सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने...!

यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाला, ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो) ने एकाच वेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करून ते उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये कौशल्यपूर्ण रीतीने स्थापित करण्याची जागतिक पातळीवरील ऐतिहासिक विक्रमी कामगिरी केली तिच्या यशाची किनार आहे. बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ रोजी  सकाळी वाजून २८ मिनिटांनी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे यान १०४ उपग्रह घेऊन अंतराळात झेपावले, या कामगिरीने इस्रो आणि इस्रोत काम करणार्‍या सर्व राष्ट्रभक्त शास्त्रज्ञांबद्दल तमाम भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण झाले आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पण भावनेने केलेल्या कष्टाचे हे चीज असून हे यश नजरेसमोर ठेवूनच यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाकडे पाहायला हवे !

दुसरीकडे संपूर्ण जगाशी आपली विज्ञान म्हणून तुलना करताना आपले किती शोधनिबंध प्रसिद्ध होतात ? अत्युत्कृष्ट ठरेल असे नवीन संशोधन (ब्रेक थ्रू) किती ? आणि आपण केलेल्या संशोधनाचे तंत्रज्ञान आणि व्यवसायात रूपांतर किती ? असे हमखास ठरलेले प्रश्न पुढे येतात. यातील पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक असली तरी तिसर्‍या विज्ञानाच्या यशस्वी व्यावसायिक रुपांतरणाच्या बाबतीत आपण अजूनही अडखळतो आहोत, असे यातील तज्ञान्चे मत आहे. यास्तव देशात सध्या "मेक इन इंडिया" चा प्रयोग सुरू झाला असावा ! काहीही असले तरी ती सध्याची गरज आहे.

विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्याची गरज जगातल्या विकसित देशांना फारशी भासत नसताना काही प्रमाणातील अशिक्षित अंधश्रद्धेय वातावरणामुळे भारताला ती जास्त जाणवते. कारण आपण अनेकदा कार्यकारणभाव समजावून घेण्यात कमी पडतो, यास्तव भारतात परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे आणि त्यानिमित्ताने देशभर विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, लोकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणे हा यातील एक प्रयत्नच आहे. याचा विचार करून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर हे १९८६ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. भारताला विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार मिळवून देणार्‍या डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन त्यांच्याशी संबंधित हा दिवस असावा, म्हणून त्यांनी ज्या दिवशी त्यांचा पुढे जगप्रसिद्ध झालेला निबंध नेचरया जागतिक स्तरावरील विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला तीच 28 फेब्रुवारी तारीख या दिवसासाठी निश्‍चित करण्यात आली.

डॉ. रामन यांना ज्या वैज्ञानिक शोधाबद्दल सर्वश्रेष्ठ "नोबेल" पारितोषिक मिळाले तो शोध "रामन इफेक्ट" नावाने प्रसिद्ध आहे. या संशोधनासाठी त्यांनी अवघ्या दोनशे रुपयाची साधने वापरली होती. सन १९२१ मध्ये रामन यांना कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून ब्रिटनला पाठविण्यात आले होते. तेथील रॉयल सोसायटीच्या सभेत निबंध वाचून झाल्यावर समुद्रमार्गे परतताना आकाशाच्या निळ्या रंगाबद्दल त्यांचे मनी कुतुहल जागृत झाले. भारतात आल्यावर त्यांनी पाणी आणि बर्फ यावरून होणार्‍या प्रकाशाच्या प्रकीर्णनावर संशोधन चालू केले. त्याआधारे पाणी व आकाश यांच्या निळ्या रंगाची कारणमीमांसा स्पष्ट केली. पारदर्शक पदार्थातून एक रंगी प्रकाशाचे प्रखर किरण गेले तर काय होईल ? याचा अभ्यास करीत असताना मिळणार्‍या वर्णपटात एक विशेष गोष्ट त्यांना आढळली. मूळ एकरंगी प्रकाशाशिवाय इतर अनेक कंपन संख्या असणार्‍या रेषा वर्णपटात उमटल्या होत्या. याचाच अर्थ पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाशाचे प्रकीर्णन झाले असा होतो. हेच संशोधन रामन इफेक्टचा शोध म्हणून पुढे आले. हा शोध 28 फेब्रुवारी 1928 रोजी लागला. रामन यांच्या शोधानंतर केवळ दहा वर्षात दोन हजारापेक्षा जास्त संयुगांची रचना रामन परिमाणाच्या सहाय्याने निश्चित करण्यात आली. कोणत्याही वस्तुतील परिवर्तन किंवा बदल हा त्या वस्तुची अगोदरची आणि नंतरची स्थिती यातील फरक असतो. म्हणजे एखादी गरम वस्तू थंड झाली, तर तिच्या स्थितीत परिवर्तन झाले. आणि थंड वस्तू पुन्हा गरम झाली तरी तोही परिवर्तनाचाच प्रकार असतो. असे बदल विश्वात ज्या नियमांनुसार घडतात, ते विश्वव्यवस्थेचे नियम होय. आणि हे नियम आपल्याला ज्यामुळे सहज समजतात, ते "विज्ञान" अशी विज्ञानाची सोपी व्याख्या सांगता येईल.

अशा या विज्ञानाचा विचार करता, आजही आपण सर्व भारतीय संशोधनापेक्षा परदेशातून आलेल्या उत्पादनांना अधिक चांगली म्हणून प्राधान्य देत असतो. मायबाप सरकारी यंत्रणाही कायम अनुभवी व्यक्तीकडूनच टेंडर मागवते. उत्पादन यापूर्वी कोठे वापरले? ते पाहून नंतर स्वीकारले जाते. यास्तव एखाद्या संशोधकाने नवीन काही शोध लावला असेल, तर त्याच्या संशोधनाचा, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्याला अडथळे निर्माण होतात. हे बदलून नवीन गोष्टींना प्रोत्साहन देणारे वातावरण आपल्याकडे निर्माण होणे गरजेचे आहे. आज संशोधकांनी आपले संशोधन बाजारपेठेपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे वातावरण बनले आहे. नवीन उत्पादन बाजारात खपले गेले नाही, तर नुकसान होईल याची भीती अनेकाना अडचणीत आणते, परदेशात असे धोके सहज स्वीकारले जातात, आपण हे शिकायला हवे. कारण नवीन उत्पादन यशस्वी ठरले, तर फायदा अधिक होऊ शकतो. आपण आपली मानसिकता तशी बनवायला हवी. तयार होऊ पाहणार्‍या पिढीचा विचार करता, देशात वैद्यकीय, अभियांत्रिकी, आयआयटी व तत्सम महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षा सुरू झाली आणि प्रात्यक्षिके अडगळीत जाऊन पडलीत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळेत विज्ञान प्रात्यक्षिकांबद्दल अनास्था वाढू लागली आहे. हे सध्या देशभर बनलेले मत खोडण्यासाठी, वेगळेपणा जोपासणारी काही शिक्षणसंकुले यशस्वीपणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी अनुभूतीपूर्ण शिक्षण देत आहेत. आपला पाल्य चांगला अभियंता, वैद्यकीय अधिकारी, विज्ञानतज्ञ बनवू पाहणार्‍या पालकांनी यास्तव अशा शिक्षण संकुलाची निवड आपल्या पाल्याच्या 10 वी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी करायला हवी. आजच्या विद्यार्थ्यांना काही नवीन  दाखवले तर त्यांना नक्की आवडते. विज्ञान म्हटले की निरीक्षण करणे आलेच ! ही निरीक्षण वृत्ती आजूबाजूच्या वातावरणातूनही निर्माण करता येते. विद्यार्थ्यांमध्ये अशी वृत्ती जोपासली जाण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करायला हवेत, असे सार्वत्रिक व्यक्त होत असलेले मत विचारात घेवून आम्ही कोकणात चिपळूण येथे "ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स" नावाने नव्याने विज्ञान क्षेत्रात ११ वी, १२ वी स्तरावर सुरू केलेल्या शिक्षणक्रमाचे वेगळेपण निश्चित नजरेत भरते. मुलांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी सतत प्रयत्न व्हायला हवेत, ही बाब हेरून येथे कायम विद्यार्थ्यांच्या एकूण विकासावर भर देण्याचा प्रयत्न होत आहे.

