रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !



          ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय निसर्ग सौंदर्य लाभलेलं अखंड कोकण वणवामुक्त व्हावं म्हणून गेल्या दोनेक वर्षांपासून ‘वणवा मुक्त कोंकण’ कार्यरत झाली आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव पाहाता वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वणवा न लावता, न लावू देता सामाजिक स्तरावर वणवा जाळण्याऐवजी वणवा लावणारी प्रवृत्ती जळून जाण्याची आवश्यकता आहे. कायद्याने गुन्हा असलेली वणवा लावण्याची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सध्याच्या जंगलातील वणव्यांच्या ऋतू हंगामात जनजागृतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आज चिपळूणात ‘वणवा’मुक्ती साठी कार्यरत संस्था, ग्रामपंचायती, व्यक्ती यांचा सन्मान सन्मान सोहोळा संपन्न होत आहे.

दरवर्षी देशातील विविध जंगलांत वणवे लागत असतात. वणवा हा अतिशय चिंताजनक विषय आहे. यातले जेमतेम १५ टक्के वणवे नैसर्गिक तर बहुसंख्य मानवनिर्मित असतात. मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्‍यातील डिंगणे गावी वाळलेल्या गवताच्या कुरणांमुळे ५०० एकरांवर नैसर्गिक वणवा भडकून काजू, आंबा आणि नारळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. ९० शेळ्या, दोन घरे व ९५ बोकडांचा या वणव्यात होरपळून मृत्यू झाला होता. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटासह अनेक भागात लावले जाणारे वणवे वाहतूक थांबविण्यास कारणीभूत ठरत असतात. भारतीय वन सर्वेक्षणाच्या अहवालानुसार वणवा लागण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य पहिल्या दहात आहे. राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने मागे वणवा समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘राष्ट्रीय धोरण’ तयार करण्याची सूचना केली होती. ‘वणवा’ संदर्भातील अभ्यासपूर्ण भूमिका निश्चित करताना, वणवा लागल्यानंतर त्या आडभागात कसे पोहोचायचे ? आग विझवायला काय वापरायचे ? त्याकरिताचे आर्थिक नियोजन याचा उलगडा होत नाही. म्हणून ‘वणवा लागूच नये’ यावर काम करण्याची आवश्यकता जाणवते. जंगलमाफियांकडून मुद्दाम आगी लावल्या जातात. पुढे त्यात होरपळलेल्या झाडांचा लिलाव केला जातो. वनौषधी, वनसंपत्ती गोळा करण्यासाठी आणि जंगल पर्यटसाठी गेलेल्या माणसांकडून निष्काळजीपणे आणि काहीवेळा जाणुनबुजून केलेल्या कृत्यामुळे वणवे लागतात. वनातून जाताना पेटती सिगारेट फेकणे, टेंभे (मशाल, पलिते) घेऊन जाणे, कॅम्पवरील आग तशीच सोडून जाणे, शेतीबांधावरील लावलेली आग आदिंमुळे वणवे लागतात. कोकणात वणवे लागण्यापेक्षा वणवे लावण्याचे प्रणाम अधिक आहे, म्हणून जनजागृती आवश्यक आहे. वणव्यासंदर्भात भारतीय वनखात्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी अद्ययावत यंत्रणा असेल का ? प्रश्न आहे. वणवा विझवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. पण आग लागू नये म्हणून जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या या पलिकडे आम्ही जात नाही. ‘ग्रीन इंडिया’चे स्वप्न पाहाणाऱ्या देशाला ‘वणवा’ प्रवृत्ती परवडणारी नाही आहे. वणवा लागलेल्या एखाद्या जंगलाचे आत्मवृत्त ऐकायला बसलो तर एखादं संवेदनशील मन उद्ध्वस्थ होऊ शकतं. वणवा लागल्यावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. यावरील सर्वात सोपा उपाय हा आग लागूच न देणे हाच आहे. अर्थात सर्वच ठिकाणी अशी अपेक्षा करणे व्यवहार्य नाही आहे. जंगलांमध्ये जेव्हा जोरदार वारा वाहू लागतो त्यावेळी एकमेकांच्या आसपास असलेल्या झाडांच्या फ़ांद्या आपापसात एकमेकांवर घासून घर्षणाने आग निर्माण होत असते. ही आग हळू हळू तेथील पालापाचोळ्याला लागून संपूर्ण जंगलात पसरते. नैसर्गिक वणवा साधारणपणे असा लागत असतो. या आगीमुळे निसर्गाला प्रतिकूल ठरणाऱ्या अनेक गोष्टींना अटकाव करता येतो असा एक मतप्रवाह आहे. याचे लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोकणात लागणारे वणवे ‘नैसर्गिक’ या कक्षेत बसत नसल्याने त्यातून होणारी नैसर्गिक हानी पाहाता कोकणात वणवे रोखायला हवे आहेत.  आपल्याकडे जंगलांना मुद्दामहून आगी लावल्या जातात हे वास्तव आहे. आगीमुळे पर्यावरणाची हानी होते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढतो. त्याचा प्रतिकूल परिणाम विश्वाचे तापमान वाढीमध्ये दिसून येतो आहे.

