सोमवार, १८ मार्च, २०१९

पालावलेल्या जंगलातील दोन तास !

रात्री साडेनऊची वेळ ! ठिकाण चांदोली अभयारण्याचा बफर झोन ! रस्त्यावर न्यायला आलेल्या धनगराने घराचा दरवाजा उघडला. घरात पाऊल ठेवले तर दरवाजातच आडव्या मोकळ्या जागेत म्हैस, रेडकू, दोन बैल बांधलेले. अधिकची जनावरं शेजारच्या एका खोलीत ! जवळच्या खुराड्यातल्या काही कोंबड्या, नि घरातच इकडे तिकडे फिरणाऱ्या दोन कुत्र्यांनी आमचे स्वागत केले. घरच्यांनी शेणाने सारवलेल्या जमिनीवर घोंगडी अंथरलेली. हातपाय धुऊन तिथेच बसलो. मित्राने विचारले, ‘कसं वाटलं ?’ आमची प्रतिक्रिया ‘जबरदस्त !!!’

चिपळूण शहराला ऑफबीट टुरिझम डेस्टिनेशनबनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कार्यरत असलेल्या ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीया संस्थेच्या वतीने गेल्या आठवड्यात आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांचा दोन दिवशीय दौरा केला. या दौऱ्यात, निसर्ग आणि पर्यटनात रुची असलेल्या स्थानिक समाजघटकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी तीन स्वतंत्र पत्रकार परिषदा आणि तीन जिल्ह्यातील बावीस पर्यटन कंपन्या आणि प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. चेअरमन श्रीराम रेडीज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या दौऱ्यात संचालक आणि वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, संस्थेचे मॅनेजर विश्वास पाटील सोबत होते. चिपळूणला परतताना रात्रीच्या जेवणाचा बेत निलेशने, आमच्या परतीच्या प्रवासाचा रस्ता थोडा वाकडा करून ढेबेवाडी नजीकच्या प्रसिद्ध वाल्मिकी पठाराजवळ असलेल्या पाणेरी गावात निश्चित केला होता. ज्यांच्या घरी गेलो त्या विठ्ठल येमकर यांच्या पत्नी माळकरी असल्याने माझ्या शाकाहारी जेवणाचा प्रश्न सुटला होता. आमच्या दोघा मित्रांना मसाल्याचे वाटण नसलेल्या इथल्या खास मांसाहारी जेवणाचा, रश्याच्या आनंद घ्यायचा होता. म्हणून आमचे इकडे येणे झाले. पण या रात्रीच्या दोन तासात आम्ही इथले जे जगणे अनुभवले ते सारेच विलक्षण होते.

ढेबेवाडीनजिक पाटण तालुक्यातला वाल्मिकी पठाराचा हा परिसर. कराडहून वाल्मिकी ५० किमी आहे. कराड, ढेबेवाडी, सणबुर, पाणेरी, वाल्मिकी असा गाडी रस्ता आहे. सणबुरच्या पुढे प्रसिद्ध नाईकबा देवस्थान आहे. चांदोली अभयारण्याच्या बफर झोनमध्ये हा भाग येतो. वाल्मिकी विस्तीर्ण पठारावर आहे. त्याच्यावर अजून १०० मीटर चढाई केली की विस्तीर्ण सडे नि पवनचक्क्यांच जाळं पाहायला मिळत. आता तर पवनचक्या, सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या चेकपोस्ट जवळ आपल्या स्वागताला उभ्या आहेत. शनिवार दिनांक ९ मार्च २०१९ च्या रात्री आमची गाडी जेव्हा तिथे नावनोंदणी करायला थांबली तेव्हा अंगाला स्पर्शिलेला वारा, पवनचक्यांचा कानात गुंजलेला ‘उँ उँ उँ’ असा विशिष्ट आवाज मनात तिथेच थांबण्याची इच्छा निर्माण करून गेला. वनखात्याची चेकपोस्ट सोडल्यावर, गेली अनेक वर्षे ज्याच्या दर्शनासाठी आतूर होतो त्या जरबेल (रानटी उंदीर)ची वाटेत अनेकदा भेट झाली. खूप चपळ त्यात रात्र त्यामुळे फोटो घेता आला नाही. हा उंदीर हाती लागलेलं धान्याचं अख्खं गोडावून खाली करण्याची ताकद ठेवतो. अर्थात सारं धान्य तो हळूहळू बिळात नेतो. जंगलाचा इन्सायक्लोपिडिया असलेल्या निलेशने माहिती दिली. मध्येच आकाराने काहीसे मोठे, गवताळ भागात रात्रीचे अॅक्टीव असलेले रानटी ससे (हेअर) भेटले. या दोघांचं दर्शन जाता-येता झालं. काही वेळाने आम्ही येमकर यांच्या घरी पोहोचलो. अंधाराची तीव्रता एवढी जबरदस्त की घरात लाईट पोहोचलेला असतानाही बाहेरचा काळाकुट्ट अंधार शहरी मनात धडकी भरवायला पुरेसा असलेला. घराबाहेरच्या वातावरणात प्रवेश केल्यापासून प्रत्यक्ष घरात प्रवेश करेतोपर्यंत नाकाला येणारा वास तीनदा बदलला जो नेहमीच्या शहरी परिचयातला नक्कीच नव्हता. दारातली जनावरं वाळकं गवतं, भाताचा पेंढा खात बसली होती. काही रवंथ करीत होती. आता हळूहळू यांना हिरवा झाडपाला कमी होत जाईल, आमची नजर हेरून येमकारांनी माहिती दिली. थोड्याश्या गप्पा झाल्या, वेळ कमी होता. पुन्हा चिपळूणला निघायचे होते. वाघाच्या उपस्थितीने दिव्याने दिवा लागावा तसं जंगल कसं पेटत जातं ? म्हणजे जागं होतं जातं, याची सुंदर माहिती त्यांनी दिली. घरात शेतात लागणारी हत्यारे, लाकडी नांगर, कुळव, सापत्या ठेवलेली दिसली. त्या पठारावर धनगरांची चार घरे नि तीनच माणसे होती.

काही दिवसांपूर्वीच इथे गव्याने एक बाई मारली. ती नेमकी यांच्या संबंधातली. दुपारी पाण्याला गेलेल्या त्या बाईची परतायची नि गव्याची एकाच वाटेत गाठ पडली. सध्याच्या पालावलेल्या जंगलात कुठल्याश्या झाळीत लपलेला तो गवा दुर्दैवाने तिला दिसला नाही. दोघे समोरासमोर येताच जे व्हायचं तेच झालं. जंगलातील झाडं जुनी पालवी पडून नवी पालवी अडवायला लागलीत. त्यालाच पालावलेल्या जंगलाचा काळ म्हणतात. घरी येऊन आम्ही जेवायला बसलो. निलेश आणि विश्वासराव मांसाहारावर ताव मारते झाले. तसं विशेष काही असणारही नव्हतं ! पण तरीही जे होतं आणि ज्या वातावरणात मिळालं होतं त्याला कशाचीच सर येणार नाही. दोघा मित्रांना येमकरांनी मटन वाढले. सोबतीला ते आणि त्यांचा मुलगाही बसला. आणखी एक मुलगा आणि सून माहेरी गेलेले. आम्ही आलोय म्हणून शेजारच्या घरातली बाईही इथेच आलेली. माझ्यासाठी एका बाजूला छानशी शाकाहारी पातळ भाजी बाईनी चुलीवरून आणून ठेवली. समोर एका ताटलीत तुकडे केलेल्या भाकऱ्यांचा ढीग ठेवला होता. मी आणि विश्वासरावांनी मनातून म्हटलं एवढं कधी नि कुणाला संपायचं ? पण त्या साऱ्या भाकऱ्या संपवून पुन्हा मागवाव्या लागल्या. त्या भाकऱ्या बऱ्यापैकी कडक होत्या. आपल्याकडच्या भाकऱ्या नरम होतात. म्हणून मी सहजंच विचारलं तेव्हा, ‘पीठ जरा जास्त वेळ मळलं की येते अशी भाकरी !’ अगदी सहजतेने त्या बाई बोलून गेल्या. कोणत्याही कौतुकाची अपेक्षा न ठेवता ! मला त्यांचं वागणं मनाचा मोठेपणा सांगून गेलं. 

तिकडे मांसाहारावर ताव मारणे सुरु असताना मध्येच येमकर मला म्हणाले, ‘पाव्हणं खा दणकून....!’ त्यांचा हा आदेश चाळीशीच्या उंबरठ्यावर जगण्यापुरतं खाण्याचा विचार करणाऱ्या मला पुरता संकटात टाकून गेला. जेवणाचे काही घास पोटात ढकलतो तोच समोरचा बैल निवांत मुतला, शाकाहारी जेवणाऱ्या मला ते पटकन जाणवलं. तेवढ्यात दुसराही...! बाकी इथल्या लोकांसाठी त्यात काहीच नवीन नव्हतं. कोणाचं तिकडे लक्षही गेलं नाही. मी मात्र विचार करू लागलो. ग्रामीण भागातील संस्कृती नि त्यांच्याशी आमची असलेली एकरूपता म्हणजे काय ? ते लक्षात आलं. जंगलात फिरताना असे अनुभव अनेकदा येतात. मात्र घरातला हा माझा तरी पहिलाच अनुभव होता. निलेशच्या आग्रहाने इथला भातही आवडीने खाल्ला. जोडीला त्यानेच मागवून घेतलेलं, वेगळ्या चवीचं दही, लसणीची चटणी याने जेवणाची लज्जत अधिक वाढविली. जेवण आटपले. निलेशने मटणाची हाडं ताटाबाहेर ठेवलेली होती. विश्वासरावांची ताटात होती. घरच्यांनी ताटं उचलली. हाडं तिथंच ठेवली. मला काहीच कळेना ? मनात म्हटलं, ‘हा निलेश असा कसा ?’ तेवढ्यात तिथं दारातला कुत्रा आला नि ती हाडं खाऊन गेला, मी बघतच बसलो ! माहितीचा पुढचा अध्याय निलेशने सांगून संपवला. जेवल्यानंतर येमकर पुन्हा गप्पा मारू लागले. म्हणाले, ‘जंगलातल्या आमच्या पिढीचं निभावलं. पुढच्या पिढीचं अवघड आहे, शिक्षण गरजेचं आहे.’ त्यांचं बोलणं खरचं होतं. पण इथल्या मुलांना आम्ही जाणीवपूर्वक आत्ताचे जंगलं विषयक शिक्षण द्यायला हवे आहे, असं उगाचंच मनात वाटून गेलं.

चिपळूणजवळचं कोयनेचं वाहतं पाणी घाटावरती असतं तर इथले शेतकरी लखपती झाले असते. असं सांगताना मध्येच काही निलेश बोललाच तर येमकर त्याला, ‘हाँ...! बोल तू...!’ असा प्रतिसाद देत होते. त्यातून त्या दोघातले वर्षानुवर्षांचे संबंध सतत जाणवत होते. निघताना घरातल्या बाई म्हणाल्या, ‘या पुन्हा कुटुंबाला घेऊन !’ तर आमचा निलेश म्हणाला, ‘लॉज दाखवायला बामण आणलायं ! त्याला आवडलं तर आलोच आठवडाभर...!’ नेहमीच्या सवयीप्रमाणे निलेशने त्या जेवणाचे पैसे देऊ केले. परतीच्या प्रवासात या भागातल्या जुन्या आठवणी तो सांगत राहिला. आम्ही जमेल तेवढे प्रश्न विचारत राहिलो. रात्री अडीच वाजता चिपळूण आले. येमकरांसारख्या लोकांच्या सान्निध्यात वर्षानुवर्षे घालविलेल्या निलेशचा मला मनापासून हेवा वाटला.  

धीरज वाटेकर
विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com, https://dheerajwatekar.blogspot.com


दैनिक तरुण भारत (रत्नागिरी) संवाद पुरवणी २३ मार्च २०१९
दैनिक उद्याचा मराठवाडा (नांदेड) २३ मार्च २०१९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...