रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

आदर्श प्राध्यापक हरपला !


आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते ही दुर्मीळ जाणीव जपणारे, आपल्या लिखाणातून सतत ती व्यक्त करणारे, या वाटेवरून चालणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारे चिपळूणच्या डी.बी.जे. महाविद्यालयाचे सेवानिवृत्त, आदर्श प्राध्यापक मधू जाधव यांचे दिनांक २५ ऑगस्ट (रविवार) रोजी सोलापूर मुक्कामी दु:खद निधन झाल्याची पोस्ट वॉट्सअपवरून समजली. धक्काच बसला. लौकिकार्थाने सरांचा विद्यार्थी नसलेला मी अस्वस्थ मानसिकतेत थेट सन २००२ सालात पोहोचलो !

सन १९७४ ते २००९ इतका प्रदीर्घ कालावधी चिपळूणात प्राध्यापकीय जीवन जगलेल्या सरांची आणि माझी पहिली भेट झाली २००२ सालच्या मराठा साहित्य संमेलनात ! चिपळूणच्या ग्रामीण पत्रकारितेत काहीतरी करण्यासाठी धडपडत असलेल्या मला या संमेलनाच्या स्मरणिकेच्या संपादन समितीत काम करण्याची संधी मिळाली. विषय माझ्यासाठी नवीन होता. मार्गदर्शक होते, अर्थातच जाधव सर ! तेव्हापासून सरांसोबत संवाद सुरु झाला आणि असंख्य स्मरणिका, विशेषांकांचे संपादन, पुस्तकांचे लेखनही ! सन २०१८ साली आम्ही आमच्या ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या जीवनकथेवरील अभिप्राय पुस्तिकेकरिता, चरित्रनायक परांजपे गुरुजींच्या सूचनेनुसार सरांशी संवाद साधला. त्यांना, आम्ही लिहिलेली काही पुस्तके भेटही पाठविली. सरांनी ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ यावर ‘बेस्ट वर्ड्स ईन बेस्ट ऑर्डर’ या शब्दात आपला अभिप्राय पाठविला. सर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी आमची इतर भेट पुस्तकेही वाचली. त्यातल्या ‘कृतार्थीनी’ या मेडिकल सोशल वर्कर कमल श्रीकांत भावे यांच्या चरित्र पुस्तकात आम्ही नीटशा माहिती अभावी ‘मोघम’ कॅप्शनसह छापलेला विद्यार्थी वसतिगृहाच्या कोनशीला अनावरण प्रसंगीचा फोटो पाहून, तात्काळ फोनवर ‘हा चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेजचा असून त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी केले होते’ असे सांगून उत्तम माहितीही दिली. आपल्या देशात गावागावात, कानाकोपऱ्यात विलक्षण काम करणारी माणसं आहेत. त्यांच्या जीवनाला शब्दबद्ध करायला हवं. या ठाम मताचे सर होते. आमची ती पुस्तके वाचून सरांनी आपली अलिकडची तीन पुस्तके भेट पाठविली, आवर्जून अभिप्रायही मागितला. त्याबाबत फोनवर बोलणंही झालं ! मात्र लेखी अभिप्राय द्यायचा राहिला तो राहिलाचं ! ती तीनही पुस्तकं सरांच्या आपल्या अवतीभवती जे घडते त्यातील महत्त्वाचे काही नोंदवायचे असते या भूमिकेशी सुसंगत आहेत. सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद (रावबहादूर मल्लप्पा बसप्पा वारद), उद्योगरत्न श्री. ए. जी. पाटील ; एका संघर्षाची कहाणी आणि तिसरे आहे होनमुर्गीचे संत श्री सद्गुरू जंगली महाराज (मोहम्मदशाह उर्फ जंगलीशाह दाऊदशाह कादरी) यांचे ! पुण्याच्या जंगली महाराज रोडवर एक तपाहून अधिक काळ माझे जाणे-येणे आहे. मात्र त्या मूळ स्थानाची सरांनी दिलेली, सोलापूरच्या होनमुर्गी गावात आपल्याला घेऊन जाणारी माहिती यापूर्वी वाचलेली नव्हती.  

