कोकणातील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण
साहित्य संमेलन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आजपासून (१-३ मार्च
२०२४) शिपोशीतील न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरात होत आहे.
संमेलनाच्या निमित्ताने ‘शिपोशी’ संदर्भातील काही दुर्लक्षित नोंदींचा घेतलेला हा
आढावा...
धीरज वाटेकर चिपळूण (मो. ९८६३६०९४८)
निश्चित
माहिती उपलब्ध नसली तरी श्रीपोशीचा अपभ्रंश होऊन आजचे शिपोशी नाव रूढ झाले असावे असा
कयास आहे. इ.स. १६८२ मध्ये गावात वस्ती असल्याचे उल्लेख सापडतात. इतिहासाचार्य वि.
का. राजवाडे यांनी कोकणातील वसाहती ग्रंथात केलेल्या नोंदीनुसार हे गाव कोणी मराठा
सरदाराने वसविलेले असावे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर
श्रीभवानी देवीचे मंदिर बांधले त्यावेळी देवीचे पुजारी इनामदार आठल्ये होते. मौजे
बावधन (वाई) हा गाव त्यांच्याकडे इनाम होता. देवीचे विद्यमान पुजारी हडप मूळचे
आठल्ये होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भयंकर आणि दुर्दैवी मृत्युनंतर (१६८९)
कोकणात ज्या चकमकी, जाळपोळी झाल्या त्यात शिपोशी गाव सापडून श्रीदेव गांगेश्वर
मंदिराचे नुकसान झाले होते. शिपोशी हे पेशवाईपूर्व काळापासून विद्वत्ता,
शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ह्यात पुढारलेले गाव होते.
११व्या
शतकाच्या सुमारास पाटण (सातारा) तालुक्यातील पाटणच्या दक्षिणेस असलेल्या
‘ओटोली’तून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले होते. ‘ओटोली-ये’ आडनावाचा
१६७६ च्या श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे. शिपोशी हे गाव
हा इ.स. १७२५ च्या आसपास देवळे येथील आठल्ये यांना इनाम म्हणून मिळाले. गावचे
ग्रामदैवत श्रीगांगेश्वर आहे. सन १७५०च्या दरम्यान आठल्ये यांनी श्रीदेव
हरिहरेश्वराची स्थापना करून प्रसिद्ध मंदिर बांधले. शिपोशी गावात मुंबई इलाख्यातील
सहावी मराठी शाळा १८५५ साली सुरु झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात
मुंबईत उद्योगधंदे वाढत होते. मुंबई बोटीने कोकणाला जोडलेले होते. १८३० नंतर
टप्प्याटप्प्याने झालेला मुंबई गोवा रस्ता तयार झाला. तर रत्नागिरी-कोल्हापूर
मार्ग १८८० ते १८९० या कालावधीत टप्प्याटप्प्याने टायर झाला. १९व्या शतकात
कोकणातून लोकं कामधंदा व शिक्षणासाठी मुंबईला जाऊ लागले. १९०५ साली गावी पोस्टऑफिस
सुरु झाले. गावात १९१३ साली शिपोशी ग्रुप सहकारी पतपेढी स्थापन झाली होती. १८ जून १९५९ रोजी कै. डॉ. वि. ग. तथा बापूसाहेब
आठल्ये यांच्या पुढाकाराने माध्यमिक विद्यालय सुरु झाले. शिपोशीचे शशिशेखर काशीनाथ
आठल्ये गुरुजी हे आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे विविध समाजाच्या पाठबळावर विधानसभेवर
सतत निवडून येत राहिले. आपल्या साधेपणासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या गुरुजींनी ‘सामाजिक
कार्य कसे करावे?’ याचा आदर्श आपल्या जीवनात निर्माण केला. गावात १९५६ पासून
ग्रामपंचायत अस्तित्वात असून पहिले सरपंच कै. रघुनाथराव बाईंग होते. गावातील मोहोळ
पऱ्यावरील धरणामुळे लोकं उन्हाळ्यात भाजीपाला व इतर पिके घेत असतात. विशेष
नोंदींची सुरुवात याच मोहळच्या पऱ्यापासून करूयात.
