शनिवार, १४ एप्रिल, २०१८

‘अलोरे हायस्कूल अलोरे’ नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने...

निर्णय घेणा-या खूर्चीतील अधिकारी व्यक्ती ‘काहीतरी वेगळं’ करून दाखविण्याच्या स्वप्नाने झपाटलेली असेल तर ती व्यक्ती आपल्या कार्यकाळात किती उत्तम काम उभे करू शकते ? याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूल अलोरे या एकाच शाळेचे रत्नागिरी जिल्हास्तरावर सर्वाधिक काळ म्हणजे २७ वर्षे ७ महिने १९ दिवस ‘मुख्याध्यापक’ म्हणून (सन १९७२-२०००) कार्यरत राहिलेल्या, ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर’ या शिस्तप्रिय मुख्याध्यापकांचे नाव त्याच शाळेला देण्याचा नामकरण समारोह नुकताच गेल्या शुक्रवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या प्रांगणात, ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध ‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, सन १९७२ च्या पहिल्या बॅचचे माजी विद्यार्थी, निवृत्त नौसेना अधिकारी गुरुदत्त साळोखे, शाळेला बोर्डाच्या यादीत पहिले यश मिळवून देणारी जयश्री कुलकर्णी-वाळिंबे, सीए वसंतराव लाड यांचे ज्येष्ठ सुपुत्र परीक्षित लाड, देऊळ, वळू या ‘राष्ट्रपती’ पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे निर्माते उमेश कुलकर्णी, जि. प. सदस्य विनोद झगडे, सरांच्या पत्नी श्रीमती शुभदा आगवेकर, मुलगा अमित आणि नचिकेत आगवेकर, संस्थाध्यक्ष डॉ. विनय नातू, कार्याध्यक्ष प्रकाश गगनग्रास, मुख्याध्यापक उमेश पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्या निमित्ताने आगवेकर सरांच्या कारकीर्दीचा हा थोडक्यात आढावा...! 
मुंबईहून गोव्याला जाताना सावर्डेच्या पुढे निवळीफाटा ओलांडल्यावर लागणाऱ्या ‘आगवे’ गावचे सर मूळ रहिवाशी ! ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’चे ‘संस्थापक-संवर्धक’ राहिलेले शिक्षक कै. नागेश प. पोटे हे सरांचे आजोबा. त्यांच्या कन्या सत्यभामा या सरांच्या आई होत. सरांचे वडील आत्माराम‘नाना’ हे व्यवसायाने गावातील प्रगतशील शेतकरी होते. उभयतांना, २ मुलगे आणि ५ मुली अशी ७ अपत्ये झाली, पैकी मोरेश्वर हे ६ वे अपत्य होय. त्यांचा जन्म दिनांक ८ मार्च १९४२ रोजी झाला. मोठाल्या, कौलारू, मातीच्या विटांनी बनविलेल्या, सारवलेल्या भिंती, जमीन, चारही बाजूंनी पडव्या असलेल्या सुगंधी घरात या भावंडांचे बालपण गेले. घरात गाई-म्हशी, भरपूर दुध-दुभते असायचे, सारे कोणालाही न विकता घरीच वापरले जायचे. त्यामुळे हातात रोख रकमेचा अनेकदा अभाव असायचा. परंतू प्रगत शेती हेच श्रीमंतीचे लक्षण मानले जाणारा तो काळ होता. लहानपणापासून अध्यात्मिक आवड, आणि डावखुरे असूनही दोन्ही हातांनी लिहिण्याची सवय, शालेय विषयात गणिताची विशेष गोडी असलेले मोरेश्वर पुढे गणिताचे शिक्षक म्हणून नावाजले गेले. चतुर्मासात गावातल्या श्रीलक्ष्मी-नारायणाच्या देवळातले कार्यक्रम त्यांना विशेष प्रिय ! अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मोरेश्वरना पुढे शिकवणे घरच्यांना शक्य होत नसताना बहिणींनी त्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. आपले बी.एस्सी. बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला संगमेश्वर, दाभोळ येथे काही काळ नोकरी केल्यानंतर सन १९६८ साली सर चिपळूणच्या ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’च्या युनायटेड हायस्कूलमध्ये नोकरीला लागले. यानंतर मूळचे कोल्हापूरचे, परंतु नोकरी निमित्ताने बरेचसे आयुष्य सांगलीत घालविलेले, तिथल्या एका माध्यमिक शाळेचे शिक्षक गणेश नरसिंह कुलकर्णी आणि मूळ मिरजच्या रहिवाशी, इंदूमती या दाम्पत्याच्या पोटी दिनांक २१ मे १९४९ रोजी जन्मलेल्या २१ वर्षे वयाच्या बी.ए.बी.एड. झालेल्या ‘शुभदा’ यांच्याशी २८ वर्षांचे मोरेश्वर दिनांक १३ डिसेंबर १९७० साली विवाहबद्ध झाले. परशुराम एज्युकेशन सोसायटीची अलोरेत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर, ‘त्या शाळेची मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी कोण घेणार?’ या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात मोरेश्वर आगवेकर यांचे नाव पुढे आले. सोमवार, दिनांक १२ जून १९७२, अलोरे हायस्कूल अलोरेचे मुख्याध्यापक म्हणून आलेली नवीन जबाबदारी घेऊन ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर’ हे युनायटेड इंग्लिश स्कूलचे बी.एस.स्सी.,बी.एड. पर्यंत शिक्षण झालेले गणिताचे शिक्षक, साधारण दुपारच्या १२ वाजताच्या सुमारास अलोरे बसस्टॉपवर उतरले. सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केव्हाच उत्साहात संपन्न झाला होता. अलोरेत शाळा सुरु व्हावी म्हणून अलोरेचे सरपंच राहिलेले गणपत दाजी देवरे, नागवेचे शंकरराव पालांडे, राजाराम पालांडे, पेढांबेचे दौलतराव शिंदे, खडपोलीचे दत्तोपंत बापट यांच्यासह स्थानिक पालक आणि ग्रामस्थांचे सहकार्य होते. दरम्यान कोणीही शिक्षक नाही म्हटल्यावर जमलेले आठव्या इयत्तेतील जवळपास ६४ विद्यार्थी आणि २१ विद्यार्थींनी घरी जायला निघाले होते. घरी जाणा-या विद्यार्थ्यांची आणि मोरेश्वर आगवेकर सरांची शाळेच्या वर्गाबाहेरच गाठभेट झाली आणि, ‘चला रे सगळ्यांनी !’ म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना शिंदे कॅन्टीन जवळच्या, भूकंपपिडीतांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या, उपलब्ध पत्र्याच्या शेडमधील इमारतीतील ३ पैकी २ वर्गात नेऊन बसविले. ‘या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता...’ या सरस्वती वंदनेचे स्वर, सह्याद्रीच्या त्या विशाल डोंगराच्या कपारीतील ‘बोलादवाडी’ या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या कोळकेवाडी धरण प्रकल्प क्षेत्रातील ‘अलोरे’च्या निसर्गरम्य वातावरणात ऐकू आले आणि गेल्या ४६ वर्षांत देश-विदेशात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी घडविणाऱ्या, अनेकांच्या आयुष्यातील ‘सोनेरी पान’ ठरलेल्या अलोरेची शाळा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-याच्या परवानगीने सुरु झाली.
सुरुवातीला या तीन शिक्षकी शाळेत २९ वर्षे वयाचे मुख्याध्यापक आगवेकर सर, २३ वर्षे वयाच्या आगवेकर मॅडम आणि गावकर आडनावाच्या २१ वर्षे वयाच्या बी.एस.स्सी. शिकलेल्या शिक्षिका कार्यरत होत्या. कोयना प्रकल्पातील अधिकारी आणि कर्मचा-याच्या मुलांच्या सोयीकरिता अलोरेच्या पूर्वी सन १९६९ साली संस्थेची पोफळीतही शाळा सुरु झाली होती. इयत्ता ८ वीचा एक वर्ग, ३ शिक्षक, १ लिपिक, १ शिपाई आणि तुटपुंजे शैक्षणिक साहित्य घेऊन, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याचे, कोळकेवाडी धरण आणि बोलादवाडी पॉवर हाऊसचे काम सुरु झाल्यावर शासनाने वसविलेल्या ‘अलोरे वसाहत’ करिता मुख्यत्वे शाळा सुरु झाली. शाळेत विद्यार्थ्यांसोबत स्वत: विद्यार्थी होऊन आगवेकर सर कार्यमग्न असत. शाळा भरायच्या वेळेस स्वतः घंटेच्या खालीच ते उभे असायचे, त्यांचा हा शिरस्ता नंतर शाळा नव्या इमारतीत आल्यावरही निवृत्तीपर्यंत कायम राहिला. विद्यार्थी आणि शिक्षकांपैकी कोण-कोण उशिरा येतंय, यांसह सर्वजण वर्गात जाऊन प्रार्थना सुरु होत नाही तोपर्यंत सरांचे बारीक लक्ष असायचे. शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने पहिल्याच वर्षी ‘पालक शिक्षक संघ’ स्थापन झाला, ‘शाळेची सर्वांगीण प्रगती’ हेच एकमेव ध्येय होते. आगवेकर सर स्वतः अगदी जिद्दीने ही शाळा उभी करायचीच अशाच प्रयत्नात होते, पण काही वेळा त्यांनाही निराश व्हावे लागायचे, शाळा चालविणे हे तितके सोपे काम नक्कीच नव्हते. या साऱ्यांतून एके दिवशी  ‘आपल्याला हे नक्की झेपेल का ?’ अशी शंका त्यांच्या मनात डोकावली. मनातल्या विचारांना मनातच दाबून काम करणे शक्य होणार नाही याची जाणीव असल्याने त्यांनी आपल्या मनातील ही भावना संस्थाचालकांनाही बोलून दाखविली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात सर्वाधिक काळ एकच ‘मुख्याध्यापक’ लाभलेली आणि प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली शाळा हा नावलौकिक मिळविण्यासाठी अलोरे शाळा सज्ज झाली होती.
नव्याने शाळेची गणिते जुळवू पहाणाऱ्या आगवेकर सर, शिक्षण क्षेत्रातील एखाद्या जाणकार व्यक्तिमत्वाच्या शोधात असताना त्यांना ५६ वर्षे वयाचे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लाभलेले, गांधीवादी विचारसरणीचे बी.एस.स्सी.,बी.एड., एम.एड. पर्यंत शिक्षण झालेले, पुढे किंचितसा सोगा सोडलेले पांढरे स्वच्छ धोतर, अंगात सैलसर सदरा नि डोक्यावर पांढरी टोपी परिधान करणारे माधव नारायण कुलकर्णी नावाचे शिक्षक गवसले. आगवेकर सरांना त्यांच्याविषयी कमालीचा आदर राहिला. त्यामागे वयाबरोबरच स्वत: विज्ञान शिक्षक असूनही इंग्रजी, मराठी, संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. यांसह शाळेतला कोणताही विषय शिकवायची तयारी आणि संपूर्ण शालेय व्यवस्थापन याबाबतीतील त्यांचे असलेले ज्ञान ही कारणे होती. या मा. ना. कुलकर्णी सरांचे योगदान पाहून आगवेकर सर शाळेतील शिक्षकांच्या ‘तासिके’ची पाहणी करायला त्यांना सांगत असत. याच दरम्यान, पूर्वी संगमेश्वर-माखजनच्या शाळेत मुख्याध्यापक राहिलेले पु. वि. जोशी हेही कार्यरत झालेले होते. गो. रा. कुलकर्णी नावाचेही एक शिक्षक होते, तेही अलोरेत येण्यापूर्वी कुठेतरी मुख्याध्यापक होते. फार थोडा काळ बर्वे नावाचे पूर्वी मुख्याध्यापक राहिलेले शिक्षक अलोरेत येत होते. कितीतरी वेळा शाळेत प्रतिकूलता निर्माण झाली पण म्हणून त्याचा परिणाम इतरत्र कुठेही वा घरात जाणवला नाही. ‘शाळेचा व्याप आहे माझ्या डोक्यात तो असू देत, पुन्हा घरी आल्यावर तो नको’ असं ते म्हणायचे. शाळेत शाळा आणि घरात घर हे गणित सरांनी १९७३ साली वर्षी जमवले आणि अगदी सन २००० पर्यंत सांभाळले. मा. ना. कुलकर्णी सरांनी अगदी सुरुवातीला आगवेकर सरांना सुचविले होते, ‘शाळा सुरु होण्याच्या आधि किमान १० मिनिटे मुख्याध्यापक शाळेत हजर असलेच पाहिजेत’ आगवेकर सरांनी ते तत्व आयुष्यभर जपले. तीन मुख्याध्यापक आणि गुरूंचे गुरु मा. ना. कुलकर्णी या वयाची पन्नाशी केव्हाच ओलांडलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात ३१ वर्षीय आगवेकर सरांच्या ‘मुख्याध्यापक’ पदाची कसोटी सुरु होती. पुढच्या काळात या कसोटीवर सर किती खरे उतरले याची साक्ष देणारे दिनांक २ जानेवारी १९९७ चे एक पत्र आजही उपलब्ध आहे. या पत्राचा विषय अलोरे शाळेत संगीत वर्ग सुरु करणे हा असून, त्यासाठी आलेल्या अर्जावर, संस्थाचालकांकरिता आपला हस्तलिखित शेरा लिहिताना शेवटच्या ओळीत आगवेकर सरांनी, ‘कृपया आपण मान्यता देणेत कोणतीच अडचण नाही’ असे म्हटले आहे. हे वाक्य लिहिण्यासाठी लागणारा आत्मविश्व्वास सरांनी आपल्या मेहनतीने कमावला होता.
पुढच्या काळात उत्तम अध्यापनाशिवाय इतर कार्यात आघाडीवर राहणाऱ्या असंख्य हुशार, नवतरुण, उत्साही, कर्तृत्ववान आणि झपाटलेल्या शिक्षकांची टीम सरांनी जमविली. अलोरे शाळेने महाराष्ट्राच्या शालेय इतिहासात जे दखलपात्र यश प्राप्त केले त्यात या शिक्षकांचा आणि त्यांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या मुख्याध्यापक आगवेकर सरांचा रोल महत्वाचा राहिला. स्वत: शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांनी शाळेतही शेतीचे अनेक प्रयोग केले, विद्यार्थ्यांना कमवा शिका योजनेचे महत्त्व पटवून दिले. शेतक-याच्या मुलांबाबत विशेष कणव होती. सन १९७३-७४ साली त्यांनी नव्याने शाळेत आलेल्या बचॅमधील काही मुले निवडली आणि त्यांच्या मदतीने आजूबाजूच्या गावातील शेतक-याच्या मुलांचा शोध घेतला होता. या लांबच्या मुलांना त्याकाळी रोजचा एवढा चालून करावा लागणारा प्रवास लक्षात घेत त्यांनी मुलांची, क्वचित मुलींचीही रात्रीची शाळेतच राहण्याची व्यवस्था केली होती. २४ तास शाळा जगणारे सर स्वतःही रात्री-अपरात्री शाळेत येत असत. सरांचे कर्मचारीही