शुक्रवार, १८ जून, २०२१

पुणेकरांनी अनुभवली ‘अपरिचित कोकणची सफर’

चिपळूण : पुणे येथील रोटरी क्लब पुणे साऊथ यांच्या नुकत्याच (१४ जून) संपन्न झालेल्या साप्ताहिक सभेत येथील पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे उपस्थितांना अपरिचित कोकणची सफर घडविली. सफारीचा आनंद घेतलेल्या अनेकांनी कोकणातील माहित नसलेल्या अनेक निसर्ग स्थळांविषयी आणि वेगळेपणाविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाल्याचे यावेळी आवर्जून नमूद केले.

७८ पॉवरपॉईंट स्लाईड्सद्वारे तासभर चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात वाटेकर यांनी श्रावण कृष्ण त्रयोदशी या कोकण क्षेत्र निर्मिती दिनापासून केली. यानंतर त्यांनी कोकणातील निसर्गास्थाने अंतर्गत सात धबधब्यांचे एकत्रित स्थान असलेले लिंगाचा डोंगर (आंगवली-मार्लेश्वर),ग्लोबल चिपळूण टुरिझम चा महत्वाकांक्षी उपक्रम असलेला वशिष्ठी उगम ते संगमउपक्रम अंतर्गत संपूर्ण वशिष्ठी नदी, साहित्यात प्रसिद्ध तुंबाड, इतिहासप्रसिद्ध दाभोळ आदींची माहिती सांगितली. तिलारी-दोडामार्ग-खडपडे-कुंभवडे-चौकुळ-आंबोलीचे जैवविविधतेने परिपूर्ण निसर्ग वैभव अनुभवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटन पॉईंटच्या पलिकडे जाऊन विचार करून नेचर ट्रेल करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी ३६५ दिवस आंबोली ही संकल्पनाही विषद केली.पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावी असलेला महाराष्ट्रातील ६८ पैकी एक असलेला रौद्रभीषण निसर्गनवल ८०० फुट उंचीचा भीमाची काठी सुळका,कोकणातील प्राचीन घाट रचनांची ओळख करून देणारा तिवरे ते मालदेव व्हाया बैलमारव घाट, कुंभे निजामपूर बोगदा परिसर निसर्ग आदी माहिती दिली.

कोकणातील ठाणे-पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सागरकिनारे, हेदवीची समुद्रघळ मालवण आणि रत्नागिरी येथील स्कुबा डायव्हिंग, त्सुनामी आयलंड (मालवण),  कोकणातील खाडी किनाऱ्यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण किनारी आणि सागरी दुर्ग, १६६१ ला छत्रपती शिवाजी महाराजांनीघनदाट अरण्यात गनिमी कावा तंत्राचा अवलंब करून कारतलबखानाच्या नेतृत्वाखालील मुघल सैन्याचा पराभव केलेली या उंबरखिंड, कोकणातील कोकणात ६४ नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या ४२ रमणीय खाड्या, कोकण आणि देश याना जोडणारे घाट रस्ते, धबधबे, पाऊस, सडा : कोकणातील एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था, कमळतळी, तळ कोकणातील १०१ धरणे, कोकणातील संग्रहालये, प्राचीन विहिरी, मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करणारीकातळशिल्पे, कोकणातील जलमंदिरे, गुहा मंदिरे, देवराया, दगडी पार, पोर्तुगीज घंटा, वारूळ देवता, किमान हजार वर्षेपूर्व मूर्तीकला, लाकडावरील कोरीव काम, जल संचयन पद्धती, कोकणी श्रद्धा, कोकणातील अष्टविनायक, बारव, दर्गे-मशीद, पारंपरिक मासेमारी, सागरी महामार्गाचे सौंदर्य, अश्मयुगकालीन गुहा, जंगलातील दुभंगलेल्या मूर्ती, मिठागरे, हेरीटेज होम, कोकणातील उत्सव, कोकणातील माणसे, इथली वाचनालये आणि माध्यमांची परंपरा आदी कोकणातील अपरिचित मुद्यांचा उहापोह वाटेकर यांनी आपल्या सादरीकरणात केला.

कार्यक्रमाची रूपरेषा रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथचेअध्यक्ष सुदर्शन नातू यांनी उपस्थितांसमोर मांडली. क्लब प्रोग्राम कमिटीचे प्रमुख मंदार पूर्णपात्रे यांनी परिचय करून दिला. आभार संदीप यांनी मानले. 

आपण ही सफर https://fb.watch/67fgm5lqMq/  या फेसबुक लिंकवर जाऊन प्रत्यक्ष अनुभवू शकता.



