गावकुसाबाहेर...धीरज वाटेकर...३
फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात
रत्नगिरीतील ८ व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय बाल्यावस्थेतील मुलाने निव्वळ
वर्गशिक्षिकेने पालकांना शाळेत बोलाविल्याच्या भीतीने, ओढणीच्या सहाय्याने बेडरूम
मधील सिलिंग पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली ! भावनिकदृष्टय़ा अस्वस्थ
असलेल्या मुलांना तातडीची मदत मिळावी, अशी मुले शालेयस्तरावर सहज पटकन ओळखू यावीत,
गरजानुरूप त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची मदत मिळावी किंवा शिक्षकांना-पालकांना योग्य
मार्गदर्शन मिळावे आणि यातून आपल्या सभोवतालच्या मुलांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी
प्रयत्न व्हावेत, म्हणून आपण सारेच गळा काढीत असतो. परंतु अधूनमधून घडणाऱ्या अश्या
घटना भावसाक्षर नसलेल्या आपल्या समाजाची शोकांतिका सांगत असतात. आपण यातून धडा
घेवून स्वत: “भावनासाक्षर” कधी
होणार ? हा प्रश्न आहे.
‘आईने दोन दिवस गणवेशाशिवाय शाळेत पाठविले
म्हणून प्राथमिक शाळेतील मुलीची आत्महत्या’, ‘बहिणीने आपणास हवा असलेला चॅनेल लावू दिला नाही
म्हणून नवव्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलाची गळफास लावून आत्महत्या’, अशा घटना आजकाल अधूनमधून
घडतच असतात. वडिलांनी स्कूटर घेऊन दिली
नाही म्हणून दिल्लीत, सप्टेंबर २०१२ मध्ये एका चौदा वर्षांच्या मुलाने आत्महत्या
केली होती, वर गळफास लावून घेण्याआधी ‘आता तुमचे पैसे वाचवा’ अशी चिठ्ठीही त्याने आपल्या वडिलांसाठी लिहून ठेवली होती. या विषयातील सगळ्या
घटना वृत्तपत्रात येतातच असे नाही. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने आत्महत्या
केल्याची उदाहरणे आपल्याकडे आता रूळली आहेत, असेच वाटते. क्षुल्लक कारणांवरून छोटी – छोटी
मुले आत्महत्येचा निर्वाणीचा मार्ग अवलंबितात आणि आपले जीवन उमलण्याआधीच संपवतात
ही भयानक दुःखदायक बाब आहे. जीवन अद्याप पुरते उमललेले नसताना कोवळ्या मुलांच्या
मनात पराकोटीचे नैराश्य का उत्पन्न व्हावे ? आपले
जीवन संपवावे, आपल्या जीवनात काहीही शिल्लक
नाही असे का वाटावे ?
जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, शालेय वयोगटातील ३ ते ५ टक्के मुलांना मानसिक आजार असतात आणि १५ ते २० टक्के मुलांमध्ये सौम्य स्वरूपाचे मानसिक
अस्वास्थ्य असते. या मुलांना वेळीच मदत व उपचार मिळाले तर आत्महत्येसारख्या अनेकविध
टोकाच्या घटना टाळता येऊ शकतात. आजच्या स्पर्धेच्या काळात मानवी आयुष्याचा वेग
वाढला असून कुटुंबाबरोबर घालवण्याचा वेळ कमी झाला आहे. यास्तव मुलांच्या मनामध्ये
निर्माण होणा-या छोटया-छोटया अस्वस्थता ओळखण्यात पालकांना अनेकदा अवघड बनते. त्या समस्या
हाताळण्यासाठी आवश्यक वेळ देणेही दिवसेंदिवस पालकांसाठी अवघड बनत चालले आहे. या
साऱ्यातून मानसिक अस्वस्थतेचा गाळ साचला तर कधीतरी आत्महत्त्येसारखे टोकाचे विचार मुलांच्या मनात येतात. आजचे आपले बदललेले
प्राधान्यक्रम, ढळलेला आयुष्याचा समतोल, आयुष्यात आर्थिक उन्नत्तीला आलेले महत्त्व यांमुळे सभ्यता, नैतिकता, वैयक्तिक
आयुष्य, कौटुंबिक नातेसंबंध या सर्वांचे प्राधान्यक्रम
मागे पडले आहेत. आज स्पर्धा आणि यशस्वितेचे बदललेले मापदंड भयानक बदलले आहेत.
