शुक्रवार, २९ मे, २०२०

निवृत्ती ! ‘भाग्याचं जगणं’ लाभलेल्या मुख्याध्यापकाची !!


    रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातल्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अलोरेचे (अलोरे हायस्कूल अलोरे) मुख्याध्यापक अरुण केशव माने (सर) आज (३१ मे २०२०) सेवानिवृत्त होत आहेत. दीड वर्षापूर्वी ते मुख्याध्यापक झाल्यावर त्यांच्यावर, ‘You deserved it much earlier, A promotion well deserved, An occasion worth celebrating आदि शुभेच्छांचा सोशल मिडीयावर पाऊस पडलेला. वर्तमानपत्रात पुरवणी प्रसिद्ध झाली. ‘आपण केलेल्या शिक्षेमुळे आज माझे जीवन घडले’ असं म्हणू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणीं छानश्या पुष्पगुच्छासारख्या फुललेल्या होत्या ! ३४ वर्षांच्या सेवेत ही विलक्षण किमया साधलेल्या मानेसरांच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...!

त्याकाळात कोकणातील शिक्षणसंस्थाचे संचालक कोल्हापूरला जाऊन शिक्षकांच्या मुलाखती घेत असत. वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध व्हायच्या. कुठल्यातरी हॉटेलातल्या पत्त्यावर मुलाखतींना तारीख, वेळ दिली जायची. अशीच एक जाहिरात मे १९८५ ला कोल्हापूरच्या हॉटेल रायगड येथे येऊन भेटण्यासंदर्भात प्रसिद्ध झाली. जाहिरात वाचून विषयज्ञान आणि शैक्षणिक अर्हता असलेले तरुण मुलाखतीला पोहोचले. मुलाखतीतून शिक्षक निवड झाली. इंग्रजी विषयासाठी निवडले गेले, अरुण केशव माने सर ! आणि शाळा होती चिपळूण जवळच्या खेड तालुक्यातली एल. पी. इंग्लिश मिडीयम स्कूल ! जून १९८५ पासून शिकवणं सुरु झालं. पण नियतीच्या आणि सरांच्या मनात काही वेगळं असलेलं ! मानेसर पुढच्याचवर्षी चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचून श्रीरामभाऊ भिडे, खेरसर आदिंनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे जून १९८६ ला अलोरे शाळेत रुजू झाले. मागील वर्षभरात, कोकणातल्या विद्यार्थ्यांच्या मनात असलेली इंग्रजीची भीती सरांच्या लक्षात आलेली. ही भीती, न्यूनगंड सरांना विद्यार्थ्यांच्या मनातून काढायचा होता. त्यांनी ठरवलं. वर्गात एकही शब्द मराठीत न बोलता केवळ इंग्रजीतून शिकवायचं. प्रयत्नातून हे शक्य होतं, हे त्यांना विद्यार्थ्यांना समजवायचं होतं. तसं सुरु झालं. अलोरे शाळेत कार्यरत असलेले दिलीप शिंदे, उमेश पाठक, दिलीप सपाटे हे त्यांचे समकालीन शिक्षक सहकारी ! अलोरेतील सुरुवातीचे दिवस सरांनी, याच सहकाऱ्यांच्या समवेत घालविले ! कालांतराने सरांना स्वतंत्र रूम मिळाली. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याकडे जाणाऱ्या मार्गावरच्या आंब्यानजीक राहणाऱ्या ‘वाशिटकर’ आजी स्वयंपाक करायला यायच्या ! सरांना त्या आजही आठवतात. वसतिगृहातले शिक्षण म्हणतात ते हेच !

जुलै १९८७ ! मानेसर एकाएकी आजारी पडले. सर्दी, ताप आणि पित्ताचा त्रास त्यांना जाणवू लागला. अविवाहित, गावात नवखे असलेल्या सरांची काळजी कोण घेणार ? जवळच्या डॉक्टरांकडून आणलेली नेहमीची औषधे घेऊन सर आपल्या अंथरुणात पडून होते. शाळेतली त्यांची आजची अनुपस्थिती बाकी कुणाला नसली तरी एका व्यक्तीला जाणवलेली होती. सायंकाळी शाळा सुटली. सारे शिक्षक आपापल्या घरी निघून गेले. मानेसर अजूनही अंथरुणात असलेले. इतक्यात, ‘माने सर ! दार उघडा !’ असा भारदस्त आवाज सरांच्या कानावर पडला. अंथरुणातून उठून कसाबसा त्यांनी दरवाजा उघडला तर समोर मुख्याध्यापक आगवेकर सर उभे ! त्यांच्या हातात ‘त्रिभुवनकीर्ती आणि सुतशेखर’च्या गोळ्या होत्या. आगवेकर सरांनी मायेनं सरांच्या कपाळाला हात लावून ताप तपासला. काही सक्तीच्या विश्रांतीच्या सूचना दिल्या. कौटुंबिक चौकशी केली. आणलेल्या गोळ्या दिल्या. मानेसरांच्या हृदयात वडिलांच्या आठवणी जाग्या करून आगवेकरसर निघून गेले. आगवेकर सरांचं येणं मानेसरांना अंथरुणातून उठण्याची ऊर्जा देणारं ठरलं !

वरील प्रसंगानंतर आगवेकर सरांच्या सानिद्ध्यात विद्यार्थी घडविणे या एका मंत्राने सरही भारावून गेले. मानेसर अक्कोळचे ! सीमावर्ती भागातले. कोकणाशी अजिबात संबंध नसलेला. त्यामुळे सुरुवातीला ओळखीचं नसल्यानं अलोरेत त्यांना अवघडल्यासारख वाटलं. पण इथल्या स्थानिकांनी आपलस केल्यानं अल्पावधीत छान जमून आलं. सरांना जाणवले की मुलांच्या हृदयाला स्पर्शिणारे दर्जेदार शिकवलं पाहिजे. मग प्रयत्न सुरु झाला. विद्यार्थी आणि पालक मायेनं, आत्मीयतेनं वागू लागले. ‘इयत्ता आठवी क’चे वर्गशिक्षक ते इयता ‘दहावी अ’चे वर्गशिक्षक आणि पुढे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक हा खडतर प्रवास नुसता सेवाज्येष्ठतेनुरूप नसलेला !

सरांच्या हाताखाली शिकून बाहेर पडून २५ वर्ष उलटल्यावरही जगभर पसरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या १० मेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ‘wish you a best one’ म्हटलं. यातून जणू कामाची पोचपावती मिळाली. मानेसरांचा आजी-माजी विद्यार्थ्यांवरला प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या वेगवेगळ्या पोस्टवर शेकड्यांनी शुभेच्छा येतात. सरही फेसबूकवरून रोजच्यारोज न थकता आपल्या विद्यार्थ्यांना ‘शुभसकाळ’ संदेश पाठवित असतात. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर अनेकांना याचा कंटाळा असला तरी सरांच्या रोजच्या शुभेच्छांना ४०/५० विद्यार्थी न चुकता लाईक करतात, हे कशाचे द्योतक आहे ? विद्यार्थ्यांच्या भावना शंभर टक्के अस्सलं, भावविश्वातून प्रकटणाऱ्या ! मानेसरांचं सर्वात मोठं सामर्थ्य यात दडलेलं आहे.

वेगाने वाढणाऱ्या विज्ञाननिष्ठ जीवन पद्धतीमुळे दोन पिढ्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. ‘कोरोना’ने त्या दरीला घरोघरी एका छताखाली बंदिस्त करून टाकलंय. त्याला अडीच महिने होताहेत ! खरंतर मानेसरांची सेवानिवृत्ती जल्लोषात साजरी व्हायची. पण नेमकं कोरोनाचं संकट उभं राहिलं. वयोमानपरत्त्वे सरांची सेवानिवृत्ती जाहीर झाली असली तरी, ‘काम अजून संपलेलं नाही !’ हे सूचित करायला तर ही परिस्थिती निर्माण झाली नसेल ना ? सन २०२२ साली संपूर्ण देश आपला अमृतमहोत्सव साजरा करीत असेल तेव्हा आपल्या अलोरे हायस्कूल अलोरे शाळेत सुवर्णमहोत्सवी वातावरण असेल. मानेसर एकषष्टीत पदार्पण करतील ! सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी संकल्पपूर्तीसाठी मानेसरांची आवश्यकता आहे. सरही हे जाणून आहेत. सरांच्या उपस्थितीत, शाळेचा सुवर्णमहोत्सव ‘न भूतो...’ व्हावा यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यानी स्वतःला कटिबद्ध करायला हवंय ! मानेसरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना, आगवेकर सरांच्या मनातले मुख्याध्यापक या नात्याने आगवेकर सरांच्या नावाची सार्थ ‘पाटी’ मिरवणाऱ्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ध्येयाच्या दिशेने वाटचाल आरंभायला हवी ! विशेष म्हणजे, सरांनीही महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले आहे.

