बुधवार, ३१ मे, २०२३

श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार 'दळवटणे सैन्यतळ'

भारताच्या इतिहासाची पाने उलगडताना आरमारासह शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेचा सुसंघटित वापर करून बलाढ्य हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे राजे म्हणून छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे स्थान अग्रेसर आहे. महाराजांचा राज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्षे होताहेत. श्रीशिवराज्याभिषेकपूर्व दिवसात चिपळूण येथे महाराजांच्या सैन्याची छावणी पडलेली होती. आपल्या सैनिकांची एकदा पाहणी करावी असे त्यांच्या मनात होते. तेव्हा महिनाभर महाराजांनी चिपळूण येथे मुक्काम केला होता. ८ एप्रिल १६७४ रोजी महाराज चिपळूणच्या लष्करी छावणीकडे गेले होते. ११ एप्रिल १६७४ रोजी त्यांनी दळवटणे सैन्यतळाची पाहाणी केली होती. १८ एप्रिल १६७४ रोजी
हंबीररावमोहिते यांना सरसेनापतीपदाची वस्त्रे बहाल केली होती. येथे महाराजांची १० हजारावर फौज होती. महाराजांनी इथल्या रामतीर्थ तलावात स्नान करून श्रीरामेश्वर, श्रीगांधारेश्वर आणि श्रीपरशुराम दर्शन घेतले होते. याच दळवटणेच्या (हलवर्ण) रेवेचा माळ भागातील या सैन्याला उद्देशून ९ मे १६७४ रोजी महाराजांनी लिहिलेलं पत्र हे प्रजाहितदक्ष आदर्श राज्य कसं असावं?’ याचं जगातील सर्वोत्तम उदाहरण आहे. एका अर्थाने ‘दळवटणे सैन्यतळ’ हा श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार आहे. श्रीशिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत असताना या दळवटणे सैन्यतळाकडे ‘हेरिटेज’ अंगाने पाहाण्याची आवश्यकता आहे.

चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदी तीरावरील
दळवटणे येथील रेवाचा माळ परिसर

जावळी जिंकल्यानंतर राजांनी कोकण काबीज करायला सुरुवात करताना १६६० मध्ये चिपळूण येथील गोवळकोटच्या खाडीत वसलेला गोविंदगड आणि गुहागर मधील गोपाळगड स्वराज्यात घेतला. त्यानंतर महाराजांनी चिपळूण येथील दळवटणे येथे घोड्यांच्या पागा बसवल्या होत्या. आजही शहरात तत्कालिन हत्तीमाळ, पागा हे शब्द वापरात आहेत. दळवटणे येथील रेवेच्या माळावर घोड्यांच्या पागा होत्या. या पागांमाधील घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय बाजूलाच एका घोडेबावीत केली जात असे. आजही त्या विहिरीला 'घोडेबाव' म्हणतात. वाशिष्ठी तीरावरील या विस्तीर्ण रेवेच्या माळावर सध्या पागांचे कोणतेही अवशेष नाहीत. गेली कित्येक वर्षे ‘घोडेबाव’च्या पाण्याचा वापर कोणीही करत नाही. १६६१ला कारतलबखानाचा पराभव केल्यानंतर निजामपूरहून ते दाभोळला आले. त्यांनी श्रीदाल्भ्येश्वराचे दर्शन घेतले. दाभोळला योग्य अधिकारी, दोन हजार सैन्य, व्यवस्थेसाठी ठेवून महाराज तीन चार दिवसांनी चिपळूणला आले. चिपळूणला महाराजांनी भगवान श्रीपरशुरामाचे दर्शन घेतले होते.

दळवटणे येथील शिवकालीन घोडेबाव

२४ फेब्रुवारी १६७४ रोजी सरनौबत प्रतापराव गुजर यांना वीरमरण आले. १९ मार्चच्या सुमारास महाराजांच्या चौथ्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा मृत्यू झाला होता. महाराजांचा राज्याभिषेक जवळ येऊन ठेपला होता. तथापि महाराजांची कार्यव्यग्रता आणि मानसिक ताण जराही कमी झालेला नसावा. श्रीशिवराज्याभिषेकपूर्व दिवसात चिपळूण येथे सैन्याची छावणी पडलेली असताना आपल्या सैनिकांची एकदा पाहणी करावी असे राजांच्या मनात होते. त्याप्रमाणे ८ एप्रिलला महाराज रायगडाहून चिपळूणला आले. ११ एप्रिलला ते हलवर्ण (दळवटणे) लष्करी छावणीकडे गेले. त्यांनी येथील लष्कराची पाहणी केली. खजिना फोडून लष्कर व पायदळ लोकांस महाराजांनी वाटणी केली. चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्यात नव्या नेमणुका करुन टाकल्या. लष्करास सरसेनापती नव्हते. कोणास करावे? हा प्रश्न होता. तेव्हा १८ एप्रिल रोजी महाराजांनी हंबीररावमोहिते यांना सरसेनापतीपदाची वस्त्रे बहाल केली. २४ एप्रिल रोजी महाराजांनी स्वतः स्वारी करून वाईजवळचा केंजळगड जिंकला. महाराजांनी वाऱ्याच्या वेगानं केंजळगडावर केलेलं आक्रमण इतकं अचानक होतं की, कृष्णा आणि नीरा नद्यांच्या खोऱ्यातल्या केंजळगडावरील आदिलशहाच्या किल्लेदाराला आणि सैन्याला लढाईसाठी सज्ज होण्यासही वेळ मिळाला नव्हता. २५ एप्रिल रोजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी सिंहासन बनवले. २६ एप्रिल रोजी कारवारवर स्वारी केली. ९ मे रोजी महाराजांनी दळवटणे (हलवर्ण) फौजेस पत्र पाठवले. तेव्हा उन्हाळ्यानंतर सैन्य घरोघर रजेवर जात नसे. काही ठिकाणी पावसाळ्यात छावणीस राहात असे. चिपळूणचे मराठी सेनेचे सैन्य पावसाळी छावणीसाठी हलवर्ण (दळवटणे) येथे गेली होती. चिपळूणला श्रीपरशुरामाचे दर्शन घेऊन महाराज प्रतापगडावर आले. १९ मे रोजी महाराजांनी प्रतापगडावरील श्रीतुळजाभवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण करून मंगलकलश प्रस्थापित केला. २१ मे रोजी महाराज प्रतापगडावरून रायगडला परतले. २९ मे रोजी महाराजांची रायगडावर मुंज झाली. ३० मे रोजी विनायक शांती विधी, ३१ मे रोजी विविध शांती विधी, १ जून रोजी दानधर्म केला, २ जून रोजी नक्षत्रयज्ञ, उत्तरपूजन विधी होऊन ४ जूनला महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. ६ जून १६७४ (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी हिंदूराष्ट्र संस्थापक छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा रायगडावर पहाटे ५ वाजता राज्याभिषेक झाला होता.


आपल्या भारतीय संस्कृतीने पर्यावरणाचा विचार दिला आहे. श्रीशिवराज्याभिषेक आणि जागतिक पर्यावरण दिन एकाच सप्ताहात येतात. महाराजांच्या काळात लिहिल्या गेलेल्या लेखनात 'झाडांचे महत्व थोर आहे.' दुष्काळाची भीषण वर्णनं आपल्याला इतिहासात भेटतात. शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा बारकाईने विचार केलेला होता. याचे शिवचरित्रात उल्लेख आहेत. छत्रपतींचा जन्म १६३० सालचा ! १६३० साली प्रचंड मोठा  दुष्काळ पडला होता. धान्य महाग महाग तैसे तीही मिळेना ! कैसे होईल होईल, होईल कळेना ! अशी स्थिती होती. एका होनाला (सोन्याचे नाणे) सहा पायली धान्य मिळत होतं. माणसं माणसाला खातील अशी अवस्था आलेली होती. लोकं गावं सोडून गेलेली होती. दुष्काळी स्थिती सावरल्यावर ती परत येत. महाराजांकडे पुन्हा त्या भूभागाची, सहकार्याची मागणी करत. नुसतं दाट जंगल असेल नी माणसं नसतील तर चालणार नाही हाही विचार जुन्या काळात होता. शेतकरीवर्गाचे मृगसालप्रमाणित धरून शिवरायांनी आपला शिवशकसुरू केला होता. ‘राई म्हणजे वनराई’ तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित महाराजांनी चलनी नाण्यांना शिवराईसंबोधलं असावं. रायगडाच्या पायथ्याला शिवरायांची मोठी आमराई असल्याचा उल्लेख मिळतो. पुण्याजवळच्या शिवापूरगावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. आजही त्यातली काही झाडे असावीत. त्यानंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केलेली होती. समुद्रातील जहाजे बनविण्याकरिता ते लाकूड लागायचे. दुर्दैवाने पुढे इंग्रजांनी ते साग ते तोडले. महाराजांनी हवामानाचा लहरीपणा लक्षात घेऊन जलव्यवस्थापन करण्यावर भर दिला होता. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्फत आज्ञापत्रात शिवराय आज्ञा करतात की, ‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावीत. गडाचे पाणी बहूत जतन राखावे. दुर्गम ‘राजधानी’ रायगड करण्यामागे पर्यावरणीय विचार होता. रयतेचे भाजी देठास हातही लावू न द्यावाहा विचार करणारे महाराज होते. महाराजांचा ‘गनिमी कावा’ जंगलांवर अवलंबून होता. इतका की महाराजांच्या पश्चात १६८२ ते १७०७ पर्यंत मराठी मुलुख जिंकण्याकरिता औरंगजेब धडपडत राहिला होता. मराठी माणूस आणि इथल्या वृक्ष संपदेने त्याला हरवलं होतं. हे गनिमी कावा युद्धतंत्र महाराजांनी उपलब्ध पर्यावरणाचा वापर करून विकसित केले होते. सह्याद्रीतील घाटमार्गाच्या परिस्थितीविषयी फेरीस्ता लिहितो, ‘या घाटातील वाटा इतक्या तोकड्या होत्या, की त्यांची तुलना केसाच्या कुरळेपणाशी केली तरी बरोबरी होणार नाही. या अरण्यात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही.या सर्व बाबी गनिमी काव्याला अनुकूल होत्या. त्यांचा महाराजांनी योग्य उपयोग करून घेतला. आदिलशहा सरदार अफजलखान याचा १० नोव्हें. १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलात केलेला पराभव, २ फेब्रुवारी १६६१ रोजी मुघल अधिकारी कारतलबखान याच्या तीस हजार फौजेचा उंबरखिंड येथे केलेला पराभव ही गनिमी कावा युद्धतंत्राची उदाहरणे आहेत.

लोटिस्माच्या छत्रपती शिवरायांच्या दळवटणे सैन्यतळ
नियोजित प्रतिकृती उभारणी कार्यक्रमाचे
उद्घाटन करताना 'तंजावूर'चे श्रीमंत छत्रपती श्रीशिवाजी महाराज,
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजी चोरगे

दळवटणे (हलवर्ण) छावणीस उद्देशून लिहिलेले पत्र हे महाराजांच्या विशाल लष्करी दूरदृष्टीचा,  प्रजाहितदक्ष राजा कसा असावा याचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. महाराजांनी लष्करातील जुमलेदार, हवालदार, कारकून व शिपाई पेशाच्या लोकांनी, आपल्या फौजांनी आपल्या राज्यात ‘कसे वागू नये’ हे यात सांगितलं आहे. हे पत्र शिवछत्रपतींनी सांगितले आणि चिटणीस बाळाजी आवजी यांनी लिहिले असल्याचे इतिहासाचार्य राजवाडे यांनी नमूद केले आहे. दळवटणे (मौजे हलवर्ण तहसिल चिपळूण) येथे दाभोळ मामल्यातील मुक्कामी फौजेला, जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना उद्देशून महाराजांनी ९ मे १६७४ रोजी पत्र लिहिले. मध्ययुगीन काळात पावसाळ्यात मराठ्यांच्या फौजा स्वगृही मुक्कामाला असत. पावसाळ्याच्या तोंडावर पाऊस काळासाठी साठवलेले घोड्यांसाठी दाणा आणि वैरण संपले व तशातच वैशाखाच्या दिवसात उन्हाळ्यात पण घोड्यांच्या पागेस ओढ पडली. कारकून व गडकरी लोकांनी असेतसे करुन दाणा, वैरण, गवताची बेगमी केली. तेव्हा समस्त शिपाई गड्यांनी या बिकट दिवसांत सावधतेने या सामग्रीचा वापर करावा. मनमानेल तसे वागलात तर भर पावसात काहीच घोड्यांना मिळणार नाही आणि घोडी उपासमारीने मरु लागतील. तेव्हा घोडी तुम्ही मारली असे दिसेल. त्यावरून तुम्ही कुणा कुणब्याचे घर लुटू पहाल तर जे कुणबी लोकं राहिली आहेत ते पण स्वराज्यातून परागंदा होतील. कित्येक उपाशीपोटी मरायला लागतील. अश्यावेळी त्यांना वाटेल की यापेक्षा मोगलाई बरी होती. त्याउपर तुम्ही लोकं आहात असे वाटायला लागेल. त्यांचा तळतळाट लागून शेवटी घोडी पण राहायची नाहीत आणि रयतही राहायची नाही. त्यामुळे रयतेस काडीमात्र तोशीस देऊ नये. जे काही कमी पडेल ते राजाच्या खजिन्यातून घ्यावे. घोड्यांना दाणा, गवत तसेच फौजेला भाजीपाला, धान्य जे लागेल ते बाजारात जाऊन विकत घ्यावे. पण रयतेला लुटून ते घेऊ नये. जे गवत तुम्ही घोड्यांना साठवताहात ते जर निष्काळजीपणामुळे आगट्या लावून खाक झाले तर मग कसली पागा आणि कसले घोडे राहतील. असे झाले तर मग तुम्ही कुणब्यांना मारले आणि कारकुनास धमकावले तरीही तुम्हाला लाकूडफाटा कोणी देणार नाही. घरात दिवा जळत असेल तर त्याची वात उंदीर पळवून नेईल आणि आगीचा दगा होईल. त्यामुळे तुम्ही दाणा आणि गवत वाचेल ते उपाय करणे जेणेकरून पावसाळ्यात घोडी वाचतील. त्यामुळे असा जो कोणी गैरप्रकार करेल त्याची बदनामी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि मराठ्यांची इज्जत राहणार नाही. असा या पत्राचा साधारण सारांश आहे. या पत्रातून महाराजांची सैन्याप्रति असलेली पोटतिडीक, रयतेबद्दल असणारी तळमळ आणि सूक्ष्म दीर्घ दूरदृष्टी दिसून येते.

लोटिस्माच्या छत्रपती शिवरायांच्या दळवटणे सैन्यतळ
नियोजित प्रतिकृती उभारणी कार्यक्रमास उपस्थित इतिहासप्रेमी

या साऱ्या इतिहासाचा, पत्राचा परामर्श घेऊन शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या वस्तूसंग्रहालयात दळवटणे सैन्यतळसाकारण्याचा निर्णय घेतला. नुकताच ११ एप्रिल २०२३ रोजी, त्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम ज्ञानपूजकाचा वारसा सांगणाऱ्या तंजावूरघराण्यातील विद्यमान राजे श्रीछत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापतीहंबीरराव मोहिते यांच्या वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्तान (चिपळूण विभाग) आणि दुर्गसेवक दळवटणे यांनी दळवटणे सैन्यतळ (रेवेचा माळ) येथे यावर्षी प्रथमच महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला. स्थानिक पातळीवर दळवटणे सैन्यतळविषयी जनजागरण सुरु आहे. कोकणची भूमी ‘पर्यटन’ अंगाने विकसित करण्याचे प्रयत्न सर्वत्र सुरु आहेत. जगभ्रमण करणारा पर्यटक हा ‘हेरिटेज’च्या प्रेमात अधिक असतो. याचा विचार करता, सध्याच्या श्रीशिवराज्याभिषेकाच्या वातावरणात दळवटणे सैन्यतळची हेरिटेज म्हणून विकास व्हायला हवा. 

 

धीरज वाटेकर

चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

दळवटणे सैन्यदलाला लिहिलेले पत्र  


दैनिक अजिंक्य केसरी 
2 जून, छत्रपती संभाजीनगर
 








मंगळवार, ९ मे, २०२३

‘जाकाय-राघो’च्या भावरम्य प्रेमकथेचं ‘निवसर’

उत्कट प्रेमभावनेचा बाजार मांडू पाहणाऱ्या जगाच्या ‘घशाला कधीमधी जीव कासावीस करणारी कोरड पडावी आणि त्यानं समोर आलेलं पाणी फिल्टरचं आहे? झाकलेलं आहे की नाही? याचाही विचार न करता जणू पाण्याचे घोट घ्यावेत’ असा रोमांचकारी अनुभव देणारी भावरम्य प्रेमकथा अडीचशे वर्षांपूर्वी तळकोकणात घडली होती. संवेदनशील मानवी मनावर मोहिनी घालण्याची क्षमता ठेवून असलेली ही विलक्षण लोककथा आजही स्मृतीमंदिराच्या निमित्ताने जणू दंतकथा बनून राहिली आहे. कोकणातल्या राष्ट्रीय महामार्ग ६६वरून प्रवास करताना रत्नागिरी जवळच्या पाली गावातून उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला निवसर गावी घेऊन जातो. या गावात मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला वडाच्या झाडांचे सान्निद्ध्य लाभलेल्या तळ्याशेजारी जाकाय आग्रे आणि राघो गोनबरे यांच्या भावरम्य अमर प्रेमकथेचं प्रतिक असलेलं स्मृतीमंदिर उभं आहे. स्मृतिमंदिराची लोककथा समजून घेऊन आपण जेव्हा निवसरला पोहोचतो तेव्हा थोडा वेळ का होईना आपल्याला जणू आपलाच विसर पडतो. आपलं मन तिथल्या शांतनिवांत परिसरात प्रेमभावनानिर्मळहास्य आणि माणुसकीची हिरवळ शोधत बसतं. हे ठिकाण पर्यटनस्थळाची ‘रमणीयता’ शोधत असून त्याचा पर्यटन अंगाने परिणामकारक विकास होण्याची आवश्यकता आहे.


गावच्या वाडीतील घराजवळच्या खोताचं कूळ असलेल्या सात्विक कुणबी समाजातील सका आग्रे यांची काळी-सावळीबुजऱ्या चेहऱ्याची, नाकी-डोळी नीटसमध्यम उंची असलेली बसक्या अंगाची मुलगी जाकाय मनस्वी अन् लाघवी स्वभावाची होती. साऱ्या कुळांची शेतकामाची पद्धत एकच असल्याने त्यांची सुखदुःखेही समान होती. वर्षभराची मेहनत, लग्नात काढलेली कर्ज फेडून किती महिन्याचे धान्य हाताशी येत असावं? अशा वातावरणात कोकणातल्या निसर्गातील कंदजंगलातले फणसकैऱ्याहरिकाची पेजपाणी, रानातला टाकळा आदी अनेकदा पोटाची भूक शमवी. त्यावर्षी गावकऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाकायचं लग्न त्याच वाडीत राहणाऱ्या राघो गोनबरेशी ठरलं होतं. राघो पूर्वीपासून त्याच दृष्टीनं जाकायकडे पाहत असावा. शेतातली कामं उरकताना मागे कधीतरी राघोला जाकायशी बोलायचा अवसर मिळाला होता. जाकायच्या मैत्रिणीही तिला राघोवरून चिडवायच्या. गावातल्या सापडात (लोककला) राघोचा इतरांपेक्षा उंच असलेला पहाडी आवाज ऐकून गाणी-फुगड्यात उत्तम असलेली जाकाय हरवून जायची. गणपतीतल्या जाखडी-गोफवेणीतही राघो १०-१२ गड्यांत उठून दिसत असे. गावकऱ्यांनी जाकाय-राघोचं लग्न ठरवलं आणि ब्राह्मणाला बोलावून मुहूर्त पक्का केला. राघोने जाकायसाठी सोन्याच्या पाटल्याबांगड्या, पायात‌ल्या साखळ्या, कानातल्या बुगड्या आदी वस्तू तर सकानेही राघोसाठी वस्तू घेतल्या होत्या. लग्नाचं साहित्य आणून झालं होतं. लग्नाचा दिवस जवळ आला. नवरीला हळद लागली. उष्टी हळद राघोला लावण्यात आली. गावात आनंदाचे वातावरण होते.


लग्नाच्या दिवस उजाडला. ऐन सकाळी सारी पाहुणे मंडळी गडबडीत असताना राघोला जाकायच्या निसर्गप्रेमाची प्रकर्षाने आठवण झाली. पूर्वानुभवानुसार, सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पानाफुलांनी सजलेली जाकाय जणू परीसारखी दिसेल या त्याच्या मनातील भावनेने उचल खाल्ली. याच भावनेतून राघो एकाएकी गावच्या जांभूळ भाटल्याच्या रानाकडं निघाला. माहितीतील करंबळाच्या झाडावर चढला. पानाफुलांनी सजलेली जाकाय मनात घर करून असल्याने करंबळाची पानं-फुलं गोळा करण्यात किती वेळ गेला हेही त्याला कळलं नाही. जाकायच्या आठवणीत देहभान हरपलेला राघो, भावी मीलनाच्या कल्पनेने जणू मोहरलेला होता. या फांदीवरून त्या फांदीवर फिरत असताना एका उंचावरच्या फांदीवर त्यानं पाय ठेवला. राघोच्या भारानं फांदी मोडली. अंगाला हळद लागलेला राघो झाडावरून खाली पऱ्हाजवळ कोसळला. त्याचं डोकं खडकावर आपटलं. त्याच्या आवाजानं जवळची लोकं कमालीची अस्वस्थ झाली. हातातली कामं टाकून पऱ्हाकडे पळाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राघोला पाहून साऱ्यांना धक्का बसला. राघो अखेरच्या घटका मोजू लागला होता.


तिकडे मनानं राघोशी एकरूप झालेल्या, त्याच्या नावची हळद लागलेल्यासाजशृंगार केलेल्या जाकायच्या कानावर हे सारं पडताच ती किंचाळून उठली. तशाच अवस्थेत तिने पऱ्हाजवळ येऊन राघोला पाहिले. राघोच्या हातात जाकायसाठी तोडलेली फुलं होती. जाकाय राघोच्या जवळ बसली. त्याचं नाव आपल्या मुखात घेताच राघोने प्राण सोडला. जाकाय धायमोकलून रडू लागली. बेशुद्ध पडली. शुद्धीवर आल्यावर जाकायने सती जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाचा सर्वांना धक्का बसला. लग्न न झालेल्या पुरुषाबरोबर सती जाता येत नाही म्हणून तिला समजवण्याचाही प्रयत्न झाला पण ती कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. ती अभंग राहिली. अखेर जाकायच्या हट्टानं वडिल सका आग्रे चिडले. त्यांनी, ‘एवढी पाणीदार आहेस म्हणून सती जातेस तर लाथ मारून दगडातून पाणी काढून दाखव. तुझं सतीत्व सिद्ध कर.’ म्हटलं. हे ऐकताच जाकाय उठली. वडिलांच्या या अचानकच्या या आव्हानाने आपल्यातील सतीचं सारं तेज एकवटून जणू अंगात संचारल्याप्रमाणे जाकायनेही सत्वपरिक्षेचे हे आव्हान स्वीकारले.


‘मी लाथ मारून पाणी काढीन तिथं उपयोगासाठी तळं बांधा आणि प्राण सोडीन तिथं माझ्या प्रेमाचं मंदिर बांधा’ असं साऱ्यांना सांगत जाकायने झाडावरून राघो जिथं पडला होता त्याच पऱ्ह्याच्या बाजूला काळ्या कातळासमोर डोळे मिटून, हात जोडून प्रार्थना केली रवळनाथाचा धावा केला आणि आपल्यातील सर्वशक्ती एकवटून कातळावर लत्ताप्रहार केला. कातळाचा कपळा उडाला. जाकायच्या पायाच्या अंगठयाचं नख तुटलंअद्भुत चमत्कार झाला. कातळातून पाण्याचा ओघ सुरु झाला. सर्वांना आश्चर्य वाटलं. तिकडे जाकायला जणू राघोकडे जाण्याची घाई झालेली असावी. जाकाय क्षणार्धात राघोच्या कलेवरावर कोसळली आणि अंतर्धान पावली. हा प्रकार पाहून सारे चकित झाले. राघो-जाकायच्या प्रेमाची स्मृति कायम जीवंत ठेवण्याकरता स्मृतीमंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर बांधलं तेव्हाच जवळच्या कोंडवीतील गावकऱ्यांनी गावात स्थापना करायच्या हेतूने एक विठ्ठलमूर्ती घडवून घेतलेली होती. पण एके रात्री गाव प्रमुखाला स्वप्नात दृष्टांत झाला. परमेश्वराने निवसरच्या याच स्मृतिमंदिरात राहाण्याची इच्छा व्यक्त केली. ती मूर्ती आज या स्मृतिमंदिरात पाहायला मिळते. स्व. शांताराम द. थत्ते यांनी लिहिलेल्या ‘कोंकण दर्शन’ (१९६४, दुसरी आवृत्ती) पुस्तकात निवसरच्या या जाकाय-राघो लोककथेची नोंद सापडते. थत्ते यांचे लेख त्यावेळी नवकोकण, समानता आणि बळवंतमध्ये प्रसिद्ध होत. विशेष म्हणजे थत्ते यांनी निवसर संदर्भात लिहिलेल्या लेखाची आमदार शामराव पेजे यांनी दखल घेतली होती. त्यांनी हा लेख कोल्हापूरच्या एका प्रसिद्ध (पुढारी) दैनिकात प्रसिद्धही करवून घेतला होता.


आम्ही २०१३साली दत्तजयंती दिनी लिहून प्रसिद्ध केलेल्या कोकणातील मठ (तालुका लांजा) येथील ‘श्रीक्षेत्र अवधूतवन’ माहिती पुस्तिकेतून आणि २०१४साली ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने ही प्रेमकथा नव्याने मांडली होती. ही घटना घडली त्या तळ्याजवळ स्थानिकांनी ‘श्रीजाकादेवी मंदिर’ अर्थात ‘जाकाय राघो स्मृतिमंदिर’ उभारल्यामुळे ही लोककथा आज दंतकथा बनून राहिली आहे. आजही निवसरातील हे जाकाईचं मंदिरशेजारचं तळं, सावळी विठ्ठलमूर्ती आणि तिथल्या रम्य निसर्गाचं गुज आपल्याला जाकाय-राघोच्या आठवणीनं देहभान विसरायला लावतात. कोकणच्या पवित्र भूमीतील आपल्याला अपरिचित असलेल्या भूतकाळाची ही निर्मिती, त्यामागची प्रेमभावना, त्यागवात्सल्य आणि माणुसकी यांचा आपलासा वाटणारा निवसरच्या निसर्गातील हळवा सूर अनुभवण्यासाठी आयुष्यातील एकतरी ‘इव्हिनिंग इन निवसर’ करायला हरकत नाही.

 

धीरज वाटेकरचिपळूण

मो. ९८६०३६०९४८

सोमवार, १० एप्रिल, २०२३

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

        
११ एप्रिल १६७४ ! साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती श्रीशिवाजीराजे चिपळूणच्या दळवटणे (हलवर्ण) येथील लष्करी छावणीकडे गेले होते. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या वस्तूसंग्रहालयात महाराजांचा हा ‘दळवटणे सैन्यतळ’ साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आज (दि. ११) ज्ञानपूजकाचा वारसा सांगणाऱ्या या ‘तंजावूर’ घराण्यातील विद्यमान राजे श्रीछत्रपती शिवाजी महाराज आणि ‘सरसेनापती’ हंबीरराव मोहिते (१८ एप्रिल १६७४ला दळवटणे सैन्यतळ येथे महाराजांकडून ‘सरसेनापती’पदाची वस्त्रे बहाल) यांच्या 
वंशातील सौ. प्रतिभा सुरेश धुमाळ चिपळूणात येत आहेत.

तंजावूर हे महाराष्ट्र आणि तामिळनाडूची नाळ जोडणारा दुवा आहे. तंजावूरच्या इतिहासात, ‘राजा’ हा किताब सरफोजीराजे द्वितीय (२४ सप्टेंबर १७७७ ते १६ मार्च १८३२) यांच्याकडे असला तरी प्रत्यक्षात राज्यकारभाराची सत्ता नव्हती. अशा विपरीत परिस्थितीत सरफोजीराजे द्वितीय यांनी तंजावूरच्या सांस्कृतिक विकासासाठी दिलेले अमूल्य योगदान आजही त्यांची ‘ज्ञानपूजक’ ही ओळख सांगण्यास पुरेसे आहे. धर्म, अर्थकारण, कलासंचार, संग्रहविद्या हे सरफोजीराजे द्वितीय यांच्या आस्थेचे विषय राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेस सुमारे नव्वद हजार लोक उपस्थित होते. लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने सरफोजीराजे द्वितीय यांना सन्माननीय सभासदत्व (१८२८) देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. हा मान मिळविणारे सरफोजीराजे द्वितीय हे पहिले भारतीय संस्थानिक होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिगंत किर्तीचे ज्ञानपूजकदुसरे सरफोजीराजे द्वितीय यांच्या कारकीर्दीचा आढावा घेऊया.

तंजावरचे राजे श्रीमंत श्रीशिवाजीराजे भोसले

कावेरी नदीच्या खोऱ्यात वसलेलं तंजावूर शहर एकेकाळी जगातील सर्वात उंच आणि आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बृहदेश्वर मंदिसाठी प्रसिद्ध आहे. एका तामिळ दंतकथेनुसार तंजा नावाच्या दैत्याचा वध भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या नीलमेघ पेरूमल यांनी केल्यावरून या ठिकाणाचे तंजाऊर असे नाव पडले होते. तंजावूरच्या इतिहासात मराठा राजांचा कार्यकाळ जवळपास १८० वर्षांचा आहे. तंजावूरमुळे महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाला प्रतिभाशाली सांस्कृतिक वारश्याची जोड मिळाली. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडपासून तंजावूर जवळपास १३६० किमी. आहे. इतिहासात तंजावूरचे राज्य विजयालय चोळ यांनी मुत्तरैयर वंशाच्या राजांकडून नवव्या शतकात जिंकून घेत तेथे राजधानी वसवली होती. चोळ राजवंशाने तंजावूर येथे सुमारे चारशे वर्षे राज्य केले. पुढे त्याच वंशातील राजेंद्र चोळ यांनी राजधानी गंगैकोंडचोळपुरम् येथे नेली. पांड्य वंशाची सत्ता तंजावूरवर १५४९पर्यंत होती. त्यानंतर विजयनगर राज्यातील सेनापती शिवप्पा नायक यांनी तंजावूर येथे स्वतंत्र राज्य स्थापले होते. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजी यांनी आदिलशाही अंकित तंजावूरच्या नायक राजांच्या गृहकलहात यशस्वी हस्तक्षेप करून १६७५मध्ये हे राज्य मिळवले होते. या घटनेचा उल्लेख भोसलावंसम् या संस्कृत हस्तलिखितामध्ये आढळतो. व्यंकोजी यांच्या मृत्यूनंतर (१६८४) शहाजी, पहिले सरफोजी व तुकोजी या तिघा भावांनी १७३६ पर्यंत राज्य केले. सरफोजीराजे प्रथम यांच्या काळात शिवभारत या छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित संस्कृत हस्तलिखिताचे तामिळ भाषांतर ‘शिवचरितम’ करण्यात आले होते. तुकोजीराजे यांनी हिंदुस्थानी संगीताचा परिचय प्रथमच दक्षिणेस करून दिला होता. त्यांनी संगीतावर आधारित संगीत समामृत ग्रंथाची निर्मिती केली. तुकोजी यांच्यानंतर त्यांचे पुत्र एकोजी (बाबासाहेब) गादीवर आले. ते वर्षभरात मृत्यू पावले. तुकोजी यांचे पुत्र प्रतापसिंह यांनी (१७३९-६३) इंग्रजांशी सख्यत्व जोडून सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले. प्रतापसिंहराजे यांच्या काळात तंजावूरने ब्रिटिश आणि फ़्रेंच यांच्यातील सप्तवार्षिक युद्ध अनुभवलं होतं. प्रतापसिंहराजे यांचे पुत्र तुळजाजी (१७६३ ते ८७) यांनी त्यांना मुलगा नसल्यामुळे मृत्युपूर्वी भोसले घराण्यातील मालोजीराजे यांचे भाऊ विठोजी यांच्या वंशातील एक मुलगा दत्तक (२३ जानेवारी १७८७) घेऊन त्याचे नाव सरफोजी ठेवले. तेच पुढे सरफोजीराजे द्वितीय म्हणून प्रसिद्धी पावले.

Drawing of Thanjavur Brihadeshwara Temple
in a French book titled
Monuments Ancients Et Modernes De L Hindoustan
Published in 1821

सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षणासाठी डच मिशनरी सी. एफ. शॉर्झ यांच्याकडे सोपविण्यात आले होते. शॉर्झ यांनी राजपुत्रास उचित शिक्षण देत इंग्रजी, ग्रीक, फ्रेंच, जर्मन, लॅटिन, डॅनिश या पाश्चात्त्य आणि मराठी, संस्कृत, तेलुगू, कन्नड, हिंदी, उर्दू आदी भारतीय अशा एकूण तेरा भाषा शिकविल्या होत्या. तुळजाजी यांच्यानंतर अमरसिंह नावाच्या त्यांच्या सावत्र भावाने तंजावूरची सर्व सत्ता हस्तगत केल्यावर सरफोजीराजे द्वितीय यांना मातोश्रींसह मद्रासला आश्रय घ्यावा लागला होता. सरफोजीराजे द्वितीय यांचे दत्तकविधान अशास्त्र असून मीच या गादीचा खरा वारस असल्याचे त्यांनी मद्रासचे गव्हर्नर सर आर्चिबॉल्ड कँबेल यांना कळविले होते. इंग्रजांनीही विषयाची अधिक चौकशी न करता अमरसिंह यांना तंजावरच्या गादीवर बसवून त्यांच्यासोबत नवीन तह (१० एप्रिल १७८७) केला होता. मात्र सरफोजीराजे द्वितीय यांना शिक्षण देणाऱ्या शॉर्झ यांनी (१७८७ ते ९७) हे दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला, सरफोजीराजे द्वितीय हेच खरे वारस असल्याचे दाखवून दिले. अखेर ईस्ट इंडिया कंपनीने अमरसिंह यांना पदच्युत करून सरफोजीराजे (द्वितीय यांचा राज्याभिषेक (१७९८) केला. त्यांच्या अखत्यारित पाच सुभे, पाच हजारहून अधिक गावं एवढा मुलुख होता. ईस्ट इंडिया कंपनीने सरफोजीराजे द्वितीय यांच्याशी एक पंधरा कलमी करार केला होता. पुढील वर्षी गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली तंजावूर संस्थान खालसा केले. सरफोजीराजे द्वितीय यांच्याकडे खासगी मालमत्ता, तंजावूर किल्ला आणि भोवतालचा काही भाग आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आली होती.

उंचपुरे, गोरे, झुबकेदार मिशा असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे सरफोजीराजे द्वितीय ग्रंथवेडे आणि कलेचे चाहते होते. चित्रकला, बागकाम, नाणेसंग्रह, ग्रंथसंग्रह, रथांच्या शर्यती, शिकार, बैलांच्या झुंजी आदींची त्यांना आवड होती. शॉर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाषा, इंग्रजी साहित्य आणि अद्ययावत पाश्चात्त्य ज्ञान यांचा अभ्यास केलेल्या सरफोजीराजे द्वितीय यांच्याकडे व्यासंग वाढविण्यासाठी पुरेसा पैसा आणि वेळ उपलब्ध होता. त्यांनी जाणीवपूर्वक आपले उर्वरित आयुष्य विद्याव्यासंग आणि लोककल्याणाची कामे करण्यात घालवले. राज्य खालसा झालेले असतानाही इंग्रजांनी त्यांना हिज हायनेसहा बहुमानदर्शक किताब प्रदान केला होता. राजकीय दृष्ट्या सुरूवातीच्या काळात बराच त्रास सहन करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर सरफोजीराजे द्वितीय यांची तंजावूरमधील कारकीर्द मराठी प्रभावाच्या दृष्टीने इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांची कारकीर्द उल्लेखनीय नव्हे तर तंजावूर राजवटीची शान वाढवणारी ठरली. त्यांची ओळख ‘जनतेचा राजा’ म्हणूनच सांगितली जाते. त्यांनी देवनागरी लिपीतील भारतातील पहिला छापखाना १८०५मध्ये दक्षिणेत उभारला. या दगडी छापखान्याचे नाव त्यांनी ‘विद्याकलानिधी वर्ण यंत्रशाळा’ ठेवले होते. त्यात छपाईसाठी दगडी मुद्राक्षरे वापरण्यात आली होती. त्यांनी तंजावूरच्या राजवाडा परिसरात तमिळनाडूमधील पहिले प्राणिसंग्रहालय निर्माण केले. व्यापारासाठी सुविधांसाठी तंजावूरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर गोदी बांधली. हवामान वेधशाळा उभी केली. त्यांचा स्वतःचा बंदुका निर्माण करण्याचा कारखाना होता.

सरस्वती महाल (सरफोजीराजे द्वितीय मेमोरियल म्यूजियम) हे तंजावूरच्या राजमहालातील ग्रंथालय आशिया खंडातील एक जुनी लायब्ररी असून ते जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. हे ग्रंथालय नायकराजवटीत (१५३५-१६७३) उभारले गेले असले तरी सरफोजी (द्वितीय) महाराजांनी या ग्रंथालयाची वाढ करत अमूल्य ग्रंथ, नकाशे, शब्दार्थकोष, नाणी, कलाकृती यांचा संग्रह केला. येथे सुमारे ६० हजार प्राचीन, जुन्या ग्रंथांचा समावेश आहे. ४० हजार हस्तलिखिते ही तामिळ आणि संस्कृतमधील तर तीन हजारपेक्षा जास्त मराठीतील ग्रंथ आहेत. यातील बाराशे ग्रंथ मोडी लिपीत आहेत. महाराजांनी अनेक विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका आदी लिहून घेतल्या. प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे आदींचा मोठा संग्रह केला. सरफोजी (द्वितीय) यांनी अनेक प्रकाशित ग्रंथ आणि हस्तलिखिते गोळा केली होती. त्यांना पुस्तकांची इतकी आवड होती, की त्यांनी चार हजारांहून अधिक पुस्तके जगातील विविध देशांतून खरेदी करून ती सरस्वती महाल ग्रंथालयात आणली. आज या ग्रंथालयात वेदांत, व्याकरण, संगीत, नृत्य आणि नाटक, शिल्पशास्त्र, खगोलशास्त्र, वैद्यक, हत्तींचे व घोड्यांचे प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील ग्रंथसंपदा आहे. दुसरे सरफोजी महाराजांनी स्वतः ग्रंथालयांतील या पुस्तकांवर इंग्रजीमध्ये सह्या केलेल्या आहेत. मराठी दरबारातील कामकाजाच्या मोडी लिपीत केलेल्या नोंदी येथे उपलब्ध आहेत. फ्रेंच व मराठी भाषांतील पत्रव्यवहार जतन करण्यात आला आहे. ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाया’ या इंग्रजी विश्वकोशाने ग्रंथालयांच्या सर्वेक्षणात भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय अशी सरस्वती महालची नोंद केली आहे. बर्नेल नावाच्या विद्वानाने सरफोजीराजे द्वितीय यांच्या संग्रहातील ग्रंथांची सूची तयार केली आहे. येथील शब्दार्थचिंतामणी हा संस्कृत ग्रंथ जर डावीकडून वाचला तर रामायण आणि उजवीकडून वाचला तर महाभारत आहे. तर कथात्रयी हा ग्रंथ डावीकडून वाचल्यास रामायण आणि उजवीकडून वाचल्यास महाभारत तर आहेच पण शब्दशः अर्थ लावल्यास भागवत धर्म सांगणारा आहे. श्रीशिवछत्रपतींच्या आज्ञेने कवींद्र परमानंदानी लिहिलेल्या ‘शिवभारत’ शिवचरित्राची मूळप्रत फक्त येथेच उपलब्ध आहे. येथे प्राचीन जग आणि अखंड भारत नकाशा पाहायला मिळतो. समर्थ रामदास यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या वेदांत उपदेश संदर्भातील हस्तलिखित येथे उपलब्ध आहे. त्यावर तामिळ भाषेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी" असा उल्लेख असून छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या बंधूंच्या वंशजांनी श्रीसमर्थ रामदासांचे सतराव्या शतकातले चित्रही जपून ठेवले आहे.

नाटक हा कलाप्रकार दक्षिणेमध्ये रुजवला तो तंजावूरच्या मराठ्यांनी. मराठी भाषेतील पहिलं नाटक हे महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर नव्हे तर तामिळनाडूच्या तंजावूरच्या मराठी रंगभूमीवर प्रथम उभे राहिले होते. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी वनस्पतीजन्य औषधनिर्मिती आणि संशोधन यासाठी धन्वंतरी महालया संशोधन संस्थेची स्थापना केली. संस्थेत आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि आधुनिक औषधे या उपचारशाखांवर संशोधन केले जात असे. संस्थेत आजारी असलेल्या व्यक्ती व प्राण्यांवर उपचार केले जात. त्यांची नोंदणीपत्रके ठेवली जात. तशी पद्धत तेव्हा भारतात रूढ नव्हती. संस्थेत वनस्पती आणि त्यांचे औषधी उपयोग यावर अठरा भागांत संशोधनपर ग्रंथ उपलब्ध आहेत. राजांकडे महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची रंगीत हस्तचित्रे होती. त्यांनी धन्वंतरी महालाच्या औषधोपचार पद्धतीचे तपशीलवार वर्णन करणारा एक कवितासंग्रह तयार केला होता. राजे हे घोडय़ाची शुभ व अशुभ चिन्हे, अश्वगती, अश्वांचे आयुष्य आदी अश्वपरीक्षेत पारंगत होते. यातून त्यांच्या गजशास्त्र प्रबंध’, ‘गजशास्त्र सारया ग्रंथांची निर्मिती झाली. त्यांनी पक्षीजगताही अभ्यास केला होता.  दुसरे सरफोजीराजे द्वितीय हे त्यांच्या बरोबर शल्यचिकित्सेची सामग्री नेहमी बाळगत. ते जेथे जेथे जात तेथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करत. सरफोजीराजे द्वितीय यांनी केलेल्या शस्त्रक्रियांच्या नोंदी इंग्रजीत तपशीलवार सापडतात. त्यांनी ज्या रोग्याची शस्त्रक्रिया केली त्याचा पूर्वेतिहासही नोंदवून ठेवलेला आहे. हे साहित्य सरस्वती महाल ग्रंथालय संग्रहात आहे. सरफोजी (द्वितीय) महाराजांनी नव विद्याकला विधी शाळेची स्थापना केली होती. तेथे भाषा, साहित्य, कला, कौशल्य, वेद आणि शास्त्र यांचे शिक्षण दिले जात असे. ते भारतीय स्त्रियांच्या उद्धाराचे समर्थक असल्याने त्यांनी स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करून शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. त्यांनी तंजावूरमध्ये पाण्याचे दहा तलाव बांधले. कित्येक विहिरी खोदल्या. संपूर्ण तंजावूरसाठी जमिनीखालील मलनिस्सारण व्यवस्था अंमलात आणली होती. सरफोजी यांनी सोळा भिन्न खाती पाडून प्रत्येक खात्यावर एक दमित (प्रमुख) नेमला होता. स्वतः उत्तम कवी असल्याने त्यांनी भरतनाट्यम् व संगीतकला यांनाही प्रोत्साहन दिले. सरफोजीराजे (द्वितीय) यांचा काळ संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात सुमारे ३६० संगीततज्ज्ञ होते. कर्नाटक संगीताला विकसित दर्जा प्राप्त करून देणारे संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे राजांचे दरबारी गायक होते. भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाची सोय केली. चित्रकलाशिल्पकला यांचाही त्यांना व्यासंग होता. त्यांनी राजमहालातील दिवाणखाना उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला होता. याशिवाय मद्रास येथील संग्रहालय आणि इतर वाड्यांमधूनही त्यांनी चित्रे काढून घेतली होती. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला होता. शॉर्झ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ राजांनी त्यांचा पुतळा उभारला होता. पवनचक्की, विद्युत्‌यंत्र, मनुष्याचा हस्तिदंती सांगाडा, राजमहालात उघडलेली वेधशाळा आदीतून त्यांची संशोधक आणि मर्मज्ञ दृष्टी दिसून येते.

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने सरफोजीराजे द्वितीय यांची अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर १८०३मध्ये दगडात कोरून घेतलेला भोसले घराण्याचा इतिहास होय. भारतात एवढा मोठा दीर्घ शीलालेख कुठेही नाही. याशिवाय सरफोजीराजे द्वितीय यांनी ऐतिहासिक अरबी व फार्सी ग्रंथांची भाषांतरे करवून घेतली. त्यात इब्न बतूताचे अरबी भाषेतील ग्रंथ व शाहनामा हे फार्सी काव्य आदी महत्त्वाचे ग्रंथ आहेत. सरफोजीराजे द्वितीय यांनी आपल्या चौतीस वर्षांच्या प्रजादक्ष कारकीर्दीत तंजावूर आणि सभोवतालच्या प्रदेशात अनेक धार्मिक आणि शिक्षणविषयक सुधारणा केल्या. ते मोकळया मनाचे व अन्य धर्मपंथीय श्रद्धावंताच्या बाबतीत सहिष्णू होते. बृहदीश्वर मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या देताना इतर धर्माच्या लोकांनाही समान वागणूक दिली. त्यांनी ख्रिश्चन मिशनरींनी चालवलेल्या शाळा आणि चर्चेस यांनाही देणग्या दिल्या होत्या. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तंजावूर हे विद्येचे आणि केलेचे केंद्र बनले होते. सरफोजीराजे द्वितीय यांची संपूर्ण कारकीर्द त्यांच्या अभिरूचीसंपन्न जीवनाची साक्ष देत आहे. त्यांना मुक्तंबाबाई व अहिल्याबाई या दोन पत्नी होत्या. मुक्तंबाबाई अकाली मरण पावल्या. अहिल्याबाई यांच्यापासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. मुलगा पुढे श्रीशिवाजी (१८३३ ते १८५५) म्हणून सरफोजीराजे द्वितीय यांच्या मृत्यूनंतर तंजावूरचे राजे बनले. मात्र कारभार पूर्णपणे इंग्रजांच्या हाती गेला होता. त्यातच श्रीशिवाजी हे निपुत्रिक वारल्यामुळे १८५५मध्ये इंग्रजांनी तंजावूर संस्थान खालसा केले.

राजा सरफोजी भोंसले दुसरे

तंजावूरच्या बहुतेक कलाभिज्ञ राजांनी चित्र, शिल्प, संगीत, नृत्य, नाट्य, ग्रंथनिर्मिती आदींसह विविध भाषांना मोठा आश्रय दिला होता. तंजावूरचा दरबार विद्वान आणि कलावंतांनी गजबजलेला असायचा. तंजावूरमधील मराठा दरबार हॉल, सरस्वती महाल ग्रंथालय म्हणजे तंजावूर भोसले घराण्याची मौलिक स्मारके आहेत. महाराजा सरफोजी द्वितीय यांनी स्वतः शंभरहून अधिक मराठी आणि तेलगु भाषेत गाणी लिहीली. ही गाणी नाट्यसंगीतात वापरली गेली. त्यांनी ‘सर्वेंद्र रत्नावली’ हा ७२ खंड असलेला ग्रंथ लिहिला. या संस्थानने १९६२च्या चीन युद्धाच्यावेळी दोन हजार किलो सोने, १९७१च्या पाकिस्तान युद्धात शस्त्रास्त्र भारत सरकारला दिली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला शंभर एकर जमीन दान दिली. तंजावूरमध्ये आजही सुमारे पाच लक्ष मराठी लोक राहतात. ते तामिळी पेहराव घालत असले तरी घरात तोडकी-मोडकी मराठी बोलतात. तंजावूरच्या मराठा राजांनी दर्जेदार १२ नाटकांसह पन्नासहून अधिक विविध ग्रंथ लिहिले. भारतातील पहिला छापखाना उभारला, भारतातील मुलींची शाळा काढली, भरतनाट्यम नृत्याला राजाश्रय दिला. मराठीमधील पाहिले नाटक लिहून रंगमंचावर आणले. जगातील सर्वात मोठा शिलालेख साकारला. जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संग्रहालय उभारले. एका मराठी राज्याचं हे वैभव आणि संस्कृती तमिळ जनतेनं जतन केली, हे फार महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील दक्षिण भारतातील हे ‘मराठी’ कर्तृत्व आपण समजून घ्यायला हवं आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण

मो. ९८६०३६०९४८


संदर्भ ::

१.    मराठी विश्वकोश

२.    थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम वेबपोर्टल

३.    ABP माझा - स्पेशल रिपोर्ट : तंजावरच्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास

४.    शिवदैनंदिनी २०२१


नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...