मंगळवार, १४ मे, २०१९

उमाळा : मातीशी असलेल्या नात्याचा !

कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या फुललेल्या जाणीवांसहच्या विचार-कृतीतून अनेकजण एकत्र येतात. एकत्र आलेली माणसं लाल मातीच्या ओढीनं जोडली जातात. एक साखळी तयार होते. मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी, त्या नात्याचं ऋण फेडण्यासाठी अशी माणसं सतत आयुष्यभर कार्यरत राहतात. चाकरमान्यांनी पाहिलेलं गाव विकासाचं स्वप्नंही अशातूनच साकार होत जातं. डोळस नजरेनं पाहिलं तर मातीशी असलेलं हे असं नातं सांगणाऱ्या अनेक कहाण्या कोकणातल्या गावागावात सतत घडत असतात. या साऱ्यामागे इथल्या मातीशी असलेला हृदयस्थ आंतरिक उमाळा दडलेला सापडतो. त्या उमाळ्याचा घेतलेला हा धांडोळा !

बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. पण मातीची नाळ पिढ्यांशी जुळलेली असते. म्हणूनच मातीला / जमिनीला आई म्हणत असावेत. तिच्या दर्शनाचा सोहोळा सर्वांगसोहळा ठरतो. ताठ कण्याचा आणि निधडय़ा छातीचा बापाच्या जागी असलेला सहय़ाद्रीसारखा पाठीराखा, तांबडय़ा मातीत खेळ मांडून एकमेकांच्या गळाभेटीसाठी आसुसलेली, फळांफुलांनी युक्त वृक्षसंपदा, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारी रंगीबेरंगी पाखरं, वन्यजीव, निसर्ग नवलांची दुनिया, इथलं अध्यात्म आणि माणसांची जडणघडण या साऱ्यातूनच झालेली आहे. हा माणूस शतकभरापूर्वी पोटापाण्यासाठी मोठाल्या शहरात जाऊ लागला. मनिऑर्डरवर जगणारा प्रांत अशी कोकणची ओळख खरंतर तेव्हापासूनची ! या चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. गावागावातल्या जत्रा, मे महिन्याची सुट्टी, शिमगा-गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी पिढ्यानपिढ्या कोकणात येत असतात. नोकरीत वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा कोकणात जाण्यासाठी राखून ठेवणारी पिढी आजही कार्यरत आहे. हा या मातीचाच गुण म्हणावयास हवा !

गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण. एकवेळ वर्षभर नाही जमलं तरी चालेलं पण गणपतीत कोकण कमिंग मस्टच ! कोकणात गणपतीची शाळाअसते. मुंबईत कारखाना तर पुण्यात चित्रशाळाअसते. गणपतीला घरी येणाऱ्या चाकरमान्याचे सामान म्हणजे ऐश्वर्य ! काय-काय असतं त्याच्यात ! जणू सगळा संसारच सोबतीला आणलेला असतो. कोकणातील माणसांची श्रद्धाही जाज्ज्वल्य आहे. इथल्या ग्रामदेवतांचे लोकजीवनाशी असलेलं नातं भक्तीशी मर्यादित नाही. इथली दैवतं लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलेली आहेत. ही देवस्थाने आजही सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसंग्रहाची केंद्रे आहेत. देवाला गाऱ्हाण घालणं, वर्षातून एकदा किमान शिमग्याला देवतेची ओटी भरणं, गावरहाटीचे नियम पाळणं सारं विलक्षण आहे. इथली दैवते माणसांशी बोलतात, संवादही साधतात ! संवादाची प्रक्रिया सुशिक्षित माणसांना धर्मभोळेपणाची, अंधश्रद्धेची वाटत असेलही ! पण गावात उभे आयुष्य घालविलेल्या माणसांना त्याच्या खडतर दैनंदिन जीवनात प्रसंगी संवादाची हीच प्रक्रिया आधार देणारी वाटते. हे एकविसाव्या शतकातील वास्तव आहे. इथल्या मातीशी दूरदेशीच्या माणसाचं जे नातं आजही टिकून आहे, त्यामागे ही सुद्धा काही कारणे आहेत. गूढरम्य गोष्टींचे भांडार असलेला कोकण भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भूतही संकल्पना खरी की खोटी ? हा वेगळा विषय आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा इथल्या मातीवर पगडा आहे, हे नक्की ! जगातील पुढारलेल्या अनेक देशांच्या प्राचीन दंतकथात डोकावल्यावरही आपल्याला हेच जाणवते.

