उदारीकरणानंतर देशात विकासाचे वारे वेगाने वाहू लागल्याला तीन दशके
पूर्ण होताहेत. या कालखंडात आपल्याला समृद्धीच्या नवनव्या वाटा खुणावू लागल्या.
खुणावणाऱ्या वाटा आजमावून पाहण्यासाठी श्रीमंतांसह शहरी आणि ग्रामीण भागातील
मध्यमवर्ग हळूहळू घराबाहेर पडू लागला. या बदललेल्या मानवी मानसिकतेचा नेमका अंदाज
घेत ठिकठिकाणी बदल होत गेले. देशभरातील असंख्य शहरांत पर्यटन उद्योग जन्माला आला
आणि वाढलाही. आपल्यालाही रत्नागिरी जिल्ह्यात शहरी पर्यटन विकासाची सुनियोजित गंगा
आणण्यासाठी शक्य तितक्या नाविन्यासह पर्यटन वातावरण अद्ययावत करत समृद्धीच्या वाटा
निर्माण कराव्या लागतील.
जगात ज्या देशांची अर्थव्यवस्था समृद्ध
आहे त्यात गरीबांचा वाटा मोठा आहे. दुर्दैवाने, गरीब लोकांची कमाई वाढलेली नाही. गेली अनेक दशके भारतात समृद्धीची वाट
उद्योग, व्यवसायातून नव्हे तर सरकारातून जाते. सर्वांनाच
तिथे प्रवेश मिळणे कठीण असल्याने या वाटेचा फायदा मर्यादित लोकांना मिळाला. मोठा
समूह समृद्धीपासून वंचित राहिला. या पार्श्वभूमीवर विचार करता समृद्धीच्या
बिगरसरकारी अनंत वाटा विकसित व्हायला हव्यात. ‘पर्यटन’
अशा वाटांपैकी एक आहे. आपल्या जिल्ह्यात पर्यटनातून समृद्धीच्या
वाटा शोधण्याच्या प्रयत्नांना सहकार्य मिळाल्यास गरीबांना आर्थिक समृद्धीची वाट
गवसण्याची संधी आहे. वाढती विषमता, बेरोजगारी, महागाई, प्रादेशिक असमतोल, पीडित बळीराजा, अर्थव्यवस्थेला आलेली
अवकळा, कॉर्पोरेट विश्वातील मरगळ, गारठलेली गुंतवणूक याचे अनुभव आपण घेत
आहोत. समृद्धीची वाट दाखवू शकणारा कोकणातला पर्यटन उद्योग गुदमरलेला आहे. आजच्या
स्वभावात: उतावीळ परंतू शोधक वृत्तीच्या तरुणाईला समस्यांच्या चिकित्सा आणि
विश्लेषणापेक्षा उपाय हवे आहेत. त्यांना अनुदाने, सवलती, अर्थसाह्य यांपेक्षा संधींच्या मोकळ्या वाटा दाखविणारी धोरणदृष्टी हवी
आहे. अडचणींचे निराकरण करीत आश्वस्थ करणाऱ्या
नेतृत्वावर तरुण मनपसंतीची मोहर उमटवत आहेत. आपल्या भागात पर्यटनातून त्यांचा
आर्थिक, भौतिक विकास शक्य आहे. याची निश्चित जाणीव
सध्याच्या सर्वस्तरीय राजकारण्यांनी करून घ्यायला हवी आहे. ‘भर पावसात रस्त्यावरून स्कूटर चालवत भिजत चाललेले चार व्यक्तींचे
कुटुंब पाहून ‘नॅनो’ची
संकल्पना स्फुरली’, असे रतन टाटा यांनी ‘नॅनो’ची जन्मकथा सांगताना नमूद केले होते.
त्यांची भूमिका आणि प्रेरणा प्रामाणिक होती. वास्तवात ‘नॅनो’ मध्यमवर्गाच्या मनोविश्वाची जागा
व्यापू शकली नाही. दोष ‘नॅनो’त नव्हता. खुणावणाऱ्या समृद्धीच्या वाटा अजमावून पाहण्यासाठी
सरसावलेल्या शहरी मानसिकतेला, ‘चारचाकीचे अन्य मॉडेल परवडत नाही म्हणून आम्ही नॅनो घेतली’
हा शिक्का नकोसा वाटला. ‘उत्पन्न
मर्यादित असणाऱ्या समाजस्तराला परवडणारी गाडी’ हे
ब्रँडींग नॅनोच्या मुळावर
आले. पूर्वी ‘ब्रँडेड’
कपडे ही ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. आज ते अनेकांच्या मुठीत
आले आहे. आपल्याकडच्या शहरी पर्यटनाचेही तसेच आहे. त्यामुळे ‘सगळं आपल्यालाचं कळत’ या भ्रमात न राहाता ‘सहज’ पैसा खर्च करणाऱ्या शहरी मानसिकतेला
नक्की काय हवंय ? ते समजून घेऊन शहर विकासाच्या
आराखड्याला पर्यटनपूरक सकस बनविण्याची गरज आहे.
निसर्गाची मुक्तहस्त उधळण, सागरकिनारे, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जैवविविधता, सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी
संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्यांची जोपासना करणाऱ्या
कोकणातील ‘रत्नागिरी’ जिल्ह्यात
जागतिक पर्यटन नकाशावर अग्रेसर होण्याची क्षमता ठासून भरलेली आहे. रत्नागिरी
जिल्ह्यातील रत्नागिरी, गुहागर ही दोन शहरे समुद्रकिनारी
आहेत. चिपळूण, राजापूर, संगमेश्वर,
खेड नदी-खाडी-बंदरकिनारी वसलेले आहे. इथल्या बंदरांना मोर्य
काळापासूनचा इतिहास आहे. आज किनारी भागात हे संदर्भ नव्याने मांडता येतील. लांजा,
मंडणगड, दापोली शहराला सह्याद्रीची ओढ
आहे. प्रत्येक शहराचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. तिथे काही पर्यटनस्थळे आपणहून उभीही
आहेत. कोकण सोडून पोटार्थ मुंबईसह जगभर गेलेली मंडळी पुन्हा कोकणात येण्याच्या
विचाराप्रत येताहेत. त्यांचे येणे घडण्यासाठी फक्त पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने
पाहावे लागेल. जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत रत्नागिरी शहर पर्यटन विकास,
पायाभूत सुविधेत पुढे आहे. याचेही कारण स्वातंत्र्योत्तर काळात
आजवर येनकेन प्रकारे जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या एकूण पर्यटन विकास निधीच्या
किती टक्के निधी एकट्या रत्नागिरी शहरावर आणि किती टक्के निधी उर्वरित जिल्ह्यावर
खर्ची पडला ? हे तपासता लक्षात येईल. अर्थात तिथल्या गेट
वे ऑफ रत्नागिरी (मांडवी बीच), भाट्ये बीच, स्वातंत्र्यवीर सावरकर कोठडी (राष्ट्रीय
स्मारक), अठरा हाताचा गणपती, पतितपावन मंदिर, काळा-पांढरा समुद्र, मिरकरवाडा बंदर, भगवती आणि रत्नदुर्ग