मंगळवार, ८ जून, २०२१

निसर्ग व पर्यावरण मंडळाची राज्यव्यापी आभासी कॉन्फरन्स

विविध ठिकाणच्या राज्य प्रतिनिधींसह महिला सखी मंचच्या प्रतिनिधींचा उस्फूर्त सहभाग

चिपळूण : राज्यभरातील कृतीशील पर्यावरणप्रेमी शिक्षकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे आभासी झूम कॉन्फरन्स जागतिक पर्यावरण दिन आणि मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचा अभिष्टचिंतन दिन संपन्न झाला. यावेळी वृक्षमित्र मोरे यांच्यासह राज्यातील उपस्थित प्रतिनिधींशी पर्यावरण मंडळाचे राज्य सचिव धीरज वाटेकर यांनी ‘पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. या आभासी झूम कॉन्फरन्समध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख प्रतिनिधींसह राज्य महिला सखी मंचच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा, मंडळाचे माजी कार्याध्यक्ष स्वर्गीय गोरखनाथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी तांबोटकर आणि कोरोनात निधन पावलेले जगभरातील समस्त पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सौ. कावेरी मोरे यांनी ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांचे औक्षण केले. यावेळी सर्वांनी आभासी वातावरणात मोरे यांना अभिष्ट चिंतले. मंडळाने सायरा एज्युकेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण पीपीटी स्पर्धेत १०६ पर्यावरण पीपीटी आलेल्या होत्या. त्या स्पर्धेचा निकाल विशाल कांबळे यांनी आभासी वातावरणात स्क्रीनवर प्रमाणपत्र शेअर करून जाहीर केला. यात अनुक्रमे सुभाष नारकर पन्हाळा कोल्हापूर, कीर्ती मोरे भिवंडी ठाणे, वंदना कोरपे चिंचवड ठाणेहे विजेते ठरले. प्रदीप भाकरे कोपरगाव अहमदनगर आणि दत्ता लोकरे भिवंडी ठाणे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. मोरे यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर बोलताना राज्यभरातील पर्यावरणप्रेमी सहकारी शिक्षक बंधू-भगिनी यांचं मिळालेलं प्रेम महत्त्वाचं असल्याचं नमूद केलं. मंडळाचे सचिव धीरज वाटेकर यांनी आपल्या पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका या विषयावरील संबोधनात छोटे छोटे जंगल निर्माण करण्याबाबत मांडलेल्या विचाराला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्याची कल्पना मांडली. मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी कोणत्या क्षेत्रात कोणती झाडं लावावीत याची संकलित केलेली माहिती महत्वाची आहे. नूतन बांदेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे त्यांनी कौतुक केले. शेवटी, झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन दिवसेंदिवस कमी होतो आहे. म्हणून सोसायटीत ऑक्सिजन देणारी छोटीछोटी झाडं लावायला हवीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका या विषयी बोलताना धीरज वाटेकर यांनी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘इको सिस्टीम रिस्टोरेशन’ असल्याचे सांगितले. आजूबाजूच्या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण, पुनर्वसन करण्याचा विचार या मागे असल्याचे ते म्हणाले. आपला ‘संपूर्ण निसर्ग हा एक परिवार आहे’ ही भावना पर्यावरणात काम करताना सतत मनात असायला हवी, असे ते म्हणाले. जलपासून सुरुवात  झालेल्या निसर्गाची दुसरी अवस्था जमीन आहे. तिसऱ्या स्तरावर प्राणअवस्था तर  चौथी जैवविविधता आहे. जैवविविधतेत मानव अंतर्भूत असून तो विकासाकडे वळल्यावर जगातील सुमारे ८० टक्के जंगल संपून निसर्गाचा ह्रास झाला आहे. म्हणून मंडळाला शाश्वत विकासाची भूमिका घेऊन पुढे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासानुसार ७० वर्षांच्या जीवनात मानव १ टन कागद वापरतो. म्हणून किमान १७ झाडे लावून जगवण्याची आपली जबाबबदारी आहे. ‘टिशू पेपर संस्कृती’ सारख्या वर्तणुकीपासून आपण दूर राहायला हवं असं ते म्हणाले. जनजागृतीच्या क्षेत्रात चालणारे पर्यावरण मंडळाचे काम हे मनुष्य परिवर्तन, व्यक्तिनिर्माण, आचरणातील परिवर्तनाचे काम आहे. यासाठी समाज जागरण, समाजाची समज वाढविणे, सहभाग वाढविणेआवश्यक असून त्यासाठी मंडळ सातत्याने कार्यशाळा आणि पर्यावरण संमेलने आयोजित करत असल्याचे वाटेकर म्हणाले.

सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था हरित करणे, सर्वाकडून माहिती घेणे, सर्वाना माहिती देणे, आजूबाजूच्या रिकाम्या जागा, आपल्या घराच्या आजूबाजूला हरित पट्टा, घराजवळ अधिकाधिक सुगंधी फुलांची लागवड यासाठी आपण प्रयत्न करू या असे आवाहन वाटेकर यांनी केले. सर्वत्र झाडांना मारलेले खिळे काढून टाकण्याचा संवेदना अभियान सारखा स्त्युत्य उपक्रम आपण राबवू शकतो. सृष्टीत जीवाची उत्पत्ती पाण्यापासून झाली. प्राचीन भारतीय शास्त्रातही पहिला अवतार मत्स्यावतार आहे. आजही सर्वाधिक जैवविविधता पाण्यात आढळते. मात्र पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष्य जाणवते आहे. यासाठी आपण घरी येणाऱ्या पाहुण्यांना पूर्ण ऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे, एका बादलीत अंघोळ, अशा प्रकारे दैनंदिन वापरातील पाणी वापर कमी करण्याबाबत सुचविले. यावेळी त्यांनी कोकणात चालणाऱ्या ‘वाशिष्ठी नदी ; उगम ते संगम’ या उपक्रमाची माहिती दिली. एका संशोधनानुसार भारतात दरवर्षी प्रति व्यक्ति ५० किलो अन्नाची नासाडी होते. त्यामुळे अन्नाची नासाडी रोखण्यासाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क राहूया असं ते म्हणाले. जळलेल जंगल निर्माण व्हायला ७०-८० वर्षे निघून जातात. झाडं ही जंगलात वाढायला हवीत, त्यासाठी जंगलात बीजपेरणी अभियान व्हायला हवे. शहरातील मोकळ्या जागांवर लघुवन तयार करता येईल का ? असा विचार भविष्यात प्राधान्याने करावा लागणार असल्याची पर्यावरण मंडळाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वागतपर मनोगत व्यक्त करताना नूतन बांदेकर यांनी, ‘पर्यावरणाचे काम सर्वव्यापी आहे. ते समाजातील प्रत्येक घटकाच्या मनामनात झिरपायला हवे आहे, असे नमूद केले. या महाराष्ट्रव्यापी चळवळीच्या माध्यमातून नव्या पिढीत पर्यावरण रुजविणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. महिला सखी मंचच्या राज्याध्यक्ष प्रियवंदा तांबोटकर यांनी,’ विकासाच्या नावाखाली झाडांची तोड झालेली आहे. त्यामुळे वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे म्हटले. घरातले अन्नपदार्थ हे स्वादिष्ट असतात हे आपण लॉकडाऊन काळात अनुभवले असल्याचे त्यांनी नमूद करताना प्लास्टिक कचऱ्याच्या कमी करण्याबाबत भूमिका मांडली. कार्याध्यक्ष उल्का कुरणे यांनी, ’निसर्गाचे रक्षण आणि संस्कृतीची ओळख आपल्याला पहिल्यापासून होती. निसर्गाचे स्वतःचे नियम आहेत. त्यांना बाधा निर्माण होईल असं काम आपण करू नये. सजीवांची आरोग्य साखळी, जैविक तराजू बिघडलेला आहे. म्हणून उपयोजनात्मक दृष्टीकोनातून काम करण्याची आवश्यकता आहे’, असे म्हटले. नयना पाटील यांनी सखी मंचाने सुरुवातीपासून चांगले काम करायला सुरुवात केल्याची मांडणी केली. सुभाष नारकर यांनी, ‘आपल्या पीपीटीतील पर्यावरणीय विचार आणि मूल्यवर्धक उपक्रम शाळांत राबविणार असल्याचे सांगितले. डॉ. प्रदीप साखरे यांनी ‘गाव तिथे पर्यावरण मंडळ हवं’ अशी भूमिका मांडली. मंडळाचे पदाधिकारी राजाराम ढवळे बोलताना पुणे-अहमदनगर मार्गावरील वनश्री पर्यावरण दिनी तोडल्याच्या मुद्द्याबाबत तीव्र आक्षेप नोंदविल्याचे म्हटले. मंडळाच्या या कार्यक्रमात याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनिषा पाटील, अनिल माळी, रमेश यमलवार, शिवम जाडकर, मनोहर सासे यांनी मनोगत व्यक्त केले.

पीपीटी स्पर्धा संयोजक आणि मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे यांनी कार्यक्रमाचे उस्फूर्त सूत्रसंचालन केले. सतत माणस जपणारे, जोपासणारे, जोडणारे, माणस घडविणारे, माणसांच्या मनाची मशागत करणारे असे आबासाहेब मोरे यांचे व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले. आभार वरिष्ठ कार्याध्यक्ष विलास महाडीक यांनी मानले. स्पर्धेतील विजेत्यांनी आपली बक्षीस रक्कम मंडळाच्या पर्यावरण कार्याला भेट दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राज्यभरातील उपस्थित पर्यावरण प्रेमींना त्यांनी वनश्रीप्रतिज्ञा दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाची यु ट्युब लिंक : https://www.youtube.com/watch?v=eYyhbCpHltY




मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

मरणावरीही कीर्ती राहील, या कलाकाराची !


       सध्याच्या विषाणू संक्रमणाच्या काळात बारा दिवसांच्या अविश्रांत धावपळीनंतर, सरळ रेषांचा हृदयविद्युत आलेख (
Electrocardiogram) दाखवत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवलग बालमित्र गमावल्याची जाणीव करून दिली तो क्षण आजवरच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट आणि वेदनादायी होता. या अशा क्षणाची आम्ही कधीही कल्पना केलेली नव्हती. तत्क्षणी भावनेने तुडुंब भरलेला बांध फुटण्याआधी स्वतःला सावरत कसाबसा पहिला फोन केला तो दुसऱ्या बालमित्राला, डॉ. तेजानंद गणपत्ये याला ! तो तातडीने पोहोचल्यावर मात्र आम्ही एकमेकांना बिलगून हॉस्पिटलच्या गेटवरच रडू लागलो. गेले बारा दिवस चाललेले डॉक्टरांचे, कुटुंबियांचे आणि मित्रांचे सारेच प्रयत्न नियतीने एका क्षणात व्यर्थ ठरवले होते. काळाने आमच्या मैत्रीवर क्रूर आघात केला होता.

       चैत्र शुद्ध ११, कामदा एकादशीला (२३ एप्रिल २०२१) रात्री ८ वाजता आम्ही शंकर कृष्णा साळवी या अवघ्या ४२ वर्षांच्या बालमित्राला गमावलं. ३ जुलै १९७९ ला जन्मलेल्या शंकरच्या जन्मापूर्वी वर्षभर अगोदर १९ एप्रिल १९७८ ला त्याचे आजोबा पांडुरंग रावजी साळवी यांचेही चैत्र शुद्ध एकादशीलाच निधन झाले होते. मला चांगलं आठवतंय, शंकर हॉस्पिटलला अॅडमिट झाल्यानंतर त्याच्याशी झालेल्या संवादातून, आठवड्याभरातल्या हालचालींवरून त्याचं ‘खोकणं’ इतकं गंभीर वळण घेईल असं मला काय जवळच्या कोणाला वाटलं नव्हतं. पण पहिल्यापेक्षा अधिक वेगवान असलेल्या संसर्गित वातावरणाने ते घडवलं. चिपळूण तालुक्यातील नागावे गावचा हा सुपुत्र मंदिर निर्मिती क्षेत्रातील आरेखन तज्ज्ञ होता. तो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या पोफळी विभागात सेवेतही होता. वेगवेगळ्या पाळ्यांमधील नोकरी, बदली आणि साईट्ससाठीचा सततचा प्रवास, आर्किटेक्चर कामांच्या बैठका, त्याच्या चिपळूणच्या ऑफिसमधली गावावाल्यांची गर्दी, कामातल्या कल्पकतेतील सातत्यासाठी येणारा ताण सांभाळून साऱ्या कसरती सुरु असायच्या. जिल्ह्यासह कोकणातल्या विविध गावात गेल्या १२/१५ वर्षांत नव्याने जीर्णोद्धारीत झालेल्या मंदिर वास्तू, इमारती, बंगले, आणि मशीद त्याच्या उत्तुंग स्थापत्य आरेखन कौशल्याची साक्ष देत उभ्या आहेत. सुरुवातीला मेकॅनिकल आणि कालांतराने सिव्हिल ड्राफ्ट्समन क्षेत्रातील आय.टी.आय. पर्यंत शिक्षण घेतलेल्या या मित्राने निवळ जिद्दीनं आणि अविश्रांत कष्टानं आपल्या आणि जवळच्या असंख्यांच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं होतं. शिक्षण कमी असलं तरी सच्चाईनं कार्यरत राहिल्यास मानवी जीवनात इतरांना आदर्शवत ठरावी अशी सामाजिक उंची गाठता येते, हे त्याने आपल्या २२/२५ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीतून सत्य करून दाखविलं होतं. भारतीय संस्कृतीचा सच्चा आदर्श जपणारं, तो सातत्याने वृद्धींगत होत राहावा यासाठी स्वतःची आर्थिक पदरमोड करून धडपडणारं हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं. आमचं एकत्रित शालेय शिक्षण झालेल्या अलोरे गावातील मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालयाच्या पुढील वर्षी (२०२२) होऊ घातलेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांसाठीच्या नियोजन-संयोजन समितीचा तो सन्माननीय सदस्य होता. खोखोखेळातील चॅम्पियनम्हणून ओळखला गेलेला शंकर शालेय टीमचा कप्तान होता. कमी उंची आणि वाऱ्याच्या वेगाने धावण्याची क्षमता असलेला, पाठीवर खेळण्याचं कसब, ३-६-९ रिंगच्या क्लुप्त्या टीममधल्या इतर सदस्यांना त्याने शिकवल्या. ‘एकदा तो मैदानात उतरला की पुढची ७ मिनिटं कोणी उतरायलाच नको’, असं डॉक्टर तेजानंदने म्हटलंय ते खरं आहे. इंटिरियर डिझाईन, कपड्यांची रंगसंगती, सुशोभीकरण हे या मित्राचे कायम आवडीचे विषय राहिले.

शंकर देवाघरी गेला त्या २३ तारखेच्या सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. तेजानंदचा अनपेक्षित फोन आलेला. तो म्हणाला, ‘डॉक्टरांनी पेशंटच्या भावाला भेटायला बोलावलं आहे. मी नेमका आत्ताच घरी आलोय. तूही सोबत जा हॉस्पिटलला. डॉक्टर काय म्हणताहेत ते मला लगेच कळव !’ खरंतर दोन तासांपूर्वी डॉ. तेजानंदमार्फत हॉस्पिटलमधून आलेल्या डॉक्टरांच्या निरोपानुसार, शंकरची तब्बेत कालच्यापेक्षा आज बरी जाणवत होती. त्यामुळे पुढच्या दोन तासात काहीतरी बिघडेल असं वाटणं अस्वाभाविक ! पण सध्याच्या वातावरणाचं हेच सर्वाधिक भयानक वैशिष्ट्य असावं. साडेसहाच्या डॉ. तेजानंदच्या फोननुसार मी शंकरचा भाऊ संतोषला (नाना) फोन करून हॉस्पिटलला पोहोचायला सांगितलं. सोबत सुरेश नावाचा एक तरुण सहकारी होता. हॉस्पिटलला पोहोचलो तेव्हा शंकरची तब्बेत नाजूक बनल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही, डॉक्टरांना सर्वतोपरी प्रयत्न करायची विनंती केली. तोवर सायंकाळचे सात वाजून गेलेले. इतक्यात शंकरच्या पत्नीचा, अंजलीचा साडेसात वाजता फोन आला. तिला समजावण्याचा प्रयत्न केला. थोडं ऑक्सिजन सॅचुरेशन कमी झाल्याने चिंताजनक म्हणून डॉक्टरांनी भेटायला बोलावल्याच तिला सांगितलं. ‘मी काय सांगतोय’, हे ऐकण्याच्या ती फारश्या मन:स्थितीत नसावी. पण तिला कसंही समजावून शांत राहायला सांगणं भाग होतं. हॉस्पिटलच्या आवारात घुटमळत असताना रात्री आठ वाजता व्हेन्टीलेटर वॉर्डमधून तातडीचा निरोप आला म्हणून त्या दिशेला धावलो. कुटुंबियांना पुढे बोलावल्याने मी काहीसा मागे थांबलो. डॉक्टर शंकरचा हृदयविद्युत आलेख दाखवित होते. नानाला ते लक्षात येईना, म्हणून त्याने आम्हाला हाक मारली. डॉक्टरांनी ओळख विचारली. मानवी हृदय बंद पडल्यानंतर दिसणाऱ्या सरळ रेषा असलेला फाईलला जोडलेला आलेख डॉक्टरांनी दाखविला. आलेख बघून आमचे पाय थरथरायला लागले. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार पसरला. डोळ्यांनी नक्की काय पाहतोय ? हेच आम्हाला  कळेना. डॉक्टरांना विनंती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण... ‘ही इज नो मोअर’ इतकंच काय ते डॉक्टर म्हणाले. शरीरातला त्राण गळालेल्या अवस्थेत आम्ही वॉर्डच्या पायऱ्या उतरलो. बाहेर नानासह जवळच्या दोघा-तिघांचा आक्रोश सुरु झालेला. त्यांनी बोललेल्यापैकी, ‘दादा काय पण कर ! शंकरदादाला आपण घरी न्यायचं !’ एवढंच आम्हाला कळलं. डॉ. तेजानंद आल्यावर पुढची बरीचशी परिस्थिती त्याच्यासह सन्मित्र यश खेडेकर आणि वेळेत पोहोचलेल्या एम.एस.ई.बी.च्या मोजक्या कर्मचाऱ्यांनी सावरली. तिकडे शंकरच्या घरच्या आवारात माणसं जमू लागली होती. मोबाईलवर त्याच्या पत्नीचे फोनकॉल्स वाढू लागले. ‘तिचे हे फोन उचलणार कसे ? आणि कोणत्या तोंडाने तिला काय सांगणार ?’ उपस्थितांनीही, ‘तुम्ही तिला फोनवर काही बोलू नका’ असं बजावलेलं. त्या रात्री सव्वा आठ वाजल्यापासून पावणे अकरा वाजेपर्यंत अंजलीने वीसेक फोन केले. त्यानंतर तिचे फोन बंद झाले. काहीतरी दुर्घटना घडल्याचं तिला समजलं असावं. अकरा वाजता शंकरचा पार्थिव देह घेऊन अॅम्ब्युलन्स गावी रवाना झाली. या हॉस्पिटमध्ये शंकरला आणताना अॅम्ब्युलन्सच्या वाजणाऱ्या सायरनशी आमच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्पर्धा करत होते. मात्र आता अॅम्ब्युलन्सच्या मागे उभा राहून आम्ही तिच्याकडे बघत राहिलो. अस्वस्थतेमुळे पुढील बराच काळ छातीतून कळा येत राहिल्या. रात्री साडेबारा वाजता शंकरच्या मानवी देहाला अग्नी दिला गेला.

शाळेत इयत्ता वेगळ्या असल्या तरी आठवीनंतर बिल्डींग कन्स्ट्रक्शन आणि ५०/५० मार्कांच्या हिंदी संस्कृतच्या तासाला आम्ही एका बेंचवर असायचो. वर्गात शक्यतो मागच्या काही रांगावर बसण्याचा आनंद घेणारा शंकर या तासांना मात्र पुढच्या रांगात यायचा. दहावीनंतर आम्ही वेगळे झालो. शंकरने जवळच्या कॉलेजात बारावीसह ड्राफ्ट्समनचा आय.टी.आय. पूर्ण केला. शिक्षणाच्या फेऱ्यातून तो लवकर बाहेर पडला. आम्ही बाकीचे मित्र शिक्षण घेत असताना हा जवळच्या औद्योगिक वसाहतीत मिळेल त्या नोकरीस जुंपलेला. थोडेफार कमवू लागला. त्या कमवण्याला पॉकेटमनीपेक्षा वेगळा अर्थ नव्हता. आम्ही स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविकेसाठी रत्नागिरीत गेलो. सुट्टीला यायचो तेव्हा गावाच्या यात्रांत फिरायला सोबतीला बाकी कोणी मित्र नसला तरी हा हमखास असायचा. खरंतर हा गाववाल्या मित्रांसोबत यात्रेत एकदा जाऊन आलेला असायचा. पण तरीही यायचा. २००१ला आम्ही कायमस्वरूपी अलोरे-चिपळूणला आलो. तेव्हाही हा एम.आय.डी.सी.त कामाला होता. हाताला काम हवं म्हणून आवडीनिवडीच्या पलिकडे जाऊन हा काम करायचा. आम्हाला ते खटकायचं. पण इलाज नसायचा. उपजत कलाकार असलेला शंकर तेव्हा स्क्रीन प्रिंटींगही करायचा. मेकॅनिकल ड्राफ्ट्समन कोर्स झालेल्या शंकरला ‘स्थापत्य’ शाखेची भलतीच आवड होती. यातच त्याने करिअर करावं असं वाटायचं. तेव्हा अलोरेतील पोलीस मैदानासमोरील नागावे रस्त्याशेजारी असलेल्या मोऱ्यांवर तासनतास बसून आम्ही भविष्याची स्वप्न रंगवायचो. हळूहळू आपण इथे राहायचं नाही, मुंबई-पुण्यात नोकरी धंद्याला जायचं असं आमच्या मनानं घेतलं. शंकरनेही तेच स्वीकारलं. यासाठी आम्ही गद्देपंचविशीत एकत्रित खूप प्रवास केला. ‘दोघांना एकाच वेळी एकाच शहरात नोकरी मिळाल्यासच आपण गाव सोडायचं’ या भूमिकेला नियतीने कधीही सहकार्य केलं नाही म्हणून आम्ही चिपळूणातच राहिलो.

आम्ही चिपळूणात एका बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स फर्ममध्ये नोकरीस लागल्यावर पुढच्या २/४ महिन्यात शंकरला सिव्हील ड्राफ्ट्समनची संधी चालून आली. ग्रामीण पत्रकारिता करताना वाचनात आलेली स्थानिक वर्तमानपत्रातील जाहिरात आम्ही याला दाखविली. टूडी अॅटोकॅडचे पक्के ज्ञान असलेल्या शंकरला आम्ही नागावेतल्या एस.टी.डी. बूथमध्ये बसून थ्री-डी अॅटोकॅडच्या काही कमांड सांगितलेल्या, बस्स ! सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या उमेदीच्या बळावर शंकर जाहिरातीतील आर्किटेक्चरल फर्ममध्ये निवडला गेला. तेव्हा त्याच्या आयुष्याने पहिल्यांदा सर्वोत्तम निर्णायक वळण घेतलं. इथे दहाएक वर्षे काम करताना त्याने खूप काही चांगलं आत्मसात केलं. मंदिरवास्तू निर्मिती आरेखनतज्ज्ञ या त्याच्या ओळखीमागचा पाया इथे जठार नावाच्या आर्कीटेक्ट मार्गदर्शकांच्या हाताखाली सक्षम झाला. त्यानंतर कष्टयुक्त कर्तृत्वाच्या सुगंधाने बहरलेल्या या मित्राने आपल्या कर्तबगारीने ‘डिझाईन सूत्र’ आणि मागील ७/८ वर्षांपासून ‘अमृतवास्तू असोसिएट’ फर्म उभारून या पायावर कळस चढविला. एकदा, ‘नव्या फर्मला नाव काय द्यायचं ?’ असा विषय पुढे आल्यावर आम्हीच त्याला एका भेटीत त्याच्या वडिलांच्या मुखी आलेल्या ‘अमृत’ शब्दाचा आधार घेत ‘अमृतवास्तू’ नाव सुचविलं. जे त्याने आनंदाने स्वीकारून आपल्या कर्तबगारीने प्रसिद्धीस आणलं होतं. आपण उरले ते कर्तव्य करावे ! तेणे त्याचे नाव भूषवावे !! आपल्या कुळात गौरव पावोनि जावे ! तेणे भूषण वडिलांसि !!’ असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या "ग्रामगीता' ग्रंथातील २२व्या अध्यायात म्हटलंय. शंकर सर्वार्थाने ते आयुष्य जगला. त्याच्या जाण्याने त्याचे कुटुंबिय आणि समाजासह माझ्यासारख्या असंख्य अभागी मित्रांचं नुकसान झालं. पण अलोरे पंचक्रोशीतील ‘नागावे’ गावाचे भविष्यात न भरून येणारे नुकसान झाले आहे, हे नक्की !

कोकणात मंदिरं हा गावाच्या भावनिकतेचा, सार्वत्रिक श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा, आत्मियतेचा आणि सामुदायिक निधी संकलन करून जीर्णोद्धारीत होणारा विषय आहे. शंकर हा कोकणातील कित्येक गावात आपल्या मंदिरशिल्प निर्मितीतील आरेखन कलाकारीमुळे घराघरात पोहोचला होता. राजापूर तालुक्यातील पेंडखळे, दत्त मंदिर राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर, सरंद, देवरुख, तुरळ, शिंदे आंबेरे, उक्षी, कुंभारखाणी, कळंबस्ते, चिपळूण तालुक्यातील शिरगाव, भराडे, कळवंडे, कात्रोळी, देवखेरकी, खडपोली, आंबेरे, आकले, मुंढे, बिवली, वहाळ, मांडकी, वालोपे, अनारी, मोरवणे, खेड तालुक्यातील लवेल, माणी, भेलसई, दाभीळ, धामणदेवी, दापोली तालुक्यातील मुरुड, आसूद, वणोशी, पालघर (बुद्धविहार), आडे, आंजर्ले, दाभोळ, मांदिवली (मशीद), गुहागर तालुक्यातील खोडदे, जामसूत, कुटगिरी, पोसरे, पडवे, भातगाव, झोंबडी, कुडली, उभळे, तवसाळ, काजुर्लीसह देवगडातील भवानी मंदिरापर्यंत कोकणातील अनेकविध गावात त्याच्या मंदिर कलेची अनुभूती पाहायला मिळते. त्याने एखाद्या मंदिराच्या जुन्या वास्तूची, जागेची आणि गावच्या अपेक्षांची नीट माहिती घेऊन तयार केलेल्या पहिल्याच डिझाईनला अनेकदा भर बैठकीत गावची संमती मिळायची. ग्रामदेवतेच्या साक्षीने भरलेल्या गावसयीत (ग्रामस्थ बैठक) आपल्या संबंधित गावच्या मंदिर निर्मितीबाबतच्या संकल्पना उपस्थित ग्रामस्थांना समजतील अशा सहज सोप्या शब्दात सांगण्याची शंकरची हातोटी अफलातून होती. मंदिर निर्मितीसारख्या क्षेत्रात देवाच्या दारात उभं राहून आपली सेवा देणाऱ्या, आपल्या नियोजित मानधनामधला काही प्रतिशत भाग कायम दैवी शक्तीसाठी आपणहून जबाबदारीने सोडून देणाऱ्या या सात्विक प्रवृत्तीच्या कलाकाराला निसर्गशक्तीने इतक्या लवकर आपल्याकडे बोलावून घेण्याची घाई का बरं केली असावी ? हे न उलगडणारे कोडे आहे.

शंकरचं दिलदार वागणं, मोकळं हसणं आणि मित्रांत आठवून-आठवून रंगतदार गप्पा मारणं अफलातून होतं. मी काय ? डॉ. तेजानंद काय ? किंवा शंकर काय ? खरतरं आम्ही बालपणीचे सर्वांसारखेच एकमेकांचे मित्र ! पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात, यांत्रिक व्यस्ततेत इतके गुरफटलेलो की भेटणं सोडा, आमचं क्षणभराचं मैत्रीपूर्ण बोलणंही होणं अवघड झालेलं. पण मैत्रीचा धागा घट्ट होता. गाठीभेटी अभावाने व्हायच्या. यात गेल्या ५/६ वर्षांत बदल घडवला तो आमच्या अलोरेतील शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या पूर्वनियोजन उपक्रमांनी, बालमित्रांच्या गेटटुगेदर्सनी ! यासाठी आम्ही सारेच शाळेचे, बालमित्रांचे आजन्म ऋणी असू. गेल्यावर्षी कोरोना-१चा प्रभाव जरासा ओसरल्यावर, २ ऑगस्टला आम्ही डॉ. तेजानंदचा वाढदिवस शंकरच्या ऑफिसमध्ये साजरा केला होता. तत्पूर्वी माझाही ! पण याचा वाढदिवस साजरा करायला आम्ही विसरलो. चालू वर्षातल्या गेल्या काही महिन्यात संकल्पित व्यावसायिक कारणाने आम्ही पुन्हा जवळ आलो. कामासंदर्भात २/३ वेळा पुण्याला नि १/२दा रत्नागिरी प्रवास केला. खूप गप्पा केल्या. तेव्हा सुधाकर घोटगे सोबत होता. आज त्या प्रवासातील गमतीजमती आठवल्या की जी अस्वस्थता निर्माण होते ती शब्दात पकडणं कठीण आहे. सांगण्यासारखे अनेक प्रसंग आहेत, या मित्राचे ! पुण्याच्या प्रवासात खरेदी करताना यानं लहान लेकीला छानशी डॉल (बाहुली) खरेदी केलेली. आम्हालाही आवडली. पुढच्या प्रवासात पुन्हा काहीतरी खरेदी करू लागला. म्हणून याला सहज विचारलं तर म्हणाला, ‘अरे काय सांगू धीरज ! लेक म्हणाली, पप्पा ! या डॉलचे केस खूप वाढलेत. म्हणून मी कात्रीने कापतेय.’ लेकीचा बालवयातील हा अल्लडपणा ज्या सहज शब्दात तो सांगून गेला, त्याला तोड नाही. आता हे सारं आठवतंय ! काळ जसजसा पुढे सरकेल तसतसा शंकरच्या आठवणींचा पाऊस आमच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावत राहील.

दुचाकी चालवायला हा शिकेल की नाही ? अशी स्थिती असणारा शंकर पुढे सराईतपणे चारचाकी चालवू लागला. त्याने स्वतःची कार घेतली. शहरात ऑफिस केलं. त्याच्या कारमधल्या गणपती बाप्पाला कायम छानसा हार अर्पण केलेला असायचा. शंकरने नवीन गाडी घेताच वेळ काढून आम्ही, तो आणि प्रशांत लाटकर असे तिघे बालमित्र ऑगस्ट २०१४ मध्ये गोवा आणि उत्तर कर्नाटक फिरायला गेलेलो. यावेळी दूधसागर धबधब्याकडे जाताना जंगलातून तुफानी पावसात सरकत्या मार्गावर दुचाकीवरून केलेला थरारक प्रवास आठवतो. त्यांनतर त्याचीच गाडी घेऊन ऑगस्ट २०१५ मध्ये कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो. जाताना हा नागावेतून आमच्याकडे चिपळूणला खेण्डीतल्या घरी आला. पहाटेच्या काळोखात गाडी रिव्हर्स घेताना याने रस्त्यावर तिरका मातीत गाडलेल्या एका पाण्याच्या निकामी पाईपमध्ये गाडीची पाठीमागची डावीकडील बाजू ठोकली. ऐकू येण्याइतपत आवाज झाला. दोन इंचाचे होल पडले. ‘असो साधु, भक्त विद्वान ! त्यांनीही न खावे कष्टाविण !! उलट आदर्श दावावा झटून ! सर्व लोकांसी !!’ या तत्वाने जगणाऱ्या, कष्टातून पै-पै जोडून गाडी खरेदी केलेल्या सज्जनमार्गी शंकरला पहाटेच्या समयी गाडीला पडलेला हा होल जिव्हारी लागला. याचा चेहरा पार उतरला. आम्हालाही वाईट वाटलं. पण गाडी नाशिकला न्यायची असल्याने आम्ही ते डोक्यातून काढलं. हा मात्र, ‘अरे माझी कष्टाने खरेदी केलेली गाडी आहे यार !’ असं सारखं म्हणत राहिला. पुढे कल्याणजवळ एका ‘टचअप’वाल्याला विचारलं. त्यानं आम्ही नाशिकला जातोय म्हटल्यावर तिथे हे काम होईल म्हणत पत्ताच हाती टेकवला. तेव्हा शंकरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नाशिकला पोहोचताच गाडीला पडलेलं ते होल आम्ही बुजवलं. दिसूनही न येणारं छानसं रंगकाम करून घेतलं तेव्हा याचा ‘कुंभमेळा’ आनंदी झाला. ५/६ वर्षांपूर्वी केलेल्या या दोन्ही प्रवासाचे छानसे फोटोज आम्ही त्याला भेट दिलेले. खूप कामाचा थकवा आल्यावर तो ते संगणकावर आवर्जून पाहायचा. पोटभर गप्पा करायचा.

