तंजावूर हे महाराष्ट्र आणि तामिळनाडूची नाळ जोडणारा दुवा आहे. तंजावूरच्या इतिहासात, ‘राजा’ हा किताब सरफोजीराजे द्वितीय (२४ सप्टेंबर १७७७ ते १६ मार्च १८३२) यांच्याकडे असला तरी प्रत्यक्षात राज्यकारभाराची सत्ता नव्हती. अशा विपरीत परिस्थितीत सरफोजीराजे द्वितीय यांनी तंजावूरच्या सांस्कृतिक विकासासाठी दिलेले अमूल्य योगदान आजही त्यांची ‘ज्ञानपूजक’ ही ओळख सांगण्यास पुरेसे आहे. धर्म, अर्थकारण, कलासंचार, संग्रहविद्या हे सरफोजीराजे द्वितीय यांच्या आस्थेचे विषय राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेस सुमारे नव्वद हजार लोक उपस्थित होते. लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजे द्वितीय यांना सन्माननीय सभासदत्व (१८२८) देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. हा मान मिळविणारे सरफोजीराजे द्वितीय हे पहिले भारतीय संस्थानिक होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिगंत किर्तीचे ‘ज्ञानपूजक’ दुसरे सरफोजीराजे द्वितीय यांच्या कारकीर्दीचा आढावा घेऊया.
तंजावरचे राजे श्रीमंत श्रीशिवाजीराजे भोसले |
कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेलं तंजावूर शहर एकेकाळी जगातील सर्वात उंच आणि आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बृहदेश्वर मंदिसाठी प्रसिद्ध आहे. एका तामिळ दंतकथेनुसार तंजा नावाच्या दैत्याचा वध भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नीलमेघ पेरूमल यांनी केल्यावरून या ठिकाणाचे तंजाऊर असे नाव पडले होते. तंजावूरच्या इतिहासात मराठा राजांचा कार्यकाळ जवळपास १८० वर्षांचा आहे. तंजावूरमुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली सांस्कृतिक वारश्याची जोड मिळाली. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडपासून तंजावूर जवळपास १३६० किमी. आहे. इतिहासात तंजावूरचे राज्य विजयालय चोळ यांनी मुत्तरैयर वंशाच्या राजांकडून नवव्या शतकात जिंकून घेत तेथे राजधानी वसवली होती. चोळ राजवंशाने तंजावूर येथे सुमारे चारशे वर्षे राज्य केले. पुढे त्याच वंशातील राजेंद्र चोळ यांनी राजधानी गंगैकोंडचोळपुरम् येथे नेली. पांड्य वंशाची सत्ता तंजावूरवर १५४९पर्यंत होती. त्यानंतर विजयनगर राज्यातील सेनापती शिवप्पा नायक यांनी तंजावूर येथे स्वतंत्र राज्य स्थापले होते. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी यांनी आदिलशाही अंकित तंजावूरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५मध्ये हे राज्य मिळवले होते. या घटनेचा उल्लेख भोसलावंसम् या संस्कृत हस्तलिखितामध्ये आढळतो. व्यंकोजी यांच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, पहिले सरफोजी व तुकोजी या तिघा भावांनी १७३६ पर्यंत राज्य केले. सरफोजीराजे प्रथम यांच्या काळात शिवभारत या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित संस्कृत हस्तलिखिताचे तामिळ भाषांतर ‘शिवचरितम’ करण्यात आले होते. तुकोजीराजे यांनी हिंदुस्थानी संगीताचा परिचय प्रथमच दक्षिणेस करून दिला होता. त्यांनी संगीतावर आधारित संगीत समामृत ग्रंथाची निर्मिती केली. तुकोजी यांच्यानंतर त्यांचे पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आले. ते वर्षभरात मृत्यू पावले. तुकोजी यांचे पुत्र प्रतापसिंह यांनी (१७३९-६३) इंग्रजांशी सख्यत्व जोडून सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. प्रतापसिंहराजे यांच्या काळात तंजावूरने ब्रिटिश आणि फ़्रेंच यांच्यातील सप्तवार्षिक युद्ध अनुभवलं होतं. प्रतापसिंहराजे यांचे पुत्र तुळजाजी (१७६३ ते ८७) यांनी त्यांना मुलगा नसल्यामुळे मृत्युपूर्वी भोसले घराण्यातील मालोजीराजे यांचे भाऊ विठोजी यांच्या वंशातील एक मुलगा दत्तक (२३ जानेवारी १७८७) घेऊन त्याचे नाव सरफोजी ठेवले. तेच पुढे सरफोजीराजे द्वितीय म्हणून प्रसिद्धी पावले.
Drawing of Thanjavur Brihadeshwara Temple in a French book titled Monuments Ancients Et Modernes De L Hindoustan Published in 1821 |
सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षणासाठी डच मिशनरी सी. एफ. शॉर्झ यांच्याकडे सोपविण्यात आले होते. शॉर्झ यांनी राजपुत्रास उचित शिक्षण देत इंग्रजी, ग्रीक, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, डॅनिश या पाश्चात्त्य आणि मराठी, संस्कृत, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू आदी भारतीय अशा एकूण तेरा भाषा शिकविल्या होत्या. तुळजाजी यांच्यानंतर अमरसिंह नावाच्या त्यांच्या सावत्र भावाने तंजावूरची सर्व सत्ता हस्तगत केल्यावर सरफोजीराजे द्वितीय यांना मातोश्रींसह मद्रासला आश्रय घ्यावा लागला होता. सरफोजीराजे द्वितीय यांचे दत्तकविधान अशास्त्र असून मीच या गादीचा खरा वारस असल्याचे त्यांनी मद्रासचे गव्हर्नर सर आर्चिबॉल्ड कँबेल यांना कळविले होते. इंग्रजांनीही विषयाची अधिक चौकशी न करता अमरसिंह यांना तंजावरच्या गादीवर बसवून त्यांच्यासोबत नवीन तह (१० एप्रिल १७८७) केला होता. मात्र सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षण देणाऱ्या शॉर्झ यांनी (१७८७ ते ९७) हे दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला, सरफोजीराजे द्वितीय हेच खरे वारस असल्याचे दाखवून दिले. अखेर ईस्ट इंडिया कंपनीने अमरसिंह यांना पदच्युत करून सरफोजीराजे (द्वितीय यांचा राज्याभिषेक (१७९८) केला. त्यांच्या अखत्यारित पाच सुभे, पाच हजारहून अधिक गावं एवढा मुलुख होता. ईस्ट इंडिया कंपनीने सरफोजीराजे द्वितीय यांच्याशी एक पंधरा कलमी करार केला होता. पुढील वर्षी गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली तंजावूर संस्थान खालसा केले. सरफोजीराजे द्वितीय यांच्याकडे खासगी मालमत्ता, तंजावूर किल्ला आणि भोवतालचा काही भाग आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आली होती.
नाटक हा कलाप्रकार दक्षिणेमध्ये रुजवला तो तंजावूरच्या मराठ्यांनी. मराठी भाषेतील पहिलं नाटक हे महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर नव्हे तर तामिळनाडूच्या तंजावूरच्या मराठी रंगभूमीवर प्रथम उभे राहिले होते. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी वनस्पतीजन्य औषधनिर्मिती आणि संशोधन यासाठी ‘धन्वंतरी महाल’ या संशोधन संस्थेची स्थापना केली. संस्थेत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि आधुनिक औषधे या उपचारशाखांवर संशोधन केले जात असे. संस्थेत आजारी असलेल्या व्यक्ती व प्राण्यांवर उपचार केले जात. त्यांची नोंदणीपत्रके ठेवली जात. तशी पद्धत तेव्हा भारतात रूढ नव्हती. संस्थेत वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग यावर अठरा भागांत संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. राजांकडे महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रंगीत हस्तचित्रे होती. त्यांनी धन्वंतरी महालाच्या औषधोपचार पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणारा एक कवितासंग्रह तयार केला होता. राजे हे घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वगती, अश्वांचे आयुष्य आदी अश्वपरीक्षेत पारंगत होते. यातून त्यांच्या ‘गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सार’ या ग्रंथांची निर्मिती झाली. त्यांनी पक्षीजगताही अभ्यास केला होता. दुसरे सरफोजीराजे द्वितीय हे त्यांच्या बरोबर शल्य–चिकित्सेची सामग्री नेहमी बाळगत. ते जेथे जेथे जात तेथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करत. सरफोजीराजे द्वितीय यांनी केलेल्या शस्त्रक्रियांच्या नोंदी इंग्रजीत तपशीलवार सापडतात. त्यांनी ज्या रोग्याची शस्त्रक्रिया केली त्याचा पूर्वेतिहासही नोंदवून ठेवलेला आहे. हे साहित्य सरस्वती महाल ग्रंथालय संग्रहात आहे. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी नव विद्याकला विधी शाळेची स्थापना केली होती. तेथे भाषा, साहित्य, कला, कौशल्य, वेद आणि शास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. ते भारतीय स्त्रियांच्या उद्धाराचे समर्थक असल्याने त्यांनी स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. त्यांनी तंजावूरमध्ये पाण्याचे दहा तलाव बांधले. कित्येक विहिरी खोदल्या. संपूर्ण तंजावूरसाठी जमिनीखालील मलनिस्सारण व्यवस्था अंमलात आणली होती. सरफोजी यांनी सोळा भिन्न खाती पाडून प्रत्येक खात्यावर एक दमित (प्रमुख) नेमला होता. स्वतः उत्तम कवी असल्याने त्यांनी भरतनाट्यम् व संगीतकला यांनाही प्रोत्साहन दिले. सरफोजीराजे (द्वितीय) यांचा काळ संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात सुमारे ३६० संगीततज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित दर्जा प्राप्त करून देणारे संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे राजांचे दरबारी गायक होते. भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाची सोय केली. चित्रकला व शिल्पकला यांचाही त्यांना व्यासंग होता. त्यांनी राजमहालातील दिवाणखाना उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला होता. याशिवाय मद्रास येथील संग्रहालय आणि इतर वाड्यांमधूनही त्यांनी चित्रे काढून घेतली होती. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला होता. शॉर्झ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ राजांनी त्यांचा पुतळा उभारला होता. पवनचक्की, विद्युत्यंत्र, मनुष्याचा हस्तिदंती सांगाडा, राजमहालात उघडलेली वेधशाळा आदीतून त्यांची संशोधक आणि मर्मज्ञ दृष्टी दिसून येते.
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीराजे द्वितीय यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर १८०३मध्ये दगडात कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास होय. भारतात एवढा मोठा दीर्घ शीलालेख कुठेही नाही. याशिवाय सरफोजीराजे द्वितीय यांनी ऐतिहासिक अरबी व फार्सी ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली. त्यात इब्न बतूताचे अरबी भाषेतील ग्रंथ व शाहनामा हे फार्सी काव्य आदी महत्त्वाचे ग्रंथ आहेत. सरफोजीराजे द्वितीय यांनी आपल्या चौतीस वर्षांच्या प्रजादक्ष कारकीर्दीत तंजावूर आणि सभोवतालच्या प्रदेशात अनेक धार्मिक आणि शिक्षणविषयक सुधारणा केल्या. ते मोकळया मनाचे व अन्य धर्मपंथीय श्रद्धावंताच्या बाबतीत सहिष्णू होते. बृहदीश्वर मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या देताना इतर धर्माच्या लोकांनाही समान वागणूक दिली. त्यांनी ख्रिश्चन मिशनरींनी चालवलेल्या शाळा आणि चर्चेस यांनाही देणग्या दिल्या होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तंजावूर हे विद्येचे आणि केलेचे केंद्र बनले होते. सरफोजीराजे द्वितीय यांची संपूर्ण कारकीर्द त्यांच्या अभिरूचीसंपन्न जीवनाची साक्ष देत आहे. त्यांना मुक्तंबाबाई व अहिल्याबाई या दोन पत्नी होत्या. मुक्तंबाबाई अकाली मरण पावल्या. अहिल्याबाई यांच्यापासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. मुलगा पुढे श्रीशिवाजी (१८३३ ते १८५५) म्हणून सरफोजीराजे द्वितीय यांच्या मृत्यूनंतर तंजावूरचे राजे बनले. मात्र कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला होता. त्यातच श्रीशिवाजी हे निपुत्रिक वारल्यामुळे १८५५मध्ये इंग्रजांनी तंजावूर संस्थान खालसा केले.
राजा सरफोजी भोंसले दुसरे |
तंजावूरच्या
बहुतेक कलाभिज्ञ राजांनी चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य, ग्रंथनिर्मिती आदींसह विविध भाषांना मोठा आश्रय दिला होता. तंजावूरचा
दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला असायचा. तंजावूरमधील मराठा दरबार हॉल, सरस्वती
महाल ग्रंथालय म्हणजे तंजावूर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. महाराजा सरफोजी
द्वितीय यांनी स्वतः
शंभरहून अधिक मराठी आणि तेलगु भाषेत गाणी लिहीली. ही गाणी नाट्यसंगीतात वापरली
गेली. त्यांनी ‘सर्वेंद्र रत्नावली’ हा ७२ खंड असलेला ग्रंथ लिहिला. या संस्थानने १९६२च्या
चीन युद्धाच्यावेळी दोन हजार किलो सोने, १९७१च्या पाकिस्तान युद्धात शस्त्रास्त्र भारत
सरकारला दिली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला शंभर एकर जमीन दान दिली. तंजावूरमध्ये
आजही सुमारे पाच लक्ष मराठी लोक राहतात. ते तामिळी पेहराव घालत असले तरी घरात
तोडकी-मोडकी मराठी बोलतात. तंजावूरच्या मराठा राजांनी दर्जेदार १२ नाटकांसह पन्नासहून
अधिक विविध ग्रंथ लिहिले. भारतातील पहिला छापखाना उभारला, भारतातील मुलींची शाळा
काढली, भरतनाट्यम नृत्याला राजाश्रय दिला. मराठीमधील पाहिले नाटक लिहून रंगमंचावर आणले.
जगातील सर्वात मोठा शिलालेख साकारला. जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संग्रहालय उभारले.
एका मराठी राज्याचं हे वैभव आणि संस्कृती तमिळ जनतेनं जतन केली, हे फार महत्त्वाचं
आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील दक्षिण भारतातील हे ‘मराठी’ कर्तृत्व आपण समजून
घ्यायला हवं आहे.
धीरज वाटेकर,
चिपळूण
मो. ९८६०३६०९४८
संदर्भ ::
१. मराठी विश्वकोश
२. थिंक महाराष्ट्र
डॉट कॉम’ वेबपोर्टल
३. ABP माझा - स्पेशल
रिपोर्ट : तंजावरच्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास
४. शिवदैनंदिनी
२०२१