सन १८३१ साली, पुणे संस्कृत महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मेजर थॉमस कँडी आणि जेम्स थॉमस मोल्जवर्थ यांनी पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश प्रकाशित केला. पुण्यातल्या सदाशिवपेठेत बोलली जाणारी भाषा ही प्रमाणभाषा म्हणून त्यावेळी पुढे आली. महाराष्ट्रात या भाषेतून सर्व व्यवहार होत असले तरीही ठिकठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात बोलीभाषा बोलली जाते, कोकणातही तिचे प्रमाण लक्षणीय आहे, आणि हे सारे आपल्या संस्कृतीचे संचित आहे. कारण भाषा आणि संस्कृती सतत हातात हात घालून नांदतात, बदलतात. कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरीलकोकण पट्ट्यात बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्र,
कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि गोवा येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी,
कर्नाटकातकानडी तर गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात. केरळातील कोकणी लोक हे मल्याळी लिपी वापरतात. कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. कोकणी ही एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणीही त्यांपैकी एक असून तिच्यातही ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे. महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोकणीही वेगळी आहे. याशिवाय मालवणी,
चित्पावनी,
वारली,
काणकोणी,
डांगी आदि अन्य बोलीभाषा या कोंकणीच्या बोली उपभाषा आहेत. तर काही बोली भाषिकदृष्टीने एकमेकींपासून इतक्या भिन्न आहेत,
की त्यांचा एकाच समूहात अंतर्भाव करणेही चुकीचे ठरते. यातील दहा बोलीभाषेतील वेगळेपणा जाणून घेण्याचा प्रयत्न या संमेलनातून झाला.
संमेलनाचा प्रकट उद्घाटन सोहळा, कालभैरव मंदिर प्रांगणात ख्यातकीर्द विधिज्ञ मा. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते, संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष आणि विविध कोकणी बोलीभाषांचे जाणकार अभ्यासक माधव भंडारी, बूकगंगा डॉट कॉम संचालक मंदार जोगळेकर (अमेरिका), नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, लोकमान्य टिळक स्मारक मंदिराचे अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष प्रकाश काणे, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. संमेलन संयोजक प्रकाश देशपांडे यांनी, अपरान्त साहित्य संमेलनाच्या माध्यमातून बोलीभाषांच्या सहकार्याने मराठी भाषा सर्वार्थाने समृद्ध करण्याचे काम केले जात आहे जात असल्याची भूमिका मांडली. उद्घाटन समारंभापूर्वी सकाळच्या सत्रात कोकणी बोलीभाषा या विषयावरील चर्चासत्र, कवीसंमेलन, कथाकथन संपन्न झाले.
खटला चालवताना बोलीभाषेचा उपयोग - उद्घाटक मा. उज्ज्वल निकम
आज लेखक, कवी, साहित्यिकांना बोलीभाषेतील शब्दांचे सामर्थ्य कळले आहे. बोलीभाषेतील संवादामुळे माणूस जाणून घेण्याची ताकद निर्माण होते. आम्ही कायद्याची माणसे आहोत, कायद्याची भाषा बोलतो. मात्र, साहित्यिकाला काळजाची भाषा कळते. वकिली हा जादूचा खेळ नाही. कायद्याने कसे जगावे ? याचा अर्थ आम्ही जगाला सांगतो. मात्र, सुंदर जगण्यासाठी कायदा लागत नसून, ते साहित्य शिकवते.