सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

अंगणी प्राजक्त फुलला..!

‘प्राजक्त’ आम्हाला लहानपणापासून मांगल्याचं प्रतिक वाटत आलाय. प्राजक्ताचं पांढऱ्या आणि केशरी या दोन रंगातील नाजूक फूल अतिशय सुंदर दिसतं. ते स्वतः प्रसन्न तर दिसतं पण बघणाऱ्यालाही प्रसन्न करून जातं. का कोण जाणे? पण असं हे फुलं आपल्या अंगणी बहरावं असं मात्र कधी वाटलं नव्हतं. ‘कोरोना’ लॉकडाऊन काळात घरासमोरच्या काकूंनी, ‘दादा! दारात प्राजक्तही लावं’ असं सुचवलं आणि आम्ही ते मनावर घेतलं. मग एकदा प्रवासादरम्यान महाडमधून दोनेक वर्षाचं कलम आणून लावलं. मागच्या उन्हाळ्यात त्याला चांगलं शेणखतही दिलं आणि मागच्या सोमवारच्या सकाळी (१२ डिसेंबर २०२२) त्यावर ‘प्राजक्त’चं फुलं फुललं. थोडं निरखून पाहिल्यावर दोन नाजूक फांद्यांवर अवघी आठ फुलं फुललेली दिसली. त्यातली चार-पाच जमिनीवर पडलेली. पाणी घालताना उरलेलीही खाली पडली. एका फांदीवर एक फूल मात्र शिल्लक राहिलेलं. आठवणीने सात फुलांमधली तीन ‘त्या’ काकींना नेऊन दिली. उरलेली ईश्वरचरणी अर्पण केली.

‘प्राजक्त’ला संस्कृतमध्ये ‘पारिजातक’ म्हणतात. आपल्या संस्कृतीत प्राजक्ताची फुले भगवान श्रीकृष्ण यांना आवर्जून वाहिली जातात. या सुवासिक फुलांना हरसिंगार’ (हरीचा शृंगार) असेही म्हणतात. एखाद्या व्यक्तीला आलेला थकवा प्राजक्तला स्पर्श करुन नाहीसा होतो, अशी धारणा आहे. आपल्याकडे निवळ आवडीने घराला याचं नाव देणारेही अनेक आहेत. समईच्या मंद प्रकाशात देव्हारा सजावटीत ही फुलं खूपच छान दिसतात. या फुलाला फार मोठं आयुष्य लाभलेलं नाही. जरा ऊन पडलं किंवा जोरात पाऊस आला तरी ही कोमेजून जातात. पण हाताशी असलेल्या वेळात ती सौंदर्याची आणि सुगंधाची मुक्त उधळण करतात. ‘जीवनबोध’ घडवतात. सकाळच्या वेळी ‘प्राजक्त’चं झाड हलवल्यावर गार दवाचा आणि मऊ फुलांचा स्पर्श अंगावर घ्यायला छान वाटतं. जणू सगळा दिवस अतिशय सुगंधी जावा, अशातलं सुख ते! रात्रीच्या वेळी प्राजक्त-रातराणी आदी झाडाखाली बसून त्याचा सुगंध श्वासात भरुन घेण्याइतका दुसरा परमानंद नसावा. कोकणातल्या माणसाला प्राजक्त आणि त्याचा धुंद करणारा सुगंध नवा नाही. पण सध्याच्या काळात शहरी दुनियेत त्याला अंगणी फुलताना पाहण्यातला आनंद काही औरच!

आपला प्रत्येक ‘ऋतू’ संपताना निसर्गाला काहीतरी देखणेपण देऊन जातो. परतीच्या पावसाला निरोप देत आश्विनाचे स्वागत असेच ‘प्राजक्त’च्या निर्मोही फुलांच्या सड्याने होत असावे. आपल्याला ‘प्राजक्त’ नेहमी सत्यभामा आणि रुक्मिणी कथेची आठवण करून देतो. पौराणिक मान्यतेनुसार हे झाड भगवान कृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणलेले. कोठे लावावे? यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावीत. परसदारातली ‘तगर’ जशी, फारसं कुणी लक्ष दिलं नाही तरी ‘तग’ धरून राहाते. ‘कुणी कौतुक केलं नाही, दखल घेतली नाही तरी निराश व्हायचं नाही’, असा संदेश देते. तसं या ‘प्राजक्त’चं वेगळेपण हे की, त्याची फुलं काढावी लागत नाहीत. टपटप करून त्याचा सडा पडतो. जणू आपल्याकडे आहे ते भरभरून देण्याची वृत्ती या ‘प्राजक्त’कडून घ्यावी अशातलं हे असावं.

आता भविष्यात रात्रीचं जेवण झाल्यावर अंगणात शतपावली करताना अर्धवट उमललेल्या प्राजक्ताच्या कळ्यांचा मोहक सुगंध अनुभवता येईल. पहाटे कधीतरी लेखन करत असताना तिकडे एकेक प्राजक्तचं फूल हळूहळू जमिनीवर पडायला सुरुवात होईल. पहाटेच्या शांत वातावरणात ही पडणारी फुलं बघण्यात वेगळाच आनंद असतो. एखाद्या मंद वाऱ्याच्या झुळूकीने अंगणभर पसरणाऱ्या सुगंधाने मोहून जायला होईल. बालपणीची आठवण, तारुण्यातली सहजता आणि आयुष्यभराची सुखद ठेव असलेला प्राजक्त अंगणी तर फुलला! आता मानवी मनाचे रंग जपणाऱ्या, खुलवणाऱ्या या निसर्गसुंदर ‘प्राजक्त’चा सडा कधी पडतो? ते पाहायला हवं. बाकी ‘व.पु.’नीं म्हटलेलं आहेच, ‘पारिजातकाचे आयुष्य मिळाले तरी चालेल, पण लयलुट करायची ती सुगंधाचीच!’

 

धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, खेण्ड-चिपळूण

मो. ९८६०३६०९४८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...