सातत्याने स्पर्धा करणे हा युगधर्म झाल्यासारखी स्थिती आहे. सतत यशस्वी झाले
पाहिजे. अपयश ही एक भयंकर गोष्ट असल्याबाबतचा
समाजात स्थिरावलेला विचार मुलांच्या मुळावर उठला आहे. मानसशास्त्र सांगते, जैविक, मानसिक
व सामाजिक आदि तीन पातळ्यांवर आत्महत्येची मानसिकता घडते. त्यात जैविक पातळीवर
अनुवंशिकता, मानसिक पातळीवर विचार करता अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्व दोष, सामाजिक पातळीवर
मान-अपमानविषयक टोकाच्या कल्पना, भावनांवर
ताबा ठेवण्यात येणारे अपयश, उतावळा
स्वभाव यांचा समावेश होतो.
या प्रश्नांचे स्वरूप तपासून पाहिले तर लक्षात
येते की, किशोरवयीन मुलांच्या वाढत्या आत्महत्या हा
महाराष्ट्रापुरता मर्यादित प्रश्न नसून त्याची व्यापकता जगभर आहे. मानवी मृत्यू हा जीवनाचा शेवट करतो. आपणाला
आयुष्यात अनेक मृत्यूंचा चटकाही जाणवतो. परंतु स्वत:च्या हाताने, स्वत:चे आयुष्य संपवले जाते, आयुष्याचा फारसा अनुभव न घेता बारा-पंधरा
वर्षाची मुलं जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा ते अनेक प्रश्न उभे करते. ‘परीक्षेत अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांने आपले
जीवन संपवले’, ‘आई-वडील
ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केली.’ कुपोषणाने
होणारे बालमृत्यू, स्त्रीभ्रूणहत्या
यासारखेच किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण नेहमीच वर्तमानपत्रांमधून
वाचत असतो. आयुष्याची समज वाढवित असताना, विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक
बुद्धिमत्तेची जोपासना करणारे, जीवन कौशल्यांवर
आधारित प्रशिक्षण, शाळेतील किमान एका शिक्षकाला, बाल व कुमार मानसशास्त्राचे प्रशिक्षण देण्याची गरज कायम बोलली जाते. या
साऱ्यांचा विचार करता स्वत:चे जीवन संपवून टाकण्यामागची मानसिकता ही समुपदेशक
किंवा मानसोपचार तज्ञांपर्यंत मर्यादित ना राहता सामाजिक स्तरावर मुळातून समजून
घेतली जाण्याची गरज निर्माण झाली आहे.
पूर्वी गावातील वडीलधाऱ्या समंजस
माणसांची शाळेकडे अधूनमधून फेरी होई. यात ते शिक्षकांशी, विद्यार्थ्यांशी बोलत, यातून
त्यांना मुलांची मनोगते कळत. सध्या शाळा संस्थाचालक हे काम कितपत करीत असतात ? ते
कळण्यास रीतसर असा कोणताही मार्ग नाही. आजची मुले खाण्यात आणि बोलण्यात घसरत चालली
आहेत यावरचे बोलणे दुर्दैवी निष्कर्षाकडे कधी नेते, काळातही नाही. आज शैक्षणिक
संस्था या शिक्षण, करुणा आणि सुधारणा यांचे केंद्र बनण्याची गरज आहे. शाळेत मुलांना तिथे
सुरक्षित वाटलं पाहिजे. चुकांवर पांघरून न घालता त्यावर प्रतिक्रिया देत असताना
त्या मुलाचे ‘वर्तनशास्त्र’ लक्षात घेतले जायला हवे, ते समजण्यासाठी तसे
प्रक्षिक्षण हवे. यश, स्पर्धा, पैसा ही गृहितके बदलून आपल्याला किशोरवयीन
मुलांच्या आत्महत्या थांबवता येतील. चुकांवर पांघरून न घालता
मानसिक दुर्बल मुलांना स्वीकारणे आणि त्यांना चांगली वागणूक देणं हे ‘प्रौढ’ म्हणून
समाजाचे कर्तव्य आहे. हे परिवर्तन घडवून आणण्याची पहिली पायरी, त्या मुलांना
आदराने वागवून सुरु होते. परिवर्तन घडण्यासाठी काही दिवस, महिने वर्षही लागतील, पण आपण
सर्वांनी प्रयत्नांची कास धरली आणि हा गंभीर आणि भयानक प्रश्न तडीस नेण्याच्या
विचाराने प्रवृत्त झालो तर समाजात नक्की परिवर्तन घडेल !
धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा