गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

कोकणात स्थिरावलेय ग्रामीण साहित्य-संस्कृतीची चळवळ


राज्यासह कोकणातील ग्रामीण भागात मराठी साहित्य आणि संस्कृती विषयक चळवळीचे सातत्य दिसत नसताना राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई संस्थेने गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वी करून राज्यातील या क्षेत्रातील गुणवत्तेच्या पातळीचे मूल्यांकन करू पाहाणारा एक नवा बेंचमार्क सेट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास, संस्कृती, नाटय, ग्रंथालय चळवळींचे 'जाणकार' व्यक्तिमत्त्व प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुक्यातील तळवडे येथे १० ते १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपन्न होत आहे. संघाचे अध्यक्ष आणि 'मोडी दर्पणदिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ग्रामीण मराठी साहित्य आणि सांस्कृतिक जडणघडणीची चळवळ कोकणात चांगलीच स्थिरावली आहे. त्या निमित्ताने ग्रामीण साहित्य, सांस्कृतिक चळवळीचा आणि समोर असलेल्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...

कोकणभूमीला र. वा. दिघे, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, साने गुरुजी, कवी माधव, कवी आनंद, 'पद्मश्री' मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद काळे आदी ग्रामीण भागातून पुढे आलेल्या असंख्य दमदार लेखकांची पार्श्वभूमी लाभलेली आहे. लांजा तालुक्यातील हरचिरी या छोट्या गावात जन्मलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी याच संमेलनाच्या व्यासपीठावरून बोलताना, ‘समाजात वावरताना डोळे उघडे ठेवून निरीक्षण केले, तर अनेक गोष्टी पाहता येतात. त्यात कथानके घडत असतात. लेखकाने ती टिपायची असतात. लेखन साच्यात बसवायची असतात. लेखकाने स्वतःला घडवायचे असते आणि कायम जमिनीवर राहायचे असते. वेगवेगळे अनुभव त्याला घडवत असतात. लेखकाने कंटाळा करून चालत नाही. त्याने समाजात जे काही वावगे घडते आहे, ते मांडण्यासाठी लिहायला हवे. पुस्तके तर वाचायला हवीतच, पण माणसेही वाचायला हवीत, अनुभवविश्व समृद्ध करायला हवे.असे सांगितले होते. असेच सकस मार्गदर्शन यापूर्वीच्या संमेलनात ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, नाटककार गंगाराम गवाणकर आदींकडून झालेले आहे. खरंतर ग्रामीण भागातील माणसे कोणताही आडपडदा न ठेवता, भीडभाड न बाळगता वागतात, बोलतात. असे नमुने ग्रामीण जीवनात पाहायला मिळतात. एस.टी. बसच्या प्रवासात, ग्रामीण बसस्टँडवर हमखास भेटतात. कोकणातील अशा बदलत्या काळातील ग्रामीण चित्रण लोकांसमोर यायला हवे आहे. त्यासाठी हे व्यासपीठ उत्तम आहे. ‘खरी पुस्तकं खऱ्या भावबळानं वाचणं हा एक अति श्रेयस्कर व्यायाम आहे. दिवसभरात केलेल्या इतर कुठल्याही व्यायामापेक्षा तो आपल्याला अधिक दमवेल असा आहे. जशी शिस्त आणि चिकाटी पैलवानाला लागते तशीच वाचनासाठी लागते. साऱ्या जिंदगीच्या अपेक्षा निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट असतं’ असं अमेरिकेतील विचारवंत ‘हेन्‍री डेव्हिड थोरो’ने सांगितल्याचं नमूद करून व्यंकटेश माडगूळकर आपल्या सरवापुस्तकात म्हणतात, ‘भावबळानं वाचन होतं ते विशी-पंचविशीपर्यंत. पुढं माणूस काही कारणाने वाचतो. काही अपेक्षा ठेवून वाचतो. त्यातही सुरुवातीला साहित्यप्रकार, नंतर प्रवासवर्णन आणि शेवटी अध्यात्म असं आपलं वाचन गडगडत. काही वाचकांच्या बाबतीत ते वृत्तपत्र वाचनापलिकडे ते जात नाही.’ यातला भावबळानं होणाऱ्या वाचनाचा वयाशी जोडलेला दाखला महत्त्वाचा आहे. त्यासाठी ग्रामीण साहित्य चळवळी आवश्यक आहेत. या साहित्य चळवळीची दखल राज्यस्तरावर घेतली जायला हवी आहे. त्यासाठी संयोजकांनी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात राज्यभराच्या साहित्यिक वर्तुळात प्रभाव असलेल्या कोकणाबाहेरील साहित्यिकाला, वाड्मयीन नियतकालिकाच्या संपादकाला आवर्जून पाचारण करण्यास सुरुवात करायला हवी. त्यामुळे ही चळवळ सर्वदूर पोहोचायला अधिक मदत होईल. वाचकांच्या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रथा, परंपरा, निसर्ग, समाज व्यवस्था, वैशिष्ट्ये, नवले, असह्यता मांडणारे ग्रामीण मराठी साहित्य हा कायम आत्मीय विषय राहिला आहे. शोषित, पिडीत, असह्य अगतिक माणसांविषयी कणव हा ग्रामीण साहित्य चळवळीचा मुख्य हेतू राहिला आहे. दुर्दैवाने आज कोकणातील खेडेगावातील लोकसंख्या कमी होताना दिसते आहे. अशा वातावरणात कोकणातील जवळच्या दोन तालुक्यातील साहित्य आणि संस्कृतीप्रेमी मंडळी एकत्र येऊन सामाजिक चैतन्याचा शब्दजागर करत असतील, तर तिथे आपण सर्वांनी सक्रिय सहभागी व्हायला हवं आहे, असं व्यक्तिश: आम्हाला या चळवळीचे विविध वृत्तांत वाचताना नेहमी वाटत आलं आहे. कौतुक म्हणून चळवळीच्या दिवाळी अंकात सहभागही नोंदवला आहे. आयोजकांनी यावर्षी ठरवून निमंत्रित केल्याने आणि संमेलनाच्या अध्यक्षीय यजमानपदाचा सन्मान चिपळूणला दिल्याने आम्हाला प्रत्यक्ष सहभाग नोंदवता आल्याचं विशेष समाधान आहे. ग्रामीण मराठी साहित्य हे समाज उभारणीचे मोठे शस्त्र आहे, ही बाब आपल्या समाजसुधारक पूर्वसुरींनी सिद्ध केली आहे. अशा कोणत्याही चळवळीच्या प्रारंभी ‘ती चळवळ कशी चुकीची आहे’ हेही सांगायला कोणीनाकोणी सुरुवात केलेली असते. थोड्याफार फरकाने हे सर्वत्र घडते. आज महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण साहित्याची निर्मिती आणि जागरणाची प्रक्रिया घडत असताना या चळवळीबद्दल आणि तिच्या सक्रियतेसाठी ग्रामीण भागात विशेष उपक्रम होत नाहीत, हे सत्य आहे. दुर्दैवाने ग्रामीण साहित्य लेखनातून नावारुपास आलेल्या प्रस्थापित मंडळींनाही ग्रामीण भागात साहित्यिक उपक्रम राबवण्यात रुची वाटत नाही. अशा काळात कोणतेही विशेष शासकीय अनुदान नसताना राज्याच्या कोकणभूमीत दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेली एक संस्था ग्रामीण साहित्य आणि संस्कृतीच्या जागर गेली आठ वर्षे सुरु ठेवते, हे कौतुकास्पद तितकेच अभिमानास्पद आहे.  

 

पूर्वी ‘लेखक-साहित्य-वाचक’ असा साहित्य व्यवहार होता. एकविसाव्या शतकात तसा तो राहिलेला नाही. साहित्याच्या प्रभावाला नियंत्रित, नियमित आणि निश्चित करणाऱ्या साऱ्या प्रक्रियांनी आजचा साहित्य व्यवहार बनतो. हे सारं व्यापक आहे. तरीही त्यात अस्सल ग्रामीण भागातील कार्याचा अपवाद कायम होता. तो ‘खळगा’ आपल्या परीने भरण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघ करतो आहे. स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिकीकरणाने वेग घेतला आणि शहरी आणि ग्रामीण वास्तवाची दृश्यमानता वाढत गेली. सामाजिक स्तर, विषमता जन्माला आली. महात्मा गांधींची हत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बौद्धधर्माची दीक्षा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा कारणांनी समाज व्यवस्थेत स्थित्यंतर येत गेले. त्याचे प्रतिबिंब साहित्यात-लेखनात उमटले. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकात दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, देशावादी आदी साहित्य प्रवाहांचा पाया घातला गेला. बहुजन लेखक वर्ग उदयाला आला. त्यांचं अनुभवविश्व शब्दबद्ध झालं. अनियतकालिकांची चळवळ बहरली. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या अर्धशतकीय उत्तरार्धात ‘प्रभावी’ लेखक अपवादानेही दिसला नाही. कारण लेखकांच्या क्षमतांसोबत इथली वाङ्मयीन संस्कृतीही काहीशी धंदेवाईक बनत गेली. प्रसिद्धीची सहज साधने उपलब्ध झाल्याने लेखक बहुत झाले. प्रसिद्धी माध्यमात सातत्याने मिळालेली जागा, चिल्लर पुरस्कार यामुळे लेखक म्हणून आपली एक सांस्कृतिक जबाबदारी आहे याचे भान हरपले, प्रतिभा ‘जणू’ तात्कालिक झाली. २०१४ सालच्या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांनी १९६८ साली आपल्या वाचाया लघुपत्रिकेत हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ असा समीक्षालेख लिहून मराठीतील लहानमोठ्या सर्वच लेखकांच्या नैतिक वाङ्मयीन व्यवहारांवर परखड टीका केली होती. अनेकांना ती झोंबली होती. व्यंकटेश माडगूळकरांनीही आपल्या ‘सरवा’ पुस्तकात ‘कोणत्या वनस्पतींची पानं खावी आणि कोणती खाऊ नयेत हे सशांच्या पिल्लांना त्यांच्या आया शिकवतात. माणसाच्या आयांनी पुस्तकांच्या पानाबद्दल अशी जागरुकता दाखवल्याचं माझ्या पाहाण्यात नाही.’ असं म्हटलं होतं. या भूमिकांवरील ‘उतारा’ शोधताना आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीचा आधार घ्यावा लागेल इतक्या त्या महत्त्वाच्या आहेत.


राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या यंदाच्या आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी, ग्रामीण भागात राहण्याचा आनंद, बैलगाडीतून अध्यक्षांची मिरवणूक आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कोट गावातून क्रांतीज्योत आणून होणार आहे. विशेष म्हणजे अर्जुना नदीकाठावर नदीपूजन करून नदीपात्रात प्रज्वलित दिवे सोडण्यात येणार आहेत. नदी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. हे सारे जनजागरण आवश्यक आहे. पुस्तक प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शनासह महिला बचत गटांचे खाद्य पदार्थांचे विक्री कक्ष हे सारे ग्रामीण संस्कृतीला पोषक असेच आहे. संस्थेच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार दिले जातात. यातले संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रिया, शेतकरी, वारकरी आदी आम्हाला विशेष महत्त्वाचे वाटतात. कोरोना अनलॉक वातावरणात २३ नोव्हेंबर २०२० रोजी राळेगणसिद्धी मुक्कामी असताना बोलण्याच्या ओघात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम्हाला गावाचा वाढदिवससंकल्पना विशद करून सांगितली होती. यशस्वी ग्रामविकासासाठी नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रांची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गावाचा वाढदिवस साजरा करणे, त्या अंतर्गत जन्माला येऊन एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना गावाने झबलं-टोपरं (अंगडं) घेणे, लग्न होऊन एक वर्ष झालेल्या गावातल्या सुनांचा खण, नारळ, साडी-चोळी देऊन सन्मान करणे, गावातील वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचं वंदन-पूजन करणे, सायंकाळी सर्वांनी एकत्रित भोजन करणे, गावाच्या विकासाचं काम करणाऱ्या तरुण, शाळेतील यशस्वी विद्यार्थी आदींना सन्मानित करणे आदी उपक्रमातून सामाजिक प्रदूषण दूर होऊन गावात पारिवारिक, एकोप्याची भावना वाढीस लागेल, अशी भूमिका होती. हाच विचार थोडा वेगळ्या पद्धतीने इथे जपलेला दिसतो आहे. आजच्या स्त्रिया जेवण बनवायचं सोडून ‘पार्सल’संस्कृतीच्या मागे लागल्यावरून खूप बोललं-लिहिलं जातं. मात्र पूर्वीच्या काळी ‘चाकरमानी’ जीवनपद्धतीत आपलं कोकण याच स्त्रियांनी सांभाळलं होतं. त्यांचा सन्मान करायला आपण कदाचित विसरलो. आजची ‘पार्सल’ किचन संस्कृती हा त्याचा परिणाम तर नसेल ना? म्हणून संघर्षातून संसार करणाऱ्या स्त्रियांना दिला जाणारा पुरस्कार आम्हाला विशेष महत्वाचा वाटतो.


महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य चळवळीची पहिल्यांदा निर्मिती होत असताना तिच्यासमोर दलित साहित्य चळवळीचा आदर्श होता, हे नाकारता येत नाही. ग्रामीण साहित्य चळवळीच्या मुळाशी सामाजिक अस्वस्थता, असंतोष आणि शोषणग्रस्तता होती. आजही ती पूर्णत्वाने संपलेली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला पुढे नेताना भविष्यात तिच्या ठाम वैचारिक अधिष्ठानाची मांडणी व्हायला हवी आहे. मेळावे, संमेलने, शिबिरे, कार्यशाळा, चर्चासत्रे ही या चळवळीची अंग आहेत. मात्र चळवळीचे खरे सामर्थ्य हे त‌िच्या तात्त्व‌िक बैठकीत आणि वैचारिक मांडणीत असते. ते काम सुरुवातीच्या काळात आनंद यादव, पाठोपाठ रा. रं. बोराडे, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले, नागनाथ कोत्तापल्ले आदींनी केल्याचे दिसते. आज राज्यातील ग्रामीण साहित्य चळवळी शिथिलता आलेली आहे. नव्या पिढीला लिहिते करण्यासाठी, दिशा देण्यासाठी ठोस उपक्रम नाहीत, हे खरे आहे. बदलत्या जीवनातील ग्रामीण प्रश्न मांडण्याची व त्यासाठी नवनवीन नेतृत्व करणारे कार्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण साहित्याची समीक्षा वाचली तर कोकण म्हणून फक्त श्री. ना. पेंडसे आणि गो. नी. दांडेकर यांच्या लेखनाचे दाखले सापडतात. कोकणातील ग्रामीण साहित्य विचार त्यापुढे जाण्यासाठीची विचारपेरणी कोकणात या चळवळीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न संघाने करावा. त्यातून कोकणातील ग्रामीण साहित्य चळवळीला नव संजीवनी प्राप्त होईल. बळीराजाचे मंदिर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेल्या ‘बरबडा’ येथे जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय गेली पाच वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवते आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ गेली आठ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उपक्रम घेत आहे. १९५३ साली स्थापन झालेली ही संस्था सत्तर वर्षे पूर्ण करते आहे. मुंबईतील चाकरमानी लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संघटना आहे. ग्रामीण भागाचा विकास, ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या समजून घेऊन सहकार्याचा हात देत संस्था कार्यरत राहिली आहे. आज बदलत्या काळानुरूप संस्था कार्यरत आहे. संघाने २०१७ साली झाशींच्या राणीच्या ‘कोटगावी 'ग्रामीण मराठी साहित्य संमेलन' भरवून हा परिसर नव्याने पुढे आणला. राणींचे वंशज सातारा मुक्कामी दत्तात्रय नेवाळकर यांच्याशी संघाने सकारात्मक चर्चा केली. नेवाळकरांनी नुकतीच कोट येथील आपली ८१ गुंठे जमीन रणरागिणी स्मारक ट्रस्टला देणगी दिली. ही बाब ग्रामीण मराठी साहित्य संमेलन फलस्वरूप महत्त्वाची आहे. आजच्या पिढीचं शहरी जगणं स्मार्ट होत चाललंय. वेगाबरोबर धावणं सर्वांना अनिवार्य आहे. बदलत्या जीवनाशी जुळवून घेताना मागच्या पिढीचा हात ताणला जातोय अशी स्थिती आहे. यावर जुळवून घेण्याची भावना वाढीस लावण्याचे औषध देण्याचे काम हा चळवळीतून होऊ शकेल. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची दोन दशके आपली जगून झालीत. यातला आपल्या जगण्याचा आणि समग्र भौतिक पर्यावरणाचा वेग अतिप्रचंड राहिला आहे. मोबाईल आणि इंटरनेट या दोन साधनांनी संपूर्ण मानव जातीला व्यापून टाकले आहे. यामुळे मानवी संस्कृतीत आणि जीवनशैलीत बदल झाले आहेत. विशेषतः १९८०च्या पूर्वी किंवा दरम्यान जन्मलेल्या पिढीला हे बदल आश्चर्यजनक वाटतात. १९९५ नंतर जन्माला आलेल्या पिढीला या नव्या जगाची चाहूल लागलेली होती. आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक माध्यमे, आणि समाज माध्यमांनी आपल्या अधिसत्तेने सर्वसामान्यांचे जगण्याचे, अभिव्यक्तीचे, सांस्कृतिक, राजकीय आदी संदर्भ बदलून टाकलेत. विविध माध्यमाच्या या सार्वत्रिक अधिसत्तेचा थोपवणे सोपे नाही. प्रत्येक काळाचा एक स्वभाव असतो. आजच्या काळाने वेगाने सामाजिक, धार्मिक, जातिय वितुष्ट वाढवलेले आपण पाहिले आहे. संभ्रम, संशय, भिती, विद्वेष आणि आत्मकेंद्रितता या नव्या माध्यमामुळे अधिकाधिक पसरताहेत. झुंडीने ट्रोलिंग करणे, कोणत्याही गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देणे, स्वत:विषयी वारंवार सांगत (सेल्फी, स्टेटस्) राहाणे, आपल्या सुरक्षित कवचात जगणे, इतरांविषयी आस्था नसणे अशी मानसिकता घडत आहे. एकाकीपणा, वार्धक्य हेही प्रश्न तीव्र झालेत. पण अशा प्रश्नांकडे बघायला वेळ कोणाला आहे? आपले भावविश्व, पारंपरिक मूल्यव्यवस्था, सांस्कृतिक संवेदना, जगण्या-वागण्याचे सौंदर्यशास्त्र, नैतिक–अनैतिकतेच्या संकल्पना, जाणीवांचे, चिंतनाचे क्षेत्र सारं बदललेलं आहे. स्त्रियांच्या देदीप्यमान इतिहासाची उजळणी करताना त्यांच्यावर आजही होणारा अन्याय विसरता येत नाही. शेती, दुष्काळ, कौटुंबिक ताणतणाव, अस्मिता, विध्वंसक राजकारण, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते घटस्फोट, नव्या पिढीवर याचा होणारा मानसिक आणि भावनिक परिणाम हे सारं चिंताक्रांत करणारं आहे.


आजच्या समाजाची बदललेली वैचारिक अभिरुची नव्याने लिहिताना ध्यानात घ्यावी लागेल. महानगर आणि खेडे हे अंतर वाढले आहे. प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील साहित्याला प्रतिष्ठा देणे आजची सांस्कृतिक गरज बनली आहे. नव्या साधनांनी आपल्याला मूळ भाषेपासून फारकत घ्यायला भाग पाडले आहे. संवादासाठी आम्ही चिन्हांची भाषा (इमोजी) वापरू लागलो आहोत. चिन्हांच्या भाषेचा अधिकाधिक प्रसार होणं म्हणजे परस्परातला संवाद कमी होणं ठरू शकतं. संवादहीन संस्कृती अविश्वासाकडे झुकल्यास घातक ठरू शकते. याचे भान लेखकाला असायला हवे आहे. आजच्या सामाजिक जीवनात मोठा अंतर्विरोध भरलेला जाणवतो आहे. अशा काळात कोकणातल्या दोन तालुक्यात सुरु असलेली ग्रामीण मराठी साहित्याची चळवळ आशेचा ‘नंदादीप’ गेली आठ वर्षे उजळते आहे, हे महत्त्वाचे आहे. हा नंदादीप आपल्याला आपल्या मातृभाषेशी, संस्कृतीशी, मानवी समूहाशी प्रामाणिक राहायला सांगतो आहे. आपल्या परंपरांचे भान राखायला, परंपरांचा नव्या काळाशी अन्वयार्थ जोडायला, समाजजीवनाच्या नकारात्मक बाजूंवर बोलायला, विविध स्थितीगतीचे प्रवाह समजून घ्यायला प्रोत्साहित करतो आहे. हे सारं नीट समजून घेतलं तर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या साहित्य चळवळीतून काळावर मुद्रा उमटवणारं, दखलपात्र आणि परिणामक्षम लेखन जन्माला येईल, असा विश्वास वाटतो.


-    धीरज वाटेकर, चिपळूण (मो. ९८६०३६०९४८)

(धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील पर्यटन-पर्यावरणविषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखनया विषयावरील आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ साधूया!

    


          कोकणातील लोककलांचे वैविध्य चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आजपासून चार दिवस (५ ते ८ फेब्रुवारी २०२३) चिपळूणातील श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्यमहोत्सवात सादर होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि पालकमंत्री ना. उदय सामंत, महोत्सवाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषणडॉ. तानाजी चोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कोकण प्रदेश हा सांस्कृतिक परंपरेने आणि लोककलेने समृद्ध आहे. नागरीकरण न झालेल्या आदिवासींसह ग्रामीण जीवनातील कलांना आपण लोककला’ (फोकआर्ट) ही संज्ञा योजिली आहे. निसर्गरम्य कोकणासह जगात जेथे लोककलाविष्कार आहेत तेथे आजही निसर्गसंवाद साधणाऱ्या लोकसमूहांचे अस्तित्व आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सव महत्त्वाच्या उत्सवांशी पारंपरिक लोककला निगडीत आहेत. कोकणभूमीत लोककलांचे वैविध्य लपलेले आहे. बदलत्या काळात पर्यटनअंगाने विचार करता या साऱ्याची मूल्यवृद्धीहोऊन लोककलांना राजाश्रयमिळायला हवा आहे. त्यादृष्टीने भव्य उत्सवी वातावरणात लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवायला वाचनालयाचा प्रयास अभिमानास्पद आहे.



रानात जाऊन गवळदेवाचा (पिंपळ तत्सम वृषाखाली पूजा करून रानात जेवण बनवणे) नैवेद्य करण्याची प्रथा आजही कोकणात टिकून आहे. आपल्या पाळीव जनावरांची काळजी घेणाऱ्या या निसर्ग देवतेप्रति प्रामाणिक श्रद्धेची भावना त्यामागे आहे. यातून निसर्गाची जपणूकही होत असते. देवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गावातल्या सगळ्यांनी एकत्र जमून केलेलं सहभोजन ही सामाजिक एकोप्यासाठी उपयुक्त आहे. कोकणात भातलावणी संपल्यावर घरोघरी गणपती येत असतात. तेव्हा इथला सर्वसामान्य शेतकरी मनुष्य मोकळा असतो. पुढे याच भाताची कापणी आणि मळणी संपल्यावर कोकणाला शिमग्याचे वेध लागतात. या काळातील कोकणी ‘लोककला’ इथल्या मातीला नवीन नाहीत. या लोककला लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. जात्यावरची ओवीगीते, बाळाला जोजवण्याची गीते, सण-उत्सवातील नृत्यनाट्ये, देवतोपासना म्हणून काढली जाणारी चित्रे, शिल्पे, रांगोळी हेही सारे पारंपरिक लोकजीवनाचा घटक आहेत. याद्वारे होणाऱ्या सौंदर्यनिर्मितीचा इथल्या निर्मात्याला कायम आनंद मिळत आला आहे. लोककलांचा महोत्सव म्हणून म्हणून आयोजकांची त्यात डोकावणारी सखोलता, कार्यपद्धतीचे वैविध्य आणि दस्तऐवजीकरण करण्याचा आग्रह याबाबी अधिक महत्त्वाच्या ठराव्यात. काळानुरूप कोकणातील जवळपास साऱ्या लोककलांच्या वेशभूषा, प्रकाशयोजना आणि वाद्यवृंदात झपाट्याने ‘रंगीतसंगीत’ बदल होताहेत. यामुळे मूळ कलाप्रकार हरवण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन वाचनालयाने महोत्सवात शत-प्रतिशत पारंपरिकतेला न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे. अस्सल परंपरा ‘वर्धिष्णू’ करण्यासाठी असे प्रयत्न आवश्यक ठरावेत. दशावतारी नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’ लोकनृत्य, शक्तीतुरा, शिमगा पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ठ तालावर पालखी नाचवणारी लोकनृत्य, संकासूर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या पायात चाळ बांधून भरजरी कपड्यांनी सजलेली पारंपरिक सामूहिक नृत्याचा अविष्कार असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे अविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा अभिनव प्रकार आपल्याला फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघर मधील आदिवासी पावसाला विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबड्या) करतात. कोकणात मासेमारी करणाऱ्या गाबीत समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाट्यप्रकार प्रसिद्ध आहे. कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान मिळवला आहे. पण असं असलं तरी याही पलिकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप आदी असंख्य ‘लोककला’ आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या कलांना, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम हा महोत्सव करतो आहे. अनेक प्रकारच्या बहुविध लोककलांनी आपली भूमी संपन्न आहे. कालानुरूप या लोककला लोप पावत चालल्या आहेत. अंधश्रद्धा बाजूला सारून सकस प्रयोगात्मक लोककला जीवंत राहाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील गणेशोत्सवात ‘जाकडी’नृत्य म्हणजे शक्तीतुरा हे इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य ठरावे. इथल्या श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार आहे. शक्ती-तुरा हे दोन्ही फड आळीपाळीने पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे खास गाण्यांच्या चालीवर एकमेकांना प्रश्न टाकून त्याची उत्तरे पटवून देत असतात. नृत्य पथकातील तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर नृत्य साथ देत असतात. नमन, दशावतार लोककला कलात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती गाऊन कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली जाते. कोकणभूमीने शतकानुशतके जोपासलेला लोककलेचा हा गाभा आपल्याला या महोत्सवात अनुभवता येणार आहे.



‘पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य’ महोत्सवात कोकणातील खाद्यसंस्कृती, जाखडी : काल, आज आणि उद्या, रत्नभूमीतील लोककला, लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती, नमनाचा अनुबंध आणि शाश्वत पर्यटन या विषयावरील परिसंवाद तसेच देवाला जागर-गोंधळ, संकासूर व गोमू, लौकवाद्य मैफल, गज्जा नृत्य, उखाणे, सापाड, नमन, जाखडी, चित्रकथी, कुंभारकला, भेदीक शाहिरी, तारफा नृत्य, घोरनृत्य, दशावतार, काटखेळ, गौरी  टिपरी व गोफ नृत्य, पोवाडा, नकटा, कोळी नृत्य, डेरा, पालखी नृत्य, मंगळागौर, कातकरी, मुस्लिम गीते, खालू बाजा, जलसा, वैदिक लग्नगीते, घोरीप, महिला दशावतार आदी चाळीस हून अधिक लोककला सादर होणार आहेत. महोत्सवांतर्गत स्थानिकांच्या लोककला कट्ट्यात ईशस्तवन, नमन, ओवी, गाऱ्हाणे, स्मरणगीत, ऐतिहासिक पोवाडा, कोकणी गीत, मुस्लिम लग्न, बारसे गीते, पारंपरिक गाणी, पारंपारिक नृत्य, आंबेडकरी गायनपार्टी, सांस्कृतिक गीत, बोलीभाषा संवादात्मक चर्चा, डांगी नृत्य, दिवली नृत्य, आंबेडकरी जलसा, वेसवा नृत्य, कोकणी संस्कृती, भारुड यांसह आष्टा येथील धनगरी नृत्याचे विशेषत्वाने सादरीकरण होणार आहे. चिपळूणातील या भव्य महोत्सवाची आयोजक संस्था, शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षांचा वारसा लाभलेले संस्कारकेंद्र लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही आहे. चिपळूण शहराला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी, निस्पृह कार्यकर्त्यांचे बळ लाभलेली, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील जिज्ञासूंमध्ये चिपळूणची ओळख सांगणारी, इथल्या श्रोत्यांना सजग आणि बहूश्रुत बनवून शहराचे सामाजिक भान उत्तम विकसित करणारी संस्था अशी तिची ओळख आहे. हे वाचनालय साहित्यिक, सांस्कृतिक अभिसरणाचे मुख्य केंद्र असावं असा व्यापक दृष्टीकोन ठेवून कार्य करते आहे. वाचनीय आणि श्रवणीय असलेले हे वाचनमंदीर आपल्या ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ प्रकल्पांमुळे प्रेक्षणीय झाले आहे. संपूर्ण कोकणभूमी ही जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशी ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणात रंगभूमी, लोककला आणि साहित्याशी निगडीत धडपड अलिकडे गांभीर्याने घेतली जाऊ लागली आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यांना चित्रपट अंगाने किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे आहे.  कांतारा या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदैवताची सेवा करणारा सेवेकरी गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कोला उत्सवासह भूता कोला प्रथा-परंपरा याचं अचूक चित्रण घडलं आहे. या प्रथेत भूताची म्हणजे ग्रामदेवाची पूजा केली जाते. हे दैवत गावाचं रक्षण करतं आणि त्यांच्या क्रोधामुळे काहीही अनर्थ होऊ शकतो अशी इथल्या गावकऱ्यांची मान्यता आहे. याबरोबरच ही कला सादर करणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून ती देवता ही गावकऱ्यांशी संवाद साधते असा तिथल्या लोकांचा विश्वास आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर ह्या मंडळींनी तग धरावा यासाठी असे लोककला महोत्सव हे लोककलावंतांच्या जीवनातील जणू ‘पथदीप’ ठरावेत.  

कोकणात ‘पर्यटन’ विकासाचे वारे स्थिरावत असताना लोककला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्याला पर्यटनाशी जोडून नवा विचार देण्याचा प्रयत्न होतो आहे. जगभर आणि देशभर पर्यटन करताना आपण तिथल्या लोकसंस्कृतीचा पोशाख आवडीने परिधान करून आपलीच छायाचित्रे पैसे देऊन मुद्दामहून काढून घेत असतो. भविष्यात कोकणातील विविध लोककलांच्या ड्रेसचे पर्यटन अंगाने असे व्यावसायिकीकरण होण्याची आवश्यकता आहे. ‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ होऊन त्यांना ‘राजाश्रय’ मिळावा यासाठीही आगामी दस्तऐवजीकरणासह भव्य उत्सवी वातावरणात सर्वांसमोर येत असलेले लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवण्याचा होत असलेला ‘महोत्सवी’ प्रयत्न स्वागतार्ह म्हणायला हवा.

 

धीरज वाटेकर

लेखक, कोकण विकास, पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते

मो. ९८६०३६०९४८

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...