रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

खा. हुसेन दलवाई यांचे कोकणातील बोलीभाषा विषयक मार्गदर्शन

खासदार हुसेन दलवाई

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित  कोकणातील विविध बोलीभाषा संदर्भातील पहिले, अपरान्त साहित्य संमेलन नुकतेच चिपळूणात पार पड़ले. यावेळी कोकणातील बोलीभाषाया विषयावरील चर्चासत्रात राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी कोकणातील मुस्लीम बोली या विषयानुरूप मराठी प्रमाणभाषेसह कोकणातील विविध बोलीभाषांच्या मंथनातून जड़णघड़णीसंदर्भात मौलिक विचार मांडले. आजच्या मराठी राजभाषा दिन पार्श्वभूमीवर त्या विचारांचा आढावा...! 


दलवाई म्हणाले, अखिल भारतीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाला मराठी बोलीभाषांची नोंद घ्यावीशी वाटली नाही. बोलीतूनच प्रमाणभाषा समृद्ध होते, व्याकरण नंतर येते. प्रमाणभाषा आवश्यक आहे, पण म्हणून बोलींचे महत्व कमी होत नाही. 'तो काल गेला व्हता' असे म्हटले की बरेच जण हसतात, पण 'गेला नव्हता' म्हटले की हसत नाहीत, ही विसंगती आहे. प्रमाणभाषा समृद्ध करायचे काम बोलीभाषेनेच केले आहे. उच्चाराच्या संदर्भात आगरी, कोळी, कुणबी आणि कोकणातील मुसलमान यांची भाषा एकमेकांच्या जवळची आहे. काही फरक आहेत, मुसलमानांच्या बोलीत काही उर्दू शब्द येतात. इस्लामी संस्कृतीचा प्रभावही आहे. भालचंद्र मुणगेकर नेहमी म्हणतात, तुम्ही कोकणी लोकांनी बाराखड़ीच बदलून टाकली आहे. आम्ही 'पड़ला' म्हणतच नाही, 'परलाव' म्हणतो. 'पलत पलत जेवायला गेलो आनि धारकन परलो’ म्हणतो. यातून जे सांगायचं होतं ते सार् यांना कळले. शुद्ध भाषेचा वाद अगदी चिपळूणकरांपासून राहिलेला आहे. फुल्यांनी काय विचारलंय याच्यावर चिपळूणकर कधीच बोललेले नाहीत, मात्र त्यांच्या भाषेवर मात्र हल्ला केला. तरीही आज जागतिक पातळीवर फुल्यांच्या तत्कालीन विचारांवर विचार होतो, विविध जागतिक विद्यापीठात अभ्यास होतोय. आज सभागृहात महिला बसलेल्या आहेत त्या मागची प्रेरणा महात्मा फुले आहेत, तरीही फुले यांची निव्वळ भाषेवरून त्याकाळी चिपळूणकरांनी चेष्टा केली. आजमितीला मोठ्या प्रमाणात बोलीभाषा वापरली जाते. आनंद यादवानी संपूर्ण 'गोतावळा', बोराड़ेनी 'पाचोळा' कादंबरी संपूर्ण बोलीभाषेत लिहीलेय. बा. भ. बोरकरांनी कोकणी शब्द वापरलेत. नारायण सुर्वे यांच्या अतिशय चांगल्या कविता आहेत. नामदेव ढसाळ यांचे लेखन समजून येण्यासाठी ती बोली समजून घ्यावी लागेल. गणेश देवी यांचे बोलीभाषेवर खूप चांगले काम आहे. महानोर यांनी अतिशय चांगली प्रतिके वापरलीत. 'या नावाने या भूमीला ज्ञान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य घ्यावे' असे खेड्यातून आल्यामुळे व शेतीशी संबंध असल्यामुळेच ते बोलू शकतात. 'कोणती पुण्ये येति फळाला, जोंधळ्याला चांदणे लकड़ून जावे', ही प्रतिके ग्रामीण साहित्यातून पुढे येतात. विविध समाजातले साहित्य पुढे आल्याने आदिवासी, कातकरी आदि लिहायला लागले. एकेकाळी फक्त ब्राह्मण लिहायचे आता बहुजन लिहितात, ब्राह्मण अमेरिकेत जातात. दलित, मराठा समाजातील कितीतरी लेखक आज पुढे आलेत. 