नुकतेच भारताने ज्या १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण केले, त्यात सहा देशांचे १०१ (अमेरिकेचे ९६ आणि इस्रायल, संयुक्त अरब अमिरात, कझाकस्तान, नेदरलँडस् व स्वित्झर्लंड या देशांचा प्रत्येकी एक) आणि भारताचे तीन उपग्रह अवकाशातील  निर्धारित कक्षेत स्थिर केले आहेत. उपग्रहाचा समावेश आहे. इतर देशांना त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा, भारताच्या भूमीचा आधार घ्यावा लागतो आहे ही भारतवासीयांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अमेरिकेच्या नासालाही जे साध्य झाले नाही ते इस्रोने शक्य करून दाखविले आहे. आजही आपल्या देशातील मुलं प्रशिक्षणासाठी नासात जातात, भविष्यात परदेशांमधील मुलं इस्रोत आली तर आश्चर्य वाटायला नको ! १०४ उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर कंपनीने मोलाची कामगिरी बजावली. एस.१३९ हेड एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल एण्ड सेगमेंट, एस १३९ नोझल डायव्हर जेट आफ्ट एन्ड व पीएम ओएक्सएल मोटार केस या तांत्रिक उपकरणाची निर्मिती वालचंदनगर कंपनीत करण्यात आली होती. याचा उपयोग यानाच्या उड्डाणासाठी झिरो व पहिल्या स्टेजसाठी केला जातो. ही कंपनी गेली ४५ वर्षे संशोधन क्षेपणास्रासाठी लागणारी विविध उपकरणे तयार करीत आहे. आक्टोबर २००८ मधील चांद्रयान, नोव्हेंबर २०१३ मधील मंगलायान मोहिमेतही या कंपनीचा सहभाग होता. आगामी काळात "इस्रो' आपला १०० वा उपग्रह तयार करणार आहे. पहिल्या चाचणीसाठी सायकलवरून रॉकेट नेणे, पहिला उपग्रह बैलगाडीतून प्रक्षेपण तळापर्यंत नेणे येथपासून सुरू झालेला प्रवास आज एकाच वेळी १०४  उपग्रह सोडण्यापर्यंत आला आहे. सन २००८ साली भारताने पीएसएलव्हीया अंतराळ यानातून १० उपग्रह अवकाशात कुशलतापूर्वक स्थापित करून इस्रोने अंतराळ संशोधन क्षेत्रात एक नवा अध्याय लिहून पूर्ण केला होता ! तत्पूर्वी रशियाने एकाच वेळी १३ उपग्रह पाठविल्याचीही बातमी आली होती. सन २०१३ मध्ये अमेरिक अंतराळ संशोधन संस्था नासाने एकाच वेळी २९ उपग्रहांचे प्रक्षेपण करून नवा विक्रम नोंदविला होता. त्यानंतर रशियाने एकाच वेळी ३७ उपग्रह अवकाशात पाठवून नासाचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, २२ जून २०१६ रोजी एकाच वेळी २० उपग्रह अवकाशात सोडून इस्रोने एक अभिनव विक्रम स्वत:च्या नावे नोंदविला. तेव्हा या २० मध्ये तीनच उपग्रह भारताचे होते. एकट्या अमेरिकेचे यात १३ उपग्रह होते. भारताने सन १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी घेतली तेव्हापासून आधुनिक तंत्रज्ञान भारतापर्यंत पोचू नये यासाठी विविध प्रकारचे निर्बंध अमेरिकेने लादले होते. या सर्वांवर मात करत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने झेप घेतली आहे. जागतिक कंपन्यांनी त्यांचे आराखडे द्यावेत, त्यानुसार उपग्रहाची बांधणी आणि प्रक्षेपण भारतातून होईल, अशा प्रकारची जबरदस्त योजना "इस्रो' आखत आहे.

अमेरिकेला उपग्रह पाठवायला जेवढा खर्च लागतो, त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चात इस्रोकडून उपग्रह पाठविले जातात, हे भारतीय शास्त्रज्ञांचे विलक्षण यश आहे. फार पूर्वी भारताने जेव्हा रोहिणीनावाच्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते, तेव्हा त्याला एक खेळणेसंबोधून अमेरिकेने भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाची थट्‌टा केली होती. परंतु समय बलवान होता हैं,’ याची प्रचीती यावर्षी साऱ्या जगाला आली आहे. या देशात काहीही नाही म्हणत जगभर फिरत नकाराचा सूर आळविणाऱ्या तरुण पिढीने यातून निश्चित धडा घ्यायला हवा.

धीरज वाटेकर
कार्यकारी संचालक,
ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, चिपळूण



प्रसिद्धी:http://www.konkanalerts.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...