मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बांधावरचे साहित्य संमेलन २०२६


आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग असलेले हे संमेलन अनोखे, अनुकरणीय ठरले. जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत.' या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,' अशी भूमिका यावेळी मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केली.

कोकणात बांध म्हणजे भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणारी, माती किंवा दगडांची अगदी छोटीशी जेमतेम वितभर उंचीची भिंत!. कोकणात हे बांध शेतीचे संरक्षण करतात, मृदसंधारण करतात आणि पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयुक्त ठरतात. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पिकांच्या वाढीसोबतच जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि मातीची धूप होण्यापासून रोखणे अशी महत्वाची कामे हे बांध करत असतात. कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱ्या या  'बांध'वर साहित्य प्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आणि त्यांच्या या प्रयोगाचे राज्यभर कौतुक झाले. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ‘बांधावरचे संमेलन रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) रोजी चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारूळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकणात सलग ११ ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करणारे सुभाष लाड, वाशिष्ठी उद्योग समूहाच्या प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव, नामवंत कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश गांधी यांनी खास मालवणी भाषेत गाऱ्हाणे घातले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे, विजय कदम यांनी केले. साथसंगत यदुवीर चौगुले यांनी दिली. धीरज वाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

संमेलनाध्यक्ष  बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे बारटक्के म्हणाले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी उद्घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन केले. आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत मांडले. सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून आणि महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून आल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष मोदी म्हणाले, ‘आजचे संमेलन ही केवळ जागेची बदललेली रचना नाही, तर विचारांची दिशा बदलणारा प्रयोग आहे. आज इथे कविता केवळ ऐकली जाणार नाही ती अनुभवली जाणार आहे. कथा फक्त सांगितली जाणार नाही ती जमिनीतून उगवलेली वाटेल. गाणी रंगमंचावर नाही तर वाऱ्यासोबत झुलताना ऐकू येतील. आजचा दिवस मराठी साहित्याच्या वाटचालीत एक स्मरणीय टप्पा ठरेल, याची मला खात्री आहे.’ संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशयगुण, नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कविता लिहिल्याबरोबर फेसबुक, व्हॉटस्अप वर शेअर करण्याची घाई करतात. हे चुकीचे आहे. जसे लोणचे मुरल्यानंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते असे ते म्हणाले. दुपारी भोजनानंतर ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन या सत्रात अमोल पालये (तिलोरी), ज्ञानेश्वर झगडे (खारवी) यांनी बोलीभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण केले. नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवींचे 'माती, नाती अन् माणूस ' या विषयावर काव्य संमेलन रंगले. कवी अरुण म्हात्रे, सूत्रसंचालक कैलास गांधी यांचेसह सर्व मान्यवरांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. म्हात्रे आणि गांधी यांची काव्य’नोकझोक’ यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली. मुझ्झफर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, विजय हटकर, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासुन कौतुक केले.  यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, ‘बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ठ आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यांवर भाष्य करायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन शेती पहाताना पीकं डोलताना, पाहाताना, बांधावरुन एखादी नदी अगर नाला जवळून पाहाताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.’ असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, ‘धामणवणे गावातील 'साद मयुराची' या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझं अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींचा पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.’


संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.


पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास जवळपास ३५० साहित्यिक आणि रसिकांनी अनुभवला. निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी सुंदर स्वागत रांगोळी काढलेली होती. काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांध हेच व्यासपीठ होता. संमेलन परिसर शेणामातीने सारवलेला होता. विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर रेखाटलेल्या कविता जागोजागी झाडांवर टांगल्या होत्या. झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान पोडिअम बनविला होता. जेवणामध्ये झुणका भाकर (ज्वारी/बाजरी/तांदूळ/नाचणी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वांग्या-पावट्याची गावरान भाजी, वरण-भात तर नाश्त्याला केळीच्या पानात आंबोळी-घावणे आणि चटणी, सायंकाळी चहापानाला स्थानिक अल्पोहार मोंगा-पोपटी (शाकाहारी) असा अस्सल कोकणी ग्रामीण बेत होता. शेतामध्ये वारूळ पूजन, संत तुकारामांच्या स्पर्शाने पावन झालेला दगडी दिवाद्वारे दीपप्रज्वलन, ग्रामदेवतेला केलेलं स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे (प्रार्थना), बोलीभाषेत लिहिलेलं संमेलन गीत, स्थानिक वाद्य ‘संबळ’ याचे वादन, मान्यवरांचा घोंगडी, मोरपीस, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देऊन केलेला सन्मान, प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक टाळणं, पत्रावळीखाली योग्य आकाराचं ताट देण्याची कल्पना, टेबल खूर्ची यांना फाटा देऊन व्यासपीठावर म्हणजेच बांधावर गाद्या टाकून केलेली बैठक व्यवस्था, संमेलनाचा लोगो छापलेल्या उपस्थितांना ‘वानोळा’भेट देण्यात आलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या, पारंपरिक सांस्कृतिक धरोहरांना दिलेला मान, रसिकांसाठी काजूच्या झाडांच्या सावलीतील व्यवस्था यांमुळे घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा उपस्थितांच्या मनात भरून राहिला.






बांधावरचे संमेलन लिंक - https://www.youtube.com/live/-JORZNEcfGw?si=bKvR02Ib4hN8FO38

बांधावरचे संमेलन आकाशवाणी वृतांत - https://youtu.be/je-L1qwqlQc?si=5fKTQ3CHA-I_9jsl


संमेलन प्रतिक्रिया

बांधावरचे संमेलन व्यासपीठ


बांधावरचे संमेलन परिसर

नैसर्गिक साहित्यातून लोगोची रांगोळी  

भूमाता सातेरी पूजानाच्या दिशेने जाताना...  

भूमाता सातेरी (वारूळ) पूजन 

कवी संमेलन

काजूच्या सुकलेल्या फांदीचा डायस








गावरान भोजन 

मोंगा (पोपटी)चा आस्वाद



धीरज वाटेकर      

मो. ९८६०३६०९४८

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध हे आज, शनिवारी (३१ जानेवारी) ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. कोणतेही आदर्श शिक्षक-मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासह त्यांचे जीवन घडविण्याकडे लक्ष देत असतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, त्यांच्या क्षमता ओळखणारे, त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारे मार्गदर्शक व शिल्पकार शिक्षक आदर्श मानले जातात. विषयज्ञान, अवांतर वाचनाची आवड, संवाद कौशल्य, सहानुभूती, संयम आणि सतत शिकण्याची-शिकवण्याची वृत्ती असलेल्या वाचासिद्ध सरांच्या ज्ञानाचा आवाका आणि कामाचा झपाटा अफाट आहे. नियोजन, आयोजन, नेतृत्व, देखरेख यांसारख्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांचा खुबीने उपयोग करणारे वाचासिद्ध सर उत्कृष्टतेसाठी सातत्याने वचनबद्ध राहिलेले मागील दहाएक वर्षात आम्ही अनुभवले आहेत.

