मंगळवार, ७ मार्च, २०१७

दुर्दैवी ‘वणवे’ सुरु झालेत !

गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...4-5 

सध्याचा ऋतू जंगलातील वणव्यांचा आहे. दरवर्षी देशातील विविध जंगलांत वणवे लागतात. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा तालुक्‍यातील डिंगणे गावात वाळलेल्या गवताच्या कुरणांमुळे ५००  एकरांवर नैसर्गिक वणवा भडकल्याने काजू, आंबा आणि नारळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. ९० शेळ्या, दोन घरे व ९५ बोकडांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरवर्षी या परिसरात बागायतींना आग लागण्याचे प्रकार घडतात. शिवजयंतीदिनी पोलादपूर ते खेड दरम्यान असलेल्या कशेडी घाटात वणवा लावला गेला. वाऱ्यामुळे वणवा रस्त्यावर आल्याने काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहन चालकांना वाहने थांबवावी लागून घाटात लांबच लांब रंग लागल्या होत्या. सातारा येथील अजिंक्यतारा किल्यावरही फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मंगळाईदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस अज्ञात समाजकंटकांनी वणवा लावला. मोठ्या प्रमाणात वारा, कडक ऊन यामुळे वणवा भडकला. आज वणव्यामुळे हा डोंगर काळाकुट्ट पडला आहे. मध्यंतरी उत्तराखंडमधील एक हजार ९०० हेक्टर एवढय़ा मोठय़ा क्षेत्रात लागलेल्या एका महावणव्याने अनेकांची झोप उडविली होती. पर्यावरांची अतोनात हानी करणारे हे वणवे आणि त्यांचा हंगाम सुरु झाला आहे, ते रोकण्यासाठी आपल्याला आपापल्यापरीने प्रयत्न करावे लागतील.

भारतातील वनांत लागणाऱ्या वणव्यांच्या प्रमाणात  गेल्या दोन वर्षांत जवळपास ५५ टक्के वाढल्याने वणवा हा अतिशय चिंताजनक विषय बनला आहे. राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने अलीकडेच सादर केलेल्या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सन २०१५ मध्ये १५,९३७ वणव्याच्या घटना नोंदविल्या गेल्या तर २०१६ मध्ये हा आकडा २४,८१७ पर्यंत जाऊन पोहोचला आहे. यातील सर्वाधिक घटना ओडीसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे नोंदविल्या गेल्या असून महाराष्ट्रातील वणव्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मागील काही वर्षांत सन २०१२ साली सर्वाधिक वणवे लागले होते. या अहवालात त्यांनी वणवा समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘राष्ट्रीय धोरण’ तयार करण्याची सूचना केली आहे. कोरडय़ा पानगळीच्या जंगलात चैत्र महिन्यापर्यंत सर्वत्र पानांचा थर साचतो. गवतही वाळलेले असते. त्यात वातावरणातील कोरडेपण भर टाकते. वरील काहीतरी किंवा निसर्गनिर्मित निमित्त घडते आणि वणवा लागतो. परंतु नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. साधारणत: मार्च हा सर्वाधिक वणव्यांचा महिना असतो. या महिन्यात एकूण वणव्यांच्या ४६ ते ६६ टक्के वणवे लागतात. हे वणवे अनेक कारणांनी लागतात. जंगलमाफिया मुद्दाम आगी लावतात आणि त्या विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव करतात. नैसर्गिक वणवे लागणे, वनौषधी, वनसंपत्ती गोळा करण्यासाठी आणि जंगल पर्यटसाठी गेलेल्या माणसांकडून निष्काळजीपणे आणि काहीवेळा जाणुनबुजून केलेल्या कृत्यामुळे वणवे लागतात. वनातून जाताना पेटती सिगारेट फेकणे, टेंभे (मशाल, पलिते) घेऊन जाणे, कॅम्पवरील आग तशीच सोडून जाणे, शेतीबांधावरील लावलेली आग आदि कारणे यामागे आहेत. आग लागल्यामुळे सामान्यत: जंगलात असलेले पालापाचोळा व गवत नष्ट होते. वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक फायदा असतो. ज्या जंगलात आदिवासी आहे आणि बाजूला शेती आहे त्या ठिकाणी वणव्याची परिस्थिती तयार होते. वन्यजीव आणि आदिवासी संघर्ष, तर दुसरा वनखाते आणि आदिवासी असा संघर्ष यामागे आहे. जंगलात फिरणारे गुराखी, रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे प्रवासी लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक फेकतात. कुठे तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते. मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, अशा गैरसमजातून गवत पेटवून दिले जाते. त्याचा परिणाम निसर्गाच्या जैविक शृंखलेवरही होत असतो. वारंवार आगी लागल्यामुळे झाडाच्या बुंध्यांना आग लागून ती कमजोर झाल्याने कोलमडतात. त्यात जंगल संपत्तीची हानी होते, वन्य जीवांना धोका पोहोचतो. वणवा लागलेल्या क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर भाजली गेल्याने जमीन टणक होते, तिच्या पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जमिनीची उत्पादकता कमी होते.

वणव्यासंदर्भात भारतीय वनखात्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी कोणतीही अद्ययावत यंत्रणा नाही. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते. आग लागू नये म्हणून जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या या पारंपरिक पद्धतीवर भारतीय वनखात्याची मदार आजही आहे. वनक्षेत्रात लागणाऱ्या आगी आणि त्यावरील उपाय योजनांच्या कृती आराखड्यासाठी महाराष्ट्र शासनाने या मोसमाकरिता १९ नोव्हेंबर २०१६ च्या पत्रानुसार रुपये २९ कोटी ८६ लाख इतका निधी विविध कार्यबाबींकरिता प्रस्तावित केला आहे. तरीही वणव्यांचे प्रमाण देशात वाढते आहे. यास्तव शासन वणवा विषयात जे काही खात्याला देऊ करतेय, तेही नीटसे कार्यान्वित केले जाते का ? याबाबत संशय आहे. ‘ग्रीन इंडिया’चे स्वप्न पाहाणाऱ्या, गेली ३६ वर्षे अव्यह्यातपणे झाडे लावत आसाममधील ब्रह्मपुत्रे वालुकामय प्रदेशाला जंगलाचे रूप देण्याचे काम जादव पायेंग या आदिवासी व्यक्तीने केले आहे.  राजकीय हस्तक्षेप वाढल्याने देशातील सर्वच जंगल राष्ट्रपतींच्या अखत्यारित देण्याची गरज आहे. अशी भूमिका पायेंग यांनी मंडळी आहे. रायगड जिल्ह्यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१६ मध्ये या जिल्ह्यात ९६ ठिकाणी वणवे लागून ६१३ हेक्‍टर क्षेत्राला त्याची झळ पोहोचली. अनेकदा जंगलातील अनियंत्रित वणवे गावात शिरतात. डोंगरातील आदिवासी वाड्या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात. हिवाळ्याच्या शेवटी व उन्हाळ्याच्या सुरुवातीला कोकणातील जंगलांत वणवे लावले जातात. यामागे  स्थानिकांमधील गैरसमज कारणीभूत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी गवत चांगले यावे, सरपणाला-जळणाला  लाकूडफाटा मिळावा, रानडुक्कर व अन्य वन्यप्राण्यांच्या शिकारीकरता याव्यात म्हणून वणवे लावले जातात. वणवा पेटला की वन्यप्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरुवात करतात. त्यामुळे या वन्यजीवांची शिकार करणे सहज शक्‍य होते. कोकणात भातशेतीच्या भाजणीसाठी विविध झाडांच्या सुक्या फांद्या तोडून त्या जमवून पेटविल्या जातात. पूर्वी हे करीत असतांना आग शेजारच्या जंगलात पसरू नये, याची काळजी घेतली जाई. हे काम एप्रिल-मेमध्ये चाले. मात्र सध्या शेतीची भाजणी ही सुद्धा खूप लवकरच उरकून घेतली जाते. तसेच भाजणीसाठी जंगलातील काट्याची झुडपे व इतर पालापाचोळा यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पावसाळ्यात आणि तदनंतरच्या जमिनीतील ओलाव्यामुळे शेतजमिनीत अनेक प्रकारची छोटी-छोटी झाडे, वेली उगवलेल्या असतात. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान ही रोपटी साधारणतः तीन ते चार फुट उंचीची झालेली असतात. ती काढून टाकण्यासाठी पारंपारिक पध्दत म्हणून जमिनीची भाजणी करतात. वास्तविक ही भाजणी अयोग्य आहे, ती करू नका असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून नियमीत केले जाते. मात्र तरीही निव्वळ मानसिकतेपायी हे घडते, आणि त्या पुढे ह्यातीलच विकृत मानसिकता जिथे शेती नाही असे जंगलही जाळायला सरसावते, ज्याला आपण "वणवा" म्हणतो. जागतिक स्तरावरही ही पध्दत योग्य नसल्याचे सर्वमान्य झाले आहे. मात्र तरीही आपल्याकडील समाजमान ही पारंपारिक पध्दत सोडण्यास तयार होत नाही. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर उतारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. हे गवत पूर्वी गुरांच्या चार्‍यासाठी वापरत असत. याच गवताच्या माध्यमातून चार पैसे मिळवलेही जायचे. गवताची एक वरंड 30 ते 35 रुपयांना विकली जायची. परंतू पशुपालन कमी झाल्याने आणि गवताला मागणीच नसल्याने वणव्याचा ट्रेंड वेगाने पुढे आला आहे.

यावर उपाय म्हणजे, सरकारने "वणवा मुक्त गाव योजना" अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. "आमचा गाव, वणवामुक्त गाव" अंतर्गत गावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृतीदल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवा विरोधी सशस्त्र पथक आदि विविध पर्याय वापरले जायला हवेत. प्रसंगी कायद्याचा, विधायक कामासाठी बळाचा वापर करून "वणवा" संस्कृतीचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. आपल्याला वनांचे महत्त्व, वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल, त्यातूनच हे प्रकार थोपवले जाऊ शकतात.  

धीरज वाटेकर

प्रसिद्धी : साप्ताहिक गोयंकार गोवा दिनांक ५ मार्च २०१७ 
http://www.mulshidinank.com/2017/03/blog-post_20.html?m=0












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...