कोकणातील इरसाल म्हणी कोकणाबाहेर खूप आवड़तात. 'तहान लागल्यावर विहीर खणायला जाता' ही खूप इरसाल म्हणं आहे ती अशी नंतर सुधारली. वामन होवाळ, सोपान कांबळे यांची उस्मानाबाद-मराठवाड़्याकड़ची बोली सगळ्यात गोड आहे. 'गेलोलो, आलेलो' अशी गोलाई या भाषेत आहे, कर्कशपणा कमी आहे. विविध गाण्यांच्या बंदिशीवरून बारकाईने नजर फिरवली तर त्यात देशभरच्या ब्रीज, आहुती, मैथिली, राजस्थानी या भारतीय भाषांतील शब्द सापडतील, त्यामुळे त्या गाताना कोठेही शब्द अड़त नाहीत. आपल्याकडील "क्लासिकल" गायक या बंदिशींमुळे हिंदीतून राहिले आहेत. माझ्या एका मैत्रिणीने काही मराठी बंदिशी केलेल्या आहेत, त्या कबीरांवर आहेत. भाषा ही लोकांना एकत्र आणते. मी विधानपरिषदेत बोलायला लागलो तेव्हा नितीन गडकरी  'व-हाड़ी' भाषा बोलायचे. ते पाच बोलत नाहीत 'पाँच' बोलतात, दस बोलतात. परंतू त्या सभागृहात गेल्यानंतर मराठी भाषा किती प्रगल्भ आहे, हे लक्षात आलं. भाषेत जरा चुकलो तर पूर्वी लोक चेष्टा करायचे. मी शाळेत असतांना लोक आम्हाला 'चिचो' म्हणायचे. आम्हाला 'ण आणि ड़' बोलताच यायचा नाही, आज चेष्टा होत नाही, अशी आठवण दलवाईंनी सांगितली.

लक्ष्मण मानेनी उपरा लिहिताना कैकाड़ी बोली वापरलेय. पुस्तक वाचून समजून घ्यायला थोडा वेळ लागतो, समजलं की गोडी लागते. 'विंचू चावला, विंचू चावला', 'कधी पाजवा कधी वाजवा, मी ढोलकीच त्याची' यात महिलांचे दुःख मांड़लय. बोलीभाषा महिलांनी जतन केली आहे. बहिणाबाईंच्या कवितेची बोली ही अहिराणी नसून वेगळी आहे, आपण समजतो हा सुद्धा वाद आहे. 'रात्रीस खेळ चाले' मधील भाषेला थोडासा प्रमाणभाषेचा स्पर्श आहे कारण मूळ देवगड़ी बोली सर्वांना कळेल असे नाही. आज सिरीयलमध्ये मोठ्या प्रमाणात बोलीभाषेचा वापर होतो. पुण्यात बव्हंशी हिंदी बोलतात, आजची पिढी तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. ती इंग्रजी, मराठी, कोकणी, आगरी आदि अनेक भाषा बोलते. सन १९७० ला बाबा आमटेंच्या एका देशव्यापी शिबीरात सहभागी असताना आमचे भाषेच्या अनुषंगाने गट झाले हे भाषेचे वैशिष्ट्य आहे. सानेगुरुजी म्हणालेत, 'खरा तो एकहि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' आणि हे काम बोलीतून घड़ते. जयवंत दळवी, आरती प्रभू यांनी आपल्या लेखनात वापरलेल्या मालवणी बोलीभाषेला मच्छिंद्र कांबळी आणि वस्त्रहरण नाटकाने प्रमाण मिळवून दिले आहे. म्हणून आज तिथला कोकणी माणूस लाजत वगैरे नाही. फाईलला शासकिय भाषेत ‘नस्ती’ म्हणतात, प्रशासकीय भाषा अशी जड करून ठेवली आहे. मुंबईच्या घरी रोज भाजी घेवून येणाऱ्या सामवेदी ब्राम्हणाची व्यथा त्यांनी ऐकवली. सगळेच ब्राम्हण पुढारलेले आहेत, हा समाज चुकीचा आहे असे ते म्हणाले.