किल्ला, मत्स्यालय, थिबापॅलेस, थिबापॉईंट, लोकमान्य टिळक जन्मस्थान आदि
स्थळांचे महत्त्व पर्यटनात खूप आहे. ३० वर्षापूर्वी
उभारण्यात आलेल्या रत्नागिरी येथील विमानतळाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम
अपेक्षित आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात आढळलेली किमान ३० हजार वर्षपूर्व कातळशिल्पे या
तालुक्यांना ‘जागतिक हेरीटेज टुरिझम’चा दर्जा मिळवून देऊ शकतात. कसबा-संगमेश्वरात हेमाडपंथीय शिल्पकलेचा
अप्रतिम नमुना असलेलं जिल्ह्यातील सर्वोत्तम श्रीकर्णेश्वर मंदिर १९०० वर्षानंतर
आपल्याला सुस्थितीत पाहायला मिळतं. संपूर्ण काळ्या पाषाणात कोरीवकाम केलेलं हे
मंदिर आजही इथलं पौराणिक महत्त्व टिकवून आहे. दगडातील सुंदर नक्षीकाम, देवतांची चित्रे, मंदिराच्या चारही
दरवाजांमधील वर्तुळाकार नक्षी, डोक्यावरील वितान (दगडात
कोरलेला सुंदर झुंबर), प्रवेशद्वाराच्या डोक्यावर आठही
कोनांमध्ये असलेल्या अष्टदिक्पालांच्या मूर्ती, कोल्हापूरमधील
महालक्ष्मी मंदिर नक्षीकामाशी जुळणारे सभामंडपातील खांबांचे नक्षीकाम, कलात्मक नंदीबैल मूर्ती, गाभाऱ्यातील भगवान
शंकराची एक फूट उंच पिंडी, खांबावर शीलालेख या माहितीची
ठळक गरज पर्यटकांना आहे. त्यासाठी लागणारे भले मोठे ‘you are here’ फलक शेजारच्या कर्नाटक राज्याने आपल्या प्रत्येक पर्यटनस्थळी लावलेत.
अशा फलकांचे नियोजन सध्या विकसित होत असलेल्या राष्ट्रीय चौपदरी मार्गावर व्हायला
हवे. राजापूरमधील श्रीधूतपापेश्वर मंदिर, उन्हाळे, प्रसिद्ध गंगास्थान (ज्याकडे निसर्गरम्य ठिकाणी असूनही गंगा लुप्त
झाल्यावर बघवतही नाही), मंडणगड मधील किल्ले मंडणगड, गुहागरचा समुद्रकिनारा, दुर्गामाता, उरफाटा गणपती, श्रीव्याडेश्वर, मोडकाआगर तलाव, चिपळूण, खेड शहरातील प्राचीनतेचा पुरावा असणारी बौद्धकालीन लेणी आदिंद्वारे
पर्यटन विकासाला चालना देण्याची क्षमता इथल्या स्थानिकात आहे. त्यास वेग
येण्यासाठी या पर्यटनस्थळांवर किमान मूलभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. सागरी
मार्गाची आवश्यकता पूर्ण व्हायला हवी. रस्त्यांची दयनीयता संपायला हवी. जिल्ह्यात
सर्वदूर हिरवाई असल्याने उद्याने-बगीचे हवेत कशाला ? असे
तर धोरण नसावे ना ? खरतरं पर्यटन सावरण्यासाठी
जिल्ह्यातील साऱ्या शहरांत आकर्षक उद्याने हवीत, असलेली
सुसज्ज करायला हवीत. रत्नागिरी वगळता इतर शहरातील नागरिकांना सायंकाळी फेरफटका
मारायला रमायला जागाच शिल्लक नाही अशी स्थिती आहे, पर्यटक
दूरच राहिला ! समृद्धीच्या वाटा इथे दडल्या आहेत.
‘पुतळे’ पर्यटन
आम्ही जगभर पाहातो. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’द्वारे आम्ही जगात उंच बनलो. चिपळूण शहरालगत परशुराम घाटात वाशिष्ठी
वळणावर पर्यटन समृद्धीची वाट निर्माण करून देणारा ‘कोकणचे
स्वामी’ भगवान परशुरामांचा असाच भव्य पुतळा उभा
राहाण्यासाठी चिपळूणकर विकासपुरूषाच्या शोधात आहेत. अपवाद वगळता दुर्दैवाने चिपळूण
शहराला पर्यटन समज असलेल्या नेतृत्वाचाच अभाव राहिला आहे. इथल्या पर्यटन
विकासासाठी गेली ६/७ वर्षे पदरमोड करून चाचपडणाऱ्या ‘ग्लोबल
चिपळूण पर्यटन’ संस्थेला राजाश्रय मिळायला हवा अशी भूमिका
पुढे येण्यामागेही ‘राजकीय इच्छाशक्तीचा अभाव’ हेच कारण आहे. पंतप्रधान पंडित नेहरूंकडे उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर,
अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा
कोयना धरणाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हा वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडणाऱ्या
पाण्याचा काय उपयोग करणार ? असा प्रश्न नेहरूंनी विचारला
होता. आम्ही त्याचे उत्तर आजही शोधतो आहोत. या वाशिष्ठी खाडीत श्रीपरशुराम मंदिर
परिसर ते गोवळकोट असा रोपवे, ‘बॅकवॉटर’ विकसित व्हायला हवे. इथल्या खाडीत सहजतेने पाहाता येणाऱ्या मगरी कोठेही
आढळत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्याला काही दशकांपूर्वी विकासाचा पहिला ‘हप्ता’ ‘लोटे-परशुराम रासायनिक औद्योगिक विकास
प्रकल्प’द्वारे मिळाला. इथल्या लोकांना रोजगार मिळाला, परंतु इथला निसर्ग, पारंपारिक व्यवसाय, जैवविविधता सारे संपले. आमची सरकारकडे पाहाण्याची मानसिकता नकारार्थी
बनली. ज्या ‘सडक्या’ मेंदूतून
हा विकास प्रकल्प साकारला त्याने रत्नागिरी जिल्ह्यावर अक्षरशः सूड उगवला असे
म्हणावे इतकी भयावह स्थिती वाशिष्ठी खाडीची झाली आहे. या प्रकल्पाने ज्या
नदीला-खाडीला प्रदूषित केले ती ‘वाशिष्ठी’ कोयना अवजलामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाणी असलेली नदी आहे.
पर्यटनात पाण्यालाही खूप किंमत आहेच. अर्थात इतकं सारं होऊनही ‘पाणी’ अनुषंगाने चिपळूण पर्यटन विकासाला मोठा
वाव आहे.
कोकणी माणसाचा इतिहास आणि संस्कृती
तपासण्यासाठी लोकसाहित्य हे सर्वात मोठे माध्यम आहे. मोबदल्याचा विचार न करता कमी
मानधनात काम करणारे कलावंत जगात फक्त कोकणात आढळतात. जिल्ह्यातील या कलावंतांना
आपलेसे केल्यास ते पर्यटन विकासास हातभार लावू शकतात. आपल्याकडील संकासूर, जाकडी, कोळीनृत्य
आदींसाठी लागणाऱ्या पेहेरावांचे, कपड्यांचे दालन
जिल्ह्यातल्या पर्यटन शहरात उभारून पर्यटनवृद्धी साधता येईल. राष्ट्रीय
महामार्गावर, तालुक्याच्या ठिकाणापासून जवळपास कुठेतरी
जुनं मातीचा धुरळा उडविणारं, मोबाईलची रेंज नसलेलं,
निसर्गरम्य कोकणी खेडं आम्हाला जपता येईल का ? आमच्या पर्यटन व्यवसायाचं जागतिक पातळीवर उत्तम मार्केटिंग सरकारने
करायला हवं. सरकारी पर्यटनाचे ‘मंडळ’ असे मार्केटिंग करते. पण तिथे तयार
होणारे साहित्य हे अभ्यासक, विविध पर्यटन व्यावसायिक, संस्था हॉटेल्स, टूर ऑपरेटर्स यांकरिता नसते.
ती एक शासकीय उपचार पद्धती वाटते. जिल्ह्यात, शहरात
पर्यटन विकासासाठी असंख्य संस्था, व्यक्ती झटत आहेत.