वाचासिद्ध सरांचा जन्म ५ जानेवारी १९६८चा. पन्नास वर्षांपूर्वीच्या कोकणातील कमीतकमी सुविधा असलेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले हे त्यांचे मूळगाव. सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पोहणे, झाडावर चढणे, व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, ढोलवादन आदी कलागुणांसह सरांची शास्त्रीय संगीताची आवड तेव्हापासूनची. आंजर्ले गावच्या मुख्य रस्त्यावरील त्यांच्या एकत्रित छोट्याश्या कुटुंबाची घराशेजारी नारळी-पोफळीची छोटीशी बाग होती. गाई-म्हशी होत्या. गावात येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांना या घराचे दरवाजे सदैव खुले राहिलेले. अशा वातावरणात सरांचे बालपण गेले. पुढे असेच वातावरण केळीच्या छोट्याश्या बागेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चिपळूणच्या घराभोवती तयार केले. या जागेत पावसाळी दिवसात पोटापुरतं भात तर उन्हाळी दिवसात पावट्याचं पिकं घेतलं जातं. विशेष म्हणजे वाचासिद्ध सरांचं चिपळूणचं हे घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचं हक्काचं ठिकाण आहे. संघदृष्ट्या सरांकडे गेली अनेक वर्ष हिंदू विद्यार्थी वसतीगृहाच्या न्यासाची जबाबदारी आहे. २०२१च्या चिपळूण महापुरात आपल्या घरात पाणी शिरलेले असताना शाळेतील, महापूरग्रस्तांसाठीच्या सामाजिक सेवायज्ञात योगदान देत राहिलेले वाचासिद्ध सर अनेकांनी अनुभवलेत. घरची बागायती, गायी-गुरे-गोठा, दुग्धोत्पादन संस्कृतीमुळे कायम मातीच्या सान्निध्यात राहिलेल्या सरांनी आपल्या मुख्याध्यापकीय नेतृत्वाच्या कालखंडात शालेय वातावरणात सुरु केलेल्या ‘वसुबारस’ उत्सव आणि रानभाज्या प्रदर्शनातील उत्साहाच्या मुळाशी बालपणातील संस्कार असावेत. आंजर्लेच्या पूर्ण प्राथमिक शाळेसह माधवराव खांबेटे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पदवी शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचा चिपळूणशी संबंध आला. ते डी.बी.जे. महाविद्यालयातून बी.एस्स.सी. झाले. बी.एड.चे शिक्षण त्यांनी देवगडच्या श्री एस. के. पंतवालावलकर कॉलेज ऑफ एजुकेशनमधून पूर्ण केले. कॉलेजयीन जीवनात आमदार अप्पासाहेब गोगटे आदी व्यक्तींचा सहवास आणि संपर्क लाभल्याचा सरांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा सकारात्मक परिणाम झाला. विद्यार्थीदशेत कॉलेजमधील गैरसोयींविरोधात विद्यापीठस्तरावर आवाज उठवून त्यांनी आपले म्हणणे प्रशासनाला मान्य करायला लावल्याचा इतिहास आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (NEP TASK राज्य समन्वय कक्ष) राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) अंतर्गत समिती सदस्य म्हणून सरांची निवड झाली. ही निवड त्यांनी आम्हाला कळूही दिली नाही. खरंतर अशा घटना घडल्यावर बातमीसाठी आग्रह न धरणारी अपवादात्मक माणसं आम्ही आमच्या तीसेक वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत पहिलीत, वाचासिद्ध सर यांपैकी एक होतं.

वाचासिद्ध सर २ जुलै १९९२ रोजी शिक्षक म्हणून युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. १९९२ ते २०१७ या काळात युनायटेडच्या ‘गुरुदक्षिणा सभागृह’ उभारणी, नापासांची शाळा, रविवारच्या गणिताच्या विशेष वर्गांसह दहावीच्या परीक्षेसाठी १७नंबरचे फॉर्म भरून अनेक विद्यार्थी यशस्वी करण्यात सरांचा सहभाग राहिला आहे. २०१६साली, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आणि माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या सहकार्याने सरांनी इतिहासात पहिल्यांदा ‘युनायटेड’ची सहल राज्याबाहेर, राजधानी नवी दिल्ली येथे नेली. विद्यार्थ्यांनी दिल्लीत तब्बल आठ दिवस मुक्काम केला. पुढे यावरील ‘वेध दिल्लीचा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही केले. ताजमहाल सारख्या वास्तूला आपल्या शिक्षकांच्या समवेत अभ्यासण्याचा एक दुर्मिळ योग विद्यार्थ्यानी अनुभवला. भारताचे संसद भवन आणि संसदीय कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना प्रमुख सल्लागार रघुनंदन शर्मा आणि कल्पना शर्मा यांनी दिलेली माहिती अविस्मरणीय ठरली.

पर्यवेक्षक म्हणून ते १ नोव्हेंबर २०१७ रोजी संस्थेच्या अलोरे शाळेत रुजू झाले. पुढे १ जून २०२० रोजी तिथेच मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी स्वीकारली. १ जून २०२५ रोजी वाचासिद्ध सर युनायटेड शाळेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. मात्र सरांची अलोरेतील कारकीर्द ‘स्पृहणीय’ घटनांनी भरलेली ठरली. अलोरेतील सरांचे आगमन जणू ‘पूर्वनियोजित’ आणि ‘शुभस्य शीघ्रम्’ या संस्कृत सुभाषितासारखे असल्याचे सिद्ध झाले. अलोरेत आल्यानंतर सरांनी अगदी सुरुवातीलाच दूरदृष्टीने शाळेतील बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या ‘विद्यार्थीप्रिय’ अरुण केशव माने सरांच्या अनुभव आणि संपर्काचा लाभ शाळेला होईल अशी संस्थात्मक रचना केली. खरंतर तिथेच त्यांनी आपल्या अलोरे शाळा कारकिर्दीतील अर्धीअधिक लढाई जिंकलेली! जागतिक पातळीवर पोहोचलेल्या अलोरेतील माजी विद्यार्थ्यांच्या शाळेप्रति असलेल्या भावना त्यांनी अचूक ओळखल्या. माजी विद्यार्थी भेटीगाठी हा विषय पूर्ण क्षमतेने हाताळला. अलोरेत आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मनात विश्वासाची पेरणी केली. त्यातून शाळेसाठीची अनेक चांगली, पवित्र आणि कल्याणकारी कार्ये कमालीच्या वेगाने जेमतेम आठेक वर्षांत अंमलात आणली. अलोरे शाळेतील २०१७-२०२५ या कालखंडाकडे आज तटस्थपणे पाहिले की, वाचासिद्ध सरांच्या अलोरेतील ‘पूर्वनियोजित’ आगमनाचा अर्थ लक्षात येतो. अलोरे शासकीय शाळेचा भाडेपट्टी करार मागील काही वर्षांपासून वादात होता. कोयना जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यापासून अलोरे, पोफळी आणि कोयना येथे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारात घेऊन परशुराम एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला १९७२साली अलोरेत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला शिक्षक वेतनेतर अनुदानातून प्रशालेचे भाडे आदी विविध खर्च पूर्णत्वास जात होते. मात्र शिक्षक वेतनेतर अनुदान बंद झाल्यावर शाळेला शासनाचे वीज, पाणी आणि भाडे भरणे अशक्य होऊन बसले. यामुळे निर्माण झालेल्या संघर्षातून जलसंपदा खात्याने अलोरे शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर फेब्रुवारी २०२५मध्ये संस्था आणि शासनाच्या कोयना सिंचन विभाग कोयनानगर (सातारा) यांच्यात तीस वर्षांचा सामंजस्य करार पूर्ण झाला. जलसंपदा विभागाने प्रशालेची आजवरची वाटचाल आणि गुणवत्ता बघून हा तीस वर्षांचा करार केला. याच्या पाठीमागे केवळ वाचासिद्ध सर आणि अलोरे शाळा-संस्था समन्वयक अरुण माने सरांनी केलेली अविश्रांत धडपड कारणीभूत आहे, हे आवर्जून नोंदवायला हवे.

माजी विद्यार्थी आग्रहास्तव अलोरे शाळा स्थापनेपासून सलग २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केलेल्या आगवेकर सरांचं नाव प्रशालेला देण्यात आलं. त्यानंतर आगवेकर सरांचा, ११ मार्चचा स्मृतिदिन ‘नंदादीप’ म्हणून साजरा होऊ लागला. वाचासिद्ध सरांनी, अरुण माने आणि शशिकांत वहाळकर सरांच्या सहकार्याने, अलोरे शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठी ३-४ वर्षांच्या प्रयत्नातून जनरल रजिस्टरवरील क्रमांक एकच्या विद्यार्थिनी प्रभावती कोनसिरसगी-बन्नी (बेळगाव) यांना शोधून काढून निमंत्रित केले. सुवर्ण महोत्सव निमित्ताने झपाटलेली ही त्रयी, आगवेकर सरांनी गुरु मानलेल्या मा. ना. कुलकर्णी सरांच्या पाउलखुणा शोधायला संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील दुंडगे गावी पोहोचली होती. सुसज्ज ‘कै. सुभाष लाड ग्रंथालय’ विभाग, महाराष्ट्राच्या आजवरच्या ग्रामीण शालेय इतिहासातील ‘न भुतो न भविष्यती’ अशा अभिनव उपक्रमांनी संपन्न झालेला शाळेचा सुवर्णमहोत्सवी उत्सव, तितक्याच गौरवशाली उंचीची नोंद असलेल्या संग्राह्य स्मरणिकेची निर्मिती, अटल टिंकरिंग लॅब, ज्युनिअर कॉलेजची शास्त्र शाखा, नवा अभ्यासक्रम (NEP), पालक-शिक्षक भेटी, अलोरे शाळेच्या अनुषंगाने घेतलेली आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची भेट, एक राखी देशासाठी..., पालवी-कला छंद वर्ग आदी घटना अलोरेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेल्यात. सरांनी अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी दिवसात जुन्या शाळेला ‘स्मृतिस्थळ’ म्हणून उजाळा दिलेला होता.

जून २०२५ नंतर ‘युनायटेड’मध्ये मिळालेल्या वर्षभरापेक्षा कमी अवधीत सरांमधील उपरोल्लेखित कौशल्यांची चुणूक पाहायला मिळाली. याच काळात नगर पालिकेचा ‘वाचू आनंदाने’, मिलिंद नाईक यांची कार्यशाळा उपक्रम शाळेत संपन्न झाला. युनायटेडसह गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा उपक्रम राबवला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित सहाशे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ‘युनायटेड’मध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधुभाव दर्शवणारी नसून सैन्यातील शूरवीरांना मनोबल देणारी ठरली. सेवानिवृत्ती रजा न घेत ‘युनायटेड’चे मुख्याध्यापक म्हणून मिळालेल्या उण्यापुऱ्या आठेक महिन्यांच्या कालावधीतही सरांनी दखलपात्र काम केले. पालकांनी विशेष कौतुक केलेले ‘युनायटेड’चे यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलनही संस्मरणीय झाले. ‘अथ् रामायण’उपक्रमात, ग.दि.मा. यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांचे सोबतचा संस्थेच्या गुरुकुल विभागाचा विद्यार्थी सहभाग, दिवाळीपूर्व दिवसात ‘वसुबारस’दिनी युनायटेड शाळेतून निवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचे कार्यक्रम निमित्ताने शाळेत एकत्रीकरण करण्यात आले होते. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती, महापरिनिर्वाणदिनी सरांनी शाळेतील शिक्षकांसाठी दोन गटात चक्क मोबाईल तंत्रज्ञानातील ‘चॅटजीपीटी’ अॅपचा उपयोग करून प्रश्नोत्तरांचे स्वरूप असलेले चर्चासत्र घेतले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीमुळे यंदा शाळा संकुलाला ‘स्ट्रॉन्गरूम’चे स्वरूप आलेले. तेव्हा ‘शाळेची गैरसोय होतेय’, अशी खंत अधिकाऱ्यांकडून व्यक्त झाल्यावर, ‘शाळेचा उपयोग स्ट्रॉन्गरूम म्हणून होत असताना, लाल दिव्यांच्या गाड्या पाहाणाऱ्या इथल्या चार हजार विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडणारे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत सजगतेने पोहोचवणारे वाचसिद्ध सर होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेले २८ पैकी १४ नगरसेवक सरांचे माजी विद्यार्थी राहिलेत.

वाचासिद्ध सरांची भाषणे तपासली तर त्यात सर नेहमी, ‘समाजातील सज्जनशक्ती आणि मातृशक्ती’वर विश्वास प्रकटताना दिसतात. ते बोलताना विविध पुस्तकांचे दाखले देतात. शिक्षण क्षेत्राचा मनुष्याच्या मस्तिष्काशी संबंध असल्याचे सांगणाऱ्या सरांनी, मानवी जीवनावर ठसा उमटवणारे तत्वज्ञान अनेकदा विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे. ‘स्वातंत्र्यदिन’ हा ज्ञात-अज्ञात सैनिकांचा स्मरणदिन आहे. पुन्हा ही वेळ येऊ नये, या दिनी अशी जागरुकता व्हायला हवी आहे. कोणताही स्मरणदिन हा अनुकरण संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाच्या श्रद्धास्थानांचा आदर करणे आणि तो सहानभूतीने प्रकट करणे भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा आहे. याचं अवमूल्यन होता कामा नये. समाजातून जाणाऱ्या मंडळींची जागा कोणीतरी घेण्याची आवश्यकता असते. भारत ही परमेश्वराची भूमी आहे. इथल्या कणाकणामध्ये प्राण भरलेला आहे. इंग्रजांनी आणि इतरांनी ही भूमी लुटली पण इथला प्राण ते लुटू शकले नाहीत. सरांच्या या भावना विचार करायला लावणाऱ्या आहेत. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी दूरदृष्टी (व्हिजनिंग), नियोजन (प्लानिंग) आणि वचनबद्धता (कमिटमेंट) याला पर्याय नाही. ‘कमिटमेंटचा माणूस’ आपल्या ध्येयांशी, कामाशी आणि नातेसंबंधांशी वचनबद्ध असतो. पूर्णपणे समर्पित असतो आणि दिलेले वचन पाळतो. असा माणूस आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो. आम्हाला जाणवलेले वाचासिद्ध सरांचे व्यक्तिमत्त्व असे आहे. आपल्या आंजर्ले गावाची ‘कालाष्टमी’ न चुकवले सर, ‘आई वडिलांची उतारवयात सेवा करण्याचे लाभलेले भाग्य सर्वोत्तम’ असल्याचे नमूद करतात यातच सारं आलं. सरांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विपश्यना, मनशक्ती आदींचे प्रशिक्षण वर्गही जाणीवपूर्वक पूर्ण केलेले. विविध पुस्तकांचे नियमित वाचन करणारे सर अनेकांना भेट म्हणून पुस्तके देत आलेत. श्रीमारुती या देवतेच्या विशेष अभ्यासासह वंदेमातरम्, भारतीय संविधान, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांची ते उत्तम मांडणी करतात. इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासाचा विषय आहे. पण काही माणसं हा जणू अभ्यास सोबत घेऊन जन्माला आल्यासारखी वावरतात. अशी काही माणसं आम्ही सामाजिक क्षेत्रात वावरायला लागल्यापासून गेली तीसेक वर्षे जवळून अनुभवतो आहोत, त्यात सरांचा नंबर वरचा आहे.

सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर नववर्षारंभी, भेटण्यासाठी आम्ही वाचासिद्ध सरांकडे वेळ मागितली. सरांनी एका रविवारी शाळेतच बोलावले. वेळ दिली होती सायंकाळी सातची! मुख्याध्यापक कार्यालयात दीडेक तास आमच्या गप्पा झाल्या असतील. सरांचे अलोरे शाळेतील ज्येष्ठ सहकारी अरुण केशव माने (सर)आणि शशिकांत शंकर वहाळकर (सर) सोबत होते. या भेटीत सुरुवातीलाच सरांनी, ‘तुझ्यासाठी एक गोष्ट काढून ठेवलेय...’ म्हणत आपल्या कपाटातून एक फाईल काढली आणि आमच्यासमोर ठेवली. हातात घेतल्यावर लक्षात आलं, ‘ती फाईल म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या म्हणजे १९१८ सालच्या शाळेतील शिक्षकांचं ते वार्षिक पगारपत्रक होतं. त्यावर शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापकांपासून सर्व शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.’ कदाचित, रद्दीत जाऊ शकणाऱ्या कागदपत्रांतून सरांनी ही फाईल बाजूला केली होती. शाळा-शिक्षक-विद्यार्थी-पालक-संस्थाचालक या पंचसुत्रीत जीवनभर कार्यरत राहून सामाजिक स्तरावर परिणामकारक विचार रुजविणारे शिक्षक दिवसेंदिवस कमी होत चालेलत. वाचासिद्ध सर अशांपैकी आहेत. वाचासिद्ध सरांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी श्रीदेव भैरीबुवा चरणी प्रार्थना!

 

धीरज वाटेकर

चिपळूण

शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

नाथमंत्र ‘पुष्पांजली’ संकलनकर्त्यांना श्रद्धांजली !

महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त वरिष्ठ तहसिलदार, महाराष्ट्र नाथजोगी गोसावी समाज मुंबई यांच्या कार्यकारिणीवर सल्लागार म्हणून काम केलेले सुदन दाजी जाधव यांचे नुकतेच (४ जानेवारी) ८६व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य आज (१६ जानेवारी) सकाळी ११ वाजता पोलादपूर येथील निवासस्थानी होत आहे. आपल्या कार्यकाळात शासनाच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर कार्यरत राहिलेल्या, नाथमंत्र ‘पुष्पांजली’चे संकलन करणाऱ्या जाधव यांना वाहिलेली ही श्रद्धांजली!

आमच्या सासऱ्यांचे (अरुण दाजी जाधव) सख्खे भाऊ असलेल्या सुदन जाधव यांची आणि आमची ओळख विवाहादरम्यानची, २००९सालची! आमच्या विवाहाला ते सपत्नीक उपस्थित होते. सप्टेंबर २०११ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तेव्हा ‘पोरका करून गेलीस मजला, जगी माझे नसे कुणी’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या. या व्यक्तिमत्त्वाशी विवाहात झालेला प्राथमिक परिचय पुढे अधिक समृद्ध होत गेला. कित्येकदा भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी विविध विषयावर संभाषण व्हायचे. हे ते दिवस होते जेव्हा जाधव यांनी ‘नाथमंत्र पुष्पांजली’चं संकलन प्रसिद्ध करण्याचे मनावर घेतले होते. या अनुषंगिक विषयावर अनेकदा चर्चा झाली. या संकलनात त्यांच्या आई स्व. कृष्णाबाई दाजी जाधव यांचा मोठा सहभाग राहिलेला. ‘पुस्तके’ हा आमचा बालपणापासूनचा ‘वीक पॉईन्ट’. जाधव हे नाथ संप्रदायातील आणि त्यातही आपल्या नाथजोगी समाजातील प्रथा-परंपरा यांचे संकलन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आलेले. असे छोटे-मोठे दस्तऐवज हे कोणत्याही मुलभूत संशोधनासाठी सहाय्यभूत ‘लिखित साधने’ म्हणून महत्त्वाचे असतात. त्यामुळे आम्हाला जाधव यांच्या या संकलनाबाबत उत्सुकता होती.

जून २०१३ साली ही पुस्तिका प्रकाशित झाली. जाधव यांनी समाज बांधवांसाठी विनामूल्य उपलब्ध केलेली ही पुस्तिका आम्हालाही मिळाली. २०१४ साली आमच्या भावाच्या लग्नाला जाधव मुंबईहून बसचा प्रवास करून चिपळूणला आले. तेव्हाही त्या गडबडीत विविध गप्पा झालेल्या. पुढे काही वर्षे गप्पांचा हा सिलसिला सुरु राहिला. ते सारे संवाद आमच्या ‘मनी’ स्मरणबद्ध आहेत. आपला समाज अजूनही मागे आहे. नाथांनी दिलेले वाङ्मय आपण विसरत चाललो आहोत. कोकणात नाथपंथाचा प्रसार फारच थोडा झालेला आहे. असे जाधव म्हणायचे. नाथमंत्र हे नाथ संप्रदायातील शक्तिशाली सिद्ध मंत्र आहेत. या मंत्रांचा उपयोग प्राणायाम, ध्यान आणि कठोर साधनेत केला जातो. नाथांनी सार्वजनिक लोकवाणीला महत्व दिल्यामुळे भारताच्या प्रत्येक भागात आजही नाथपंथाचा प्रभाव दिसून येतो. या प्रभावाचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी आपणही योगदान द्यायला हवे, हा संदेश जाधव यांनी आपल्या संकलनातून दिलेला आहे.

‘जगाकडून एखाद्याने काही घेतलं म्हणून नाही तर त्याने जगाला काय दिलं या बद्दल त्याचा सन्मान होत असतो’ हे कॅल्व्हिन कूलिज यांचे उद्बोधन आपल्या पुस्तिकेच्या सुरुवातीला उपयोजिलेल्या जाधव यांची दृष्टी स्वच्छ होती. विचारपूर्वक त्यांनी ही पुस्तिका संकलित केली. एका चांगल्या आणि आवश्यक पुस्तिकेचे संकलनकर्ते म्हणून ते आमच्या सदैव स्मरणात राहतील.

 

भावपूर्ण श्रद्धांजली !

धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर

 


रविवार, ११ जानेवारी, २०२६

परखड शब्दात ‘कटूसत्य’ सांगणारे ‘निसर्गशास्त्रज्ञ’

२००८! आमच्या पहिल्या ‘चिपळूण तालुका पर्यटन’ पुस्तकाच्या प्रकाशनाची गुढीपाडव्याची तारीख निश्चित झालेली. पुस्तक स्वरुपात पहिल्यांदाच मजकूर प्रकाशित होणार असल्याने उत्सुकता, दडपण, वेळ कमी कामे फार अशी स्थिती. त्यातच ‘कोकण इतिहास पुरुष’ अण्णा शिरगावकर यांचा, ‘चिपळूणला एका निसर्ग कार्यशाळेला येत असून तिथे भेटायला या’, असा निरोप मिळालेला. १८ फेब्रुवारी २००८ रोजी अण्णांना भेटायला कार्यशाळेत पोहोचलेल्या आम्हाला पहिल्यांदा निसर्गशास्त्रज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सर भेटलेले. कालांतराने आम्ही ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांनी चालवलेल्या पर्यावरण जनजागरणाच्या चळवळीकडे वळलो. चळवळीच्या या वाटेवरून चालताना गत दोन दशकात अनेकदा गाडगीळ सरांच्या भेटी झाल्या. अत्यंत परखड शब्दात निसर्गविषयक ‘कटूसत्य’ सांगणारे गाडगीळ सर आमच्या सदैव स्मरणात राहातील.

 

१८ फेब्रुवारी २००८

कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता शाश्वत विकासाचा विचार लोकांसोबत राहून मांडणाऱ्या गाडगीळ सरांचे नुकतेच (७ जानेवारी) निधन झाले. पर्यावरण क्षेत्रात आयुष्यभरात दिलेल्या योगदानासाठी सरांना अलिकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला होता. गाडगीळ सरांना ऐकणं हा अफाट समृद्ध करणारा अनुभव असायचा. सर पर्यावरणाचा विचार हृदयापासून संदर्भासह मांडायचे. आम्हाला अनेकदा हा अनुभव घेता आला. सरांचा मराठी भाषा सौष्ठवाचा अभ्यासही दांडगा होता. याबाबतीतील विविध संदर्भही ते द्यायचे. २०१८ साली भूतानचा अभ्यास दौरा करण्यापूर्वी आम्ही सरांना भेटलेलो. तेव्हा सरांनी ‘निसर्ग पर्यटन’ संकल्पनेबाबत आपली परखड मते मांडली होती. ‘सह्याद्रीची आर्त हाक! - पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ हा वनराई ने प्रकाशित केलेला त्यांचा ग्रंथ आम्ही आमच्या आळंदीच्या पर्यावरण संमेलनात सहभागींना भेट दिला होता. सरांनी आपले हस्ताक्षर असलेले ‘उत्क्रांती एक महानाट्य’ हे प्रचंड वैज्ञानिक मूल्य असलेले पुस्तक मधंतरी भेट म्हणून पाठवलेले. सरांचे हस्ताक्षर असेलेला तो दस्तऐवज अमूल्य आहे. मध्यंतरी डॉ. गाडगीळ आणि डॉ. विजय एदलाबादकर यांच्या मार्गदर्शनखाली राज्यातील १५ गावांच्या जैवविविधता नोंदवह्या बनवण्याचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात आला. त्यात आम्ही पर्यावरण मंडळाने कोकणातील चिपळूण तालुक्यातील पेढे गावावर काम केलेले.

 

हस्ताक्षरांकित अमूल्य पुस्तक भेट. 

२०११ साली डॉ. गाडगीळ समितीने पश्चिम घाट संरक्षण व संवर्धनासाठी उपाय सुचविणारा अहवाल दिला. या अहवालाला भारताच्या पर्यावरण इतिहासात खूप महत्त्व आहे. नियोजनकर्त्यांना तो अहवाल गैरसोयीचा वाटला. म्हणूनच तर आजही पर्यावरणीयदृष्ट्वा संवेदनशील गावे आणि वाड्या-वस्त्या या श्रेणीतून वगळण्यासाठी आजही प्रयत्न सुरु असतात. या साऱ्या घडामोडीत गाडगीळ सरांनी आपली भूमिका एकदाही बदलली नाही. या अहवालात सरांनी म्हटलं होतं, ‘रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही आता प्रदूषणकारी प्रकल्पांना‌ जागा नाही.’ रत्नागिरी जिल्ह्यात, इटलीमधून हद्दपार करण्यात आलेली घातक विषारी रसायनिक पदार्थ बनवणारी 'मिटेनी एस.पी.ए.' ही रासायनिक कंपनी लोटे परशुराम एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिक या नावाने सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवरचे सरांचे जाणे अधिक वेदनादायी आहे. सरांनी वेळोवेळी व्यक्त केलेली मते ऐकून अनेकदा अनेकांच्या भुवया उंचावायच्या. वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबतची त्यांची भूमिकाही अशीच चर्चेचा विषय झालेली. सरांची यामागची भूमिका समजून घेण्यासाठी तेव्हा आम्ही, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे प्रतिनिधी त्यांना भेटायला गेलेलो. तेव्हा, ‘संविधानातील तरतुदीनुसार निसर्गाची चांगली व्यवस्था आणणं शक्य आहे. देशभर बागायतदारांना माकडांचा आणि शेती करणाऱ्यांना डुकरांचा त्रास होतो आहे. हिमाचल प्रदेशातही सफरचंदाच्या बागा पिकवणाऱ्या बागायतदारांना माकडांचा प्रचंड त्रास आहे. बागायतदार शेती-बागायती बंद करण्याच्या विचारापर्यंत आलेत. म्हणून वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करून पुन्हा शिकारीला परवानगी दिली पाहिजे! जगात कोणत्याही देशात अशी बंदी नाही. नियंत्रण न ठेवल्यास वन्यप्राण्यांची संख्या वाढेल. अर्थात शिकाऱ्यांना रान मोकळं होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे. सामान्य लोकांनी परंपरा जपल्यात. निसर्ग व्यवस्था पूर्वी लोकांनी सांभाळली. जिथे जिथे पर्यावरण संरक्षण आहे ते लोकांमुळे आहे. सामान्यांच्या विवेकबुद्धीला आपण मानायला हवं आहे. निसर्ग संवर्धनातून शाश्वत विकास साधताना स्थानिक लोकांना न्याय्य लाभही व्हायला हवा आहे. पैसे कमावण्याच्या हेतूने निसर्गाचा विध्वंस सुरु आहे. त्यावर निर्बंध आणायला हवा आहे. केरळातील दोन जिल्ह्यात लोकांनी जैवविविधता रजिस्टर बनवली. खाणीमुळे होणारे नुकसान लक्षात आणून दिले आणि केरळच्या हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. खाणींचे काम थांबवण्यात आले. अशी जागृती व्हायला हवी आहे. कायद्याचा तो उद्देश आहे. नाशिकमध्ये खाणीच्या कामामुळे गोदावरीच्या उगमाकडील ब्रह्मगिरी पर्वताच्या भागाचा मोठा विध्वंस सुरु होता. तो थांबवला गेला आहे. भारतीय संविधानातील चौकटींचा आधार घेऊन पर्यावरणीय जनजागृती व्हायला हवी आहे. संविधानाप्रमाणे पर्यावरण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या चांगल्या संधी आहेत.  शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरण संवर्धन कामात सहभागी व्हायला हवं आहे. जागृती कृतियुक्त असायला हवी’, अशी भूमिका सरांनी मांडली होती.

 

राळेगणसिद्धी - २०१६च्या  पर्यावरण संमेलनास
उपस्थित प्रमुख मार्गदर्शक 'पद्मभूषण' अण्णा हजारे,
पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ आणि स्वर्गीय वृक्षमित्र आबासाहेब मोरे

पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणाऱ्या सरांच्या आत्मचरित्रावर आम्ही आवर्जुन लिहिले. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा विश्वास उराशी बाळगून गाडगीळ सर हयातभर वावरले. त्यांचा तो विश्वास सार्थ ठरावा, ही निसर्गदेवतेच्या चरणी प्रार्थना. गाडगीळ सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

 

धीरज वाटेकर चिपळूण

  

स्व. गाडगीळ सरांचे आत्मचरित्र ‘‘सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी’’चा आम्ही लिहिलेला आणि दैनिक महाराष्ट्र टाईम्स ने प्रसिद्ध केलेला ग्रंथ परिचय - https://dheerajwatekar.blogspot.com/2024/03/blog-post_19.html

 





गुरुवार, १ जानेवारी, २०२६

चला, जपूया कोकण!


        नववर्षारंभपूर्व आठवड्यात तीन दिवस कोकणसह गोव्यात फिरत होतो. पर्यटकांनी भरलेल्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये चालकाने, ‘स्वर्गापेक्षा सुंदर आसा, आमचो ह्यो कोकण ! तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन !! असो आमचो ह्यो कोकण... !! ध्रु !!’ हे गीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी स्वतः संगीतबद्ध केलेलं, कोकणी भगिनींनी गायलेलं आणि लाखो व्ह्यूज मिळालेलं गाणं लावलं. गाडीत सर्वांनी एकच जल्लोष केला. पुढे गाडीतून उतरतानाही हेच गाणं ऐकून सफर पूर्ण करण्याची फर्माईश पूर्ण करण्यात आली. संवेदनशील मनानं कोकण भूमीविषयीची ही सर्वमान्य उत्कंठा तर टिपली पण याच दिवसात जाणवलेल्या कोकणपण हरवत नेणाऱ्या खुणांनी अस्वस्थताही आली.


पन्नास वर्षांपूर्वीच्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावातील बोअरवेलची जन्मकथा मोठी रंजक आहे. पाणी टंचाईने घेरलेल्या त्या गावात बोअरवेल मारण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला. पाण्याची जागा नक्की करून, अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी एका आठवड्याच्या गुरूवारी खूण म्हणून चुना टाकलेला मोठाला दगड आणून ठेवला. ज्या वाडीत ही बोअरवेल घ्यायची होती ती गावच्या मुख्य रस्त्यावर होती. गावचे ग्रामसेवक शनिवार-रविवारच्या जोड सुट्टीत आपल्या मूळगावी गेलेले असतानाच बोअरवेल कॉन्ट्रॅक्टर बोअर पाडण्यासाठी मूर्तवड्यात पोहोचले होते. दरम्यानच्या काळात त्या वाडीत लगोरीचा खेळ खेळणाऱ्या लहानग्या मुलांनी सर्व्हे अधिकाऱ्यांनी चुना टाकून खूण केलेला मोठाला दगड आपल्या खेळाचा भाग बनवला. मुलांनी तो दगड उचलून मुख्य रस्त्यालगत आणून ठेवला. वाडीतील मोकळ्या जागेत चुना टाकलेला दगड ही बोअरवेलच्या जागेचे खूण याची जाणिव असलेल्या कॉन्ट्रक्टरने, पूर्वीच्या सूचनेप्रमाणे सोमवारी पहाटे बोअरींग मारायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी आपल्या कामावर रूजू होण्याकरिता ग्रामसेवक आले. पाहातात तर बोअरवेलचे काम बरेच पुढे गेलेले आणि जागाही बदललेली! ग्रामसेवकांनी संबंधितांना विचारणा केली. ‘जेथे पांढरा दगड ठेवलेला होता तेथे आम्ही बोअरींग मारायला सुरूवात केली’, असे उत्तर संबंधित कॉन्ट्रक्टरने दिले. तोवर याठिकाणी पाण्याचा चांगलाच उद्भव असल्याच्या अनुमानापर्यंत कॉन्ट्रक्टर पोहोचला होता. बघताबघता रस्त्यानजीकच्या त्या चुकीच्या जागेवर पाणी लागले. नियोजनाप्रमाणे पाण्याची उपलब्धी आणि बोअरींगची खोली पूर्ण झाल्यानंतर बोअरींग कॉन्ट्रक्टर निघून गेले. रस्त्याशेजारी बोअरवेल मारल्याचे पाहून रस्ते विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली. गावच्या पाण्याचा स्त्रोत रस्त्याला आडवा येत असल्याची ती तक्रार होती. अर्थात या सर्व प्रकाराला ग्रामसेवकांना जबाबदार धरण्यात आलं. प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्ते आणि बांधकाम विभागाने मूर्तवडे ग्रामपंचायतीवर आणि ग्रामसेवकांवर केस टाकली. संपूर्ण गाव ग्रामसेवकांच्या बाजूने उभा राहीला. त्यांचे वकीलपत्रही तालुक्यातील नामवंत वकिलांनी स्वीकारले. वर्षभर ही केस चालली. अंतिम टप्प्यात ग्रामसेवकांच्या वकिलांनी न्यायाधीशांसमोर युक्तीवाद केला, ‘जमीनीत ज्या ठिकाणी पाणी असते, तेथूनच ते घ्यावे लागते. रस्ता कोठूनही प्रयत्न करून फिरवून नेता येऊ शकतो.’ या युक्तीवादावर न्यायाधीशांचे मत अनुकूल बनले. केसचा निकाल ग्रामसेवकांच्या बाजूने लागला. हा प्रसंग आम्ही २०१६ साली लिहून प्रकाशित केलेल्या ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ या पुस्तकात नोंदवलेला आहे. ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ हे पुस्तक ८६वर्षे वयाचे सेवानिवृत्त ग्रामसेवक दत्ताराम (आबा) महाडीक यांची ती जीवनकथा आहे. दुर्दैवाने असा न्याय गोदावरी किनारी वसलेल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमी नाशिकच्या तपोवनात मागच्या दहा वर्षात जन्माला आलेल्या आणि निसर्गत: वाढलेल्या झाडांना मिळाला नाही. उलट परिणामस्वरूप बीड जिल्ह्यातील सह्याद्री देवराई जाळण्यात आल्याच्या आरोप समाजमाध्यमातून करत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. ही घटना प्रातिनिधिक असली तरी कोकणातही हेच सुरु आहे. तीन दिवसांच्या प्रवासावरून परतताना वाटुळ (राजापूर) ते साखरपा (संगमेश्वर) दरम्यान रस्त्याशेजारी ठिकठिकाणी वृक्षतोड केल्याचे दिसले. पोटतिडीकीने समाजमाध्यमात वृक्षतोडीची छायाचित्रे प्रसूत केल्यावर एका ठिकाणी, ’...अशाप्रकारे झाडं तोडणं गरजेचे आहे. तोडलेल्या झाडांच्या ठिकाणी पुन्हा नैसर्गिकरित्या झाडे आणि झुडपी जंगले चांगली तरारून उभी राहतात. ग्रामीण भागातल्या माणसाला चार पैसे मिळण्यासाठी हे करावे लागते. झाडं तोडल्यामुळे अनेक लोकांच्या भुकेची सोय झालेली आहे, मला याबद्दल कधी वाईट वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया आली. पुढे लिहिलं होतं, ‘झाडांबद्दल कळवळा असणारे लोक शहरात राहतात. इको फ्रेंडली स्टिकर लावून पर्यटनाच्या नावाने दूरदूरच्या गावात कार्बन मोनॉक्साईड सोडतात. दारूपार्टी करतात. स्वतः गावात राहत नाहीत. गावातल्या लोकांना शिकवण्याचं काम मात्र करतात.’ ही प्रतिक्रिया वाचून झाल्यावर मागील तीन दिवसातील कोकण आणि गोव्यातील घटनाक्रम पुन्हा आठवला.


नववर्ष स्वागत निमित्ताने कोकण आणि गोवा हाऊसफुल्ल आहे. ही गर्दी कोकणाला नवीन नाही पण झेपेनाशीही झाली आहे. मालवण सारख्या पर्यटन शहरांच्या अरुंद रस्त्यावर होणारी गाड्यांची गर्दी प्रचंड आहे. या पर्यटनातून येणारा कचरा भयंकर समस्या आहे. गर्दीच्या वातावरणात आम्हाला त्याकडे बघायला वेळही नसावा. अशा स्थितीत, ‘चला जपूया, आपलं कोकण!’ म्हणणं धाडसाचं ठरावं! पण हे धाडस दाखवत आपल्याला यावर मार्ग शोधावाच लागेल. कोकणातील खड्डया-खड्डयातील रस्त्यांवरून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाची तमा न बाळगता गर्दी करणारं मानवी मन कोकण भूमीला स्वच्छ ठेवण्याची भूमिका घेताना दिसायला हवं! तरच, ‘साधीभोळी आम्ही कोकणची माणसा, जगताव सुखाचो क्षण!’ ह्या गीतकारांच्या पवित्र भावना ‘पर्यटनदृष्ट्या’ अबाधित राहातील. यासाठी कोकणातील सुखाचे क्षण अबाधित ठेवण्याची, कोकण अस्वच्छ न करण्याची शपथ कोकणात पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येकाने नववर्षारंभाच्या निमित्ताने घ्यायलाच हवी!

 

धीरज वाटेकर, चिपळूण

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८

(कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या धीरज वाटेकर यांची पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली २८ वर्षे ते पत्रकारम्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)



शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

नीलिमा पक्ष्याची दुसऱ्यावर्षी एकाच जागी वीण!



            नीलिमा (Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्यावर्षी आमच्या परसदारातील हॉलच्या खिडकीच्या डाव्या कोपऱ्यावर विश्वास दाखवला. सर्वसाधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा विणीचा हंगाम असलेल्या या पक्ष्याने परसदारी गतवर्षी (२०२४) २३ जूनला पहिले अंडे दिले होते. त्याच ठिकाणी यावर्षी (२०२५) २६ मेला अंडे दिले गेले. नीलिमा पक्ष्याने गतवर्षी १७ जुलैला तर यंदा २० जूनला आपला विणीचा हंगाम पूर्ण केला आणि पिल्ले घरट्यातून आकाशी उडाली. या पक्ष्याचा गतवर्षीचा विणीचा हंगाम २५ दिवसांचा होता. यंदाचा हंगाम २६ दिवसांचा राहिला. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या हंगामासाठी गतवर्षीच्या जागेचीच निवड केल्याने महिनाभर आमच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता.


जवळपास पक्षी घरटं बांधताना छद्मवेश (camouflage) धारण करत असतात अर्थात स्वतःचे खरे स्वरूप लपवत असतात. यंदा घराच्या खिडकीत सलग दुसऱ्यांदा निलीमाचं घरटं बांधून पूर्ण होईपर्यंत आम्हालाही या घरट्याबाबत लक्षात आलं नव्हतं. टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा पक्षी. जेमेतेम ६ इंच/ १५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव निलीमा असे आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि जंगलातही आढळतो. निलीमा पक्षी निळ्या रंगाचा असून त्याच्या मान-गळ्याला नारंगी रंग आहे. पोटाखालचा भाग पांढरा असतो. याची मादी फिकट रंगाची असते. हा पक्षी उडणाऱ्या माश्या आणि कीटकांसह जमिनीवरचे किडेही खातो. लालसर तपकिरी ठिपके असलेली याची अंडी असतात. आमच्या परसदारी यावर्षी पक्ष्याने २६जूनला पहिले अंडे दिल्यावर सलग दोन दिवसात आणखी दोन अंडी दिली. २९ तारखेला अंडं दिलेलं नव्हतं. या पक्ष्याने चौथं अंडं ३० तारखेला दिलेलं दिसलं. ६ जूनच्या रात्रीपासून घरट्याजवळ टकटक आवाज येऊ लागला होता. पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी जवळ आल्याचा तो संकेत होता. दोन दिवस असेच निघून गेले. ९ जूनला तीन अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतला. एक पिल्लू अंड्यात आहे असे वाटलेले. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. गेल्यावर्षी नीलिमाने चार पिल्ले दिलेली, यंदा मात्र अंडी चार घातलेली असताना पिल्ले मात्र तीनच जन्मली.

