मंगळवार, १२ मार्च, २०१९

आठवणीतले ‘भडकावू’ भाषण !


घडत्या-बिघडत्या, रत्नागिरीतील स्थापत्य अभियांत्रिकी पदविकेच्या कॉलेजयीन जीवनात आमच्या व्यक्तिमत्त्वावर, आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली आणि आदरणीय प्रा. एस. डी. आटे या दोन अधिव्याख्यात्यांचा जबरदस्त प्रभाव राहिलेला आहे. गेल्या नुकताच आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. यावेळी आम्हाला सुदैवाने सोबतच्या सहकाऱ्यांसह आदरणीय प्रा. डॉ. मोहनकुमार हंपाली सरांना विजयनगर-सांगली येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटता आले. भेटीदरम्यान आमच्या सहकाऱ्यांना काही जुन्या आठवणी सांगताना सर थेट, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. त्या भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

आदरणीय हंपाली सरांसोबतची प्रत्येक भेट ही बुद्धीवर्धकच असते. याची जाणीव त्यांना भेटणाऱ्या आणि ओळखणाऱ्या सर्वांनाच आहे. सर सध्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनात स्थापत्य / उपयोजित यंत्रशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात आम्ही चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते.

शनिवार दिनांक ८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी कोल्हापूर मधील भेटी आटपल्यावर दिवसभरातल्या कामाविषयी फेसबुक आणि वॉट्सअप सोशल मिडीयावर पोस्ट टाकली. आमच्या पुढील नियोजनाविषयी काहीही माहिती नसताना सरांनी थेट, ‘सांगली अभियान कधी आहे मित्रा ?’ असा प्रश्न विचारला. इच्छा असूनही, निव्वळ व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण ठिकठिकाणच्या जवळच्यांना भेटू शकत नाही ही नेहमीची खंत याहीवेळी जाणवली. सरांकडून मात्र सांगलीतील जेवणाचे चांगले पर्याय, गणपती दर्शन आणि वेळ मिळाला तर घरी भेट अशा बाबी सांगितल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तर सरांनी फोन करून पत्रकार परिषद असलेल्या सांगलीतील हॉटेल नटराज येथे मी भेटायला येतो असे सांगून आमची अडचणही बहुदा ओळखली. या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्हांला अचानक सरांकडे जाण्यासाठी वेळ उपलब्ध असल्याचे लक्षात येणे, सुदैवाने आम्ही त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात असणे असे सारे काही जुळून आले. प्रत्यक्षात सरांना जाऊन भेटलो तेव्हा मनाला लाभलेले समाधान शब्दात सांगणे कठीण आहे. आम्ही येतोय म्हणताच मॅडमनी अगदी थोड्या वेळात केलेला उपमा-चहा गप्पांत गोडवा निर्माण करून गेला. देशाच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, माणसाच्या मानसिकता बदलाच्या आव्हानापर्यंत वेगवेगळ्या विषयावरील गप्पा सुरु असताना सर अचानक, आम्ही कॉलेजयीन वयात केलेल्या भडकावू भाषणापर्यंत पोहोचले. भडकावू भाषणाच्या आठवणीने आमचेही मन थेट १८ वर्षे मागे गेले.

रत्नागिरी युवा महोत्सवात
कॉलेजला मिळालेल्या चषकासह...!  
वयाच्या एकविसाव्या वर्षी, कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना सन २००१ साली रत्नागिरीत विविध कॉलेजचा स्पर्धात्मक सहभाग असलेला युवा महोत्सव सुरु होता. या महोत्सवाच्या वक्तृत्त्व स्पर्धांत, ‘युवकांच्या दृष्टीकोनातून देशासमोरील प्रश्न’ असा विषय देण्यात आला होता. आमच्या कॉलेजमधून यासाठी प्रतिनिधी म्हणून स्पर्धेतून आमची निवड झालेली. भाषणाची रिहसल सरांनी घेतली होती. स्पर्धांत आकाशवाणी केंद्राचा सहभाग होता. ही सारी निवडक अंतिम भाषणे केंद्रावरून प्रसारित होणार होती. आमच्या भाषणातील सारे मुद्धे निवडण्यात आम्हाला आमच्या वडिलांसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे व्यावसायिक कार्यकर्ते नरेंद्र घाडीगावकर यांनी सहकार्य केले होते. हे मुद्दे सरांनाही ज्ञात होते. अनेक मुद्धे असेही होते जे इच्छा असूनही काही मर्यादांमुळे आम्ही वगळले होते. स्पर्धास्थळी प्रत्यक्षात मात्र आम्ही सळसळत्या रक्ताच्या भावनिक आवेशात स्टेजवर भाषणाला उभे राहिलो. सुरुवातीपासूनच अचानक शरीरात संचारलेल्या त्या उत्साहाच्या भरात आमच्या तोंडून ठरलेले मुद्धे अधिक आक्रमकतेने मांडले गेलेच पण रिहसलमध्ये नसलेला ए्नरॉन प्रकल्पाचा मुद्धाही अधिकच तीव्रतेने मांडला गेला. अखेर नको व्हायला तेच झाले ! आमच्या भाषणाला उपस्थितांच्या अधिक टाळ्या मिळूनही प्रत्यक्षात गुणांकनात मात्र कमतरता राहिली. कॉलेजचा एकत्रित युवा महोत्सव स्पर्धेतील पहिला क्रमांक हुकला. पुढच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ए्नरॉनचा मुद्धा भाषणात आला नसता तर कदाचित कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला असता. पण ते राहिले. मुख्य म्हणजे एवढे होऊनही आदरणीय हंपाली सर आणि आटे सर यांपैकी कोणीही आम्हांला फारसे बडबडले नाहीत. कदाचित त्यानांही ते मुद्धे पटले असावेत. आमचे व्यक्त होण्याचे व्यासपीठ आणि आवाजाची तीव्रता यात काहीतरी गडबड झाली असावी. स्पर्धेत व्यासपीठावर आमच्याकडून जे बोलले गेले ते सारे सहजतेने आलेले होते. त्याचा झालेला परिणाम मात्र आम्हांला खूप मानसिक वेदना देऊन गेला.     
   
परवाच्या भेटीत, १८ वर्षानंतर सरांनी पहिल्यांदा त्या भाषणाचा उल्लेख ‘भडकावू’ असा केला नि हे सारे आठवले. कदाचित त्यावेळच्या परीक्षकांनीही आमच्या भाषणाला असाच शेरा दिला असेल ! पण त्या भाषणाने सरांचे नि आमचे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले ते कायमचेच ! तेव्हापासूनच्या आमच्या जीवनप्रवासात शरीराने दूर असले तरी मनाने सरांचे निश्चित लक्ष असते. जीवनाच्या विविध वळणावर वेळोवेळी भेटलेले, ज्यांच्यासमोर आम्ही कायम नतमस्तक होतो असे सरांसारखे मोजके मार्गदर्शक या ना त्या मार्गाने आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याकडून लाभणाऱ्या या मार्गदर्शनरुपी श्रीमंतीने जबरदस्त सुखावलेले आम्ही आणखी एका नव्या उपद्यापासाठी सज्ज होत असतो.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
ईमेल : dheerajwatekar@gmail.com   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...