त्यांच्याशी सरकारी, प्रशासकीय समूहाचा अजिबात संपर्क,
संबंध, समन्वय नसावा ? जिल्ह्यातल्या अनेक शहरात ‘पर्यटन
महोत्सव’ भरतात, भरायला
हवेत. त्यांचे एकत्रित मार्केटिंग करण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा ? जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये ‘नॅरोगेज’ नेरळ-माथेरानची ‘टॉय ट्रेन’ वगळता, हजारों वर्षांचा इतिहास असलेल्या
कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही स्थळाचा
समावेश नाही. आम्हांला कोकणची किमान रत्नागिरी जिल्ह्यातील ‘जागतिक पुरातत्त्वीय स्थाने’ अशी यादी बनवून
तसे फलक मार्गांवर लावत अद्ययावत मार्केटिंग करायला कुणाची परवानगी हवी आहे ?
आपले पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग
आहे. ज्यातून परदेशी पर्यटक, चलन आपल्याकडे येईल. पर्यटन
हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळ, गोवा, हिमाचल, उत्तराखंड, अंदमान आदि देशी ठिकाणी
फेरफटका मारला तर याची जाणीव होते. या तुलनेत कोकण, आपला
रत्नागिरी जिल्हा कमी नाही. इथे येणाऱ्या पर्यटकाला शांतता, चांगले खाद्य, स्वच्छता, करमणूक, राहाण्याची उत्तम व्यवस्था हवी
आहे. ते न देता केवळ पर्यटन विकासाच्या गप्पा आणि न मिळणाऱ्या कोट्यवधींच्या
विकासनिधीच्या आकडेवारीच्या बोंबा मारण्यात काय अर्थ आहे ? मध्यंतरी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ९६ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी
६७०.५७ कोटी रुपयांचा स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करण्यात आला होताच की ! ‘निसर्ग वाचवा’, म्हणून जिल्ह्यात आम्ही
बेंबीच्या देठापासून ओरडतो. त्याच जिल्ह्यात गेली अनेक दशके काळोख्या रात्री रोज
विविध घाटांतून ट्रकानि लाकूड तोडून नेले जाते. सध्या तर महामार्गाच्या
चौपदरीकरणामुळे महामार्गही वृक्ष आच्छादनात ‘भकास’
बनलाय ! तो शासकीय प्रयत्नातून ‘झकास’
बनेल ? आजही बाहेरच्या पर्यटकांना,
या न त्या कारणाने भेटी देणाऱ्यांना कोकण आवडते. त्यांना आपण
शहरात रमण्यासाठी कोणत्या पायाभूत सुविधा देत आहोत ? देणार
आहोत ? कोकणच्या सांस्कृतिक राजधानीची, चिपळूणची याबाबतची स्थिती तर आमची लाज काढणारी आहे. तरीही आम्ही
रोजच्या वर्तमानपत्रात शहर स्वच्छतेचे मंत्र जपतो असतो. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, सागरी महामार्गाचा प्रभावी वापर, मुंबई-गोवा
महामार्गाचे चौपदरीकरण हे पायाभूत सुविधेतील आशेचा किरण आहेत. पर्यटन विकासासाठी
जिल्ह्य़ातील सुमारे आठ हजार किलोमीटर अंतर्गत रस्त्यांना सुस्थितीत आणायला हवे आहे.