कोकणातल्या मुस्लीम बोलीची फारशी कोणी दखल घेतलेली नसून संशोधनही झालेले नाही. प्रा. मैमुना दळवी यांनी यावर लिहिलेले आहे. मागे एकदा साहित्य संमेलनात अब्दुल कादिर मुकादम यांचे भाषण झाले होते. त्यांच्या कन्या, कोकणी खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक प्रा. मोहसीना मुकादम यांनी मुंबईतील कोकणी मुसलमानांच्या भाषेवर लिहिले आहे. मुंबईचा मुस्लीम हा हबशी इराणातून आलेला परंतु भाषा कोकणी, इतर कोकणी अरबस्तान, गल्फ येथून मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी आलेले आहेत. व्यापारासाठी आलेले पुढे कोकणसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर स्थिरावले, सुफीपंथाचा पगडा इथे आहे. त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीवर ‘सुफी’ प्रभावामुळे हिंदू आणि मुस्लीम असा तणाव नाही. ‘सुफी’ लोक प्रवचने करायचे. त्याला सर्वपन्थीय समाज श्रोता असायचा. परंतु सर्वांनी मुसलमान व्हावे अशी काही अट त्यांची नसायची. काही लोक मुस्लीम व्हायचे ! या साऱ्यामुळे आपल्याला इतर ठिकाणांच्या मानाने शिक्षण परंपरेच्या बाबतीत कोकणातला मुसलमान सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतो, तो इथल्या बोलीशी, खाद्यसंस्कृतीत मिसळलेला दिसतो. यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. दलवाई, कासकर आणि देसाई हे मुसलमान समाजात स्वतःला जास्त सुशिक्षित समजतात, ते ‘हत बेस’, ‘हत ये’ बोलतात ‘थै’ बोलत नाहीत. यात सुद्धा बोलीतील भेद जाणवतो. रायगड, रत्नागिरी आणि दालदी मुसलमान तर याहूनही वेगळी बोली बोलतो. हमीदा बानू यांचे ‘मजलीस’ नावाचे पुस्तक आहे, त्यांनीही या बोलीवर लिहिले आहे. स्त्री दु:ख खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे. ती म्हणते, ‘ती पांढऱ्या पायाची असं आपण पुरुषांबाबत बोलत नाही. स्त्रीयांबाबतही बोलू नका, तिचा दोष नाही, अल्लाच्या इच्छेप्रमाणे ते झालेले आहे’. स्त्री साहित्यात मोठ्या प्रमाणावर बोलीभाषेचा वापर झालेला दिसतो. इस्लाम येथे दोन प्रकाराने आलेला आहे. व्यापारी आणि त्यातून सुफीपंथ आला. सारे पीर केरळ ते अजमेर-काश्मीर पर्यंत सुफी आहेत. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी संस्कृतीचे संवर्धन, समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काश्मीर, केरळ, कर्नाटक ते कोकण-सिंधुदुर्ग प्रत्येक ठिकाणच्या मुसलमानाची भाषा वेगळी आहे, त्यावर तिथला प्रभाव आहे. इथली भाषा राजापूरला संपते, पुढे दुसरी बोली सूरु होते. आम्ही बाराखडी सोपी केलेली आहे, ड, र, ळ वापरत नाही. ही भाषा व्यापाऱ्यांनी आणलेली नाही, त्यांना ही भाषा शिकवली गेली आहे. इथल्या कुणबी, कोळी, आगरी आणि मुसलमानाच्या बोलींत मोठ्या प्रमाणात साम्य आहे. मुसलमानांच्या भाषेत काही उर्दू शब्द आहेत, यामागे व्यापारी समूहासोबत इथल्या समाजाचा ‘नाविक’ व्यवसाय हे सुद्धा एक कारण आहे. आम्ही ग्लास म्हणतो, पेला म्हणत नाही. आज मुसलमान आपल्या कोकणी भाषेपासून दूर चाललेत. आपण आपली मातृभाषा विसरलो, तर सगळच विसरू. कारण तिचा संस्कृतीशी फार मोठा संबंध आहे. तिच्या पासून आपण लांब गेलो तर समाजापासून आपण तुटतो. आम्ही मोहरमात, ‘इमाम हुसेन ररायला निकले फुलों का शेरा है, अल्ला अल्ला बादल फिर साया है, मेहंदी लगाओ जी कासम बाला के हाथ’ अशी आठवण गीते म्हणायचो. पूर्वी मिरवणूकपूर्व रात्री ताबूताची उंची वाढविण्यासाठी रातोरात प्रयत्न होत असत, आज आम्ही ताबूत, ऊर्स यांपासून आम्ही लांब गेलेलो आहोत. गाणी, कव्वाली या सुफीतून आलेल्या आहेत.  

