(छायाचित्र : गुगलच्या सौजन्याने) |
सांबर हरीण (Cervix Unicolour) भारतात आढळणारी
हरीणाची सर्वात मोठी आणि मुख्य जात आहे. सांबर हरिणाचा स्वभाव गरीब
आणि भित्रा असला तरी त्याचा गडद तपकिरी रंग त्याच्या रुबाबात भर घालतो. आम्हाला
ज्यानं दर्शन दिलं तोही असाच रुबाबदार, आकर्षक शिंगे आणि धिप्पाड देहयष्टी असलेला
होता. हे नर सांबर झाडाच्या खोडाला शिंगे घासत असतात. जंगलात फिरत असताना त्यांनी
घासलेली झाडे दिसतात. लिंगाच्या डोंगरावर जाण्याच्या चारेक
दिवसांपूर्वी (४ डिसेंबर) कोयना निसर्ग संवर्धन व पर्यावरण पर्यटन संस्थेचे मित्र
सचिन धायगुडे यांची फेसबुकवर ‘सांबराची घासण’ ही पोस्ट वाचलेली. अंगावरच्या गोचिडांचा
त्रास, खाज कमी करण्यासाठी सांबरं चिखलात लोळतात. खाज असेल तर झाडाच्या खोडाला जोरजोरात
अंग घासतात. जंगल फिरताना झाडांच्या खोडांवर ही ‘सांबराची घासण’ दिसून येते.
त्यासाठी सांबरं झाडाची सालं शिंगांनी सोलतात. सोललेली सालं खातात. तिचा काही भाग झाडाच्या
बुंध्याजवळ पडलेला दिसतो. पोस्ट वाचताना सांबराची ही वर्तवणूक लिंगाच्या डोंगरावर बघायला
मिळाली तर ? असं सहज वाटून गेलेलं, अन् चक्क सांबरानेच दर्शन दिलं ! मार्लेश्वरकडे तोंड करून
उभे राहिल्यावर आपल्या डाव्या हाताला असलेल्या लिंगाच्या डोंगरावर जाण्याचा बेत
जवळच्या आंगवली (देवरुख-संगमेश्वर) गावचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्र अभ्यासक मित्र
संजीव अणेराव यांच्या सहकार्याने ठरवलेला. त्यासंदर्भात यथावकाश लिहीन. चिपळूणच्या
‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’चे चेअरमन श्रीराम रेडिज आणि आम्ही सर्व संचालक मंडळी (रविवारी)
अणेराव यांच्या सेंद्रिय मसाला बाग आणि ‘वनालिका’ हॉलिडे होमच्या भेटीला पोहोचलो. दुसऱ्या
दिवशी (सोमवारी) सकाळी श्रीराम रेडिज, वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, करजाई
क्रिएशनचे महेंद्र कासेकर, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे
कार्याध्यक्ष विलास महाडिक, हॉटेलियर प्रल्हाद लाड, ‘ग्लोबल चिपळूण’चे मॅनेजर
विश्वास पाटील आणि आम्ही ‘सृष्टीज्ञान’चे संस्थेचे तरुण कार्यकर्ते कुणाल अणेराव, स्थानिक
वाटाड्या शांताराम रेवाळे आदि लिंगाच्या डोंगराच्या दिशेने जात असताना सांबराचं अलभ्य
दर्शन झालं. तेव्हाही दक्षिणोत्तर पसरलेला, सह्याद्रीतील सलग रांगांपासून
सुटावलेल्या एका स्वतंत्र डोंगरावर उठून दिसणारा अवाढव्य डोंगरी किल्ला महिमतगड डाव्या
हाताला होता. त्याच्या दोनही टोकावर स्थानापन्न असलेले दोन बुरुज आणि
बालेकिल्ल्यावरील ध्वजस्तंभही नजरेस पडत होते.
नरसांबर दर्शन क्षणाचे फोटो
घ्यायला न मिळाल्याने आम्ही दोघे-तिघे चुटपुटलो. तेव्हा ‘जंगल हे वर्तमानपत्रासारखं
वाचत वाचत चालताना, “सांबर अचानक डोळ्यासमोरून गेलं” ही “न्यूजफ्लश” होती.
