शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

‘इतके पावसाळे बघितलेत’ म्हणजे काय?

ग्रामीण कोकणात आजही पावसाळ्यात
असे नद्या-ओहोळ-नाले ओलांडावे लागतात
 


कोकणच्या दऱ्याखोऱ्यातील माचाळसारख्या (रत्नागिरी) अनेक गावात आजही ‘पावसाळ्याचे दोन महिने नको’ म्हणणारी माणसं भेटतील. याच माणसांनी उराशी कवटाळून जपलेली उबदार ‘पिरसा’ संस्कृती आपल्याला ‘पावसाळ्याचे दोन महिने का नको? आणि ...मी इतके पावसाळे बघितलेत! म्हणजे नक्की काय?’ हे समजावून सांगेल. कोकणातील या जाणत्या माणसांचं अनुभवाचं हे बोलणं ऐकायचं असेल तर तुफानी पावसात काहीशी वाकडी वाट करून मर्यादित जोखीम (calculated risk) उचलून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गावात बिनधास्त भटकावं लागेल.


खरंतर आपल्याला ‘जीवेत् शरदः शतम्’ म्हणत कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ ही ओळ आठवायला हवी. मनुष्याला जीवनात शंभर शरद ऋतू जगायला मिळावेत हा या वाक्याचा अर्थ आहे. पण यातल्या शरद ऋतूच्या मुळाशी वर्षा ऋतू आणि ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ हेच कारण असावं असं वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीतील संवत्सरं आणि पंचांगे पावसावर जवळपास जाणारे भाकित करत असतात. आपल्या दाते पंचांगाचा वापर तर जगभर सन्मानाने होत असतो. अर्थात तरीही प्रत्येक पावसाळ्याचा अनुभव निराळा असतो. कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर तर कधी पाऊस खूप वाट बघायला लावतो. अशा साऱ्या पावसाळ्यांची संख्या, वैविध्य आणि तीव्रता यातूनच आपण ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ या वाक्यापर्यंत पोहोचलेलो असावेत. तर ‘जीवेत् शरदः शतम्’ मधल्या शरद ऋतूचा संबंध हा सुगीच्या दिवसांशी जोडलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसातून निभाव लागल्यावर साऱ्या कष्टाचं, संघर्षाचं, प्रतिक्षेचं फलित-पिक हाती यायचा हा काळ आहे. पेरलेलं उगवून पदरात पाडून घेण्याचा काळ आहे. गुलाबी थंडी, निरभ्र आकाश, रात्रीचं लख्ख चांदणं असा सुखावणारा आसमंत शंभर वर्षं उपभोगायला मिळणं म्हणजे समृद्ध दीर्घायुष्यचं!


नव्याने सुरु झालेल्या बांधकामासाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपडीत वास्तव्यास असलेल्या निवासी मजुरांना पावसाचा तिटकारा वाटतो. पावसाळ्यात अशा ठिकाणी राहाणे सोपे नाही. जास्त पाऊस पडला की जमीनीतली ओल संपूर्ण खोलीत पसरते. घरातील अंथरुणापासून कपड्यांपर्यंत सर्व काही ओले होत असते. कपडे कुठे सुकवायचे? हाही प्रश्न असतो. शहरातील मजुरांची ही व्यथा तर दुर्गम सह्याद्रीत निवासाला असलेल्यांचे काय होत असेल? नदी किनाऱ्यावरील गावाच्या लोकांना पूर्वांपार शेती करताना किती समस्यांना तोंड द्यावे लागत असेल? शेतीला जायच्या मार्गावरचं नदीचं, ओढ्याचं पात्र नियमित ओलांडताना अनेकदा वाहून जायला व्हायचं. अनेकदा बैलं-गुरं डोळ्यांदेखत वाहून जायची. कधीकधी त्यांना वाचवायला गेलेला स्वतः मात्र दुर्दैवी ठरायचा. असं हे दरवर्षी कुठल्याना कुठल्या गावात हमखास घडायचं. पावसाच्या या फेऱ्यातून वाचलेले जीवेत् शरदः शतम्’चे भाग्यवान ठरतं.

 

बाष्पीभवन होऊन पाणी ढगाद्वारे जमिनीवर कोसळते. पऱ्या, ओहोळ, नदी-नाल्यांतून वाहात सागराला मिळते. पाऊस आपल्याला नखशिखांत चिंब भिजवतो. रिपरिप, रिमझिम, झरझर, टपटप, भुर्रभुर्र, धपधप, अशा कितीतरी आवाजात तो कान देऊन ऐकता येतो. त्याचं रौद्र रूप विविध अडचणी निर्माण करतं. त्या अडचणींवर मात करत जीवन जगण्याची उर्मी ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ हे सांगण्याची शक्ती प्रदान करतं.

 

पावसाने तुफान बॅटिंग केल्यानंतर खुललेला निसर्ग 

असा खरा पाऊस आपल्याला जंगलात अनुभवायला मिळतो. तिथे तो वेगळे रुप धारण करतो. जंगलातील झाडे, गवत, प्राणी व कीटक या पावसाचे स्वागत करतात कारण ते त्यांचे जीवन असते. पण तिथल्या माणसांना पाऊस नकोसा वाटतो, हे सत्य आहे. पावसाळा हा पाहाण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा ऋतू आहे. अनुभव घेणे हे जागृत अवस्थेचे लक्षण आहे. बालपणी कधीतरी घराच्या दाराजवळ, अंगणात पाणी आल्यावर किंवा ओहोळाच्या पाटाचे पाणी वाहू लागल्यावर त्यात कागदी होड्या सोडण्याचे उद्योग आपण सर्वानीच केलेले असतील. पण त्याक्षणी आपल्या घरातल्या मोठ्यांच्या समोर कोणत्या अडचणी उभ्या असतात हे आपल्या गावीही नसतं. त्या समजाव्यात असं आपलं वयही नसतं म्हणा! अगदीच नाही म्हणायला, अंगावर शहारे आणत रस्त्यावरून एकटेच फिरणारे एखादे भेदरलेले कुत्र्याचे पिल्लू आपल्या बालमनाचा ठाव घेतं.

 


पूर्वी काय नि आजही काय, पाऊस बेभान होऊन बरसायला लागला की अवतीभोवतीचा परिसर हा नववधूने शृंगार केल्यासारखा हिरवागार दिसू लागतो. बालपणी पायात चपला नसायच्या तेव्हा मोकळ्या पायाने घराच्या बाजूच्या माळरानावर मित्रांसोबत पायानेच एकमेकांवर वाहणारं पाणी उडवताना कधीकधी पाय घसरून पडायला व्हायचं. वारा सुरू झाला की छत्र्यांचे कमळ व्हायचे. अनेकदा धुक्याच्या पांघरूणात आपलं घरही अस्पष्ट दिसायचं. ग्रामीण कोकणातली मुलं ओलेचिंब होऊनच शाळेत पोहोचायची. मुसळधार पावसापुढे रेनकोट, छत्रीचा टिकावही लागायचा नाही. शाळेत दिवसभर कुडकुडत बसावं लागायचं. शाळा सुटल्यावर भर पावसात रानवाटा तुडवत, धावत, शर्यती लावत मुलं घराकडे निघायची. घरात आल्यावर पहिल्यांदा कुठं जायचं तर पिरश्याजवळ! ‘पिरसा’ पावसाळ्यात उबेसाठी सतत जळणाऱ्या एखाद्या लाकडाची चुल किंवा धग होय. कधीकधी हे पेटते लाकूड आढ्याला दोरीने बांधून खाली लाकडे पेटवून जाळ करत. पिरसा ही पावसाळ्यात शेतीचे कपडे आणि विशेषता घोंगडी सुकवण्यासाठी तयार केलेली बांबूच्या लाकडाची चौकट ज्याला दांडी म्हणत. ज्याखाली भिंतीलगत आग पेटवलेली असायची. याच्या आधारे आजूबाजूला घोंगडी, शेतीचे कपडे वाळत घातले जातं.

 

पिरसा 

पिरश्याची धगधगणारी आग पावसात बाहेरून शेतीचं काम करून आलेल्यांना उब द्यायची. पिरश्यावर पाठ, कंबर शेकवली की दिवसभराचा त्रास जरा कमी वाटायचा. ही आग दिवसभर पावसात गारठलेलं शरीर उबदार करायची. दमलेल्या शरीराचा थकवा घालवायची. या पिरश्यात काजू किंवा फणसाच्या वाळवलेल्या आठला भाजून खाण्यातला आनंद शब्दातीत. कारण पिरश्यावर भाजून खाल्लेल्या काजू आणि आटलांची चव अवर्णनीय होती. बाहेर धोधो पाऊस, कोकणी घराच्या कौलावर सुरु असलेलं पावसाचं संगीत, कौटुंबिक गप्पा, गरमगरम पिठलं-भाकरी, तर कधी रानभाजी पचवलेल्या ताटातलं बालपण संघर्षाची अफाट क्षमता बाळगून होतं. आज पिरसा आणि हे सारं अतिदुर्मीळ झालंय. आमची संघर्षाची क्षमता कमीकमी होत चाललीय. मग आम्हाला , ‘...मी इतके पावसाळे बघितलेत!’ याचा अर्थ कुठून समजणार आहे?

 

'माचाळ'वासी ग्रामस्थ मांडवकर यांच्या समवेत एक क्षण

अलीकडे विरंगुळा म्हणून मोबाईलवर स्क्रोलिंग करताना, ‘...मी इतके पावसाळे बघितलेत!’ या वाक्याचा गंमतीदार उपयोग केलेला दिसून आला. जुन्याचा आदर करणं जितकं महत्त्वाचं तितकंच नव्याविषयी विचार करणंही महत्त्वाचं आहे, हे मान्यच आहे. पण सध्याच्या कुटुंबव्यवस्थेत अशा वाक्याचं गांभीर्य जाणणाऱ्या पिढीसोबत आपण किती जगतोय? तो काळ, ती माणसं, त्यांचा दैनंदिन संघर्ष किती समजून घेतोय? हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सक्रीय वावर असलेल्या आणि ‘किती पावसाळे बघितले?’ सारख्या वाक्यांचं गांभीर्य प्रसंगी समजू न शकणाऱ्या पिढीला हे सारं सांगावसं वाटलं. बाकी, आमचा आवडता ऋतू ‘पावसाळा’च आहे.

 

जळवांचे साम्राज्य असलेल्या मुचकुंदी नदीच्या उगमस्थानी...

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८ 

मंगळवार, २३ जुलै, २०२४

Tickell's Blue Flycatcherचं बाळंतपणं



१६ जुलै २०२४
 

आषाढी एकादशीलाच आकाशी झेप घेऊन श्रीपरमेश्वर दर्शन घ्यायची यांचीही तीव्र इच्छा तर झाली नसेल ना? असा विचार उगीचच मनात करत असताना नीलिमा (Tickell's Blue Flycatcher) पक्ष्याच्या पिल्लानं त्याच्यापासून किंचित दूरवर असलेल्या अंगणातील भल्यामोठ्या आंब्याच्या एका नाजूक डहाळीवर डोळ्यादेखत झेप घेतली आणि त्याच्या आई-वडिलांच्या मागील तीनेक आठवड्यांच्या संगोपन-मेहनतीचं सार्थक झालं. त्या दिवशी (१७ जुलै २०२४) सायंकाळी घरट्याजवळ काहीतरी आवाज झाला म्हणून बघायला बाहेर आलो तेव्हा घरट्यातील एक पिल्लू (बहुदा थोरलं) खिडकीला असलेल्या लोखंडी ग्रीलच्या आडव्या गजावर बसलेलं दिसलं. खेण्ड (चिपळूण) घरातील मागील १५ वर्षांच्या वास्तव्यात परसदारी हिरवाई फुलवण्याचा प्रयत्न करत असताना नीलिमा पक्ष्याने पहिल्यांदाच घरटे केल्यामुळे आम्हीही शक्य तेवढा वेळ निरीक्षणात घालवला.


Tickell's Blue Flycatcherचं नाव ब्रिटीश पक्षीशास्त्रज्ञ सॅम्युअल टिकेल यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. पक्ष्याचं निसर्गातील वर्तन त्याच्या शरीरावरील मोहक निळा, फिकट निळा-राखाडी, केशरी आणि पांढऱ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर मनाला अत्यंत उत्साहवर्धक अनुभूती देतं. नीलिमा पक्ष्याचे निरीक्षण करताना त्याच्या पंखांची रंगछटा प्रचंड आनंद देते. सतत जागोजागी फिरत राहण्याच्या सवईमुळे यांना नर्तक पक्षी म्हणूनही ओळखले जाते. नीलिमा पक्षी साधारणपणे चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा (११ ते १२ सें.मी.) आहे. यातील नर पाठीकडून निळा, पोटाकडे पांढरा, गळा व छातीचा भाग तांबूस, खांद्यावरचा काही भाग आणि भुवया आकाशी रंगाच्या असतात तर मादी नरापेक्षा फिकट रंगाची असते. हा पक्षी भारतासह श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या आशियाई देशात आढळतो. Tickell's Blue Flycatcher खरंतर जंगलातील पक्षी आहे. तो झाडी, बांबूची झाडे, पानगळीची जंगले, सदाहरित जंगले, लहान झुडपी जंगले, बांबूचे बेट आणि हिरवळीने समृद्ध बागांच्या वातावरणात वास्तव्याला असतो. बहुतेक वेळा पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतो. या पक्ष्याच्या आहारामध्ये प्रामुख्याने उड्डाण करताना चतुराईने पकडलेल्या कीटकांचा, काही अपृष्ठवंशी आणि अळ्यांचा समावेश असतो. कधीकधी जमिनीवरून रांगणारे कीटकही गोळा करतो. त्याचे हे वर्तन सध्याच्या बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेणे ठरावे.

१८ जून २०२४

मार्च ते ऑगस्ट हा काळ या नीलिमा पक्ष्यांचा वीणीचा काळ आहे. आमच्याकडे १८ जूनच्या दरम्यान पक्ष्याने घरटे करायला सुरुवात केलेली. पाने, मूळ, शेवाळे, बारीक गवत, वनस्पतींचे तंतू आदी साहित्य वापरून बनविलेले घरटे सहसा बांबूच्या बुंध्यात, झाडाच्या पोकळीत-खोडात किंवा खडकांमध्ये असते. मात्र कुठेही जागा न मिळाल्याने पक्ष्याने साधारणपणे नियमित साहित्याचा उपयोग करून आमच्या घराच्या ईशान्येला असलेल्या खिडकीच्या (पांढऱ्या काचांची स्लायडिंग विंडो) डाव्या कोपऱ्यात घरटे केले होते. घरट्या समोरून फारशी मानवी ये-जा नसल्याचे अचूक हेरून त्याने हे घरटे बनवले होते. हे लक्षात येताच आम्हीही कुटुंबीयांना पुढील किमान महिनाभर हॉलची खिडकी अजिबात न उघडण्याच्या, खिडकीला धक्का न लावण्याच्या आणि अंगणाची विशेष स्वच्छता न करण्याबाबत सांगितलं होतं. इकडे १९ जूनला पक्ष्याचे घरटे पूर्ण झालेले, मादीही घरट्यात बसलेली पण अंडी अजून घातलेली नव्हती. नर आणि मादी घरट्यापासून अगदी जवळ वावरत होती. याचा अर्थ त्यांनी हे घरटे पूर्णपणे स्वीकारलेले होते. नीलिमा पक्ष्याने परसदारी पहिल्यांदाच घरटे केल्याने आम्हीही आनंदून गेलो होतो. नीलिमा मादीने घरट्यात २३ जून रोजी पहिलं अंड घातलं. प्रजनन हंगामात नीलिमा मादी एकावेळी ३ ते ५ अंडी देते याची वाचनात आल्याने आमची पाहाणी सुरु होती. २३ जून रोजी पहिले अंडे घातल्यानंतर २४ जूनला दुसरे तर २६ जूनला घरट्यात एकूण ४ अंडी घातलेली दिसली. फिकट तपकिरी रंगाची आणि तुटक लालसर रेषा असलेली अंडी होती. 



इतर कार्यबाहुल्यांमुळे पुढील आठ-दहा दिवस आणि त्यानंतरही आम्हाला घरट्याकडे विशेष लक्ष पुरवता आले नाही. मात्र तरीही वेळ मिळेल तेवढे निरीक्षण आम्ही करत राहिलो. चिरंजीव आणि सौ.ही निरीक्षण करत होतीच! 

७ जुलैला आम्ही पाहिलं तेव्हा घरट्यात पिल्लांनी जन्म घेतला असल्याचे लक्षात आले. आता नर-मादी मिळून पिलांची देखभाल करण्यात गुंतलेले होते. सुरुवातीचे दोनेक दिवस बराच काळ पक्षी घरट्यावर बसून असलेले दिसले. १५ जुलैला पाहिलं तेव्हा लक्षात आलं, घरट्यातील पिल्लं बऱ्यापैकी मोठी झालेली होती. आता ती घरट्याच्या कडेवर येऊन उभी राहात होती. ती कोणत्याही क्षणी जणू झेप घेण्याच्या तयारीत जाणवली. म्हणून वेळ मिळताच १६ जुलैला सायंकाळी काही छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला. 




१७ जुलैला आषाढी एकादशीच्या सायंकाळी घरट्याजवळ आवाज झाला म्हणून पाहिलं तेव्हा घरट्यातील एक पिल्लू खिडकीच्या लोखंडी आडव्या गजावर बसलेलं! ‘दिसलं’ म्हणायचाही अवकाश, पिल्लू पुढच्या काही क्षणात अंगणात किंचित दूरवर असलेल्या आंब्याच्या डहाळीकडे डोळ्यादेखत झेपावलं. नीलिमा पक्ष्याच्या लेकरांच्या खान-पान व्यवस्थेत खारीचा वाटा उचलता यावा म्हणून आम्ही परसदारी अंगण स्वच्छता अभियान दोन आठवडे पुढे ढकललेलं! आषाढीच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१८ जुलै) सकाळी चिरंजीव शाळा-शिकवणीसाठी घराबाहेर पडला तेव्हा एक पिल्लू जणू त्यालाच भेटायला गेटवर येऊन बसलेलं. त्यानं मला सांगेपर्यंत ते पुन्हा उडालं. पिल्लाचे आई-बाबा (नरमादी) आसपासच होते. चार लेकरांचा हिशोब जुळवा म्हणून आम्ही तिकडे घरट्याकडे पाहिलं तर त्यात अजूनही एक पिल्लू शांतपणे झोपलेलं दिसलं. मनात किंचितशी काळजीही दाटून आली. पण काही वेळाने त्यानेही घरट्यातून आकाशी झेप घेतली आणि बघता-बघता अवघ्या तीनेक आठवड्यांचा हा रम्य प्रवास संपला.

नीलिमा पक्ष्याची सारी लेकरं श्रीविठ्ठल कृपेने निसर्गदेवतेच्या छायेत बागडू लागल्याची खात्री झाल्यावर आम्हीही स्वतःला अंगण स्वच्छता अभियानात गुंतवून घेतलं. राज्यात पंढरीची वारी (२९ जून ते १७ जुलै २०२४) सुरु असताना आमच्या परसदारी जैवविविधतेतील हे चैतन्य फुललं होतं. नीलिमा पक्षी आपली चार लेकरं वाढवत होती. ऐन आषाढी वारीच्या दिवसातलं हे परसदारचं बाळंतपण विशेष काहीही कारण नसताना आम्हाला, ‘पक्षी अंगणी उतरती | ते का गुंतोनी राहती ||’ एकनाथ महाराजांच्या या अभंगाची आठवण करून देऊन गेलं.

धीरज वाटेकर चिपळूण

रविवार, २३ जून, २०२४

'नदी की पाठशाला' निमित्ताने...


सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि चला जाणू या नदीला अंतर्गत चिपळूण नगर परिषद आयोजित डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संपन्न झालेल्या तीन दिवशीय (२१-२२-२३ जून २०२४) नदी की पाठशाला कार्यक्रमाचा अनुभव अविस्मरणीय राहिला. या तीन दिवसात संशोधक-अभ्यासकांचे मार्गदर्शन, वाशिष्टी नदी क्षेत्रभेट आणि कोकणातील नदी-जल यशकथा यांचे उत्तम मिश्रण अनुभवले. २०१५-१६साली वाशिष्टी नदीच्या कुंभार्ली घाटातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील उगमाचा शोध घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, मान्यवरांच्या समोर वाशिष्टी नदी विषयक मनोगत व्यक्त करता आलं.

या निमित्ताने भारताचे जलपुरुष आदरणीय डॉ. राजेंद्रसिंह जी यांचे मार्गदर्शन आणि लाभलेले सान्निध्य अमूल्य होते. त्यांच्यासह भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे, डॉ. अजित गोखले, यशदाचे निवृत्त संचालक डॉ. सुमंत पांडे, जलबिरादरी महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. Narendra chugh, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळोखे, उदयजी गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे मार्गदर्शन लाभले. नदी की पाठशाला आयोजित केल्याबद्दल चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे नदी की पाठशाला नगर परिषद स्तरावर आयोजित करणारी चिपळूण ही भारतातील पहिली नगर परिषद ठरली.

नदी विषयाच्या आमच्या श्रद्धा गढूळ झाल्या तेव्हापासून नदीचे पात्र गढूळ होत गेले आहे. नदीच्या क्षेत्रात आमची पाऊले वळायला हवीत. नदीच्या परिक्रमा व्हायला हव्यात. एकुणात नदी कृतज्ञतेचे उत्सव व्हायलाच हवेत, हे आम्ही यापूर्वी वाशिष्टी नदी परिक्रमा आणि वाशिष्टीला साडी नेसवण्याच्या उपक्रम निमित्ताने मांडलेले विचार इथे संशोधन स्वरूपात अभ्यासता आले. चिपळूणला महापूरमुक्त करायचे असल्यास समूळ वृक्षतोडबंदीसह जगबुड़ी (खेड) नदी पात्रावरही काम करावं लागेल, अशा अनेक कळीच्या मुद्द्यांचं गांभीर्य या तीन दिवसात लक्षात आलं याचा विस्तृत वृत्तांत सवडीने लिहीन.


धीरज वाटेकर


गुरुवार, २० जून, २०२४

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पाऊले वळायला हवीत!

              

वडवळ (सोलापूर) येथील वटवृक्ष

        अलिकडे, वटपौर्णिमेचे औचित्य साधून पूजनकारणे वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विक्रेते छोट्या-मोठ्या शहरात सार्वजनिक रस्त्यांच्या आजूबाजूची, जंगलातील किंवा खासगी आवारातील वडाची झाडे / फांद्या तोडत असतात. यावर उपाय म्हणून अनेक शहरातील वृक्षप्रेमींनी वडाच्या रोपांचे वितरण उपक्रम सुरु केले आहेत. महिलांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद अभिनंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावातील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे. दस्तऐवजीकरणातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे जनजागरण चळवळ राबवून महिला वर्गाची पाऊले हळूहळू पुन्हा ‘पुरातन’ वटवृक्षांकडे वळायला हवीत!

इमामपूर (बीड) येथील वटवृक्ष

            महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणे पुरातन ‘वटवृक्ष’ पाहायला मिळतात. मागच्या दिवाळीत आम्ही सहकुटुंब बीड जिल्ह्यात पर्यटन-भ्रमण करत असताना ईमामपूर (बीड) येथील वटवृक्ष आवर्जून पाहिला होता. तिथल्या श्रीकाळभैरवाच्या डोंगरावर मूळवृक्ष बहुधा अस्तित्वात नसलेला आणि पारंब्यांचाच पसारा वाढलेला हा प्रचंड मोठा वटवृक्ष आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात आम्ही नागेश संप्रदायाचे ठिकाण असलेल्या आणि हेगरस, अज्ञानसिद्द आदी संतश्रेष्ठांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ गावाला भेट दिली होती. गावातील श्रीनागनाथ मंदिर इतिहासप्रसिद्ध आहे. त्यावेळी प्रसिद्ध कवी-समीक्षक अरुण इंगवले आणि कोकणी लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे यांच्यासमवेत आम्ही वडवळ गावातील वडाचे भव्य झाड पाहिले होते. कोकणात गावागावात आजही महिला वटवृक्ष पूजन करताना आढळतात. आमचे बालपण गेलेल्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील अलोरे गावी विश्वकर्मा चौकात असलेले वडाचे झाड कोयना प्रकल्प कार्यालय सेवाकारणे गावात वास्तव्य केलेल्या मागील किमान तीनेक पिढ्यांच्या आठवणी जपून आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड किल्ल्याजवळ) या ठिकाणी भले मोठे वडाचे झाड आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील थीमम्मा मरीमानु हे वडाचे झाड, कोलकात्यातील ग्रेट बनियान ट्री, गुजरातमधील भरूच शहरातील कबीरवड, तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील पिल्लालमर्री, रामोहल्ली-बेंगलोरमधील द बिग वटवृक्ष आदी ठिकाणची वडाची झाडे प्रसिद्ध आहेत.

वडवळ (सोलापूर) येथील वटवृक्ष

              वटपौर्णिमेशी निगडीत वटसावित्रीची कथा वडाच्या वृक्षाबरोबर जोडली गेल्याने हा वृक्ष महिलांमध्ये पूजनीय आणि लोकप्रिय ठरला आहे. खरंतर मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या कथानकांशी जोडलेले वृक्ष आणि पर्यावरण महत्त्वाचे आहे. निसर्गचक्रातील वर्तमान प्रदूषित जगात, वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान, वृक्षांची उपयुक्तता लक्षात घेऊन वडासारख्या पुरातन वृक्षांचे अधिकाधिक सान्निध्य मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच दक्ष असायला हवे आहे. यासाठी कोकणात गावागावातील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण ही चळवळ बनायला हवी आहे.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८



https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/10330


बुधवार, ५ जून, २०२४

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात!

        राळेगणसिद्धी (अहमदनगर) :: पर्यावरणाच्या दृष्टीने सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. विषयाचं गांभीर्य कमी झालंय. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रातील अनास्था कमी करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिलं पाहिजे. नदीविषयीच्या आमच्या श्रद्धा गढूळ झाल्या तेव्हा नदीचे पात्रदेखील गढूळ होत गेले आहे. आम्ही धरणांचे पाणी पिऊ लागलो, तेव्हा नदीची आवश्यकता संपली. नदीपासून दूर गेलेल्या लोकांना नदीच्या जवळ आणले पाहिजे. आम्ही कोकणात वाशिष्टी नदीला साडी नेसवण्याचा उपक्रम केला. नदीची परिक्रमा केली. खूप पर्यटक, जिज्ञासू आले. गावातील कुतूहल जागृत झालेली लोकं वेगळेपणा पाहायला आली. लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्या असल्याचे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.

        जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने आयोजित ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे जयंती व पर्यावरण कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वनविभाग पालघरचे सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर म्हस्के, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहमदनगरचे उप-प्रादेशिक अधिकारी चद्रकांत शिंदे, कोकणातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, पर्यावरणप्रेमी विलास महाडिक, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे होते. वाटेकर म्हणाले, ‘आपल्याकडे नदी कृतज्ञतेचे उत्सव व्हायला हवे आहेत. नद्यांच्या सांस्कृतिक संचितांच्या परिक्रमा व्हायला हव्या आहेत. नदी तिच्या काठाने संस्कृती निर्माण करते. असेच संस्था एक सांस्कृतिक जीवन निर्माण करत असते. मानवी सांस्कृतिक जीवन अधिक विशुद्ध व्हावं यासाठी तुरटीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. असे कार्यकर्ते ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेबांनी पर्यावरण मंडळाला राज्यभर मिळवून दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. 

        कितीही समजावले तरी लोकं उघड्यावर कचरा टाकतात. आम्हाला आमचे हक्क कळतात पण कर्तव्य समजत नाहीत. निसर्गाप्रतीची आमची अनास्था आजच्या आजच्या पर्यावरणीय समस्यांचे मूळ असल्याचे वाटेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात ‘वृक्षमित्र’ स्वर्गीय आबासाहेब मोरे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंडळातील सेवानिवृत्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आभार ज्ञानेश्वर कऱ्हाळे (नांदेड) यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यभरातील नंदूरबार, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, वर्धा, सोलापूर, लातूर आदी पंचवीसेक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

रविवार, २८ एप्रिल, २०२४

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती


        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी एक ‘गुरुजी’ घरातून आपल्या मोटारसायकलने नऊ वाजता निघाले. शाळा थोडीशी आडगावात असलेली. सकाळची एसटी येऊन गेली की रस्ता जणू निर्मनुष्य व्हायचा. जवळच्या बाजाराच्या गावातून जाणा-येणारा नशीबाने कोणी भेटला तरच आडगावात पोहोचणे शक्य होई. अन्यथा किमान पाच किमीची पैदल ठरलेली. त्यामुळे जातायेता कोणी पांथस्थ भेटला तर त्याला सोबत घेणे गुरुजींना नित्याचे झालेले. ‘त्या’ दिवशीही असंच घडलं. रस्त्यात लागणाऱ्या पुलाच्या पलिकडे उजव्या दिशेस एक महिला आपल्या १४-१५ वर्षांच्या लेकीला ‘चल लवकर चल लवकर’ म्हणत रस्त्याने फरफटत आणत होती. मुलीच्या तोंडातून फेस येत होता. गुरुजींच्या गाडीचा आवाज ऐकताच ती लगबगीने पुढे आली, ‘ लेकीला विषार झाला आहे. तिला वाचवा’. गुरुजींनी तातडीने त्या माय-लेकींना जवळच्या बाजाराच्या गावातील सरकारी दवाखान्यात आणले. मुलगी एव्हाना बेशुद्ध झालेली. सुदैवाने डॉक्टर भेटले. त्यांनीही तातडीने इंजेक्शन-सलाईन लावून उपचार केले. म्हणाले, ’अजून १०-१५ मिनिटे उशीर झाला असता तर काही खरं नव्हतं.’ गुरुजींनी त्या आईच्या हातात शंभराची नोट ठेवली आणि आपल्या शाळेच्या वाटेने निघून गेले. शाळेत पोहोचायला अर्थात अर्धा दिवस उशीर झाल्याने त्यांनी रस्त्यात घडलेला प्रकार सांगितला. घटना ऐकून एक सहकारी म्हणाले, ‘त्या बाईंना वाडीने वाळीत टाकले आहे. तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे कसे नेलेत. लोकांना समजले तर तुम्हाला काय म्हणतील?’ विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्याध्यापकांनी गुरुजींना अर्धा दिवस रजा टाकू दिली नाही. दुसऱ्या दिवशी मुलीच्या आई शाळेत आल्या. त्यांच्या हातात एक नारळ आणि त्या शंभर रुपयातील शिल्लक राहिलेले पैसे होते. अर्थात गुरुजींनी पैसे परत घेतले नाहीत. अलिकडच्या काळात एखाद्या गुरुजीचं जगणं आपल्याला आपलं वाटावं, सर्वांपरिचं ते जगणं आपण आपल्या काळजात साठवून ठेवावं याची निरंतर जाणीव करून देणारे एक ‘दुर्मीळ गुरुजी’, कोकणातील चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख विलास दत्ताराम महाडिक आज (३० एप्रिल २०२४) सेवानिवृत्त होत आहेत.

आजकाल दुर्मीळ झालेल्या नैतिकतेचा, बर्‍यावाईटाचा विचार करणारा, काटेकोर, पापभीरू, अत्यंत आस्थेवाईक गुरुजी अशी विलास दत्ताराम महाडिक (गुरुजी) यांच्याविषयी मागील १८-२० वर्षांतील सहसंबंधातून आमची धारणा बनलेली आहे. संभ्रमाच्या वर्तमानात कोणीही कधीही स्वच्छ मनाने साद घालावी नि अवांतर काहीही न सांगता महाडिक गुरुजींनी साथ द्यावी. गुरुजींचं हे वागणं त्यांना जवळून ओळखणाऱ्या आणि अनुभवणाऱ्या अनेकांना अंगवळणी पडलेलं आहे. ‘विश्वास’ शब्दाचा अर्थ समजावून सांगणारी फारच कमी माणसं दुनियेत शिल्लक असताना जगण्याची आस्थेवाईक समज असेलेले महाडिक गुरुजी सामाजिक आशेचे बलस्थान आहेत. सेवानिवृत्ती निमित्त गुरुजींचा आज जाहीर सत्कार होतोय. त्यांची निवृत्ती शासकीय सेवेतील असून भविष्यात ती कृतिशील पर्यावरण जनजागरणासह सकस समाज निर्मितीच्या विविध विषयांत झोकून देऊन कार्यरत होणारी ठरावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत.

निवृत्त ‘ग्रामसेवक’ वडिल दत्तात्रय (आबा) आणि आई सौ. सुषमा या उभयतांचे सामाजिक भान, संयमित जीवन जगण्याची पद्धती, कुणाला फारसं न दुखावता कुटुंबाला एकत्र ठेवण्याची हातोटी गुरुजींनी जशीच्यातशी उचलली आहे. सदा हसतमुख चेहरा, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट पटली नाही तरीही घाईघाईने व्यक्त न होण्याची सवय, सर्वांशी सहज जुळवून घेण्याची हातोटी या गुणांचे धनी असलेले महाडिक गुरुजी हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

५ एप्रिल १९६६ रोजी निवळी (चिपळूण) गावी महाडिक गुरुजींचा जन्म झाला. संत गाडगेबाबांच्या विचारांचे पाईक, ग्रामसेवक वडील दत्ताराम आणि आई सौ. सुषमा यांच्या मायेच्या सावलीत चिपळूण तालुक्यातील निवळी गावात त्यांचे नि छोटी बहिण स्मिता आणि भाऊ विकास यांचे बालपण गेले. गुरुजींच्या बालपणी, एकत्र कुटुंब पद्धतीतील घरची आर्थिक स्थिती मध्यम होती. त्यांचे बालपण आनंदात गेले. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची शाळा घराजवळ होती. पुढील हायस्कूल शिक्षणासाठी त्यांना तुरंबव गावाची आठ किमीची दैनंदिन पायपीट करावी लागली. दहावीनंतर पुन्हा पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. कॉलेजची सोय सावर्डे आणि चिपळूणला होती. वडीलांच्या सुचनेनुसार गुरुजींनी कॉमर्सचा पर्याय निवडला. गावातून चिपळूणला डी.बी.जे.तील कॉमर्स कॉलेजच्या वर्गांच्या वेळेनुसार जाणाऱ्या एस्.टी. बसेस उपलब्ध होत्या. दैनंदिन प्रवासासाठी लागणाऱ्या एस्.टी.च्या पासचे पैसे मिळवण्यासाठी गुरुजींनी चिपळूणला काही हॉटेलात घरातील अतिरिक्त दूध दैनंदिन पोहोचवण्याचे काम सुरु केले. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान सावडर्याला सहयाद्री शिक्षण संस्थेने डी.एड्. कॉलेज सुरु केले होते. सावर्डे ते निवळी अंतर आठ किमी होते. आर्थिक अडचणींमुळे हॉस्टेलमध्ये राहाणे अशक्य होते. वडिलांनी गुरुजींना सायकल घेऊन दिली. रोजच्या १६ किमी. सायकल प्रवासासह गुरुजींचे डी.एड. शिक्षण सुरु झाले. या प्रवासाने त्यांना खूप थकून जायला व्हायचं. पहाटे लवकर उठून आई डबा करून द्यायची. आईनं कितीही देऊ केलं तरीही सायकलचा प्रवास आणि दिवसभराच्या कॉलेजसाठी तो अपुरा पडायचा, पण इलाज नव्हता. गुरुजींनी जिद्दीनं जुलै १९८६मध्ये डी.एड. पूर्ण केलं. त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात खेड तालुक्यातील जि. प. शाळा शिंगरी येथून प्राथमिक शिक्षक म्हणून शिक्षकी पेशास प्रारंभ केला.

शिंगरीतील नोकरीच्या सुरुवातीच्या पहिल्या स्वतंत्र जगण्यात निवळीहून निघताना गुरुजींनी आईकडून भात बनवण्याची पद्धत विचारून लिहून घेतली होती. पण प्रत्यक्ष कृती करताना भात ढवळावा लागतो हे कृतीत न लिहिल्याने लक्षात आलं नाही आणि भातातील पाणी आटलं. भात कच्चा राहिला, थोडासा करपलाहि ! सुरुवातीच्या टप्प्यावर हा अनुभव आलेल्या गुरुजींनी जीवनात यथावकाश उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक तर मिळवलाच पण कृषी पर्यटन आणि त्या अनुषंगाने केटरिंग सर्व्हिसमध्येही स्वतःला सिद्ध केलं. तर, शिंगरीतील जेवणाचे हाल बघून वडिल आबांनी गुरुजींची बदली चिपळूणला व्हावी म्हणून धडपड सुरु केली. त्याला यश आलं. गुरुजींची पेढे पाणकरवाडीत (३१ डिसेंबर १९८६ - १३ सप्टेंबर १९९५) बदली झाली. ‘मुख्याध्यापक’ मोरेश्वर महादेव परांजपे गुरुजींसारखे मार्गदर्शक-गुरु लाभले. परांजपे गुरुजींनी महाडिक गुरुजींना स्वतःच्या मुलासारखे प्रेम देऊन सांभाळले. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजासाठी आपण काम केले पाहिजे.’ ही शिकवण त्यांना परांजपे गुरुजींनी स्वतःच्या कृतीतून दिली. इथल्या प्रदीर्घ सेवेनंतर गोवळकोट मराठी (१४ सप्टेंबर १९९५ – १३ सप्टेंबर १९९६), उक्ताड (१४ सप्टेंबर १९९६ – ३० नोव्हेंबर २०००), गुहागर तालुक्यातील मासू, (१ डिसेंबर २००० – २३ जुलै २००२) आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळा उक्ताड येथे २४ जुलै २००२ ते ६ डिसेंबर २०२३ पर्यंत गुरुजींनी काम केले. डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ निवृत्तिअखेर ते चिपळूण तालुक्यातील खेण्ड आणि शिरळ या दोन केंद्रांचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत राहिले. दरम्यान, महाडिक यांनी जुलै १९९२मध्ये  बी.ए. तर २००१साली बी.एड. हे व्यावसायिक पदवी शिक्षण पूर्ण केले होते.

महाडिक गुरुजींचे वडिल दत्ताराम‘आबा’ हे सरकारी कर्मचारी असल्याने घरात सतत सुरु असलेल्या गावातील सामाजिक कार्याच्या चर्चांचा आणि लोकांच्या सततच्या ‘ये-जा’चा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला होता. त्या पायावर गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक, ग्रंथचळवळ, सामाजिक आणि पर्यावरणीय कामाच्या वर्तमान वाटचालीत पत्नी सौ. नूतन यांचा सिंहाचा वाटा असल्याचे ते नमूद करतात. घरची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळल्याने ते काम करता आल्याची त्यांना जाणीव आहे. गुरुजींचे पूर्वज निवळीतील तीन गावाच्या देवस्थानचे मानकरी होते. ग्रामदेवतांचे कपडे धुण्याचा मान परंपरेने त्यांच्या कुटुंबीयांकडे असलेला. पूर्वजांनी गावात शेती सांभाळली. आजोबा मुके होते. त्यांना पाच मुलगे आणि तीन मुली. आर्थिक परिस्थिती हालाखीची. आजोबा हे पंचक्रोशीत ‘वैदू’ म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र मुके असल्याने त्यांना जवळचे ज्ञान कोणाला देता आले नाही.

आपले सामाजिक भान उत्तम राखताना महाडिक गुरुजींनी विविध सामाजिक चळवळीतही सक्रीय सहभाग नोंदवला आहे. शिक्षण विभागातर्फे ‘सर्वधर्मसमभाव’ संकल्पनेवर आधारित त्यांनी सादर केलेल्या मुकनाट्य या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हास्तरीय केंद्रप्रमुख संमेलन, विभागीय स्तर आणि राज्यस्तरावर क्रमांक मिळाला होता. २००२मध्ये त्यांनी शहरात जुनी नाणी, नोटा आणि ३६० देशातील विविध तिकीटांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात सक्रीय सहभाग घेतला. शहरातील हजारो लोकांनी हे प्रदर्शन पाहिले. आवड असत्यामुळे गुरुजींनी आपल्या घराजवळ नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस, शेवगा तसेच फुलझाडे गुलाब, जास्वंद, जाई, जुई, मोगरा, लिली, कृष्णकमळ, ब्रह्मकमळ, विविध तळ्यातील कमळे, बेल, शमी आणि विविध ‘शो’च्या झाडांची लागवड केली. किराणा दुकानासह रोपांची नर्सरी उभारली. यातूनच पुढे त्यांनी घराला कृषी पर्यटनाचा साज चढवला. त्यांचे घर आणि बगीचा तालुक्यातील पहिले अधिकृत कृषी पर्यटन केंद्र ठरले. बालपणीची छायाचित्रणाची आवड त्यांनी जाणीवपूर्वक व्यवसायात बदलली. हाही व्यवसाय त्यांनी इतक्या तत्परतेने केला की दैनिक तरुण भारतने आपल्या ‘ध्यास’ छायाचित्र प्रदर्शनात जिह्यातील मान्यवर छायाचित्रकारांत त्यांच्या निसर्ग चित्रांची निवड केली होती. कोणतेही काम अगदी मनापासून करण्याची त्यांची सवय जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या पदरात काही सकस देऊन जात राहिली आहे.

महाडीक गुरुजी हे आपल्या पर्यावरणीय जनजागरणाच्या कामामुळे महाराष्ट्रातील एक उपक्रमशील पदवीधर प्राथमिक शिक्षक-मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख म्हणून परिचित राहिले आहेत. गुरुजींनी सुरुवातीच्या काळापासून पर्यावरण विषयाची आवड जोपासली होती. शेतीविषयक ज्ञानजागरण, वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी मार्गदर्शन, परिसरातील स्थानिक वृक्ष प्रजातींच्या बीयांचे संकलन, शाळेच्या आणि १९९८ पासून घराच्या रोपवाटीकेत रोपांची निर्मिती करून शाळेतील विदयार्थी व समाजामार्फत, विविध संस्था-मंडळांमार्फत वृक्षदिंडी, वृक्षारोपण, जागतिक पर्यावरण दिन, कृषिदिन, पर्यटनदिनी महिलामंडळे, तरुणमंडळे, तंटामुक्ती कमिटी, शिक्षक संघटना आदींच्या सहकार्याने रस्त्यांच्या कडेला व ओसाड डोंगरावर रोपण, रोपांचे वितरण, २००५, २०२१ मध्ये चिपळूणला आलेल्या महापूरप्रसंगी मजरेकाशीसह विविध ठिकाणच्या पूरग्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर, विविध शाळकरी मुलांना वह्या, दप्तरे, पुस्तके, कपडे आणि धान्यवाटप केले होते. महिला मंडळांकडून हळद लागवड, भाजीपाला लागवड करून त्यापासून चांगले उत्पन्न मिळते, हे पटवून दिले. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्र प्रदर्शन भरवून स्थानिक लोक व विदयार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन चिपळूण पंचायत समितीने आपल्या मासिक सभेत अभिनंदनाचा ठराव केला होता. विदयार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी यासाठी सातत्याने वनभोजन आणि पर्यावरण सहलींचे आपल्या कार्यकाळात गुरुजींनी आयोजन केले. शाळेतील विद्यार्थांना पर्यावरणीय अनुभूती प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक समयोचित पर्यावरण ज्ञान आपल्याजवळ सक्षमतेने असायला हवं यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील राज्यव्यापी पर्यावरणीय उपक्रमांची वाट धरली.

शिक्षकी पेशात कार्यरत राहताना, शाळेशी होणारा प्रत्येक पत्रव्यवहार जबाबदारीने हाताळणाऱ्या गुरुजींना एका पत्रव्यवहारातून वृक्षमित्रआबासाहेब मोरे भेटले. २००० साली ते ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या संपर्कात आले. आबासाहेब मोरे हे ‘पद्मभूषण’ अण्णासाहेब हजारे यांच्या विचारकार्याने प्रभावित राज्यात पर्यावरण संवर्धन जनजागरणाचे काम करत होते. त्यांच्यासोबत गुरुजींच्या पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीच्या कामाला अधिक गती मिळाली. इतकी की, महाडिक गुरुजींसारखा उमदा सक्रीय सहकारी भेटल्यावर आबासाहेबांनी त्यांच्यावर निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. महाडिक गुरुजी अधिक क्षमतेने कार्यरत झाले. पावसाळ्यात शालेय मुलांकडून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड ,डोंगरभागात बीज पेरणी उपक्रम, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय पर्यावरण विषयक निबंध आणि रंगभरण स्पर्धेचे आयोजन, बक्षिस वितरणाच्या मुख्य कार्यक्रमाचे चिपळूण येथे आयोजनात सक्रीय भूमिका बजावली होती. राज्यभरातील पर्यावरण या विषयात काम करणारे शिक्षक, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांना वेगळा दृष्टीकोन मिळावा म्हणून राळेगणसिद्धीसह विविध ठिकाणी मंडळाची आजवर आठ पर्यावरण संमेलने यशस्वी होण्यात महाडिक गुरुजींचे योगदान आहे. चिपळूणच्या या पदवीधर प्राथमिक शिक्षकाने राळेगणसिद्धीच्या मातीसह सर्वदूर संपन्न झालेल्या सात पर्यावरण संमेलनांत दिलेले योगदान त्यांच्या सहकारी शिक्षकांनी त्या-त्या ठिकाणी स्वतः येऊन अनुभवले आहे, त्याला दादही दिलेली आहे.

त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे 'वणवामुक्त ग्राम अभियान' राबवण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर केला. चिपळूण येथे २०१३ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात पर्यावरण विभाग व पर्यावरण दिंडीच्या कामात सहभाग घेतला. ‘वनश्री’ या पर्यावरण विशेषांकाचे संपादक म्हणून काम पाहिले. वृक्षमित्रआबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मंडळाचे, राज्यातील दुसरे बिगरमोसमी जंगलपेर अभियानचिपळूणला संपन्न झाले. त्या कार्यक्रमात चंदनतज्ज्ञ वनश्रीमहेंद्र घागरे भेटले नि ‘रत्नागिरी जिल्ह्यात चंदनाचा सुगंध दरवळावा’ म्हणून आम्ही दोघांनी अभियान सुरु केले. ते ५/६ वर्षे चालवले. गुरुजी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून, जिल्हाध्यक्ष विजयराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शालेयस्तरावर ७५ लाख बीज पेरणी अभियान संपन्न झाले. आजही कोकणातील वेगवेगळ्या गावातील देवराया, नदीकिनारे, रस्त्याच्या दुतर्फा, पर्यटनस्थळी, स्मशानभूमी परिसरात आमचे वृक्षारोपण-संवर्धन उपक्रम सुरु असतात.

गुरुजींनी शिक्षकी पेशाच्या सुरुवातीच्या दीडेक दशकात, स्थानिक वर्तमानपत्रे, स्मरणिका आणि मासिकातून शिक्षण, पर्यावरण विषयावर विपुल लेखन केले. ग्रंथचळवळ वाढावी, समाजातील चांगल्या लेखकांना पुस्तकरूपी व्यासपीठ उपलब्द्ध व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्षम अर्धांगिनी, सौ नूतन वहिनींच्या सहकार्याने त्यांनी २००७साली चिपळूण तालुक्यातील पहिले निसर्ग पर्यटन केंद्र सुरु केले. पर्यटन विषयात चिपळूणात कार्यरत असणाऱ्या रामशेठ रेडीज, प्रसाद काणे, कैसर देसाई, मिलिंद कापडी, समीर कोवळे, धीरज वाटेकर आदींचे सहकार्य त्यांना लाभले होते. आपल्या राहात्या घराला नुसते ‘कृषी पर्यटन केंद्र’ करून भागणार नाही हे लक्षात येताच पर्यटन केंद्र सर्वदूर पोहोचवण्यासाठी गुरुजींनी २००८ साली, आमच्या मनातील चिपळूण तालुका पर्यटन पुस्तकाची कल्पना उचलून धरली. आमच्यासह सहकारी मित्र समीर कोवळे याच्या लेखनाला पहिले पुस्तकीय कोंदण प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. पत्नी सौ. नूतन यांच्या सहकार्याने सुरु केलेल्या चिपळूण तालुक्यातील पहिल्या श्री परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्रातर्फे धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांच्याकडून ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे पर्यटनाची इत्यंभूत माहिती असलेले पुस्तक लिहून घेतले आणि प्रकाशित केले. विशेष म्हणजे या पुस्तकाच्या आजवर जवळपास तीन हजार प्रती वितरीत झाल्यात. नामवंत इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर, कोकणचे बुद्धिवैभव स्वर्गीय नानासाहेब जोशी, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत लेखक प्र. के. घाणेकर, इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णासाहेब शिरगावकर, प्रख्यात इतिहास संशोधक स्व. श. गो. धोपाटे यांसारख्या नामवंतांचे मिळालेले आशीर्वाद त्या पुस्तकाचा वेगळेपणा सांगण्यास पुरेसे आहेत.

२०१४-१५ साली पर्यावरण-पर्यटन विषयातील गुरुजींच्या अभ्यासू मनाने उचल खाल्ली. संधी मिळाली. नि आमचे त्यांच्या सहकार्याने ठोसेघर पर्यटनहे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आम्ही दोघे जवळपास दीड वर्षे चिपळूण-सातारा-सज्जनगड-ठोसेघर असा निसर्गरम्य प्रवास करत होतो. या प्रवासातील अनुभव हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. गुरुजींमधील निखळ आयुष्य जगणारा अवलिया म्हणजे ‘आयुष्य जगलेला गुरुजी’ आम्हाला खऱ्या अर्थाने तेव्हा पहिल्यांदा भेटला. पुढे या पुस्तकाला कोल्हापूरच्या चंद्रकुमार नलगे ग्रंथ पुरस्काराने गौरविण्यात आले. लेखन चळवळ वाढावी म्हणून ते सतत कार्यरत असतात. आमच्या सोबत अनेक विशेषांकांचे संपादन करण्यात त्यांचे योगदान आहे. आपले गुरु प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगीमो. म. परांजपे गुरुजी यांची जीवनकथा प्रकाशित व्हावी म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम सर्वश्रुत आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांनी, विलासरावांच्या गुरुदक्षिणाया लेखनाबाबत म्हटले होते, ‘गुरुदक्षिणा या कृतज्ञ अक्षरपूजेत गुरुजी श्री. विलास महाडिक यांनी कर्मयोगी परांजपे गुरुजींबद्दल जे उत्कटतेने लिहिले आहे ते मनोगत सध्याच्या तरुणांनी व विशेषतः शिक्षकांनी मन:पूर्वक वाचले तर प्राथमिक शिक्षक आपल्या अत्यंत मर्यादित कार्यक्षेत्रात किती अमर्याद काम करू शकतो हे लक्षात येईल.अधिक काय लिहावे? कोकणचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर (व्रतस्थ, शेवचिवडा, सिंहावलोकन, गेट वे ऑफ दाभोळ) आणि कोकण पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांची ८-१० पुस्तके त्यांनी आजवर प्रकाशित व वितरीत केली. महाडिक गुरुजी यांनी आपले वडिल दत्ताराम(आबा) महाडीक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’, शिक्षकी पेशातील ‘गुरु’ मोरेश्वर महादेव परांजपे यांची जीवनकथा ‘प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी’ या नावाने लेखक धीरज वाटेकर यांच्याकडून लिहून घेतली. आम्ही लिहिलेले, कोकणातील पहिल्या ‘मेडिकल सोशल वर्कर’ कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थिनी’ चरित्र प्रकाशित केले.

गुरुजींनी आपल्या अंगभूत कलात्मक गुणांच्या बळावर प्राथमिक शिक्षकी पेशाला आकार दिला. प्रतिकूल परिस्थितीतून जीवनाचा मार्ग शोधला. आज त्यांच्या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल वाटणारा जिव्हाळा याचेच द्योतक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत प्राथमिक शिक्षण घेण्याची प्रक्रिया आज मंदावलेली जाणवते. पण तत्पूर्वीच्या दशकभराच्या कालावधीत गुरुजींनी आपल्या शालेयस्तरावरील जबाबदारीला सर्वस्व झोकून देत न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना चार भिंतींच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याची त्यांची पद्धत अनुकरणीय आहे. प्रसंगी पदरचं खर्चून, आपल्या विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना समजाव्यात म्हणून ते सतत आघाडीवर राहिले. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे आजही त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते याची साक्ष देण्यास पुरेसं आहे. ज्यांनी आजवर कधीही विशेष म्हणावा असा प्रवास केलेला नसेल अशा उपेक्षित-वंचित घटकातील मुलांना आपल्यासह मोजक्या सामजिक योगदानातून सातत्याने निसर्गात घेऊन जाणारा, चिपळूणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांच्या सहकार्याने राज्याची राजधानी मुंबईचे शालेय विद्यार्थ्यांना बालवयात दर्शन घडविणारा अवलिया म्हणजे विलास महाडिक गुरुजी! मोलमजुरी निमित्ताने कोकणात आलेल्या बहुभाषिक पालकांच्या शाळाबाह्य लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत शाळेची गोडी लागावी या उद्देशाने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे गुरुजी म्हणूनही महाडिक गुरुजी विद्यार्थीप्रिय आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी कार्यानुभव, कला, मनोरंजक खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला, कौशल्य आणि कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात वारली कला, अक्षरलेखन, भेटकार्ड, मातीकाम, रंगकाम, खाद्ययात्रा भरविणे, उन्हाळी छंद शिबिर, प्लास्टीकचा पुनर्वापर करून रोपकुंड्या, टाकाऊ पुठ्ठ्यांपासून साहित्यनिर्मिती केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. अनेकदा सुट्टीच्या दिवशी रविवारी महाडिक गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याच चारचाकीमधून कुठेनाकुठे घेऊन जात असताना आम्ही पाहिलेत. यात विविध स्पर्धांपासून मनोरंजनाच्या सकस उपक्रमांचा समावेश आहे.

गुरुजींनी १९८९ ते १९९१ या तीन वर्षांत सलग तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शनात आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून दिला. शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनात १९९०-९१, १९९६-९७-९८या तीन वर्षांत प्रथम क्रमांक पटकाविला. साक्षरता आंदोलनामध्ये ते मास्टर ट्रेनर, एस.एस.सी. परीक्षेसाठी सहाय्यक उपपरीक्षक म्हणून कार्यरत होते. महाडीक गुरुजी यांनी आपल्या कार्यरत शाळांच्या शैक्षणिक सोईसुविधासाठी खूप प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सलग तीन वर्षे त्यांना गोपनीय 'अतिउत्कृष्ट' शेरा देऊन गौरविण्यात आले होते. याखेरीज स्मार्ट पी.टी. प्रशिक्षणातील मूकअभिनय, पल्स पोलिओ, साक्षरता अभियान, कुटुंब कल्याण आदी कामासाठी शासनाने गौरविले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर जात आपल्यातील क्रयशक्तीला अधिकचे सकस काहीतरी हवे आहे, याची जाणीव झालेल्या गुरुजींनी शिक्षणासोबतच आवडत्या सामाजिक, पर्यावरण आणि पर्यटन या क्षेत्रात काम केले. जे जे सत्य नि चांगलं, ते ते सारं आपलंया न्यायाने, त्यांनी अनेकविध समाजाभिमुख उपक्रमांना आपलसं केल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. शैक्षणिक कार्यकाळात त्यांची एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात अचानक बदली झाली होती. यामुळे त्यांना मनस्ताप, आर्थिक तोटा, रोजचा ११० कि.मी. दुचाकी प्रवास आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. पण शांत वृतीने त्यांनी यावर मात केली. अनेक ‘ज्येष्ठ’ शिक्षक रांगेत उभे असताना वयाच्या ३५व्या वर्षी त्यांची जि. प.च्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्यातून एकमेव निवड झाली होती. आपल्या सातत्यपूर्ण उपक्रमशील शिक्षकी वर्तनातून शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारही निवृत्तीपूर्वी सतरा वर्षे अगोदर मिळवून महाडिक गुरुजींनी जिल्हास्तरावरील पुरस्कार पटकावतानाचा शिरस्ता कायम ठेवला होता.

गुरुजींना महाराष्ट्र शासनाने जिल्हा व राज्यस्तरीय (२००६-०७) आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना आजवर आदर्श शिक्षक (नगरपरिषद, लायन्स क्लब व रोटरॅक्त क्लब चिपळूण), पर्यावरण मित्र (श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषि सेवा ट्रस्ट अहमदनगर), कलागौरव (मयूर आर्ट अकादमी परळी वैजनाथ), कलाश्री (कलांजली कला महोत्सव), पर्यावरण रक्षक (पर्यावरण व सामाजिक प्रदूषण निवारण महामंडळ), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप (अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ), भाषारत्न (राष्ट्रभाषा हिंदी प्रचार परिषद सिंधुदुर्ग), राष्ट्रचेतना गौरवमूर्ती (राष्ट्रचेतना पब्लिकेशन जळगाव), अखिल भारतीय प्रतिभा सन्मान, पर्यावरण भूषण (ग्रामीण मानव विकास प्रतिष्ठान व माय अर्थ फाउंडेशन), उपक्रमशील कलाध्यापक (सानेगुरुजी प्रबोधिनी चिपळूण), श्री गणेश गौरव (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूण) आदी पन्नासेक राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

निवृत्ती आली की आयुष्याची संध्याकाळ आली असं म्हटलं जातं. मात्र न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनया वैद्यकीय नियतकालिकाच्या मे २०२३च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार आपण ज्या क्षेत्रात आहोत तिथे सर्वाधिक उत्तम कार्यक्षमतेचा काळ हा साठी आणि सत्तरीत असतो असे नोंदवण्यात आले आहे. मनुष्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार्यक्षमता वयाच्या ७० ते ८० या दशकादरम्यान असते. ५० ते ६०च्या दशकाचा क्रमांक त्यानंतर लागतो असे नमूद आहे. निवृत्तीची अट नसलेल्या वकिली, लेखन, लेखपाल अशा क्षेत्रांत कित्येक लोक ऐंशीव्या वर्षी सक्रिय व कामातली गुणवत्ता टिकवून आहेत. सतत कार्यमग्न राहणे हाच यशस्वी जीवन जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आमचे आणि महाडिक गुरुजींचे ‘मार्गदर्शक’ प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्व. अण्णा शिरगावकर हेही वयाच्या ९३व्या वर्षी आगामी ग्रंथलेखनासाठीच्या संदर्भांची जुळवाजुळव करत असलेले आम्ही पाहिलेत. प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणणे, समाजातील सर्व घटकांना जमेल तेवढी मदत करणे, गरजूंना सहकार्य करणे, आपल्यासोबतच्या सहकाऱ्यांना आपल्यासोबत पुढे घेऊन जाण्याची कला, कोणाला विशेष विरोध न करणे, निसर्गाची आवड, झाडांची जोपासना, परसबाग, फोटोग्राफी, संग्राहकवृत्ती, संगीताची आवड, दुर्मीळ आणि औषधी वनस्पतींची लागवड, शांत व नम्र स्वभावामुळे महाडिक गुरुजी सर्वदूर पोहोचले. संकटात सापडलेल्यांना शक्यति मदत, सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग, टाकावूतून टिकावू वस्तू बनविण्याचे कौशल्य, शोधकवृत्ती, समानता, स्वच्छता, टापटीप यांमुळे गुरुजींचे व्यक्तिमत्त्व अनेकांत उठून दिसते.

स्वच्छंदी जीवन जगणारे महाडिक गुरुजी गेली दोन दशके आम्ही पाहातोय. ‘आयुष्य हे माणसाला मिळालेले एक वरदान आहे. त्याचा यथार्थ उपयोग करून घेता आला पाहिजे. आयुष्यात मी हे पाहिले नाही. मला हे माहिती नाही असे होता कामा नये. सर्व गोष्टींचा मर्यादित आनंद लुटता आला पाहिजे. सगळ्याच गोष्टीत यश नाही मिळाले तरी चालेल पण खचून न जाता प्रयत्नवाद जीवंत ठेवला पाहिजे. जीवनात सुख-दुःख, यश, अपयश या सर्वांना समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी असली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत इप्सित साध्य करण्यासाठी अत्यंत कष्टाने व नेटाने आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती, ताकद आपल्यात असली पाहिजे.’ ही विलास महाडिक गुरुजींची जगण्याची भूमिका सर्वस्पर्शी आहे. प्रत्यक्ष मेहनतीतून, श्रमातून, ध्यासातून यशाचं फूल उमलतं. या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवल्याने आपण इथवर मजल मारू शकल्याचे गुरुजींना वाटते. ‘आपल्या यशाची बलस्थाने सांगताना ते तीर्थरूप आई-वडिल, आदरणीय गुरुवर्य महादेव मोरेश्वर परांजपे (गुरुजी), शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना लाभलेले सहकारी मित्र, मार्गदर्शक अधिकारीवर्ग आणि कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात’ जे त्यांच्यातील माणूसपण दर्शवणारे आहे. गुरुजींची आजची ‘सेवानिवृत्ती’ आगामी विविधांगी आणि ठोस सामाजिक कामासाठी पूरक ठरो, या शुभेच्छा !

धीरज वाटेकर चिपळूण

बुधवार, २७ मार्च, २०२४

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (२७ मार्च) मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी कोकणातील चिपळूणच्या खेण्ड हद्दीतून मार्गक्रमण करणारी ग्रामदेवता (मिरजोळी) श्रीमहालक्ष्मी साळूबाईची शिमगा पालखी आमच्या ‘विधिलिखित’ निवासस्थानी ५०१ श्रीफळांच्या तोरणावर विराजमान झाली. वर्षभराचे कष्ट करण्यासाठी लागणारी नवीन उमेद, ऊर्जा देण्यासाठीच देव अंगणी आल्याचा आनंद झाला.

शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात जणू संचारतं. शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते. कोकणी लोककला, सोंगं दिसायला लागतात. कोकणात गावोगावी शिमगोत्सवात ग्रामदैवतं पालख्यात बसून माणसाच्या भेटीला येतात. दारोदारी पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच पालख्या फिरतात. पालखीचा मार्ग, वेळ, तपशीलवार नियोजन पूर्व प्रसिद्ध होत असते. त्यामार्गावर, आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून, सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगून लोकं श्रद्धेने पालखीच्या दर्शनासाठी उभे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजत असते. अलीकडे तिला पर्यटनाचे कोंदण मिळू लागले आहे. शिमग्याच्या दिवसांत देवही देऊळ सोडून भक्तांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आलेले असतात. कोकणी माणसांना गावापासून मुंबई-पुण्यासह जगभर काबाडकष्ट करण्यासाठी लागणारी वर्षभराची ताकद, कुटुंबियांना आधार देण्यासाठीचा आत्मविश्वास शिमग्यातून मिळत असतो. देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला कोकणी मनुष्य आपल्या अडचणीची थेट विचारणा करतो. त्याला आपल्या ग्रामदेवतेवर भरवसा असतो, त्याला ग्रामदेवतेचा आधार वाटतो. आपल्या ग्रामदेवतेकडून मिळालेले संरक्षण त्याला महत्वाचे वाटते. जगाच्या पाठीवर कोकणातील गावगड्याचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

अशा या ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पाहात रात्र जागावी लागते तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते. कोकणातील शिमग्यात गावोगावी ज्या प्रथा-परंपरा, रितीभाती आणि लोककललांचं दर्शन होतं ते 'बकेटलिस्ट'मध्ये ठेवून प्रत्येकानं एकदातरी 'याचि देही...' जरूर अनुभवावं. कोकण पर्यटन आपली वाट पाहातंय.

धीरज वाटेकर चिपळूण

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...