 


नीलिमाने अंडी घालायला सुरुवात केल्यापासून कोकणात अवकाळी पाऊस बरसू लागलेला. आता पावसाने जोर धरला होता. त्यातच पिल्ले जन्मलेली. कसं होणार? असं उगाचच वाटत असताना १७ जूनला पिल्लांना भेटायला सूर्यदेव आलेले. सूर्याची किरणे पिल्लांवर पडल्यावर इवलीशी पिल्ले खूपच लोभस दिसत होती. पिल्ले तशी मोठीही झालेली. गतवर्षी चार पिल्ले एवढ्याशा घरट्यात आनंदाने राहिलेली होती. पिल्लांच्या घरट्यातील हालचालींवरून यंदा तीन तरी राहतील का? असा प्रश्न पडलेला. तसंच झालं. १८ जूनला सायंकाळी एक पिल्लू घरट्यातून खाली कुंडीत पडलं. नर-मादी आजूबाजूला घिरट्या घालत होती. पिल्लाला उचलून घरट्यात ठेवणे आवश्यक होते. पण नर-मादी अंगावर येण्याची शक्यता होतीच! त्यात घरटे पिल्लांना कमी पडत असेल अशीही शक्यता वाटलेली. म्हणून याच हंगामात बुलबुलने उपयोग करून सोडलेल्या घरट्याला खिडकीत ठेवले आणि त्यात हे पडलेले पिल्लू ठेवले. थोड्यावेळाने नीलिमा आली. तिने पिल्लाला पाहिलं, अन्न दिलं. एवढं सगळं करूनही दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी, १९ जून रोजी सकाळी ते पिल्लू पुन्हा खाली पडलेलं दिसलं. आता त्याच्या जगण्याची शक्यताही आम्हाला कमी वाटू लागलेली. पण आपण शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत, असं मनाशी म्हणत खाली पडलेल्या पिल्लाला उचलून पुन्हा घरट्यात ठेवलं. पिल्लू घरट्यातून खाली पडताना घरटंही बाहेरच्या बाजूला कलंडलेलं दिसलं होतं. म्हणून खिडकीच्या लोखंडी ग्रीलजवळ दोन्ही घरट्यांना एक आडोसा उभा केला. दुपारी पाहिलं तर ते दुखापत झालेलं पिल्लू आपल्या मूळ घरट्यातून जाऊन परत नव्या घरट्यात येताना दिसलं. काहीसं तरतरीत झालं असावं. सायंकाळी तिन्ही पिल्लांचे सतत आवाज करणे, घरट्याच्या वरती येऊन बसणे सुरू झालेले. त्यांची चुळबूळ वाढलेली जाणवत होती. वाढलेली चुळबुळ खरी ठरली. एकेक करून २० जूनला तीनही पिल्ले घरट्यातून उडाली. घरट्यातून दोनदा खाली पडलेल्या पिल्लाने मात्र आकाशी झेप घ्यायला इतर दोन पिल्लांपेक्षा किमान चारेक तास अधिक घेतले असतील. तीनही पिल्ले आनंदात-समाधानात असल्याची खात्री करून आम्ही आमच्या कामात गुंतलो. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्या वर्षी आपल्या परसदारावर दाखवलेला विश्वास पुढील वर्षी कायम राहील का? की पक्षी जागा बदलेल? हे समजण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पाहायला हवी!

 


परसादारातले पशु-पक्षी- झाडे आम्हाला माणसाळलेले जाणवतात. दारातील झाडे एकमेकांशी बोलतात. आपल्या भावना आम्हालाही सांगू पाहातात, असे वाटते. त्यांच्याकडे लक्ष नही दिले तर झाडे-निसर्ग पोरका होतो. माडांना तर माणसांचा सहवास लागतच असावा. क्वचित प्रसंगीही नारळ कधी कुणाच्या डोक्यात पडल्याचे ऐकिवात नाही. आपल्या असण्याचा आनंद झाडेही साजरा करत असावीत. म्हणूनच तर आम्ही आमचा सवडीचा वेळ बऱ्याचदा झाडांसोबत घालवतो. उन्हाळी हंगामाच्या शेवटी आणि पावसाळ्यापूर्वी शासकीय कर्मचारी ज्या निर्दयतेने झाडाच्या कुंपणाबाहेरील-रस्त्यावरील फांद्या तोडतात ते पाहून खूप वाईट वाटतं. कारण कदाचित याच फांद्यांचा नव्याने जन्मा येणाऱ्या पाखरांना आधार मिळणार असतो. परसदारी निवडुंग कुळातील ब्रम्हकमळाच्या फुलण्याच्या वेळचा आनंद तो काय वर्णावा? आत्मिक सुखाची कल्पना याहून वेगळी ती काय असावी? त्याक्षणी लाभलेला आनंद वेगळा असतो. आम्ही तर या फुलाचे बहरणे साजरे करतो. पहाटे हे फुल कोमेजणार हे माहिती असते. तरीही आम्ही त्या फुलातील सौंदर्य भरभरून न्याहाळतो. कारण निसर्ग आपल्याला भावनांचे असे उमाळे जगायला देत असतो. परसदारातील साऱ्या पक्ष्यांच्या विणीचेही तसेच असते.

 


खरंतर परसदारी यावर्षी विणीच्या हंगामात एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल चार पक्ष्यांनी आपला संसार थाटण्याचा प्रयत्न केलेला. नीलिमा पक्ष्याने तर यंदा परसदारी त्याच ठिकाणी सलग दुसऱ्यावर्षी घरटे केलेले. अर्थात सर्वच पक्ष्यांचा विणीचा हंगाम यशस्वी होऊ शकला नाही. काहींनी आपणहून घरटे अर्धवट सोडले. काहींची वीण दुर्दैवाने अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यापूर्वीच संपुष्टात आली. मात्र असे असले तरीही अपवादालाही विशेष झाडी नसलेल्या चिपळूण शहरातील खेंडीतील वास्तव्यात मागील १६ वर्षांत विविध छोट्या पक्ष्यांना आपल्या हक्काचा अधिवास-आधार वाटावा असं नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे ही घटना सांगत होती. आपल्या परसदारावर, इथल्या निसर्गावर आणि आजूबाजूच्या साऱ्या परिसरावर विणीच्या हंगामासाठी पक्ष्यांनी पसंतीची मोहर उमटवली होती. भक्तीचा उंबरठा घेऊन निवासी वास्तूत वावरणाऱ्या आम्हाला आकांक्षांचे पंख घेऊन आकाशी उडालेली पिल्ले पाहाताना झालेला आनंद शब्दातून व्यक्त होण्यापलिकडला राहिला.

 

धीरज वाटेकर, चिपळूण


२६ मे २०२५ - चिपळूणच्या खेंड येथील निवासी वास्तूमधील हॉलच्या 
खिडकीतील डाव्या कोपऱ्यात नीलिमा पक्ष्याने केलेले घरटे






२६ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले पहिले अंडे

२७ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले दुसरे अंडे

२८ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले तिसरे अंडे

३० मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले चौथे अंडे

९ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले


११ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले

१० जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले

१७ जून २०२५ नीलिमा पक्षी आपल्या पिल्लांसह

१८ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले

२० जून २०२५ - घरट्यातून उडालेल्या पिल्लासह नीलिमा पक्षी

नीलिमा पक्षी





एका निरलस सेवेची गाथा

 श्रीमती विठाबाई श्रीपत भोसले (आक्का) यांचे नुकतेच (२७ मार्च २०२६) घोणसरे येथील ‘विजयश्री’ हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झ...