सोबत असत. बाहेरच्या या सा-या मुलांमधील तब्बेतीने चांगला असलेल्या मुलाला सर रोज घरी पाठवित, हा विद्यार्थी दुस-या दिवशी शाळेत येताना उर्वरित विद्यार्थ्यांचे डबे सोबत आणीत असे. हे वाचायला जितकं सोपं वाटतंय, प्रत्यक्षात ते तितकं सोपं मुळीच नव्हत, पण ‘आगवेकर’ नावाच्या सरांचं हेच तर वैशिष्ट्य होत. जे हळूहळू लोकांना समजू लागलं होतं, सरांच्या याच स्वभावामुळे पंचक्रोशीतील अनेकांनी सरांना आपलं मानलं होत. त्याकाळी कोयना प्रकल्पातल्या अनेक कर्मचाऱ्यांना ११ वी पास झाल्याशिवाय पुढील प्रमोशन मिळत नव्हते, कर्मचा-यांचे नुकसान व्हायचे. संघाच्या संस्कारातून तयार झालेल्या सरांनी सामाजिक जाणीवेतून या अशा लोकांसाठी त्यावेळी शाळेत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ११ वीचे जुन्या अभ्यासक्रमानुसार विशेष वर्ग, प्रकल्पात शेजारच्या कर्नाटक राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांकरिता १० वीच्या ‘मराठी’ भाषेचे वर्ग शाळेने चालविले. सन १९७५ साली शाळेच्या पहिल्या एस.एस.सी. बॅचचा निकाल ८० टक्के इतका सर्वोच्च लागला. शाळेची राणीदेवी सुमेरचंद अगरवाल ही ७०० पैकी ५७७ (८२.४२ टक्के) गुण मिळवून चिपळूण केंद्रात पहिली आली. शालेय विद्यार्थ्याचा अगदी आई-बापाप्रमाणे, किंबहुना किंचितसा त्याहूनही अधिक विचार करणारे, मुलांचा सांभाळ करणारे व्यक्तिमत्व म्हणून, सतत काळी पँट आणि किंचित पांढरा ढगळा शर्ट परिधान करणारे आगवेकर सर एव्हाना पंचक्रोशीत लोकप्रिय झालेले होते. याच दरम्यान त्यांना ‘बाबा’ आगवेकर हे मिळालेले नामाभिधान त्याचेच सार्थस्वरूप होय.
माजी विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासह सन १९७८ पासून शाळेने आपले स्नेहसंमेलन घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या पटावरील एकूण विद्यार्थ्यांपैकी किमान २५ टक्के विद्यार्थी स्टेजवर यायलाच हवेत, यासाठी सर आग्रही असायचे. अलोरे सारख्या लहान गावात राहणा-या विद्यार्थ्यांना लांब पल्याच्या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षणीय स्थळे पाहाता यावीत यासाठी आगवेकर सर एस.टी.ची बस मध्यरात्री १२ वाजता सोडायचे. वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करता साहित्याची जमवाजमव करण्यापासून त्याच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा सन १९८० साली शाळेत उभारण्यात आली. शाळेचे पहिले स्वतंत्र स्नेहसंमेलन दिनांक १२ ते १४ ऑक्टोबर १९८१ ला के. पु. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तात्यासाहेब नातू हे स्वतः शैक्षणिक चळवळीशी खूप वर्षे संबंधित आणि कष्टाची पारख असलेले, मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व असल्याने, त्याचा आगवेकर सरांना खूपच चांगला उपयोग झाला. रामचंद्र गणेश खोत हे शाळेत सन १९७५-७६ च्या दरम्यान दाखल झालेले व्यक्तिमत्व पुढे शिष्यवृत्ती परीक्षांच्या विषयात जिल्ह्यात अग्रक्रमाने नावाजले गेले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेने जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत येण्याचा रत्नागिरीच्या पाठक हायस्कूलचा विक्रम मोडीत काढला. अलोरेची शाळा दर्जेदार म्हणून गणली जाऊ लागली तेव्हा प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे काम जोरात सुरु झालेले होते. अलोरे पंचक्रोशीत शासनाच्या विविध प्रकारांची जवळपास ५२ कार्यालये तेव्हा येथे कार्यरत होती, प्रत्येक कार्यालयात कनिष्ठ अभियंता पदापर्यंत किमान १२ आणि त्यानंतर लिपिक, भांडारपाल आणि शिपाई वगैरे कार्यरत असायचे. अलोरे ‘हाउसफुल्ल’ झालेले होते. सुदैवाने कर्मचा-याना निवासासाठी खोल्या अपु-या पडत असताना, शाळा चालविण्याच्या निमित्ताने विविध किमान चार ठिकाणी अनेक खोल्या अडकून असणे ही एक जमेची बाजू होती. ‘शाळेला कुठेतरी द्या एक इमारत बांधून !’ ही भावना त्यातूनच जोर धरू लागली होती. कधीतरी अचानक शाळेत संस्थाचालक आले की मग त्यांची आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घडावी, शाळेच्या नव्या इमारतीच्या विषयात काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी म्हणून ध्यास घेतलेले आगवेकर सर सतत प्रयत्नात असायचे. त्याकाळात मोबाईल नव्हते, त्यामुळे अधिकारी प्रकल्पाच्या कोयेनेच्या कार्यालयात असेपर्यंतच संपर्क राहायचा, नंतर ते अलोरेत पोहोचेपर्यंत विश्रामगृहात निव्वळ वाट पाहात बसावे लागायचे, यात किती कालावधी नि संयमाची कसोटी नियतीने पाहिली असेल, याची मोजदाद न केलेलीच बरी ! सर अशावेळी तासनतास उभे असलेले अनेकांनी पाहिलेत. प्रकल्पातील अधिकारी अभियंता आणि संस्थाचालक यातील दुवा बनून समन्वय साधण्याचे महत्वाचे काम आगवेकर सरांनी केले, प्रकल्पात कार्यकारी अभियंता राहिलेले इनामदार आजही हे मान्य करतात. ‘नवीन शाळा हवीच !’ हा आगवेकर सरांचाच अट्टाहास होता. दिनांक २४ जानेवारी १९८७ साली शाळेच्या नवीन भव्य वास्तूचा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री महोदय येणे ही घटना संस्था चेअरमन आमदार तात्यासाहेब नातू यांच्यामुळेच शक्य झाली होती. शाळेला जून १९८७ ला, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष पां. म. कुलकर्णी यांची मुलगी कुमारी जयश्री कुलकर्णी हिच्या रूपाने मुंबई विभागीय मंडळाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले, ९१.२८ टक्के गुण मिळवून यादीत ती १७ वी आली. त्यावेळचा तो आनंद केवळ शब्दातीत !
सरांचा तास विद्यार्थ्यांना जीवंतपणाची जाणीव करून द्यायचा. खणकन् कानाखाली वाजवून स्पष्टीकरण द्यायची सरांची पद्धतच वेगळी होती, त्यामुळे आगवेकर सर शाळेच्या आवारातच काय संपूर्ण गावात कुठेही दिसले की त्यांना पाहून जो लपेल, तो अलोरे शाळेचाच विद्यार्थी समजला जायचा. अशी कधीतरी एखादी कानाखाली वाजविलेली, अख्या वर्गालाच काय अख्ख्या शाळेला पुढचे अनेक महिने पुरायची. ‘शाळेतल्या विद्यार्थ्यांना मारणे, बदडणे यात काहीही गैर नाही’, या तत्वावर सरांचा गाढा विश्वास होता आणि तसे ते वागलेही ! यामुळेच त्याकाळी मुलाला अलोरे हायस्कूलमध्ये घालून आगवेकर सरांच्या देखरेखीखाली दिलं की, ‘मुलगा सुरक्षित’ असल्याची प्रबळ भावना पालकांची असायची ! सरांच्या घेरदार पोटावर अडकविलेला तो किंचितसा ढगळा बऱ्याचदा पांढरा किंवा फिक्कट शर्ट, काळी पँट, पायात चप्पल असा अत्यंत साधासा सरांचा पेहेराव राहिला. पावसाळ्याच्या दिवसात सर कधीकधी शर्टच्या कॉलरला मागून छत्री अडकवून चालायचे, हे फक्त आगवेकर सरांनाच शोभावे. ज्यांनी हे पाहिलेय त्यांना ते आजही आठवेलं. सरांचा सतत मार खाणा-या विद्यार्थ्याने एखाद्या दिवशी डबा नाही आणला तर ते त्याला आपल्या घरी घेऊन जात. कोणाही शिक्षक-कर्मचा-याच्या सुख-दुखा:सह व्यक्तिगत अडचणीच्यावेळी शाळेचे वातावरण ‘त्या’ व्यक्तीला अक्षरशः एखाद्या कुटुंबासारखेच वाटायचे, मायेचा ओलावा आणि आपलेपणाचं हे वातावरण काही अचानक तयार झालेलं नव्हतं, त्यामागे अनेक वर्ष एक अविश्रांत मन, मेंदू आणि शरीर एकाचवेळी कार्यरत राहून विचार करत होत. ज्याने आपल्या धीरोदात्त व्यक्तिमत्वाने अलोरे शाळेच्या सा-या वातावरणाला ‘बाबा’ बनून आधार दिला होता. जून १९९१ साली अलोरे शाळेत कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांच्या परवानगीने उच्च माध्यमिक ‘कला आणि वाणिज्य’ शाखेचे वर्ग सुरु झाले. दिनांक १४ नोव्हेंबर १९९२ साली शाळेच्या नवीन वास्तूचे शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
एकदा वर्गात शिरले की विद्यार्थ्यांना शिकविण्यात सारेच तरबेज आणि एकापेक्षा एक सरस अशा हरहुन्नरी शिक्षकांचा शब्दशः ‘ताफा’च आगवेकर सरांनी जमविला होता, शाळेच्या सततच्या चढत्या आलेखामागे हे एक प्रमुख कारण होते. सन १९८२ ते ९७ दरम्यानचा कालावधीत सरांना शाळेच्या माध्यमातून यशाचे बरेच पाळले गाठता आले. सर्व सुखसोयींनी युक्त अशी दर्जेदार शाळा म्हणून या शाळेने अनेकदा शासनाची विशेष ‘ग्रँट’ मिळविल्याचा इतिहास आहे. दिनांक २६ नोव्हेंबर १९९५ च्या सकाळी सरांना पहिला दुर्दैवी ‘माईल्ड हार्टअॅटक’ येऊन गेला. यामुळे सरांच्या कणखर मानसिकतेला धक्का बसला. शाळेच्या चौकटीबाहेरील ‘बोर्डाचा चीफकंडक्टर’ सारख्या जबाबदा-याआता आपण कमी करू या असेही त्यांना वाटू लागले होते. सरांच्या कार्यक्षमतेवरही याचा निश्चित परिणाम झाला, पण सरांनी निवृत्तीपर्यंत तो कधी कोणालाही जाणवू दिला नाही.
दिनांक १२ जून १९९६ साली शाळेने आपला रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याचा भव्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर १९९६ ला संपन्न झाला. तोपर्यंत शाळेने ‘महाराष्ट्रातली १९ व्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २ ऱ्या क्रमांकाची आदर्श शाळा’ असा लौकिक प्राप्त केलेला होता. रौप्य महोत्सवी वर्षात शाळेत ‘बालवाडी ते बारावी’ पर्यंतच्या शिक्षणाची सोय झालेली होती. फेब्रुवारी १९९७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत ६५ पैकी २५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली. सन १९९५ ते १९९७ दम्यान, संस्थेच्या सहकार्याने खडपोलीला हायस्कूल व्हावे, म्हणून सरांनी यशस्वी प्रयत्न केला. सन १९९९ च्या दरम्यान शाळेला नवी इमारत कमी पडू लागली, इमारत वाढविणे शक्य होत नव्हते अखेर शासनाच्या परवानगीने शाळा ‘दुबार’ पद्धतीने भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक ३१ मार्च २००० रोजी आगवेकर सरांच्या निवृत्तीप्रसंगी ‘प्राचार्य आगवेकर गौरव समारंभ’ पार पडला. आजच्या स्पर्धेच्या युगात संगणक आणि इंटरनेट सारख्या माध्यमांच्या वापरातून स्वतःला अधिकाधिक अद्ययावत करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला होता. आपले गुरुवर्य मा. ना. कुलकर्णी सरांचा मुख्याध्यापक होण्याचे भाग्य लाभले, हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा गौरव असल्याचे सरांनी नमूद केले होते. ‘प्रचार आणि प्रसिद्धी यांच्या फार मागे धावणारे असे सरांचे व्यक्तिमत्व नव्हते, त्यांचा स्वतःचा एक स्पेस होता. ते अत्यंत मोजक्याच माणसांजवळ मनापासून मोकळे व्हायचे. एखाद्याजवळ त्यांचे जमेपर्यंत थोडे अवघड असायचे, पण एकदा का जमले की मग सरांसारखा माणूस नाही असेच शब्द सरांना अनुभवणा-या प्रत्येकाच्या तोंडून यायचे.
पुढे २००० साली निवृत्त झाल्यावर पूर्णतः मोकळे झाल्यावर सर ख-या अर्थाने खचत गेले. आपण रिकामे आहोत ही भावना त्यांना कायम सतवायची. ‘अलोरे हायस्कूल हे आगवेकर सरांचे तिसरे अपत्यचं !’ सरांच्या मुलांच्या अमित आणि नचिकेत यांच्या या भावना आपल्याला खूप काही सांगून जातात. निवृत्तीनंतर, आता यांचे कसे होणार ?’ याची काहीशी चिंता कुटुंबियांच्याही मनात होती. ‘आयुष्यातील सर्वाधिक काळ २४*७ एका विशिष्ट ध्येयाने झपाटून कार्यरत राहिलेला हा माणूस त्याच्याशिवाय कसा जगू शकतो ?’ हा प्रश्न होताच !
दुर्दैवाने तसचं घडलं ! शारीरिक कारणं काहीही असतील ! पण निवृत्तीनंतर अवघ्या ३ वर्षांत ११ एप्रिल २००३ साली सरांचे निधन होण्यामागे, ‘आपण निवृत्त झालोय’ ही गोष्ट मानसिक पातळीवर स्वीकारण्यात त्यांना निर्माण झालेली अडचण हे ‘आपण सिद्ध करू शकत नसलो तरीही’ एक प्रमुख कारण असल्याची भावना त्यांचा मुलगा नचिकेतची आहे. सर भूतकाळात रमणारे नव्हते, त्यांना त्याबाबत फारसे बोलणेही आवडायचे नाही, ते सतत भविष्याचे इमले बांधण्यात, विचारात मग्न असायचे. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतानाचे सर आणि निवृत्तीनंतरचे आगवेकर सर यांत ‘जमीन-अस्मान’ एवढे अंतर होते. ‘खरंतरं माणसाने आपली नोकरी एवढी मनावर घेऊच नये’ असं कोणीही आज म्हणेल, पण सरांनी ती घेतली होती, आजचे शाळेचे समृद्ध रूप त्याचेच प्रतिक असून त्यांचेच नाव शाळेला दिले जाण्याचा हा नामकरण सोहोळा अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com
(माजी विद्यार्थी, इयत्ता दहावी बॅच १९९५)



बुधवार, १४ मार्च, २०१८

चला ! ‘चिपळूण’ला मुक्कामी जाऊ या !

कोकणच्या दिशेने सिंधुदूर्गात वा रायगड-ठाण्याच्या दिशेने निघालेल्या पर्यटकाला कुठे निघालात ? या प्रश्नानंतर,  कसे ? असा प्रश्न विचारल्यावर ‘व्हाया चिपळूण !’ असेच उत्तर मिळते. मुंबई ते गोवा महामार्गावरील चिपळूण शहराची ‘विश्रांतीस्थान / व्हाया’ ही ओळख पर्यटनावर प्रेम करणाऱ्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या सततच्या प्रयत्नातून बदलते आहे. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन सहकारी संस्था’ या संस्थेच्या माध्यमातून गेली पाच वर्षे चिपळूणच्या पर्यटनाला चांगले दिवस यावेत म्हणून प्रयत्न सुरु आहेत. त्याच-त्याच पर्यटनस्थळांना भेटी देऊन कंटाळलेल्या पर्यटकांसाठी ‘डेस्टिनेशन चिपळूण’ एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. अलिकडच्या काही वर्षांत ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी महाराष्ट्रभर प्रसिद्धी पावलेल्या चिपळूणच्या विविधांगी ‘पर्यटन श्रीमंती’चा हा आढावा.

चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दघोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात 'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. श्रीविष्णूचा अवतार भगवान परशुरामाने या नगरीची स्थापना केल्याचा उल्लेख ई.स. १६३७ साली कवी विश्वनाथ यांनी लिहिलेल्या 'श्री व्याडेश्वर माहात्म्य' या संस्कृत ग्रंथात आढळतो. शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे' परिसर पाहायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते, इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत, येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा.
 
भगवान श्रीविष्णूंच्या दहापैकी सहावा चिरंजीव अवतार म्हणजे ‘परशुराम’ होय. कोकण भूमीच्या या निर्मात्याचे महेंद्रगिरी पर्वत क्षेत्रात, ‘ब्रह्मंद्रेस्वामी’ यांच्या प्रयत्नाने हिंदूधर्मीय भक्तांसाठी, मुस्लिमांनी द्रव्य पुरवठा केलेले आणि ख्रिश्चन कारागिरांनी उभारलेले सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेले मंदिर आहे. सहाशे वर्षांपूर्वीच्या आदिलशाही वैभवाची वास्तू येथे पाहावयास मिळते. त्यामुळे मंदिराच्या स्थापत्यात मंदिर, मशीद आणि चर्च रचनेचा सुंदर संगम साधला गेला आहे. मंदिराबाहेर बाणगंगा तलाव, श्रीदेवी रेणुकामाता मंदिर आहे. जांभ्या दगडांची पाखाडी उतरताना दोन्ही बाजूंना झाडेझुडपे, जुनी परंतु प्रशस्त घरे, उजव्या बाजूला पुरातन मंदिरे आणि जलकुंडाचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ-काम-परशुराम अशा काळ्या पाषाणाच्या तीन सुबक मूर्ती आहेत. या तीन मूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार होय. परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रेणुकादेवीच्या हातात गदा, डमरू, पानपात्र आणि शिर अशी आयुधे आहेत. हे शिर सहस्रार्जुन दैत्याचे आहे, असे मानतात. कर्नाटकातल्या विजयनगर-होळसर घराण्यात राजचिन्ह म्हणून वापरले जाणारे, द्विमुखी गरुडाच्या आकृतीला दिलेले मानवी रूप असे स्वरूप असलेले गंडभेरुंड शिल्प, पाच प्राण्यांच्या विविध अवयवांपासून बनलेला शुभसूचक प्राणी शरभ, शीलालेख हे रेणुकामाता मंदिराच्या खांबांवर, माथ्यावर पाहता येतात. राष्ट्रकूट राजांची कुलदेवता असलेल्या अर्धवर्तुळाकृती राजचिन्ह 'गजान्तलक्ष्मी' जुन्या काळभैरव मंदिर आवारात आहे. त्यांचा काल इ.स. ५०० ते ९०० असा सांगितला जातो. आठव्या शतकातील श्रीदेवी विंध्यवासिनी मंदिर हे विंध्याचलचे अंशपीठ, सतींच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. देवीची यादवकालीन मूर्ती ही महिषासुरमर्दिनीस्वरूप शाळीग्राम शीळेतील अष्टभूजा मूर्ती आहे. कार्तिकस्वामींची सहामुखी (षडानन), दुर्मीळ, महाराष्ट्रातील सर्वात सुबक आणि देखणी मूर्ती याच मंदिरात आहे. 'करंजी'च्या वृक्षातून प्रगट झालेल्या, आठव्या शतकातील याच श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव अखिल महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. शेरणे कार्यक्रमासाठी नवसाचा नारळ पिवळ्या कापडात, नावाची चिट्ठी आणि दक्षिणेसह गुंडाळून शिमगोत्सवाचा जागेवरील वाळूत पुरला जातो. हा नारळ शिमगोत्सवादरम्यान देवीच्या पालख्या आपल्या ढाल-काठीच्या माध्यमातून शोधून काढतात. चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास आजही विशेष प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी.  समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य, राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.

डेरवणनजीक कुडप गावी मोठाल्या झाडाच्या खोडालाही लाजवती अश्या वेलीनी समृद्ध ३७ एकर देवराईच्या वनात, भगवान शंकराचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एकाच गाभार्यात तीन शाळूंखेवर सोमेश्वर, रामेश्वर, वैजनाथ ही तीन रूपे चार लिंगात स्थापित असलेले हे दुर्मीळ मंदिर आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी जांभ्या दगडातील ९२ पायर्या चढून जावे लागते. अभ्यासकांच्या अंदाजानुसार, सन १७५० ते १८०० दरम्यानची ही लिंगे स्मृती स्वरूपात स्थापन केली गेली असावी. यातील दुहेरी लिंग हे दोन गुरूबंधू अथवा गुरू-शिष्य प्रतीक असावे. फार पूर्वी आपल्याकडे महत्वाची व्यक्ती गेल्यानंतर लिंग स्थापन करण्याची प्रथा होती. अनेक प्राचीन वीरगळींवर आपल्याला शिवपिंडी कोरल्याचे दिसते. निसर्गरम्य लोटनशहा दर्गा हे शहरातील उंचीवरचे ठिकाण आहे. इथल्या वनराईत विविध प्रकारच्या पक्षांचे वास्तव्य आहे.

सावर्डेपासून कि.मी. अंतरावर, महाराष्ट्रातील पहिली श्रीशिव शिल्पसृष्टी डेरवण येथे श्रीसंत सीतारामाबुवा वालावलकर ट्रस्टने सन १९८५ साली उभारली आहे. कै. गणेश (दादा) पाटकर या शिल्पकाराने सुमारे १५ वर्षांच्या मेहनतीतून इथे शिल्पे साकारली आहेत. शिल्पाच्या माध्यमातून साकारलेले छत्रपतींच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग पर्यटकांना खिळवून ठेवतात. येथे भारतीय पोषाखातच दर्शनार्थ प्रवेश दिला जातो. वैजी गावातील प्राचीन विहीर आवर्जून पाहण्यासारखी आहे. चिपळूणच्या इतिहासात प्राचीन संदर्भ असलेल्या, ई. स. सहाव्या शतकापासूनचे पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या ‘राजेशिर्के’ यांचे कुटरे, डेरवण आणि तळसर येथील मराठा वास्तुशैलीने युक्त चौपाखी वाडे आपला इतिहास सांभाळून आहेत. या वाड्यात दोन दशकांहून अधिक काळातील वापरातील विविध वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यासोबतच मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही, तरीही येथील ही अशी लागवड अभ्यासू मानवी मनाला बुचकळ्यात टाकते. शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते.  त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. मात्र नव्वद वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे. 

अलीकडच्या काही वर्षांत, वाशिष्ठी बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल टुरिझम विकसित झालेल्या दाभोळ ते गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूण बॅकवॉटर आणि क्रोकोडाईल सफारी दम्यान वाळूत पहुडलेल्या मगरींसोबत, आपण मराठी साहित्यात ‘तुंबाडचे खोत’ या कादंबरीतून श्री.ना. पेंडसे यांनी आजार्मार केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता अनभवू शकतो. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

चिपळूणचा पहारेकरी अशी नोंद असलेला, दोन एकर शेत्रात विस्तारलेला किल्ले गोविंदगड आवर्जून पाहावा असा आहे. ३४२ पायऱ्या चढून वा गाडीमार्गाने किल्ल्यावर पोहोचता येते. एकूण १२ बुरुजांपैकी ४ बुरुज सुस्थितीत आहेत. चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेला हा किल्ला निसर्गरम्य वातावरणात आहे. किल्यावर सहा तोफांचे एकत्रित जतन करण्यात आले आहे. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख पाहायला मिळतो. किल्ल्याच्या पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या या देवीचा शिमगा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चिपळूणात, शहरानजीक दीडशे फुटावरून कोसळणारा बाह्यवक्र जलप्रपात 'सवतसडा' हा अगदी मुख्य राष्ट्रीय महामार्गाला  लागून असल्याने प्रवास करणाऱ्या जवळपास सर्वांच्या पावसाळी आकर्षणाचा विषय आहे. त्यासोबतच वीर-देवपाट येथे १०० फुट उंचीवरून दोन टप्यात कोसळणारा बारमाही धबधबा, अडरे धबधबा आणि कुंभार्ली घाटमाथ्यावरील धबधबा विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात विसावा पॉइंट असून येथून वळणावळणाच्या ‘वाशिष्ठी’ नदी पात्राचे विहंगम दृश्य पाहाता येते. चिपळूणचे उद्योगपती श्रीराम रेडीज यांनी धामणवणे येथील आपल्या १०० एकर जागेत ‘एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स’ फार्मची उभारणी केली असून येथे जंगल सफारी, नेचरट्रेल, पक्षी अभयारण्य, शेततळे, कँप, बाल्या नृत्य, जाखडी सारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्थाही अशा ठिकाणी  मागणीनुसार होऊ शकते. याखेरीज शहरात पेढे-परशुराम येथे तालुक्यातील पहिले ‘श्रीपरशुराम सानिद्ध्य निसर्ग पर्यटन केंद्र’ असून अशी इतर ७-८ केंद्रे कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या अथक प्रयत्नातून साकारलेले डी.बी.जे.महाविद्यालयाचे जैवसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. विविध २१ दुर्मीळ प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे जतन येथे करण्यात आले आहे. तालुक्यात ११२ देवराया असून त्यातल्या दसपटी, कुडप, वीर, गुढे, शिरंबे येथील देवरायात ‘नेचरट्रेल’ची अनुभूती घेता येते.   

पर्यटकांना अवघ्या ६० ते १०० कि.मी.च्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजआदि सारी अमर्याद पर्यटन समृद्धी देणाऱ्या चिपळूणात जवळपास ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार हॉटेलात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था आहे. तालुक्यातील पर्यटन संपूर्णतः विकसित करण्याचे प्रयत्न ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ करते आहे. या साऱ्याची प्रसिद्धी करण्याबरोबरच दर्जेदार पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही चिपळूणात सुरु झाले आहे. आगामी काळात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला हे जाणवेल, ज्यातून पर्यटक चिपळूणात रमतील हे नक्की !

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com  
मो. ९८६०३६०९४८. 
     

शुक्रवार, २ मार्च, २०१८

‘डेस्टिनेशन चिपळूण’च्या दिशेने...!

मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ‘ताज’ने साधारणत सन १९८९ ते ९५ च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात, महेंद्रगिरी डोंगरात, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्रीस्टार हॉटेल उभारले. याकाळात ‘महाराष्ट्र पर्यटन’कडे बघण्याचा पर्यटकांचा दृष्टीकोन वेगळा होता. नंतरच्या काळात कोकण महामार्गावर, इथेच पुढे ‘विसावा पॉइंट’ जन्माला आला, निसर्ग तर पहिल्यापासूनच खुणावतच होता. तेव्हापासून असलेली चिपळूणची ‘विश्रांतीस्थान’ ही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या २०-२५ वर्षांत अनेकांनी आपापल्यापरीने केले. मात्र त्याला दखलपात्र यश मिळत नव्हते. मागच्या महिन्याच्या २३ ते २५ फेब्रुवारीला चिपळूण पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच संपन्न झालेल्या, देशभरातील पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या ‘चिपळूण दर्शन’ दौऱ्यातून हे दखलपात्र यश काही प्रमाणात का होईना, मिळण्याची आशा निर्माण झाल्याचे जाणवून आले. निर्माण झालेल्या आशेवर नुसतेच विसंबून न राहाता चिपळूण पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक स्थानिक घटकाने ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेच्या हातात हात घालून काम करायला सुरुवात केली तर भविष्यातील ‘डेस्टिनेशन चिपळूण’चे स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचे ते दमदार पाऊल ठरेल.          
     
निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेले चिपळूण पर्यटन आजही उपेक्षित आहे.  संपूर्ण कोकणाकडे खूप काही असल्यामुळे ही अडचण निर्माण होते, ज्यांच्याकडे दाखवण्यासारखं थोडंस आहे ते मात्र हमखास प्रगती साधतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी’चे गेल्या पाच वर्षातील ‘आपण चालायला लागलो की रस्ता बनायला सुरूवात होते’ अशा विचाराचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सन १९६४-६५ ला या महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले. तत्पुर्वीपासून परशुराम मंदिराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील बंडोपंत आणि लीलाकाकू सहस्रबुद्धे यांचे ‘विश्रांतीस्थान’ हीच चिपळूणातीलच नव्हे तर कोकणातील (कदाचित) एकमेव पर्यटक व्यवस्था होती. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचा धामणदेवीमार्गे प्रवास चाले. भरणेनाका नाका सोडल्यानंतर चिपळूणपर्यंत एकही हॉटेल नव्हते, वीज, वाहतूक व्यवस्था नव्हती. तेव्हा हे ‘विश्रांतीस्थान’ २४ तास सुरु असायचे. येथूनच ‘कोकम सरबत’ महाराष्ट्रभर पोहोचले. पर्यटन कंपन्या चहा-फराळासाठी इथे थांबत असतं. पाठीमागील वाशिष्ठीची खाडी हे तेव्हाही आकर्षण होते, क्रोकोडाईल टुरिझमसह विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत पर्यटन आकाराला आलेलेच नव्हते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शैलेश वरवाटकर, रविकिरण जाधव, संदेश संसारे आदि काहींनी वाशिष्ठी खाडीत वैयक्तिक प्रयत्नांना सुरुवात केली होती. सन २००८ साली धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांनी, तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या सौ. नूतन आणि श्री. विलास महाडिक यांच्या सहकार्याने ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे इथल्या पर्यटनाची खडानखडा माहिती देणारे अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात इथल्या पर्यटन चळवळींनी आकार घ्यायला सुरुवात केली. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ हे त्याचे आजचे सर्वात समृद्ध स्वरूप होय. याच संस्थेच्या सहकार्याने, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे, इंटरप्रायाझिंग ट्रॅव्हलर एजंट असोसिएशन, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया आदि संस्थांमार्फत कार्यरत प्रसन्ना टूर्स, ट्रॅव्हल मास्टर, गिरिकंद ट्रॅव्हल्स, ओम टूर्स, पॅराडाईज मार्केटिंग, मिहीर टुरिझम, सिमास ट्रॅव्हल्स आदि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांसोबत काम करणाऱ्या नामांकित ३५ टूर ऑपरेटर्सचा नुकताच तीन दिवशीय चिपळूण पर्यटन दौरा संपन्न झाला. चिपळूणची पर्यटन श्रीमंती दाखवून आगामी काळात अधिकाधिक पर्यटक चिपळूणात आणता यावेत, हा या मागचा मुख्य हेतू होता.

पहिल्याच दिवशी दिनांक २३ फेब्रुवारीला दुपारी चिपळूणात दाखल झालेल्या टूर ऑपरेटर्सचे परशुराम येथील ‘दि रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्ट येथे आगमन झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दुपारच्या भोजनानंतर मान्यवर टूर ऑपरेटर्सना डेरवण शिवसृष्टी दाखविण्यात आली. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारलेली महाराष्ट्रातील ही सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे पंधरा वर्षांच्या प्रयत्नातून शिल्पकार दादा पाटकर यांच्या सहकार्याने सन १९८५च्या दरम्यान उभारली गेली. सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली. डेरवण येथेच उभारण्यात आलेल्या ऑलंम्पिक दर्जाच्या क्रीडासंकुलाची पाहणी सर्वांनी केली. कोकणातल्या काटक आणि निसर्गतःच चपळाई अंगात असलेल्या तरुणाईला संधी देण्यासाठी हे ऑलंम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. संकुलामध्ये शूटिंग, जिम्नास्टिक, स्विमिंग, वॉटर पोलो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल, कॅरम, हॉकी, कराटे, कुस्ती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, कराटे, गोळा फेक, थाळी फेक, तिरंदाजी आदि ३५ खेळ खेळण्याची सुविधा आहे. त्यामध्ये रायफल खेळांचा समावेश आहे. सुमारे १०० एकर परिसरात वसलेल्या आणि फळबाग लागवड, विविध पक्षी अभयारण्य, नेचर ट्रेल, १.५ कोटी लीटर पाणी क्षमतेचे शेततळे असलेल्या कँपसाठी उपयुक्त धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स सर्वांनी भेट देऊन तिथल्या ‘जंगल सफारी’ आणि स्थानिक प्रसिद्ध शाकाहारी / मांसाहारी मोंगा पार्टी, विठ्ठलाई नाचनृत्य धामणवणे (मधली उंडरेवाडी), श्रीराम मित्र मंडळ यांच्या पारंपारिक जाखडी नृत्याचा आनंद घेतला. इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी उपस्थितांना ‘चिपळूण इतिहास आणि संस्कृती’ याबाबत माहिती दिली.  

दुसऱ्या दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी चिपळूणचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाची पाहाणी करण्यात आली. गोविंदगड नावाने ओळखला जाणारा, सात बुरुज, वैशिष्ट्यपूर्ण बांगडी तोफ असलेला गोवळकोट किल्ला 'डोंगरी' प्रकारातील आहे. किल्ल्यावर तळी, तोफा पुरावशेष पाहायला मिळतात. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. किल्यावर रेडजाई तर पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. त्यानंतर चिपळूण बॅकवॉटर, आयलँड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा आनंद सर्वांनी घेतला. ‘गोवळकोट ते दाभोळ’ असा ४४ कि.मी.चा प्रवास असलेल्या आपल्या दोन्ही तीरावर दापोली, गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमा अससेल्या देखणे निसर्गसौंदर्य, नितांत सुंदर वाशिष्टी खाडी, खाडीतील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीचे छोटे-मोठे डोंगर आणि खाडीकिनारी निवांत विसावलेल्या मगरींचे दर्शन सर्वांनी बोटीमधून घेतले. दुपारच्या भोजनासाठी सर्वांना शैलेश वरवाटकर यांच्या ‘तुंबाड किनारा रिसॉर्ट्स’ येथे नेण्यात आले. प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘तुंबाडचे खोत’ (१९८७) या कादंबरीने अजरामर झालेले तुंबाड गाव जगबुडी नदीच्या काठावर वसलेलं आहे. खेडच्या पूर्व सह्याद्रीतून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी नदी तुंबाडच्या पुढे वशिष्ठी नदी मिलनानंतर दाभोळ येथे समुद्राला मिळते. निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न असलेल्या या तुंबाडच्या धक्यावरून शरीराला सुखावणारा मंद, गार वारा, झाडांची गर्द सावली. फुलझाडांचा दरवळलेला सुवास अशा नैसर्गिक वातावरणातील प्रसन्नता साऱ्यांनीच अनुभवली. या दरम्यान टूर ऑपेरेटर्सनी पॅगोडा, रीम्झ, अभिरुची, ओमेगा इन, दि रिव्हर व्हयू रिसॉर्ट्स आदींची पाहाणी केली. कोकणाचा स्वामी भगवान परशुराम आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचे दर्शन घेत इथल्या अध्यात्मिक परंपरा समजून घेतल्या. भगवान परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रावतळे परिसरात विध्यवासिनीचे पुरातन मंदिर आहे. शाक्तपंथियांना भावणारी देवीची यादवकालीन अष्टभुजा मुर्ति, कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिसऱ्या शेवटच्या दिवशी, २५ फेब्रुवारी हेदवीतील प्रसिद्ध दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर, निसर्गनवल समुद्रघळ (बामणघळ), वेळणेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा पाहिला. 

तत्पूर्वी दिनांक २४ रोजी सायंकाळी, चिपळूण पर्यटन विकासासाठी खा. हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या भरीव सहकार्याने गेली पाच वर्षे झटणाऱ्या 'ग्लोबल चिपळूण टुरिझम' या टूर आयोजक संस्थेच्या वतीने 'द रिव्हर व्हयू' या चिपळूणातील तारांकित हॉटेलच्या विशेष सहकार्याने पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या टूर ऑपेरेटर्स, स्थानिक हॉटेलियर्स आणि पर्यटन या विषयात रुची असलेल्या सुमारे ६५ अभ्यासू व्यक्तींचे महत्वपूर्ण चर्चासत्र पार पडले. यात ‘प्रसन्ना पर्पल’चे संजय नाईक, मिहीर टुरिझमचे सुधीर करंदीकर, सिमास ट्रॅव्हल्सचे विश्वास केळकर, ‘ट्रॅव्हल मास्टर’चे कृष्णा गोपालन, ओम टूर्सचे राजेश अरगे, पॅराडाईज मार्केटिंगचे मिलिंद आयरे, ट्रीप स्टोअरचे प्रशांत ढेकणे यांनी तर 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'तर्फे अध्यक्ष श्रीराम रेडिज, संजीव अणेराव, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, 'द रिव्हर व्हयू'चे विजय गावकर यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात सुरुवातीला आयोजकांकडून परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे, चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा धबधबा बारमाही प्रवाही करणे, शहरातील तलाव उर्जितावस्था, शहरातील पर्यटनाशी निगडीत रिक्षावाला, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर निश्चिती, गेल्या २५ वर्षांत एकही नवा उद्योग चिपळूणात आलेला नसल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता पर्यटनाकडे पाहण्याची गरज, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, किल्ले गोविंदगडसह चिपळूण पर्यटनातील विविधता याबाबत माहिती देण्यात आली. चिपळूणात आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत. चर्चेदरम्यान, चिपळूणकरांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज, येणा-या पर्यटकांचे स्वागत करण्याबाबत घायावयाची भूमिका, ‘क्रोकोडाईल सफारी’ला ब्रँड अॅम्बॅसिडर बनविण्याची गरज, छोट्या-छोट्या बोट राईड, महाराष्ट्रातील ५-६ हजार टूरएजंटपर्यंत चिपळूण फेस्टीवल पोहोचविण्याची गरज, मार्केटिंग, वैयक्तिक ग्राहकाला पॅकेजमध्ये वेगळी सूट न देण्याचा विचार, ‘सर्टिफाईड गाईड’ची टीम, खाडीतील बेटावर निवासासह विविध व्यवस्था, महाराष्ट्राबाहेरच्या पर्यटकाला त्याच्या कंफर्ट झोनप्रमाणे जेवण, मगरी दिसल्या नाहीत तर पर्यटक येतील का ?  यासाठीची पर्यायी व्यवस्था, एकावेळी ४० माणसं राहू शकतील अशा हॉटेलची वाढीव संख्या, वीज, पाणी व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, मेन्टेनन्स, स्वच्छ बाथरूम, जवळपासच्या देवरायातील नेचर ट्रेक यांवर चर्चा झाली.

मूळात चिपळूणकरांना आपल्या पर्यटनाची ताकद समजायला हवी आहे, त्यासाठी चिपळूणकरांनी चिपळूण  पाहायला, फिरायला हवे आहे. आपल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित शक्तीस्थळांवर काम करावे लागणार आहे. पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, शासन आणि लोकप्रतिनिधी या पर्यटन विकासाच्या दोन महत्वाच्या चाकांचे सहकार्य, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता, रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी, कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार व्हायला हवाय. येथे येणाऱ्या पर्यटकाला शांतता, चांगले खानपान, स्वच्छता, करमणूक, राहाण्याची उत्तम व्यवस्था हवी असते. पर्यटन हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळ, गोवा, हिमाचल, उत्तराखंड, अंदमान आदि देशी ठिकाणाशी तुलना करता कोकण कोठेही कमी नाही. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, अशी व्यवस्था आपण चिपळूणातही करू शकतो. आपल्याकडे पर्यटन विकास कामाची अंदाजपत्रके कोट्यानुकोटींची उड्डाणे घेत आहेत, जी यंत्रणा, व्यवस्था प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी ही विकासकामे पूर्ण करते, तिला ‘पर्यटन दृष्टी किती असते ? की आम्ही फक्त ठेकेदारी कामम्हणून याकडे पाहतो ? पुढेही पाहणार आहोत ? खाडीकिनाऱ्यावरील कामे,  किल्ल्यांची, प्रमुख पर्यटन रस्ते, हेरीटेजची डागडुजी करताना काम करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ठेकेदारी कामम्हणून पाहतो, मग अशा पर्यटन विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो, पर्यटन म्हणून विचार करून यात काम करण्याची संधी आहे. प्रसिद्ध दोन पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचे सक्षमीककरण करताना कल्पकतेने, पर्यटकांच्या रस्त्यावरील गरजा पूर्ण करणारे नियोजन व्हायला हवे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग हवे. चिपळूणची वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला पुढे जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्हाला पर्यटन विकासासाठी हे संदर्भ वापरावे लागतील.

चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजअशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर पर्यटक चिपळूणात रमतील. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. तालुक्यातील मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत अतिशय जवळ नितांत सुंदर म्हणून सवतसडा धबधबा प्रसिद्ध आहे. वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार असलेले दादरचे श्रीरामवरदायिनी मंदिर, टेरवचे भवानी माता मंदिर, तीन हजार फुट उंच किल्ले भैरवगड, शारदादेवी मंदिर तुरंबव, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले शिरंबेचे श्रीमल्लिकार्जुन मंदिर, शहराच्या पश्चिमेकडील अरण्यमय महालक्ष्मीण डोंगर भागात असलेले मिरजोळीत श्रीदेवी महालक्ष्मी - साळूबाई हे देवस्थान, वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या किनार्यावर असलेल्या गोंधळे गावी सन १६९६ मध्ये आप्पाजी गोंधळेकर यांनी बांधून पूर्ण केलेले श्रीहरिहरेश्र्वर मंदिर, त्या मंदिराशेजारी विशाल आकारमानाची ४० पायऱ्यांची प्राचीन विहिर, डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनित वास्तू राजगृह, चिपळूण शहर दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजन बौद्ध गुंफा लेणी, शहरातील गजान्तलक्ष्मी शिल्प, विजयस्तंभ, भोगाळेतील घोडेबाव, ई. स. सहाव्या शतकापासूनचे चिपळूणातील पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे असलेल्या राजेशिर्के यांची ३५० वर्षाचा इतिहास लाभलेली वाडासंस्कृती इथलं वैभव आहे. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या श्रीराम रेडिज, इब्राहिम दलवाई, संजीव अणेराव, आलिम परकार, मिलिंद कापडी, निलेश बापट, धीरज वाटेकर, रमण डांगे, राजेश पाथरे, विश्वास पाटीलसमीर कोवळे, विलास महाडिक, मनोज गांधी, महेंद्र कासेकर, शाहनवाज शाह, समीर जानवलकर यांच्यासह प्रा. सौ. मीनल ओक, डॉ. मनोज रावराणे, संदेश संसारे, सत्येंद्र वैद्य, अभिजित चव्हाण, प्रकाश चव्हाण आदि अनेकजण ‘चिपळूण पर्यटन’ विकसित व्हावे म्हणून धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे, तळमळीचे अनेकांनी कौतुकही केलं.

चिपळूणची जीवनदायिनी म्हणून इथल्या ‘वाशिष्ठी’ नदीकडे पाहाता येईल. कोयनेच्या अवजालामुळे चिपळूणकर निवांत आहेत, अन्यथा आम्हा सर्वांची हयात पाणी भरण्यातच वाया गेली असती. जेव्हा ओहोटी असते, कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी सोडलेले नसते, वीजनिर्मिती बंद असते, तेव्हा या वाशिष्ठी नदीला बहाद्दुरशेखनाकानजीक ब्रिटीशकालिन पुलाजवळून फेरफटका मारला की माझ्या वरच्या विधानाचे मर्म ध्यानी येईल. इथे आगामी काळात ‘रिव्हर बँक प्रकल्प’ राबविताना आम्हाला याचा विचार करावा लागणार आहे. गोव्यात  मांडवी आणि झुआरी नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव,  चिपळूणला ‘आपण सारे’ पर्यटन समृद्ध का करू शकत नाही ? याचा विचार समस्त चिपळूणकरांनी आपणहून करायलाच हवा. चिपळूणला डेस्टिनेशन बनविण्याच्या प्रयत्नांना प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यासह, चिपळूणला उतरलेल्या कोणी पर्यटकाने सहजपणे विचारलेल्या ‘इथे पाहण्यासारखे काय आहे ?’ या प्रश्नावर ‘इथे ? कुठे काय ? काय नाय, बा !’ असे तद्दन खोटे आणि नकारात्मक उत्तर न देणाऱ्या स्थानिक चिपळूणकरांचेही तितकेच  ठोस सहकार्य मिळण्याची गरज आहे.          

धीरज वाटेकर

http://www.mulshidinank.com/2018/03/blog-post_4.html

कोकणाचा स्वामी भगवान परशुराम मंदिर 
धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्समधील जंगल सफारी

एस.आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सची माहिती घेताना टूर ऑपेरेटर्स
प्रसिद्ध विसावा पॉइंट


श्रीदेवी करंजेश्वरी 

किल्ले गोविंदगड भेट 

वाशिष्ठी खाडीतील बेटास भेट

खाडीतील जल पर्यटन

खाडीतील क्रोकोडाईल पर्यटन 

 सवतसडा धबधबा 

चर्चासत्रात 'चिपळूण पर्यटनातील विविधता' याबाबत बोलताना धीरज वाटेकर






आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...