शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०

…यांना भेटायचं राहिलं !

‘सर्वोदय’ विचारांचे गांधीवादी कार्यकर्ते आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक ‘भारतरत्न’ आचार्य विनोबा भावे, सानेगुरुजी, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्यासह ‘कोकणचे गांधी’ गोपुरी आश्रमाचे अप्पासाहेब पटवर्धन आदिंचे काही दशकांचे निकटचे सान्निध्य प्राप्त झाल्यावर उर्वरित जीवनात त्याच विचारांची आणि तत्वांची आदर्शवत जपणूक करणाऱ्या उरण (रायगड) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त कलाशिक्षक भिकाजी गोविंद तांबोटकर (वय ८५) यांना बालदिनी (१४ नोव्हेंबर २०२०) देवाज्ञा झाली. विनोबाजींच्याच पुण्यतिथी पूर्वदिनी त्यांचं जाणं हा अपूर्व योगायोग म्हणावा लागेल. भेट घेण्याची अतीव इच्छा असलेल्या एका तत्त्वनिष्ठ ज्येष्ठाला भेटायचं, छानसं बोलायचं, त्यांचं काम समजून घ्यायचं राहून गेल्याचं मनाला झालेलं आंतरिक दु:ख हलकं करण्यासाठीचा  हा लेखन प्रयत्न !

ऐन दीपावलीच्या दिवशी तांबोटकर सरांना देवाज्ञा झाल्याची दु:खद वार्ता आम्हाला दुसऱ्या दिवशी कळली. त्याच रात्री उशीरा आम्ही कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सरांच्या कन्येनं, चैत्रालीने याबाबतची पोस्ट केलेली. दुसऱ्या दिवशी ती पाहिली. पोस्ट पाहून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहिताना नकळत हातून ‘गेल्यावर्षी चिपळूणच्या पर्यावरण संमेलनात भेट झाली होती’ असं वाक्य लिहिलं गेलं. लिहिल्यावर मन चटकन वर्षभर मागं सरलं. गेल्यावर्षी (२०१९) २ नोव्हेंबरला चिपळूणातील चौथ्या पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन समारंभानंतरच्या सहज गप्पांत आम्हाला, चिपळूणच्याच प्रा. मीनल ओक मॅडमनी तांबोटकर परिवाराच्या या वेगळ्या उंचीची जाणीव करून दिली. तेव्हा थक्क होऊन काही क्षण आम्ही तांबोटकर सरांकडे पाहात बसलेलो. तांबोटकर सर आणि मॅडमसोबत तेव्हा कन्या चैत्राली, जावई चेतन ठक्कर आणि सरांची नातही उपस्थित होती. संमेलनात, मागील २५ वर्षे मंडळाच्या पर्यावरण कामात सक्रीय योगदान दिल्याबद्दल सरांच्या पत्नी प्रियंवदा तांबोटकर मॅडमना ‘पर्यावरण मित्र’ म्हणून सन्मानित केल्यानंतर कुटुंबासोबत छानसे ग्रुप फोटोही घेतले. संमेलनानंतर हे कुटुंब सरांच्या इच्छेखातर अक्कलकोट, गाणगापूरला रवाना झालं. तेव्हाच ठरवलेलं, उरणला जाऊन एकदा निवांत सरांना भेटायचं ! चालूवर्षी, २०२० साली असं काही निश्चित होण्यापूर्वीच कोरोना भेटीला आला नि आमच्यासारख्या अनेकांच्या अनेकविध नियोजनांवर पाणी पडलं. पण ते इतकं भयानक असेल, तांबोटकर सरांच्या भेटीची इच्छा बाळगणाऱ्याला त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जायची वेळ आणेल असं वाटलं नव्हतं. पण तसं घडलं.

