महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष,
नाटककार, कवी प्रा. संतोष गोनबरे यांचा सुपरिचित प्राणीकथांच उपहासगर्भ पुनर्कथन,
जुन्या कथांचा काळानुसार अन्वयार्थ असलेला माकडहाड डॉट कॉम हा कथासंग्रह
नुकताच पुण्याच्या संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. आपल्या संस्कृत वाड्मयातील
विष्णूशर्मांचे पंचतंत्र, पाश्चात्य इसापच्या नीतिकथा, महानुभाव पंथातील चक्रधर
स्वामींच्या दृष्टांतकथा आदि माध्यमातून लेखनात प्राणीसृष्टीचा वावर झालेला आहेच !
गोनबरे यांनी कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये हा प्राणीसृष्टीचा
वावर आणला आहे. मराठी कथा क्षेत्रातला आजवर न हाताळला गेलेला हा नवा प्रयोग आहे.
चिपळूणचे नामवंत कवी अरुण इंगवले यांची समर्पक प्रदीर्घ प्रस्तावना हे
पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी केलेली ‘अवस्थ माकडहाडाची चिकित्सा’ वाचताना त्यांनीही हा कथासंग्रह जवळपास लेखकाइतकाच अभ्यासल्याचे जाणवते. निसर्ग नियमांची संविधानिक जबाबदारी निष्ठेने
पाळणाऱ्या प्राण्यांच्या प्रवृत्तीशी मानवी दुर्गुणांना तोलणे ही फारमोठी विसंगती
आहे, असे इंगवले यांनी म्हटले आहे. यातल्या साऱ्या कथा वरकरणी वेषांतर केलेल्या वाटतात.
चिकित्सकपणे वाचल्या तर बोधकथा किंवा नीतिकथा वाटतात. आणि त्यात खोल डुबकी मारली
तर अचंबित करणारे मतितार्थ गवसतात. हे प्रस्तावनाकारांचे विधान कथासंग्रह वाचताना
वारंवार आठवत राहते.
संग्रहातील साऱ्या कथा मॉडर्न
इसापनीती सांगतात. पूर्वी कधीतरी गावातील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात लेखकाने
कोल्हा, लांडगा, माकड यांचा एक संवाद लिहिला होता. पण माकड व्हायला कोणीच तयार
नसल्याने तो प्रयोग झाला नाही. लेखकाला इसाप पहिल्यांदा भेटला तो तेव्हाच ! पुढे मग
अनेकदा भेटत राहिला. संग्रहातील ‘म्हातारी आणि वाघ’ या पहिल्याच कथेतील ‘भोपळा
सुकला तर ? म्हातारीचे काय होईल ?’ हा आणि असे अनेक प्रश्न लेखकाला पडू लागले नि
त्याची उत्तरे शोधताना या कथांची निर्मिती झाली. आर. के. नारायण यांनी आपल्या
लेखनातून ‘मालगुडी’ नावाचं गावं निर्माण केलं. तसाच प्रयत्न गोनबरे यांनी ‘भोचकवन’
नावाने जंगलं उभारून केला आहे. समकालीन प्रश्नांना भिडून वाचकांना खडबडून जागं
करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथा आहेत. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचा वापर, सामन्यांच्या
तोंडच्या शब्दांचा खुबीने वापर असल्याने यातलं कथानक अधिक जवळचं वाटतं. मानवी
जीवनात घडते, ते प्राणी सृष्टीत घडले तर काय होईल ? अशा विचारातून लिहिलेल्या या कथा
आहेत. वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या साऱ्या कथा आशयघन असून अत्यंत संवेदनशील
विषयांना लेखकाने वाचा फोडलेली जाणवते. ‘जिंकणारा जिंकत राहतो, हरणारा हरत राहतो.
जिंकण्याची वृत्ती शारिरिक न होता मानसिक झाली की हरणाराही उरफुटेस्तोवर
जिंकण्यासाठी धावत सुटतो. हरणं ही सवय असेल तर जिंकणं हे व्यसन आहे. दोन्हीही
बदलता येत नाहीत.’ असे अनेक जबरदस्त पंच कथानकात भेटत राहतात.
म्हातारी आणि वाघ’ कथेत म्हातारीच नाव सांगायचं
राहून गेलं म्हणत लोकशाहीचा केलेला उल्लेख विदारक वास्तव पुढे आणते. पुढारलेल्या
समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारा वाघ, मागासलेल्या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारी
म्हातारी ! इतर पांढरपेशे जीवन जगणारे प्राणी, कथेतील इंग्रजी आणि ग्रामीण
शब्दांची उधळण छान जमलेली आहे. चोरून खीर खाणाऱ्या मांजराची ‘बुडबुड घागरी’ कथा
न्यायदानाच्या परिभाषेत वाचताना आजचे वास्तव नजरेखालून जात असल्याचे जाणवते. इतिहासात
आठशे वर्षांपूर्वी ‘काऊचे घर शेणाचे, चिऊचे घर मेणाचे’ ही कथा चक्रधरस्वामींनी
सांगितली आहेच. इथे ‘चिऊ-काऊ’ कथेत लबाड कावळ्याची भूमिका ज्या व्याकुळतेने मांडली
आहे ते पाहाता मूळ कथेचा भाव पूर्णपणे बदलला आहे. माकडाचा अप्रतिम शोधप्रवास
असलेल्या पाचर कथेत परखड भाष्य करून शिक्षण व्यवस्थेचा उपरोधिक समाचार घेण्यात आला
आहे. ‘वेबसाईटवर शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण सोडून सर्वकाही माहिती मिळाली.’ हे
वाक्य विचार करायला प्रवृत्त करते. लेखकाचे लेखन सामर्थ्य दाखविणारी कमी शब्दातील
‘श्रेष्ठ’ ही रंगतदार कथा सर्वार्थाने विचार करायला लावणारी आहे. जातीभेदाचे
वास्तव मांडणारी ‘बोकड आणि लांडगा’ कथा, दैनिक बाताबाती... बातमी खरी तोंडाला येईल
ती ! ही मुळातून वाचण्यासारखी कथा आहे. लेखकाने कथासंग्रहात उभारलेल्या भोचकवनातील
साऱ्या कथांमागे नितांत करुणा दडलेली आहे.
माकडहाड हा प्राणी आणि माणूस यांच्या
उत्क्रांतीमधला फरक आहे. ‘कॉक्सिक्स’ नावाचे हे टोकदार हाड वाढले तर शेपूट होते.
खुरटले तर टोचत राहते. म्हणूनच प्राणी स्वभावाने सच्छिल वावरतात. तर माणसं
स्वभावाने एकमेकांना टोचत राहतात. काहीश्या वेगळ्या शैलीचा, व्यवस्थेला आव्हान देऊ पाहाणारा हा कथासंग्रह आहे. माणसं व्यवस्थेची
गुलाम झालेली असताना लेखक पक्ष घेऊन लिहीत नाही. बोलीभाषेचा समर्पक उपयोग लेखकाने केला
आहे. पुस्तक कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात केली तरीही छान वाटतं. अचूक
शब्दांची केलेली निवड हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य ! माणसाचा उत्क्रांतीच्या विरुद्ध दिशेने
चाललेल्या दिशाहीन प्रवासाचे वर्णन असलेला हा वाचनीय कथासंग्रह आहे.
पुस्तकाचे नाव : माकडहाड डॉट कॉम (कथासंग्रह)
पृष्ठ संख्या : १७६, मूल्य : २०० रुपये
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे
फोन : ०२२ /
२४४९७३४३
पुस्तक परीक्षण : धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा