रविवार, १३ डिसेंबर, २०२०

गावाचा वाढदिवस

        महाराष्ट्रात नुकत्याच १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यातल्या काही पंचायती पूर्णत:, काही अंशतः बिनविरोध झाल्या होत्या. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या सदस्यांकडून जनतेला सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावच्या भल्याची अपेक्षा असणार आहे. ग्रामपंचायती ह्याच देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या कणा असल्याने त्या चालविणाऱ्या विश्वस्थांची जबाबदारी मोठी आहे. या पार्श्वभूमीवर विचार करताना मागच्या २०२०च्या दीपावलीनंतर कोरोना अनलॉक वातावरणात (२३ नोव्हेंबर) आम्ही कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वेबसाईटकरिता शुभसंदेश रेकॉर्ड करताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलेली ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना आठवली. यापूर्वी कधीतरी अण्णांच्याच तोंडून ऐकलेली ही सामाजिक प्रदूषण दूर सारण्याची क्षमता असलेली संकल्पना या भेटीत वन-टू-वन ऐकल्यावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवर्जून नोंदवावीशी वाटली.

'खेड्यांकडे चला' हा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अनेक वर्षांपूर्वी दिला होता. ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागेही तेच सूत्र आहे. राळेगणसिद्धीप्रमाणे शासनाचे विविध पुरस्कार पटकावणारं वाशिम जिल्ह्यातील जांभरूण महाली गावही ‘गावाचा वाढदिवस’ साजरा करतं. महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक मंडळाने बारावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या इंग्रजी पुस्तकात ‘टुवर्डस् आयडियल व्हिलेजेस्’ पाठात या गावाची दखल घेतली आहे. राज्यात वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी पोपटराव पवारांचे हिवरेबाजार, कोकणातल्या डॉ. प्रसाद देवधरांचे झाराप आदी काही गावं आहेत. समाजाने आणि माध्यमांनी अशा गावांची आणि तिथल्या प्रयोगांची सातत्याने विशेष दखल घ्यायला हवी आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांची ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पना अधिक महत्त्वाची वाटते. ४० वर्षांच्या जन आंदोलनातून देशाला १० कायदे देणारे अण्णा आता ८४ वर्षांचे झालेत. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या वातावरणातही अण्णांनी केलेलं काम, त्यांचं असणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, व्यक्त होत राहाणं आम्हाला महत्वाचं वाटतं. समाजकार्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्तींना कामाप्रति समाजाचा विरोधाभास दिसून आला तर नैराश्य येतं. अशा वातावरणात, ‘अध्यात्म माणसाला पूर्ण बदलू शकते, यावर माझा विश्वास आहे’, असं म्हणणारे अण्णा आम्हाला जवळचे वाटतात. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पाच सूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून अण्णा कमालीचे आग्रही आहेत. मंडळाच्या राज्य पर्यावरण संमेलनकारणे आम्ही २०१६ पासून अनेकदा, ४० वर्षांपूर्वी ओसाड, दुष्काळग्रस्त असलेल्या राळेगणसिद्धीतील जलसंधारण आणि ग्रामविकासाची कामे पाहिलीत. अण्णांच्या या कामातून प्रेरणा घेत देशातल्या अनेक गावांनी जलसंधारण व ग्रामविकासाची कामे सुरु केलीत. राळेगणसिद्धीतील जातीभेद नष्ट करण्यासाठी अण्णांनी गावकुसाबाहेरील कुटुंबांना आपले निवासस्थान असलेल्या यादवबाबा मंदिराजवळ वसविले. गावातल्या सर्वांचे विवाह एकाच मांडवात, एका मुहूर्तावर करण्याचा पायंडा पाडला. गावजेवण सुरु झालं. तुलनेने कमी शिकलेल्या अण्णांसारख्या विभूतीने सर्वस्वाचा त्याग करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले अशी उदाहरणे दुर्मीळ होताहेत. म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे.

