शनिवार, १० जानेवारी, २०२६

परखड शब्दात ‘कटूसत्य’ सांगणारे ‘निसर्गशास्त्रज्ञ’

२००८! आमच्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तकाच्या प्रकाशनाची गुढीपाडव्याची तारीख निश्चित झालेली. पुस्तक स्वरुपात पहिल्यांदाच मजकूर प्रकाशित होणार असल्याने उत्सुकता, दडपण, वेळ कमी कामे फार अशी स्थिती. त्यातच ‘कोकण इतिहास पुरुष’ अण्णा शिरगावकर यांचा, ‘चिपळूणला एका निसर्ग कार्यशाळेला येत असून तिथे भेटायला या’, असा निरोप मिळालेला. १८ फेब्रुवारी २००८ रोजी अण्णांना भेटायला कार्यशाळेत पोहोचलेल्या आम्हाला पहिल्यांदा निसर्गशास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सर भेटलेले. कालांतराने आम्ही ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी चालवलेल्या पर्यावरण जनजागरणाच्या चळवळीकडे वळलो. चळवळीच्या या वाटेवरून चालताना गत दोन दशकात अनेकदा गाडगीळ सरांच्या भेटी झाल्या. अत्यंत परखड शब्दात निसर्गविषयक ‘कटूसत्य’ सांगणारे गाडगीळ सर आमच्या सदैव स्मरणात राहातील.

 

१८ फेब्रुवारी २००८

कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता शाश्वत विकासाचा विचार लोकांसोबत राहून मांडणाऱ्या गाडगीळ सरांचे नुकतेच (७ जानेवारी) निधन झाले. पर्यावरण क्षेत्रात आयुष्यभरात दिलेल्या योगदानासाठी सरांना अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला होता. गाडगीळ सरांना ऐकणं हा अफाट समृद्ध करणारा अनुभव असायचा. सर पर्यावरणाचा विचार हृदयापासून संदर्भासह मांडायचे. आम्हाला अनेकदा हा अनुभव घेता आला. सरांचा मराठी भाषा सौष्ठवाचा अभ्यासही दांडगा होता. याबाबतीतील विविध संदर्भही ते द्यायचे. २०१८ साली भूतानचा अभ्यास दौरा करण्यापूर्वी आम्ही सरांना भेटलेलो. तेव्हा सरांनी ‘निसर्ग पर्यटन’ संकल्पनेबाबत आपली परखड मते मांडली होती. ‘सह्याद्रीची आर्त हाक! - पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ हा वनराई ने प्रकाशित केलेला त्यांचा ग्रंथ आम्ही आमच्या आळंदीच्या पर्यावरण संमेलनात सहभागींना भेट दिला होता. सरांनी आपले हस्ताक्षर असलेले ‘उत्क्रांती एक महानाट्य’ हे प्रचंड वैज्ञानिक मूल्य असलेले पुस्तक मधंतरी भेट म्हणून पाठवलेले. सरांचे हस्ताक्षर असेलेला तो दस्तऐवज अमूल्य आहे. मध्यंतरी डॉ. गाडगीळ आणि डॉ. विजय एदलाबादकर यांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील १५ गावांच्या जैवविविधता नोंदवह्या बनवण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. त्यात आम्ही पर्यावरण मंडळाने कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे गावावर काम केलेले.

 

हस्ताक्षरांकित अमूल्य पुस्तक भेट. 

२०११ साली डॉ. गाडगीळ समितीने पश्चिम घाट संरक्षण व संवर्धनासाठी उपाय सुचविणारा अहवाल दिला. या अहवालाला भारताच्या पर्यावरण इतिहासात खूप महत्त्व आहे. नियोजनकर्त्यांना तो अहवाल गैरसोयीचा वाटला. म्हणूनच तर आजही पर्यावरणीयदृष्ट्वा संवेदनशील गावे आणि वाड्या-वस्त्या या श्रेणीतून वगळण्यासाठी आजही प्रयत्न सुरु असतात. या साऱ्या घडामोडीत गाडगीळ सरांनी आपली भूमिका एकदाही बदलली नाही. या अहवालात सरांनी म्हटलं होतं, ‘रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही आता प्रदूषणकारी प्रकल्पांना‌ जागा नाही.’ रत्नागिरी जिल्ह्यात, इटलीमधून हद्दपार करण्यात आलेली घातक विषारी रसायनिक पदार्थ बनवणारी 'मिटेनी एस.पी.ए.' ही रासायनिक कंपनी लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक या नावाने सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवरचे सरांचे जाणे अधिक वेदनादायी आहे. सरांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते ऐकून अनेकदा अनेकांच्या भुवया उंचावायच्या. वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबतची त्यांची भूमिकाही अशीच चर्चेचा विषय झालेली. सरांची यामागची भूमिका समजून घेण्यासाठी तेव्हा आम्ही, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रतिनिधी त्यांना भेटायला गेलेलो. तेव्हा, ‘संविधानातील तरतुदीनुसार निसर्गाची चांगली व्यवस्था आणणं शक्य आहे. देशभर बागायतदारांना माकडांचा आणि शेती करणाऱ्यांना डुकरांचा त्रास होतो आहे. हिमाचल प्रदेशातही सफरचंदाच्या बागा पिकवणाऱ्या बागायतदारांना माकडांचा प्रचंड त्रास आहे. बागायतदार शेती-बागायती बंद करण्याच्या विचारापर्यंत आलेत. म्हणून वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे! जगात कोणत्याही देशात अशी बंदी नाही. नियंत्रण न ठेवल्यास वन्यप्राण्यांची संख्या वाढेल. अर्थात शिकाऱ्यांना रान मोकळं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे. सामान्य लोकांनी परंपरा जपल्यात. निसर्ग व्यवस्था पूर्वी लोकांनी सांभाळली. जिथे जिथे पर्यावरण संरक्षण आहे ते लोकांमुळे आहे. सामान्यांच्या विवेकबुद्धीला आपण मानायला हवं आहे. निसर्ग संवर्धनातून शाश्वत विकास साधताना स्थानिक लोकांना न्याय्य लाभही व्हायला हवा आहे. पैसे कमावण्याच्या हेतूने निसर्गाचा विध्वंस सुरु आहे. त्यावर निर्बंध आणायला हवा आहे. केरळातील दोन जिल्ह्यात लोकांनी जैवविविधता रजिस्टर बनवली. खाणीमुळे होणारे नुकसान लक्षात आणून दिले आणि केरळच्या हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. खाणींचे काम थांबवण्यात आले. अशी जागृती व्हायला हवी आहे. कायद्याचा तो उद्देश आहे. नाशिकमध्ये खाणीच्या कामामुळे गोदावरीच्या उगमाकडील ब्रह्मगिरी पर्वताच्या भागाचा मोठा विध्वंस सुरु होता. तो थांबवला गेला आहे. भारतीय संविधानातील चौकटींचा आधार घेऊन पर्यावरणीय जनजागृती व्हायला हवी आहे. संविधानाप्रमाणे पर्यावरण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या चांगल्या संधी आहेत.  शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरण संवर्धन कामात सहभागी व्हायला हवं आहे. जागृती कृतियुक्त असायला हवी’, अशी भूमिका सरांनी मांडली होती.

 

राळेगणसिद्धी - २०१६च्या  पर्यावरण संमेलनास
उपस्थित प्रमुख मार्गदर्शक 'पद्मभूषण' अण्णा हजारे,
पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ आणि स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे

पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणाऱ्या सरांच्या आत्मचरित्रावर आम्ही आवर्जुन लिहिले. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा विश्वास उराशी बाळगून गाडगीळ सर हयातभर वावरले. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरावा, ही निसर्गदेवतेच्या चरणी प्रार्थना. गाडगीळ सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

धीरज वाटेकर चिपळूण

  

स्व. गाडगीळ सरांचे आत्मचरित्र ‘‘सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी’’चा आम्ही लिहिलेला आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स ने प्रसिद्ध केलेला ग्रंथ परिचय - https://dheerajwatekar.blogspot.com/2024/03/blog-post_19.html

 


परखड शब्दात ‘कटूसत्य’ सांगणारे ‘निसर्गशास्त्रज्ञ’

२००८! आमच्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तकाच्या प्रकाशनाची गुढीपाडव्याची तारीख निश्चित झालेली. पुस्तक स्वरुपात पहिल्यांदाच मजकूर प्र...