शनिवार, २३ मार्च, २०१९

साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक !


अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती कायम आमच्या वैचारिक जडणघडणीचे कारण ठरलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रकाशकाका देशपांडे होत.

सन १९९२ साली, प्रकाश काकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा १२ वर्षांचे आम्ही अलोरेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकत होतो. सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या अलोरेच्या वातावरणात काही साहित्यप्रेमी सृजनांच्या सहकार्याने, आमच्या वडिलांनी 'ओंजळ काव्य रसिक मंच' स्थापन केला. या मंचाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘प्रमुख वक्ते’ म्हणून  दिनांक ४ एप्रिल १९९२ रोजी गुढीपाडव्याला प्रकाशकाका अलोरेत आले असताना आम्ही त्यांना पहिल्यांदा पाहिले, त्यांचे विचारही ऐकले. अर्थात तोपर्यंत आमचा आणि साहित्याचा फारसा संबंध नव्हता. निव्वळ आमच्या बाबांच्या आग्रहाखातर आम्ही कार्यक्रमात असायचो. वाचन ही जेमतेमच होतं. काकांनी आपल्या भाषणात वाचनाबाबत केलेलं मार्गदर्शन आजही आठवतंय. ‘अस्वस्थ आणि बेचैन साहित्यप्रेमींची चळवळ’ अशा शब्दात त्यांनी ‘ओंजळ’ला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी ‘कविता नव्या-जुन्यांची’ हा आमच्या वडिलांच्याच संकल्पनेतला कार्यक्रम सादर झाला होता, अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. बाबांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘प्रमुख वक्ते’ म्हणून प्रकाशकाकांची प्रतिमा आमच्या मनात तेव्हाच घट्ट बसली.

प्रकाशकाकांची दुसरी व्यवस्थित भेट आठवतेयं ती सन २००८ सालच्या मार्च महिन्यातली ! त्याच्या काही महिने अगोदरपासून आम्ही आमचे सहकारी समीर कोवळे आणि विलास महाडिक यांच्या सहकार्याने पूर्ण करीत आणलेला 'चिपळूण तालुका पर्यटन' हा पुस्तक निर्मिती प्रकल्प अंतिम टप्प्यात असताना 'एक्सर्ट ओपिनिअन' घेण्यासाठी आम्ही काकांना भेटलो होतो. काकांमधील 'साहित्य-कलेच्या प्रांगणातील सर्वस्पर्शी मार्गदर्शक' व्यक्तिमत्वाची ओळख पहिल्यांदा आम्हाला तेव्हा झाली. आमच्या नियोजित पुस्तक प्रकल्पाचे मनापासून कौतुक करताना काकांनी आवर्जून त्यात काही मुद्द्यांची आपणहून भर घातली होती, यास्तव आम्हीही सर्वानुमते काकांचा फोटोसह गौरवपूर्ण उल्लेख त्या पुस्तकात केला होता. पुढे जाऊन त्याच बैठकीत काकांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या हॉलमध्ये घेण्याची सूचना केली होती. पुढे गुढीपाडव्याला तो कार्यक्रम लोटिस्माच्याच सभागृहात पार पडला. एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हॉल भरून रसिकांची दुर्मीळ गर्दी तेव्हा चिपळूणात अनेकांनी अनुभवली होती. या सा-यात काकांचे मोलाचे सहकार्य राहिले हे नक्की ! 

या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीनंतर यावर्षीच्या सन २०१८ च्या गुढीपाडव्याला, पेढे गावातील श्रीपरशुराम निसर्ग सान्निध्य पर्यटन केंद्रात आम्ही त्याच चिपळूणच्या पुस्तकाची 'दशकपूर्ती' साजरी केली. काकांचे हमखासचे मार्गदर्शन तेव्हाही मिळाले. गेल्या दहा वर्षांत आमची आठ पुस्तके प्रकाशित झाली. प्रत्येक वेळी प्रकाशित पुस्तक चिपळूणच्या वाचनालयाकरिता काकांच्या हाती देतानाचा आमचा आनंद केवळ अवर्णनीयचं राहिला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या कार्यबाहुल्यातून वेळ मिळेल तेवढे वाचनालयाशी जोडले गेलो ते काकांमुळेच ! वाचनालयाच्या उपक्रमात काहीवेळा व्यासपीठावर येऊ शकलो तेही काकांमुळेचं ! आमच्या आठव्या लिखित 'कृतार्थीनी' या सुप्रसिद्ध मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाच्या दिनांक २ ऑक्टोबर २०१७ रोजी मुरूड ता. दापोली येथील प्रकाशन सोहोळ्यास प्रत्यक्ष निमंत्रण नसतानाही काका आपले दोन सहकारी नामवंत कवी आणि लोटिस्माचे वर्तमान अध्यक्ष अरूण (दादा) इंगवले आणि साहित्यिक प्रा. संतोष गोणबरे (आमचा    कॉलेजयीन साहित्यिक मित्र) यांच्यासह उपस्थित राहिले, तो क्षण आमच्यासाठी सुखद तितकाच धक्कादायक होता. आमच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुरूडच्या कार्यक्रमाला चिपळूणातून कशाला कोण येईल ? हा आमचा विचार काकांनी खोटा ठरविला होता. 'मुद्दामहून तुला शुभेच्छा देण्यासाठीच आलोय' असेही ते यावेळी म्हणाले होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत 'कदाचित' वाचनालयाच्या कक्षेत येऊ न शकणारे परंतु सर्जनशील समाजासाठी आवश्यक असलेले अनेक उपक्रम काकांनी विचारपूर्वक सर्वांच्या सहकार्याने वाचनालयाच्या पटलावर आणून यशस्वी केलेले आम्ही पाहिलेत. वाचनालयाचे 'कलादालन' हा अशातीलच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. तो काकांच्या कल्पक नेतृत्वाखाली पूर्णत्वास जातो आहे. आगामी काळात त्याचा परिघ विस्तारेल असा विश्वास वाटतो. 

सतत कार्यरत राहू पाहणा-या वर्तमान तरूण पिढीच्या सोबत असलेले 'प्रकाशकाका' आम्ही पाहिलेत-अनुभवलेत. आज प्रकाशकाका देशपांडे यांच्या विविधांगी कतृत्वसंपन्न कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रति सदैव आदरभाव असलेल्या सर्वांकडून 'कृतज्ञता सोहोळा' संपन्न होतो आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या सोहोळ्यासाठी आणि काकांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही भरभरून सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आम्हाला सतत मिळत राहावा, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. 


धीरज वाटेकर  (८ ऑक्टोबर २०१८)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...