शिपोशी ओढ्याची दिशा बदलण्याची कल्पकता
जमीन
सुधारण्यासाठी, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली
आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून साहाय्य मिळत असे. रत्नागिरी
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तर्फे देवळे मौजे शिपोशी या गावी मोहळचा पऱ्या
(ओढा) व दाभोळच्या सीमेवरील ओढा असे दोन ओढे होते. विशाळगडचे पोतदार मल्हार रंगनाथ
यांनी हे दोन ओडे मोडून नवे भातशेत करण्यासारखे आहे असे देवळे येथील ठाणेदारांना
कळविले होते. मल्हार रंगनाथ मशागत करणारे असले तरी हे काम फार कष्टाचे होते. त्या
जागी बराच खर्चही करावा लागणार होता. भातशेत तयार होऊन लागवडीस देण्यास बरीच वर्षे
लागण्याची शक्यता होती. मल्हार रंगनाथ आणि देवळे येथील सरकारी कामगार यांनी ती
जागा पाहून, तेथील मल्हार, गुरव यांना
बोलावून सर्वासमक्ष नदीस मिळालेला मोहोळाचा ओढा मोडून उत्तरेच्या बाजूने डोंगरात
चर काढून नदीस मिळविण्यासाठी तो १४०० हात लांबीचा खणावा अशी योजना होती. त्यासाठी
त्यांना देवळे तर्फ्याचे ठाणेदार यांनी मल्हार रंगनाथ याला १६८२ साली कौलनामा सादर
केला होता. ओढ्याची दिशा बदलण्याची आणि त्याखालील जमीन भातशेतीखाली आणण्याची योजना,
त्याकाळचा विचार करता, अत्यंत कौतुकास्पद
ठरावी अशी होती. या कल्पनेला संभाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मल्हार
रंगनाथ आणि काशी रंगनाथ यांनी डोंगरातून जो चर खणला त्याची लांबी १८०० हात,
रुंदी १८ ते २० हात आणि खोली ५ ते ७ हात होती. त्यांना या कामासाठी
८ हजार रुपये खर्च आला होता. श्रम, साहस व कष्ट मशागत करून
केलेले हे बांधकाम फुटले. पुन्हा खर्च आणि श्रम करण्यासाठी हुशारी यावी म्हणून
शिपोशीपैकी नदीच्या पूर्वेकडील सर्व भाग कोंड म्हणून स्वतंत्र करून द्यावा यासाठी
काशी रंगनाथ याने १६९२ साली विशाळगडचे अमात्य रामचंद्र निळकंठ यांना विनंती केली
होती. त्याप्रमाणे त्यांना सनद देण्यात आल्ली होती. खोदून तयार केलेला चर कित्येक
ठिकाणी १० ते २० हात रुंद असून ७-८ हात उंचीचा आणि दोनअडीचशे हात लांबीचा होता. या
ठिकाणाला 'चराची पट्टी' म्हणत. दाभोळ
नावाच्या सीमेच्या ओहोळासही बांध घालून बाजूने चर खणून तोही नदीपर्यंत नेलेला
होता. त्या ठिकाणी शेत तयार केलेले होते. मोहोळाच्या ओढ्यातील बांध फुटल्यामुळे ते
काम अपुरे राहिले होते. चर खणण्याचे आणि बांध घालण्याचे काम १६८२ साली सुरू होऊन
पुढे ८-९ वर्षे चालू होते.
जवळच्या
गावात चकमक
२
मार्च १७०२ रोजी रात्री शिपोशी जवळच्या (कोतरी-कातर) गावावर मोगल बादशाही
अधिकाऱ्यांनी हल्ला चढवला होता. मराठे आणि मोगल बादशाही अधिकाऱ्यांच्यात यांच्यात
चकमक झाली होती. मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी गाव ताब्यात घेतले होते. मराठ्यांनी
खेळणा (विशाळगड) किल्ल्याचा आसरा घेतला होता.
रियासतकारांच्या
प्राथमिक शिक्षणाचे गाव
रियासतकार
डॉ. गो. स. सरदेसाई यांचा जन्म गोविळ गावी १७ मे १८६५ला (मृत्यू - २९
नोव्हेंबर १९५९, कामशेत) झाला. गोविळच्या परिसरात सृष्टीनिरीक्षण आणि काबाडकष्ट
करण्यात त्यांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोविळ जवळ असलेल्या वेरवली एक
वर्षे (वय वर्षे ७) आणि उर्वरित वर्षे शिपोशी या त्यांच्या मामांच्या गावी झाले
होते. त्यांचे पुढील शिक्षण रत्नागिरी (१८७९), पुणे आणि मुंबई येथे झाले. मुंबईच्या
एल्फिन्स्टन कॉलेजातून १८८८ साली बी.ए. झाल्यावर पुढे काय करावे? अशा विचारात
असताना, बडोदा संस्थानात नायब दिवाण असलेल्या शिपोशीतील बापूसाहेब आठल्ये यांनी
त्यांना तिकडे नेले. बडोद्याचे तरुण महाराज सयाजीराव यांचे वाचक म्हणून १ जानेवारी
१८८९ रोजी त्यांची नेमणूक झाली. पुढे त्यांना राजपुत्र विद्यालयात शिक्षक म्हणून
बढती मिळाली. विद्यालयाचे मुख्य कालानुरूप युरोपीय होते. पुढील जीवनात
सयाजीराजांच्या सोबत अनेकदा ते विलायतेस गेले. सरदेसाई हे निर्लोभी असल्याने जे
सहजरित्या मिळेल त्यावर संतुष्ट राहून जणू इतिहासाला आपला पुत्र मानून त्यांनी
आपले काम चोख बजावले. त्यांच्या या जगण्याचा राष्ट्राला मोठा उपयोग झाला. वि. का.
राजवाडे यांनी सरदेसाई यांना शतकातील शंभर नामांकितमध्ये ’इतिहासमार्तंड’ म्हणून
संबोधले होते. इतिहास संशोधकांच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले.
हिंदू
महासभेला शिपोशीत पाठींबा
विद्यार्थ्यांमध्ये
भेदभाव न करण्याचा सरकारी आदेश असताना कोकणात त्याचे पालन होत नव्हते. तेव्हा
रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकारांनी हिंदू महासभेच्या
माध्यमातून १९२५ मध्ये हा प्रश्न हातात घेतला. जनजागृतीसाठी त्यांनी कोकणात
सर्वत्र दौरे केले, व्याख्याने दिली. याचे पडसाद कोकणातील साठ-सत्तर गावात उमटले
होते ज्यात शिपोशी एक होते.
१९२९ची
शिपोशी सहकार परिषद
तत्कालीन
सावंतवाडी प्रांतातील कुडाळ येथील बाकरे कुटुंबातील वैद्यकीय व्यावसायिक (आयुर्वेद
आणि होमिओपॅथी) वासुदेव महाशेवर बाकरे यांनी १९०८मध्ये बेळगाव येथे वैद्यकीय
व्यवसाय सुरु केला होता. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १३ वर्षे
संचालक, सहकार परिषदेचे सदस्य, १९३२-३३मध्ये मुंबई प्रांतीय सहकारी संस्थेचे सचिव
होते. विशेष म्हणजे १९२९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिपोशी येथे झालेल्या सहकार
परिषदेचे ते अध्यक्ष होते.
आठल्ये
दप्तर
शिपोशी
गावातील श्रीकृष्ण विठ्ठल आठल्ये हे मराठा इतिहासाचे एक सुप्रसिद्ध समीक्षात्मक
अभ्यासक होते. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मूळ दस्तऐवज संकलित,
कॉपी आणि प्रेससाठी तयार केले होते. त्यांच्या आठल्ये दफ्तरातील हा
संग्रह १९४५मध्ये रघुवीर लायब्ररीसाठी विकत घेण्यात आला.
हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक शिपोशीचे!
क्रांतीकारक
गणेश गोपाळ उर्फ अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ रोजी शिपोशी येथे झाला.
पोस्टमास्तर वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी,
अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते
मुंबईला गेले; पण हलाखीच्या परिस्थितीमुळे शिकणे कठीण झाले.
मुंबईत बदामवाडीत रहात असतांना त्यांचा संपर्क आर्यसंघ या बंगाली क्रांतीकारकांच्या
संघटनेशी झाला. संघटनेतील शामसुंदर चक्रवर्ती हे अण्णांचे खास मित्र होते.
त्यावेळी गुप्तपणे काम करणार्या क्रांतीकारकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा असे.
त्यामुळे गणेश गोपाळ हे कधी अण्णा कधी डॉ. आठल्ये, अमेरिकन
मेस्मोरिस्ट, ओ. अँटले, ए. गणपतराव,
तर कधी गणेशपंत आठल्ये अशा अनेक टोपणनावांनी वावरत होते. गोव्यात
झालेल्या राणे बंडाच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलीस त्यांची चौकशी
करत असल्याने आठल्ये यांना मुंबईत रहाणे कठीण झाले होते. त्या वेळी बेंजामिन वॉकर
या पारशी गृहस्थाने त्यांना आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे आठल्ये टोपण नावाने
जहाजावरून वॉकर यांच्यासमवेत अमेरिकेला निघून गेले. त्या वेळी त्यांची त्यांच्या
कुटुंबियांशी झालेली भेट अखेरची ठरली. त्यांचा मुलगा म्हणजेच (कै.) डॉ. विनायक
गणेश आठल्ये केवळ दीड वर्षांचे होते. गणेश आठल्ये यांनी अमेरिका, इंग्लंड, इटली, जर्मनी,
फ्रान्स या देशांचा छुप्या पद्धतीने दौरा करून बॉम्ब सिद्ध करण्याची
विद्या आत्मसात केली होती. त्यानंतर जर्मनीहून मालवाहू जहाजाने ते कोलकत्याला आले.
या दरम्यान त्यांना क्षयरोग झाला. अज्ञातवासात असतांनाच ३२ व्या वर्षी २ सप्टेंबर
१९११ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार तेथील तत्कालीन महाराष्ट्र
मंडळाचे सदस्य आणि नागपूरचे डॉ. केशव बळीराम हेडगेवार, पुण्याचे
डॉ. पळसुले यांच्या अर्थात महाराष्ट्रीय व्यक्तीच्या हस्ते अज्ञातपणे त्यांचा
अंत्यविधी झाला. शस्त्रास्त्रांच्या जहाल मार्गाने अन्यायी ब्रिटीश राजवटीला
हादरवून सोडणार्या या थोर क्रांतीकारकाचे संपूर्ण जीवन आणि कार्यपद्धत गुप्त
राहिली आहे. मुंबईतील भडकमकर मार्गावरील चौकाला क्रांतीवीर जी. अण्णा यांचे नाव
दिलेले आहे. “वन्दे मातरम् या जहाल नियतकालिकाचे संपादक शामसुंदर चक्रवर्ती यांनी
अण्णांना बंगाली लिपीतील वन्दे मातरम् ही अक्षरे कोरलेली चंदनाची पाटी भेट दिली
होती. गणेश गोपाळ हे हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक होते. सेनापती बापट
यांच्यापूर्वी त्यांनी बॉम्ब सिद्ध करण्याची विद्या शिकून घेतली होती. ही विद्या
त्यांनी बंगालमधील तत्कालीन जहाल क्रांतीकारकांना शिकवली. खुदीराम बोस यांनी
उडवलेला हिंदुस्थानातील पहिला बॉम्ब त्यांनीच सिद्ध केला होता.
कवी-साहित्यिक कृष्णाजी नारायण आठल्ये
कोचीन
(केरळ) मधील वास्तव्यात ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक सुरू (१८८६) करून ते सुमारे २५
वर्षे चालविणारे कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे मूळगाव शिपोशी. वडील दशग्रंथी वैदिक
असल्याने त्यांनाही तेच शिक्षण मिळाले. कराड, पुणे ट्रेनिंग महाविद्यालय येथे
त्यांचे शिक्षण झाले. त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तीन वर्षे
शिक्षण घेतले होते. मलबारमधील कोचीन येथे आठल्यांचे एक बंधू नोकरी करीत होते. ते
आजारी पडल्याने त्यांना भेटायला म्हणून कृष्णाजी कोचीनला आले आणि तेथेच राहिले.
कोचीन मधील वास्तव्यात त्यांनी ‘केरळकोकिळ’ नावाचे मासिक चालविले. त्यांनी
‘गीतापद्यमुक्ताहार’ (१८८४), ‘आत्मरहस्य’ (१९१९), ‘The English
Teacher’ भाग १ व २’ (१९२३), ‘कोकिळाचे बोल’ -
निवडक लेख (१९२६), ‘रामकृष्ण परमहंस’ (१९२९), ‘माझे
गुरुस्थान’, ‘सार्थ दासबोध’, ‘समर्थांचे
सामर्थ्य’, ‘सार्थ ज्ञानेश्वरी’, ‘सुलभ
वेदान्त’, ‘आर्याबद्ध गीता’, ‘वसंत
पूजा’, ‘फाकडे तलवार बहाद्दर’, ‘नरदेहाची
रचना’, ‘विवेकानंद जीवन’, ‘ज्ञानेश्वरांचे
गौडबंगाल’, ‘पंचतंत्रामृत’ हे ग्रंथ ‘सुश्लोक लाघव’,
‘सासरची पाठवणी’, ‘माहेरचे मूळ’, ‘शृंगार तिलकादर्श’, ‘मुलीचा समाचार’ आदी काव्यसंग्रह
तसेच ‘मुले थोर कशी करावीत?’, ‘नजरबंद
शिक्षक’, ‘ग्रहदशेचा फटका’, ‘मथुरा
गणेश सौभाग्य’ आणि अनुवादित आदी चाळीसेक ग्रंथ लिहिले. शृंगेरी मठाच्या
शंकराचार्यांनी त्यांना ‘महाराष्ट्र भाषा चित्रमयूर’ ही पदवी दिली होती. त्यांची
‘प्रमाण’ नावाची कविता विशेष गाजलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कविता सर्वाची
तोंडपाठ होती. मराठी बालभारती १९९८च्या चौथीच्या पुस्तकात अभ्यासासाठी असलेली ही
कविता खालीलप्रमाणे...
प्रमाण
अतीकोपता कार्य
जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते
कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना
नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त
सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख
शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे
सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ३ ।।
अती ज्ञान
अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच
पाया ।
न कष्टाविणे त्वा
रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही
प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते
मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग
येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग
देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे
अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां
कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी
प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी
आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही
जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां
न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती
बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते
अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे
।। १० ।।
अती वाद घेता
दुरावेल सत्य, अती `होस हो'
बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा
ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ११ ।।
अती औषधे
वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास
कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत
नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून
तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे
दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग
कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग
तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न
कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती
बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट
चित्ती ।
न कोणा उगे शब्द
स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।
अती भांडणे नाश
तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न
कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे
रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ
खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती
भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध
नादी ।
खरे सार शोधोनिया
नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।
सदा पद्य
घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास
होतो ।
कधी ते कधी हेही
वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
शिपोशीतील आठल्ये यांनी काढले रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मराठी
वर्तमानपत्र
रत्नागिरी
जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे संपादक जनार्दन हरि
आठल्ये यांचेही मूळगाव शिपोशी होते. जनार्दन हरि आठल्ये यांचा जन्म १८२६ ला
झाल्याची नोंद मिळते. जनार्दन हरी आठल्ये (1826-1900) हे रावसाहेब विश्वनाथ
नारायण मंडलिक हे प्रसिद्ध वकील आणि प्राच्यविद्या अभ्यासक यांचे लहानपणापासूनचे
स्नेही आणि रत्नागिरीतील शाळासोबती होते. तसेच ते संस्कृतचे अभ्यासक बापूसाहेब
आठल्ये यांच्याशी संबंधित होते. प्राथमिक आणि इंग्रजी असे सुरुवातीचे शिक्षण
खाजगीत,
घरी मिळवणारे ते एक स्वयंनिर्मित व्यक्ती होते. त्या काळात छापून
आलेली इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती. यातून
त्यांना भारताबाहेरील देशांच्या घडामोडींमध्ये रस निर्माण झाला. रत्नागिरीच्या
सरकारी हायस्कुलात शिकून ते मॅट्रिक झाले त्यानंतर त्याच हायस्कुलात शिक्षक म्हणून
नोकरीला लागले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे जाणकार
असलेल्या जनुभांऊचा धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचा विशेष अभ्यास होता.
हस्तलिखितापेक्षा
मुद्रित ग्रंथाना महत्व येणार आहे हे जाणून या ज्ञात्याने १८४८ ला रत्नागिरीत
‘जगमित्र’ छापखाना सुरू केला. जून १८५४ ते १८९० पर्यंत सुमारे ३७ वर्षे त्यांनी
“जगन्मित्र” साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या शिळाप्रेसवर चालविले. पुणे-मुंबर्इ सोडून
अन्यत्र कुठे वृत्तपत्राला प्रारंभ झाला नव्हता तेव्हा या दोन शहरानंतर संपूर्ण
महाराष्ट्रात पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा मान ‘जगन्मित्र’ लाच आहे. जनार्दन हरी
यांचा स्वतःचा उत्तम असा ग्रंथसंग्रह होता. स्वतःचा मुद्रण व्यवसाय असल्यामुळेच
त्यांनी साप्ताहिकाचा बुडिताचा धंदा सुरू केला. साप्ताहिक विकत घेऊन वाचायची
मानसिकता समाजात आलेली नव्हती. ’जगन्मित्र ‘साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ५ रुपये
होती आणि वर्गणीदारांची संख्या होती अवघी १७. विशेष म्हणजे या १७ वर्गणीदारात
मराठीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखक आणि कोशकार मेजर थॉमस कॅडी,
कराची येधील फ्रियर हे पुढे मुंबर्इ प्रांताचे गर्व्हनर झाले होते.
मिस्टर एलिस अशा अभ्यासू व्यक्ती होत्या. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी
ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना हिंदू धर्मावर टीका करायला प्रारंभ केला असताना
त्या टीकेला अभ्यासपूर्ण भाषेत लेख लिहून उत्तरे देण्याचे काम जनुभाऊ आठल्ये यांनी
‘जगन्मित्र’ मधून केले. २० ऑगस्ट १८६६ च्या अंकात, हिंदुस्तानात
पडलेल्या दुष्काळाच्या एका बातमीत, ‘चितापूर येथे भिकाऱ्यास
तांदुळ वाटिले तेव्हा त्या गरिबांचे गर्दीत ३२ माणसे ठार मेली व १५ स दुखापत झाली
आहे.’ अशी नोंद आहे. ’जगन्मित्र‘चा त्या वेळी ’रत्नागिरीचे गॅझेट‘ असा उल्लेख
व्हायचा. बिनचूक माहिती प्रसिद्ध होत असे. जगन्मित्र छापखान्यात आठल्ये यांनी
‘धर्मसिंधू’, भावार्थ दीपिका’, ‘बृहत्संहिता’
ग्रंथ प्रकाशित केले. १८७५साली आठल्ये आणि विनायक शास्त्री आगाशे यांनी
शब्दसिद्धीनिबंध नावाचा कोश प्रसिद्ध केला होता. संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठी
अनुवाद असलेला एक मूलभूत दुर्मिळ ग्रंथ वराहमिहिरकृत श्री बृहतसंहिता चे भाषांतर करून जनार्दन हरि आठल्ये यांनी ११
ऑक्टोबर १८७४ रोजी प्रसिद्ध केला होता.
'वराहमिहिर' हा चौथ्या-पाचव्या शतकातील
खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. त्या काळात, भारतीय
खगोलशास्त्र व गणित, युरोपपेक्षा खूपच प्रगत होते. वराहमिहिर,
हा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता, अशी आख्यायिका आहे. या पुस्तकात १०७ अध्याय असून त्यातील भविष्य हे,
व्यक्तिगत भविष्य नसून सार्वजनिक भविष्य आहे. भूकंपासारखी नैसर्गिक
संकटांची कारणे आणि भविष्ये यात आहेत. अशा प्रकारचा हा ग्रंथ दीड हजार वर्षापूर्वी
लिहिला गेला होता, ही आश्वर्याचीच गोष्ट आहे. १८७४ मध्ये
आठल्ये यांनी रत्नागिरी सारख्या ठिकाणी, या ग्रंथाचे
मुळाबरहुकूम भाषांतर सिद्ध केले होते. विद्योद्भव लाभ (१८४९) हा शिक्षणाच्या
फायद्यांवरील निबंध, शब्दसिद्धी निबंध (१८७१) हा एक दार्शनिक
निबंध, संस्कृतमधून मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल
मुर्खासतक (१८७७) हा मूर्खाविषयीच्या २५ सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकांचा श्लोक
स्वरूपात केलेला अनुवाद, काली उद्भव (1878) हे येणार्या
अंधकारमय युगाबद्दल संस्कृत कृतीचे मराठी रूपांतर, सद्यस्थिती
निबंध, विद्यामाला, ज्योतिष, बालवैद्य, पाकशास्त्र ही त्यांची कमी ज्ञात पुस्तके
आहेत. या नोंदी History of modern Marathi literature 1800-1938
मराठी वान्द्मय कोश या govind chimanaji bhate निवृत्त
प्राचार्य वेलिंग्टन कोलेज सांगली यांनी १७ फेब्रुवारी १९३९ रोजी लिहून प्रसिद्ध
केलेल्या ग्रंथात आहेत. त्यांनी शिपोशी येथे मराठी शाळा सुरू केली. लोकांच्या उदार
सहकार्याने शाळेसाठी इमारत बांधली होती. भारतीय ग्रंथमुद्रण – बापूराव नाईक (कॅ.
गो. गं. लिमये ट्रस्ट प्रकाशन) १० मे १९८० नुसार जगन्मित्र छापखान्यात १८५४ पासून
१८६९ पर्यंत २५ पुस्तके छापण्यात आली होती. गुण्ये घराण्याचा इतिहास खंड दुसरा
नुसार, शके १७९०, सन १८६८ मध्ये जनार्दन हरि आठल्ये (इनामदार शिपोशी) यांनी
परिश्रमपूर्वक कऱ्हाड्यांची शुद्ध गोत्रावळी तयार केली होती.
१८००
ते १८६९ दरम्यान महाराष्ट्रात बेळगाव-धारवाड-कराची सह १०१ छापखाने होते. त्यात
रत्नागिरीतील हा एकमेव होता. १८७० ते १८८५ - १८ पुस्तके छापण्यात आली. त्यांचे
पहिले पुस्तक प्रातस्मरणादि पद्य (प्रती २५) सखाराम मोरेश्वर जोशी यांनी छापून
घेतले होते. विद्यामाला हे अन्वर्थक नाव
घेऊन त्यांनी १८७८ मध्ये महाराष्ट्रीय ज्ञानकोश मासिक स्वरुपात छापायला सुरुवात
केली होती. पण २०० पानांच्यावर त्याची प्रगती झाली नाही. जनुभाऊ वृद्धापकाळापर्यंत
जगले आणि 1900 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले.
संदर्भ
::
१. WHO’S
WHO INDIA (EDITED AND COMPILED THOS. PETERS) १९३६
२. HAND LIST OF IMPORTANT HISTORICAL MANUSCRIPTS IN THE RAGHUBIR LIBRARY १९४९
- RAGHUBIR LIBRARY SITAMAU (MALWA)
३. डिसेंबर
१९५१ - मासिक नवभारत - प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचा लेख
४. शिवपुत्र
संभाजी - डॉ. सौ. कमल गोखले (ज्ञान-विज्ञान विकास मंडळ १९७१)
५. कै.
वै. वि. आठल्ये यांचे १९८१ सालचे माघी उत्सवातील भाषण
६. जानेवारी
१९८३ :: मोगल दरबाराची पत्रे (खंड दुसरा) संपादक - सेतुमाधव पगडी
७. www.harihareshwardevasthanshiposhi.in
(धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील
‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या
विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण
इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५
वर्षे कार्यरत आहेत.)