खरंतर मानेसरांचं वैशिष्ट्य काय ? असा प्रश्न मला नेहमी पडतो. मग वाटतं, शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यावर गुरूचा सार्वकालीन प्रभावशाली ठसा उमटावा लागतो. एकाचवेळी तो अनेकानेक विद्यार्थ्यांवर उमटविण्यात मानेसर कमालीचे यशस्वी ठरलेत. सरांकडे ‘विद्यार्थी’ भेदभाव कधीच नव्हता. त्यांना हुशार, कमी हुशार, काठावर पास होणारे, शब्दशः ‘ढ’ असे सगळे विद्यार्थी एकसारखेच ! त्यांचं सगळ्यांशी सहज जमायचं ! बोर्डात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याशी सरांचं जितक्या सहजतेनं जमायचं तितक्या सहजतेनं त्यांचं शाळा सोडून देऊन रिक्षा चालवायला लागलेल्याशीही जमायचं ! हे जमणं विलक्षण नैसर्गिक ! कुठलंही काम हलकं नसतं हा संस्कार सरांवर बालपणात बिंबवला गेला असावा.

‘ए कोण रे तो आलाय खाली, व्हरांड्यातून जाते अशी हाळी !

मानेसर आहेत खाली, म्हणत विद्यार्थी करती पळापळी !!

रागीट चेहऱ्यामागे सहृदयतेचा झरा, ममत्वात सामावला जीवनाचा अर्थ खरा !

आदर्श शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, येता कोणती अडचण हेच चांगले समुपदेशक !!

सौ. राधा रायकर मॅडम यांनी शब्दबद्ध केलेल्या या ओळी ! मूळात, ‘हा माणूस जे काही करतोय ते आपल्या फायद्याचं आहे’, असं सरांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मनात झिरपत राहायचं ! कारण ती कृती करताना मानेसर हातचं न राखता अक्षरशः हृदयातून साद घालायचे. म्हणून त्यांच्या मांडवाखालून गेलेले विद्यार्थी आज २०/३० वर्षानंतरसुद्धा आपल्या शालेय जीवनातील त्यांच्या सोबतच्या क्षणांना विसरू शकलेले नाहीत. त्या क्षणांमध्ये देखावा अजिबात नव्हता. जे होतं ते केवळ अन् केवळ विद्यार्थ्याचं कल्याण ! तसे अलोरे शाळेतील सगळे शिक्षक या गुणांनी युक्त ! तरीही आगवेकर सरांनंतर अनेकांना मानेसर अधिक जवळचे वाटतात. याचं मूळ सरांच्या जडणघडणीत, त्यांच्या वसतिगृहातील दिनचर्येत गवसावं ! वसतिगृहातील शालेय शिक्षण तेव्हाही काही विशेष नव्हतं. गावात शाळा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती नाही म्हणून अनेकांच्या ते नशीबी आलं. मानेसरांनीही मैलोनमैल पैदल करीत, खडतर परिस्थितीतून स्वतःला सर्वोत्तम बनवलं. आपल्या पदरात पडलेल्या हजारो कोऱ्या पाट्यांवर शंभर टक्के तेच शिस्तबद्ध संस्कार करण्याचं कसब, स्वतःच्या अध्यापन विषयावरील त्यांची ‘कमांड’, जगण्यातलं सामाजिक भान, परिस्थिती कशीही असली तरी त्यातून शंभर नंबरी सोनं तावून सुलाखून बाहेर काढण्याची क्षमता, त्यासाठी अखंड मेहनतीची तयारी हे सारं शालेय वयात सरांनी बिंबवलंय, त्याला आजही धक्का लागलेला नाही.