‘डी-मार्ट’ नावाच्या सवलतीच्या दरातील व्यावसायिक दुकानदारी व्यवस्थेने देशात
क्रांती घडविली आहे. आपल्या जिल्ह्यात वर्षाकाठी लाखांनी पर्यटक येताहेत. त्याहून
अधिक संख्येने लोकं मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करत असतात. इथे येणाऱ्या
पर्यटकांत, प्रत्येकात ‘कोकणी
मेवा’ संकल्पनेची क्रेझ आहे. आपण प्रयत्नपूर्वक जर
डहाणू-जव्हारच्या चिक्कूपासून सुरुवात करून सावंतवाडीच्या खेळण्यांपर्यंत आपले
अस्सल कोकणी असलेले सारे पदार्थ, हस्तकौशल्यातून साकारलेल्या
वस्तू ‘डी-मार्ट’ संकल्पनेनुसार
एकाच छताखाली आणू शकलो तर ? ...तर हमरस्त्यावरील साऱ्या
मुख्य कोकणी शहरात खूप मोठी आर्थिक क्रांती करणे शक्य आहे. कोकणात गावागावातल्या
हातांना काम मिळेल. निसर्गाकडे बघण्याचा हरित दृष्टीकोन वाढीस लागेल. कोकणात सन
२०१० पासून इतिहास परिषद कार्यरत आहे. तिच्या दरवर्षीच्या अधिवेशनात नवे संदर्भ
समोर येत असतात. ऐतिहासिक आणि प्राचीन खूणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जपणूक होत
नसल्याने ही मंडळी कायम हळहळत असतात. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कोकणात
या विषयात काय करता येईल ? अशी शास्त्रीय विचारणा
व्हावयास हरकत नसावी. शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठावरील ताण वाढला आहे. गेली
अनेक वर्षे इथला माणूस स्वतंत्र कोकण विद्यापीठ, स्वतंत्र
मत्स्यविज्ञान विद्यापीठ मागतो आहे. पर्यटनावर याच्या असण्याचाही सकारात्मक परिणाम
होऊ शकतो. पर्यटनस्थळातील अद्ययावता, समुद्रकिनाऱ्यावर
महिलांसाठी टॉयलेट, पर्यटन पॅकेज जिल्ह्याला हवे आहे.
जिल्ह्यातल्या याच व्यवसायात सर्वाधिक कोकणी मनुष्यबळ कार्यरत आहे. ‘कोकणात रोजगार नाही’ अशी ओरड होत असताना
सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला सुलभ
परवानग्या, दीर्घ मुदतीची कर्जे, सबसिडी, भरीव अर्थसाहाय्य मिळायला हवे आहे.
यांतून पर्यटकांचा प्रवास सुलभ झाल्यावर, शहरा-शहरांतून ‘पर्यटन गाईड’ महत्त्वाचे ठरणार आहेत. यासाठी
स्थळांची माहिती, सतत अभ्यास, वाचन करण्याची तयारी, संभाषण कौशल्य, भटकंतीची आवड आणि अपार मेहनत करण्याची तयारी, शारीरिक
सक्षमता, इतिहास, संस्कृती आणि
पर्यटनाबाबतचा उत्साह आवश्यक राहाणार आहे.
‘नवा भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशा, अपेक्षा,
आकांक्षांच्या संकल्पनेला अपेक्षित बळ नवमतदारांनी (तरुण)
एकगठ्ठा पाठीशी उभे केल्याने सलग दुसऱ्यांदा मोदींना लोकसभेत जबरदस्त मुसंडी मारता
आली. कोकणसह रत्नागिरी जिल्ह्यात या बळाची परतफेड करण्यासाठी पर्यटन विकासात खोडा
घालणाऱ्या पायाभूत सुविधा, विशेषत: राष्ट्रीय महामार्गाचे
चौपदरीकरण शक्य तितक्या लवकर व्हायला हवे आहे. सध्या देशात आणि राज्यात कमालीच्या
परस्पर विरोधी विचारांचे सरकार कार्यरत आहे. अशा स्थितीत पर्यटन समृद्धीच्या वाटा
नाविन्यासह अद्ययावत होण्यासाठी विकासाची ‘कोणती’ दिशा पकडतात ? यावरच सारं काही अवलंबून असून
आगामी काळात हेही चित्र स्पष्ट होईल.
धीरज वाटेकर
पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८,
ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com
(वाटा समृद्धीच्या : दैनिक सकाळ वर्धापन दिन विशेष
पुरवणीत प्रसिद्ध लेख : ३१ जानेवारी २०२०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा