गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

चिपळूणच्या पक्षी वैभवातील महत्वाच्या नोंदी






कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेला चिपळूण परिसर हा पक्षी वैभवाने समृद्ध आहे. भौगोलिक दृष्ट्या चारही बाजूंनी सह्याद्रीच्या छोट्या डोंगरांनी वेढलेल्या, समुद्रसपाटीपासून २१ फुटांवर असलेल्या या भूमीत स्थानिक प्रजातींसह देशी आणि विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा दखलपात्र वावर आहे. साधारणत २३० प्रकारचे पक्षी आढळणाऱ्या चिपळूणात काही वर्षांपासून अधिवासात ढवळाढवळ झाल्याने पक्ष्यांच्या जीवनक्रमात आणि वर्तनात बदल होत आहेत. पक्ष्यांचे बदलते भ्रमणमार्ग, खाण्यापिण्याच्या सवयी, अन्नाचा तुटवडा, बदललेली वस्तीस्थाने यांमुळे त्यांच्यात वीण (ब्रीडिंग) करावी की नाही ? अशी मानसिकता निर्माण झाली आहे. मानवाने निसर्गसाखळीतील जीवांचा विचार न करता केलेले भौगोलिक बदल याला कारणीभूत आहेत. प्रदूषित वातावरणातील या नोंदी इथल्या जबाबदार नागरिकांपर्यंत पोहोचायला हव्यात. पक्षी जगताविषयीची मानवी समाजाची सजगता अधिक समंजस व्हायला हवी या हेतूने रत्नागिरी जिल्हा वन विभाग आणि जिल्हा मानद वन्यजीव रक्षक यांच्या पुढाकाराने सर्वांसमोर आलेल्या चिपळूणच्या पक्षी वैभवातील नोंदी म्हणून समजून घेणे आवश्यक आहे.

भारतात जवळपास १३०० प्रकारचे पक्षी आढळतात. त्यातले ६५० महाराष्ट्रात तर चिपळूणच्या आसपास २३० प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रातील निम्मे पक्षीवैभव म्हणजे किमान ३०० प्रकारचे पक्षी असायला हवेत. हे पक्षी म्हणजे द्विपाद आणि पिसं असलेला जीव होय. पक्ष्यांविषयी समजून घेताना सुरुवातीला आपण पेक्षालहान आणि पेक्षामोठा असा आधार घेऊन बोलायला लागतो. पुढे पक्षी निरीक्षण शिकताना, एखाद्या ठिकाणी पहिलं फुलपाखरू शोधतो. तिथल्या वनस्पतींवर ऋतूबदलानुसार येणारा फुलोरा, फळ-फळावळे समजून घेतो. त्यावरून त्या परिसरात कोणत्या पक्ष्यांचा अधिवास असू शकतो ? याचा अंदाज येतो. चिपळूणात पाणथळ किंवा पाण्याच्या बाजूला असलेल्या गवताळ जागेत, छोट्या वेलींत, छोट्या-मोठ्या झाडांमध्ये पक्ष्यांचा अधिवास आहे. उंच झाडावर असणारा गरुड आपल्याला फारसा जमिनीवर दिसू शकत नाही. जमिनीवर असलेला बुलबुल खूप उंचीवर पाहायला मिळणार नाही. कोणता पक्षी ? कोणत्या हंगामात ? कोठे बघायचा ? याचे काही नियम आहेत. आपल्याकडे असलेली जुनी-जाणती झाडं जगायला हवीत. अशा झाडांवर पक्ष्यांचे अधिवास असतात. मलबार पाईड हॉर्नबीलचं घरटं असलेली काही ५०/१०० वर्षे जुनी झाडं चिपळूणात आहेत. एका जागा मालकाला जुने झाड न तोडण्याची विंनती वन्यजीव अभ्यासकांनी केली होती. आजच्या मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं तर विस्तारलेलं वडाचं झाड हे त्या जंगलातला जणू मॉल असते. तिथे ३०/३५ प्रकारचे ग्राहक (पक्षी) खरेदीसाठी (अन्न) आलेले असतात. म्हणून ही फायकस झाडं जंगलात टिकून राहायला हवीत.

चिपळूणात गेली अनेक दशके ईगल (गरुड), हॉर्नबीलसारखे (ककणेर) पक्षी जोडीने एकत्र राहत आलेत. आज त्यांच्यात वीण करावी की नाही ? अशी मानसिकता निर्माण झाली आहे. जैवविविधतेतील साऱ्या घटकांच्या आपापल्या हद्दी ठरलेल्या आहेत. मानवाने आपली हद्द केव्हाच पार केली आहे. शहरात वर्षानुवर्षे एकाच जागेवर घरटे बनविणारा मलबार पाईड हॉर्नबील अलिकडे त्या जागेवर घरटे बनवित नाही आहे. मानवनिर्मित अडथळ्यांनी त्याच्या अडचणी वाढवल्यात. सिमेंट काँक्रीटच्या बिल्डींग संस्कृतीतील खिडक्यांवर लावल्या जाणाऱ्या काचांवर विशेषत्वाने विणीच्या हंगामात (टेन्टेड ग्लास) पक्षी येऊन आपटणे किंवा तिथेच बराच काळ आपल्या चोचीने ‘टकटक’ करत राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील डी.बी.जे. कॉलेज हॉस्टेलच्या खिडकीच्या काचेवर आपटून दोन पक्षी मृतवत (जून २०२१) झाले. खिडकीच्या काचेवर चोचीने ‘टकटक’ करत राहण्याने पक्ष्याच्या घरटे बनविण्याच्या एकाग्रतेवर परिणाम होत आहे. खिडकीच्या काचेत दिसणारे आपले प्रतिबिंब पाहून आपल्या भागात दुसरा नर आल्याची त्याची भावना प्रबळ होते आहे. आपल्या हद्दीत आलेल्या दुसऱ्या नराला बाजूला करण्याच्या प्रयत्नात हे घडते आहे. पहिल्याला आपलं घर सुरक्षित करायचं आहे. म्हणून हॉर्नबील जोडीने काचेवर सातत्याने आपली चोच मारत असतो. असे करण्याने त्याच्या चोचीला इजा होते आहे. बिल्डींगच्या खिडकीबाहेर अन्न ठेवल्याने तिथे येणारा पक्षी काचेत आपलं प्रतिबिंब पाहून चोच काचेवर आपटत राहातो. मानवाला असं वाटतं की, ‘पक्षी खिडकीवर टकटक करतोय. माझ्याकडे काही अन्न मागतोय.’ हा गैरसमज आहे. या घटनांनी पक्ष्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून पक्ष्यांचे खिडकीतले फोटो काढणे आणि ते समाजमाध्यमांत पोस्ट करणे थांबवायला हवे. अशावेळी घराबाहेर पक्ष्यांना पाणी जरूर ठेवावे पण अन्न ठेवू नये. खिडकीत येणारा पक्षी काचेवर टकटक करत असेल तर खिडकीच्या काचेवर परिस्थितीनुसार आतून-बाहेरून कागद लावायला हवा.

शहरातील गाड्यांच्या आरशांवरही पक्षी आपल्या चोची मारत असतात. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्याकरिता आपल्या रंगात थोडासा बदल करणाऱ्या लीफबर्ड पक्ष्याला पाहाण्यासाठी देशभरातून अभ्यासक आणि छायाचित्रकार चिपळूणला येत असतात. हाही पक्षी गाड्यांच्या आरश्याच्या काचेवर चोचीने मारत बसलेला असतो. संबंधित गाडी तिथून जात नाही, तोवर त्याचे काचेवर चोचीने मारणे चालू राहाते. अशात खाद्य, घरटे बनवायला लागणारे साहित्य आदींवर परिणाम होतो. त्याचा विणीचा हंगाम संपून गेला तर वाढ खुंटते. आपल्या पुढच्या पिढीला आपण काही देऊ शकणार नाही, ही व्यथा यामागे असावी. ‘आपल्या पुढच्या पिढीला आपण काही देऊ शकणार नाही’ याचा दुसरा अर्थ हा पक्षी मानवाच्या दुसऱ्या पिढीलाही काही देऊ शकणार नाही असा होतो आहे. पक्षी जगतातील हे वास्तव भयंकर मानव जमात कधी समजून घेणार ? हा प्रश्न आहे.

चिपळूणात असलेल्या ५०/१०० वर्षे जुन्या झाडाच्या ढोलीत मलबार पाईड हॉर्नबीलची मादी किमान दोन महिने वास्तव्याला असते. यातले पावणे दोन महिने नर हा मादीला आणि पिल्लांना बाहेरून अन्न भरवित असतो. नंतर काही दिवस मादी बाहेर येते. मात्र पिल्लं घरट्यातच असतात. तेव्हा पिल्लांचं घरट्यामधलं प्रशिक्षण सुरु झालेलं असतं. नर आणि मादी पिल्लांना बाहेरून अन्न पुरवतात. आपलं अन्न आपण कसं खायचं ? विष्ठा बाहेर कशी टाकायची ? मादी बाहेर येताना लिंपण केलेलं घरटे कसे फोडायचे ? ते पुन्हा कसे लिंपण करायचे ? हे पिल्लांना शिकवलं जातं. पुढे योग्य वेळेस पिल्लं बाहेर येतात. या नैसर्गिक साखळीत ऐन विणीच्या हंगामात बाहेर अन्न जमा करीत असताना नराच्या जीवनात काही दुर्घटना घडली तर ढोलीत बसलेल्या मादीने आणि नव्याने जन्माला आलेल्या पिल्लांनी काय करायचं ? मादी ढोलीत असल्याच्या काळात नर किमान चाळीसेक प्रकारचं शाकाहारी आणि मांसाहारी अन्न आणत असतो. यातलं शाकाहारी अन्न कधी आणायचं ? मांसाहारी अन्न कधी आणायचं ? हे ठरलेलं असतं. पिल्लं अंड्याच्या बाहेर आल्यावर अन्नात बदल होऊन प्रोटीन्स असलेलं अन्न आणलं जातं. यात दुसऱ्या पक्षाची पिल्लं, मांसल भाग, अंडी असू शकतात. चिपळूणातला हॉर्नबील हा काजूबीया, काजऱ्याची बी, बिब्याच्या झाडाचीफळं आणि फुलं आणताना हमखास दिसतो.

चारही बाजूला डोंगर असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा चिपळूणला पाणी भरतं, पूर येतो. पाण्याच्या या प्रवाहासोबत डोंगरावरील काही जीव पाण्याच्या समुद्राकडे सरकतात. डोंगर माथ्यावरती आढळणारा माउंटन कॅट स्नेक (मांजऱ्या), इंडिअन रॉक पायथॉन (अजगर)मोठ्या पाण्याच्या प्रवाहासोबत चिपळूणला येतात. इथल्या खाडीत पाहायला मिळतात. देश-विदेशातून स्थलांतर करून सीगल, करकोचा, स्टॉर्क, शेकाट्या, ओपन बिल्ड स्टॉर्क आदी पाणपक्षी चिपळूणात येतात. थंड प्रदेशात बर्फाच प्रमाण जास्त झालं की यांना खाद्य मिळेनासं होतं किंवा प्रमाण कमी होतं. मग ते कमी थंडीच्या प्रदेशात सरकतात. आपल्याकडे भारतात गुजरातपासून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकच्या किनारवर्ती भागात हे येतात. विशेषत समुद्रकिनारी सीगल नर-मादी पक्षी जोडीने कायम आपल्याकडे येतात आणि परत जातात. भौगोलिकतेमुळे गुहागर मधील कमी प्रमाण वगळता रत्नागिरीसह सीगल हे अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, दापोली, हर्णै-आडे-आंजर्ले पट्ट्यात पाहण्यात येतात. काही स्थलांतरित पक्षी कोकणात पोहोचत नाहीत. ते थेट घाटमाथ्यावरून कर्नाटककडे रवाना होतात. काही गुजरातेतून श्रीवर्धन तर काही मालवणपर्यंत पोहोचतात. विविध पाणपक्षी शेवाळ (अल्गी), मासे, खेकडे आदींसह झाडांना त्रास देणारी शेवाळं (अल्गी) खाण्याचे काम हे पक्षी करत असतात. पण मानवाने आजकाल समुद्रात, खाडीत काहीही फेकायला सुरुवात केली आहे. इथल्या वाशिष्ठी नदीत अशीच घाण टाकली जाते. घाणीच्या पाण्यात हे पक्षी वावरत असतात. चिपळूणात होणाऱ्या मटण आणि चिकन विक्रीनंतर शिल्लक राहाणारी घाण, कोंबड्यांची पिसं मोठ्या प्रमाणात वाशिष्ठीच्या खाडीत फेकली जातात. कचरा पाण्यात टाकला की तो विरघळून जातो किंवा संपून जातो असा मानवी समुदायाचा भयंकर समज झालेला आहे. पण निसर्गात तसं काही होत नाही. पाणपक्षी ही पिसं खाऊन साफसफाई किती करणार ? ह्या पिसांना फार थोड्या प्रमाणात मांस चिकटलेलं असतं. ते मांस खाण्याच्या प्रयत्नात पक्षी अनेकदा अख्खी पिसं खातात. निसर्गनियमानुसार पक्षी पिसं खातात, ती त्यांच्या विष्ठेतून बाहेरही पडतात. पण याचे प्रमाण ठरलेलं आहे. एखादं पिसं ठीक आहे. पण इथे पिसांचा अख्खा जुडगा खाण्याचा प्रयत्न पक्ष्यांकडून होतो. जो पुढे त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो. वर्षातून एकदा सायबेरियातून येणाऱ्या व्हाईट स्टॉर्कचं रेकॉर्ड चिपळूणला खूप कमी झालेलं आहे. आता तोही ही पिसं खाऊ लागला आहे. मानवाने फेकलेले आपल्या खाण्याजोगे आहे असे पक्ष्याला वाटते. कधीकधी त्याला प्लास्टिक आदींचा डीस्टर्बन्स जाणवतो. प्लास्टिक खाल्यामुळे पक्ष्याचा मृत्यू होतो. यातून त्याचं स्थलांतर जीवन अपूर्ण राहतं. तो त्याच्या मूळ अधिवासात पोहोचू शकत नाही. त्याच्या विणीत अडचणी निर्माण होतात.

विणीच्या काळात लागणाऱ्या वणव्यांमुळे शिकारी पक्षी आणि मोरासारख्या गवताळ प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी संपुष्टात येतात. अनेक साप मारले जातात. जैवविविधता संपते. निसर्ग रचनेत गवताळ पट्टा महत्वाचा आहे. जंगलात शाकाहारी प्राणी असतील तरच मांसाहारी प्राणी जगू शकतात. वणव्यामुळे हे निसर्गचक्र बिघडतं. ओढ्या-नाल्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू, औषधांच्या बाटल्या फेकल्या गेल्याने प्रदूषणाद्वारे पक्ष्यांच्या पायांना आणि चोचींना वेगवेगळे रोग, फोड होताहेत. पक्षी चालू शकत नाहीत. आपलं पूर्वांपार प्रदूषित पाणी आणि सध्याच्या प्रदूषणाने युक्त पाणी वेगळं आहे. पूर्वी शेवाळ आलंय म्हणजे पाणी खराब झालंय म्हटलं जायचं. सध्या चिपळूण जवळच्या लोट्यातील कारखान्यांच्या रासायनिक प्रदूषणाने म्हशी मरताहेत तिथं पक्ष्यांची काय व्यथा वर्णावी ?

चिपळूणात एका ब्लॅकबर्डने तीन पिल्लं दिली. नेमकी तिन्ही कावळ्याने खाल्ली. त्याचं हंगामात क्षमता शिल्लक असल्याने पुढच्या दोन-चार दिवसात ब्लॅकबर्डने पुन्हा दोन अंडी दिली. कालांतराने दोन पिल्लांचा जन्म झाला. त्यातलं एक पिल्लू मेलेलं किंवा अधू झाल्याने मरत आलेलं ब्लॅकबर्डने स्वतः चोचीने उचलून घरट्याबाहेर नेऊन ठेवलं. गेली दोन वर्षे (२०१९-२०२१) हा ब्लॅकबर्ड नेमकेपणाने आठ जूनला विशिष्ट ठिकाणी अंडी घालायला सुरुवात करत असल्याची नोंद आहे. या ब्लॅकबर्डची आजवर या एकाच ठिकाणी चार घरटी झालीत. कदाचित त्याला दुसरीकडे जागाच मिळत नसल्याने तयार होणारी पुढची वीणही इथलीच जागा निवडत असावी. या जागेच्या जवळपास सुरक्षित जागाही शिल्लक राहिलेली नाही. भारद्वाज, कावळा, मलकोवा (कावळ्याच्या कुळातील) हे पक्षी या छोट्या पक्ष्यांची अंडी, पिल्लं पळवत असतात. अलिकडे हे प्रमाणही वाढलेले आहे. शिकारी पक्ष्यांना दुसरं काही खायला मिळत नाही म्हणून हे अंडी आणि पिल्लं खात आहेत का ? हे तपासायला हवं आहे. हीच कथा इंडियन पिट्टा या पक्ष्याची आहे. या स्थानिक स्थलांतरित पक्ष्याने चिपळूणला लाईटच्या पोलवर घरटी केलीत. कदाचित ब्रीडिंगमध्ये त्रास होऊ शकतो. पाऊस जास्त पडणार आहे. वादळ येऊ शकते. असाही विचार यामागे असावा. यंदा (२०२१) चिपळूण भागात दीड महिना अगोदर पाऊस पडला. इंडियन पिट्टाला डोमशेप घरट्याकरिता चिखलाची माती, मातीत असलेल्या काठ्या, काड्या आदी बेंड करून वापरायला हव्या असतात. विविध पक्ष्यांनी यावेळी पाऊस लवकर सुरु झाल्याने त्यांच्या विणीच्या हंगामाला नियमिततेपेक्षा लवकर सुरुवात करून पिल्लांना जन्म दिला आहे. चिपळूणात इंडियन पिट्टा आला की पुढील ३०/४० दिवसात पाऊस येत असतो. लाईटच्या पोलांवर केलेल्या या घरट्यांपैकी तीन घरटी संपुष्टात आलीत. दाबली गेलीत, नीट बसली गेली नसावीत. वीण पूर्ण झालेली नाही. टॉमी बॅबलर (गुजरात) नावाचा छोटासा स्थलांतरित पक्षी १ जुलैला चिपळूणात दिसायला लागतो. ८ जुलैला तो घरटे करायला सुरुवात करतो. ही गोष्ट मागील ३ वर्षांच्या (२०१८-२०२०) नोंदींवरून निश्चित झालेली आहे. स्लॅटिंग लेग क्रेक (पाण कोंबडी) नावाचा पाणपक्षी आहे. चिपळूणात सध्या तो ना पाण्यात राहातो ना जंगलात राहातो. अर्धवट डबकी साठलेल्या पाण्यात त्याचे वास्तव्य आहे. जंगल हा त्याचा अधिवास नाही. त्याने पाणथळ जागी राहायला हवं आहे. त्याचा मूळ अधिवास डिस्टर्ब होऊन तो दुसरीकडे सरकला असावा. जंगल आणि पाणथळ जागा येथील डिस्टर्बमुळे तो मधल्यामध्ये अर्धवट डबक्यांच्या परिसरात भटकतो आहे. सध्या याही पक्ष्याचा विणीचा हंगाम (ब्रीडिंग) आहे. पण आता या पक्ष्याला, नेमकं कुठल्या डबक्यात घरटे करू हे समजेनासं झालं असावं. कारण आज तो घरटे करायचा आणि उद्या खणलेला एखादा खड्डा ढासळायचा. त्यात एखादा बांधकामाचा पिलर उभा व्हायचा किंवा एखादी पाण्याची सिंटेक्सची टाकी बसायची आणि त्याची घरटे करायची मेहनत फुकट जायची.

चिपळूणात पाण्याची तळी किंवा पाणी साठण्याच्या जागा कमी होत चालल्यात. शहरातील भोगाळे, माधव सभागृह आदी नजीकची तळी किंवा पाणी साठण्याच्या जागा, पूर्वीच्या दलदलीच्या जागा (वेडर बर्ड्स) कमी झाल्यात. नारायण तलाव अजून हवा तसा बहरला नाही. विंध्यवासिनी, रामतीर्थ तलाव, गांधारेश्वर परिसर, गुहागर बायपास रोड, धामणवणे, टेरव भागात अजूनही पक्षीवैभव टिकून आहे. पण तिकडेही डोंगरांचे लचके तोडून बिल्डींग बांधण्याचा विकास कार्यक्रम सुरु आहे. हे कदाचित असंच सुरु राहिलं तर भविष्यात चिपळूणच्या आजूबाजूचे सारे डोंगरी वैभव संपेल. शहरातील वळचणीच्या जागा संपल्याने चिमण्या गायब झाल्यात. आजही जिथे त्यांना योग्य जागा भेटतात, तिथे त्यांचा अधिवास आहे. बहाद्दूरशेख नाक्यावर गणेशोत्सव होत असलेल्या ठिकाणी एका मोठ्या उंबराच्या झाडावर किमान सहाशे चिमण्या पूर्वी मोजल्या गेल्या होत्या. आज यातल्या चिमण्या जवळच्या ओअॅसिस हॉटेलच्या पाठीमागील भागात दिसतात. शहरतील मध्यवर्ती बस स्थानकानजीकच्या दत्तमंदिर भागातील झाडांवर चिमण्या येतात. चिपळूणच्या रामतीर्थावर हल्ली फारसे कावळे फारसे दिसत नाहीत. ते रेडी टू युज मटेरियल (अन्न) घ्यायला कोकण रेल्वे ट्रॅकवर बसलेले असतात. रेल्वे ट्रॅकवर लोकांकडून फेकले जाणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी चिमण्या, साळुंख्या, कावळे येतात. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म शेडच्या कोनातल्या आडोश्यात हे पक्षी घरटी करतात. विशेष म्हणजे साळुंख्या रात्रीच्याही जाग्या असतात. रात्री दोन वाजता एखादी रेल्वे गाडी येणार असेल तर ह्या ओरडायला लागतात. गाडी येऊन गेल्यावर ट्रॅकवर एखादं दुसरा राऊंड त्या मारतात. हे चित्र भारतभर पाहायला मिळतं. या ट्रॅकवर ड्रॉन्गोही (कोतवाल) असतात. पण ते हे अन्नपदार्थ खात नाहीत. ते अन्नावरचे किडे खातात. जेव्हा स्टेशनवर रेल्वे येते. तेव्हा आजूबाजूचे गवत उडते. सोबत गवत, झाडी-झुडूपालेकिडे वाऱ्याने उडतात. ते खायला ड्रॉन्गो उपस्थित असतात.

चिपळूणच्या प्रसिद्ध सवतसडा धबधबा परिसरात विशेषतः विणीच्या हंगामात दिसणारा फाल्कन (पेरिग्रीन किंवा शाईन) हा जगातील सर्वाधिक वेगाने उडणारा पक्षी आहे. तो ताशी ३४० किमी वेगाने उडतो. इथल्या वन्यजीव अभ्यासकांचा त्यावर गेली ५ वर्षे अभ्यास सुरु आहे. सवतसड्याच्या ९० टक्के उंचीवर दगडाच्या कपारीत हा आपले घरटे करतो. नर-मादी उघड्या कातळाच्या कपारीत पिल्लांना वाढवतात. अजूनतरी या पक्ष्याला फारसा डिस्टर्ब झालेला नाही. या फाल्कनची पिल्लं अंड्याबाहेर येईपर्यंतचा यांचा विणीचा हंगाम एक महिन्याचा असतो. त्या नंतर महिनाभर पिल्लं घरट्यातच वावरत असतात. तेव्हा ती नर-मादीपेक्षा मोठी दिसतात. यंदा (२०२१) फाल्कन जोड्याला आपल्या दोन पिल्लांना अन्न आणायला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याची नोंद आहे. कारण परिसरातील अन्नाची उपलब्धी कमी झालेली आहे. पाचेक वर्षांपूर्वी हे अन्न लवकर आणलं जायचं. अन्नात विशेषता असायची. तीही कमी झाली आहे. पाऊणएक तास फाल्कन अन्न घेऊन येत नाही तेव्हा पिल्लं बराच वेळ घरट्यात ओरडत असतात. उन्हाळ्यात पिल्लांना अॅक्टीव्ह होईपर्यंत पाणी मिळत नसतं. ते त्यांना अन्नातून घ्यावं लागतं. पिल्लांना दिवसातून किमान ४/५ वेळा पाण्याचा अंश असलेलं मांसल अन्न आणावं लागतं. ते प्रमाणही कमी झालंय. अलिकडच्या लॉकडाऊन काळातील ताज्या नोंदीनुसार (मे २०२१) अडीच तासात पक्षी २/३ वेळा तेही तुलनेने कमी अन्न घेऊन आला होता. एकदा तर सकाळच्या अडीच तासात ४ वेळा आणि संध्याकाळी ३ वेळा पक्ष्याने पिल्लांकरिता अन्न आणलं होतं. याचे मुख्य कारण या भागातला वणवा असावे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस विणीच्या हंगामात फाल्कनचे चिपळूणात अधिकचे दर्शन घडू लागते. त्या नंतरचे पुढचे तीन महिने कोकणात वणवे लावायचा विकृत उद्योग सुरु असतो. सवतसडा धबधबा परिसरातली वालोपे आणि परशुराम हद्दीत दरवर्षी न चुकता वणवा लागतो. मग याला तर अन्न तरी मिळणारं कसं ? किमान २० चौरस किमी परिसरात फाल्कन अन्नाकरिता फिरतो. यास्तव तो चिपळूणच्या बाहेरही जाऊ शकतो. पण विणीच्या हंगामात पिल्लांची ओढ त्याला फार दूरवर जाऊ देत नाही. पूर्वी फाल्कन सकाळच्या वेळी वीसेक मिनिटात पिल्लांसाठी अन्न घेऊन यायचा. तेव्हा एकाला वाट पहावी लागायची. अशा नोंदी करणाऱ्या पक्षी अभ्यासकांना, ‘सध्या नर-मादी पैकी एकाला अन्न मिळालेलं असतं आणि एकाला नाही. मादीला अन्न मिळालं तर नर तिच्या मागावर येतो. पण त्याच्याजवळ अन्न नसतं. तो फक्त पिल्लांना बघून परत जातो.’ असं लक्षात आलं आहे.

काही झाडाच्या फुलांमध्ये मकरंद (नेक्टर) मोठ्या प्रमाणात असतो. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे हा मकरंद पक्ष्यांसाठी अमृतासारखा असतो. यात पाणी, गुल्कोज (साखर), तणाव कमी करणारे घटक असतात. सावरीच्या फुलांमधून हे कंटेंट सर्वाधिक प्रमाणात मिळतात. म्हणूनच या झाडावर एका वेळेला ८/९ जातीचे किमान २८ ते ३२ पक्षी नोंदविण्यात आलेले आहेत. अनेकदा आपल्याला पक्षी फुलातून मध घेतात असं वाटतं, पण तसं नसतं. तसेच प्रत्येक फुलातील मकरंदाची चव वेगळी असते. मोबाईल टॉवरचा पक्ष्यांना फारसा फरक पडत नसावा, अशी इथली नोंद आहे. विमानांप्रमाणे पक्ष्यांचे भ्रमणमार्ग बऱ्यापैकी निश्चित असतात. स्थानिक स्थलांतरित पक्षांचेही स्वतःचे भ्रमण मार्ग ठरलेले आहेत. या भ्रमण मार्गात जर कुठे मोबाईलचा टॉवर आला तर पक्ष्यांना डिस्टर्ब होऊ शकतो. पण मोबाईल रेंजच्या प्रभावाने पक्षी मरू शकतो असं वाटतं नाही. रोडकिलवर मरणारी जनावरे हे निसर्ग साखळीचा भाग आहेत. रोडकिलमध्ये इंडियन पाम सिव्हेट, पाम सिव्हेट या दोन जातीच्या मांजरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. रात्री प्राण्यांची आणि गाडीवाल्यांची एकच वेळ असते. याची काळजी वाहनचालकांनी घ्यायला हवी आहे. समोर एखादं जनावर, छोटासा प्राणी दिसत असेल तर त्याच्यावरून गाडी नेऊ नका याचं शिक्षण गाडी चालकांना द्यायला हवं आहे. साधारणपणे दर आठमागे एका पक्ष्यांची जात आपल्याकडे नष्ट होते आहे. ८/१० किड्यांमध्ये एखादा नष्ट होतो आहे. प्राण्यांमध्येही हे सुरु आहे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेप ही या मागील कारणे आहेत. प्रदूषणाचा परिणाम पक्ष्यांवर आणि त्यांच्या विणीच्या हंगामावर होतो. पक्ष्यांना पाण्यातलं प्रदूषण मारक ठरत. कारण इथलं पाण्यातलं प्रदूषण स्थलांतरित पक्ष्यांद्वारे हिमालयातल्या पेंग्विनपर्यंत जाऊन पोहोचतं.

पक्ष्यांबद्दलच्या गमतीजमती, पक्ष्यांची हालचाली, त्यांचे वागणे, विशिष्ठ कालावधीत आणि वातावरणात बदल समजून घेणे औत्युक्याचे असते. पक्षी हे पिल्लांना वाढवण्यासाठी, प्रजननासाठी घरटे करतात. खंड्या पक्षी मातीच्या जागेत बीळ करतात. कबुतर छोट्या मोठ्या काट्या-कुट्यानी घरटे बांधतात. सुगरणीचे घरटे सर्वाना मोहित करते. अवघी एक चोच आणि दोन पाय असलेले पक्षी खूप सुंदर घरटी बांधतात. उन्हाळ्यात नदीच्या काठाने पक्षी निरीक्षणासाठी फिरताना पाणी कमी झाल्याने तयार झालेल्या छोट्या छोट्या पाण्याच्या जागापक्षी निरीक्षणासाठी सर्वोत्तम असतात. अशा जागांपासून आपण नीटसे कॅमॅफ्लाज होऊन आपण दूरवर थांबलो तर चांगले पक्षी बघायला मिळू शकतात. एकदा चिपळूण पट्ट्यात एक लिटील हेरॉन आपल्या चोचीनं एकेक फुल उचलून पाण्यात टाकत असल्याचं निदर्शनास आलं. कुतूहल चाळवलं म्हणून निरखून पाहिल्यावर फुल टाकल्यावर तो थोडावेळ स्तब्ध राहात असल्याचं जाणवलं. हा पक्षी असा का करतोय ? असा प्रश्न निर्माण झाला. नंतर लक्षात आलं की त्या फुलांच्या निमित्ताने तो पाण्यातल्या छोट्याछोट्या माश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे. फुलांनी पाण्यावर उठणारे तरंग बघून मासे आकर्षित होतील आणि त्याला सहज भक्ष्य मिळेल अशी त्याची योजना होती. दलदल, गटार, डबक्यामध्ये वाढणारा पाँड हेरॉन, अत्यंत स्तब्ध आणि शांतपणे एकाजागी बसून आपल्या भक्ष्यावर नजर स्थिरावून असलेला पर्पल हेरॉन (जांभळा बगळा) असे सात प्रकारचे हेरॉन चिपळूण परिसरात दिसतात. लिटील इग्रेट पाण्यामध्ये फार सुंदर नाचतो. पायाच्या व्हायब्रेशन द्वारा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग निर्माण करून पाण्यातील, डबक्यातील गांडूळ, बेडूक, लहान मासे आदी भक्ष्य अधिक जवळ आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो. चिपळूणात कॉपर स्मिथ, व्हाईट चिक आणि ब्राऊन हेडेड बार्बेट हे तीन प्रकारचे तांबट (बार्बेट) दिसतात. प्रजननाच्या कालखंडात बार्बेट वाळक्या झाडाच्या फांदीवरत ठोके मारताना दिसतात. पदार्थाची घनता तपासण्यासाठी असे ठोके मारले जातात. डॉक्टरही रुग्णाच्या शरीरावर हाताच्या बोटाने असे ठोके मारून तपासणी करतात. कॉपरस्मिथ बार्बेट पक्षी झाडाच्या खोडाच्या कोणत्या भागात घरटे बनवायचे आहे ? याचा अंदाज घेताना चोचीने असे ठोके मारतो. यावेळी लाकूड आतमध्ये कुजलेले, वाळवी लागलेले नाही ना ? आपल्याला घरटे करायला ते कितपत कठीण जाईल ? असे विचार तो करत असावा. चिपळूणात रोजरिंग पॅराकीट (पोपट), प्लम हेडेडपॅराकीट, अलेक्झांडर पॅराकीट हे तीन दिसतात. यांच्यातला नर हा मादीला रिझवण्यासाठी स्वतः खाऊन आलेलं अन्न उलटी करून तिला भरवत असतो. विणीच्या हंगामात स्वतःचे रंग बदलून अधिक आकर्षक होणाऱ्या या नर पोपटाचे काम अन्न आणून देणे हेच असते. युरेशियन रायनॅक हा पक्षी चिपळूण विभागात गेली चार वर्षे दिसतो आहे. वाळवी, किडे, कीटक खातो. हा पक्षी आपल्याकडे युरोपमधून येतो. तिकडून येणारा हा एकमेव सुतार पक्षी आहे. हा स्वतःची मान १८० अंशात वळवतो म्हणून याला मानमोड्या असेही म्हणतात.

गेली पाच सहा वर्षे प्रथमतः नोंद केलेला पॅलीड स्कोप्स आऊल (घुबड) पक्षी इराण-इराकमधून इथे येतो. पांढरा करकोचा (व्हाईट स्टॉर्क) युरोप आणि कझाकिस्थान येथील मूळचा पक्षी आहे. तिथे त्याचे प्रजनन होते. थंडीचा काळ तो आपल्याकडे खाडीत घालवतो. किमान १५ ते २० हजार फुट उंचावरून अनेक पक्षी स्थलांतर करून येतात. पाणथळ जागी स्थलांतर करतात. अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेला पाणकावळा (लिटील कॉर्मोनंट) पाण्यात पोहोतो आणि हवेतही उडतो. मोठा श्वास घेऊन पाण्यात उडी मारून खाद्य पकडण्यात तो कमालीचा तरबेज आहे. ओले पंख सुकविण्यासाठी पाणकावळाही सनबाथ घेत असतो. या पाणकावळ्यांच्या पंखांमध्ये एक स्त्राव किंवा तेल सदृश्य घटक असतो. कोलगेटची पेस्ट जशी किंचित दाबल्यावर बाहेर येते, तसा हा स्त्राव पिसांतून बाहेर येत असतो. बाहेर ऊन यायच्या आधी आणि पाण्यात जायच्या आधि तो आपल्या पिसांना चोचीच्या साहाय्याने हास्त्राव लावतो. पाण्यात त्याला काही अडथळा जाणवला तर त्याला सहज पाण्यातून बाहेर झेप घेता आली पाहिजे. म्हणून ही सोय असते. पाण्यामधून बाहेर पडून उडण्यासाठी लागणारी स्त्रावाची वेगळी क्षमता आणि कौशल्य याच्या पिसांत असते. पंख सुकविणारा किंग फिशर, ओरिएन्टल डार्टरही असाच आहे. सगळ्या पाणपक्ष्यांमध्ये हे चालू असतं. पण पाण्याशी अधिकचा संबंध असणाऱ्या पाणकावळ्यात हे प्रमाण अधिक आहे.

या पक्ष्यांची किंवा वन्यजीवांची फोटोग्राफी हे एक आव्हान आहे. इथे मानवी संयमाचा कसं लागतो. संयम नसलेल्या मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षी अंडी सोडून जाण्याच्या किंवा नवतर पक्ष्याला जन्माला आलेली पिल्लं अर्धवट सोडून जातो, काहीवेळा पक्षी घरटे सोडून जातो अशा घटना घडतात. त्यामागे अन्न मिळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे का ? उंदीर, पाली, झुरळांवर सर्वत्र जंतुनाशके मारली जातात. याचा त्रास ह्यांच्यावर गुजराण असलेल्या पक्ष्यांना होत असावा. भाजी-फळांवर जंतुनाशके मारली जातात, याचाही त्रास होत असावा. ही कारणे आहेत का ? यावरही संशोधन व्हायला हवे आहे. तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर) हा सगळे रंग असलेला हा पक्षी आहे. भारतातले सगळे लोकं याला पाहायला चिपळूणला येतात. तिबोटी खंड्यानेपाली किंवा मासे आणून मादीला भरविण्याची दृश्ये उत्साहवर्धक असतात. छायाचित्रकार तिबोटी खंड्याचा चांगला फोटो मिळवण्याकरिता त्याच्या घरट्याजवळ असलेली अडचणीची ठरणारी झाडेझुडपे, गवत काढतात. घरट्याजवळ एखादी काठी लावतात. जेणेकरून पक्षी त्या काठीवर बसला तर सुंदर फोटो टिपता येईल. पण यातून पक्ष्याचा अधिवास डिस्टर्ब होतो, दिनक्रम बिघडतो. कधीकधी पक्षी पिल्लं सोडण्याच्या घटना घडतात. पुढे पिल्लांना मुंग्या लागल्याच्या घटना घडल्यात. म्हणून न जमल्यास पक्ष्यांचा फोटो काढू नये पण पक्ष्याला त्रास होईल असं वर्तन अजिबात नसावं. पक्ष्यांची फोटोग्राफी सुरक्षित अंतरावरून संयमपूर्वक व्हायला हवी. ब्लॅक ईगल थंडीच्या दिवसात स्थलांतरित होऊन चिपळूणात येतात. भारतात फार कमी लोकांना या पक्ष्याचे बसलेल्या अवस्थेतील फोटो मिळाले आहेत. फ्लॉवर पेकर (फुलटोचा) भारतात दिसणारा सर्वात छोटा पक्षी चिपळूणात दिसतो. पावसाळ्यात सक्रीय असणारे बुशस्क्वेल, बार्ट बुशस्क्वेल, फ्रॉग माऊथ आदींची फोटोग्राफी करताना निसर्गाची काळजी घ्यायला हवी. छोटासा टेलर बर्ड हा घरटे बनविताना कोळ्याच्या जाळ्याचे मटेरियल वापरत असतो. चिपळूणात स्थलांतरित चातक पक्षी (जेकोबीन कक्कू; पावश्या नव्हे) हा गेली काही वर्षे ठरलेल्या विशिष्ठ काळात एक दिवसाच्या फरकाने दिसतो आहे. स्थलांतरित आहे. आपण अनेकदा निसर्गाचे, त्यातल्या या जीवांचे छान फोटो काढतो, पण नंतर आपल्याला या संदर्भातील काहीही लक्षात राहात नाही. म्हणून या निसर्गाचे व्यवस्थापन करायला, नोंदवही लिहायला आपण शिकायला हवं. आपल्या नोंदीत पक्षी दिसलेल्या भागाचे नाव, तारीख, वेळ हवामान, तापमान, अधिवास, खानपान, वर्तन, घरट्याचा आकार, वापरलेले साहित्य आदी लिहायला हवं.

पक्ष्यांचे जीवन प्रयोगशाळेतील लिटमस पेपरसारखे आहे. पक्षी हे निसर्गातील बदल आपल्या कृतीतून सांगण्याचा प्रयत्न करतात. मानवाने स्वतःच जगणं सुखकर होण्यासाठी निसर्गात अनेकविध बदल घडवलेत. त्याच्या फटका जैवविविधतेतील घटकांना बसला आहे. त्यांच्या जगण्या-वागण्याच्या पद्धती, हालचाली, खानपान यांमध्ये बदल झालेला आहे. आज मनुष्य पैशासाठी, कुटुंबासाठी जीवन जगतोय. पूर्वी असं नव्हतं. हे आजही आपल्याला निसर्गाच्या सानिद्ध्यात राहणाऱ्या माणसांमध्ये गेल्यावर जाणवतं. पक्ष्यांचा अधिवास झपाट्याने संपुष्टात येत असल्याने बालपण जगणाऱ्या सध्याच्या पिढीला जैवविविधतेतील हा ठेवा भविष्यात अनुभवता येईल का ? हा प्रश्न आहे. पूर्वी आपल्याकडे घरांच्या वेगवेगळ्या रचना होत्या. अंगणं शेणाने सारवलेलं असायचं. वाडे-गोठे, गाई-गुरं असायची. यामुळे पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित होता. आज हा अधिवास संपुष्टात आलेला आहे. आजूबाजूच्या डोंगरावर जाऊन चिपळूणात डोकावलं तर फक्त आणि फक्त सिमेंटचं ‘विकासाभिमुख’ जंगल दिसतं. हे जे चिपळूणला झालंय ते हळूहळू आजूबाजूच्या खेडेगावात होतंय. थोड्याफार फरकाने कोकणातील अनेक शहरांतील हे चित्र आहे. म्हणून निसर्ग टिकवून काळानुसार निसर्ग बदललं पाहिजे. मानवाने पक्षी बघायचा आनंद जगायला सुरुवात केली तर त्याला निसर्ग कळत जाईल.

पक्ष्यांच्या अशा नोंदी असलेल्या चिपळूणात पुढीलवर्षी (२०२२) नेक्टर फेस नियोजित आहे. यासाठी पळस, पांगारा आणि काटेसावर आदी फळे-फुलांनी बहरणाऱ्या झाडांना गृहित धरले जाते. मार्च ते मे महिन्यात आपल्याकडे यांसह विविध झाडांवर पक्षी असतात. त्या झाडांसमोर पक्षीप्रेमींना बसविले जाणार आहे. पक्षीप्रेमीं दुर्बीणीच्या साहाय्याने पक्ष्यांच्या नोंदी करतील. वन विभाग रत्नागिरीचे (चिपळूण)विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनी वेबीनारच्या माध्यमातून या नोंदी समाजासमोर आल्या. निलेश बापट यांच्यासह पक्ष्यांचे वैज्ञानिक वर्गीकरण डॉ. श्रीधर जोशी, पक्ष्यांची फोटोग्राफी नयनीश गुढेकर आणि निसर्ग डायरी लेखन याबाबत प्रा. डॉ. हरिदास बाबर यांनी केलेल्या मांडणीमुळे मागील किमान पाचेक वर्षातील चिपळूणच्या पक्षी जगतातील महत्वाच्या नोंदी नव्याने अपडेट झाल्या हे नक्की !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

सर्व छायाचित्रे : डॉ. श्रीधर जोशी आणि नयनीश गुढेकर (चिपळूण)






रविवार, २५ जुलै, २०२१

कोयनेच्या जंगलातील व्याघ्रदर्शन

 

पूर्वीच्या कोयना अभयारण्यामध्ये (सध्याचे सह्याद्री टायगर रिझर्व्ह) पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना सुरु झाली, तेव्हाची घटना. आपल्या जंगलांना प्राणीगणना नवीन नाहीत, त्या पूर्वीही व्हायच्या. २००८ पर्यंत प्राणीगणनेत भरपूर फिरायचं, हिंडायचं, जंगलं अनुभवायचं असं चालायचं. फॉरेस्ट गार्डस्, वनमजूर, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आदी मंडळी एकमेकांजवळ माहितीचं, अनुभवांचं आदानप्रदान करायचे. कोयनेच्या जंगलासाठी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्यांदा २००९ मध्ये शास्त्रीय प्राणीगणनेचे आदेश आले. २०१० साली ही शास्त्रीय प्राणीगणना निश्चित झाली. त्यावेळी कोयनेच्या घनदाट जंगलात रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या बावीस मीटर अंतरावरून ऑनफूट वाघ पाहिला होता. जंगलातल्या त्यांच्या चित्तथरारक अनुभवाची ही कहाणी आहे.

सर्वाधिक घनदाट म्हणून प्रसिद्ध असलेले कोयनेचे अभयारण्य हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या साथीने पसरलेले आहे. शिवकालीन इतिहासापासून जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याला जलाशयाची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. या जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूचा अभयारण्याचा बहुतांश भाग घनदाट आहे. या अभयारण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीची मुख्यरांग आणि दुसऱ्या बाजूच्या उपरांगेमधून कोयना नदी वाहते. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ‘बाबू कडा’, अभयारण्यातील सर्वोच्च वासोटा किल्ला या जंगलात आहे. दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात वर्षाला सरासरी ५००० मि.मी. पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता असलेल्या अशा या अभयारण्यात पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना होणार होती.


नियोजनानुसार गार्ड, फॉरेस्टर किंवा वनपाल यांचेकडून विविध बीटातील सहभागी सदस्यांना ठराविक जंगल क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या भागात किमान हजारभर आणि कमाल दोन हजार मीटरच्या ट्रॅन्झॅक्ट लाईन टाकून तिचे २०० मीटरचे तुकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने ही ट्रॅन्झॅक्ट मेथड लाईन (रेषा विभाजन पध्दती) विकसित केलेली होती. उत्तम नोंदींकरिता ओढ्या-नाल्यांना क्रॉसलाईन टाकली जाणार होती. प्राणीगणना करणाऱ्या टीम सोबत एक फॉर्म दिला जाणार होता. त्यात जंगलांचे आच्छादन, एक हजार मीटर ट्रॅन्झॅक्ट लाईनचे दोनशे मीटरचे तुकडे केल्यावर त्या प्रत्येक तुकड्यातील महत्त्वाच्या माहितीची नोंद होणार होती. जंगलातील पायवाटांच्या दुतर्फा चौकोन, काही ठिकाणी वर्तुळं आखली जाणार होती. एखादा प्राणी डावीकडून उजवीकडे किंवा उलट दिशेने पाणवठ्याकडे गेला आहे का ? जंगल वाटांवरून खाली किंवा खालून वर प्राणी गेला आहे का ? प्राण्यांच्या विष्ठा कोणत्या भागात मिळत आहेत ? आदी प्रत्यक्ष पाहिलेल्या नोंदी फॉर्ममध्ये करून वन्यजीवांचा अंदाज घेतला जाणार होता. तेव्हा आजच्यासारखे कॅमेरा ट्रॅप नव्हते.

वाघ किंवा बिबट्याच्या पायाचा ठसा मिळाला तर प्लॅस्टर कास्टिंग करून ठशाचे मोजमाप घेतले जाणार होते. एखादा ठसा साधारणत साडेसहा पावणेसात इंचापेक्षा अधिक असल्यास तो वाघाचा असल्याची शक्यता बळावणार हे नक्की होतं. एखादा ठसा थोडा छोटा असला तरी बिबट्या आणि वाघाच्या पिल्लाचा ठसा यातला भेद समजू शकणार होता. ही प्राणीगणना करताना पहिल्या दिवशी शाकाहारी प्राण्यांचा सर्व्हे, दुसऱ्या दिवशी मांसाहारी प्राणी, तिसऱ्या दिवशी वर्तुळासारख्या केलेल्या मार्किंगमधील विष्ठा पाहिल्या जाणार होत्या. पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे समजणारे आवाज नोंदवले जाणार होते. चौथ्या दिवशीपासून सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष जंगल गस्त (पायदळ) सुरु होणार होती. प्रत्येक दिवसाचा दुपारचा शिधा सोबत घेण्याच्या सूचना होत्या. पायदळीतून एका जंगलाच्या मोठ्या पट्यातील कोणत्या बीटात कोणते प्राणी दिसताहेत ? पायांचे ठसे, कोणत्या प्राण्यांचे आवाज येत आहेत ? प्राण्यांच्या भ्रमणानुसार एका बीटातून दुसऱ्या बीटात जाण्यासाठी काही जवळचे मार्ग आहेत का ? एखाद्या प्राण्याची विष्ठा मिळाली तर ती ताजी आहे का ? की आठवड्याभरापूर्वीची आहे ? आदी नोंदींच्या आधारे संपूर्ण जंगलाची माहिती संकलित करण्याचे नियोजन होते. विष्ठा आदी गोळा करायला पुरेसी साधने, लिहायला लेटरपॅडसोबत असणार होती. वन्यप्राणी, वन्यपक्षी, ठिकाणचे नाव आदी दहाएक नोंदी केल्या जाणार होत्या. जंगलात महत्वाच्या ठिकाणी, पाणवठ्यावर प्राण्यांच्या पायांचे उमटलेले ठसे चटकन कळावेत, प्लॅस्टर कास्टिंग चांगलं व्हावं या दृष्टीने मातीच्या चौकोनात, पीआयपी (पगमार्क इम्प्रेशन पॅड) अर्थात अगदी पुळण (वस्त्रगाळ) माती तयार केली जाणार होती. इम्प्रेशन पॅडमुळे जंगलात गस्त करताना अचूक माहिती मिळायला मदत होणार होती. मागील ८/१० वर्षांपेक्षा ही प्राणीगणना काहीशी वेगळी होती.


कोयना धरण ते नदीचा उगम हे अंतर सत्तरेक किमी असावे. जलाशयाभोवती किमान शंभरएक गावे वसलेली आहेत. देशातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र ‘खिरखंडी’ इथेच आहे. गावांचे दळणवळण लाँचसेवेवर अवलंबून आहे. संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. कोयनेचा जंगलातील भूप्रदेश अत्यंत रमणीय आहे. सह्याद्रीच्या अवघड भौगोलिक रचनेमुळे इथे रस्ते नाहीत. जंगलात असंख्य खोरी आहेत. त्यातल्या झुंगटी, पाली, मालदेव, रोहिणे, करंजावडे, शिरशिंगे, झाडोली, डिचोली, किसरुळे, आंबेघर, आंबेगाव आदी पंधराएक गावांची बीट (खोरी/उपखोरी)तयार केली होती. या बीटातील टीमना ८४ हेक्टर, ९० हेक्टर अशी जंगलांची विभागणी करून देण्यात आली होती. प्रत्येक बीटात एक फॉरेस्ट मजूर किंवा गार्ड, बाकीचे तिघे पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आदी चार सदस्य सहभागी होते. संपूर्ण जंगलातल्या झुंगटी, पाली, मालदेव या बीटात वन्यजीवांच्या हालचाली तुलनेने अधिक असल्याची प्राथमिक माहिती होती. ऐकीव माहितीनुसार जंगलातील आडोस-माडोसपासून बामणोली पर्यंतच्या भागात पट्टेरी वाघाचा वावर होता. पट्टेरी वाघ अगदी चकदेव-परबत पर्यंत फिरायचा.

निलेश बापट यांचा समावेश असलेल्या बीटमध्ये, तीसेक वर्षे कोयनेच्या जंगलात मजूर म्हणून वावरणारे बापू गुरव हे जंगलातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. मध्यम उंची, काळ-सावळा रंग, प्रौढत्वाकडे झुकलेली पण काटक शरीरयष्टी, कंबरेला कोयता आणि अर्धेअधिक टक्कल पडलेल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांचे धनी बापूंचा जन्म कोयनेच्या जंगलातला. जन्मापासून रात्री-अपरात्री जंगलातून चालायची सवय असल्याने त्यांना इथल्या सगळ्या वाटा माहित. कोयना भागात कोणीही अधिकारी आले तरी ते जंगल फिरताना बापूंना हमखास सोबत न्यायचे. कोयनेच्या जंगलाला वाहून घेतलेल्या बापूंचे योगदान इतके मोठे की आजही कोयनेच्या जंगलात काही ठिकाणी बापूंच्या फोटोची पूजा केली जाते. बापट यांच्यासारखे अनेक वन्यजीव अभ्यासक बापूंकडून बारकाईने जंगल वाचायला शिकलेले. तर असे हे बापू आपल्या बीटात असावेत असं प्रत्येकाला वाटायचं. निलेश आणि बापूंच्या बीटात तेव्हा चिन्मय ओक आणि आदित्य जोशी हे दोघे अन्य पर्यावरणप्रेमी होते.


आजचा पहिला दिवस हा सर्वांना विविध बीटाच्या भागात सोडण्यात जाणार होता. कोण कोणाच्या बीटात यांची नोंद आणि शिधावाटप वगैरे होऊन सगळ्यांना घेऊन कोयना धरणाच्या जवळून भन्नाट वाऱ्याच्या साथीने महाराष्ट्र शासनाची वनराणी लाँच निघाली. लाँचमधल्या काही जणांचे ट्रेनिंग झालेले होते. ट्रेनिंगमध्ये वाघाच्या ठश्यांचे प्लॅस्टर कास्टिंग कसे करायचे ? ठसे कसे मोजायचे ? ते कागदावर कसे उतरवायचे ? आदी माहिती देण्यात आली होती. जंगलात कोणत्याही प्रकारचे मद्यपान करायला बंदी होती. जंगलातील प्रत्येक पानावर जंगलाचाच हक्क असल्याने तिथून काहीही बाहेर न्यायला परवानगी नव्हती. मानवी गंध प्राण्यांना किमान १/२ किमीपर्यंत समजत असल्याने परफ्युम वगैरे वापरल्यास वन्यजीव दिसणं अशक्य होईल. यास्तव ते न वापरणे, जंगलात एकटे-दुकटे विनाकारण न फिरणे, जंगलात मोठ्याने बोलणे, हसणे टाळणे आदी सूचनांसह काच, लेटरपॅड, स्केचपेन, मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे साहित्य आणि ७/८ किलो तांदूळ, तेल, मसाला असा शिधा सोबत देण्यात आला होता. कोयनेतून सुटलेली लाँच सर्वांना बीटनुसार सोडत पालीच्या खोऱ्यात पोहोचेपर्यंत सायंकाळचे ४ वाजले. पुढे ही लाँच कोयना जंगलाची शेवटची रेंज असलेल्या ताकवली-मालदेव बीटापर्यंत पोहोचली. तिथून परत फिरून बामणोलीला गेली.

बापू, निलेश, चिन्मय आणि आदित्य यांना लाँचनेज्या पालीच्या पट्ट्यात सोडले तिथे धरणाच्या बॅकवाटरला लागून असलेल्या गर्द जंगलात एक तीन मजली सिमेंट काँक्रीटचा वॉचटॉवर होता, अजूनही तो वॉचटॉवर आहे. वॉचटॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर या चौघा मंडळींचा मुक्काम असणार होता. आवश्यकतेनुसार बॅटरी आणि चूल वगळता रात्रीच्या अंधारात आकाशातील चंद्रकोर हाच काय तो प्रकाश सोबतीला होता. आपण जंगलात आहोत याची सतत जाणीव करून देणारा रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज, अंगाला झोंबणारा गार वारा आणि जलाशयातील पाण्याच्या लाटांच्या चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक आवाजाच्या साथीने दिवस जाणार होते. सह्याद्रीची पर्वतरांग, घनदाट जंगल, हिवाळ्यात दिसणारे हिरवेगार डोंगर, जंगलातील पायवाट, पाणवठा, वन्य प्राण्यांचा सहवास, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, औषधी वनस्पती अशा वातावरणात रात्री घालवण्यात थ्रिलिंग असणार होते. मंडळींनी वॉचटॉवरच्या पायथ्याशी असलेल्या एका झाडानजीकची सवयीच्या जागेवरील चूल नीटशी केली. उघड्यावर जेवण करायचं होतं. पाऊस आला तर आडोश्याला थांबायचं नक्की होतं. कोयनेच्या जंगलात जानेवारीतही अचानक पाऊस भेटीला येत असल्यामुळे बचावासाठी सर्वांजवळ प्लास्टिक होतं. कोयनेतला हा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरलाही पडत असतो. एप्रिल-मे महिन्यात तो सुरुवात करतो. असं वातावरण असतं, आजही होतं. जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब या सर्वांचा उत्साह वाढवित होते. चुलीवरच्या जेवणासोबत सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या. बघता बघता जेवणही आवरलं. झोपायची वेळ झाली. वन विभागाचे ट्रेनिंग निलेशने पूर्ण केलेले होते. त्याने सर्वांना त्याची माहिती दिली. त्यानुसार कामाची विभागणी करायला हवी होती. तेवढ्यात बापू बोलू लागले, ‘तुम्हाला काय काय काम दिलंय ते तुम्ही बघा. मला काय त्यातलं समजत नाय ! मी काय अनपढ ! मी तुम्हाला जंगल दाखविण्याचं काम करतो.’ रात्री अकरा-सव्वा अकराच्या सुमारास सारे वॉचटॉवरवर आडवे झाले. झोपी गेले. सर्वानुमते प्राणीगणनेचे फॉर्म भरायची जबाबदारी चिन्मयने घेतली. त्यासाठीचा नोटपॅड सदैव त्याच्यासोबत असणार होता. जंगलमार्ग दाखवत जंगलाबाबतची समजेल ती माहिती बापू सांगणार होते. आदित्यकडे कॅमेरा असल्याने त्याच्याकडे फोटोग्राफीची जबाबदारी होती. बापूंच्या सहकार्याने नोंदींशी निगडीत साऱ्या बाबी तपासण्याचे काम निलेशकडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. मंडळींचा जंगलातून वाट काढत सुरु झालेला प्रवास त्यांना निसर्गाकडे घेऊन जाऊ लागला. प्रवासातून पावलागणिक नवी उर्जा मिळू लागली. आज त्यांनी कोयनेच्या जलाशयावरती आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या पाणवठ्यावरती बसून प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले. दिवसभरात ऐकलेल्या पक्ष्यांच्या आवाजानुसार सायंकाळी नोंदी अपडेट केल्या. चुलीवरचं आमटी-भाताचं जेवण सारे जेवले. बघता बघता असे दोन दिवस सरले.


तिसरा दिवस उजाडला. आज दिवसभर वाटेवर फिरायचं नियोजन होतं. प्राण्यांची विष्ठा, वनाचे आच्छादन बघण्याचा आजचा दिवस होता. दिवसभरात सारीवाट फिरून सायंकाळी वॉचटॉवरजवळ येऊन मंडळींनी नोंदी पूर्ण केल्या. तोवर अंधार पसरला. साधारणत सात-साडेसातची वेळ असावी. कोयनेच्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब, पाण्याच्या लाटांवर उमटणारे त्याचे तरंग, जलाशया शेजारच्या भूपृष्ठावर तयार झालेली लाटांच्या रेषांची नक्षी पाहात चुलीवर जेवण बनविण्याचं काम सुरु झालं. मंडळींनी थोडी अधिक लाकडं जमवली. इतक्यात निलेशला लघुशंकेचा कॉल आला. तो जवळच्या आडोश्याला गेला. हा जिथे उभा राहिला तिथवरच्या जागेत पायाखाली पाण्याच्या लाटांमुळे निर्माण झालेल्या रेषांची नक्षी स्पष्ट जाणवत होती. निलेशला तिथे उभा राहता क्षणी पायाच्या अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. चुलीपासून तसं जवळचं उभं राहायचं असल्याने याने नेमकं तेव्हा पायात काही घातलेलं नव्हतं. काहीतरी चावल्यासारखा फील येताच याने तिथेच एकदोनदा पाय झटकला. चुलीजवळ परत आल्यावर, त्याने काहीतरी चावलं असल्याचं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. मग हे सारे बॅटरी घेऊन चावलेल्या जागी काही दिसतंय का ? म्हणून शोध घेऊ लागले. जंगलात जमिनीवर साठलेल्या पालापाचोळ्याची चाचपणी करताना बॅटरीच्या उजेडात यांना एक काळसर विंचू दिसला. ‘निलेशला काय चावलं असेल ?’ याचा सर्वांना अंदाज आला. आता तातडीने काही हालचाल करावी म्हटलं तर जवळ लाँच नव्हती. वॉकीटॉकीही नव्हता. या बीटातल्या चिन्मयकडे एक छोटा मोबाईल होता. पण त्याला जंगलात रेंज नव्हती. विचार करण्यात वेळ जात होता. तोवर तिकडे काही मिनिटांनी निलेशचा पाय हळूहळू वरच्या दिशेने मुंग्या येऊन सुन्न पडायला सुरुवात झालेली. बाकी मंडळी, ‘एवढ्याश्या विंचवाने निलेशला काहीही होणार नाही’, म्हणत त्याची मानसिकता सकारात्मक ठेवण्याच्या प्रयत्नात होते. इतक्यात चिन्मयला, त्याने आणलेल्या प्रथमोपचाराच्या साहित्यात सूर्यप्रकाश तेलाची बाटली असल्याचं लक्षात आलं. विंचूदंशात या तेलाचा उपयोग नक्की होणार होता. त्याने निलेशला हे तेल नाकात हुंगायला दिलं गेलं. विंचवाचा दंश झालेल्या जागेवर तेलाचे थेंब टाकायला सुरुवात केली. विंचू चावलेला असल्याने सर्वांनी रात्रभर न झोपण्याचा निर्णय घेतला. तोवर निलेशचा पाय गुडघ्यापर्यंत सुन्न पडत आलेला. आज त्याच्यासह सारे कसेबसे टॉवरवर चढले. गप्पांसोबत सूर्यप्रकाश तेलाचा थेंब-थेंब उतारा रात्रभर चालू राहिला.

सकाळचे साडेचार वाजले. तेव्हा पायाला आलेला सुन्नपणा काहीसा कमी झाल्याचे निलेशला जाणवले. आजच्या चौथ्या दिवशी ट्रॅन्झॅक्ट लाईन पार करून कोयना खोरे फिरायला सुरुवात करायचे नियोजन होते. पालीच्या वॉचटॉवरमागून कोकण कड्यापर्यंत ही ट्रॅन्झॅक्ट लाईन गेलेली होती. निलेशला आता फक्त अंगठ्याजवळ वेदना जाणवत होत्या. त्याने शांतपणे विचार केला आणि सर्वानुमते पहाटे पाच वाजता पायात बूट चढवले. साडेपाच वाजता कोकण कड्यापर्यंत जाणाऱ्या ट्रॅन्झॅक्ट लाईनच्या दिशेला लागणाऱ्या पहिल्या चढाच्या दिशेने मंडळींनी चालायला सुरुवात केली. चढ चढल्यावर यांना एक माळरान भेटलं. तिथे मोठं जंगल आहे. तेव्हा सकाळचे पावणेसात वाजले होते. तिथून पुढे एक पायवाट तिरकी होते आणि समोरच्या जंगलातून खाली उतरून पुन्हा वर जाते. यातल्या खाली उतरणाऱ्या वाटेवर मारलेल्या ट्रॅन्झॅक्ट लाईनला क्रॉस करून खालून वर आलेल्या अवस्थेत यांना कोण्या वन्यजीवाचा किमान पावणेसात इंचाचा पगमार्क मिळाला. तो पगमार्क पाहताच बापू उद्गारले, ‘वाघरू (ढाण्या) फिरलंय इकडे कुठंतरी !’ बापूंचं बोलणं ऐकताच सर्वांचे डोळे विस्फारले. तातडीने ठश्याचं प्लॅस्टर कास्टिंग केलं गेलं. तोवर सव्वा सात वाजले. पुढे चालताना काही अंतरावर टप्प्याटप्प्याने जमिनीवर विशिष्ठ पद्धतीची उकरण दिसून आली. कोयनेच्या जंगलात बापू वगळता इतरांसाठीहे नवीन होते. अजून थोडे चालल्यावर सर्वांना कोकण कड्याच्या एक किमी अलिकडे उतारावरील वळणात एका झाडावर विशिष्ठ स्क्रॅच मार्किंग दिसले. हे स्क्रॅच जवळपास बापूंच्या उंचीएवढ्या अंतरावर केलेले होते. सारे निरीक्षण सुरु असताना मंडळींना जवळच कोण्या वन्यजीवाने लघुशंका केल्याचे निदर्शनास आले. ती लघुशंकाही ताजी होती. जणू काही वेळापूर्वी केलेली ! बापूंनी हे सारं क्षणार्धात ओळखलं. २०१० सालचा जानेवारी महिना संपत आलेला. २९ तारीख. कोयनेतल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस ते. जंगलात सर्वत्र धुकं पसरलेलं. लघुशंका पाहून निलेशने, ‘थंडीमुळे पानावरून पाणी गळलेले असेल’ अशी शंका बापूंना विचारण्याचा प्रयत्न केला. पण बापू, ‘वाघ मुतलेला आहे’ या आपल्या मतावर ठाम राहिले.


आता मंडळी जंगलातल्या त्या अरुंद पायवाटेवरून सावध पावलं टाकत चाललेली. पुढे एका टप्प्यावर यांना वन्यजीवाची विष्ठा मिळाली. पहिला पगमार्क आणि आत्ताची विष्ठा यातलं अंतर पाऊणएक किमी असेल. मागचे सारे संदर्भ डोक्यात घोळू लागल्याने बापू अत्यंत सावध झालेले. त्यांनी तशा सूचनाही इतरांना दिल्या. बापूंच्या मागे निलेश चालत होता. नोंदी आणि छायाचित्रे घेत मागोमाग चिन्मय, आदित्य येत होते. सारेजण एका वाटेवरून खाली उतरले तिथे यांना दोन-तीन मोठे दगड लागले. सर्वांना आता डोळ्यासमोर कोकणकडा दिसत होता. आता इथून तिथवर पोहोचायला जेमतेम दहाएक मिनिटे अजून हवी होती. पाऊल वाटेवरचे दगड पार करत असताना समोर बापूंचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले, ‘अरे वाघ बसलाय ! वाघ बसलाय !’बापूंचे शब्द कानावर पडताच निलेशची नजर त्या दिशेला वळली. निलेशला डोळ्यासमोर एक बऱ्यापैकी विस्तारलेलं आंजणीचं झुडूप दिसत होतं. अजूनही ते झुडूप आहे. त्या झुडुपाच्या खाली पट्टेरी वाघ बसलेला होता. निलेशने अगदी हलक्या आवाजात पाठीमागच्या चिन्मय आणि आदित्यला हाक मारायला सुरुवात केली. ते दोघे मागच्या नोंदी करत आणि छायाचित्रे घेत सावकाश चालत येत होते. आवाज ऐकताच चिन्मय तसाच धावला. तोवर इकडे पाठमोऱ्या बसलेल्या वाघाला निलेश आणि बापूंच्या हालचालींची चाहूल लागली असावी. वाघ जागेवरून उठला. आंजणीच्या झाडामागून चालू लागला. तेव्हा चिन्मय या दोघांजवळ पोहोचला होता. हा वाघ संपूर्ण कोकण कड्यावरती फिरलेला असावा, असा कयास मंडळींनी बांधला. आंजणीच्या झाडामागून चालू लागलेल्या वाघाने काही अंतर कापल्यावर जवळच्या उतारावर दोनदा जोरदार डरकाळी फोडली. दूरवर असलेल्या आदित्यने डरकाळीचा हा आवाज ऐकला. बापू म्हणाले, ‘आता तो पुढे गेलाय. तो काय मागावर येणार नाही.’

पुढच्या तीनेक मिनिटात ही मंडळी पट्टेरी वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ पोहोचली. वाघ निघून गेलेला होता. हातात असलेल्या गोल टेपनं मंडळींनी आपल्यातलं आणि वाघामधलं अंतर मोजलं, तर ते होते अवघं २२ मीटर ! वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ एका वयस्क गव्याची विष्ठा पडलेली होती. त्या विष्ठेच्या एका कोपऱ्यावर वाघाच्या पायाचा ठसा उमटलेला होता. त्या वाघाच्या पायाच्या ठशाचे प्लॅस्टर कास्टिंग केले. त्या ठशाच्या ठिकाणी चारही बाजूंनी दगड लावले. जवळच वाघाचीही विष्ठा मिळाली, यांनी तीही ताब्यात घेतली. समोरच्या कोकण कड्यावर पोहोचल्यावर यांच्या मोबाईलला रेंज मिळाली. काही महत्वाची नोंद मिळाली तर तातडीने संपर्क करण्याबाबतच्या काही सूचना सर्वांना पूर्वीच दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर कुठेही संपर्क होईना म्हटल्यावर निलेशने वन खात्याच्या कोयना कार्यालयात २८४४९२ या क्रमांकावर फोन केला. तोही फोन कोणी उचलेना. शेवटी याने बामणोली फॉरेस्ट रेंजचे आर.एफ.ओ. दशरथ गोडसे यांना मोबाईल कॉल केला. तुलनेने त्यांना या ठिकाणी लवकर पोहोचणे शक्य होते. त्यांचा मोबाईल कॉल लागला. ते तेव्हा सातारा भागातील एका बीटात होते. निलेशने त्यांना कळवलं, ‘आमच्या बीटात आज सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आम्ही प्रत्यक्ष वाघ बघितला. तुम्ही या. ’गोडसे साहेबांनी निलेशचं बोलणं ऐकलं. म्हणाले, ‘तुम्ही जंगलात गस्त करत राहा. मी सायंकाळी येतो.’

ही मंडळी सध्या उभी असलेल्या रस्त्यांनी खाली उतरलं की पाली आणि मालदेवच्या मधलं घनदाट जंगल लागतं. तिथल्या एका जवळच्या ओढ्यापर्यंत जायचं यांनी आज पहाटेच ठरवलेलं. आता अर्धा दिवस सरून गेलेला. दुपारचे साडेबारा वाजलेले. त्या पायवाटेवरून चालताना ठिकठिकाणी यांना जणू डिसेंट्री लागल्यासारखी ताजी पातळ विष्ठा पडलेली दिसली. सुरुवातीची काही मिनिटे, ‘ही विष्ठा कोणाची असेल ?’ याचा यांना नीटसा अंदाज येईना. तिथे थांबून विचार केल्यावर थोड्या वेळाने बापूंच्या लक्षात आलं, ही विष्ठा अस्वलाची होती. अंदाज लावून झाल्यावर सारेजवळच्या डुंग्यावर (छोटा डोंगर) पोहोचले. तेव्हा बापूंचा अंदाज खरा ठरल्याची खात्री पटली. डुंग्याला लागून वाहात असलेल्या ओढ्याच्या जवळपास अस्वलाचं एक पिल्लू फिरत होतं. बापूंनी ते पाहिलं. बापू सर्वांना ते पिल्लू दाखवेपर्यंत पिल्लाच्या आणि मंडळींच्या डावीकडे आणखी एक पिल्लू आणि मादी अस्वलही दिसलं. अस्वल हा जंगलातील वन्यजीवात सर्वात भयानक आणि बेभरवश्याचा प्राणी. त्याचा हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. तो शिकार खात नाही पण फाडून टाकतो. स्वातंत्र्यापूर्वी म्हैसूरच्या जंगलात एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. प्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांनी मेळघाटी सातपुडापुस्तकात, ‘मेळघाटातील कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना घाबरत नाहीत. परंतु आपल्याला जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना देवतांना करीत धास्तावलेला प्रवास करतात’, असे लिहीले आहे. अर्थात प्रसंगावधान राखून बापूंनी सर्वांना डुंग्याच्या दिशेने धावण्याचा आणि दगड गोळा करण्याचा सल्ला दिला. सारे डुंग्यावर चढले. दगड गोळा केले. मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. तोवर अस्वल आपल्या दोन पिल्लांसह डुंग्याच्या खालपर्यंत आलेली. मग यांनी जमवलेले २५/३० दगड काही क्षणात खाली ढकलायला सुरुवात केली. डुंग्याखाली असलेली मादी अस्वल सुरुवातीला जमिनीवर लोळत होती. इकडे तिकडे मान हलवित होती. दगड टाकण्याने ती तिथेच थांबली. या मंडळींना वाघाच्या पाठीवर उंबराचं पाणी असलेल्या ज्या पायवाटेनं जायचं होतं नेमक्या त्याच पायवाटेनं मादी अस्वल निघून गेली. म्हणून मग यांनी आल्या वाटेनं परत जायचा निर्णय घेतला. डुंग्यासमोर यांना कोकणकडा आणि मालदेवमधील सह्याद्रीची हद्द दिसत होती. मंडळींना तिथे पोहोचायला किमान अडीच तास लागावेत. मनुष्याच्या दृष्टीने दूरवरच्या अशा ठिकाणापर्यंत ती मादी अस्वल यांच्या डोळ्यादेखत अवघ्या काही मिनिटात पोहोचली. वन्यजीवांमध्ये किती ताकत असते ? मनुष्य त्यांच्यासमोर किती कमकुवत आहे ? याची साक्ष पटविणारा तो अफलातून अनुभव होता. या दरम्यान कोकण कड्याच्या दिशेने चालताना मादी अस्वलीने ४/५ वेळा मागे वळून आपल्या पिल्लांकडेही पाहिलं. हा अनुभव गाठीशी जमा करून सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान मंडळी पालीतील लोखंडी वॉचटॉवरजवळ पोहोचली.

सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी यांना वॉचटॉवरजवळ बसल्या जागी पट्टेरी वाघाची डरकाळी पुन्हा ऐकू आली. आवाजाच्या दिशेने अंदाज घेतला तेव्हा सकाळी फिरलेल्या पट्ट्यात अजूनही वाघ असल्याचे लक्षात आले. यांची नजर आता समोरच्या शिवसागर जलाशयावर स्थिरावली होती. सकाळी संपर्क झालेला असल्याने वन खात्याचे अधिकारी आत्ताच हे पाहायला पोहोचायला हवेत अशी निलेशची भावना झालेली. तेव्हढ्यात जलाशयात दुरून वनराणीलाँच येताना दिसली. लाँच जसजशी जवळ आली तसतसा तिचा आवाज कानाला जाणवू लागला. वाघाचा आवाज जिथून येत होता ते अंतर मंडळींपेक्षा लाँचमधील अधिकाऱ्यांच्या अधिक जवळ होतं. अर्थात लाँचमधील अधिकाऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू येणे अभिप्रेत होते. संजय पवार नावाचा लाँचचा ड्रायव्हर होता. त्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकल्यावर तत्काळ लाँचचं इंजिन बंद केलं. लाँचमधील गोडसे साहेबांना सांगितलं. पुढे ६ वाजून १० मिनिटांपासून साडेसहा वाजेपर्यंत १३ वेळा या भागात हा पट्टेरी वाघ ओरडला. त्याच्या डरकाळ्या सर्वांनी ऐकल्या. काळोख पडताना वनराणी लाँच पाली वॉचटॉवरजवळ पोहोचली. लाँचमधून उतरताच आर.एफ.ओ. गोडसे साहेब निलेशला म्हणाले, ‘आहे ! तुम्हाला वाघ दिसला हे खरं आहे. आम्ही लाँचमधून आवाज ऐकला.’ खूप आनंदी वातावरणात सर्वांचा गप्पांचा मूड जमलेला तेव्हा !


सहाव्या दिवशी सकाळी लाँच मालदेवला रवाना झाली. पाली बीटाची जबाबदारी असलेली ही मंडळी काल वाघाचा आवाज आलेल्या जलाशया समोरच्या जंगलात आज फिरली. त्यांनी तिथले पट्टेरी वाघाचे पगमार्क जमवले. दुपारी ३ वाजता मंडळी मालदेवच्या पठारावर पोहोचली. तेव्हा, मालदेव बीटमधील मंडळींनीही पालीच्या दिशेला वाघ बघितलेला होता हे समजलं. मालदेवचे स्थानिक शामराव कोकरे यांची म्हैस वाघाने मारली होती. शामरावांनी अनेकदा या भागात वाघ बघितलेला होता. गाडीच्या टायरच्या सोलांच्या चप्पला वापरणारे शामरावांचे भाऊ लक्ष्मण यांनीही २००७/०८ साली पालीच्या जंगलात जवळून चालताना पट्टेरी वाघ बघितला होता. नवजा गावातही काही लोकांनी २००७ ते २०१० सालात वाघ बघितला होता. ज्या पठारावर ही मंडळी भेटली तिथे बऱ्याच ठिकाणी वाघाच्या विष्ठा दिसून आल्या. सातव्या, शेवटच्या दिवशी अवसारी सेंटरवर सर्व बीटमधील सदस्यांची मीटिंग झाली. मिटींगमध्ये शिरसिंग्याच्या खोऱ्यात वाघ ओरडल्याची आणि वाघाने सांबर मारलेल्याची माहिती दाजी ढमाल यांनी दिली. डिचोली, आंबेघर मधील लोकांनीही वाघाचे ओरडण्याचे आवाज ऐकलेले होते. वन खात्याने अजूनही जंगलात राहून काम करू इच्छिणाऱ्यांना दोन दिवसांची जादा परवानगी दिली. निलेशसह इच्छुक १२/१५ जण शिरसिंग्याच्या टॉवरवर पोहोचले. तिथे मुक्काम करून आठव्या दिवशी सकाळी वाघाने सांबर मारलेल्या पाभळ्याच्या पाण्याजवळ आले. तिथल्या परिस्थितीवरून वाघाचे सांबर खाणे सुरु असल्याचे लक्षात आले. यातून एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येत राहिला तो म्हणजे, पालीत दिसलेला वाघ हा इकडे शिरसिंग्यात येऊन सांबर मारू शकत नव्हता. अर्थात हे दोन्ही वाघ वेगळे होते. नर की मादी हे कोणालाच कळले नाही. बापूंनी यापूर्वी जंगलात किमान ५/६ वेळा वाघ बघितला होता. या निमित्ताने निलेश आणि सहकाऱ्यांनी कोयनेच्या जंगलात पहिल्यांदा ‘ऑनफूट’ वाघ पाहिला.

नेहमीपेक्षा वेगळी, वन्यजीवांचे काही ठोस पुरावे मिळतात का ? या शास्त्रीय दृष्टीने केली गेलेली ही प्राणीगणना होती. यासाठी सहभागींना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. या घटनेनं पट्टेरी वाघाचे कोयनेतील अस्तित्व निश्चित केलं. पालीतील प्रत्यक्ष दर्शन, शिरसिंगे येथील सांबराचे किल आणि मालदेव या ठिकाणी मिळालेल्या विष्ठा, पायांचे ठसे आदी पुराव्यांची बेंगलोरस्थित लॅबमध्ये शास्त्रीय तपासणी पूर्ण झाल्यावर २०११ च्या जानेवारी महिन्यात मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर (वर्धा) आणि ताडोबा पाठोपाठ महाराष्ट्रातला सहावा कोयना व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या आणि जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या कोयना अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जा मिळाल्यावर वनविभागाने गवताळ प्रदेशाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न सुरु केल्याने जंगलात शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढू लागली.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com  

सर्व छायाचित्रे : आदित्य जोशी 


कोकण कड्यावरून दिसणारा तिवरे जलाशय


कोयना अभयारण्याची वनराणी लाँच


कोयनेच्या जंगलातील सूर्योदय


कोयनेच्या जंगलातून चालताना


डोळ्यादेखत काही मिनिटात 
अख्ख्या डोंगर चढून गेलेले मादी अस्वल आणि पिल्ले 


पट्टेरी वाघाची विष्ठा


पट्टेरी वाघाने केलेली उकरण


पट्टेरी वाघाने झाडावर केलेले स्क्रच मार्किंग


पाली बीटातील सहकारी डावीकडून अनुक्रमे 
आदित्य जोशी बापू गुरव निलेश बापट चिन्मय ओक


पालीचा वॉचटॉवर


मादी अस्वलाची विष्ठा

गुरुवार, २४ जून, २०२१

कुटुंबात शिरला होता, कोरोना !

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात, ३० एप्रिलला (२०२१) संकष्ट चतुर्थीदिनी कुटुंबात कोरोना विषाणू दाखल झाल्याची जाणीव झाली आणि बालमित्र गमावल्याच्या दु:खातून सावरणाऱ्या आमचं उरलं-सुरलं अवसान गळालं. खरंतर त्या क्षणी काही कळेनासं झालेलं. भर दिवसा जणू डोळ्यांसमोर अंधार पसरावा अशी स्थिती. पुढे दिवसागणिक टप्प्याटप्प्याने कोरोना विषाणूच्या जाळ्यात कुटुंबातील सदस्य अलगद अडकत गेले. 'मनातून भिती वाटते म्हणजे नक्की काय होतं ?, अंगाला दरदरून घाम फुटणे, चिंतेत आणि काळजीत रात्रभर झोप न लागणे' या आजवर ऐकलेल्या आणि क्वचित कॉलेजयीन जीवनात एखाद-दुसरा अपवाद वगळता कधीही विशेष अनुभूती न घेतलेल्या या वाक्यांचा मे महिन्यात अनुभव घेतला. २९ मेला, संकष्ट चतुर्थीदिनी आम्ही कुटुंबीय इतर कोणालाही संसर्गित होऊ न देता या संकटातून बाहेर आलो. तांत्रिक क्वारंटाईन बाब म्हणून १ जूनला विवाहाचा १२वा वर्धापनदिन कौटुंबिक वातावरणात साजरा करून दैनंदिन जीवनात सक्रीय झालो. कोरोनाने या महिन्याभराच्या कालखंडात आम्हाला बरंच काही शिकवलं, समजावलं. जणू आजवर जगलेल्या आयुष्याचं ऑडिट करायला लावलं.

एप्रिल महिन्यात बालमित्र हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी, १३ एप्रिलला कोरोना वैद्यकीय मदत नावाच्या व्हाट्सअॅपच्या राज्यव्यापी ग्रुपवर (क्रमांक ४) जॉईन झालेलो. त्याच दिवशी हा ग्रुप फुल्ल होऊन पाचव्या ग्रुपची लिंक प्रसूत झाली होती. या ग्रुपचे उद्दिष्ट कोरोना संक्रमितांना मदत करणे हेच होते, आणि शीघ्रगतीने ते चालूही होते. ग्रुपमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा पोस्ट पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकच्या होत्या. माहितीपूर्ण आणि उपयुक्त असल्या तरीही त्या पोस्ट आमच्यासारख्या दूरस्थ कोकणी मनाला चलबिचल करत होत्या. ग्रुपवर सतत ठिकठिकाणच्या कोविड केअर सेंटरची माहितीअँटीजेन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्टएचआरसीटी स्कोर, हॉस्पिटल, बेड, ऑक्सिजन बेड, पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर, प्लाझ्मा, प्लाझ्मा रक्तपेढी, कोरोना लसीकरण विषयक सद्यस्थिती, टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसेवीर इंजेक्शन उपलब्धी, अॅम्ब्युलन्स, होम क्वारंटाईन लोकांना घरपोच डबानातेवाईक नसलेल्या किंवा कोणीही उपलब्ध नसलेल्यांसाठी मोफत अंत्यसंस्कार सुविधा, प्रायव्हेट हॉस्पिटलमधील कोरोना आजाराच्या बीलांसंदर्भातील तक्रारी आणि दात्यांचे रक्तगट आदी चर्चा सुरू असायच्या. कोणीतरी, 'आज *** हॉस्पिटलमध्ये *** ही व्यक्ती अॅडमिट झाली आहे. त्यांची तब्बेत सिरीयस आहे. त्यांना प्लाझ्माची गरज आहे. त्यांचा रक्तगट *** आहे. प्लाझ्मा दान करणारं कोणी आहे का ? तातडीने हवं आहे. कृपया *** या नंबरवर संपर्क करावा.असं कळवायचे. जमलं तर कोणीतरी मदत करायचे. कोणीतरी, ‘मी स्वतः आहेम्हणायचे. अचानक दुसऱ्या क्षणाला, कोणीतरी एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधील कोरोना आजाराच्या बीलांसंदर्भातील तक्रारीची दखल घेऊन बील कमी केल्याची पोस्ट करायचा, मग बरं वाटायचं. कोणीतरी तेवढ्यात अगदी काकुळतीला येऊन ‘रेमडेसेवीर इंजेक्शन मिळेल का ?’असं विचारायचे. त्यावर त्याला कुणाकडून तरी जवळच्या मेडिकलचा संदर्भ दिला जायचा. कोणीतरी अति महत्त्वाचे मोबाईल नंबर शेअर करायचे.

दोनेक दिवसांनी या ग्रुपवर 'तातडीने मदत हवी आहे' या मथळ्यांतर्गत कोरोना बाधित पेशंटचे नाव, राहात असलेल्या भागाचे नाव, वय, संपर्क क्रमांक, पेशंटचे अन्य आजार, सध्याची लक्षणे, ऑक्सिजन लेव्हल, पल्स, ब्लडग्रुप, व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे अथवा नाही ? एचआरसीटी स्कोअर अशा माहितीच्या पोस्ट एका मागोमाग एक येऊ लागल्या. अनेक गरजवंत आपली अडचण पोस्ट करायचे. कधीकधी कोणीतरी चटकन मदतही उपलब्ध करायचे. असं सारं चाललेलं. या दिवसात आम्हीही बालमित्राच्या कारणे याच प्रवाहातून प्रवास करत असल्याने पोस्ट करणाऱ्या गरजवंतांच्या अडचणींचा अंदाज यायचा. संवेदनशील मनाला आतून कळवलायला व्हायचं. अंतर्मनात कालवाकालव व्हायची. अशातच, ‘बारामतीत रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणीबनावट इंजेक्शनची विक्री’ ही बातमी कळल्यावर तर संताप अनावर झालेला. वैद्यकीय भ्रष्टाचाराची प्रकरणेसमोर येत होती. कोरोना विषयक मतमतांतरे मानसिक गोंधळात अधिक भर घालायची. अशा दोलायमान अवस्थेत न चुकता कोरोना वैद्यकीय मदत ग्रुपचे वाचन सुरु असायचे. २३ एप्रिलच्या रात्री ८ वाजता आमच्या बालमित्राला देवाज्ञा झाली आणि कोरोना वैद्यकीय मदत ग्रुप मधल्या प्रत्येक गरजवंताच्या मनातल्या स्मशान शांततेनं आमच्या मनाचा ताबा घेतला. मागील १०/१२ दिवस सातत्याने हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू असल्याने आपणही संक्रमित होणार असं वाटू लागलं. पण आठवडा होऊनही कोणतीच लक्षण दिसेनात. तेव्हा हायसं वाटलेलं, पण तेही क्षणिक ठरलं.

एक मे रोजी चिरंजीवाचा आणि आईचा वाढदिवस होता. दहा दिवसांपूर्वी जीवाभावाचा बालमित्र गमावलेला असल्याने वाढदिवसाचे काय कौतुक असणार पण घरचे वातावरण निवळावे म्हणून सहज सौ. ला म्हटलं, 'उद्या रात्री संपूर्ण कुटुंबासह एकत्रित भोजन करू.' सौ. ने जवळच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन नंबरच्या भावाच्या बायकोला हे कळवलं. तेव्हा सौ. ला कळलं, ‘भावाच्या बायकोला ताप आलेला आहे ! आमचा भाऊही डिसेंट्रीने आजारी पडलेला.’ या सर्वांना हे किरकोळ वाटलेलं. मागील १२ दिवस हॉस्पिटल वारी केल्यानं आम्हाला त्यातलं गांभीर्य चटकन जाणवलं. तातडीने जवळच्या डॉक्टरकडे पोहोचलो. डॉक्टरांनी कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. नजीकच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत बहिणीकडे पोहोचलो. तिने भावाच्या बायकोची केलेली अॅन्टीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली. इकडे डॉक्टरांनी एच.आर.सी.टी. करण्याच्या सूचना दिल्या. त्याही करून झाल्यावर इन्फेक्शन नॉर्मल असल्याने आमच्या घरातील स्वतंत्र खोलीत तिला क्वारंटाईन केलं. शासकीय यंत्रणेला कळवलं. तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरु झाले. तोवर त्यांच्या मुलाला ताप आला. पण तो १/२ दिवसांच्या औषधांनी सावरला. भावाची अॅन्टीजेन टेस्ट केली. त्याला त्रास सुरु होऊन काही दिवस पुढे सरकलेले आणि औषधेही घेऊन झालेली असल्याने त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. पण त्याच्या शरीरात अशक्तपणा होता.

भावाच्या आणि त्याच्या पत्नीच्या निमित्ताने आम्ही संक्रमित झालो. गुरुवारी, ६ मेला पहाटे २ वाजता आम्हाला ताप आला. पण तेही सुरुवातीला किरकोळ वाटलं. लक्षणं जाणवेनात. तरीही औषधांचा कोर्स चालू केला. वैद्यकीय उपचारांनी शनिवारी ८ मेला पहाटे पावणेतीन वाजता ताप उतरला. बऱ्यापैकी फ्रेश वाटतं होतं. २/३ दिवसानंतर बहुदा पहिल्यांदा झोप लागलेली असावी. सौ.नेही, 'चांगले घोरत होतात' म्हणत होकार दर्शविला. तेव्हा शरीराचं तापमान होतं ९७ आणि ऑक्सिजन लेव्हल होती ९६. तुलनेनं कमी पण डोकं अजूनही जड होतं. घशाला कोरड पडलेली. गरम पाणी प्यायलो आणि झोपलो. विशेष झोप लागली नाही. सकाळी निवांत उठलो. अंगात ताप नव्हता. आदल्या दिवशी वडिलांनाही ताप आलेला. त्यांची बीपी कमी व्हायची गोळी बहुतेक त्यांना सूट होत नसावी. डॉक्टरांनी २/३ दिवस गोळी थांबवायला सांगितली होती. आज सकाळी त्यांना गरगरायला लागलं. त्यांचं गरगरणं शारीरिक की गोळी बंद केल्यानं मानसिक हेच कळेना. त्यांची ऑक्सिजन लेव्हल, बीपी चेक केला. तो ठीक होता. त्यांना जेवण जाईना. आई-बाबांचा कोरोना लसीकरणाचा एक डोस घेऊन झालेला असल्याने बाबांना ताप आल्यावर भावाच्या फ्लॅटवर स्वतंत्र ठेवून त्यांच्या रक्ताच्या जवळपास सर्व तपासण्या केल्या. त्या नॉर्मल आल्या. पण अशक्तपणातून सावरायला त्यांना आठवडा गेला. बाबांना फ्लॅटवर पाठवल्यानंतर तासाभरात आमच्या चिरंजीवाला ताप भरला. घरात तापाचं औषध असल्याने ते त्याला दिलं. दुसऱ्या दिवशी, ९ मेला चिरंजीवाला डॉक्टरकडे नेलं. दिवसभरात त्याचा ताप किंचित कमी झालेला होता. १० मेला ताप उतरला. परंतु या धावपळीत सौ.वरील मानसिक ताण वाढल्याचे आमच्या लक्षात आले. भावाची पत्नी, स्वतः मी, काही प्रमाणात बाबांना संसर्ग होतोय याची जाणीव होऊनही ती धीट राहिलेली. पण चिरंजीवाला ताप आल्याने तिची अस्वस्थता वाढली. तिच्या चेहऱ्यावरील काळजीचे भाव सारं काही मूकपणे सांगत होते.

आमच्याकडे घरी स्वतंत्र खोलीत असलेल्या भावाच्या बायकोचा क्वारंटाईन कालावधी संपत आलेला. ११ मे ला आम्हाला बऱ्यापैकी जेवण संपलं. सायंकाळी फ्लॅटवरून आई घरी पाहायला आली. तिच्याही बोलण्यात काळजीचा सूर राहिला. जवळच्या मित्राने पुण्यातून काही औषधांचे कुरियर पाठविले होते. पण मधाळ बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरियर कंपनीने अर्जंट मेडिसिन असं लिहिलेलं असूनही निरोपाचा एक मोघम फोन केल्यावर दोन दिवस कुरियर ऑफिसात बाजूला ठेवून दिलं. नेमकं तेव्हाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण बाजारपेठेत फिरण्यासाठी हेल्मेट सक्तीचा कायदा लागू झाला. कोणीही कुरियर पोहोचवेना. कुरियर हाती यायला आणखी दोन दिवस लागले. माझ्यासकट घरातले संक्रमित हळूहळू सावरत असताना १२ मे ला सकाळी ११ वाजता आमच्या सौ.ला ताप आला आणि मला घाम फुटला. १३ तारखेला क्वारंटाईन कालावधी संपत आलेल्या भावाच्या पत्नीला आणि तापातून सावरलेल्या आमच्या चिरंजीवाला भावाकडे फ्लॅटवर रवाना केलं. आता आम्ही आणि आमची पत्नी दोघेही पत्नीचा ताप कमी होत नाही म्हणून घरात स्वतंत्रपणे क्वारंटाईन झालो. शक्य तेव्हढ्या तातडीने कळावं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डेरवण येथे १६ तारखेला दोघांनी आर.टी.पी.सी.आर. टेस्ट केली. खरंतर आम्हाला तेव्हाही विशेष लक्षणं दिसत नव्हती. पण दुसऱ्या दिवशी रात्री दोघांचीटेस्ट पॉझिटीव्ह आली. झालं ! डॉक्टरांनी १८ तारखेला एच.आर.सी.टी. करण्याच्या सूचना दिल्या. आमचा स्कोअर आला होता ३ आणि पत्नीचा ६ !

दरम्यान पत्नीला ताप आल्यानंतरचे सहा दिवस आमच्या आजवरच्या वैवाहिक जीवनातील सर्वाधिक काळजीवाहू ठरले. चिरंजीवाला भावाच्या फ्लॅटवर ठेवलेले. त्याच्याशी सलगीचा संपर्क तुटलेला. सुरुवातीचे २/३ दिवस त्याला तिकडे रात्रीची झोपच लागेना. रात्री ११/१२ वाजता रडवेल्या आवाजात त्याचा फोन यायचा. त्याचा आवाज आम्हा उभयतांची अस्वस्थता वाढवायचा. त्यात आम्हाला सौ.ची ऑक्सिजन लेव्हल एच.आर.सी.टी. करेपर्यंत अनेकदा ९५ पेक्षा कमी जाणवलेली. तीही अधूनमधून, ‘मध्यरात्री मी पाहिली तेव्हा अजून कमी होती’, असं म्हणायची. कोरोना संक्रमणातून जवळपास सगळे सुखरूप बाहेर आलेले असताना, आईला आणि छोट्या भावाला कोणताही त्रास झालेला नसताना आमची सौ. आणि तिच्या निमित्ताने आम्ही मात्र त्यात अडकत चाललेलो. काहीवेळा तिच्या बोलण्याचे अर्थ आम्हालाच कळेनात. तिची अस्वस्थता कमालीची वाढलेली. हे सारं तिच्या माहेरच्यांना कळल्यावर त्यांचे फोन वाढले. मग हिची फोनवर चिडचिड सुरु झाली. आणखी एका जवळच्या मित्रानं ‘पतंजली’चं ‘दिव्यधारा’ औषध आणून दिलं. त्याचा गंध नाकावाटे शरीरात घेतल्यावर सौ.च्या ऑक्सिजन लेव्हलमध्ये वेगाने सुधारणा होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. १६ तारखेला आम्ही आर.टी.पी.सी.आर. टेस्ट केली तेव्हा तिची ऑक्सिजन लेव्हल ९५+ होती. दोघांच्या रक्ताच्या विविध तपासण्या केल्या. या निमित्ताने आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या शरीरातील रक्ताच्या तपासण्या केल्या. त्या सगळ्या नॉर्मल आल्या. एच.आर.सी.टी. स्कोअर नुसार डॉक्टरांची औषधे सुरु झाली. पण ऑक्सिजन लेव्हलसाठी ‘दिव्यधारा’चाच आधार राहिला. कोरोना काळात केली जाणारी कोणतीही टेस्ट आणि त्याचा येणारा रिपोर्ट या मधला जो कालावधी होता तो आजवरच्या जीवनातील सर्वाधिक विचित्र, क्षणाक्षणाला मनात वेगवेगळे विचार निर्माण करणारा राहिला. १९ तारखेला बऱ्याचश्या टेस्ट झालेल्या असल्याने मानसिक निवांतपणा आला होता. डॉक्टरांना दिवसातून तीन वेळा सौ.च्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल कळविणे सुरु होते. सौ. च्या १/२ टेस्ट सहा दिवसांच्या फरकाने पुन्हा कराव्या लागणार होत्या.

घरात संसर्गित वातावरण सुरु झाल्यावर अर्धा लिटर सॅनीटायझरच्या ३/४ बाटल्या वापरून झालेल्या. कारसाठीही वेगळा सॅनीटायझर आणलेला. नंतर आम्ही उभयता क्वारंटाईन झाल्यावर छोट्या भावाने घरात पाच लिटर सॅनीटायझरचा कॅनच आणून ठेवला. आता घरात दिवसातून कित्येकवेळा सॅनीटायझरचा वापर होऊ लागला. वेळेवर डॉक्टरांची औषधे घेणे, त्यांच्याशी नियमित संपर्क ठेवणे, भरपूर अन्न पोटात घेणे आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे एवढेच हातात होते. तसेही आम्हाला विशेष काही जाणवत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून आम्ही स्वयंपाकघरातील किरकोळ कामात जुंपलो होतो. सकाळी उठून नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालणे, पक्ष्यांसाठीची पिण्याच्या पाण्याची भांडी भरणे सुरु झालेले. स्वयंपाकघरात वावरताना एकदम बालपण आठवत होतं. बालपणी आई आजारी असताना आम्हाला स्वयंपाकघरात लक्ष घालावं लागायचं. त्याला आता कित्येक वर्ष झाली. लग्न झाल्यावर दरवर्षी मे महिन्यात बायको माहेरी गेल्यावर आमचा आईच्या हातचं जेवण्याचा मस्त बेत बनायचा. गेल्यावर्षी तो कोरोनाने हुकवला आणि यंदा तो विचित्रपणे कोरोनाने जुळवला होता. नियमितपणे भावाच्या फ्लॅटवरून आईच्या हातचं जेवण मिळू लागलं. सुरुवातीला ते संपत नव्हतं. आठवडाभरानंतर ते कमी पडू लागलं. हा सारा कोरोनातील अॅलोपॅथी गोळ्यांचा परिणाम होता. म्हणून मग उभयतांनी सकाळी-सकाळी गोमूत्र अर्क घ्यायला सुरुवात केली.

मानवी जीवन व्यापून राहिलेल्या सोशल मिडीयासह दूरचित्रवाणीवरील २४ तासांच्या बातम्या, रेडिओची, दूरदर्शनची आठवण करून देऊ लागल्या. सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत’, सनईच्या सुरासह कानी पडणारा रेडिओवरील निवेदिकेचा हा मंजूळ स्वर तेव्हा आजारी वातावरणात उत्साह आणायचा. तिथे आजच्या दूरचित्रवाणीची कथा काय वर्णावी ? म्हणताना त्याची आठवण झाली. मानवी इतिहासाच्या दृष्टीने कोरोना विषाणूच्या साथीने अनेक मौखिक संदर्भ वेगाने पुसले होते. लिहून लिहून भावपूर्ण श्रद्धांजलीह्या शब्दाचा अर्थ कळेनासा झाला होता. मन बधीर झालेलं. उद्याचा सूर्योदय काय घेऊन उगवणार आहे ? याची शाश्वती नसल्याने केविलवाणी अवस्था झालेली. इथं प्रत्येकाला आपली लढाई स्वतःला लढायची आहे हे पक्क झालेलं. हाताबाहेर गेलेली परिस्थिती, नातेवाईकांचा आक्रोश आणि आपली ही अशी झालेली अवस्था रात्री झोपताना अंतर्मनात खळबळ निर्माण करायची. कष्टानं उभा केलेला संसार, लेकरं मागे टाकून कुणाला न सांगता, कुणाचा निरोप न घेता माणसं निघून चालली होती. नाती जगायची राहिली होती, अनेक स्वप्न अधुरी पडली होती. प्रायव्हसीच्या खुळ्या नादात वर्तमान समाजानं एकट्यानंच चालायचं ठरवलं आणि थकवा येऊन समाजाची ऑक्सिजन लेव्हल कमालीची खालावली होती. इमोशनल हेल्थसंकल्पनेला महत्त्व आलेलं. पण वेदना देणाऱ्या इतक्या घटना आजूबाजूला होत असताना मन प्रसन्न तरी कसं राहिलं अशातच कोरोना कारणे, आमच्याकडून आपणहून केला जाणारा बाहेरचा नियमित संपर्क जवळपास तुटला होता. तरीही शंका आलेल्या ४/२ जणांनी, ‘बऱ्याच दिवसात संपर्क नाही. पोस्ट नाही. सगळं ठीक आहे ना ?’ असं व्हाट्सअॅपवर विचारलंच ! आमचा नियमित संपर्क ज्यांच्याशी असतो अशांपैकी एक कोकणचे नामवंत इतिहास संशोधक ९२ वर्षीय अण्णा शिरगावकर यांनी तर आम्ही फोनवर उपलब्ध होत नाही म्हणून या काळात चक्क एक अंतर्देशीय पत्रच आम्हाला पाठवलं. ते हाती पडल्यावर मात्र, ‘आता लोकांशी बोलायला हवं’ या भानावर आम्ही आलो.

२१ मे रोजी सकाळी रत्नागिरीतून कोणत्या तरी शासकीय विभागाचा कोरोना संसर्गित रुग्णांची आपुलकीने विचारपूस करणारा फोन सौ.च्या मोबाईलवर आला. दोघांचीही विचारणा झाली. ‘काळजी घ्या, सकस आहार घ्या. काही अडलं तर कळवा.’वगैरे सूचना सांगितल्या गेल्या. २५ तारखेला दुपारी दीड वाजता, आम्ही भोजन घेत असताना मोबाईल कॉल आला. तो आमच्या स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचा होता. ‘आम्हाला कोरोना झालाय ना ? कधी झाला ? टेस्ट पॉझिटीव्ह कधी आली ? तब्बेत कशी आहे ? घरी कोण कोण राहात आहे ? कोणत्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे ? वगैरे...’ प्रश्न आमची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर नवव्या दिवशी विचारले जात होते. तेव्हा जवळपास सगळं नॉर्मल झालेलं. या प्रश्नांनी पुन्हा आम्हाला भूतकाळात नेलं. खरंतर वैतागायला झालेलं. त्यातही पत्नीबाबत विचारणा नव्हती. तिला स्वतंत्र फोन जायला नको, म्हणून मग आम्हीच तिचीही माहिती दिली. फोन संपवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शेवटी समोरची व्यक्ती म्हणालीच, ‘आम्हाला फॉर्मलिटी करायला हवी हो !’ २६ तारखेला शासनाने रत्नागिरीसह १८ जिल्ह्यात गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आमच्याशी संबंध राहिलेला नव्हता. पूर्व सूचनेनुसार २८ मेला आम्ही डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. तेव्हा आम्ही लवकर रिकव्हर झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढचे २/३ दिवस घरची स्वच्छता आणि सॅनीटायझेशन करण्यात गेले.

एक जूनच्या सकाळी आमचं जीवन पूर्वपदावर आलं. हसत्या खेळत्या बायकोची अस्वस्थता आमच्यासाठी भयानक ठरली होती. घराला घरपण आणणारी, घरातलं वातावरण आनंदी ठेवणारी हसतीखेळती बायको असण्याचं वैभव केवढं मोठं असतं ? याची जाणीव कोरोनामुळे झाली. महिन्याभराच्या या कालावधीत कोरोनाने आम्हाला आमच्या आजवरच्या जीवनाचं जणू ऑडिट करायला लावलं होतं. खरं खोटं त्या चीनलाच माहित ! पण कौटुंबिक स्तरावर लाखभर रुपयांचा चुराडा पाहिलेल्या आमचा आंतरिक अनुभव, ‘कोरोना हा नुसता आजार नसून हे भलतंच काहीतरी आहे,’ असंच आम्हाला वारंवार सांगत राहिला. आयुष्यातील तब्बल दोन महिने निवळ कोरोना अनुभवात निघून गेल्यावर एका निवांत क्षणी मेंदू ऑडिटच्या फीलमध्ये असताना कुठेतरी वाचलेलं, ‘रोज अविश्रांत मेहनत करायला विसरू नका ! मरताना वाटायला हवं, वाह !! काय लाईफ होती ती !!!’ हे वाक्य आठवलं आणि आम्ही कार्यरत झालो.

 

धीरज वाटेकर

मो. ०९८६०३६०९४८. 

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...