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यामुळे जोडला गेल्यानंतर आमचं राळेगणसिद्धीला जाणं होऊ लागलं. जलसंधारण, ग्रामविकास आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा ध्यास घेतलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ऐकणं हा सामाजिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी असलेला समृद्ध जीवनानुभव आमच्याही पदरात पडू लागला. पुढे २०१६ साली ‘निसर्ग आणि सामाजिक प्रदूषण’ विषयावर अण्णांची विस्तृत मुलाखतही घ्यायला मिळाली होती. मंडळाच्या नव्याने बनविण्यात येत असलेल्या वेबसाईटसाठी शुभसंदेश रेकॉर्ड करताना अण्णांनी, राळेगणसिद्धी आणि जनआंदोलनांसंदर्भात विस्तृत माहिती असलेले ८ व्हिडिओ नुकतेच प्रदर्शित झाल्याचे म्हटले. या संदर्भात त्यांना अधिक विचारता अवघ्या मिनिटभरात पाणलोट क्षेत्रातून ग्रामीण विकास आणि ग्रामसभेची माहिती देत अण्णा सामाजिक पर्यावरणांतर्गत ‘गावाचा वाढदिवस’ संकल्पनेवर बोलू लागले. तसं याबाबत त्यांच्या तोंडून पूर्वीही ऐकलेलं होतं. पण का कोण जाणे ? आज (कदाचित कोरोना पार्श्वभूमीवर) त्या विषयातलं गांभीर्य अधिक जाणवू लागल्याने आम्ही शक्य तितक्या शांततेने अण्णांचे बोलणे ऐकू लागलो. अण्णा सांगत होते, ‘लोकं आपले वाढदिवस करतात. राळेगणसिद्धी परिवार गावाचा वाढदिवस करते. गावाचा वाढदिवस म्हणजे काय ? जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घ्यायची. लग्न होऊन येऊन १ वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करायचा. गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषाचं गावानं पूजन करायचं. सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करायचं. गावाच्या विकासाचं काम करणारे तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदिंना सन्मानित करायचं. हे सामाजिक पर्यावरण आहे. म्हणून गावाचा वाढदिवस देशभरातील गावागावात व्हायला हवा. यातून सामाजिक प्रदूषण दूर होईल. गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल. गाव एक होईल.’ अण्णांचे विविध कामाचे ८ व्हिडिओ त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. त्यातल्या ‘राळेगणसिद्धी - जल संरक्षण क्षेत्र विकास’ या व्हिडिओत त्यांनी ‘गावाचा वाढदिवस’ या संदर्भातील आपली भूमिका मांडली आहे. गावातल्या वयोवृद्ध स्त्री-पुरुषाला आपले माता पिता मानून समस्त ग्रामस्थ त्यांचे पूजन करतात. एका वर्षात जन्माला आलेल्या बालकांना नवीन कपडे शिवले जातात. त्यांचा स्वागत केले जाते. लग्न करून गावात आलेल्या सुनांचा साडी चोळी देऊन सन्मान केला जातो. समाजसेवेचं काम करणाऱ्या गावातील युवकांचा सन्मान केला जातो. त्यांची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न होतो. दरवर्षी २ ऑक्टोबरला, गांधी जयंतीदिनी हा गावाचा वाढदिवस (ग्रामपरिवर्तन दिन) होतो.

राळेगणसिद्धीत गावाचा वाढदिवस वर्षानुवर्षे सुरु आहे. हे काम पाहून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील भारावून गेले होते. आजचं आमचं बोलणं संपवून निघताना अण्णांनी, ‘सरकार पडण्याला घाबरतं. सरकार पाडण्याची शक्ती जोपर्यंत जनतेत येणार नाही तोपर्यंत खरे लोकतंत्र येणार नाही’ असं म्हटलं. या देशात ‘प्रजासत्ताक’ आलंय. त्याला ७१ वर्षे पूर्ण झालीत. ‘आज जनता देशाची मालक झाली आहे. ग्रामसभेला अधिकार देणारा कायदा देशाला हवा आहे. यासाठी जनतेचे संघटन करावं लागेल’, अण्णांचे हे विचार ऐकून आम्ही राळेगणसिद्धीच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाच्या परिसरातून बाहेर पडलो. तेव्हा, ‘कथनी और करनी मैं अंतर नही होना चाहिये !’ हे अण्णांचं वाक्य कानात गुंजत राहिलं.  

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5443837279092300750&title=Birthday%20of%20Villages&SectionId=1002&SectionName=Be%20Positive








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...