संमेलनाचे अध्यक्ष भास्करराव पेरे पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला पर्यावरण हा समाजाचा विषय असल्याचे म्हटले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनी दिलेल्या शपथेप्रमाणे आपण वागत असून जीवात जीव असेपर्यंत कार्यरत राहाणार आहोत. सध्याच्या तीव्र प्रदूषणाच्या काळात सुसह्य मानवी जीवन जगण्यासाठी स्वच्छ पाणी प्या, मुलांना शिक्षण चांगलं द्या, स्वच्छता राखा, वडीलधाऱ्या, म्हाताऱ्या माणसांना त्या-त्या गावांनी स्वीकारा, सेंद्रिय शेती करा, वृक्षारोपण करा आदी कानमंत्र पेरे पाटील यांनी दिले. १९९५ पासून पेरे पाटील यांनी पाटोदा या साडेतीन हजार वस्तीच्या गावात काम सुरू केले होते. शिक्षण सातवीपर्यंत झालेल्या त्यांच्या घरी वारकरी वातावरण होते. लोक आरोग्यपूर्ण आणि दीर्घायुष्य जगले पाहिजेत म्हणून त्यांनी काम केले. ‘मूल जन्माला आले की, त्याला प्रथम ऑक्सिजन लागतो. झाडामुळे हे शक्य आहे. झाडे म्हणजे पावसाचे एटीएम आहे. प्रत्येक माणसामागे चार झाडे लावणे आवश्यक आहे.’ असा विचार त्यांनी मांडला. लग्नानंतर नवरीने माप ओलांडून येताना झाड लावले पाहिजे. झाड नाही तर लेकरं जगणार नाहीत हे सांगणे जरुरीचे आहे. पाटोद्यात माणशी चार झाडे लावली आहेत. पूर्वजांना नावे ठेवू नका, त्यांच्या काळात योग्य होते. आपण मोडतोड करून समस्या वाढविल्या. आज सर्वच प्रकारांत भेसळ वाढली आहे. समाजातील कर्त्या माणसांनी लक्ष दिले पाहिजे. समाज ऐकतो, सांगणारा योग्य दर्जाचा आणि प्रामाणिक पाहिजे. देशाचे राजकारण जातीपातीवर न करता विकासावर करायला हवे. प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे. कष्टाशिवाय पर्याय नाही. शिर्डी सारख्या देशातील धार्मिक संस्थाननी भाविकांना रोपं भेट द्यायला सुरुवात करायला हवी. रोपांची विक्रीही करता येईल. लोकं इच्छेने प्रसाद म्हणून ती सोबत नेतील लागवड करून संगोपन करतील असा विचार पेरे पाटील यांनी मांडला.
रघुनंदन रामकिशन लाहोटी यांनी ‘सर्वांगीण ग्रामीण विकास’बाबत बोलताना २०१२ साली दुष्काळ पाहिल्यावर एक गाव दत्तक घेतल्यापासून ची कहाणी सांगितली. जमिनीत पाणी मुरेल असं काम करायला पाहिजे असं ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी असंख्य प्रयत्नानंतर ‘गावात समृद्धी आली माणसं बदलली नाहीत’ अशी व्यथा बोलून दाखवत ‘काय चुकलं?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या उत्तरादाखल ‘माणूस घडविण्याच्या कामात आम्ही कमी पडलो’ असंही ते बोलून गेले. लाहोटी हे अरुणिमा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संस्था मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात ग्राम जलसंधारण, वृक्षारोपण, शिक्षण, स्वच्छता, तरुणांमध्ये कौशल्य विकासवाढ, लहान बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण, भारतीय गायीवर आधारित सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेतमालाचे थेट विपणन आदी विषयात काम करते. या संस्थेने जलसंधारण प्रकल्पांतर्गत लोकसहभागातून २५ हून अधिक वेगवेगळ्या गावांमध्ये २५० चेक dam बांधलेत. ही गावे पाणी टंचाईमुक्त झालीत. आगामी काळात असेच बंधारे आणखी १०० गावात उभारण्याचे संस्थेचे ध्येय आहे. यातून सध्या ५ हजार दशलक्ष लीटर पेक्षा जास्त पाण्याचे संवर्धन आणि जतन केले गेले आहे. ज्याचा १० हजारपेक्षा जास्त कुटुंबांना दीर्घकालीन लाभ होतो आहे. पाणी या विषयावर खूप काम केलं तर पण गावं पाणीदार होईल. सेंद्रिय शेती वाढवण्यासाठी येणारे उत्पन्न रासायनिक खताच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाइतके मिळेल याची काळजी घ्यायला हवी असंही लाहोटी यांनी नमूद केलं. ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ या विषयावर प्रा. विशाल(महाराज) फलके यांनी मार्गदर्शन केले.
‘शिर्डीतील पर्यावरण’ हा विषय ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारक यांनी मांडला. ही संस्था शिर्डीमध्ये ताजी हवा आणि स्वच्छ वातावरण मिळावं यासाठी २०१२ पासून प्रयत्न करते आहे. संस्थेने आजवर ११ हजारहून अधिक झाडे लावलीत. तेवढ्याच स्थानिक जागरूकता मोहिमा राबविल्या आहेत. रक्षाबंधन निमित्ताने झाडाला राखी बांधणे (वृक्षबंधन), ‘एक सेल्फी झाडासोबत’, वृक्षपूजन, स्वच्छ शिर्डी हरित शिर्डी प्रकल्प उपक्रम राबवलेत. शिर्डीच्या सुशोभीकरणात ग्रीन एन क्लीन शिर्डी फाऊंडेशनचे योगदान आहे. पारख यांनी आपल्या भाषणात, अर्धवट तोडलेल्या झाडांना शेणाने ड्रेसिंग करावे आणि शालेय मुलांनी घरी परतताना पाण्याच्या बाटलीत शिल्लक राहिलेले पाणी झाडाला घालावं असा विचार मांडला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बी. जे. भोसले यांनी ‘जागतिक पर्यावरण, भारताची स्थिती आणि आपली जबाबदारी’ या विषयाची मांडणी केली. यावेळी बोलताना त्यांनी प्लॅस्टिकचे दुष्परिणाम, औद्योगिक क्रांती, आर्थिक विकास आदी मुद्यांचा उहापोह करत शाश्वत विकासासाठी काम न केल्याने आपण विनाशाच्या उंबरठ्यावर असल्याचे नमूद केले. चिरकाल ठरणारा विकास विचारात यायला हवा, असं ते म्हणाले. समारोपप्रसंगी ‘वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी बोलताना निसर्ग, सामाजिक आणि मानसिक पर्यावरण विषयक उहापोह केला. सकस विचारांचं बीज वाढायला हवं असं त्या म्हणाल्या. सामाजिक पर्यावरण असल्याचे नमूद करून त्यांनी अतिशय भावनिक ओलाव्यात सामाजिक पर्यावरणाचं वास्तव मांडलं. उपाय म्हणून त्यांनी उपस्थितांना ध्यानधारणा करावयाची सूचना केली. प्राथमिक शिक्षणचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी मोफत पुस्तक वाटप योजनाबाबत बोलताना विद्यार्थ्यांची पुस्तके वापरण्याबाबतची स्थिती वर्णिली.
संमेलनाला श्रीसाईबाबा देवस्थान संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत, चांगुलपणाची चळवळचे संस्थापक राज देशमुख, अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, डॉ. प्रकाश कांकरिया यांची उपस्थिती लाभली. संमेलनात विलास महाडिक, प्रमोद काकडे यांनी संपादित केलेल्या ‘वनश्री’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
धीरज
वाटेकर
मो.
९८६०३६०९४८
संपूर्ण संमेलन चित्रीकरण लिंक ::
https://www.youtube.com/channel/UCp-CZbY3RxW4mrWMp3-FOHg/streams
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा