सोमवार, २० मार्च, २०२३

मुंबई-गोवा जागतिक ‘जैवविविधता महामार्ग’ करूया

पुढील वर्षी आपल्या देशात, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पंचवार्षिक निवडणूक उत्सव होणार आहे. मागील काही वर्षात देशातील विकासकामांच्या घोडदौडीत सर्वाधिक काळ रखडलेला बहुचर्चित प्रकल्प अशी दुर्मिळ नोंद स्वत:च्या नावावर करू पाहाणारा ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प’ पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपसूकच या महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कंत्राटी कामालाही वेग येणार आहे. त्यातच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा शासन स्तरावर काजू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रसूत झालेले वृत्त वाचल्यानंतर अलिकडे ऐकलेलं, ‘हा मार्ग जगातील सर्वोत्तम बोटॅनिकल कम् जैवविविधता (Biodiversity) महामार्ग होऊ शकतो हे वनस्पतीशास्त्राचा विशेष अभ्यास असलेल्या एका अस्सल कोकणी कृतिशील तज्ज्ञाचं चिंतन आठवलं आणि जागतिक वनदिनाच्या अनुषंगाने कागदावर उतरवलं, इतकंच! 

 

२०११पूर्वी मुंबई ते गोवा दरम्यानचा किमान प्रवास तेरा तासांचा होता. या रुंदीकरण प्रकल्पाने तो दहा तासांच्या आत येईल. भविष्यात हा महामार्ग मंगळुरूपर्यंत वाढेल. सरकारी जमीन उपलब्ध झाल्यास लॉजिस्टिक पार्क आणि ट्रक टर्मिनलही उभारली जातील. या महामार्ग प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सिंधुदूर्ग जिल्हा वगळता कोकणातील लोकप्रतिनिधींनी सक्षम पाठपुरावा केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी अनेकदा उच्च न्यायालयाला, सरकारला आदेश द्यावे लागले आहेत. २०१४पासून २०२१पर्यंत जवळपास सहा वेळा सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या तारखा बदलल्यात. महामार्ग निर्मितीच्या काळात आजवर किमान पाचेक हजार प्रवाशांचे दुर्दैवी मृत्यू झालेत. मुंबई ते गोवा हा ४७१ किमी महामार्ग (NH66) २०११पासून चार पदरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा मार्ग नवी मुंबईतील पनवेलला गोव्याशी जोडतो. पुढे तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधून थेट कन्याकुमारी आणि तामिळनाडू येथील केप कोमोरिन येथे संपतो. आम्ही ‘कोकण ते कन्याकुमारी’ प्रवास या रस्त्याने केलेला आहे. ‘सप्तकोकण’ संकल्पना समजून घेतली तर हा सारा मार्ग आपल्याला जागतिक ‘बॉटनिकल हायवे करता येणे शक्य आहे. अर्थात आपण तूर्तास लेखन मर्यादा मानून मुंबई ते गोवा मर्यादित विचार करतो आहोत. आपल्या देशात ‘बोटॅनिकल गार्डन’ आहेत. तिथे वनस्पती ह्या संशोधन आणि शिक्षणाच्या उद्देशाने वाढवल्या जातात आणि प्रदर्शित केल्या जातात. तामिळनाडूमधील उटीचे सरकारी बोटॅनिकल गार्डन गुलाबांच्या प्रचंड संग्रहासाठी प्रसिद्ध आहे. ही भारतातील गुलाबाची सर्वात मोठी बाग मानली जाते. जगातील सर्वात मोठे वटवृक्ष सांभाळणारे आचार्य जगदीश चंद्र बोस भारतीय वनस्पति उद्यान पश्चिम बंगालमधील शिबपूर, हावडा येथे आहे. निर्दयी मानवी विकृतींनी कितीही वृक्षतोड केली तरी आजही पुरेशा पर्जन्यमानाच्या बळावर असंख्य निसर्गनवले प्रसवण्याची कोकणभूमीची क्षमता सर्वज्ञात आहे. चिपळूणचे प्रसिद्ध व्यापारी श्रीरामशेठ रेडीज यांनी त्यांच्या धामणवणे येथील फार्महाऊसवर अलिकडच्या दोनेक वर्षात ग्लोबल चिपळूण टुरिझमसंस्थेच्या मदतीने दोन एकरात ‘मियावाकीजंगल तयार केले. येथे साडेतीनशे प्रकारची झाडे पाहाता येतात. कोकणातील मातीची उगवणक्षमता यातून सिद्ध होते. तिला पाठबळ देऊन या महामार्गावर वृक्ष लागवडीस बळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वसामान्य मनात बोटॅनिकल गार्डन म्हणजे एक अशी जागा जिथे आपण प्रवेश करताच आपल्याला एकाच ठिकाणी भूतलावरचे सर्वोत्तम सौंदर्य पाहायला मिळते. बोटॅनिकल गार्डनची ही संकल्पना विचारपूर्वक मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा उपयोगात आणल्यास कोकणातील नष्ट होण्याच्या किंवा धोक्यात आलेल्या वनस्पतींचे संवर्धन करता येईल. कोकणचे पर्यटन अधिक हरित आणि पर्यावरण पर्यटन म्हणून बळकट होण्यास मदत होईल. हा बोटॅनिकल हायवे पाहायला जगातून पर्यटक येतील.

 

या हायवेचे वृक्ष लागवडीचे उदिष्ट कितीही आकर्षक असले तरीही प्रत्यक्षात जून २०२१मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ‘मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप ते खारेपाटण दरम्यान वनसंज्ञेखालील संपादित करण्यात आलेल्या भूमीत दुतर्फा झाडे तात्काळ लावण्यात यावीत. अन्यथा महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम करण्यास अनुमती दिली जाणार नाही’, अशी नोटीस सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला बजावली होती. शासनाच्या एका विभागाने काम करण्यासाठी शासनाच्याच दुसऱ्या विभागाला नोटिस पाठवण्याची घटना या प्रकल्पाने अनुभवली. भविष्यात वृक्षतोडीचा परिणाम कोकणच्या पर्यावरणावर होईल, वातावरण बिघडून सह्याद्रीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण घटेल असे पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले गेले आहे. हे प्रश्‍न उद्‌भवू नयेत यासाठी मुंबई-गोवा महामार्ग हरीत महामार्ग बनविण्याची घोषणा झाली होती. चौपदरीकरणासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या तिप्पट झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. स्थानिक हवामानात वाढतील आणि भरपूर प्राणवायू सोडतील अशा झाडांची निवड करण्यात येणार होती. प्रत्यक्ष लागवडीसाठी रस्त्याजवळच्या ग्रामपंचायतींची मदत घेण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात छोट्या उंचीची, दुसऱ्या भागात मध्यम आणि तिसऱ्या टप्प्यात उंच वाढणारी झाडे अशा चढत्या क्रमाने लावल्यास ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही. पर्यावरणावर होणारे परिणाम टाळता येतील. असे सारे छान कागदोपत्री नियोजन होते. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमांत महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर अंतरावर ५८३ झाडे लावावीत असे नमूद आहे. त्यानुसार या महामार्गावर प्रति किलोमीटरला ५८३ झाडे (रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी सहा मीटरमध्ये छोटी, मध्यम आणि मोठी अशी तीन स्वरूपाची झाडे) म्हणजे त्यात छोट्या उंचीची ३३३, मध्यम उंचीची १६८ आणि उंच ८४ झाडे असे गणित निश्‍चित झाले होते. तर १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९० गावांतून जाणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान प्रति किलोमीटर १३२६ झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे आहे. कोकणात मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी झाडे लावण्याचे नियोजन होणे गरजेचे असताना सध्या फक्त काजू लागवडीचा विषय पुढे येतो आहे. या महामार्ग रुंदीकरणात पहिल्या ८४ किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे २५हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. तर महामार्गाच्या मध्यवर्ती चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी आणि लांजा या चार तालुक्‍यांतील सुमारे ५५ हजार ८८९ झाडे तोडली गेली आहेत. चौपदरीकरणासाठी पोलादपूर तालुक्यात ६९७ वृक्ष तोडले गेलेत. सर्वाधिक वृक्षतोड कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि सुकेळी खिंड भागात झालेली असावी. जवळपास सर्व ठिकाणच्या वृक्षतोडीला किमान आठेक वर्षांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणी आजही वृक्षारोपण झालेले नाही. कोकण रेल्वे प्रकल्पाप्रमाणे स्वतंत्र कार्यभार म्हणून या प्रकल्पाकडे न पाहाणे आणि अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या याचाही मोठा फटका या प्रकल्पाला बसलेला आहे. वृक्षतोडीमुळे आज मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याशेजारी थोडयाश्या विसाव्यासाठीही सावली शिल्लक राहिलेली नाही. पूर्वी हा हायवे झाडाझुडपांमुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला होता. खरंतर तो तसाच ठेवून सागरी महामार्ग अधिक सक्षम करणे किंवा सध्याचा प्रस्तावित नवा कोकण मार्ग निर्माण करणे शक्य होते. मात्र वृक्षतोडीचा अतिप्रचंड हव्यास कामी आला आणि कोकण महामार्ग भकास बनला. त्यातच कोकणात वणवे, चोरटी वृक्षतोड, प्राणीहत्यांनी इथल्या निसर्गाला रक्तबंबाळ करून सोडले आहे. ‘वृक्षप्रेमी’ जनता यावर पावसाळी लागवड-जतन आणि संवर्धन उपक्रमांची मलमपट्टी तरी किती लावणार?

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात दुतर्फा वृक्षारोपण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची की राज्याची? यावरूनही यापूर्वी कोर्टात चर्चा झाल्या आहेत. आज या महामार्गावरून प्रवास करताना पूर्वीच्या अनेक पाऊलखुणा पुसल्या गेल्याच्या, असंख्य संजीवांची निवासस्थाने असलेले बडे वृक्ष जमीनदोस्त झाल्याच्या आठवणी मनाला छळतात, असंख्य वेदना देतात. २०१८साली कणकवली शहरातील प्रसिद्ध पुरातन वड जमीनदोस्त झाला त्या सायंकाळी आम्ही दुर्दैवाने तिथे मुक्कामी होतो. शहरातील बसस्थानक आणि हॉटेल सह्याद्रीसमोरील या वटवृक्षाने मागील किमान शंभर वर्षात असंख्य पक्षांना आधार दिला होता. प्रवाशांना सावली दिली होती. त्या सायंकाळी अचानक जगण्याचा आधार हरविलेला पाहून दिवसभर फिरून परतलेली थकली-भागलेली पाखरं जीवाच्या आकांताने आकाशात घिरट्या घालताना पाहिली आणि त्या रात्री आमची जेवणाची इच्छाच मेली इतकी अस्वस्थता आली होती. निसर्गाविषयी विलक्षण आत्मियता बाळगणारी माणसे आपल्याकडे खूप आहेत. त्याचवेळी आपल्याकडे शहरा-शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या आडवी आलेली, वीजेच्या तारांशी सलगी करू पाहाणारी, सर्वसामान्यांनी मायेनं वाढविलेली झाडी निर्दयतेने तोंडणारे स्थानिक प्रशासन आणि वीज कंपनीचे कर्मचारीही आहेत. आपल्याकडे असंख्य शहरातील भूजलपातळी दिवसेंदिवस कमालीची खालावते आहे. आपण शहरातून वास्तव्य करताना ‘वृक्षकर’ भरूनही वृक्षसंस्कृती संपवत चाललो आहोत. रखरखत्या उन्हात आता नागोठणे जवळच्या वाकण नाक्यावरील वटवृक्षाची आठवणही सतावते. चिपळूणनजीक सावर्डे गावीही असाच पुराणवृक्ष उद्धवस्थ झाला. पूर्वीच्या कोकण महामार्गावर याच झाडांनी प्रवासी निवारा शेडची भूमिका बजावली होती. आम्ही करंटयांनी ‘गरज सरो वैद्य मरो’ अशा पद्धतीने शतकांचे साक्षीदार असलेल्या असंख्य पुराणवृक्षांचा निर्दयतेने बळी घेतला. मुंबई-गोवा जागतिक ‘बॉटनिकल हायवे या निर्दयतेचे प्रायश्चित करण्याची संधी ठरू शकते. आम्ही सर्वानी ती स्वीकारण्याची गरज आहे. अन्यथा निसर्गशक्ती आपल्यावर सूड उगवल्याशिवाय राहाणार नाही.

 

मुंबई ते गोवा हा कोकण पर्यटन महामार्ग जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ठ बोटॅनिकल कम जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारणे शक्य असल्याची संकल्पना आम्हाला ज्यांनी सांगितली त्या, आपल्या सुमारे १७ एकरच्या जंगलात २५ वर्षांच्या अविश्रांत कष्टातून जगातील विविध वनस्पतींचं जातिनिहाय वैविध्य फुलविणाऱ्या, वनस्पतीशास्त्राचे कृतिशील तज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे डोळ्यांच्या हॉस्पिटलचे नेटवर्क उभारणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई सरांना आम्ही याबाबतचे नियोजनही विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘मुंबई गोवा महामार्गाच्या ‘कशेडी ते खारेपाटण’ या रत्नागिरी जिल्हा हद्दीतील दोनशे किमी मार्गात वृक्ष लागवडीसाठी दुतर्फा चारशे किमी अंतर उपलब्ध आहे. साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक प्रजाती अशा पद्धतीने विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातील उपलब्ध चारशे किमी अंतरात आपल्याला विविध चारशे प्रजाती लावता येतील. इतक्या प्रजाती विचारपूर्वक जतन केलेला महामार्ग जगात कुठेही नाही आहे. प्रजातीची निवड करताना कोकणातील डोंगराळ, सपाटीचा, उताराचा प्रदेश याचा विचार करून प्रत्येक पंचवीस किलोमीटरच्या टप्प्यात एकाच झाडाच्या विविध प्रजातींची लागवड करणे आणि त्याच पंचवीस किमीच्या पट्ट्यात एका ठिकाणी विशिष्ठ वर्तुळ करून त्याच झाडाची सर्वोत्कृष्ठ प्रजातीची लागवड करण्यासारख्या संकल्पना अमलात आणता येतील. यातून कोकण हायवे हा ‘जगातील पहिला बोटॅनिकल हायवे’ तर होईलच पण तो उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्गही होईल. असे झाल्यास जगातील असंख्य अभ्यासक, संशोधक हा हायवे पाहायला येतील. वृक्ष लागवडीच्या एक किमीच्या मधल्या अंतरात आपल्याला काही ठिकाणी जाळयांचे कुंपण करून दुर्मिळ वेली, वनस्पती, फुलझाडे लावता येतील. अशा पद्धतीने आपण हजारभर प्रजातींचा हा महामार्ग उभा करू शकतो. काही ठिकाणी खाड्यांच्या परिसरात आपल्याला कांदळवनांच्या प्रजातींची लागवडही करता येईल. मात्र शासनाने काजूची झाडे कोकणातील मुंबई गोवा या पर्यटन महामार्गाच्या दर्शनी ठिकाणी अजिबात लावू नयेत. काजूच्या कलमांना १५-२० वर्षांहून अधिकचे आयुष्य नाही. ही झाडे दर्शनी खूप बोजड दिसतात. त्या झाडांचा कचरा खूप पडतो. त्याच्यावर रोगही लवकर येतो. या कारणांमुळे काजूची झाडे हायवेवर लावण्यातील शासकीय गुंतवणूक वाया जाण्याचा धोका आहे. त्यामुळे कोकण पर्यटन महामार्ग साकारताना आपल्याला ‘जगातील पहिला बोटॅनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारण्याची, वृक्ष संवर्धनाची खूप मोठी संधी आहे. हा विचार करून सर्वांनी एकत्र येऊन महामार्गाच्या टप्प्यातील गावातील वृक्षरक्षकांचे गट करून, मार्गावरील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, ग्रामपंचायती आदींना अनुदान किंवा मानधनासह जबाबदारी दिल्यास शासनाच्या वृक्ष लागवडीच्या बजेटमध्ये जागतिक दर्जाचा सर्वोत्कृष्ठ बोटॅनिकल कम जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ साकारणे शक्य आहे.’

 

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे गावी संपन्न झालेल्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनावरून परतताना आठवणीने आम्ही विशेष आग्रहावरून आवर्जून, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई सरांना त्यांच्या भांबेड गावी जाऊन भेटलो होतो. जागतिक दर्जाची वैशिष्ट्य सांभाळणारी त्यांची बाग फिरताना बोलण्याच्या ओघात सरांनी आमच्याजवळ मुंबई गोवा हायवे हा ‘जगातील पहिला बोटॅनिकल कम उत्कृष्ठ जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ होऊ शकतो ही भूमिका बोलून दाखविली होती. कोकणभूमीत हे होणे शक्य असल्याने हा जगातील असा पहिला हायवे ठरेल असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत त्यांनी कोकणातील काही लोकप्रतिनिधींशी चर्चाही केली होती. जागतिक वनदिनाच्या पार्श्वभूमीवर, कोकणातील या महत्त्वाच्या हायवेच्या दुतर्फा ‘काजू फळपिक विकास योजना’ अंतर्गत काजू लागवड केली जाणार असल्याचे वृत्त वाचनात येताच आम्हाला हे सारे लिहावेसे वाटले. करमळसारखे (एलिफंट अँपल)अनेक देशी आणि कोकणच्या मातीशी नाते सांगणारे वृक्ष आज कोकणातून गायब झालेले आहेत. अशा साऱ्या दुर्मिळ वृक्षांची जाणीवपूर्वक जोपासना करण्याचे अभियान पुढील काळात कोकण महामार्गावर उभे राहिल्यास ‘जगातील पहिला बोटॅनिकल हायवे कम् जैवविविधता (Biodiversity) महामार्ग’ अशी एक वेगळी ओळख या कोकण पर्यटन महामार्गाला मिळवून देता येणे सहज शक्य आहे. यासाठी ‘एकच लक्ष्य दुतर्फा वृक्ष’ हा भविष्यातील मुंबई-गोवा महामार्गाचा वृक्षसंवर्धन मंत्र व्हायला हवा आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

बुधवार, १ मार्च, २०२३

डोंगर-बागांचे ‘निसर्गसौंदर्य’ काळवंडतेय!

    याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या वार्षिक आगींमुळे वनक्षेत्रही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. अशा स्थितीत आपल्या सर्वांचा ‘गॉडफादर’ सह्याद्री आणि तिथली वनराई कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसताना आपल्याला बरंच काही देते आहे. या वनराईला उन्हाळ्याच्या हंगामात काळवंडलेली पाहाणं दुर्दैवी असतं. आपल्याकडे देशभरातील जंगलांना लागणाऱ्या आगींवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी डेहरादूनहून नियंत्रित होणारे सॅटेलाईट तसेच फायर ब्लोअर आणि ड्रोनने पाण्याची फवारणी करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तरीही राज्यात पावसाळा सुरु होईपर्यंत पदोपदी वणवे पेटत राहातात. अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे यंदा (२१ फेब्रुवारी) कोकणातील रत्नागिरी नजीकच्या हातखंबा तारवेवाडी भागातील काजूच्या बागेला लागलेला वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यालाच आगीत होरपळून आपला प्राण गमवावा लागले. स्वर्गीयसौंदर्य अनुभवणाऱ्या नजरांना काळवंडलेलं कोकणपाहाताना ‘ही मानवनिर्मित वणवा प्रवृत्ती जळणार तरी कधी?’ हा प्रश्न वर्षानुवर्षे छळतो आहे.

महाराष्ट्रातील जंगले ही कोरडी पानझडी जंगले (dry deciduous forests) आहेत. जानेवारीपासून आपल्याकडे पानगळतीला सुरवात होते. ही पानगळती आणि वाढलेले गवत वनवणव्यांना पोषक ठरते. वणव्यांचा कालावधी नोव्हेंबर ते मे असला तरी शिमग्यात हे प्रकार अधिक वाढतात. संस्कृती म्हणून शिमगोत्सव आम्हाला कितीही प्रिय असला तरी होळीसाठी झाडं तोडणं पटणारं नाही. आपण बदलत्या काळात प्रतिक म्हणूनही कचऱ्याची होळी करायला हवी. आपण आपल्या घराला, इमारतीला, कंपनीला आग लागली तर किंचाळतो, विव्हळतो, हतबल होतो. मग माळरानावर, डोंगरात वणवा पेटतो तेव्हा तिथल्या सजीवांनी कसा आक्रोश करायचा? त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत का पोहोचत नसावा? वणवा लावणारी प्रवृत्ती परदेशातून येत नाही. ती आपल्यातच आहे. जंगल माफियांसह गुरांसाठी अधिक चाऱ्याची उगवण व्हावी, काटेकुटे जळून जावेत, शेतीत राख येऊन उपन्नवाढ व्हावी, ससे पकडण्यासाठी, शिकारीस मदत, सागवान तस्करी, नाईट स्टे, जमीन जाळण्याची पद्धत, कोळसा बनवणाऱ्या टोळ्या, शेतातील कचरा आणि पालापाचोळा साफ व्हावा अशा एक ना अनेक गैरसमजूती या प्रवृतीमागे असाव्यात. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण कार्बन डायऑक्साईड वातावरणात वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढते आहे. सततच्या वणव्यांना कंटाळून शेतकऱ्यांनी जमिनी विकाव्यात, शेती-बागायती बंद करावी, तो देशोधडीला लागावा, त्याने पाळीव जनावरे विकावीत, जमिनी नापिक व्हाव्यात, जेणेकरून जमिनी कमी भावात बळकावता येतील असंही षड्यंत्र यामागे असू शकतं. आपल्या समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात अनास्था आहे असं म्हटलं जातं. ही अनास्था काही प्रमाणात असते काही प्रमाणात नसते. ही अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहाण्याची आवश्यकता आहे. आजचा काळ हा प्रत्यक्ष बघण्याचा आणि अनुभवण्याचा असूनही वणव्यासारख्या प्रवृत्ती फोफावत आहेत. या बदललेल्या समाजजीवनाचा विचार करायला हवा आहे. आपल्या समाजातील ही वणवा प्रवृत्ती नष्ट व्हावी यासाठी सतत प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. चिपळूणला नुकताच ‘लोककला महोत्सव’ झाला. लोकांनी याला उदंड प्रतिसाद दिला. आपल्याच नाही तर देशभरातील संपूर्ण लोककला या शेतकरी जीवनाशी जोडलेल्या आहेत. त्या कमी झाल्या कारण शेती करणारी मंडळी आपल्याकडे कमी होत गेलीत. वणव्याचे चक्र असेच सुरु राहिले तर भविष्यात त्याचे असेही दुष्परिणाम आपल्या समाजाला भोगावे लागणार आहेत.

यंदाच्या मोसमात रायगडच्या उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला आठ दिवसात दोनदा आग लागली. या डोंगराच्या पायथ्याशी ओ.एन.जी.सी.चा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. १० जानेवारीला आंजर्ले परिसरात वणवा लागून ३० बागा खाक झाल्या. १७ जानेवारीला खेडच्या मोरवंडे-बोरज भागात वणवा लागला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राजापूर तालुक्यातील सागवे-गोठीवरे परीसरात सकाळी लागलेल्या आणि ५ किमी पसरलेल्या वणव्यात जवळपास ३५ शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या. २० फेब्रुवारीला अंबरनाथ, बदलापूर (टाहुली डोंगर) आणि वांगणी, पालघरच्या सापणे-वरले भागात वणवे पेटले. पोलादपूर जवळच्या चरई महादेवाच्या डोंगराला आग लागून मोठी हानी झाली. अलिबाग समुद्रकिनारी सुरूच्या बनाला, मंडणगड जवळच्या वेळास जंगलाला, माणगाव तालुक्यातील वडघर डोंगरावर आग लागून जंगल संपत्तीचं नुकसान झालं. यंदा सिंहगड, कात्रज भागात वणवा लागला. कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील वनौषधी पार्क, कोरीवडे, पेरणोली, हरपवडे भागातील दोनशे एकर जंगलाला वणवा लागला होता. नाशिक जिल्ह्यातील मातोरी गावाच्या गायखोऱ्यात ९ फेब्रुवारीला दुपारी वणवा लागल्याने शेकडो एकर जंगलक्षेत्र जळून खाक झाले. हा वणवा गाव शिवाराकडून लागला होता. वृक्षवल्ली फाउंडेशन, वृक्षमित्र परिवार आदींनी चार तासांच्या अथक प्रयत्नांनी वणवा विझवला. त्यामुळे अधिकच्या वनक्षेत्रात वणवा पसरला नाही. अहमदनगरच्या चांदबीबी महाल येथे (१४ फेब्रुवारी) वणवा पेटलेला असताना तरुणांनी तो विझवला. म्हसवे (२३ फेब्रुवारी) गावपठारावरील जंगलात वणवा लागला होता. ही माहिती मिळताच वर्ल्ड फॉर नेचर आणि दुर्ग शिलेदारांनी घटनास्थळी पोहोचून तो आटोक्यात आणला.

यातले काही वणवे नैसर्गिक असतात. १९७१ पासून सातत्याने उष्ण लहरींचे प्रमाण वाढत असून शीत लहरींचे प्रमाण कमी होत आहे. निसर्गातील हा असमतोल जंगलातील अपवादात्मक नैसर्गिक वणव्यांना निमित्त ठरतो आहे. बाकी मानवनिर्मित वणवे विझवायचे सरकारी आणि स्वयंसेवी प्रयत्न सुरु असतात. मीडियात ते जागाही मिळवतात. पण वणवा हा विषय इतका मोठा आहे की अख्खं गाव जरी विझवायला गेलं वणवा विझत नाही. कोणा एकाच्या विकृत डोक्यातील ही आग क्षणभरात असंख्य वन्यजीवांना सैरावैरा धावायला भाग पाडते. अभ्यासकांच्या मते २००३ पासून आपल्या देशात जंगलातील वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. वणव्याच्या प्रकोपातून होणारी पक्षी, त्यांची घरटी, सरपटणारे प्राणी, जैवविविधता यांची जीवितहानी हा मोठा चिंतेचा विषय आहे. डोंगरात वाढलेल्या गवताला विशेष किंमत मिळत नसल्याने वणवा लागू नये म्हणूनची गवतकाढणी शेतकऱ्यांना परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीही डोंगराळ भागातील गवत काढणी आणि येणारा वाहतूक खर्च विचारात घेऊन या गवतापासून कागद, पुठ्ठा, प्लायवूड आदी बनवणे शक्य आहे का? यावर अधिकचे संशोधन व्हायला हवे आहे. गवताची अधिकाची उत्पादकता सिद्ध झाल्यास ‘वणवा’ प्रवृत्ती कमी होऊ शकेल. डोंगराला लागणारा वणवा आपले अमर्याद नुकसान करू नये म्हणून गवताचा पाच सहा फूट रुंदीचा पट्टा आपल्याच देखरेखीखाली जाळण्याची पद्धत आहे. कोवळ्या झाडांना झळ पोहोचू नये म्हणून पावसाळ्यानंतर वाढलेले रस्त्याकडले गवत आपल्याकडे काढले जात नाही. म्हणून किमान आपण आपल्या खाजगी बागांमध्ये वाढलेले गवत काढणे जरुरीचे आहे. जंगल भागात वन खात्याने गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. गस्ती दरम्यान विनाकारण जंगलात फिरणाऱ्या लोकांची झडती घ्यायला हवी आहे. जंगलात लाकूडफाटा आणण्यासाठी जाणाऱ्यांची चौकशी व्हायला हवी आहे. जंगलातील अडचणीच्या जागा मोकळ्या करण्यासाठी वणवे लावले जातात. वणवे थांबवण्यासाठी जंगलात जाण्या-येण्याच्या मार्गांवर वाटेवर असलेल्या शेवटच्या घरात राहणाऱ्या गावकऱ्यांनी रखवालदार व्हावे लागेल. ग्रामपंचायती आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीने अशा मार्गांवर शेवटच्या घरात जंगलात जाताना आणि जंगलातून बाहेर येताना नोंद करण्यासाठी नोंदवही ठेवावी. वहीतून जंगलात दर दिवशी कोण जाते? वणवा लागलेल्या काळात जंगलातून कोण परतले? याचा अंदाज अशा प्रयत्नातून बांधता येईल.

जंगलांना निसर्गाने पुर्न:निर्माणाची क्षमता दिल्याने ऋतुचक्र बदलल्यावर पुन्हा नव्याने जैवविविधता निर्माण होत राहाते हे खरे असले तरी सततच्या वणव्यांचा जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो का? वणव्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या जंगलांचं जीवन पूर्वीसारखं होतं का? हेही तपासण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणीयदृष्ट्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल घडवून आपल्याला निसर्गासोबत चांगलं जगणं शिकावं लागेल. मध्यंतरी आम्ही चिपळूणकरांनी ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’ म्हणत अखंड कोकण वणवा मुक्त व्हावं म्हणून ‘वणवा मुक्त कोंकण’साठी प्रयत्न केले होते. आमच्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असेच होते. अर्थात वणवा लावणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याद्वारे जबरी शिक्षा मिळाल्याच्या नोंदी समाजमनात कर्णोपकर्णी होईस्तोवर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून यावर ठोस उपाययोजना सापडेपर्यंत किमान सह्याद्रीच्या कडेकपारीत, डोंगरातील चढ-उतारावरील वणवे बघत काळवंडलेलं कोकणअनुभवणे संवेदनशील मनांसाठी दुर्दैवी आहे.

 

-धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २५ वर्षे पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

‘कोकणी’ लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ साधणारा महोत्सव

    कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, चिपळूणात नुकताच (५ ते ८ फेब्रुवारी २०२३) ‘पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य’ महोत्सव पार पडला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोकण प्रदेश हा सांस्कृतिक परंपरेने आणि लोककलेने समृद्ध आहे. निसर्गरम्य कोकणासह जगात जेथे लोककलाविष्कार आहेत तेथे आजही निसर्गसंवाद साधणाऱ्या लोकसमूहांचे अस्तित्व आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव महत्त्वाच्या उत्सवांशी पारंपरिक लोककला निगडीत आहेत. कोकणभूमीत लोककलांचे वैविध्य लपलेले आहे. बदलत्या काळात ‘पर्यटन’ अंगाने विचार करता या साऱ्याची ‘मूल्यवृद्धी’ होऊन लोककलांना ‘राजाश्रय’ मिळायला हवा आहे, ही बाब या लोकोत्सवाने अधोरेखित केली. कोकणात ‘पर्यटन’ विकासाचे वारे स्थिरावत असताना लोककला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्याला पर्यटनाशी जोडून नवा विचार देणारा आणि भव्य उत्सवी वातावरणात लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवण्याचा झालेला हा प्रयत्न लोककलांची ‘पर्यटन’ अंगाने ‘मूल्यवृद्धी’ साधणारा ठरेल अशी उभारी संपूर्ण कोकणातील लोककलावंतांना देण्यात हा आनंदोत्सव प्रचंड यशस्वी ठरला हे वास्तव आहे.

    महाराष्ट्रात लोककला महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दुरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. कोकण प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड मार्ग आदी प्रकल्पांचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. उद्घाटनापूर्वी आयोजक संस्था असलेल्या ‘लोटिस्मा’ने उभारलेल्या कलादालनात ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्राला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम लोककलावंत प्रभाकर मोरे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा संयोजन समितीचे संयोजन समितीचे अध्यक्ष ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे आणि समन्वयक प्रकाश देशपांडे उपस्थित होते. चार दिवसांच्या लोककला महोत्सवाने चिपळूणच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचा नवा तुरा खोवला गेला असल्याची भावना समारोपप्रसंगी डॉ. चोरगे यांनी व्यक्त केली. खरंतर साहित्य संमेलने, नाट्य संमेलन आदी कार्यक्रम पाहण्याचा, त्यात सहभागी होण्याचा अनुभव असला तरी ‘लोककला’ हा पूर्णतः वेगळा विषय होता. त्याची नाळ कोकणातील ग्रामीण जीवनाशी जोडलेली आणि नागरी भागात त्याचे सादरीकरण होणार होते. डहाणूपासून सावंतवाडी पर्यंतच्या लोककला आणि कलावंतांना एकत्र आणून चार दिवस महोत्सव घेणे तसे सोपे नव्हते. महोत्सवाचा कालावधीही तसा विशेष अनुकूल नसावा. एकदा तारखांत बदलही करून झालेला. असं असतानाही रसिक प्रेक्षकांच्या अतिप्रचंड गर्दीमुळे कोकणातील लोककलांना आजही गर्दी करणारा प्रेक्षकवर्ग असल्याचे स्पष्ट झाले. या निमित्ताने वाचनालयाने आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे नुसतेच रंगमंचावर प्रायोगिक सादरीकरण न करताना अनुषंगिक आणि कसदार परिसंवादही आयोजित केले होते. कोकणातील लोककलांची आवड असलेल्या अनेकांसाठी हा सारा खटाटोप जणू ‘वर्कशॉप’ ठरला. धनगर समाजाचे गजनृत्य या महोत्सवाने लोकांसमोर आणले. पूर्वी हा समाज जंगलात राहायचा. वाद्याच्या आवाजाने हिंस्र प्राणी दूर जायचे, म्हणून यांनी आपल्या लोककलांत जगण्यात वापर केला होता. कोकणातील कुंभार क्रिया ही आजवर कोणत्याही लोककला मंचावर सादर झालेली नव्हती. कुंभार क्रिया हा ‘विधी’ मनुष्याच्या मृत्युनंतर केला जातो. कुंभार क्रिया केल्याशिवाय मोक्ष नाही, अशी समाजभावना आहे. कुंभार समाजातील मंडळी ही क्रिया आजवर सांभाळून आहेत. ती या निमित्ताने रंगमंचावर आली. नमन, जात्यावरच्या ओव्या, पारंपारिक गाणी, बासरी वादन, प्रबोधन गीत, मालवणी गजाली, जाखडी, काटखेळ व संकासूर, गोंधळ, गज्जोनृत्य, देवाला नवस लावण्याच्या पध्दती, समरगीत, ऐतिहासिक पोवाडा, कोकणी गीत, भारुड, दशमुखी रावण नमन, म्हणी आणि शिव्या, पोवाडा, नकटा, कोळीनृत्य, डेरा,  असे कितीतरी प्रकार महोत्सवात चार दिवसात सादर झाले. महोत्सवाच्या निमित्ताने रसिक खवय्यांनी खास कोकणी खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनाही भरभरून प्रतिसाद दिला. यात संगमेश्वरी पद्धतीचे वडे-मटण, चिकन-वडे, आंबोळी, अळूवडी, थालीपीठ, घावणे, झुणका-भाकरी यासह कोकम, आंब्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध होते. रसिकांची खाऊगल्लीत मोठी गर्दी उसळली होती. महोत्सवाच्या प्रत्येक सायंकाळची सुरुवात कोकणी पद्धतीने गाऱ्हाणे घालून करण्यात आली होती. खरंतर अख्खा महोत्सव ‘लक्षवेधी’ ठरला असल्याने कोणत्या लोककला प्रकाराला अधिक ‘लेखन’न्याय द्यावा हा प्रश्न पडावा! शेवटच्या दिवशी मालवणी बोलीत गाऱ्हाणे घातले गेले. अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या रत्नसिंधू फाऊंडेशन (कणकवली) प्रस्तुत महिला दशावताराने महोत्सवाची सांगता झाली. महोत्सवात पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील आदिवासी बांधवांच्या तारपा नृत्याने सर्वांची मने जिंकली. इतकी की लोकनृत्य संपल्यावर खासबाब म्हणून रसिकांनी आणि आयोजकांनीही यात सहभाग घेत रंगमंचावर ठेका धरला. कोकणातील लोककलांना व्यासपीठ मिळावे. पालघर ते सिंधुदूर्गपर्यंतच्या लोककला एकाच व्यासपीठावर सादर व्हाव्यात. त्या जगासमोर याव्यात. लोककलांचे एकत्रित संकलन व्हावे हा आयोजकांचा उद्देश या निमित्ताने सर्वांसमोर आला.

