रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

तळ हातावर मावणारी मोरवणेतील वैशिष्ट्यपूर्ण पूर्वाभिमुख प्रताप मारुती मूर्ती !



परंपरागत मौखिक पद्धतीने चालत आलेल्या माहितीच्या आधारे, चिपळूण तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्ष पूर्व असावी, असा निष्कर्ष येथील पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, इतिहास अभ्यासक समीर कोवळे, निसर्गप्रेमी विलास महाडिक यांनी काढला आहे. श्रीरामदास नवमीच्या (२०१७) पार्श्वभूमीवर या अभ्यासकांनी नुकतीच मोरवणेत जाऊन मंदिर व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मंदिराचा आणि मूर्तीचा इतिहास जाणून घेतला.

समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामीअवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवलेलीत्याकाळी या ठिकाणी जंगल होते. श्रीरामदास सांप्रदायिक ती व्यक्ती गावात जवळपास आठवडाभर राहिलीत्यांच्याशी कोणाचे वा त्यांनी कोणाशी काही बोलल्याची माहिती नाही. एका झाडाच्या बुंध्याजवळ खोलगट गाभारा करून त्यात ही मूर्ती ठेवण्यात आलेली. त्यावर छोटीशी देवडी (मठ) बांधली गेली. आजही मंदिर स्थापित या जागेला पूर्वांपार माहितीनुसार मठअसे संबोधतात. मूळ छोटी मूर्ती ही अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची आहे. मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांचा ओढा वाढल्यानंतर होणारी अडचण लक्षात घेवून सध्या मंदिरात असलेली नवीन मूर्ती प्रतिष्ठापित केली गेली असावीत्या स्थापनेचाही निश्चित काळ सांगता येत नाही. या मूर्तीच्या पायाशी मूळ जुनी मूर्ती आजही पाहायला मिळते. दोनही शेंदुरचर्चित मूर्ती आकारमान वगळता समसमान आहेत. 

साधारणतः १२५ वर्षपूर्व, गेल्या तीन पिढ्यांपूर्वीपासून या मंदिरात माघ कृष्ण पंचमी ते माघ कृष्ण द्वादशी सप्ताह संपन्न होतो. या कालावधीत दैनंदिन हरिपाठ, काकडाआरती, कीर्तन होते. गावातील स्थानिक माळकरी पाहुण्यांमार्फत सप्ताह बसविण्याचा आणि उठविण्याचा धार्मिक विधी केला जातो. ही पद्धत पंधरागावातील पोसरे गावच्या पोसरेकर महाराजयांनी स्वतःच्या कीर्तनाने सुरु केली, ती आजतागायत काय आहे. सप्ताहाचा दासनवमी दरम्यानचा असलेला पारंपारिक कालावधी पाहाता वरील परंपरागत मौखिक पद्धतीने चालत आलेल्या माहितीत तथ्य जाणवते.द्वादशीला मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो. याखेरीज रामनवमी, हनुमान जयंती, त्रिपुरारी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती उत्सव होतात. गोकुळ अष्टमीला वाडीत ध्वज फिरतो. माघ कृष्ण एकादशीला प्रदाक्षिनांतर्गत   निरबाडे खेंड, आकले, वालोटी खिंड, दळवटणे बंदरणी या सीमेवर श्रीफळ अर्पण केले जातात. गावातील खालच्या वाडीतील प्रताप मारुती, गणपती, वेताळ आणि वरच्या वाडीतील श्रीराम मंदिर ही चारही मंदिरे एका सरळ रेषेत आहेत. 

साधारणतः चारशे वर्षांपूर्वी इ.स. १६४५ ते १६५५ अशा दहा वर्षांच्या काळात, समाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी साताराकराड आणि कोल्हापूर परिसरात शक्तीचं प्रतीक असलेल्या ११ मारुतींची स्थापना केलेली आपल्याला दिसते. त्यावेळची देशांतील परिस्थिती, सामाजिक स्थिती विचारात घेऊन समर्थानी समाजापुढे शक्तीचे, तेजाचे प्रतीक असलेले हे दैवत श्रीमारुती उभे केले. त्यांच्यायोगे बलोपासना आणि कोणत्याही संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा समर्थानी समाजाला दिली होती. समर्थांनी त्याकाळी ११०० मठ स्थापन केले आणि सुमारे १४०० तरुणांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते, तर काही शिष्य ब्रम्हचारी होते. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला होता. 

मोरवणेतील मंदिराचे पुजारी म्हणून राजाराम सखाराम जंगम काम पाहतातत्यांचे कटुंब गेल्या तीन पिढ्यांहून अधिक काळ या मंदिराच्या सेवेत आहे. सप्ताहादरम्यान मारुतीची सूर्योदयपूर्व आणि सप्ताह उठविताना सूर्यास्तानंतर पूजा होते. वाडीतील ग्रामस्थांनी राजाराम रघुनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर व्यवस्थापन कमिटी स्थापन केली आहे. यात सदस्य म्हणून दिलीप बाबासाहेब साळुंखे, संतोष बाळकृष्ण सुर्वे, जयसिंग अमृतराव शिंदे, दिलीप पतंगराव शिंदे, मोहन तातोजीराव शिंदे, रविंद्र रघुनाथ शिंदे, हनुमंत प्रताप चव्हाण, तर सल्लागार म्हणून बाळकृष्ण अनंत गुजर, सत्यविजय गणपतराव शिंदे, बाबासाहेब दगडूजी साळुंखे कार्यरत आहेत.


# धीरज वाटेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...