पावसाळ्यातल्या कोकणाचं आमच्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळ स्थान आहे. कोकणातला पाऊस आजतागायत आम्ही तरी शांतपणे आलेला पाहिला नाही. ढगांच्या प्रचंड आवाजात गर्जना करीत तो येतो. तेव्हाचा गंधवती पृथ्वीचा नाकात शिरणारा सुगंध ‘मातीशी आपलं नातं’ सांगतो. हा सुगंध कोकणी कर्तृत्वाला मातीचं ऋण फेडण्यासाठी तेव्हाही उद्युक्त करायचा, आजही करतोय. वचन दिल्याप्रमाणे येणाऱ्या या पावसाच्या तयारीसाठी अवघ्या कोकणची लगबग चालू असते. पावसात कुठं पाणी गळू नये म्हणून घरावरची कौलं परतणं, पत्रे सरळ करणं, अंगणातला माटव (छत) काढून ठेवणं, नित्य चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं शाकारलेल्या पडवीत आणणं अशी बरीचं कामं याकाळात सुरु असतात. कोकणी माणसाच्या पायांना ह्या दिवसात थारा नसतो. अर्थात तसा तो पूर्वीही नसायचा. नशीबानं, जन्मानं आणि कर्मानं आम्ही कोकणातील आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत. शालेय सहलींचे क्वचित प्रसंग वगळले तर बारावी होईतोपर्यंत या जिल्ह्याच्या बाहेर आमचं पाऊल पडल्याचंही आम्हांला स्मरत नाही. दापोली तालुक्यातलं केळशी आमचं मूळ गाव ! जन्म आमचा तळवडे-लांज्याचा ! लहानपणापासूनचं वास्तव्य चिपळूणात ! अगदी काल-परवापर्यंतचं आमचं सुट्टीतलं बालपण मातीच्याचं घरात गेलंय. कोकण आमच्याही जगण्याचा भाग आहे. बालपणी शाळेच्या सुट्टीच्या दिवसात उन्हाळी सुट्टीत आजोळी तर दिवाळीत मूळगावी आमचा मुक्काम ठरलेला. त्या लहानपणी या सुट्टीत आमच्याही पायांना अजिबात थारा नसायचा. आमचा संबंध कामाशी कमी नि भटकण्याशी जास्त असायचा. अशातच कधीतरी आभाळ आवाजू लागायचं. खेळून सुटी झालेली पायाखालची लाल माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. झाडं हलायची. सारं आभाळ पाखरांचं व्हायचं. भर दिवसा काळोख दाटून आल्यावर जाम मज्जा यायची. तेव्हा लाईट नव्हती. काळोख दाटून आला की आजी / काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे घरभर लावायची. कळकट्ट लोखंडी नळीने चूल फुंकायची. होणारा आवाज आम्हाला प्रचंड आवडायचा. चुलीवरचा गरम कोरा (बिना दुधाचा) चहा, यथेच्छ बरसणारा पाऊस, रातकिड्यांचे आवाज, जवळच्या पाणवठयावर, नळाजवळ येणारे बेडकांचे आवाज, रात्रीच्या जेवणानंतर रॉकेलच्या दिव्याजवळ बसून रंगणाऱ्या गप्पा, मारताना कमालीचं सुरक्षित वाटायचं आयुष्य ! किती वर्णावा या मातीतल्या आठवणींचा तो महिमा ?

भगवान श्रीपरशुरामानं समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली. यावर आमची श्रद्धा आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर झालेल्या संशोधनाद्वारे या भागात बऱ्याच ठिकाणी पूर्वी समुद्र खूप आतपर्यंत होता आणि पुढे तो मागे हटला याचे अनेक भूपुरातत्त्वीय पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. भडोच (भृगुकच्छ), नालासोपारा (शूर्पारक) येथील समुद्रकिनाऱ्यांबाबतची संशोधने हेच सांगत आहेत. गेली सतत १५/१८ वर्षे आम्ही या मातीत पनवेल ते पणजी भटकतो आहोत. आज एका दमात अख्ख कोकण फिरताना प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या अनेक जुन्या खुणा हरवत जाताना पाहातो आहोत. मागच्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणातल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत आलाय ! जुन्या कौलारू देवळांच्या जागी भव्य मंदिर उभी राहिलीत. बाकी सारं ठीक मानलं तरी आधुनिक जीर्णोद्धार आमच्यासारख्या इतिहास, पर्यटन, प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासकाला पटणारा नाही. कोकणातल्या लालमातीतील वास्तुसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्ही ती मोडीत काढू पाहतो आहोत. इथल्या आरोग्याला पूरक असणारे तांदूळ, उडीद, नाचणी, कुळीथ, शेवग्याच्या शेंगा, जांभूळ, भोपळा, काकडी, करांदे आज गायब होत आहेत. कोकणची भौतिक प्रगती, भौगोलिक विविधता आणि इथली संस्कृती ह्याची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आम्हां कोकणवासियांसमोर आहे.

कोकण बदलतंय. माणसं बदललीत. मागच्या पिढीने अनुभवलेलं कोकणपुढच्या पिढीला बघायला मिळेल का ? प्रश्न आहे. कौलारू घर, घराबाहेरची पडवी, झोपाळा, पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपा मारलेल्या खिडक्या, छानसं माजघर, जातं, सारवलेली चूल, स्वच्छ अंगण, तुळस, तुळशीतला दिवा, गुरांचा गोठा, साठवून ठेवलेलं गवत, वासरू, कौलारू देऊळ, देवळातला गुरव, मानाचे दगड, देवळातले देव... महापुरुष, वाघजाई, सोळजाई, महाकाली, व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर, नाटेश्वर, देवाची राई (देवराई), वेशीवर दिला जाणारा नारळ, शिमग्यातली सोंगं, ढोल-ताशा, निशाण, ग्रामदेवतेच्या पालख्या, घराघरातला देवचार, वाडवडिलांच्या पुण्याईची जाणीव, मोहरत जाणारा आंबा, फणस, आंब्याची साठं, माडा-पोफळीची झाडं, बकुळी, करवंदाची जाळी, कण्हेरी, इथला मांसाहार... सरंगा, पापलेट, सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी, चुलीवर भाजलेला बांगडा, भाकरी, मिरचीचा ठेचा, उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठला, फणसा-केळफुलाची भाजी, मऊ गुरगुरीत भात, कैरी घातलेली डाळ, घावणे, उसळी, मुसळधार पाऊस, नदीला येणारे पूर, पुलाखालून वाहणारा व्हाळ, गणपती बाप्पा, त्याची मंडपी, गावरान सजावट, मोदक, रात्रीच्या डबलबाऱ्या, दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या, कंदिल, इथली होळी, होळीतल्या बोंबा, ग्रामदेवतांच्या जत्रा, लोककला, समुद्रातून हाती लागलेली रापण, तिला ओढणारे तांडेल, बघ्यांचा गलका असं सारं बरचं काही उद्याच्या पिढीला पाहायला मिळावं यासाठी कोकणातील काही माणसं आजही जीव तोडून धडपडतायतं. सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर अग्रेसरहोऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. उद्याच्या कोकणात मुंबई ते गोवा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग, रो-रो ट्रेन सर्व्हिस, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेसेवा, वेंगुर्ल्याच्याजवळचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, चिपी येथील विमानतळ, सागरी महामार्ग यांमुळे परकीय आणि भारतीय पर्यटकांच्या नजरा गोव्यावरून कोकणाकडे वळताहेत. हे सारं कोकणचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.

बड्या शहरांच्या बजबजपुरीत जगणारा माणूस आपल्या हिरव्यागार कोकणात आला की परत जाईपर्यंत कोकण डोळ्यांत साठवून घेत असतो. परतताना त्याच्या गाडीत, खांद्यावरल्या पिशवीत सारं कोकण भरलेलं असतं. बसस्टँडवर, स्टेशनवर जेव्हा तो घरच्यांच्या हातात आपला निरोपाचा आणि प्रेमाचा हात ठेवतो तेव्हाचं दृश्य तर खास ठेवणीतलं असतं. खिडकीतून बाहेर काढलेल्या हातातून एकमेकांची बोट जेव्हा सुटतात तेव्हा ती इथल्या मातीशी असलेल्या नात्यांची खरी जाणीव करून देतात. बदलत्या कोकणात त्याचं प्रमाण आज कमी झालं असेलही ! पण जाणीवांचा ओलावा कायम आहे. स्वतःला कोकणी म्हणवणाऱ्या, या मातीशी आपलं नातं सांगणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या, या मातीचं ऋण मानणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीशी असलेल्या आंतरिक उमाळ्यापोटी या जाणीवा जपायलाच हव्यात. 
 
धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५,
जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८         
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  
ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)










सोमवार, १३ मे, २०१९

मराठी कथा सृष्टीतला नवा प्रयोग : माकडहाड डॉट कॉम


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष, नाटककार, कवी प्रा. संतोष गोनबरे यांचा सुपरिचित प्राणीकथांच उपहासगर्भ पुनर्कथन, जुन्या कथांचा काळानुसार अन्वयार्थ असलेला माकडहाड डॉट कॉम हा कथासंग्रह नुकताच पुण्याच्या संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला आहे. आपल्या संस्कृत वाड्मयातील विष्णूशर्मांचे पंचतंत्र, पाश्चात्य इसापच्या नीतिकथा, महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींच्या दृष्टांतकथा आदि माध्यमातून लेखनात प्राणीसृष्टीचा वावर झालेला आहेच ! गोनबरे यांनी कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये हा प्राणीसृष्टीचा वावर आणला आहे. मराठी कथा क्षेत्रातला आजवर न हाताळला गेलेला हा नवा प्रयोग आहे.

चिपळूणचे नामवंत कवी अरुण इंगवले यांची समर्पक प्रदीर्घ प्रस्तावना हे पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांनी केलेली ‘अवस्थ माकडहाडाची चिकित्सा’ वाचताना त्यांनीही हा कथासंग्रह जवळपास लेखकाइतकाच अभ्यासल्याचे जाणवते. निसर्ग नियमांची संविधानिक जबाबदारी निष्ठेने पाळणाऱ्या प्राण्यांच्या प्रवृत्तीशी मानवी दुर्गुणांना तोलणे ही फारमोठी विसंगती आहे, असे इंगवले यांनी म्हटले आहे. यातल्या साऱ्या कथा वरकरणी वेषांतर केलेल्या वाटतात. चिकित्सकपणे वाचल्या तर बोधकथा किंवा नीतिकथा वाटतात. आणि त्यात खोल डुबकी मारली तर अचंबित करणारे मतितार्थ गवसतात. हे प्रस्तावनाकारांचे विधान कथासंग्रह वाचताना वारंवार आठवत राहते.

संग्रहातील साऱ्या कथा मॉडर्न इसापनीती सांगतात. पूर्वी कधीतरी गावातील प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात लेखकाने कोल्हा, लांडगा, माकड यांचा एक संवाद लिहिला होता. पण माकड व्हायला कोणीच तयार नसल्याने तो प्रयोग झाला नाही. लेखकाला इसाप पहिल्यांदा भेटला तो तेव्हाच ! पुढे मग अनेकदा भेटत राहिला. संग्रहातील ‘म्हातारी आणि वाघ’ या पहिल्याच कथेतील ‘भोपळा सुकला तर ? म्हातारीचे काय होईल ?’ हा आणि असे अनेक प्रश्न लेखकाला पडू लागले नि त्याची उत्तरे शोधताना या कथांची निर्मिती झाली. आर. के. नारायण यांनी आपल्या लेखनातून ‘मालगुडी’ नावाचं गावं निर्माण केलं. तसाच प्रयत्न गोनबरे यांनी ‘भोचकवन’ नावाने जंगलं उभारून केला आहे. समकालीन प्रश्नांना भिडून वाचकांना खडबडून जागं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कथा आहेत. प्रमाणभाषा आणि बोलीभाषेचा वापर, सामन्यांच्या तोंडच्या शब्दांचा खुबीने वापर असल्याने यातलं कथानक अधिक जवळचं वाटतं. मानवी जीवनात घडते, ते प्राणी सृष्टीत घडले तर काय होईल ? अशा विचारातून लिहिलेल्या या कथा आहेत. वरवर हलक्याफुलक्या वाटणाऱ्या या साऱ्या कथा आशयघन असून अत्यंत संवेदनशील विषयांना लेखकाने वाचा फोडलेली जाणवते. ‘जिंकणारा जिंकत राहतो, हरणारा हरत राहतो. जिंकण्याची वृत्ती शारिरिक न होता मानसिक झाली की हरणाराही उरफुटेस्तोवर जिंकण्यासाठी धावत सुटतो. हरणं ही सवय असेल तर जिंकणं हे व्यसन आहे. दोन्हीही बदलता येत नाहीत.’ असे अनेक जबरदस्त पंच कथानकात भेटत राहतात.

म्हातारी आणि वाघ’ कथेत म्हातारीच नाव सांगायचं राहून गेलं म्हणत लोकशाहीचा केलेला उल्लेख विदारक वास्तव पुढे आणते. पुढारलेल्या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारा वाघ, मागासलेल्या समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारी म्हातारी ! इतर पांढरपेशे जीवन जगणारे प्राणी, कथेतील इंग्रजी आणि ग्रामीण शब्दांची उधळण छान जमलेली आहे. चोरून खीर खाणाऱ्या मांजराची ‘बुडबुड घागरी’ कथा न्यायदानाच्या परिभाषेत वाचताना आजचे वास्तव नजरेखालून जात असल्याचे जाणवते. इतिहासात आठशे वर्षांपूर्वी ‘काऊचे घर शेणाचे, चिऊचे घर मेणाचे’ ही कथा चक्रधरस्वामींनी सांगितली आहेच. इथे ‘चिऊ-काऊ’ कथेत लबाड कावळ्याची भूमिका ज्या व्याकुळतेने मांडली आहे ते पाहाता मूळ कथेचा भाव पूर्णपणे बदलला आहे. माकडाचा अप्रतिम शोधप्रवास असलेल्या पाचर कथेत परखड भाष्य करून शिक्षण व्यवस्थेचा उपरोधिक समाचार घेण्यात आला आहे. ‘वेबसाईटवर शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण सोडून सर्वकाही माहिती मिळाली.’ हे वाक्य विचार करायला प्रवृत्त करते. लेखकाचे लेखन सामर्थ्य दाखविणारी कमी शब्दातील ‘श्रेष्ठ’ ही रंगतदार कथा सर्वार्थाने विचार करायला लावणारी आहे. जातीभेदाचे वास्तव मांडणारी ‘बोकड आणि लांडगा’ कथा, दैनिक बाताबाती... बातमी खरी तोंडाला येईल ती ! ही मुळातून वाचण्यासारखी कथा आहे. लेखकाने कथासंग्रहात उभारलेल्या भोचकवनातील साऱ्या कथांमागे नितांत करुणा दडलेली आहे.

माकडहाड हा प्राणी आणि माणूस यांच्या उत्क्रांतीमधला फरक आहे. ‘कॉक्सिक्स’ नावाचे हे टोकदार हाड वाढले तर शेपूट होते. खुरटले तर टोचत राहते. म्हणूनच प्राणी स्वभावाने सच्छिल वावरतात. तर माणसं स्वभावाने एकमेकांना टोचत राहतात. काहीश्या वेगळ्या शैलीचा, व्यवस्थेला आव्हान देऊ पाहाणारा हा कथासंग्रह आहे. माणसं व्यवस्थेची गुलाम झालेली असताना लेखक पक्ष घेऊन लिहीत नाही. बोलीभाषेचा समर्पक उपयोग लेखकाने केला आहे. पुस्तक कुठल्याही पानावरून वाचायला सुरुवात केली तरीही छान वाटतं. अचूक शब्दांची केलेली निवड हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य ! माणसाचा उत्क्रांतीच्या विरुद्ध दिशेने चाललेल्या दिशाहीन प्रवासाचे वर्णन असलेला हा वाचनीय कथासंग्रह आहे.

पुस्तकाचे नाव : माकडहाड डॉट कॉम (कथासंग्रह)
पृष्ठ संख्या : १७६, मूल्य : २०० रुपये
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे 
फोन : ०२२ / २४४९७३४३


पुस्तक परीक्षण : धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८ 

गुरुवार, २ मे, २०१९

सफर वाशिष्ठी बॅकवॉटरची !


मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे ? रम्य खाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये वाशिष्ठी बॅकवॉटरहा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ग्लोबल चिपळूण पर्यटनया चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नाने आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.

      आपल्या देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. क्रोकोडाईल सफारीचा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. मगरचिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी ग्लोबल चिपळूण टुरिझमसंस्थेच्या माध्यमातून क्रोकोडाईल सफारीउपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. अगदी ८-१० फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतील नैसर्गिक वातावरणात पाहाता येते. मायबाप शासनाने, चेन्नईप्रमाणे येथेही क्रोकोडाईल पार्कची शक्यता तपासण्याची तसेच या मगरींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी या चिपळूण पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचे काम करत आहेत हे नक्की ! वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाईल टुरिझमचा आनंद मिळण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. सन २०१४ पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून प्रतिवर्षी किमान सुमारे २५ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती यास लाभते आहे. चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. खाडीत साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच, पण वूली नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटिल रिंग प्लोव्हर, युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट, मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राम्हिणी काईट, मोर, टेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो किंगफिशर, हेरॉन आदि दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही येथे होते. क्रोकोडाईल सफारीसाठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते. गेल्या मे २०१८ मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यातील साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारीचे उद्घाटनासाठी चिपळूणात आलेल्या नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर यांनीही वाशिष्ठी नदीतील पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा असा सल्ला दिला होता. साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मालदोलीचे संदेश आणि शैलेश संसारे, तुंबाडचे शैलेश वरवाटकर, हॉटेलियर रविकिरण जाधव यांनी खाडीत ‘क्रोकोडाईल सफारी’ची सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० साली संपूर्ण कोकणात क्रोकोडाईल टुरिझमसाठी मालदोली (वाशिष्ठी) बॅकवॉटरहा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा आम्हीही रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासू तरुणांचे संघटन असलेल्या झेप क्षितिजापलीकडेसंस्थेच्या आनंदमेळ्यादरम्यान दिला होता.

      वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्याने, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून सन २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीने घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचे मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश ठरावा, वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) : उगम ते संगम’ हा चिपळूण पर्यटनातील महत्वकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती नदी, वैतरणा आणि शिवनदी येऊन मिळतात. कोयना अवजलमुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ, खारफुटीची जंगले, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणीसंपदा असून ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीपात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातील माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचे अवजल उपलब्ध झाल्यानंतर झपाट्याने शिवनदीचे महत्त्व कमी होऊन तिचे अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे. शासनाने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी या कोयनेच्या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा ? याबाबत उपाय सुचवण्यासाठी ५ सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना केली होती. दिनांक २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीने राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीने कोकणातील सुमारे १,७०,५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असे पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल सन २०१३ सालापर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. राजकीय साठमारीत पेंडसे समितीचा अहवाल आजही इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुन:र्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावे असे कधीही वाटलेले नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाईपलाईन, जळणारी पिके, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशुपक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळू उपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.

      अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी अमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होतें. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित व चवथ्या बाजूस खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्याचा २० फूट उंच, ८ फूट रुंद व चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हब्शांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर २ एकर आहे. ह्या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून ६ तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता पर्यटक अनभवू शकतो. वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी नवल ठरलेली रामचंद्र वासुदेव मराठे न्यासही ‘हेरिटेज वास्तू’ आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकारात  ही वास्तू आहे. उंचीवरील जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही झालेले नाही. वास्तूतील जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या लगीआज नव्वदीनन्तरही मजबूत असून त्यांना कोठेही बाक आलेला नाही. छप्पराच्या ९ इंच आय बीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे.

      दापोली तालुक्यातील पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील कोटजाई ही नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा नितांत सुंदर लेणी समूह  आहे. इथल्या गुंफा ऐतिहासक असून त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. एकूण २९ भल्या मोट्या दगडांमध्ये पहायला मिळतात. या ठिकाणी श्रीगणेश, सरस्वती यांसारख्या देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसंच भिंतींवर महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत. पन्हाळेकाझी इथे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक लेण्यांचं अनोखं मिश्रण आहे. शिलाहार राज्याची एकेकाळी राजधानी असलेल्या या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्धस्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी किमान दोन-तीन तास लागतात. कोटजाई नदीकाठचं दृश्य अतिशय रमणीय आहे. येथील परिसर हिरव्यागर्द वनराईने समृद्ध आहे. दापोलीपासून पन्हाळेकाझी २१ कि.मी. आहे. चिपळूण तालुक्यातील गोंधळे येथील तांबी नदीच्या किनारी असलेले पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर, परिसरातील इंग्रजी ‘एल’ शेप आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव), शेकडो वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पाहण्यासारखे आहे. भरती-ओहोटीचे गणित सांभाळून छोट्या बोटीने खाडीमार्गाने आपण पन्हाळेकाझीसह येथेही पोहोचू शकतो. वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरील गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीर्पर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. नुकताच आम्ही ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा प्रवास केला. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

      ओहोटीच्या वेळी खाडी किनाऱ्यावर शरीराचे तापमान नियंत्रित करण्याकरिता ‘बास्किंग’ करीत निवांत पहुडलेल्या, मॅनग्रोव्हमध्ये लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी बोटीतून बघायला धमाल मज्जा येते. या बोट प्रवासात सुमारे ८ ते १० फुट लांबीच्या किमान १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. अर्थात त्यासाठी ओहोटी असली पाहिजे. पावसाळ्यात हा सगळा परिसर हिरवागार असतो. हिवाळ्यात कुडकुडायला लावणारी थंडी येथे असते. या खाडी पट्ट्यात आजवर पक्ष्यांच्या ७० ते ८० जाती नोंदवल्या गेल्या आहेत. हे बॅकवॉटर आणि इथल्या मगरी हे मोठं आकर्षण आहेच, पण वाशिष्ठीच्या खाडीतीरावर आणि जोडनद्यांमध्ये भरपूर प्राचीनता, लोकसंस्कृती, जीवनपद्धती, चालीरीती पाहायला मिळतात. आपल्या मातीतील हे सारे वैभव अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाशिष्ठीच्या खाडीची सफर करायलाच हवी !

धीरज वाटेकर
‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.
     
मो. ९८६०३६०९४८
dheerajwatekar@gmail.com


प्रसिद्धी 
दैनिक महाराष्ट्र टाईम्स, मगरींच्या सानिद्ध्यात... ४ मे २०१९ 

मासिक लोकराज्य, मे २०१९ 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...