कोरोनाकारणे थांबलेला आमचा अहमदनगर प्रवास पूर्ण करून परतताना, मंडळाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष, सन्मित्र विलास महाडीक यांच्यासमवेत आम्ही उरणला तांबोटकर कुटुंबियांच्या भेटीस पोहोचलो. तेव्हा कळलं, अलिकडे सरांच्या पायाला सूज यायची. हाताला थोडंसं इन्फेक्शन झालेलं. थकवा जाणवायचा. पण हॉस्पिटलला अॅडमिट होण्याची मानसिकता होत नव्हती. मग किमान ईसीजी काढण्यासाठी म्हणून गावातल्या जे.एन.पी.टी. टाऊन हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय झाला. तसं हॉस्पिटलला कळवूनही झालं. तो दीपावलीचा दिवस होता. शहरातले रस्ते गर्दीने वाहात असलेले. मॅडमनी चैत्रालीला बोलावून घेतलं. दुपारी पावणे दोनच्या सुमारास कुटुंबियांसोबत तांबोटकर सर द्रोणागिरी नोड टाऊनशीप समोरील वसुंधरा हाऊसिंग सोसायटीच्या निवासी सदनिकेतून आपणहून चालत डॉक्टरांकडे निघाले. तिथे पोहोचेपर्यंत त्यांना हातपाय गळाल्यासारखं झालं. गाडीतून उतरून हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत ‘अॅटक’ आला. अशाही स्थितीत जावई चेतन ठक्कर आणि मॅडमनी त्वरेने व्हीलचेअर आणून हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण... तोवर मुलीच्या खांद्यावर मान टेकवून सरांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. असं काही इतकं अचानक घडेल याची कोणालाच कल्पना नसावी. त्याचदिवशी कोरोनाकारणे गर्दी टाळत कुटुंबियांनी तातडीने सरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. सुट्टीची जराशी उसंत मिळाली की फिरायला बाहेर पडायची सवय असलेले तांबोटकर सर कोरोना लॉकडाऊन मधल्या घरकोंडीला कमालीचे कंटाळलेले. कुठे जाता येत नाही. कोणाला भेटता येत नाही. हे त्यांच्यासाठी त्रासदायक बनलेलं. सध्याच्या काळात तर हॉस्पिटल म्हटलं की ‘कोरोना’ हे डोक्यात फिट्ट बसलेलं असावं. त्यात याच काळात सख्खे बंधू सोडून गेल्याचा, कोरोनाकारणे त्यांचं अखेरचं दर्शन घ्यायला न मिळाल्याचा मानसिक धक्काही बसलेला होता. बहुदा हे सगळं अनपेक्षित जुळून आलं ! दहाव्या दिवशी आम्ही सांत्वन भेटीस पोहोचलो तेव्हा मॅडमची नात त्यांना, ‘रडू नको !’ असं सांगत होती. आणि मॅडम तिला, ‘हां ! मैं नही रो रही हूँ बेटा !’ म्हणत समजावत होत्या. नातीमुळेच त्या काहीशा सावरलेल्या होत्या.

मुंबईत असताना सानेगुरुजींच्या संपर्कात आलेले तांबोटकर सर आयुष्यातील उमेदीच्या काळात ‘सर्वोदय कार्यकर्ते’ म्हणून चौदा वर्ष भारतभ्रमण करत होते. भूदान चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. नक्षलवाद्यांमध्ये जाऊन काम करताना १५ दिवस ओलीतास राहिलेले. पुढे परिवर्तन घडलं आणि नक्षलवादी विनोबांना शरण आले. आप्पासाहेब पटवर्धन यांच्यासोबतही सर असायचे. आप्पासाहेब तर सरांना, सर्वोदय चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मापाच्या चामड्याच्या चपला बनवून वापरायला पाठवायचे. चीनने भारतावर केलेल्या आक्रमणाच्या वेळेस तांबोटकर सर तेजपूर (आसाम) मधील हॉस्पिटलमध्ये ४ महिने जखमी सैनिकांची सेवा करत होते. तेव्हा इकडे, ते राहात असलेल्या दादर (मुंबई) मध्ये वृत्तपत्रात ‘दादरचा तांबोटकर गेला’ अशा आशयाची बातमी छापून आलेली. जयप्रकाश नारायण यांचे मदतनीस म्हणूनही सरांनी तीन वर्ष काम केलं. विनोबाजींना पवनार आश्रमासाठी स्वतःची जमीन दान करणाऱ्या राजाभाऊ देशमुख आणि कुटुंबियांना तांबोटकर सर मोठ्या भावाच्या ठिकाणी होते. आसाममध्ये सर्वात लहान सर्वोदय कार्यकर्ता म्हणून कुसुमताई देशपांडे ह्यांनी स्त्रीयांच्या आश्रमात सरांना दोन वर्षे राहाण्यासाठी परवानगी दिली होती. याकाळात आश्रमात उपस्थितांना गीताप्रवचने वाचून दाखविणे, त्याचा अर्थ समजावून सांगणे, शिल्लक वेळात विनोबांच्या पुस्तकांची परिसरात विक्री करणे, विनोबाजींचे विचार सर्वदूर पोहोचविणे आदि कामात सरांचा सहभाग राहिला. सेनापती बापट यांच्या सहवासातील स्वच्छता अभियान असो वा बाबा आमटे यांचे शांतीवन येथील कुष्ठरोग्यांच्या चळवळीतील काम असो तांबोटकर सर सतत कार्यरत राहिले.

