गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...7
‘द लान्सेट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या दोन स्वतंत्र पाहण्यांत देशातील ९४ प्रदूषित शहरांच्या यादीत
महाराष्ट्रातील सर्वाधिक १७ शहरांचा समावेश असल्याचे चित्र नुकतेच पुढे आले आहे. ‘द लान्सेट’नुसार दरवर्षी
हवेच्या प्रदूषणामुळे दहा लाखांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू होत असतो. आपण भारतीय ज्या हवेत श्वास
घेत आहोत ती हवाही दिवसेंदिवस विषारी बनत चालली आहे. आपल्याकडेही हवेच्या प्रदूषणामुळे
रोज सरासरी दोन माणसांचा मृत्यू होत आहे. हवेच्या प्रदूषणामुळे
दक्षिण आशियावर अधिक दुष्परिणाम झालेला आहे. अकाली मृत्यू होण्यामागच्या जगभरातील विविध
कारणांपैकी ते चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. देशाला ‘प्रदूषित-विषारी’ हवेचा विळखा
बसू लागल्यानंतर आपण भारतीय या समस्येकडे ‘समस्या’ म्हणून बघून पर्यावरण
रक्षणासाठी कटिबद्ध होणार का ? हा प्रश्न आहे.
कालपर्यंत
जगातील हिरव्या शहरांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवणारे नागपूर शहर
सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या या यादीत आले आहे. शहरातील हिरवळ प्रदूषणाला
रोखण्यासाठी पुरेसी नाही. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या या सर्वेक्षणात
ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर आणि बदलापूर, वाहनांची जेमतेम संख्या आणि
औद्योगिकदृष्टय़ा मागास अमरावती शहर, अकोला, चंद्रपूर या शहरांचाही समावेश आहे. अमरावती
शहरात दुचाकीनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मुख्यत्वे ऑटोरिक्षांवर अवलंबून आहे.
ऑटोरिक्षांमधील इंधनाच्या भेसळीमुळे प्रदूषण वाढले आहे. जीवनासाठी आवश्यक शुध्द
हवा आणि पाणी या दोन्ही गोष्टी चंद्रपूर जिल्हय़ात पूर्णत: प्रदूषित झाल्या असून
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट
व पोलाद उद्योग, कोळसा जाळणे, सदोष घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रक्रिया
प्रकल्प त्यासाठी कारणीभूत ठरले आहे. वाढती लोकसंख्या, घनकचरा, सांडपाणी, वाहनांची
वाढती संख्या यामूळे अनेक शहरे प्रदूषणाच्या खाईत लोटली गेली आहेत. अनेक शहरात रस्ते
दुभाजकावर लावण्यात येणारी ही झाडे शोभीवंत असून,
धुळ शोषून घेणारी
आणि ऑक्सिजन निर्माण करणारी नसतात. त्यामुळे शहरातील वाढत्या दुचाकी आणि चारचाकी
वाहनातून निघणाऱ्या धुरांवर कोणतेही नियंत्रण राहात नाही. गाव आणि
शहराच्या विकासाचा असमतोल बिघडल्यामुळे प्रत्येक राज्यातील ३० टक्के जनता
त्या-त्या राज्यातील शहरांमध्ये राहते आहे. प्रत्येक राज्यात निवडक शहरांचा विकास
झाला आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई, मध्यप्रदेशातील
इंदोर आणि भोपाळ, गुजरात मधील अहमदाबाद आणि बडोदा, आंध्रमध्ये
हैद्राबाद,
कर्नाटकमध्ये बंगलोर, युपीमध्ये लखनौ आदि. असं का झालं ? गेली
६७-७० वर्षे देशाचा कारभार चालवणारे ह्याला जबाबदार आहेत. आपल्याला ‘स्वच्छता’ हा विषय शाळा-कॉलेजमधून
शिकवावा लागेल अशी स्थिती आहे. ज्या
वेगाने आपण प्राणवायू वापरतो आहोत, वृक्षतोड करतो आहोत, त्याचा विचार करता आगामी
काळात प्राणवायू अपुरा पडणार आहे. मुंबई लोकलमध्ये, निव्वळ गर्दीमुळे रोज काही
माणसे मृत्युमुखी पडतात, याचे कोणालाच आश्चर्य वाटत नाही.
भारताने पर्यावरण बदलाबाबतच्या ऐतिहासिक पॅरिस
करारावर स्वाक्षरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) ताजा अहवाल
पर्यावरण म्हणून भारतासाठी धक्कादायक आहे. देशाची राजधानी कमालीची प्रदूषित
झालेली आहे. मागे एकदा अमेरिकेचे अध्यक्ष
बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले, तेव्हा येथील प्रदूषणाची पातळी विचारात घेवून, त्यांच्या हिंडण्या-फिरण्यावर अमेरिकी आरोग्य
खात्याने अनेक बंधने आणली होती, तरीही आम्हाला भारतीय म्हणून याची लाज वाटली नाही.
जगातील प्रत्येक दहा शहरांपैकी एका शहरातील वातावरण हे ‘डब्ल्यूएचओ‘च्या निकषांनुसार जगण्यासाठी
पात्र नाही. या परिस्थितीमुळे कोट्यवधी नागरिकांना श्वसनविषयक अनेक विकार होतात
आणि आपले प्राणही गमवावे लागताहेत. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून राहून पर्यावरण
संवर्धन होणार नाही. यातून बाहेर पडावयाचे असेल आणि
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांस मान्य होईल,
असे
पर्यावरण सभोवताली उभे करावयाचे असेल तर स्वत:वर अनेक निर्बंध घालून घ्यावे
लागतील. वृक्षारोपणाचे निव्वळ दिखाऊ कार्यक्रम आयोजित न करता, लावलेली झाडे जगतील कशी ? याबाबत काळजी घ्यावी
लागेल. इतक्या प्रमाणावरील प्रदूषणास फक्त उद्योगच
कारणीभूत नाहीत,
आपण सर्व त्यास जबाबदार आहेत. शहरातील कचऱ्याची, मैलापाण्याची विल्हेवाटही
लावता येऊ
न शकलेल्या महाराष्ट्राला मग विकसित राज्य असे तरी का म्हणायचे ? हा प्रश्न
आहे. रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याच्या मोहिमेचा शहरातील तापमानावर विपरीत परिणाम होऊन, शहरातील
जमिनीखालील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षाही गेली आहे. त्यामुळे देशभर शंभर
ते हजार फूट खोल विहिरी खणून पाण्याचा थेंब न् थेंब शोषून घेण्याची स्पर्धा लागतेय.
जालना जिल्ह्य़ाच्या ठिकाणी पिण्याचे जे पाणी मिळते, ते चहाच्या रंगाचे
असते. चीनसारख्या देशात वृक्षराजीने बहरलेल्या इमारती उभ्या करण्याची मोहीम हाती
घेण्यात आली आहे. त्यामुळे हवेतील कर्बवायू मोठय़ा प्रमाणात शोषून घेण्याची
नैसर्गिक व्यवस्था करण्याची योजना आखण्यात आली आहे.
हवेचे हे प्रदूषण माणसाच्या स्मरणशक्तीला
बाधा आणते, त्याला वैफल्यग्रस्त करते, असे संशोधन ‘ओहियो स्टेट विद्यापीठ’ शास्त्रज्ञांनी पुढे आणले आहे.
प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, माणसाच्या मेंदूतील
जडणघडणीवर विपरीत परिणाम होतो. हवेचे प्रदूषण हे माणसाच्या वाढत्या चंगळवादामुळे होत आहे. शहरातील नागरिक हवेच्या
प्रदूषणामुळे हमखास उच्च रक्तदाबाचे बळी ठरतात, यावर जर्मनीतल्या संशोधनाने
शिक्कामोर्तब केले आहे. शहरातील वाहतूक, औद्योगिक कारखाने, उर्जा प्रकल्प यातून
उत्सर्जित होणारे सूक्ष्म घनकण हे रक्तदाबाच्या वाढीस कारणीभूत ठरतात. निसर्गचक्रात
मानवाने ढवळाढवळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हापासूनच हवामान बदलाच्या
संकटाचे बिगुल वाजले आहे.
पृथ्वीची
हवामान प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची असून त्यात वातावरण, हिम आणि बर्फ, नद्या, सागर, महासागर, जलयंत्रणा, अनेक
सजीव यांची परस्परावलंबी आणि महत्त्वाची भूमिका कार्यरत असते. या प्रणालीस ऊर्जा
पुरवण्याचे काम सूर्य करतो. सूर्याच्या सरळ येणाऱ्या किरणांपासून आपले संरक्षण
करण्याचे काम पृथ्वीवरील वायूंच्या पडद्यामुळे शक्य होते. वाढत्या औद्योगिकरणामुळे
या वायूंच्या पडद्यावर वाईट परिणाम होत आहे आणि त्यामुळे पृथ्वीचे
सरासरी तापमान हळुहळू वाढत आहे. २१ वे शतक संपेपर्यंत हवामान बदलामुळे जागतिक
तापमान सुमारे चार ते सहा अंश सेल्सिअस वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करीत
आहेत. याचा विचार आपणाला प्रत्येक भारतीयाला आपापल्या पातळीवर येवून करावा लागेल,
आपली जीवनपद्धती बदलावी लागेल, तेव्हा पर्यावरण संवर्धन आणि शुद्ध हवेकडे आपण
मार्गक्रमण करू !
धीरज वाटेकर