‘लोकसंकृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्रीगीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ परिसंवादातून पुढे आला. स्त्रीगीतांमधील अभिव्यक्ती नैसर्गिक आहे. निसर्गाधिष्ट, श्रमाधिष्ट अभिव्यक्तीची रुपे आपल्याला या गीतांमधून दिसून येतात. वारली समाजातील महिला चित्रांतून आपले जीवन रेखाटतात. स्त्रीची प्रतिभा निसर्गाशी जोडली गेली आहे. आपण किती उच्च पातळीवरील अभिव्यक्ती निर्माण करीत आहोत? आपण उत्तम कलावंत आहोत? याची जाणीव स्त्रियांना नसते. ओव्या हा लोककलेचा सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. परमेश्वराला सर्व अर्पण करण्याची यात भावना आहे. भोग, निष्कर्ष आणि चिंतन याचे समग्र दर्शन ओवींमधून घडते. या महिला अशिक्षित असूनही त्यांच्याकडे सूज्ञता असते. असे मुद्दे यावेळी चर्चिले गेले. महत्त्वाचे म्हणजे लोककलेतील परंपरागत वाद्ये शिकायला गुरू लागत नाही. ती उपजत किंवा प्रयत्नांनी ती साध्य होते. म्हणून तिला ‘कला’ म्हणतात. मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे या लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत परिसंवादातून पुढे आले. व्ही. शांताराम यांनी १९६० साली भारतीय लोककलांचा माहितीपट तयार केला होता. पूर्वी देवगडमध्ये 'घुमट' वाद्य आणि खेळ होते. आता ते नष्ट झाले आहे. लोककला हे मनोरंजनापासून प्रबोधनापर्यंतचे माध्यम आहे. समाजातील अपवित्र नष्ट व्हावे, ही लोककलांची भूमिका आहे. कोकणातील मागील चार-पाचशे वर्षांच्या संघर्षात लोककलांचा मोठा वाटा मोठा आहे. श्रीरामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख आहे. अर्थात लोककलेचा प्रवास किमान पाचशे वर्षांचा नक्की असावा. कोकणातील जाखडी लोककलेमध्ये आधुनिकता आणि अश्लिलता आलेली आहे. अशात तरुणपिढीने मूळ परंपरा सोडू नये, पारंपारिक पध्दतीनेच जाखडीचे सादरीकरण व्हायला हवे. अश्लिलता टाळायला हवी असा सूर ‘जाकडी : काल, आज आणि उद्या’ परिसंवादातून उमटला होता. जाखडीमध्ये नृत्य, गायन आणि वादन असा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. जाखडीमध्ये प्रश्न विचारण्याची पध्दत आहे. यामुळे आपल्या पौराणिक ग्रंथांचा अभ्यास होत असतो. सर्वत्र नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचिकता असते. त्यामुळे काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या लोककलांचे भवितव्य उज्ज्वल असा सूर नमनाचा अनुबंध परिसंवादात उमटला. लोककला समाजाचे अनुकरण करत असतात. प्रत्येक लोककलेला स्वतःचा आकृतिबंध असतो. लोककलांचा मूळ हेतू प्रबोधनाचा असला तरी दिवसभर श्रमणाऱ्यांना थोडा विसावा मिळावा हेही त्यामागचे एक कारण आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी लोककलांचे स्वरूप धार्मिक होते. स्वातंत्र्यकाळात त्यात स्वातंत्र्याविषयीच्या जनजागृतीचा अंतर्भाव झाला. स्वातंत्र्यानंतर ते प्रबोधनाचे माध्यम बनून कार्यरत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन ही प्राचीन आणि स्वतंत्र परंपरा कुणबी समाजाने जोपासली आहे. लोककलेचा समाजमनावर आणि समाजाचा कलेवर परिणाम होतो आहे. नव्यांना लोककलांशी जोडायचे असेल तर आपल्याला काही बदल स्वीकारावे लागतील. महोत्सवात ‘कोकणातील खाद्यसंस्कृती’ आणि ‘शाश्वत पर्यटन’ याही विषयावरील पार पडले.


खरंतर जगभर आणि देशभर पर्यटन करताना आपण तिथल्या लोकसंस्कृतीचा पोशाख आवडीने परिधान करून आपलीच छायाचित्रे पैसे देऊन मुद्दामहून काढून घेत असतो. भविष्यात कोकणातील विविध लोककलांच्या ड्रेसचे पर्यटन अंगाने असे व्यावसायिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण कोकणभूमी ही जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणात रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडीत धडपड अलिकडे गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यांना चित्रपट अंगाने किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे आहे.  कांतारा या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणारा सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कोला उत्सवासह भूता कोला प्रथा-परंपरा याचं अचूक चित्रण घडलं आहे. या प्रथेत भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर ह्या मंडळींनी तग धरावा यासाठी हा ‘लोककला महोत्सव’ लोककलावंतांच्या जीवनातील ‘पथदीप’ ठरला आहे.

 

धीरज वाटेकर

लेखक, कोकण विकास, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते

मो. ९८६०३६०९४८

 

(सर्व छायाचित्रे :: श्री. संजय शिंदे, ‘चित्रम’ डिजिटल, चिपळूण)





गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

कोकणात स्थिरावलेय ग्रामीण साहित्य-संस्कृतीची चळवळ


राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य दिसत नसताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई संस्थेने गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वी करून राज्यातील या क्षेत्रातील गुणवत्तेच्या पातळीचे मूल्यांकन करू पाहाणारा एक नवा बेंचमार्क सेट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास, संस्कृती, नाटय, ग्रंथालय चळवळींचे 'जाणकार' व्यक्तिमत्त्व प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्यातील तळवडे येथे १० ते १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपन्न होत आहे. संघाचे अध्यक्ष आणि 'मोडी दर्पणदिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ग्रामीण मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जडणघडणीची चळवळ कोकणात चांगलीच स्थिरावली आहे. त्या निमित्ताने ग्रामीण साहित्य, सांस्कृतिक चळवळीचा आणि समोर असलेल्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...

कोकणभूमीला र. वा. दिघे, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, साने गुरुजी, कवी माधव, कवी आनंद, 'पद्मश्री' मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद काळे आदी ग्रामीण भागातून पुढे आलेल्या असंख्य दमदार लेखकांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. लांजा तालुक्यातील हरचिरी या छोट्या गावात जन्मलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी याच संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना, ‘समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानके घडत असतात. लेखकाने ती टिपायची असतात. लेखन साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःला घडवायचे असते आणि कायम जमिनीवर राहायचे असते. वेगवेगळे अनुभव त्याला घडवत असतात. लेखकाने कंटाळा करून चालत नाही. त्याने समाजात जे काही वावगे घडते आहे, ते मांडण्यासाठी लिहायला हवे. पुस्तके तर वाचायला हवीतच, पण माणसेही वाचायला हवीत, अनुभवविश्व समृद्ध करायला हवे.असे सांगितले होते. असेच सकस मार्गदर्शन यापूर्वीच्या संमेलनात ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, नाटककार गंगाराम गवाणकर आदींकडून झालेले आहे. खरंतर ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता, भीडभाड न बाळगता वागतात, बोलतात. असे नमुने ग्रामीण जीवनात पाहायला मिळतात. एस.टी. बसच्या प्रवासात, ग्रामीण बसस्टँडवर हमखास भेटतात. कोकणातील अशा बदलत्या काळातील ग्रामीण चित्रण लोकांसमोर यायला हवे आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उत्तम आहे. ‘खरी पुस्तकं खऱ्या भावबळानं वाचणं हा एक अति श्रेयस्कर व्यायाम आहे. दिवसभरात केलेल्या इतर कुठल्याही व्यायामापेक्षा तो आपल्याला अधिक दमवेल असा आहे. जशी शिस्त आणि चिकाटी पैलवानाला लागते तशीच वाचनासाठी लागते. साऱ्या जिंदगीच्या अपेक्षा निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट असतं’ असं अमेरिकेतील विचारवंत ‘हेन्‍री डेव्हिड थोरो’ने सांगितल्याचं नमूद करून व्यंकटेश माडगूळकर आपल्या सरवापुस्तकात म्हणतात, ‘भावबळानं वाचन होतं ते विशी-पंचविशीपर्यंत. पुढं माणूस काही कारणाने वाचतो. काही अपेक्षा ठेवून वाचतो. त्यातही सुरुवातीला साहित्यप्रकार, नंतर प्रवासवर्णन आणि शेवटी अध्यात्म असं आपलं वाचन गडगडत. काही वाचकांच्या बाबतीत ते वृत्तपत्र वाचनापलिकडे ते जात नाही.’ यातला भावबळानं होणाऱ्या वाचनाचा वयाशी जोडलेला दाखला महत्त्वाचा आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य चळवळी आवश्यक आहेत. या साहित्य चळवळीची दखल राज्यस्तरावर घेतली जायला हवी आहे. त्यासाठी संयोजकांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात राज्यभराच्या साहित्यिक वर्तुळात प्रभाव असलेल्या कोकणाबाहेरील साहित्यिकाला, वाड्मयीन नियतकालिकाच्या संपादकाला आवर्जून पाचारण करण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे ही चळवळ सर्वदूर पोहोचायला अधिक मदत होईल. वाचकांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रथा, परंपरा, निसर्ग, समाज व्यवस्था, वैशिष्ट्ये, नवले, असह्यता मांडणारे ग्रामीण मराठी साहित्य हा कायम आत्मीय विषय राहिला आहे. शोषित, पिडीत, असह्य अगतिक माणसांविषयी कणव हा ग्रामीण साहित्य चळवळीचा मुख्य हेतू राहिला आहे. दुर्दैवाने आज कोकणातील खेडेगावातील लोकसंख्या कमी होताना दिसते आहे. अशा वातावरणात कोकणातील जवळच्या दोन तालुक्यातील साहित्य आणि संस्कृतीप्रेमी मंडळी एकत्र येऊन सामाजिक चैतन्याचा शब्दजागर करत असतील, तर तिथे आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हायला हवं आहे, असं व्यक्तिश: आम्हाला या चळवळीचे विविध वृत्तांत वाचताना नेहमी वाटत आलं आहे. कौतुक म्हणून चळवळीच्या दिवाळी अंकात सहभागही नोंदवला आहे. आयोजकांनी यावर्षी ठरवून निमंत्रित केल्याने आणि संमेलनाच्या अध्यक्षीय यजमानपदाचा सन्मान चिपळूणला दिल्याने आम्हाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवता आल्याचं विशेष समाधान आहे. ग्रामीण मराठी साहित्य हे समाज उभारणीचे मोठे शस्त्र आहे, ही बाब आपल्या समाजसुधारक पूर्वसुरींनी सिद्ध केली आहे. अशा कोणत्याही चळवळीच्या प्रारंभी ‘ती चळवळ कशी चुकीची आहे’ हेही सांगायला कोणीनाकोणी सुरुवात केलेली असते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्र घडते. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण साहित्याची निर्मिती आणि जागरणाची प्रक्रिया घडत असताना या चळवळीबद्दल आणि तिच्या सक्रियतेसाठी ग्रामीण भागात विशेष उपक्रम होत नाहीत, हे सत्य आहे. दुर्दैवाने ग्रामीण साहित्य लेखनातून नावारुपास आलेल्या प्रस्थापित मंडळींनाही ग्रामीण भागात साहित्यिक उपक्रम राबवण्यात रुची वाटत नाही. अशा काळात कोणतेही विशेष शासकीय अनुदान नसताना राज्याच्या कोकणभूमीत दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली एक संस्था ग्रामीण साहित्य आणि संस्कृतीच्या जागर गेली आठ वर्षे सुरु ठेवते, हे कौतुकास्पद तितकेच अभिमानास्पद आहे.  

 

पूर्वी ‘लेखक-साहित्य-वाचक’ असा साहित्य व्यवहार होता. एकविसाव्या शतकात तसा तो राहिलेला नाही. साहित्याच्या प्रभावाला नियंत्रित, नियमित आणि निश्चित करणाऱ्या साऱ्या प्रक्रियांनी आजचा साहित्य व्यवहार बनतो. हे सारं व्यापक आहे. तरीही त्यात अस्सल ग्रामीण भागातील कार्याचा अपवाद कायम होता. तो ‘खळगा’ आपल्या परीने भरण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघ करतो आहे. स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिकीकरणाने वेग घेतला आणि शहरी आणि ग्रामीण वास्तवाची दृश्यमानता वाढत गेली. सामाजिक स्तर, विषमता जन्माला आली. महात्मा गांधींची हत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बौद्धधर्माची दीक्षा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा कारणांनी समाज व्यवस्थेत स्थित्यंतर येत गेले. त्याचे प्रतिबिंब साहित्यात-लेखनात उमटले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकात दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, देशावादी आदी साहित्य प्रवाहांचा पाया घातला गेला. बहुजन लेखक वर्ग उदयाला आला. त्यांचं अनुभवविश्व शब्दबद्ध झालं. अनियतकालिकांची चळवळ बहरली. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकीय उत्तरार्धात ‘प्रभावी’ लेखक अपवादानेही दिसला नाही. कारण लेखकांच्या क्षमतांसोबत इथली वाङ्मयीन संस्कृतीही काहीशी धंदेवाईक बनत गेली. प्रसिद्धीची सहज साधने उपलब्ध झाल्याने लेखक बहुत झाले. प्रसिद्धी माध्यमात सातत्याने मिळालेली जागा, चिल्लर पुरस्कार यामुळे लेखक म्हणून आपली एक सांस्कृतिक जबाबदारी आहे याचे भान हरपले, प्रतिभा ‘जणू’ तात्कालिक झाली. २०१४ सालच्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी १९६८ साली आपल्या वाचाया लघुपत्रिकेत हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ असा समीक्षालेख लिहून मराठीतील लहानमोठ्या सर्वच लेखकांच्या नैतिक वाङ्मयीन व्यवहारांवर परखड टीका केली होती. अनेकांना ती झोंबली होती. व्यंकटेश माडगूळकरांनीही आपल्या ‘सरवा’ पुस्तकात ‘कोणत्या वनस्पतींची पानं खावी आणि कोणती खाऊ नयेत हे सशांच्या पिल्लांना त्यांच्या आया शिकवतात. माणसाच्या आयांनी पुस्तकांच्या पानाबद्दल अशी जागरुकता दाखवल्याचं माझ्या पाहाण्यात नाही.’ असं म्हटलं होतं. या भूमिकांवरील ‘उतारा’ शोधताना आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीचा आधार घ्यावा लागेल इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत.


राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या यंदाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी, ग्रामीण भागात राहण्याचा आनंद, बैलगाडीतून अध्यक्षांची मिरवणूक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट गावातून क्रांतीज्योत आणून होणार आहे. विशेष म्हणजे अर्जुना नदीकाठावर नदीपूजन करून नदीपात्रात प्रज्वलित दिवे सोडण्यात येणार आहेत. नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. हे सारे जनजागरण आवश्यक आहे. पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शनासह महिला बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विक्री कक्ष हे सारे ग्रामीण संस्कृतीला पोषक असेच आहे. संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार दिले जातात. यातले संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रिया, शेतकरी, वारकरी आदी आम्हाला विशेष महत्त्वाचे वाटतात. कोरोना अनलॉक वातावरणात २३ नोव्हेंबर २०२० रोजी राळेगणसिद्धी मुक्कामी असताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम्हाला गावाचा वाढदिवससंकल्पना विशद करून सांगितली होती. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गावाचा वाढदिवस साजरा करणे, त्या अंतर्गत जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घेणे, लग्न होऊन एक वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करणे, गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचं वंदन-पूजन करणे, सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करणे, गावाच्या विकासाचं काम करणाऱ्या तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदींना सन्मानित करणे आदी उपक्रमातून सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल, अशी भूमिका होती. हाच विचार थोडा वेगळ्या पद्धतीने इथे जपलेला दिसतो आहे. आजच्या स्त्रिया जेवण बनवायचं सोडून ‘पार्सल’संस्कृतीच्या मागे लागल्यावरून खूप बोललं-लिहिलं जातं. मात्र पूर्वीच्या काळी ‘चाकरमानी’ जीवनपद्धतीत आपलं कोकण याच स्त्रियांनी सांभाळलं होतं. त्यांचा सन्मान करायला आपण कदाचित विसरलो. आजची ‘पार्सल’ किचन संस्कृती हा त्याचा परिणाम तर नसेल ना? म्हणून संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रियांना दिला जाणारा पुरस्कार आम्हाला विशेष महत्वाचा वाटतो.


महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य चळवळीची पहिल्यांदा निर्मिती होत असताना तिच्यासमोर दलित साहित्य चळवळीचा आदर्श होता, हे नाकारता येत नाही. ग्रामीण साहित्य चळवळीच्या मुळाशी सामाजिक अस्वस्थता, असंतोष आणि शोषणग्रस्तता होती. आजही ती पूर्णत्वाने संपलेली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला पुढे नेताना भविष्यात तिच्या ठाम वैचारिक अधिष्ठानाची मांडणी व्हायला हवी आहे. मेळावे, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे ही या चळवळीची अंग आहेत. मात्र चळवळीचे खरे सामर्थ्य हे त‌िच्या तात्त्व‌िक बैठकीत आणि वैचारिक मांडणीत असते. ते काम सुरुवातीच्या काळात आनंद यादव, पाठोपाठ रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले, नागनाथ कोत्तापल्ले आदींनी केल्याचे दिसते. आज राज्यातील ग्रामीण साहित्य चळवळी शिथिलता आलेली आहे. नव्या पिढीला लिहिते करण्यासाठी, दिशा देण्यासाठी ठोस उपक्रम नाहीत, हे खरे आहे. बदलत्या जीवनातील ग्रामीण प्रश्न मांडण्याची व त्यासाठी नवनवीन नेतृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण साहित्याची समीक्षा वाचली तर कोकण म्हणून फक्त श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या लेखनाचे दाखले सापडतात. कोकणातील ग्रामीण साहित्य विचार त्यापुढे जाण्यासाठीची विचारपेरणी कोकणात या चळवळीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न संघाने करावा. त्यातून कोकणातील ग्रामीण साहित्य चळवळीला नव संजीवनी प्राप्त होईल. बळीराजाचे मंदिर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या ‘बरबडा’ येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उपक्रम घेत आहे. १९५३ साली स्थापन झालेली ही संस्था सत्तर वर्षे पूर्ण करते आहे. मुंबईतील चाकरमानी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेऊन सहकार्याचा हात देत संस्था कार्यरत राहिली आहे. आज बदलत्या काळानुरूप संस्था कार्यरत आहे. संघाने २०१७ साली झाशींच्या राणीच्या ‘कोटगावी 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' भरवून हा परिसर नव्याने पुढे आणला. राणींचे वंशज सातारा मुक्कामी दत्तात्रय नेवाळकर यांच्याशी संघाने सकारात्मक चर्चा केली. नेवाळकरांनी नुकतीच कोट येथील आपली ८१ गुंठे जमीन रणरागिणी स्मारक ट्रस्टला देणगी दिली. ही बाब ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फलस्वरूप महत्त्वाची आहे. आजच्या पिढीचं शहरी जगणं स्मार्ट होत चाललंय. वेगाबरोबर धावणं सर्वांना अनिवार्य आहे. बदलत्या जीवनाशी जुळवून घेताना मागच्या पिढीचा हात ताणला जातोय अशी स्थिती आहे. यावर जुळवून घेण्याची भावना वाढीस लावण्याचे औषध देण्याचे काम हा चळवळीतून होऊ शकेल. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची दोन दशके आपली जगून झालीत. यातला आपल्या जगण्याचा आणि समग्र भौतिक पर्यावरणाचा वेग अतिप्रचंड राहिला आहे. मोबाईल आणि इंटरनेट या दोन साधनांनी संपूर्ण मानव जातीला व्यापून टाकले आहे. यामुळे मानवी संस्कृतीत आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. विशेषतः १९८०च्या पूर्वी किंवा दरम्यान जन्मलेल्या पिढीला हे बदल आश्चर्यजनक वाटतात. १९९५ नंतर जन्माला आलेल्या पिढीला या नव्या जगाची चाहूल लागलेली होती. आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक माध्यमे, आणि समाज माध्यमांनी आपल्या अधिसत्तेने सर्वसामान्यांचे जगण्याचे, अभिव्यक्तीचे, सांस्कृतिक, राजकीय आदी संदर्भ बदलून टाकलेत. विविध माध्यमाच्या या सार्वत्रिक अधिसत्तेचा थोपवणे सोपे नाही. प्रत्येक काळाचा एक स्वभाव असतो. आजच्या काळाने वेगाने सामाजिक, धार्मिक, जातिय वितुष्ट वाढवलेले आपण पाहिले आहे. संभ्रम, संशय, भिती, विद्वेष आणि आत्मकेंद्रितता या नव्या माध्यमामुळे अधिकाधिक पसरताहेत. झुंडीने ट्रोलिंग करणे, कोणत्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे, स्वत:विषयी वारंवार सांगत (सेल्फी, स्टेटस्) राहाणे, आपल्या सुरक्षित कवचात जगणे, इतरांविषयी आस्था नसणे अशी मानसिकता घडत आहे. एकाकीपणा, वार्धक्य हेही प्रश्न तीव्र झालेत. पण अशा प्रश्नांकडे बघायला वेळ कोणाला आहे? आपले भावविश्व, पारंपरिक मूल्यव्यवस्था, सांस्कृतिक संवेदना, जगण्या-वागण्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिक–अनैतिकतेच्या संकल्पना, जाणीवांचे, चिंतनाचे क्षेत्र सारं बदललेलं आहे. स्त्रियांच्या देदीप्यमान इतिहासाची उजळणी करताना त्यांच्यावर आजही होणारा अन्याय विसरता येत नाही. शेती, दुष्काळ, कौटुंबिक ताणतणाव, अस्मिता, विध्वंसक राजकारण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते घटस्फोट, नव्या पिढीवर याचा होणारा मानसिक आणि भावनिक परिणाम हे सारं चिंताक्रांत करणारं आहे.


आजच्या समाजाची बदललेली वैचारिक अभिरुची नव्याने लिहिताना ध्यानात घ्यावी लागेल. महानगर आणि खेडे हे अंतर वाढले आहे. प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा देणे आजची सांस्कृतिक गरज बनली आहे. नव्या साधनांनी आपल्याला मूळ भाषेपासून फारकत घ्यायला भाग पाडले आहे. संवादासाठी आम्ही चिन्हांची भाषा (इमोजी) वापरू लागलो आहोत. चिन्हांच्या भाषेचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजे परस्परातला संवाद कमी होणं ठरू शकतं. संवादहीन संस्कृती अविश्वासाकडे झुकल्यास घातक ठरू शकते. याचे भान लेखकाला असायला हवे आहे. आजच्या सामाजिक जीवनात मोठा अंतर्विरोध भरलेला जाणवतो आहे. अशा काळात कोकणातल्या दोन तालुक्यात सुरु असलेली ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ आशेचा ‘नंदादीप’ गेली आठ वर्षे उजळते आहे, हे महत्त्वाचे आहे. हा नंदादीप आपल्याला आपल्या मातृभाषेशी, संस्कृतीशी, मानवी समूहाशी प्रामाणिक राहायला सांगतो आहे. आपल्या परंपरांचे भान राखायला, परंपरांचा नव्या काळाशी अन्वयार्थ जोडायला, समाजजीवनाच्या नकारात्मक बाजूंवर बोलायला, विविध स्थितीगतीचे प्रवाह समजून घ्यायला प्रोत्साहित करतो आहे. हे सारं नीट समजून घेतलं तर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य चळवळीतून काळावर मुद्रा उमटवणारं, दखलपात्र आणि परिणामक्षम लेखन जन्माला येईल, असा विश्वास वाटतो.


-    धीरज वाटेकर, चिपळूण (मो. ९८६०३६०९४८)

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...