पूर्वी काळोखाच्या खोलीत स्त्रीयांचे बाळंतपण होत असे. त्या खोलीची खिडकी लहानच असायची. मूल झालं की ते सुपात टाकले जायचे, सूप ओढले जायचे आणि लग्न ठरवून टाकले जायचे. ‘सुपात परलाय सोनपुतला, त्याच्या बाबाला देगुन कलवा, त्याच्या मामुला तारन कलवा, सुपात परलाय सोनपुतला’ असं म्हटल जायचं ! आता ती प्रथा गेलेली आहे. लग्नाच्या वेळेला सकाळी सकाळी बायका, ‘तुना बाय शेजारनीचो कोम्भूरलो, कोम्भूरल्यानी आवाज केलो, इद्रमभाई शान्याची निज पोरगी, कोम्भूरल्यानी आवाज केलो’ अशी गाणी म्हणायच्या. दुर्गाबाई भागवत यांनी ही सगळीबोली भाषेतील गाणी जमा केली होती. त्यातली ऊर्दू त्यांनी हमीदभाई यांच्याकडे दिली. उर्दू मला आणि हमीदभाईनाही येत नव्हते, तेव्हा आमच्या भाबी ती ऊर्दू गाणी म्हणायच्या आणि मी लिहायचो, असा रोज रात्री उपक्रम चाले. पुढे त्याचे काय झाले माहित नाही पण दुर्गाबाईनी त्यावर खूप मेहनत घेतली होती, असे दलवाई म्हणाले. बोलींचा वापर गाण्यांत अधिक झाला आहे. गीता, कुराण, बायबल विविध सारे धर्मग्रंथ पद्यांमध्ये आहेत. ते सहजतेने गायले जातात. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अगदी मोरोपंतांपर्यंत  लेखन पद्यात आहे. तत्पूर्वी गद्यात बखरी लिहिल्या जायच्या. बखरीतही इतिहास कमी असायचा, पद्यातून संगोपन व्हायचे, या साऱ्यांचा अभ्यास लोकांनी वेळोवेळी केलेला आहे. जर्मनीत जेव्हा भाषेसंदर्भात प्रश्न निर्माण झाले तेव्हा त्यांनी गावागावातून काय शब्द बोलले जातात याची माहिती घेवून ‘जर्मन भाषा विकसित केली. चिपळूणच्या विश्रामगृहात ‘गरम आणि गार पाणी’ असे लिहिलेले असायाचे, थंड म्हणत नाहीत, ‘गार’ फक्त कोकणी माणूसच म्हणतो. म्हणून शब्द भांडार वाढविण्यासाठी बोलीभाषा गरजेच्या आहेत. हमीद दलवाई गेले तेव्हा नानासाहेब गोरे यांनी आपल्या अग्रलेखात म्हटले होते, ‘हमीदची मराठी खास चिपळूणी मराठी होती’, अशी आठवण त्यांनी अखेरीस सांगितली.

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com
प्रसिद्धी : दैनिक सागर, मराठी राजभाषा दिन दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...