तीन तपाहून अधिक काळ सरांनी साहित्य, इतिहास, संत, समाजसुधारक या विषयांच्या अवतीभवती राहून आपला जीवनकाळ सफल केला. अलिकडेच सरांच्या २२ व्या कर्मवीर लोहोकरे गुरुजी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे २७ नोव्हेंबर २०१८ ला ना. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. ‘सोलापूर जिल्हा पर्यटन’ पाठोपाठ सध्या सर ‘अक्कलकोट दर्शन’ लिहित होते. चिपळूणातून, कोकणातून त्यांच्याकडे जाणाऱ्या स्नेहींना ते आपणहून अभ्यासपूर्ण अक्कलकोट दर्शन घडवितं. आम्हांलाही त्यांनी यायला सुचविले होते, पण तेही राहिले. या पुस्तकानंतर ‘संत गाडगेबाबा’ यांच्या जीवनावर विस्तारपूर्वक लिहायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. खरंतर गाडगेबाबांविषयी आम्हांलाही अतीव आदर असल्याने आम्ही, ‘आपले पुस्तक वाचावयास उत्सुक आहोत’ असे त्यांना बोललो होतो, आता तेही राहिले. सरांचे विवेकवादी लेखन, आकाशवाणीवरील व्याख्याने इथल्याप्रमाणे सोलापूरातही सुरूच होती. सरांच्या भूत भानामती जादूटोणा आणि शोध भुताचा या पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले होते. आदर्श प्राध्यापक, प्रौढशिक्षण कार्यकर्ता, व्यसनमुक्ती कार्य, महाराष्ट्र शासनाचा ‘दलितमित्र’ पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्या कामासोबतच ते कन्या भक्ती हिच्या जलचळवळ अभियानचे खंबीर पाठीराखे होते. स्वतःची पदरमोड करून सुरु असलेला भक्तीचा हा प्रकल्प यशस्वी व्हावा यासाठी ते सुरुवातीपासून गेली ८ वर्षे सोबत राहिले. परवाच्या ९ ऑगस्टला भक्तीने फेसबुकवर, ‘उजनीतील पाण्याने हिप्परगा तलाव भरणार, पप्पांचं - आमचं स्वप्न पूर्ण होतंय, धन्यवाद. सोलापूरला आल्याचे सार्थक झाले, लाखोंना पाणी मिळेल !’ अशी पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला. तो सरांनी सरांनी ‘याचि देहि याची डोळा’ अनुभवला आणि अवघ्या दोनेक आठवड्यात सर गेले ! हा सरांच्या कुटुंबियांवर मोठा आघात ठरला आहे.  
       
जेष्ठ संपादक, नानासाहेब जोशी यांनी, ‘चिपळूणला मिळालेले वैभव’ अशा शब्दात सरांचा गौरव केला होता. त्याचा अर्थ जाधव सरांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केलेल्या ‘ज्ञान जान्हवीचा प्रवाह’ या डी.बी.जे. कॉलेजच्या साडेतीन तपाची वाटचाल सांगणाऱ्या ग्रंथाकडे पाहाताना कळतो. अशा प्रकारचे ग्रंथ सिद्ध करताना, यापूर्वी असे काम केलेल्यांचा संदर्भ समोर ठेवून काम करण्याची सरांची सवय, आपल्यालाही असल्याबाबत आम्हांला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले होते. असो ! सरांनी देहदान केले होते. त्यांचे अचानकचे जाणे सहृदयांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज वाटेकर  

२२ व्या पुस्तक प्रकाशन प्रसंगीचा क्षण !

दैनिक सकाळ रत्नागिरी २५ ऑगस्ट २०१९  

दैनिक सकाळ सोलापूर ३१ ऑगस्ट २०१९














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...