सृष्टीतलावरील सर्वात मोठी निर्मिती म्हणजे माणूस ! त्याला लाभलेली वाणी आणि शब्द हे वरदान आहे. बोलीभाषा हा व्यक्त होण्याचा एक मार्ग असून त्यामुळे आपल्या मनातील विचार स्पष्टपणे प्रकाशित होतात. बोलीभाषेची शैली, त्यातील हुंकार जीवनाला वेगळा आनंद देणारा आहे. यास्तव अशा बोलीभाषांचे जतन होणे काळाची गरज आहे. आपण भाषा व बोलीभाषेविषयी शुद्ध, अशुद्ध असा गैरसमज करून बसलो आहोत. आपण “म्होरं जा” म्हटलं तर अशुद्ध मानतो आणि मात्र “म्होरक्या” हा शब्द शुद्ध मानतो. कोकणातील माणूस स्वतःला “कोकणी” म्हणवतो आणि बाहेरच्याना “घाटी”म्हणतो. या पार्श्वभूमीवर, बोलीभाषेचे संवर्धन हा विचार मनात आल्यानंतर त्यासाठी साहित्य संमेलन भरवणे महत्वपूर्ण आहे. प्रमाणभाषा शुद्ध आणि बोलीभाषा अशुद्ध असा भेदभाव अनेकदा साधला जातो. परंतु प्रमाणभाषेइतकेच बोलीभाषेला महत्त्व असून ते मराठी भाषेला राज्यातील विविध बोलीभाषांनीच मिळवून दिले आहे. वकिली क्षेत्रात काम करताना या गोष्टींचा नेहमीच बारकाइने विचार करावा लागतो. अनेकदा खटला चालवताना बोलीभाषेचा उपयोग होतो.
भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न हवेत ! – स्वागताध्यक्ष माधव भंडारी
अपरान्त म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. हा प्रदेश गोदावरीपासून सुरू होतो आणि केरळजवळ संपतो. पुराणानुसार अपरान्ताची निर्मिती भगवान परशुरामाने केली. चिपळूण ही आता संमेलन नगरी झाली असून यंदाच्या डोंबिवलीतील अखिल भारतीय संमेलनानेही चिपळूणच्या संमेलनाच्या आठवणी पुसल्या गेल्या नाहीत, असे भंडारी म्हणाले. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे जातानाही बोलीभाषेत बदल घडतो. कोकणात हा फरक प्रकर्षाने जाणवतो. भाषा बदलण्याचा वेग फार कमी असतो, भाषा स्थिर असते. बोलीभाषा बदलण्याचा वेग मात्र मोठा असतो. पूर्वी गावदेवाला गाऱ्हाणे घालताना बोलीभाषेतील विविधता जाणवत असे, आजही जाणवते. बोलीभाषेतील सवयी आणि विविधता समजून घेणे आवश्यक आहे. अशा भाषांची नोंदही आवश्यक आहे. अलीकडे मूळ मराठी भाषेलाही धक्का पोहचू लागला आहे. आपल्या मुलांना मराठीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने महिलावर्गही यास तितकाच जबाबदार आहे. ३५० वर्षांपूर्वीच्या इंग्रजीमुळे 800 वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेली आपली मराठी भाषा पुढील दीडशे वर्षे टिकवणेही कठीण बनले आहे. बोलीभाषा ही काही कोसांवर बदलत असते. तसेच ती पुढील पिढीतही बदलते. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे.
कोकणातील मुस्लीम बोली - खासदार हुसेन दलवाई
बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा अधिक समृद्ध होते. समाजाची संस्कृती रेखाटण्यासाठी बोलीभाषांचे जतन आवश्यक आहे. बोलीभाषेवर अधिक अभ्यास आणि संशोधन होण्याची आवश्यकता आहे. बोलीभाषेत अनेक लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्या. मराठी किती प्रगल्भ आहे याची संवेदना लक्ष्मण माने यांच्या कैकाडी बोलीभाषा असलेल्या ‘उपरा' कादंबरीत दिसते. आपल्याकडे महिलांनी विविध बोलीभाषा जतन करण्याचा अधिक प्रयत्न केला आहे. पूर्वी सुफी लोक बरेच समान धार्मिक कार्यक्रम करायचे. आपल्याकडील सारे पीर सुफी आहेत. समाजात आजही बोलीभाषा स्त्रिया बोलतात. मुस्लीम बोलीत ‘ड,र,ल,व,श’ हे शब्द वापरत नाहीत. कोकणी मुस्लीम पूर्वांपार नाविक होता, आजही आहे.
कादोडी-सामवेदी - इग्नेशिअस डायस वसई
वसईतील लोकांवर अनेकदा मराठीचे दडपण आले तरी त्यांनी कादोडी-सामवेदी बोलीचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला. येथील अनेक लेखकांनी कादोडी बोलीभाषेतून लिखाण केले. आजचे तरुण फेसबुकवरून कादोडीत लिखाण करुन ती समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वसई भागातील १२ गावात ही बोली आजही बोलली जाते.
कुडाळी-मालवणी बोली - प्रा. पंढरीनाथ रेडकर
कुडाळी-मालवणी बोलीला विशेष गोडवा आहे. मच्छिंद्र कांबळी, श्री. ना. पेंडसे आदींनी मालवणी बोलीला अधिक समृद्ध होण्यासाठी योगदान दिले. ‘‘आपला ठेवा झाकान आणि दुस-याचा बघा वाकान’’, ‘‘ज्येच्या मनात पाप तेका पोरा होतत आपोआप’’, ‘‘रोग रेडय़ाक आणि औषध घोडय़ाक’’ किंवा ‘‘जेचा जळता, तेका कळता’’ अशा इथल्या विविध म्हणींचा बोलीत पुरेपूर वापर आपल्याला आढळून येतो. मालवणीत विहिरीला ‘बाव किंवा बावडी’ म्हणतात,असे अनेक शब्द आहेत. या मालवणी बोलीभाषिक माणसाशी गप्पा मारणे हा विलक्षण अनुभव असतो. आपली रोखठोख मतं आपल्या बोलीत स्पष्टपणे मांडताना मालवणी माणूस आपल्याला दिसतो. विनोद, खवचटपणा, तिरकसपणा, फिरकी आदि सारेकाही असलेल्या मालवणीची गम्मत यावेळी सर्वांना अनुभवता आली.
आगरी बोली - प्रा. एल. बी. पाटील
आगरी बोलीमुळे आपल्याला आयुष्याची खोली कळली म्हणणाऱ्या पाटील यांनी, वर्तमान काळात आगरी लोकांमध्ये झालेला बदल, त्यांचे राहणीमान, शेतीकामातील गाणी, टोमणे मारण्याच्या पद्धती, पोवाडे आदि आगरी बोलीत सादर करीत चर्चासत्रात रंगत आणली. बोलीभाषेतील गीतांतून कोणताही विषय सहज मनाला भिडतो.
कातकरी बोली - किर्ती हिलम
कातकरी समाज ही आपल्या समाजाचा घटक आहे. उद्याचा विचार करण्याची मानसिकता नसल्याने त्यांचे आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे मोठे नुकसान होत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. जंगलात राहून सतत भटकणाऱ्या कातकरी समाजाचे चित्र हिलम यांनी सर्वांसमोर उभे केले. हा समाज संरक्षणासाठी जंगलात राहायचा. तिरंदाजी आणि नेमबाजीत यांचे प्राबल्य असल्याने यांना पूर्वीपासून बागेत कामाला ठेवले जाई. अस्वच्छ असल्याने यांना वानर प्राणीही घाबरतात, निसर्गालाच हा समाज देव मानतो. पूर्वीच्या समाजात पान-सुपारी खाण्याचे प्रमाण खूप होते. यासाठी लागणारा कात निर्माण करण्याची भट्टीतील कष्टप्रद प्रक्रिया लीलया पार पाडणारा तो ‘कातकरी’. आजही हा समाज भित्रा आहे. तो पोटाची भूक भागविण्यासाठी दारूकडे वळला. समारंभात आजही पुरुष दारू आणि स्त्रिया मादी पितात. लग्न आणि बारसे हे या समाजातील मोठे सण असून यावेळी केल्या जाणाऱ्या ‘बांगडी’ नाचातील गीते यावेळी सादर करण्यात आली.
मालवणी बोली - प्रा. पंढरीनाथ रेडकर
मालवणी ही दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. सुप्रसिद्ध दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. कै. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जगभर प्रसिद्धी पावली. झिल (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा) आदि भरपूर बोली शब्द सामर्थ्य मालवणी बोलीत आहे.
गोव्याच्या गझलकार राधा भावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोलीभाषा कवीसंमेलनात सेलिब्स डिसुझा, राजेंद्र बर्वे, रंजना केणी, दादा मडकईकर, अरुण इंगवले,महंमद झारे, सुनील कदम, कैसर देसाई, प्रा. एल. बी. पाटील, प्रा. पंढरीनाथ रेडकर, मिलिंद डिसुझा यांनी विविध बोलीत कविता सादर केल्या, सूत्रसंचालन प्रा. कैलास गांधी यांनी केले. तर प्रा. पंढरीनाथ रेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथनात राजेंद्र बर्वे यांनी चित्पावनी बोलीत, सॅबी परेरा यांनी सामवेदी बोलीत,संतोष गोणबरे यांनी तिल्लोरी बोलीत, मनाली बावधनकर यांनी खारवीबोलीत कथा सदर केल्या. सूत्रसंचालन प्रसिद्ध कथालेखक श्रीराम दुर्गे यांनी केले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी बोलीभाषांवर चर्चासत्र संपन्न झाले.
चित्पावनी बोली - प्रा. विनय बापट गोवा
चित्पावनी ही चिपळूणातील बोली आहे, आज ती इथे कमी बोलली जाते. परंतु चित्पावनी ब्राम्हण येथून जिथे जिथे गेले तिथे ही भाषा गेली, तशी ती कोकणात, सिंधुदुर्गात, गोव्यात, उत्तर कर्नाटकात (उडपी कारवार) दरम्यान पसरली. चिपळूण प्रमुख घटक असलेली प्राचीन मराठीशी जवळीक साधणारी भाषा आहे. पुराणातील भगवान परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले या कथेचा संदर्भ या समाजाला आहे. या समाजाचा बोलीनुरूप आज शोध घेणे म्हणजे विहिरीत सुई शोधण्यासारखे आहे. ही भाषा टिकवून ठेवणे आपल्याच हाती आहे. या बोलीत गोव्यातील कोकणी, प्रमाणमराठीतील शब्द आहेत. जात-स्वभावाशी निगडीत ही बोली आहे. प्राची ण मराठी भाषा आणि आपल्या बोलीभाषा यांत साम्य आहे. सांस्कृतिकदृष्ट्या विचार करता गोवा कोकणपासून वेगळा करता येणार नाही, असे आग्रही प्रतिपादन बापट यांनी केले.
दालदी बोली - डॉ. निधी पटवर्धन रत्नागिरी
दादली अथवा दाल्दी ही मुस्लीम समाजातील एक जात आहे. इ.स. ७-८ व्या शतकात जे अरब लोक भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थायिक झाले, त्यांचे हे वंशज शाफी पंथाचे “सुन्नी” मुस्लीम आहेत. या समाजात रत्नागिरी शहराच्या खाडीपट्ट्यात (मिरकरवाडा, भाटकरवाडा, राजीवडा, कर्ला ते सोमेश्वर, भाट्ये, जुना फणसोप, गोळप, पावस, पूर्णगड, गावखडी) दालदी बोली बोलली जाते. हे लोक मात्र या बोलीला“कोकणी बोली” म्हणून संबोधतात. मराठी, उर्दू, हिंदी, कोकणी, अरबी-फार्सी या भाषांतील शब्द मिश्रणाने ही बोली बनलेली आहे. लहान वा तरुण मुला-मुलींना हाक मारताना ‘याव’, समवयस्क स्त्रीयांना ‘गे’, ‘गो’, वयाने-मानाने मोठ्या व्यक्तीस ‘ओ’ अशी संबोधणे वापरतात. एखाद्याची प्रसंशा करताना ‘लय चुकट’ हा विशेष शब्द वापरतात. प्रमाण मराठीत आपण ‘छे छे’ असे बोलतो तर यासाठी दालदीत ‘श्या श्या’ म्हणतात. निश्चय करणे-कानाला खरो लावणे, गावभर फिरत राहाणे-गाव पालवने, खूप बडबड करणे-चामारयाचा तोंड असने, मस्ती करणे-ताल करत रवने, फुटके नशीब असणे-नशीबाची हाडा होणे, उर्मटपणा करणे-टकल्यावर चरने, काहीही काम नसणे-मासक्या मारत रवने असे शब्द प्रयोग केले जातात. आपल्या फायद्याच्यावेळी बरोबर हजर असणे यासाठी ‘काय नाय खबर, वाटनीला बराबर’ किंवा वाजवीपेक्षा खर्च जास्त करणे या करिता ‘खातय दानो करतंय उदानो’ असे दालदी भाषेत बोलतात. थोडेबहुत सानुनासिक उच्च्चारही बोलतात. हिकरे (इकडे), झार (झाड), वाटानो, कानपो, चिमचो, टिपको आदि. आश्चर्य म्हणजे रत्नागिरी शहरातच राजिवडा आणि कर्ला या जेमतेम कोसभर अंतरात याच बोलीतील काही शब्द ‘करुचा-केरूचा’, ‘खालू-खलय’ असे बदलतात.
तिल्लोरी संगमेश्वरी बोली - अरुण इंगवले
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधक बोलीभाषा म्हणून 'संगमेश्वरी बोली'चा उल्लेख केला जातो. या बोलीभाषेचा वापर कोकणचा सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमनखेळे आणि जाखडी नृत्यात पूर्णतः केलेला आहे. ‘गावंडी’बोली असे हिणकस बोलले गेल्याने या बोलीचे प्रचंड नुकसान झाले. परंतु इंगवले यांनी या बोलीतील सुमारे ७ हजार शब्दांचे संकलन करून या भाषेची ताकद अभ्यासकांसमोर आणली. या बोलीचा उद्भव हा द्रविडीयन आहे, या बोलीवर संस्कृत प्रभाव नसावा. ही बोली म्हणजे कुणबी समाजाचा जमिनीखाली दडविलेला खजिनाच आहे. तो पुढे यायला हवा. आज इंग्रजीतील शब्द या बोलीत समाविष्ट जाले आहेत, ते सहजरीत्या बोलले जातात. जुन्या पिढीला शब्द माहित असून ते सांगितले जात नाहीत. ही बोली बोलताना एखाद्याच्या आदर सन्मान करताना ‘नु’ प्रत्यय जोडला जातो, उदा. तात्यानु, दादानु. कोड्यात बोलणे हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्याच्या प्रश्नाला प्रति प्रश्नाने उत्तर देणे ही या बोलीची खासियत होय. याची काही नमुनेदार उदाहरणे यावेळी सदर करण्यात आली.
खारवी बोली - प्रा. मनाली बावधनकर
खारवी ही कोळी समाजातील एक पोटजात आहे. हा समाज फारसा पुढारलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावरील २६ गावांत ही बोली बोलली जाते. सतत गुहागरनजिक असगोली गावात ७० टक्के समाज आहे. आजच्या पिढीत भाषा बोलण्यात भयगंड आहे. ‘मासळीबाजार भरलाय’ यातील मतितार्थ आपल्याला या समाजाच्या मासळी विक्री भागात गेल्यावर कळतो. आजही हा समाज जेवणासाठी मातीच्या भांड्याचा वापर करतो. यांचे पुरुष बराचसा वेळ बोटीत असल्याने फारसा सामाजिक संबंध नाही, स्त्रियांचा सामाजिक संबंध मासेविक्रीच्या माध्यमातून भरपूर आहे. बोलीतील बोलण्यात माधुर्य आणि गोडवा असलेल्या या बोलीत मोठ्या प्रमाणात म्हणींचा वापर केला जातो. प्रमाण भाषेचा जराही सूर हा समाज आपल्या बोलीत मिसळताना दिसत नाही. गोव्यात खारवी क्षत्रिय मराठा म्हणून यास ओळखले जाते.
वारली बोली – हरेश्वर वनगा
४७ अनुसूचित जातीतील वारली ही एक जात आहे. त्यांची बोली ती ‘वारली बोली’ होय. आजही हा समाज वनात राहतो. दगडाला ‘धोंड’ तसेच पोयरा-पोयरी, बाबाला ‘बाप्पा’, विळ्याला ‘कोयती’ असे म्हणणारा हा समाज आहे. या समाजात पुरुषांऐवजी आजही स्त्रिया लग्न लावतात, प्रसंगी विधवा स्त्रिया चालतात. असे सांगून वनगा यांनी व्यासपीठावरून सर्वांसमोर वारली मंगलाष्टक म्हटले, ज्यातून सर्वानाच त्या बोलीचा गोडवा जाणता आला. समाजाची तीर्थस्थाने आजही भूयारे आणि वनस्पतीत सापडतात. हिमादेव, भीमदेव अशी यांच्या देवतांची नावे होत. हा समाज आजही अंधश्रद्ध आहे. शिक्षित अधिकाऱ्यांना घाबरून हा समाज आजही लांब पळतो. अडीच हजाराहून अधिक शब्द या बोलीच्या आज संग्रही आहेत. बोलीतील पूर्वीचा गोडवा आज नाही या स्पष्टीकरणार्थ त्यांनी दोन पिढ्या पूर्व आणि वर्तमानात एकच गीत गाऊन दाखविले. पूर्वी हेल काढून बोलली जाणारी वारली बोली आज कालौघात एका पट्टीत बोलली जात आहे.
या चर्चासत्रानंतर ऋजुता खरे यांच्या संकल्पनेतून गो. नि. दांडेकर जन्मशताब्दी वर्ष२०१६विशेष ‘साहित्य अभिवाचन कार्यक्रम’ संपन्न झाला. गोनिदांच्या लेखणीतून साकारलेल्या रानभुलीतील ‘मनी’, जैत रे जैत मधील ‘नाग्या आणि चिंधी’, माचीवरचा बुधा, शितू आणि मृण्मयी आदि विविध कादंबऱ्यामधून रेखाटलेल्या विविध मानवी व्यक्तिरेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. कोकणातील बोलीभाषांचा बाज पकडणाऱ्या या कादंबऱ्यांच्या वाचनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिवाचनात श्रीकांत कानिटकर, स्नेहल जोशी, संगिता जोशी, श्रीकांत करमरकर, अंजली बर्वे, सुमंत केळकर यांनी सहभाग घेतला. संमेलनाचा समारोप प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.
वाड्मयीन संस्कृतीची जोपासना गरजेची : संमेलनाध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी
पूर्वीच्या संस्कारांच्या वातावरणावर आज मॉल, मुव्ही, मोबाईल संस्कृतीने आक्रमण केले आहे. आपल्या सभोवताली काय चालले आहे ते समजून घेण्यासाठी इतरांचे साहित्य वाचेले पाहिजे. परंपरा समजून घेतल्या जायला हव्यात. चिंतन करायला हवे. यातून लोकांच्या मनात भाषाविषयक आकर्षण निर्माण होऊन वाड्मयीन संस्कृतीची जोपासना होईल. या सम्मेलनांसारख्या छोट्या-छोट्या संमेलनांना राज्यभर राजाश्रय मिळाला तर नव्या पिढीत शब्दांचे आकर्षण निर्माण होईल. साहित्य ही शब्दांची आतषबाजी नसून ती मानवी जीवनाची उपासना आहे. प्रतिभेच्या नव्या कवडश्यांना व्यासपीठ देण्याचे काम चिपळूणात होत आहे. दर्दी रसिकही चिपळूणात आहे. प्रस्थापितांना शेंदूर लावण्याच्या दुनियेत, नवीन कसदार निर्माण होत नाही ही ओरड चुकीची असून माणस घडविण्यासाठी नव्या जुन्याचा संगम घडायला हवा. समाजासाठी आणि साहित्यासाठी वेळ दिला तरच सर्जनशील कामे घडतात. पूर्वी कुटुंबातला एकतरी माणूस वाचनालयाचा सदस्य असायचा, घराघरात वाड्मयीन संवाद साधला जायचा, आज परिस्थिती बदलली आहे. शालेय मुलांची जीवनशैली इतकी व्यग्र बनवून टाकली आहे की त्यांना अवांतर वेळच मिळत नाही. माध्यमांनीही समाजाला जे हवय ते देण सुरु केल्याने, कृत्रिमता वाढली आहे. तंत्रज्ञानाचा वेग वाढला तरी सर्जनशीलता-नवनिर्मिती यातून घडत नाही, त्यासाठी अनुभवाचे विश्व व्यापक असावे लागते. आपण ज्या ठिकाण-कालखंडातील लेखन करतो आहोत, तेथील जुने संदर्भ नव्याने तपासायला हवेत तरच कसदार लेखन शक्य आहे. दुभंगलेली मन आणि विस्कटलेली नाती सांधण्याचे काम साहित्य करू शकेल, त्यासाठी भाषा पोटातून यायला हवी. आज आपल्याकडे माहितीपर साहित्याचे वाचन वाढले आहे. वृत्तपत्रांतून पुस्तक परिचय लिहिणाऱ्यांना आज समीक्षक मानले जाते आहे. हे कुठेतरी थांबवायला हवे, यातून समीक्षेचेच नुकसान होते आहे, असे जोशी म्हणाले. सर्वोत्कृष्ट समिक्षाणासाठीचा ‘लोटिस्मा’चा यावर्षीचा पुरस्कार यावेळी अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या हस्ते प्रा. मिलिंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. ‘लोटिस्मा’चे उपाध्यक्ष प्रकाश काणे यांनी यावेळी पुढील वर्षी कृतज्ञता संमेलन घेण्याचे जाहीर केले.
मध्यंतरी पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियातर्फे (पीएलएसआय) भाषा सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पातून हाती आलेल्या निष्कर्षांवर आधारित भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण हा डॉ. गणेश देवी संपादित खंड २०१३ मध्ये प्रकाशित झाला. यात बोलीऐवजी “रूपे” हा शब्द जाणीवपूर्वक वापरला गेला. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण करताना महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ भाषा आणि बोलीभाषा बोलल्या जातात,असं या पाहणीत आढळलं. आपल्या कोकणातील फक्त एका गावात तर “नोलिंग”नावाची भाषा बोलली जाते, हे सत्य याच सर्वेक्षणाने पुढे आणले. जगातील बोली-भाषावैभवाने समृद्ध असलेल्यांत, ७८० बोली-भाषांसह आपण अग्रणी आहोत. परंतु तरीही आपल्याकडील बोलीभाषा झपाटय़ाने नष्ट होत आहेत, हे वास्तवही यातूनच पुढे आलेलं आहे. वास्तविक पाहाता बोलीभाषेतील ग्रामीणपणा मराठी भाषेची प्रतिष्ठा, प्रमाण आणि ताकद वाढवितो. हा सारा पसारा हे आपले खरेखुरे वैभव आहे. त्याच्या संवर्धनासाठी प्रमाण भाषा बोलणाऱ्या कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत, चिपळूणात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने यशस्वी केलेल्या अपरान्त साहित्य संमेलनाने बोलीभाषांच्या संवर्धनाला बळ प्राप्त झाले हे नक्की !
धीरज वाटेकर
http://www.konkanalerts.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8/