एप्रिल महिन्यात बालमित्र हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, १३ एप्रिलला कोरोना वैद्यकीय मदत नावाच्या व्हाट्सअॅपच्या राज्यव्यापी ग्रुपवर (क्रमांक ४) जॉईन झालेलो. त्याच दिवशी हा ग्रुप फुल्ल होऊन पाचव्या ग्रुपची लिंक प्रसूत झाली होती. या ग्रुपचे उद्दिष्ट कोरोना संक्रमितांना मदत करणे हेच होते, आणि शीघ्रगतीने ते चालूही होते. ग्रुपमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पोस्ट पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकच्या होत्या. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्या तरीही त्या पोस्ट आमच्यासारख्या दूरस्थ कोकणी मनाला चलबिचल करत होत्या. ग्रुपवर सतत ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरची माहिती, अँटीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट, एचआरसीटी स्कोर, हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन बेड, पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर, प्लाझ्मा, प्लाझ्मा रक्तपेढी, कोरोना लसीकरण विषयक सद्यस्थिती, टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसेवीर इंजेक्शन उपलब्धी, अॅम्ब्युलन्स, होम क्वारंटाईन लोकांना घरपोच डबा, नातेवाईक नसलेल्या किंवा कोणीही उपलब्ध नसलेल्यांसाठी मोफत अंत्यसंस्कार सुविधा, प्रायव्हेट हॉस्पिटलमधील कोरोना आजाराच्या बीलांसंदर्भातील तक्रारी आणि दात्यांचे रक्तगट आदी चर्चा सुरू असायच्या. कोणीतरी, 'आज *** हॉस्पिटलमध्ये *** ही व्यक्ती अॅडमिट झाली आहे. त्यांची तब्बेत सिरीयस आहे. त्यांना प्लाझ्माची गरज आहे. त्यांचा रक्तगट *** आहे. प्लाझ्मा दान करणारं कोणी आहे का ? तातडीने हवं आहे. कृपया *** या नंबरवर संपर्क करावा.' असं कळवायचे. जमलं तर कोणीतरी मदत करायचे. कोणीतरी, ‘मी स्वतः आहे' म्हणायचे. अचानक दुसऱ्या क्षणाला, कोणीतरी एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधील कोरोना आजाराच्या बीलांसंदर्भातील तक्रारीची दखल घेऊन बील कमी केल्याची पोस्ट करायचा, मग बरं वाटायचं. कोणीतरी तेवढ्यात अगदी काकुळतीला येऊन ‘रेमडेसेवीर इंजेक्शन मिळेल का ?’असं विचारायचे. त्यावर त्याला कुणाकडून तरी जवळच्या मेडिकलचा संदर्भ दिला जायचा. कोणीतरी अति महत्त्वाचे मोबाईल नंबर शेअर करायचे.
दोनेक दिवसांनी या ग्रुपवर 'तातडीने मदत हवी आहे' या मथळ्यांतर्गत कोरोना बाधित पेशंटचे नाव, राहात असलेल्या भागाचे नाव, वय, संपर्क क्रमांक, पेशंटचे अन्य आजार, सध्याची लक्षणे, ऑक्सिजन लेव्हल, पल्स, ब्लडग्रुप, व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे अथवा नाही ? एचआरसीटी स्कोअर अशा माहितीच्या पोस्ट एका मागोमाग एक येऊ लागल्या. अनेक गरजवंत आपली अडचण पोस्ट करायचे. कधीकधी कोणीतरी चटकन मदतही उपलब्ध करायचे. असं सारं चाललेलं. या दिवसात आम्हीही बालमित्राच्या कारणे याच प्रवाहातून प्रवास करत असल्याने पोस्ट करणाऱ्या गरजवंतांच्या अडचणींचा अंदाज यायचा. संवेदनशील मनाला आतून कळवलायला व्हायचं. अंतर्मनात कालवाकालव व्हायची. अशातच, ‘बारामतीत रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी, बनावट इंजेक्शनची विक्री’ ही बातमी कळल्यावर तर संताप अनावर झालेला. वैद्यकीय भ्रष्टाचाराची प्रकरणेसमोर येत होती. कोरोना विषयक मतमतांतरे मानसिक गोंधळात अधिक भर घालायची. अशा दोलायमान अवस्थेत न चुकता कोरोना वैद्यकीय मदत ग्रुपचे वाचन सुरु असायचे. २३ एप्रिलच्या रात्री ८ वाजता आमच्या बालमित्राला देवाज्ञा झाली आणि कोरोना वैद्यकीय मदत ग्रुप मधल्या प्रत्येक गरजवंताच्या मनातल्या स्मशान शांततेनं आमच्या मनाचा ताबा घेतला. मागील १०/१२ दिवस सातत्याने हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू असल्याने आपणही संक्रमित होणार असं वाटू लागलं. पण आठवडा होऊनही कोणतीच लक्षण दिसेनात. तेव्हा हायसं वाटलेलं, पण तेही क्षणिक ठरलं.
एक मे रोजी चिरंजीवाचा आणि आईचा वाढदिवस होता. दहा दिवसांपूर्वी जीवाभावाचा बालमित्र गमावलेला असल्याने वाढदिवसाचे काय कौतुक असणार ? पण घरचे वातावरण निवळावे म्हणून सहज सौ. ला म्हटलं, 'उद्या रात्री संपूर्ण कुटुंबासह एकत्रित भोजन करू.' सौ. ने जवळच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन नंबरच्या भावाच्या बायकोला हे कळवलं. तेव्हा सौ. ला कळलं, ‘भावाच्या बायकोला ताप आलेला आहे ! आमचा भाऊही डिसेंट्रीने आजारी पडलेला.’ या सर्वांना हे किरकोळ वाटलेलं. मागील १२ दिवस हॉस्पिटल वारी केल्यानं आम्हाला त्यातलं गांभीर्य चटकन जाणवलं. तातडीने जवळच्या डॉक्टरकडे पोहोचलो. डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. नजीकच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बहिणीकडे पोहोचलो. तिने भावाच्या बायकोची केलेली अॅन्टीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली. इकडे डॉक्टरांनी एच.आर.सी.टी. करण्याच्या सूचना दिल्या. त्याही करून झाल्यावर इन्फेक्शन नॉर्मल असल्याने आमच्या घरातील स्वतंत्र खोलीत तिला क्वारंटाईन केलं. शासकीय यंत्रणेला कळवलं. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु झाले. तोवर त्यांच्या मुलाला ताप आला. पण तो १/२ दिवसांच्या औषधांनी सावरला. भावाची अॅन्टीजेन टेस्ट केली. त्याला त्रास सुरु होऊन काही दिवस पुढे सरकलेले आणि औषधेही घेऊन झालेली असल्याने त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. पण त्याच्या शरीरात अशक्तपणा होता.
भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या निमित्ताने आम्ही संक्रमित झालो. गुरुवारी, ६ मेला पहाटे २ वाजता आम्हाला ताप आला. पण तेही सुरुवातीला किरकोळ वाटलं. लक्षणं जाणवेनात. तरीही औषधांचा कोर्स चालू केला. वैद्यकीय उपचारांनी शनिवारी ८ मेला पहाटे पावणेतीन वाजता ताप उतरला. बऱ्यापैकी फ्रेश वाटतं होतं. २/३ दिवसानंतर बहुदा पहिल्यांदा झोप लागलेली असावी. सौ.नेही, 'चांगले घोरत होतात' म्हणत होकार दर्शविला. तेव्हा शरीराचं तापमान होतं ९७ आणि ऑक्सिजन लेव्हल होती ९६. तुलनेनं कमी पण डोकं अजूनही जड होतं. घशाला कोरड पडलेली. गरम पाणी प्यायलो आणि झोपलो. विशेष झोप लागली नाही. सकाळी निवांत उठलो. अंगात ताप नव्हता. आदल्या दिवशी वडिलांनाही ताप आलेला. त्यांची बीपी कमी व्हायची गोळी बहुतेक त्यांना सूट होत नसावी. डॉक्टरांनी २/३ दिवस गोळी थांबवायला सांगितली होती. आज सकाळी त्यांना गरगरायला लागलं. त्यांचं गरगरणं शारीरिक की गोळी बंद केल्यानं मानसिक हेच कळेना. त्यांची ऑक्सिजन लेव्हल, बीपी चेक केला. तो ठीक होता. त्यांना जेवण जाईना. आई-बाबांचा कोरोना लसीकरणाचा एक डोस घेऊन झालेला असल्याने बाबांना ताप आल्यावर भावाच्या फ्लॅटवर स्वतंत्र ठेवून त्यांच्या रक्ताच्या जवळपास सर्व तपासण्या केल्या. त्या नॉर्मल आल्या. पण अशक्तपणातून सावरायला त्यांना आठवडा गेला. बाबांना फ्लॅटवर पाठवल्यानंतर तासाभरात आमच्या चिरंजीवाला ताप भरला. घरात तापाचं औषध असल्याने ते त्याला दिलं. दुसऱ्या दिवशी, ९ मेला चिरंजीवाला डॉक्टरकडे नेलं. दिवसभरात त्याचा ताप किंचित कमी झालेला होता. १० मेला ताप उतरला. परंतु या धावपळीत सौ.वरील मानसिक ताण वाढल्याचे आमच्या लक्षात आले. भावाची पत्नी, स्वतः मी, काही प्रमाणात बाबांना संसर्ग होतोय याची जाणीव होऊनही ती धीट राहिलेली. पण चिरंजीवाला ताप आल्याने तिची अस्वस्थता वाढली. तिच्या चेहऱ्यावरील काळजीचे भाव सारं काही मूकपणे सांगत होते.
आमच्याकडे घरी स्वतंत्र खोलीत असलेल्या भावाच्या बायकोचा क्वारंटाईन कालावधी संपत आलेला. ११ मे ला आम्हाला बऱ्यापैकी जेवण संपलं. सायंकाळी फ्लॅटवरून आई घरी पाहायला आली. तिच्याही बोलण्यात काळजीचा सूर राहिला. जवळच्या मित्राने पुण्यातून काही औषधांचे कुरियर पाठविले होते. पण मधाळ बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरियर कंपनीने अर्जंट मेडिसिन असं लिहिलेलं असूनही निरोपाचा एक मोघम फोन केल्यावर दोन दिवस कुरियर ऑफिसात बाजूला ठेवून दिलं. नेमकं तेव्हाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण बाजारपेठेत फिरण्यासाठी हेल्मेट सक्तीचा कायदा लागू झाला. कोणीही कुरियर पोहोचवेना. कुरियर हाती यायला आणखी दोन दिवस लागले. माझ्यासकट घरातले संक्रमित हळूहळू सावरत असताना १२ मे ला सकाळी ११ वाजता आमच्या सौ.ला ताप आला आणि मला घाम फुटला. १३ तारखेला क्वारंटाईन कालावधी संपत आलेल्या भावाच्या पत्नीला आणि तापातून सावरलेल्या आमच्या चिरंजीवाला भावाकडे फ्लॅटवर रवाना केलं. आता आम्ही आणि आमची पत्नी दोघेही पत्नीचा ताप कमी होत नाही म्हणून घरात स्वतंत्रपणे क्वारंटाईन झालो. शक्य तेव्हढ्या तातडीने कळावं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डेरवण येथे १६ तारखेला दोघांनी आर.टी.पी.सी.आर. टेस्ट केली. खरंतर आम्हाला तेव्हाही विशेष लक्षणं दिसत नव्हती. पण दुसऱ्या दिवशी रात्री दोघांचीटेस्ट पॉझिटीव्ह आली. झालं ! डॉक्टरांनी १८ तारखेला एच.आर.सी.टी. करण्याच्या सूचना दिल्या. आमचा स्कोअर आला होता ३ आणि पत्नीचा ६ !
दरम्यान पत्नीला ताप आल्यानंतरचे सहा दिवस आमच्या आजवरच्या वैवाहिक जीवनातील सर्वाधिक काळजीवाहू ठरले. चिरंजीवाला भावाच्या फ्लॅटवर ठेवलेले. त्याच्याशी सलगीचा संपर्क तुटलेला. सुरुवातीचे २/३ दिवस त्याला तिकडे रात्रीची झोपच लागेना. रात्री ११/१२ वाजता रडवेल्या आवाजात त्याचा फोन यायचा. त्याचा आवाज आम्हा उभयतांची अस्वस्थता वाढवायचा. त्यात आम्हाला सौ.ची ऑक्सिजन लेव्हल एच.आर.सी.टी. करेपर्यंत अनेकदा ९५ पेक्षा कमी जाणवलेली. तीही अधूनमधून, ‘मध्यरात्री मी पाहिली तेव्हा अजून कमी होती’, असं म्हणायची. कोरोना संक्रमणातून जवळपास सगळे सुखरूप बाहेर आलेले असताना, आईला आणि छोट्या भावाला कोणताही त्रास झालेला नसताना आमची सौ. आणि तिच्या निमित्ताने आम्ही मात्र त्यात अडकत चाललेलो. काहीवेळा तिच्या बोलण्याचे अर्थ आम्हालाच कळेनात. तिची अस्वस्थता कमालीची वाढलेली. हे सारं तिच्या माहेरच्यांना कळल्यावर त्यांचे फोन वाढले. मग हिची फोनवर चिडचिड सुरु झाली. आणखी एका जवळच्या मित्रानं ‘पतंजली’चं ‘दिव्यधारा’ औषध आणून दिलं. त्याचा गंध नाकावाटे शरीरात घेतल्यावर सौ.च्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. १६ तारखेला आम्ही आर.टी.पी.सी.आर. टेस्ट केली तेव्हा तिची ऑक्सिजन लेव्हल ९५+ होती. दोघांच्या रक्ताच्या विविध तपासण्या केल्या. या निमित्ताने आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या शरीरातील रक्ताच्या तपासण्या केल्या. त्या सगळ्या नॉर्मल आल्या. एच.आर.सी.टी. स्कोअर नुसार डॉक्टरांची औषधे सुरु झाली. पण ऑक्सिजन लेव्हलसाठी ‘दिव्यधारा’चाच आधार राहिला. कोरोना काळात केली जाणारी कोणतीही टेस्ट आणि त्याचा येणारा रिपोर्ट या मधला जो कालावधी होता तो आजवरच्या जीवनातील सर्वाधिक विचित्र, क्षणाक्षणाला मनात वेगवेगळे विचार निर्माण करणारा राहिला. १९ तारखेला बऱ्याचश्या टेस्ट झालेल्या असल्याने मानसिक निवांतपणा आला होता. डॉक्टरांना दिवसातून तीन वेळा सौ.च्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल कळविणे सुरु होते. सौ. च्या १/२ टेस्ट सहा दिवसांच्या फरकाने पुन्हा कराव्या लागणार होत्या.
घरात संसर्गित वातावरण सुरु झाल्यावर अर्धा लिटर सॅनीटायझरच्या ३/४ बाटल्या वापरून झालेल्या. कारसाठीही वेगळा सॅनीटायझर आणलेला. नंतर आम्ही उभयता क्वारंटाईन झाल्यावर छोट्या भावाने घरात पाच लिटर सॅनीटायझरचा कॅनच आणून ठेवला. आता घरात दिवसातून कित्येकवेळा सॅनीटायझरचा वापर होऊ लागला. वेळेवर डॉक्टरांची औषधे घेणे, त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणे, भरपूर अन्न पोटात घेणे आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे एवढेच हातात होते. तसेही आम्हाला विशेष काही जाणवत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही स्वयंपाकघरातील किरकोळ कामात जुंपलो होतो. सकाळी उठून नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालणे, पक्ष्यांसाठीची पिण्याच्या पाण्याची भांडी भरणे सुरु झालेले. स्वयंपाकघरात वावरताना एकदम बालपण आठवत होतं. बालपणी आई आजारी असताना आम्हाला स्वयंपाकघरात लक्ष घालावं लागायचं. त्याला आता कित्येक वर्ष झाली. लग्न झाल्यावर दरवर्षी मे महिन्यात बायको माहेरी गेल्यावर आमचा आईच्या हातचं जेवण्याचा मस्त बेत बनायचा. गेल्यावर्षी तो कोरोनाने हुकवला आणि यंदा तो विचित्रपणे कोरोनाने जुळवला होता. नियमितपणे भावाच्या फ्लॅटवरून आईच्या हातचं जेवण मिळू लागलं. सुरुवातीला ते संपत नव्हतं. आठवडाभरानंतर ते कमी पडू लागलं. हा सारा कोरोनातील अॅलोपॅथी गोळ्यांचा परिणाम होता. म्हणून मग उभयतांनी सकाळी-सकाळी गोमूत्र अर्क घ्यायला सुरुवात केली.
मानवी जीवन व्यापून राहिलेल्या सोशल मिडीयासह दूरचित्रवाणीवरील २४ तासांच्या बातम्या, रेडिओची, दूरदर्शनची आठवण करून देऊ लागल्या. ‘सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत’, सनईच्या सुरासह कानी पडणारा रेडिओवरील निवेदिकेचा हा मंजूळ स्वर तेव्हा आजारी वातावरणात उत्साह आणायचा. तिथे आजच्या दूरचित्रवाणीची कथा काय वर्णावी ? म्हणताना त्याची आठवण झाली. मानवी इतिहासाच्या दृष्टीने कोरोना विषाणूच्या साथीने अनेक मौखिक संदर्भ वेगाने पुसले होते. लिहून लिहून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ ह्या शब्दाचा अर्थ कळेनासा झाला होता. मन बधीर झालेलं. उद्याचा सूर्योदय काय घेऊन उगवणार आहे ? याची शाश्वती नसल्याने केविलवाणी अवस्था झालेली. इथं प्रत्येकाला आपली लढाई स्वतःला लढायची आहे हे पक्क झालेलं. हाताबाहेर गेलेली परिस्थिती, नातेवाईकांचा आक्रोश आणि आपली ही अशी झालेली अवस्था रात्री झोपताना अंतर्मनात खळबळ निर्माण करायची. कष्टानं उभा केलेला संसार, लेकरं मागे टाकून कुणाला न सांगता, कुणाचा निरोप न घेता माणसं निघून चालली होती. नाती जगायची राहिली होती, अनेक स्वप्न अधुरी पडली होती. प्रायव्हसीच्या खुळ्या नादात वर्तमान समाजानं एकट्यानंच चालायचं ठरवलं आणि थकवा येऊन समाजाची ऑक्सिजन लेव्हल कमालीची खालावली होती. ‘इमोशनल हेल्थ’ संकल्पनेला महत्त्व आलेलं. पण वेदना देणाऱ्या इतक्या घटना आजूबाजूला होत असताना मन प्रसन्न तरी कसं राहिलं ? अशातच कोरोना कारणे, आमच्याकडून आपणहून केला जाणारा बाहेरचा नियमित संपर्क जवळपास तुटला होता. तरीही शंका आलेल्या ४/२ जणांनी, ‘बऱ्याच दिवसात संपर्क नाही. पोस्ट नाही. सगळं ठीक आहे ना ?’ असं व्हाट्सअॅपवर विचारलंच ! आमचा नियमित संपर्क ज्यांच्याशी असतो अशांपैकी एक कोकणचे नामवंत इतिहास संशोधक ९२ वर्षीय अण्णा शिरगावकर यांनी तर आम्ही फोनवर उपलब्ध होत नाही म्हणून या काळात चक्क एक अंतर्देशीय पत्रच आम्हाला पाठवलं. ते हाती पडल्यावर मात्र, ‘आता लोकांशी बोलायला हवं’ या भानावर आम्ही आलो.
२१ मे रोजी सकाळी रत्नागिरीतून कोणत्या तरी शासकीय विभागाचा कोरोना संसर्गित रुग्णांची आपुलकीने विचारपूस करणारा फोन सौ.च्या मोबाईलवर आला. दोघांचीही विचारणा झाली. ‘काळजी घ्या, सकस आहार घ्या. काही अडलं तर कळवा.’वगैरे सूचना सांगितल्या गेल्या. २५ तारखेला दुपारी दीड वाजता, आम्ही भोजन घेत असताना मोबाईल कॉल आला. तो आमच्या स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा होता. ‘आम्हाला कोरोना झालाय ना ? कधी झाला ? टेस्ट पॉझिटीव्ह कधी आली ? तब्बेत कशी आहे ? घरी कोण कोण राहात आहे ? कोणत्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे ? वगैरे...’ प्रश्न आमची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर नवव्या दिवशी विचारले जात होते. तेव्हा जवळपास सगळं नॉर्मल झालेलं. या प्रश्नांनी पुन्हा आम्हाला भूतकाळात नेलं. खरंतर वैतागायला झालेलं. त्यातही पत्नीबाबत विचारणा नव्हती. तिला स्वतंत्र फोन जायला नको, म्हणून मग आम्हीच तिचीही माहिती दिली. फोन संपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेवटी समोरची व्यक्ती म्हणालीच, ‘आम्हाला फॉर्मलिटी करायला हवी हो !’ २६ तारखेला शासनाने रत्नागिरीसह १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आमच्याशी संबंध राहिलेला नव्हता. पूर्व सूचनेनुसार २८ मेला आम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. तेव्हा आम्ही लवकर रिकव्हर झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढचे २/३ दिवस घरची स्वच्छता आणि सॅनीटायझेशन करण्यात गेले.
एक जूनच्या सकाळी आमचं जीवन पूर्वपदावर आलं. हसत्या खेळत्या बायकोची अस्वस्थता आमच्यासाठी भयानक ठरली होती. घराला घरपण आणणारी, घरातलं वातावरण आनंदी ठेवणारी हसतीखेळती बायको असण्याचं वैभव केवढं मोठं असतं ? याची जाणीव कोरोनामुळे झाली. महिन्याभराच्या या कालावधीत कोरोनाने आम्हाला आमच्या आजवरच्या जीवनाचं जणू ऑडिट करायला लावलं होतं. खरं खोटं त्या चीनलाच माहित ! पण कौटुंबिक स्तरावर लाखभर रुपयांचा चुराडा पाहिलेल्या आमचा आंतरिक अनुभव, ‘कोरोना हा नुसता आजार नसून हे भलतंच काहीतरी आहे,’ असंच आम्हाला वारंवार सांगत राहिला. आयुष्यातील तब्बल दोन महिने निवळ कोरोना अनुभवात निघून गेल्यावर एका निवांत क्षणी मेंदू ऑडिटच्या फीलमध्ये असताना कुठेतरी वाचलेलं, ‘रोज अविश्रांत मेहनत करायला विसरू नका ! मरताना वाटायला हवं, वाह !! काय लाईफ होती ती !!!’ हे वाक्य आठवलं आणि आम्ही कार्यरत झालो.
धीरज वाटेकर