                                       
पाचाड गाव सीमेवरील येथील वणवा विझवताना समितीचे सदस्य

थंडी संपून उन्हाळा सुरु झाला की वणव्यांचा प्रश्न गंभीर बनतो. कोकणात दिवसाला कुठेना कुठे एक वणवा अशी भयंकर स्थिती निर्माण होत असते. तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी पर्यावरणस्नेही उपायांचा विचार करता पेटलेला वणवा विझवणे कठीण आहे. कोकणात फळबागांना लागणाऱ्या वणव्यांमुळे ‘नको ती शेती’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याची उदाहरणे आहेत. वणवा ही कोकणच्या सौंदर्याला लागलेली कीड आहे. कोकणची सांस्कृतिक राजधानी आणि असंख्य कृतीशील चळवळींचे माहेरघर असलेल्या चिपळूणात माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करणारे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे, ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या माध्यमातून चिपळूणला ‘डेस्टीनेशन’ बनविण्यासाठी कार्यरत असलेले पर्यावरणस्नेही उद्योजक श्रीराम रेडिज, शहरातील सर्व चांगल्या उपक्रमातील अग्रणी उद्योजक प्रकाश(बापू) काणे यांच्यासह प्रवीण कांबळी, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, अनिकेत बापट, धीरज वाटेकर, दिनेश दळवी, विलास महाडिक, डॉ. गौरव बारटक्के आदी कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी हे असंख्य पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याच्या बळावर ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘वणवा मुक्त कोकण’च्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील खेंड कांगणेवाडी परिसरातून जाणाऱ्या गुहागर बायपास घाट मार्गावरील महालक्ष्मी डोंगराला ६ डिसेंबर २०२० ला दुपारी लागलेला वणवा प्रयत्नांती विझवला होता. अलिकडे पाचाड (चिपळूण) वणवा मुक्त कोंकण समितीच्या सदस्यांनी ११ फेब्रुवारी २०२२ गावात येणारा वणवा सीमेवर विझवण्यात यश मिळवले होते. समिती सदस्य प्रवीण कांबळी आणि अनिकेत बापट यांनी नेरळ (कर्जत) येथील सगुणा बागेने विकसित केलेले वणवा लागू न देण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या गावांचे सर्वेक्षण, सर्वेक्षणाच्या आधारे कामाचा प्राथमिक कृती आराखडा, ‘वणवा मुक्त गाव’ प्राथमिकता, तालुक्यातील ग्रामपंचायती, वनविभाग, पोलिस, विविध सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांचा सहभाग या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समितीचे काम सुरु आहे. गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे फलक गावागावात लावल्यानंतर जेव्हा गावात वणवे लागले तेव्हा ते विझवण्यासाठी कार्यकर्त्यांना फोन येत होते. आजही येत असतात. याचा अर्थ आजही समाजात ही प्रवृत्ती नष्ट व्हावी असं मानणारं समाजमन आहे. त्याला संघटीत करायला हवं आहे.   

महालक्ष्मी डोंगर गुहागर बाय पास रोड येथील वणवा विझवताना समितीचे सदस्य

कोकणात शेतजमिनीची भाजावळ करण्याची लोकांची जुनी सवय आहे. वास्तविक ही भाजणी अयोग्य आहे, ती करू नका असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून सातत्याने केले जाते. तरीही हे घडते. यातील काही विकृत मानसिकता पुढे वणव्याला कारणीभूत ठरते.  भाजवळ पद्धत जागतिक स्तरावरही योग्य नसल्याचे सर्वमान्य झाले आहे. तरीही आपलं समाजमन ही पारंपारिक पध्दत सोडण्यास तयार नाही. भाजावळीच्या काळात ही पद्धत अव्हेरून शेती करणाऱ्या किती शेतकऱ्यांच्या पाठीवर आम्ही कौतुकाची जाहीर थाप मारली आहे ? भाजवळ पद्धत नाकारून यशस्वी शेती करणाऱ्या किती शेतकऱ्यांना आम्ही सन्मानित केलं आहे ? त्यांचे अनुभव समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही कोणते प्रयत्न केले आहेत ? आपला समाज उत्सव आणि कार्यक्रमप्रिय आहे. समाजाची ही मानसिकता प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. हे ओळखून वणवा मुक्त कोंकणतर्फे आज (१४ जानेवारी) पुरस्कार प्रदान आणि जनजागृती सोहोळा संपन्न होत आहे. कोकणात पशुपालन वाढल्यास वणव्याचे प्रमाण कमी होऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे. सरकारनेही ‘वणवा मुक्त गाव योजना’ स्वरूप कार्यक्रम हाती घेण्याची नितांत गरज आहे. ‘आमचा गाव वणवामुक्त गाव’ कार्यक्रमांतर्गत गावागावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन या संदर्भातील मार्गदर्शन, गाव कृतीदलाची स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवा विरोधी सशस्त्र पथक आदी पर्याय वापरले जायला हवेत. आज चिपळूणचे आ. शेखर निकम, पंचायत समिती सभापती सौ. रीयाताई कांबळे, उपसभापती प्रतापराव शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, प्रभारी गटविकास अधिकारी भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम वणवा मुक्ततेसाठी साहाय्यभूत ठरावा.

 

धीरज वाटेकर

सदस्य, वणवा मुक्त कोंकण



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...