मुंबईनंतर वसईत मुक्कामाला असेतोवर सरांचा बराचसा पत्रव्यवहार जपलेला होता. पुढे उरणला आल्यावर २००५च्या महापुरादरम्यान तो लुप्त झाला. केलेल्या कामाच्या फारशा नोंदी ठेवायला, त्याची जंत्री प्रसिद्ध करायला, फोकसमध्ये वावरायला सरांना स्वतःला कधीही आवडलं नाही. एकदा प्रवास करताना गंमत म्हणून कुलींची अर्धी चड्डी पाहून, ‘मी हेलिकॉप्टर मधून अर्धी चड्डी आणि खादीची बनियन घालून आलेलो !’ असंही ते बोलून गेले. स्वतः महाराष्ट्र कलाशिक्षक संघटनेचे कार्यवाह राहिलेले सर निवृत्तीनंतर कायम पर्यावरणासह कलाध्यापक संघटनेची राज्यव्यापी अधिवेशने, कृतिसत्रे, संमेलनांमधील मॅडमच्या वावरात सातत्याने पाठीमागे उभे राहिले. ‘चांगलं काम आहे. मी आहे तुझ्या बरोबर, तू कर !’ म्हणत त्यांनी मॅडमना कायम पाठबळ दिलं. सरांनी उरणमध्येही तीसेक वर्षे शैक्षणिक, सामजिक, वृक्षारोपण, गणेशोत्सव, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचारमुक्ती या विषयात, ‘झाडाचं रोप लावताना फळाची अपेक्षा कधी करायची नाही’ या विचारानं काम केलं. सामाजिक कामातील व्यवहार्य पारदर्शकतेसाठी सर सतत आग्रही राहिले. याचकारणे काही सेवाभावी कामं त्यांनी कमी केली. पुढे नि:स्वार्थीपणे काम करता येईल असा शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला. पण इतका उशीरा की १९९३ ला सेवानिवृत्त झालेल्या सरांची सेवाही अवघी १९ वर्षे भरली. तेव्हा सेवेची २० वर्ष पूर्ण व्हायला एक महिना कमी पडत होता. परिणामस्वरूप पेन्शन कमी बसणार होती. खरतरं तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून विनंती अर्जाद्वारे एक महिन्याची सेवावाढ मिळवणं सहज शक्य होतं. पण, ‘पूर्वीची सेवा मी देशासाठी केली आणि ही पोटासाठी ! एक महिना वाढवून जास्त पैसे मिळविण्याचा अट्टहास मला करायचा नाही’, म्हणत सरांनी हे प्रलोभन नाकारलं. आयुष्याच्या सुरुवातीला ज्यांच्यासोबत सर वावरले त्यांनी त्यांना हे संस्कार दिलेले नव्हते. अर्थात सरांना पेन्शन कमी बसली. गिरगावच्या आर्यन हायस्कूलमध्ये कलाध्यापन करताना अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना हेरून सरांनी मार्गदर्शन केलं. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नरेंद्र भगत, चित्रकार जगदीश नैकर, लक्ष्मण खंबदकोण, शशिकांत झगडे, रंगभूषाकार उजवणे, मुंबई येथील फायरब्रिगेड  ऑफिसर उत्तम भगत ही यातली काही नावं. विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकाला कधीही विसरत नाहीत हे सूत्र तांबोटकर सरांच्याबाबतीतही लागू होतं. ‘सरांनी आम्हाला घराच्यांहून अधिक क्षमतेनं घडवलं !’ असं म्हणणारे अनेक विद्यार्थी आजही त्यांच्या आठवणींमध्ये गुंतून आहेत.

जीवनातील उमेदीचा बराचसा काळ प्रवासात घालविल्याने त्यांना २४-२४ तास गाडीत बसून प्रवास करायची सवय लागलेली. परिणामस्वरूप शिक्षक म्हणून वावरताना निसर्गाच्या सान्निद्ध्यात मनमुराद आनंद मिळवून देणाऱ्या सहलींचे आयोजन करण्यासाठी सर नावाजले गेले. कलाध्यापक म्हणून काम करताना त्यांनी बांद्रा स्कूल ऑफ आर्टचे दत्तात्रय परूळेकर यांच्यासोबत बालचित्रकलेचे विविध प्रयोग राबवले. अगदी वर्तमानातही सर जायंटस् ग्रुप ऑफ इंटरनॅशनलचे सदस्य म्हणून कार्यरत होते. सानेगुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विनायक क्षीरसागर, आर्यन हायस्कूलचे माजी सुपरवायजर प्रभाकर राणे, माजी आमदार तात्या सुळे, बालनाट्य लेखक आणि मुंबई शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राहिलेले माधव साखरदांडे, बाप्पा रेडकर, प्रेमा साखरदांडे, सुलभा देशपांडे आदिंसोबत शिक्षक संघटनेच्या चळवळीतही सर सक्रीय राहिले. तत्कालीन ५४ दिवसाच्या शिक्षकांच्या संपात सहभागी होऊन दिलासादायक निर्णय पदरात पाडून घेण्यातही त्यांचा सहभाग राहिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सरकारी सेवासुविधांचा सरांनी कधीही लाभ घेतला नाही. त्यांनी एस.टी. बसमध्ये कायम पूर्ण तिकीट काढून प्रवास केला. ‘सरकारी सेवा मिळवायच्या असत्या तर त्या कधीच मिळवता आल्या असत्या. माझ्या दोन पैशाने सरकारला मदत होणार असेल तर अशी सेवा आपण का घ्यायची ?’ ही भूमिका सर जगले. वागण्यातील, जगण्यातील, बोलण्यातील उमदेपणा, दर दोन दिवसाआड दाढी करण्याची सवय, स्वच्छ इस्त्रीचे साधे कपडे आदि पेहेरावातील टापटीप सरांनी कधीही सोडली नाही. अखेरच्या दिवशीही हॉस्पिटलला जाताना ते असेच टापटीप गेले. कोरोना लॉकडाऊन नसता तर तांबोटकर कुटुंबीय आसाममधील शरणी आश्रमात जाण्याच्या तयारीत होतं. त्याठिकाणी पूर्वी दोन वर्ष सरांनी काम केलेलं. शांतीवन असो की आचार्य विनोबा भावे यांचे पवनार (वर्धा) येथील परमधाम आश्रम असो आजही तिथं सरांचं नाव निघतं, ही तांबोटकर कुटुंबियांसाठी समाधानाची बाब होय !

सानेगुरुजींवरील अविचल निष्ठेने गेली ४५ हून अधिक वर्षे प्रकाशित होणाऱ्या 'बालविकास मंदिर' मासिकाचे संस्थापक-संपादक आणि सानेगुरुजी बालविकास मंदिर संस्थेचे अध्यक्ष यशवंत क्षीरसागर हे सरांसोबतचे या साऱ्या कामातील स्नेही होत. ह्या लोकांनी त्या काळात प्रचंड काम केलं. आपण त्यांच्या कामाची, त्यागाची कल्पनाही करू शकत नाही. ‘पत्नी बनून ३४ वर्ष अशा माणसाची सेवा करायला मिळाली, हे मी माझं भाग्य समजते’ असं तांबोटकर मॅडम बोलल्या तेव्हा सर हे किती विलक्षण व्यक्तिमत्त्व होतं हे ध्यानात आलं. अशी माणसं आता शोधूनही मिळणे नाही. होणे त्याहून दुर्मीळ !

(प्रियंवदा तांबोटकर मॅॅडम यांचा संपर्क क्रमांक : +91 88794 56908)

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. 

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

 


४थे पर्यावरण संमेलन चिपळूण (२०१९)
डावीकडून सरांच्या कन्या चैत्राली आणि नात,
पर्यावरण मंडळाचे 
अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ,
स्वतः तांबोटकर सर आणि मॅडम, संमेलनाध्यक्ष डॉ. उमेश मुंडल्ये,
मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, धीरज वाटेकर,
प्रा. मीनल ओक, सरांचे जावई चेतन ठक्कर.
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...