मागील वीसेक वर्षांत आमच्या बहरलेल्या संपादकीय भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या ‘पेज ले आऊट / डीटीपी डिझाईन’ आदी कौशल्याच्या मुळाशी स्क्रीन प्रिंटींगची कामं करणाऱ्या शंकरचं मार्गदर्शन होतं. स्वतःच्या कौतुकाबाबत विशेष काही आमच्याकडून लिहून न घेतलेल्या शंकरने त्याच्या निधनाची बातमी आणि हा श्रद्धांजलीपर ब्लॉगलेख लिहिण्याची वेळ आमच्यावर आणली. कमी वयात शब्दशः किरकोळ आणि तुटपुंज्या शिक्षणाच्या बळावर जिद्दीनं आणि अविश्रांत कष्टानं फुलवलेलं एक उमदं, कुटुंबियांचा आधार असलेलं व्यक्तिमत्त्व जीवनातील सर्वाधिक सुखद-दु:खद आठवणींचा ठेवा हवाली करून आणि आपली निर्णायक छाप समाजमनावर सोडून अनंतात विलीन झालं. खरंतर शंकरच्या तब्बेतीला आराम मिळावा म्हणून म्हणून त्याचा मोठा भाऊ, दुसऱ्या दिवशी शनिवारी कुटुंबियांचे आराध्यदैवत असलेल्या मारुतीरायाला अभिषेक करणार होता. त्या अभिषेकाआधीच शुक्रवारी रात्री शंकर देवाघरी गेला. शंकरच्या पत्नीला, गेले बारा दिवस तब्बेतीबाबत कायम सकारात्मक समजावणारे आम्ही शंकर गेल्याच्या रात्री तिचे तब्बल वीसेक मोबाईल कॉल येऊनही ते उचलण्यास अपात्र ठरलो.

२०/२५ वर्षांच्या अथक परिश्रमातून, कोणत्याही टेकूशिवाय निवळ स्वकर्तृत्वावर उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्त्व इतक्या क्रूरपणे काही कळायच्या आत निसर्गशक्तीने आमच्यातून का हिरावून नेलं ? हा प्रश्न सतावतो आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्या हातात नसतात, ती काळावरच सोडायची असतात. ‘काळ’ हेच त्यांचे उत्तर असते. हे तत्त्वज्ञान कितीही घोकायचं म्हटलं तरीही भारतीय संस्कृतीच्या सच्च्या वारसदाराच्या बाबतीत नियती इतकी कठोर का बरं वागली ? ज्या निसर्गशक्तीला, आमच्या मित्राला आमच्यातून न्यायची इतक्या लवकर घाई झाली, तिच्याविषचीचा मानसिक उद्वेग आम्हाला असह्य करतो आहे. या जीवलग मित्राला श्रद्धांजली अर्पण करताना कुठेतरी वाचलेलं नि आठवलेलं ‘मरणावरीही किर्ती राहील, या कलाकाराची !’ म्हणावसं वाटतं. जाताजाता, हे मारुतीराया ! कलेवर निस्सीम प्रेम केलेल्या आमच्या या मित्राला, तुझ्या भक्ताला तुझ्याच पवित्रचरणी सद्गती लाभू देत !! ही प्रार्थना !!!

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८  

dheerajwatekar@gmail.com


विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. अ. के. माने सरांचे आशीर्वाद घेताना 


कोकणातील एका जुन्या बांधणीच्या मंदिराची पाहणी करताना 


दहावी होऊन २० वर्षे पूर्ण झाल्यावर आमच्या १९९५ बॅचने 
आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी संमेलन आणि 
शिक्षक कृतज्ञता सोहळ्यात आम्ही संपादित केलेला 
हा विशेषांक बालमित्र शंकरसह प्रशांत लाटकर आणि 
डॉ. तेजानंद गणपत्ये या तीन मित्रांच्या 
विशेष सहकार्याने प्रकाशित झाला होता


गोव्यातील प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या 
छायाचित्रात डावीकडून धीरज वाटेकर, शंकर साळवी आणि प्रशांत लाटकर


गतवर्षी कोरोना-१ काळात आम्ही २ ऑगस्टला 
बालमित्र डॉ. तेजानंदचा वाढदिवस साजरा केला होता


शरावती नदीवरील प्रसिद्ध जोग फॉल्सच्या पार्श्वभूमीवर 
२०१४ साली या बालमित्राची टिपलेली ही आनंददायी मुद्रा


शंकरच्या वास्तू संकल्पना


शाळेतील एका कार्यक्रमात माजी विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना


शंकरच्या वास्तू संकल्पना ( बुद्धविहार अलोरे)


शंकरच्या वास्तू संकल्पना ( जामा मस्जिद मांदिवली दापोली)


शंकरच्या वास्तू संकल्पना ( श्रीसोमजाई ग्राममंदिर तवसाळ गुहागर)

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...