न्यूजफ्लश प्रमाणेच ती हालचाल आपल्या नजरेत राहायला हवी. अशा क्षणातल्या हालचाली
कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी टिपणे फार महत्त्वाचे असते.’ असे वन्यजीव अभ्यासक नीलेश
बापट आम्हाला सांगत होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सांबराचे डोळ्यांनी दिसणारे
सौष्ठव, काही सेकंदांच्या अवधीत कॅमेऱ्यात टिपणे अवघड होते. मानवी आवाजांना
घाबरल्याने झुडुपात सांबराचा आवाज झालेला. तेव्हा पहिल्यांदा माकड किंवा डुक्कर
असेलं असं वाटलेलं. आमच्या इनमिन नऊ जणांतील सुरुवातीचे दोघे-तिघे विशेष बोलण्याचा
आवाज न करता दांडीच्या वाटेनं किंचित पुढे गेलेले. मधल्या फळीतील आम्ही तिघे-चौघे
निसर्गाच्या गप्पा करत चाललेलो. पाठीमागे काहीश्या अंतरावर शेवटचे दोघे होते. तेव्हा
मधल्यांच्या आवाजाने त्या शाकाहारी सांबराची वाळलेलं गवत खाण्यातली तंद्री भंगली आणि
झुडुपातून ते अचानक समोर आलं. अपरिचित चाहूल जाणवल्यास वन्यजीवांमध्ये सजगता
निर्माण होत असल्याची ती नैसर्गिक प्रतिक्रिया होती. श्रेष्ठ साहित्यिक अनंत
काणेकर यांनी १९५५ साली लिहिलेली ‘सांबर’ नावाची एकांकिका आहे. ‘साम्बरी’ या
काल्पनिक वन्यजमातीच्या, ‘सांबरी पुरुषाने एकतरी सांबर मारलाच पाहिजे. नाहीतर
त्याला समाजात मान नाही’ या मूळ जीवनसूत्राला छेद देणारी ही शोकान्त एकांकिका
आपल्याला वन्यजीवांच्या हत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. कॉलेजयीन
जीवनात स्नेहसंमेलनाच्या वातावरणात कधीतरी ती ऐकलेली. आज पहिल्यांदा असं सांबर
दर्शन घडल्यावर विविध ठिकाणी वाचलेलं सांबरांचं वर्णन आठवलं. तेव्हा ‘गरीब
स्वभावाचा हा प्राणी हिंस्र प्राण्यांपासून स्वतःला कसा वाचवित असेल ?’ असाही
विचार मनाला स्पर्शून गेला.
जगभरातील अभयारण्यांच्या
चौकटीतलं वन्यजीव दर्शन आणि आजचं मोकळ्या आकाशाखाली मुक्त संचार करणारं, मानवी
पाऊलखुणांची चाहूल लागताच, अवघ्या काही सेकंदात, मानवी डोळ्यांच्या पापण्या
लवण्याच्या आत सुरक्षित जागेत पसार झालेलं ते सांबर हरिणाचं दर्शन मनसोक्त डोळे
भरून निसर्ग पाहायला शिकविणारं होतं. आमच्यासारखे हाता-गळ्यात कॅमेरे घेऊन
फिरणाऱ्यांनाही सांबराने काही सेकंदांच्या इंट्रीने चकवलं. मोकळ्या वातावरणात
जंगलातील खरीखुरी गंमत समजावून सांगितली. फोटोंच्या फारशा मोहात न अडकणारे
सन्मित्र, निलेश बापट अनेकदा सांगतात, ‘जंगलात अशा अचानकच्या क्षणी उघड्या
डोळ्यांनी बघण्यातलं, ते दृश्य अनुभवण्याचं सुख वेगळंच ! ते जंगलातील खरं सौंदर्य
!’ त्याची अनुभूती घेऊन आम्ही लिंगाचा डोंगर उतरलो.
धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग : dheerajwatekar.blogspot.com
(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
वयस्क ‘नरसांबर’ दर्शन घडण्यापूर्वीचा फोटो... |
लिंगाच्या डोंगराकडे जाणारी दंडाची वाट... |
लिंगाचा डोंगर ट्रेकमधील सहभागी सहकारी |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा