शनिवार, ५ एप्रिल, २०२५

कोकणच्या सांस्कृतिक बंधातील उमाळा



            कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला की त्याच्यातल्या ‘कोकणी’ जाणीवा अलगद फुलत जातात. या फुललेल्या जाणीवांसहच्या विचार-कृतीतून अनेकजण एकत्र येतात. एकत्र आलेली माणसं लाल मातीच्या ओढीनं जोडली जातात. एक साखळी तयार होते. मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी, त्या नात्याचं ऋण फेडण्यासाठी अशी माणसं सतत आयुष्यभर कार्यरत राहतात. चाकरमान्यांनी पाहिलेलं गाव विकासाचं स्वप्नंही अशातूनच साकार होत जातं. डोळस नजरेनं पाहिलं तर मातीशी असलेलं हे असं नातं सांगणाऱ्या अनेक कहाण्या कोकणातल्या गावागावात सतत घडत असतात. या साऱ्यामागे इथल्या मातीशी माणसाचा असलेला हृदयस्थ आंतरिक उमाळा, इथल्या देवदेवतांचे उत्सव आणि संस्कृतीचे बंध दडलेले असतात. कोकणच्या या सांस्कृतिक बंधात दडलेल्या उमाळ्याचा हा धांडोळा!

बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. पण मातीची नाळ पिढ्यांशी जुळलेली असते. म्हणूनच मातीला / जमिनीला आई म्हणत असावेत. तिच्या दर्शनाचा सोहोळा सर्वांगसुंदर ठरतो. ताठ कण्याचा आणि निधडय़ा छातीचा, बापाच्या जागी असलेला सहय़ाद्रीसारखा पाठीराखा, तांबडय़ा मातीत खेळ मांडून एकमेकांच्या गळाभेटीसाठी आसुसलेली, फळांफुलांनी युक्त वृक्षसंपदा, तिच्या अंगाखांद्यावर खेळणारी रंगीबेरंगी पाखरं, वन्यजीव, निसर्ग नवलांची दुनिया, देवालये त्यातील अध्यात्म यातून इथल्या माणसांची जडणघडण झालेली आहे. ही संस्कृती जपणारा कोकणी माणूस शतकभरापूर्वी पोटापाण्यासाठी मोठाल्या शहरात जाऊ लागला. मनिऑर्डरवर जगणारा प्रांत अशी कोकणची ओळख खरंतर तेव्हापासूनची! पण या चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. गावागावातल्या जत्रा, मे महिन्याची सुट्टी, शिमगा-गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी पिढ्यानपिढ्या कोकणात येत राहिल्यात. नोकरीत वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा कोकणात जाण्यासाठी राखून ठेवणारी पिढी आजही आहे. हा या मातीचाच गुण म्हणावयास हवा!

कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस तेवढीच जाज्ज्वल्यही आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावगाडा हा न्याय, नीती, धर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालतो आहे. अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. कोकणात दैवी कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा कौल (गावपळण, यात्रोत्सव, देवतांचे उत्सव, गावाच्या चतु:सीमेतील विशेष कार्य) घेण्याच्या प्रथेतील ‘बारा-पाचाची देवस्की’ हे इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय आहे. बारा इंद्रिये व पाच पंचमहाभूते म्हणजेच बारा-पाच अशी संज्ञा आहे. ‘कौलप्रसाद’ म्हणजे देवाचे न्यायालय होय. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ, प्राणीमात्र, जीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी ‘गावह्राटी’ अतिशय व्यापक, सर्वहितकर, विविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय प्राचीन संकल्पना आहे. तळकोकणात हिचे आजही प्राबल्य आहे.  

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा जल्लोष देशभर साजरा होत असताना कोकणसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूर आलेला होता. अशातच त्या दिवशी, ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी रत्नागिरी तालुक्यातल्या तोणदे गावातील श्रीसांब मंदिरातल्या श्रावण नाम सप्ताहाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. कौलारू मंदिरात छातीपर्यंत पाणी भरलेले असताना छताच्या आढ्यावर बसून भाविक श्रीनामाच्या गजरात दंग झाले होते. कोकणातल्या उत्सवी उत्साहाची ही प्रातिनिधिक अनुभूती होती. हिंदू जीवन पद्धतीत मानवाला विष्णू चरित्र आवडल्यास त्याला वैष्णव होता येते. शिवाची उपासना केल्यास शैव होता येते. तसेच रामाची उपासना केल्यास रामभक्त, गणरायावर प्रेम केल्यास गाणपत्य होता येते. यासाठी मूळ ‘हिंदू’ जीवन पद्धतीचा त्याग करावा लागत नाही. 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' असं वचन आहे. म्हणजे शिव बनून शिवची पूजा करावी अर्थात देवस्वरूप होऊन राहावे. ही फार मोठी वैश्विक उपलब्धी हिंदू संस्कृतीत सामावलेली आहे.

गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण. एकवेळ वर्षभर नाही जमलं तरी चालेलं पण गणपतीत कोकण कमिंग मस्टच! कोकणात ‘गणपतीची शाळा’ असते. मुंबईत ‘कारखाना’ तर पुण्यात ‘चित्रशाळा’ असते. या गणपतीला शहरातून घरी येणाऱ्या चाकरमान्याचे सामान म्हणजे जणू ऐश्वर्यचं! काय-काय असतं त्याच्यात! सगळा संसारच सोबतीला आणलेला असतो. कोकणातील माणसांची श्रद्धाही जाज्ज्वल्य आहे. इथल्या ग्रामदेवतांचे लोकजीवनाशी असलेलं नातं भक्तीशी मर्यादित नाही. इथली दैवतं लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलेली आहेत. ही देवस्थाने आजही सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकसंग्रहाची केंद्रे आहेत. देवाला गाऱ्हाण घालणं, वर्षातून एकदा किमान शिमग्याला देवतेची ओटी भरणं, गावरहाटीचे नियम पाळणं सारं विलक्षण आहे. इथली दैवते माणसांशी बोलतात, संवादही साधतात! संवादाची प्रक्रिया सुशिक्षित माणसांना धर्मभोळेपणाची, अंधश्रद्धेची वाटत असेलही! पण गावात उभे आयुष्य घालविलेल्या माणसांना त्याच्या खडतर दैनंदिन जीवनात संवादाची हीच प्रक्रिया अनेकदा आधार देणारी वाटते. हे एकविसाव्या शतकातील जीवंत वास्तव आहे. इथल्या मातीशी दूरदेशीच्या माणसाचं जे नातं आजही टिकून आहे, त्यामागे ही कारणे आहेत. गूढरम्य गोष्टींचे भांडार असलेला कोकण भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘भूत’ ही संकल्पना खरी की खोटी? हा वेगळा विषय आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा इथल्या मातीवर पगडा आहे, हे नक्की! जगातील पुढारलेल्या अनेक देशांच्या प्राचीन दंतकथात डोकावल्यावरही आपल्याला हेच जाणवते.

कोकणात भातलावणी संपल्यावर घरोघरी गणपती येत असतात. तेव्हा इथला सर्वसामान्य शेतकरी मनुष्य मोकळा असतो. निसर्गसुंदर कोकणाने गणपती आणि त्यांची आई गौराई यांना जणू निसर्गदेवता मानले आहे. कोकणी आसमंतात तेरडा फुलायला लागला की गौरी-गणपतीचे दिवस जवळ आल्याचे मानले जाते. गणेशोत्सवाशी कोकणवासियांचे जीवाभावाचे नाते आहे. इथल्या माणसांना बाप्पा आपल्या घरातला वाटतो. ही माणसं बाप्पाची नुसती पूजाअर्चा नि आरत्या करत नाहीत. तर तो असेल तितके दिवस त्याच्याशी संवाद करत राहतात. त्याला आपली सुखदु:खे सांगतात. नवस-सायास करतात. वर्षभराची उर्जा उरी साठवून आपलं जीवन जगायला सिद्ध होतात. येणाऱ्या संकटांवर मात करत राहातात. कदाचित म्हणून कोकणी माणसं आत्महत्या करत नाहीत.

कोकणवासियांच्या मनातले बाप्पाचे रूप वेगळे आहे. आमच्यासाठी तो सुखकर्ता दुखहर्ता आहे. ‘यावर्षी बाप्पाला आरास कोणती करायची ?’ याचे काही महिने अगोदर सुरु होणारे नियोजन असो किंवा बाप्पाला मुक्यांनी पोहोचविण्यात काय अर्थ ? म्हणून त्यांच्यासमोर एकतरी भजन झालंच पाहिजे असं मानणारी कोकणची संस्कृती. कोकणवासिय बाप्पाच्या डोक्यावर पाने, फळे, फुले, वेली, कवंडाळं, आंब्याच्या डहाळ्याची जी ‘माटवी’ बांधतात. त्यामागे पर्यावरण संवर्धन संकल्पना आहे. पूर्वी रानावनात गुरांच्या मागनं फिरणारे गुराखी या कवंडाळाच्या वेली हेरून ठेवत असत. पडत्या पावसात रात्रीच्यावेळी जेवणावळी आटपल्यावर चिडीचूप झोपी जाणाऱ्या कोकणात या दिवसात वाड्या-वस्त्यांवर घराघरात आळीपाळीने कोणा बुवाची थाप अचानक ऐकू येते. भजनाचा साज ठीकठाक असल्याची खात्री झाली बुवांच्या आवाजाने भरून गेलेल्या वातावरणात सारे सखेसोबती बाप्पासमोर किंवा पडवीत जमा होतात. ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा आवाज रात्रीचा अंधार कापत वाड्या वस्त्या घुमवून काढतो. गणपतीच्या दिवसातला भक्ताचा पायरव अफलातून असतो. विसर्जनवेळी बाप्पासोबत दहीभाताचा नैवद्य दिला जातो. आपल्याकडे प्रवासाला निघणाऱ्या माणसाच्या हातावर चमचाभर दही देण्याची परंपरा आहे. पाहुण्याला विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ही त्यामागील भावना असते. कोकणात बाप्पा पाठोपाठ घरी येणाऱ्या आमच्या गौरीचं तेरडारुपी वास्तव्य पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असतं. सुवासिनी स्त्रिया व कुमारिका पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीची गौरी स्वरूप आवाहन पूजा करतात. गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढतात. कोकणातील अनेक गावात गौरी आगमनासाठी डोक्यावरील रोवळीत किंवा सुपात  हळद, तेरडा, आघाडा यांचे रोपटे घेण्याची प्रथा आहे. तेरडा वनस्पतीची गौराई कोकणात बघायला मिळते. परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष पूजा-साहित्य आणावे लागत नाही. कोकणात माळरानी, डोंगर उतारावर, शेताच्या बांधावर जांभळी, फिक्कट गुलाबी, तांबड्या, पांढऱ्या रंगांची ही तेरड्याची फुले सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. तेरड्याच्या फुलांचं आयुष्य पाच ते सात दिवस असते.

पुढे याच भाताची कापणी आणि मळणी संपल्यावर कोकणाला शिमग्याचे वेध लागतात. शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात जणू संचारतं. शिमग्याची पालखी त्याच्या डोक्यात नाचायला लागते. कोकणी लोककला, सोंगं दिसायला लागतात. कोकणात गावोगावी शिमगोत्सवात ग्रामदैवतं पालख्यात बसून माणसाच्या भेटीला येतात. दारोदारी पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच पालख्या फिरतात. पालखीचा मार्ग, वेळ, तपशीलवार नियोजन पूर्व प्रसिद्ध होत असते. त्यामार्गावर, आपापल्या घराजवळ रांगोळ्या घालून, सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगून लोकं श्रद्धेने पालखीच्या दर्शनासाठी उभे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजत असते. अलीकडे तिला पर्यटनाचे कोंदण मिळू लागले आहे. शिमग्याच्या दिवसांत देवही देऊळ सोडून भक्तांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आलेले असतात. कोकणी माणसांना गावापासून मुंबई-पुण्यासह जगभर काबाडकष्ट करण्यासाठी लागणारी वर्षभराची ताकद, कुटुंबियांना आधार देण्यासाठीचा आत्मविश्वास शिमग्यातून मिळत असतो. देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला कोकणी मनुष्य आपल्या अडचणीची थेट विचारणा करतो. त्याला आपल्या ग्रामदेवतेवर भरवसा असतो, त्याला ग्रामदेवतेचा आधार वाटतो. आपल्या ग्रामदेवतेकडून मिळालेले संरक्षण त्याला महत्वाचे वाटते. जगाच्या पाठीवर कोकणातील गावगाड्याचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावगाड्यातील ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पाहात रात्र जागावी लागते तेव्हा आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड सेवेची जाणीव होते. या काळातील कोकणी ‘लोककला’ इथल्या मातीला नवीन नाहीत. या लोककला लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. जात्यावरची ओवीगीते, बाळाला जोजवण्याची गीते, सण-उत्सवातील नृत्यनाट्ये, देवतोपासना म्हणून काढली जाणारी चित्रे, शिल्पे, रांगोळी हेही सारे पारंपरिक लोकजीवनाचा घटक आहेत. दशावतारी नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’ लोकनृत्य, शक्तीतुरा, शिमगा पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ठ तालावर पालखी नाचवणारी लोकनृत्य, संकासूर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या पायात चाळ बांधून भरजरी कपड्यांनी सजलेली पारंपरिक सामूहिक नृत्याचा अविष्कार असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे अविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा अभिनव प्रकार आपल्याला फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघर मधील आदिवासी पावसाला विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबड्या) करतात. कोकणात मासेमारी करणाऱ्या गाबीत समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाट्यप्रकार प्रसिद्ध आहे.

कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान मिळवला आहे. याही पलिकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप आदी असंख्य ‘लोककला’ आपले अस्तित्व टिकवून आहेत. शिमगा-गणेशोत्सवात ‘जाकडी’नृत्य म्हणजे शक्तीतुरा हे इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य ठरावे. इथल्या श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार आहे. शक्ती-तुरा हे दोन्ही फड आळीपाळीने पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे खास गाण्यांच्या चालीवर एकमेकांना प्रश्न टाकून त्याची उत्तरे पटवून देत असतात. नृत्य पथकातील तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर नृत्य साथ देत असतात. नमन, दशावतार लोककला कलात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती गाऊन कृपा संपादन करणे हा सोंगांचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली जाते. कोकणात शिमगोत्सवापाठोपाठ गावोगावी पारंपारिक पद्धतीने छबिना उत्सव साजरा होतो. महाडच्या वीरेश्वर मंदिराचा छबिना उत्सव काळातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला देवभोजन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे देवभोजन पाहाण्यासाठी भाविक गर्दी करतात. छबिन्याच्या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामदेवतांच्या पालखी एकवटतात. गोंधळ, पालख्यांची मिरवणूक निघते. यात्रा भरलेली असते. कोकणातील शिमग्यात गावोगावी ज्या प्रथा-परंपरा, रितीभाती आणि लोककललांचं दर्शन होतं ते 'बकेटलिस्ट'मध्ये ठेवून प्रत्येकानं एकदातरी 'याचि देही...' जरूर अनुभवावं असंच असतं.

पावसाळ्यातल्या कोकणचं आमच्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळ स्थान आहे. कोकणातला पाऊस आजतागायत आम्ही तरी शांतपणे आलेला पाहिला नाही. ढगांच्या प्रचंड आवाजात गर्जना करीत तो येतो. तेव्हाचा गंधवती पृथ्वीचा नाकात शिरणारा सुगंध ‘मातीशी आपलं नातं’ सांगतो. हा सुगंध कोकणी कर्तृत्वाला मातीचं ऋण फेडण्यासाठी तेव्हाही उद्युक्त करायचा, आजही करतोय. वचन दिल्याप्रमाणे येणाऱ्या या पावसाच्या तयारीसाठी अवघ्या कोकणची लगबग चालू असते. पावसात कुठं पाणी गळू नये म्हणून घरावरची कौलं परतणं, पत्रे सरळ करणं, अंगणातला माटव (छत) काढून ठेवणं, नित्य चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं शाकारलेल्या पडवीत आणणं अशी बरीचं कामं या काळात सुरु असतात. कोकणी माणसाच्या पायांना ह्या दिवसात थारा नसतो. अर्थात तसा तो पूर्वीही नसायचा. नशीबानं, जन्मानं आणि कर्मानं आम्ही कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आहोत. शालेय सहलींचे क्वचित प्रसंग वगळले तर बारावी होईतोपर्यंत या जिल्ह्याच्या बाहेर आमचं पाऊल पडल्याचंही आम्हांला स्मरत नाही. दापोली तालुक्यातलं केळशी आमचं मूळ गाव! जन्म आमचा तळवडे-लांज्याचा! लहानपणापासूनचं वास्तव्य चिपळूणात! अगदी काल-परवापर्यंतचं आमचं सुट्टीतलं बालपण मातीच्याचं घरात गेलंय. कोकण आमच्याही जगण्याचा भाग आहे. बालपणी शाळेच्या सुट्टीच्या दिवसात उन्हाळी सुट्टीत आजोळी तर दिवाळीत मूळगावी, आमचा मुक्काम ठरलेला. लहानपणी सुट्टीत आमच्याही पायांना अजिबात थारा नसायचा. आमचा संबंध कामाशी कमी नि भटकण्याशी जास्त असायचा. अशातच कधीतरी आभाळ आवाजू लागायचं. खेळून सुटी झालेली पायाखालची लाल माती उडवत सोसाट्याचा वारा यायचा. झाडं हलायची. सारं आभाळ पाखरांचं व्हायचं. भर दिवसा काळोख दाटून आल्यावर जाम मज्जा यायची. तेव्हा लाईट नव्हती. काळोख दाटून आला की आजी/काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे घरभर लावायची. कळकट्ट लोखंडी नळीने चूल फुंकायची. होणारा आवाज आम्हाला प्रचंड आवडायचा. चुलीवरचा गरम कोरा (बिना दुधाचा) चहा, यथेच्छ बरसणारा पाऊस, रातकिड्यांचे आवाज, जवळच्या पाणवठयावर, नळाजवळ येणारे बेडकांचे आवाज, रात्रीच्या जेवणानंतर रॉकेलच्या दिव्याजवळ बसून रंगणाऱ्या गप्पा, मारताना कमालीचं सुरक्षित वाटायचं आयुष्य! किती वर्णावा या मातीतल्या आठवणींचा तो महिमा?

मकर संक्रमण दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कोकणातील महिला वर्ग एकमेकींना सौभाग्याचे हळदीकुंकू लावून भेटवस्तू देण्याची परंपरा सांभाळून आहेत. ही परंपरा कोकणात शाळां-शाळांमध्येही मोठय़ा उत्साहात जपली जाते आहे. चैत्राची पालवी आणि वसंत ऋतूचे आगमन होताच कोकणातील निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. गावोगावी जत्रा-उत्सव सुरु होतात. कोकणातील जत्रा आणि त्यातील प्रथा खूप प्रसिद्ध आहेत. कोकणातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अभ्यासण्यासाठी जत्रोत्सव पाहायला हवेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भातशेतीची कामे पूर्ण होऊन, भात विकून शेतकऱ्याच्या हातात पैसे आलेले असतात. याकाळात प्रबोधिनी एकादशीपासून कोकणात वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. कोकणातील प्रत्येक गावाचा वार्षिक जत्रोत्सव, सप्ताह, दिंडी, नित्योत्सव आणि परंपरा यातूनच गावचे गावपण जपले गेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावची श्री देव नारायणाची जत्रा ही प्रबोधिनी एकादशीला असते. ठाणे जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध म्हसाची जत्रा शाकंभरी पौर्णिमेपासून पुढे सात दिवस चालते. ऐतिहासिक काळात खुष्कीच्या मार्गाने अपरांत (कोकणप्रांत) ते घाटवाटेने देशावर जाण्यासाठी जे मार्ग होते, त्यापैकी सातवाहन काळातील एक प्रमुख राजमार्ग नाणेघाट हा येथून जवळ आहे. त्या काळी दळणवळणाच्या साधनात बैलांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असे. त्यामुळे म्हसा गाव जत्रेत बैल खरेदी-विक्रीचे अथवा घाट चढून जाणाऱ्या नव्या दमाच्या बैलांच्या अदलाबदलीचे व्यवहार होत, आजही यात्रेनिमित्त जुन्नरपासून ते मुरबाडच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी हे जपले आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या चांद्रप्रकाशात अन्न शिजवले की त्यात औषधी गुण उतरतात, असे येथे म्हटले जाते. ठाणे हा आदिवासी जिल्हा. इथल्या आदिवासी संस्कृतीत माता किंवा शक्तीची पूजा अतिशय महत्त्वाची मानलेली आहे. डहाणूची ‘महालक्ष्मी’ सारखी आदिमायेची स्थाने आदिवासी समाजाची आराध्यदैवते आहेत. ठाण्यातील ओवळा गावात येऊरच्या डोंगरालगत असलेल्या आदिवासी पाडय़ातील ‘चांमुडादेवी’ला शक्तिदेवता महाकाली किंवा पार्वतीचे रूप मानतात. वैशाखात तिची यात्रा भरते. आदिवासी आपले घर-अंगण सारवून त्रिकोण, चौकोन, वर्तुळातील उभ्या-आडव्या रेषा काढून स्त्री-पुरुष, पशु-पक्षी, डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले, चंद्र-सूर्य यातून सृष्टीदेवतेचे चित्र रेखाटतात. या चित्रातून आदिशक्ती चामुंडादेवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते, ही कला पाहावी अशी आहे. कोदवली-राजापूरचे ग्रामदैवत श्रीदेव शंकरेश्वरचा ‘कावडखेळ’ वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे. हा खेळ अवघ्या महाराष्ट्रात दुसरीकडे पहाण्यास मिळत नाही. पुराणातील श्रावणबाळाच्या कावडीचा आणि या परंपरेचा संबंध नाही. पूर्वी कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे पाचशे वर्षापूर्वी सिध्देश्वर बाबा गोसावी नामक सिध्दपुरूष या कावडीचा उपयोग श्रीदेव शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करत असत. पुढे ही परंपरा ग्रामस्थांच्या श्रध्देचा आणि परंपरेचा भाग बनली. शिमगोत्सवात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या तालावर नाचवत सादर केले जाणारे नृत्य विशेष असते.

कोकणात कोणत्याही गावाच्या जत्रेच्या दिवशी अगदी सकाळपासूनच देवळामध्ये धार्मिक कार्यांना सुरुवात होते. ज्या कोणाचे ते कुलदैवत असेल ते, श्रद्धाळू, माहेरवाशिणी आवर्जून येतात. देवी असेल तर खणा-नारळाने ओटी आणि देवाची जत्रा असेल तर श्रीफळ अर्पण करून गार्‍हाणे घातले जाते. गार्‍हाणी घालण्याची म्हणजेच देवाला सांगणे करण्याची ही पद्धत गावागावाप्रमाणे वेगेळी असते. ज्या देवाचा हा वार्षिक जत्रोत्सव असतो, त्या देवतेचे मंदिर सजवायला सुरुवात होते. रंगरंगोटी केली जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली जाते. वेगवेगळ्या वस्तूंची, खेळण्यांची, खाऊची दुकाने मांडली जातात. चवदार पदार्थांचे वास दरवळत असतात. सिंधुदूर्गात सोनुर्लीची माउली, आंगणेवाडीची भराडी देवी, कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा, नारुरगावची महालक्ष्मी, मातोंड-पेंडूरची घोडेमुख आदी यात्रांना भाविकांची गर्दी होते. नवसाला पावणारे अशी या देवतांची ख्याती असल्याने भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. कोकणातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी अर्थात देवी भराडीच्या यात्रेचा उत्सव हा भावभक्तीचा अलोट मेळा, श्री देवीचा अगाध महिमा, जनसामान्यांपासून राजकीय नेत्यांची गार्‍हाणी, सेलिब्रेटींची उपस्थिती यांमुळे अलिकडे खूप मोठ्या गर्दीत संपन्न होत असतो.

भगवान श्रीपरशुरामानं समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली. यावर आमची श्रद्धा आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर झालेल्या संशोधनाद्वारे या भागात बऱ्याच ठिकाणी पूर्वी समुद्र खूप आतपर्यंत होता आणि पुढे तो मागे हटला याचे अनेक भूपुरातत्त्वीय पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. भडोच (भृगुकच्छ), नालासोपारा (शूर्पारक) येथील समुद्रकिनाऱ्यांबाबतची संशोधने हेच सांगत आहेत. गेली २० वर्षे आम्ही या मातीत व्यावसायिक कारणे पनवेल ते पणजी सतत प्रवास करतो आहोत. आज एका दमात अख्ख कोकण फिरताना प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या अनेक जुन्या खुणा हरवत जाताना दिसताहेत. मागच्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणातल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत चाललाय. जुन्या कौलारू देवळांच्या जागी भव्य मंदिर उभी राहिलीत. बाकी सारं ठीक मानलं तरी आधुनिक जीर्णोद्धार आमच्यासारख्या इतिहास, पर्यटन, प्राचीन संस्कृतीवर प्रेम करणाऱ्याला पटणारा नाही. कोकणातल्या लालमातीतील वास्तुसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्ही ती मोडीत काढू पाहतो आहोत. इथल्या आरोग्याला पूरक असणारे तांदूळ, उडीद, नाचणी, कुळीथ, शेवग्याच्या शेंगा, जांभूळ, भोपळा, काकडी, करांदे आज गायब होत आहेत. कोकणची भौतिक प्रगती, भौगोलिक विविधता आणि इथली संस्कृती ह्याची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आम्हां कोकणवासियांसमोर आहे.

कोकण बदलतंय. माणसं बदललीत. मागच्या पिढीने अनुभवलेलं ‘कोकण’ पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? प्रश्न आहे. कौलारू घर, घराबाहेरची पडवी, झोपाळा, पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपा मारलेल्या खिडक्या, छानसं माजघर, जातं, सारवलेली चूल, स्वच्छ अंगण, तुळस, तुळशीतला दिवा, गुरांचा गोठा, साठवून ठेवलेलं गवत, वासरू, कौलारू देऊळ, देवळातला गुरव, मानाचे दगड, देवळातले देव... महापुरुष, वाघजाई, सोळजाई, महाकाली, व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर, नाटेश्वर, देवाची राई (देवराई), वेशीवर दिला जाणारा नारळ, शिमग्यातली सोंगं, ढोल-ताशा, निशाण, ग्रामदेवतेच्या पालख्या, घराघरातला देवचार, वाडवडिलांच्या पुण्याईची जाणीव, मोहरत जाणारा आंबा, फणस, आंब्याची साठं, माडा-पोफळीची झाडं, बकुळी, करवंदाची जाळी, कण्हेरी, इथला मांसाहार... सरंगा, पापलेट, सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी, चुलीवर भाजलेला बांगडा, भाकरी, मिरचीचा ठेचा, उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या आठला, फणसा-केळफुलाची भाजी, मऊ गुरगुरीत भात, कैरी घातलेली डाळ, घावणे, उसळी, मुसळधार पाऊस, नदीला येणारे पूर, पुलाखालून वाहणारा व्हाळ, गणपती बाप्पा, त्याची मंडपी, गावरान सजावट, मोदक, रात्रीच्या डबलबाऱ्या, दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या, कंदिल, इथली होळी, होळीतल्या बोंबा, ग्रामदेवतांच्या जत्रा, लोककला, समुद्रातून हाती लागलेली रापण, तिला ओढणारे तांडेल, बघ्यांचा गलका असं सारं बरचं काही उद्याच्या पिढीला पाहायला मिळावं यासाठी कोकणातील काही माणसं आजही जीव तोडून धडपडतायतं. सातासमुद्रापार कोठेही न आढळणारी संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे, मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर ‘अग्रेसर’ होऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. कोकणात होऊ घातलेल्या मुंबई ते गोवा सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग, रो-रो ट्रेन सर्व्हिस, कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेसेवा, वेंगुर्ल्याच्याजवळचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, चिपीचे विमानतळ, सागरी महामार्ग यांमुळे परकीय आणि भारतीय पर्यटकांच्या नजरा गोव्यावरून कोकणाकडे वळताहेत. हे सारं कोकणचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.

बड्या शहरांच्या बजबजपुरीत जगणारा माणूस आपल्या हिरव्यागार कोकणात आला की परत जाईपर्यंत कोकण डोळ्यांत साठवून घेत असतो. परतताना त्याच्या गाडीत, खांद्यावरल्या पिशवीत सारं कोकण भरलेलं असतं. बसस्टँडवर, स्टेशनवर जेव्हा तो घरच्यांच्या हातात आपला निरोपाचा आणि प्रेमाचा हात ठेवतो तेव्हाचं दृश्य तर खास ठेवणीतलं असतं. खिडकीतून बाहेर काढलेल्या हातातून एकमेकांची बोट जेव्हा सुटतात तेव्हा ती इथल्या मातीशी असलेल्या नात्यांची खरी जाणीव करून देतात. बदलत्या कोकणात याचं प्रमाण आज कमी झालं असलं तरी जाणीवांचा ओलावा कायम आहे. स्वतःला कोकणी म्हणवणाऱ्या, या मातीशी आपलं नातं सांगणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या, या मातीचं ऋण मानणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीशी असलेल्या आंतरिक उमाळ्यापोटी या जाणीवा जपायला हव्यात.

 

धीरज वाटेकर

पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

(लेखक धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २८ वर्षे ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

गुरुवार, ६ मार्च, २०२५

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली - परिसंवाद - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब


        चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा फोडण्याची गरज आहे. देशातील एकूण परिस्थितीवर साहित्यिकांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. लेखक मांडू पाहाणारे वास्तव समाजाला पचणार आहे का? साहित्यात पडलेले प्रतिबिंब सहन करण्याची मानसिकता आजच्या समाजामध्ये राहिली आहे का?समाज तेवढा सहिष्णू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत राजकीय स्थित्यंतराचे मराठी साहित्यात प्रतिबिंब उमटणारच असल्याची भूमिका पत्रकार-लेखक धीरज वाटेकर यांनी मांडली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात "राजकारणाचे मराठी साहित्यावर उमटणारे प्रतिबिंब" या विषयावरील परिसंवादात वाटेकर यांनी आपली भूमिका मांडली.

वाटेकर पुढे म्हणाले, राजसत्ता स्वकीय असेल वा परकीय, राजकारण स्वमताचे असेल वा भिन्न मताचे. काहीही असले तरी राजकीय व्यक्तिमत्त्वे ही समाजाचे अभिन्न अंग असतील तर समाजमनात राजकारणाचे प्रतिध्वनी उमटणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. मराठी साहित्याच्या उगमाकडे जाताना महानुभाव साहित्य, ‘गाथा सप्तशती’, संत तुकारामांचे पाईकीचे अभंग, समर्थ रामदासांची पत्रे दासबोध आदित तत्कालीन राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. गोडसे भटजी वरसईकरांच्या ‘माझा प्रवास’ या प्रवासवर्णनात संस्थानिकीय राजकारण आणि ब्रिटीश राजसत्ता याचे दर्शन घडते. मराठी मधील म्हणी, वाक्प्रचार, जात्यावरच्या ओव्या, अभंग, लोककलावंतांची गाणी, लोककलांतील संवाद यातूनही राजकीय प्रतिबिंब पडलेले दिसते. महाराष्ट्रात टोपणनावाने मार्मिक लिहिण्याची परंपरा आहे. बघ्याची भूमिका, कलंदर, ठणठणपाळ, सख्या हरी, ब्रिटिश नंदी, तंबी दुराई आणि १९४० मध्ये गाजलेले ‘आलमगीर’ ही टोपणनावे सदाबहार ठरलीत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही स्वरूपातील दंभाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही सदरे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या व घडणाऱ्या घडामोडींवर खुसखूशीतपणे टिप्पणी करणारी राहिली आहेत. ही लेखने वाचणाऱ्याला भावत आली आहेत, वाचकाला स्वतःची प्रतिक्रिया वाटत आली आहेत. राजकारणाचे साहित्यात उमटलेले प्रतिबिंब यात दिसते. १९३८साली अध्यक्षपदावरून बोलताना, सावरकरांनी ‘लेखण्या मोडा बंदुका घ्या’ असे आवाहन केले होते. ‘ज्या देशाचा इतिहास दुबळा त्याचं साहित्यही दुबळं होतं तेव्हा आधी देश बलशाली करा’ अशी त्यामागची भावना होती. तत्कालिन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आपणास आचार्य अत्र्यांच्या १९४२च्या नाशिकमधील भाषणात पाहावयास मिळते. १९४६ साली माडखोलकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या एकभाषी प्रांताला गांधीजींची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. कवी यशवंत (१९५०) यांनी गांधीहत्त्येनंतरच्या राष्ट्रीय विध्वंसाची दखल घेतली होती. ‘गदिमा’च्या ‘बामणाचा पत्रा’लाही काहीशी याची पार्श्वभूमी आहे. लोकहितवादींची शतपत्रे, महात्मा जोतीराव फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड‘, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची 'निबंधमाला', ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचे ‘काळ’ नियतकालिक यातही आपल्याला राजकीय प्रतिबिंब भेटते. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ हे राजकीयदृष्ट्या सर्वात गाजलेले आणि सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलेले नाटक होय. गो. पु. देशपांडे यांनी संपूर्णपणे राजकीय वैचारिक नाटके सातत्याने लिहिली आणि त्यांची एक वेगळी स्वतंत्र वाट मराठी रंगभूमीवर निर्माण केली होती. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली!' ही लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय गाजली होती.

कोकणातील कवी अरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’मधील कविता याही राजकारण, जात, धर्मांधतेवर प्रखर टीका करणाऱ्या आहेत. ‘एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य’ करणाऱ्या आहेत. प्रा. संतोष गोनबरे यांच्या ‘माकडहाड डॉट कॉम’मध्ये प्राणीसृष्टीचा वावर कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये आणलेला आहे. राजकीय प्रतिबिंब अंगाने मराठी कादंबरीकडे पाहात बरेच मागे गेलो तर द्वा. ना. रणदिवे यांच्या 'शिक्षक' (१८८३) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मॅडम सभापती, गँगरिन, सूड या कादंबऱ्यात राजकीय प्रतिबिंब आहे. ‘आज राजकारणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे अधिकाधिक विषय लेखकांना मिळू शकतात.’ असं डॉ. चोरगे यांनी नमूद केलं आहे, ते वास्तव आहे. अर्थात मोजके साहित्य सोडले तर मराठी साहित्यात निखळ राजकीय प्रतिबिंब असणारे साहित्य फारसे आढळत नाही. राजकीय व्यंगचित्रांना वाहिलेले एका अर्थाने प्रतिबिंब उमटवणारे ‘मार्मिक’ सारखे राजकीय क्षेत्राला वाहिलेले नियतकालिक मराठीत आढळत नाही. कन्नड आणि बंगाली साहित्याच्या पार्श्वभूमीवर सद्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करण्यासाठी मराठी लेखक धजावत नाहीत हे वास्तव आहे. मराठीत राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेल्या साहित्यकृतीतील लेखक व नायक हे अपवाद वगळता संपादक किंवा पत्रकार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची विधानपरिषदेवर वर्षभर नियुक्ती व्हायला हवी आहे. एकमेकांची निंदा नालस्ती करण्यासाठी राजकीय पुढारी जी असभ्य मराठी भाषा जाहीर व्यासपीठावरून वापरतात ती बंद व्हायला हवी. आजकाल साहित्य संमेलनात राजकारणाचे प्रतिबिंब विविध राजकीय नेतृत्वाच्या निमित्ताने दिसते. ते स्वागतार्ह आहे. पण साहित्यात तितकेसे प्रतिबिंब दिसत नाही.

ज्येष्ठ संपादक लेखक जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात डॉ. समीर जाधव, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा आणि संजय आवटे या पत्रकारिता आणि संपादन क्षेत्रातील ज्येष्ठ सहभागी झाले होते. साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही. मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. राजकारण आज ज्या दिशेला चालले आहे त्याला एक नवे वळण देण्याचे काम मराठी साहित्यिक करतील का? असे प्रश्न या परिसंवादातून उपस्थित करण्यात आले. वाटेकर यांना या परिसंवादासाठी मराठी इतिहास व साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ कवी-समीक्षक अरुण इंगवले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर, कोकणातील लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे, वडिल साहित्यिक मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
















 

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक

संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल (सर) 

कोकणात ग्रामीण साहित्य संमेलनांचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ला वाटूळ (राजापूर) येथे संपन्न होत आहे. प्रसिद्ध प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक-पत्रकार आदरणीय दिनकर गांगल (जन्म - २५ नोव्हेंबर १९३९, रोहा-रायगड) सर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सरांच्या रूपाने या ग्रामीण साहित्य संमेलनाला, मराठी भाषा व साहित्याबाबत चतुरस्त्र विचार करणारे आणि अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारे अध्यक्ष लाभले आहेत. शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित मराठी शाळा सर्वत्र बंद पडत आहेत. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर सरांचे अध्यक्ष होणे ग्रामीण भागातील साहित्यप्रेमींना बौद्धिक दिशादर्शक ठरावे.

कमालीचे साधे, प्रेमळ विनम्र, ठाम आणि सुस्पष्ट विचार असलेले गांगल सर हे महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा येथे २०११साली संपन्न झालेल्या १३व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे सरांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची साहित्य व संस्कृती क्षेत्रातील कारकीर्द सहा दशकांची राहिलेली आहे. सरांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्‍यांनी साकारलेली ‘महाराष्ट्र टाइम्स‘ची रविवार पुरवणी विशेष गाजली होती. सरांना ‘फीचर रायटिंग‘ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली होती. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. 'फीचर रायटिंग' मधले बापमाणूस अशी त्यांची ओळख यातूनच निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत, घडामोडीत, जडणघडणीत सरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे साक्षीदार असणारे गांगल सर वयाच्या ८५व्या वर्षी अमाप उत्साहाने काम करतात हे आमच्यासारख्यांना आदर्शवत आहे. सर अत्यंत धडपडणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या सहवासात अनेकांना नवी दृष्टी मिळाली आहे. साहित्य आणि सामाजिक व्यवहारातली अनेक माणसं ज्या वयात कालबाह्य झालेली पाहायला मिळतात, त्या वयात सरांचा डोळस सार्वजनिक वावर आश्वासक वाटतो. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ सरांच्या ठायी असल्याने आम्हालाही गांगल सर खूप जवळचे वाटतात. सरांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), क्षितीज अपार आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड‘ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सरांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती‘चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ‘ व ‘मराठा साहित्‍य परिषद‘ यांचे संपादनाचे पुरस्‍कार, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार आणि वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण‘ पुरस्‍कार प्राप्त झाला आहे.

कार्यरत होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सरांनी १९५७ पासून प्रथम 'केसरी' नंतर 'सकाळ'मध्ये काम केले. १९६४ पासून ते 'महाराष्ट्र टाइम्स'शी अखंड जोडले गेले. सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर जुलै १९६८ मध्ये ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना केली होती. १९६० ते १९८० हा दोन दशकांतला काळ विविध चळवळींचा होता. बहुसंख्य मध्यमवर्ग कोणत्यातरी चळवळीत होता. त्यात वाचनाची आस असलेला मोठा समाजगट होता. त्याच्यापर्यंत पुस्तके पोहोचवीत यासाठी १९७४-७५च्या सुमारास जाणीवसंपन्न समाजासाठी वाचन आणि विचारांची एक चळवळ उभी राहिली, ती ग्रंथाली वाचक चळवळ! ही चळवळ निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान गांगल सरांचे आहे. सरांनी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली‘ची स्‍थापना केली होती. ग्रंथाली पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. तिने अनेक मोठे लेखक घडवले. तळागाळातील अनेक हौशी कवी व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे विचार समृध्द केले. ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली त्यांपैकी ऐंशी टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते. त्यामागे गांगल सरांचे विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहल आणि संबंधित व्यक्तींमध्ये, विषयांमध्ये त्यांना दिसलेला स्पार्क हा धागा होता. दया पवार यांचे 'बलुतं' किंवा नरेंद्र जाधव यांचे 'आमचा बाप अन् आम्ही' ही त्याची दोन ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील. सरांनी ‘ग्रंथाली‘च्‍या ‘रुची‘ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. ‘ग्रंथाली‘ची चारशे पुस्‍तके संपादित केली. सरांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार‘चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. ‘ग्रंथाली’ ही साहित्याची उत्तम जाण व चोखंदळपणा यासाठी कार्यरत मराठी भाषेतील एक अग्रेसर चळवळ आहे. समाजाच्या नाडीवर अचूक ठेवले गेलेले बोट हे ग्रंथाली’च्या यशाचे खरे कारण होते. जाणीवजागृत तरुणांच्या प्रखर व तीव्र संवेदना, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा संघर्ष व त्यांना खुणावणाऱ्या विधायकतेमुळे ‘ग्रंथाली’कारांना लेखन-पुस्तकांचे नवनवे फॉर्म, नवनवे विषय सुचत गेले. गांगल सरांच्या शब्दात सांगायचं तर, ‘ग्रंथाली हे तत्त्वाग्रहांच्या कार्यपद्धतीतून उभी राहिलेली चळवळ आहे. ‘वाचनवेधकता’ हे मूल्य ‘ग्रंथाली’ आग्रहाने लेखकांसमोर मांडत आली. वाचकांना न कळणारे दुर्बोध साहित्य लिहिण्याची एक फॅशन मराठी साहित्यात होती. तेव्हा ग्रंथाली’ने वाचकांना आवडीने वाचता येईल असे सुगम साहित्य निर्माण करण्यावर भर दिला होता. विशेष म्हणजे या 'ग्रंथाली'ची वाटचाल ३५ वर्षांची झाल्यावर सरांनी 'ग्रंथाली'ची सूत्रे नव्या पिढीकडे दिलीत. गांगल हे ‘ग्रंथाली‘प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा‘चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. दीपक घारे यांच्या सहकार्याने २००१मध्ये त्यांनी ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ नावाने स्थानिक इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी छोट्या पुस्तिकांची मालिका तयार केली. ग्रंथाली ज्ञानयज्ञ’मध्ये हजार पुस्तके निर्माण झाली असती तर ते खूप महत्त्वाचे काम ठरले असते. अर्थात यात ज्या दोन-अडीचशे पुस्तकांची निर्मिती झाली तीही खूप महत्त्वाचीच होती. २००५मध्ये ‘मराठी विद्यापीठ डॉट कॉम’ वेबसाईटची निर्मिती केली.

एकविसाव्या शतकातील ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा संवर्धित व्हावा हा हेतू मनी बाळगून सरांनी २००९मध्ये ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ असलेले वेबपोर्टल चालवण्यात येते. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. ‘भारत देशात, महाराष्ट्रात विधायक असे काहीही होताना दिसत नाही. गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे.’ असं जाणवू लागल्यास सरांनी संपादित केलेल्या थिंक महाराष्ट्र’ वेब पोर्टलवर आवर्जून फेरफटका मारावा. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे ग्रंथालीचे पुढील अद्ययावत रूप आहे. एकप्रकारे त्याला मराठी विद्यापीठाचे प्रगत रूप म्हणता येईल. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल म्हणजे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशाचे विस्तारित आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे ते खरे आहे. हे पोर्टल उद्याच्या महाराष्ट्राचे म्युझियम आणि कंटेंप्ररी जर्नल असणार आहे. सरांनी सुरु केलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’चा प्रवास कोणत्या दिशेने असणार आहे? हे समजून सांगताना, ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतात. ‘पूर्वीच्या खेड्यातदेखील दारूचा गुत्ता, मटणाचे दुकान अशा, त्यावेळी दुष्ट मानल्या गेलेल्या गोष्टी होत्या. पण गावात दोन वारकरीदेखील असत आणि दारू प्यायलेला माणूस वारकर्‍यांच्या घरापाठीमागून लपतछपत स्वगृही जाई. ही दहशत नैतिक होती. समाजात सांस्कृतिक गोष्टी प्रभावी झाल्या तर असांस्कृतिकता, असभ्यता आपोआप निष्प्रभ होत जातात.’ हेच ध्येय बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ काम करते आहे. आजच्या बकालतेवर ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटवावे आणि सांस्‍कृतिकता अधिक प्रभावी करून लोकांमधील पुढाकार घेण्‍याची भावना जागृत करावी, यासाठी ‘थिंक महाराष्‍ट्र’ प्रयत्‍नशील आहे.

गांगल सरांनी मांडलेल्या थिंक महाराष्ट्र कम्युनिटी (समुदाय), जन्मशताब्दी वीरांचे दालन याही संकल्पना भन्नाट आहेत. १९०० ते १९३० या काळात जन्मलेल्या महनीय मंडळींनी महाराष्ट्रीय जीवन घडवले. अशा तीनशे मोठ्या व्यक्तींची नावेसरांच्या टीमने काढलीत. या मंडळींचा अभ्यास व त्यांचे कार्य संशोधन करून ‘जन्मशताब्दी वीरांचे दालन’अंतर्गत व्यवस्थितरित्या लोकांसमोर आणले तर अवघा महाराष्ट्र चकित होईल आणि सांस्कृतिकतेचे महत्त्व लोकजीवनात परत ठसेल. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे मराठी माणसाची कर्तबगारी आणि विधायकता यांचे नेटवर्क आहे. ते राज्याची तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न करते आहे. भौतिक विकासाचे मॉडेल स्वीकारले गेल्याने महाराष्ट्राच्या ‘व्हिजन’ला नव्वद सालानंतर अर्थ उरलेला नाही. महाराष्ट्र हा अमेरिकेप्रमाणेच ‘स्थलांतरितांचा देश’ (बॉयलिंग पॉट) आहे. मराठी कोणास म्हणावे? हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा ‘मिनी इंडिया’ आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला एकात्म उद्दिष्टाने बांधण्याचे काम आहे. हे एकात्म उद्दिष्ट वैचारिक व भावनिक असू शकते. मराठी माणसात कार्यकर्ता दडलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय ख्यातीचे कलाकार (भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गायतोंडे, हुसेन आहेत) व क्रीडापटूही (गावसकर, तेंडुलकर, नाटेकर) मोठे होऊन गेले. मात्र त्यांची छाप राष्ट्रीय पातळीवर मराठी म्हणून जाणवत नाही. महाराष्ट्रात मागील पन्नास-सत्तर वर्षांत काही मराठी विद्वान हे स्वतंत्र विचार मांडू शकतील अशा ताकदीचे होते. त्यांनी त्या त्यावेळी काही विचार नोंदूनही ठेवले. ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘स्वायत्त महाराष्ट्र’ पुस्तक या पठडीतले आहे. हे पुस्तक महाराष्ट्रकेंद्री आहे. दुर्दैवाने सुप्त सामर्थ्याचे असे अनेक विचारकण त्या काळात दडपले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्राची बौद्धिक हानी होऊन राज्याला बुद्धिमांद्याचा रोग जडल्याचे ठासून सांगत राज्याच्या स्थित्यंतरावर अचूक बोट ठेवणाऱ्या गांगल सरांच्या प्रतिभाशक्तीला सलाम करायला हवा.

महाराष्ट्र हा प्रदेश कर्तृत्वाचा आहे, हे गत आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. मानवी भाषांवर १९९०नंतर तंत्रज्ञानाचे मोठे आक्रमण सुरू झाले. त्यामुळे भाषेद्वारे आविष्काराची गरज कमी झाली. मानवी संभाषण पर्यायाने म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर, नव्या पर्यायी शब्दांचा शोध घेणे कमी झाले आहे. म्हणून इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे रूप नव्याने विकसित व्हायला हवे आहे. महाराष्ट्राच्या तालुक्या-तालुक्यात उपक्रमशील व्यक्तींचा संचार आहे. त्यांचा आणि प्रस्थापितांचा ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. उद्याचे परिवर्तन हे निर्मितीच्या प्रेरणांनी भारल्या गेलेल्या माणसांकडून होणार आहे. माणसांच्या सदसद्विवेकाची संस्कृती मागे पडते आहे. देशातील विचारी व संवेदनाशील समाज काहीसा आत्ममग्न आहे. माणसाच्या सत्त्व गुणाचे रुपांतर अतिगर्वात झाले आहे. रज गुणाने धुमाकूळ घातला आहे. हपापलेपण आणि विषयी वृत्ती हे समाजाचे ब्रीद बनले आहे. बुद्धीच्या जोरावर विवेकीपण येण्याऐवजी भोगवृत्ती वाढते आहे. प्रशासनावर वचक व पर्यायी विचार सापडत नाही आहे. मूल्यव्यवस्था ढासळते आहे. गावागावात पुतळे, मंदिरे, हॉस्पिटले बांधली जातायत. मात्र ग्रंथालय असायला पाहिजे असा आग्रह दिसत नाही. विद्वेष, विखार, विषमता हे सद्यकाळाचे दुखणे आहे. त्यामुळे संवेदनाशील व विचारी मनांमध्ये अस्वस्थता येते. माणसाची संवेदनेची पातळी कमी होत चालली आहे. सामाजिक कामांवर पैसा खर्च करण्याविषयीच्या संकल्पना खूप ठोकळेबाज असतात. गरजूला मदत करणे म्हणजे सामाजिक कामांवर पैसा खर्च करणे नाही. मन घडविण्याच्या कामांसाठी कोण काय करणार? याचा विचार करायला हवा. अशा मुद्द्यांवर गांगल सरांमधील भाष्यकार-निरीक्षक अचूक बोट ठेवतो. पर्याय म्हणून राज्यात तालुकास्तरावरील जीवनाचा-परंपरेचा व प्रगतीचा वेध घेणाऱ्या तालुका संस्कृती महोत्सवाची कल्पना राबवतो. समाजप्रबोधन व साहित्य संशोधन यांमधून तयार झालेल्या पिढीचा प्रभाव मराठी समाजावर १९४५ ते १९८० या काळात निर्विवाद होता. त्यानंतर हे सारे बिघडत गेले. नव्वद सालानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात केवळ पैशाला असाधारण महत्त्व प्राप्त होऊन इतर सारे दिशाहीन झाले. पूर्वी बहुसंख्य समाज अशिक्षित असूनही तो संस्कृतीच्या उत्तम कल्पना जोपासून होता. आज परिस्थिती उलटी आहे म्हणून समाजात सुसंस्कृत समाजाचा प्रभाव वाढायला हवा अशी सरांची अपेक्षा आहे. जुन्या मराठी साहित्यिकांच्या व कलाकारांच्या वेबसाईटस्ची निर्मिती, कला आणि करमणूक यांचा बिघडलेला तोल पुनर्स्थापित करण्यासाठी गांगल सरांनी रसिकतेचा अभ्यासक्रम उपक्रम सुरु करण्याची सूचना केली आहे.

बदलत्या काळात पुस्तकाची देवघेव करणाऱ्या ग्रंथालयांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागणार आहे. विविध ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे ग्रंथालयांचे मुख्य कार्य असायला हवे आहे. याविचारानेही सरांनी चळवळ सुरु केली आहे. सद्यकाळात मानवी भावना व्यक्त करण्याचे माध्यम पैसा आहे. ज्ञानाचा विस्तार प्रचंड झाला आहे. माहिती-ज्ञान सर्वत्र खुलेपणाने उपलब्ध आहे. गुरू गुगलबद्ध झाला आहे. मराठी प्रकाशन व्यवसाय आजही काहीसा संकटात आहे. हा व्यवसाय सरकारावलंबी राहिला आहे. पुस्तकांची लोकांमधील विक्री ही फार मोठी कधी राहिलेली नाही. साहित्य-कला-संस्कृती हे प्रश्न या समाजात कधी अग्रस्थानी आले नाहीत. जिज्ञासा, ज्ञानोत्सुकता यांना समाजात दोन-तीन टक्क्यांचे स्थान राहिले आहे. मागील दोनेकशे वर्षांपासून समाजात वावरणारे पुस्तक हे ज्ञानोत्सुकतेचे प्रतिक आहे. ‘पुस्तक व्यक्तीला घडवते’ यावर जिद्यासूंचा विश्वास आहे. असे नमूद करणारे गांगल सर, ‘वाचकाची भूक नव्या कंटेण्टची असण्याकडे मराठी पुस्तकांना पाहायला लागेल’ असं सांगून जातात तेव्हा त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन घडते. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. सर आजही वाचकांस काय हवे आहे? याचा प्रथम विचार करताना दिसतात. एखादा शब्द लिहिला नाही तर वाक्यात काही फरक पडेल का? संबंधित शब्द भविष्यात वापरात राहिल का? याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. ते रोज नव-नव्या व्यक्तींशी संवाद साधतात. व्यक्तींविषयी आपल्या साप्ताहिक स्तंभात लिहितात. अनेकांच्या लेखनावर संस्करण करतात. अनेक वर्तमानपत्रांसाठी विविध लेखकांचे साहित्य स्वतः संस्कारित करतात. सध्याच्या साहित्य क्षेत्रातील अशा मंडळींची यादी खूप मोठी आहे की ज्यांचे पहिले लेखन गांगल सरांनी संस्कार करून महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध करून त्यांना नावारूपास आणले होते. असे गांगल सरांचे आम्हाला जाणवलेले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, विचारी, व्यासंगी व मजकुराशी प्रामाणिक असलेल्या शैलीदार संपादकाचे आहे. सर रसिक, संवेदनशील आहेत. आमच्यासारख्या उभरत्या तरुणांना सरांसारख्या ज्येष्ठाने हात देणे, त्यांचे सान्निध्य मिळणे मौलिक वाटते. एका पत्रकाराची दृष्टी किती व्यापक आणि शोधक हवी हे सरांच्या कामाचा आढावा घेताना जाणवते. सरांची संपादकीय नजर, समाजभान, अपार औत्सुक्य आमच्यासारख्यांना समृध्द बनवते.

८५व्या वर्षी सरांचा उत्साह, उत्तम ते जतन करण्याबाबतचा आग्रह, आमच्यासारख्याचा एखादा लेख लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील राहिलेले बारकावे समजावून सांगत नव्याने लेखन घडवण्याचा आग्रह अफलातून आहे. महाराष्ट्रात सेवाजेष्ठतेनुसार अनेक संपादक झाले असतील पण अनेक नवीन विषय व लेखक घडवणारे गांगल सर ही एक व्यक्ती नसून संस्था आहे. सरांसारखा बहुश्रुत व व्यासंगी संमेलनाध्यक्ष मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. ‘मराठीत संपादक दोन प्रकारचे राहात आले आहेत. एक लिहिणारे, दुसरे संयोजक संपादक. वाचकांना लिहिणारे संपादक जास्त आवडतात.’ सरांचे हे विधान आजच्या काळात सोशल मिडीयावर ‘ब्रेकिंग न्यूज’चा धुमाकूळ घालणाऱ्या ‘ऑनलाईन’ पत्रकार-संपादकांनी समजून घ्यावे. वर्तमानकाळात वावरत असताना वर्तमानाच्या पलिकडे कुतुहलपूर्वक नजरेने पाहाण्याची दृष्टी लाभलेल्या ‘संमेलनाध्यक्ष’ दिनकर गांगल सरांना या ग्रामीण संमेलनात ऐकायची संधी सोडू नका!

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

 

  

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...