आगवेकर सरांच्या सान्निध्यातल्या वातावरणाचं शतप्रतिशत सोनं केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे मानेसर ! याच क्षमतेची अजून दोन व्यक्तिमत्त्व मला आठवतात ती म्हणजे श्री. खोतसर आणि कै. जाधव सर ! यातल्या खोतसरांचा विद्यार्थ्यांशी असलेला थेट संबंध सातवीच्या स्कॉलरशिपनंतर काहीसा कमी व्हायचा. जाधवसरांच्या बाबतीत कदाचित त्यांचा ‘भूगोल’ विषय विद्यार्थ्यांवर कमी प्रभाव टाकणारा ! परंतु कोणाच्याही अध्यापन पद्धतीला तोड नव्हती. स्कॉलरशिपच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना तासनतास बसविण्याची खोत सरांची क्षमता किंवा खडू हातात धरून, फळ्याला चिकटून उभं राहून आपला हात सहजतेने फिरवून पृथ्वीचा गोल काढणारे जाधव सर आठवले की काय विलक्षण क्षमतेची माणसं ‘शिक्षक’ म्हणून लाभली आम्हांला, असं वाटतं ! आगवेकर सरांची सगळी टीम याच पठडीतली, प्रत्येकाच्या शैलीवर एक स्वतंत्र लेख व्हावा अशी ! मानेसरांचं म्हणाल तर त्यांचा विषय इंग्रजी ! त्यात त्यांची अध्यापन पद्धत !

‘मानेसरांच्या तासाला तेव्हा, इंग्लडला गेल्यासारखे व्हायचे !

एवढं कुणीचं फ्लुएन्ट नव्हते, आम्हाला प्राऊड फील व्हायचे !!’

सरांची विद्यार्थींनी निशा खरातच्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत, आमच्यासारख्या बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी सर्वात अवघड असलेल्या इंग्रजीच्या तासाला, ३५ वर्षांपूर्वी एकही शब्द मराठीत न बोलणारे माने सर म्हणूनच वेगळे ठरले. आपल्याला जे सहज जमत नसतं ना ? त्याचं समूहाला आकर्षण अधिक असतं. माने सरांचं ‘विषयज्ञान’ आकर्षणाचा विषय ठरलं. ते वर्गात आल्यावर जो ‘पिनड्रॉप सायलेन्स’ व्हायचा त्याला आजही तोड नाही.

दिनांक १० मे १९६२ चा सरांचा जन्म ! सरांचं मूळगाव अक्कोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातले. गावात घरची ज्वारी आणि तंबाखूची शेती. संपूर्ण कुटुंबावर कडक शिस्तीच्या आजोबांचे संस्कार अधिक ! त्यांना ३ भाऊ आणि १ बहीण आहे. दोन भाऊ आजही गावातील शेती सांभाळतात. सरांना शेतीची सर्व कामे उत्तम अवगत आहेत. अक्कोळमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. घरची गरीबी असल्याने, इयत्ता आठवीपासूनचे शिक्षण त्यांनी निपाणीच्या वसतिगृहात राहून विद्यामंदिर शाळेत घेतलं. त्यांना निपाणी ते अक्कोळ पैदल करावी लागायची. सर बारावीला असतानाची घटना. परीक्षा जवळ आली होती. दुर्दैवाने, अजूनही पुस्तकांचा अभाव होता. अनेक समकालीन मित्रांची मदत आणि कॉलेजमधील लेक्चर्सच्या बळावर परीक्षेला बसले. परीक्षेच्या कालावधीत अभ्यासाचं गणित जुळविताना खूप त्रास झाला. खरंतर तेव्हाच सरांनी मनाशी खूणगाठ बांधली की काही करायचं पण आपण इंग्रजी विषयात पदवीधर व्हायचं. पुढे सरांनी बी.ए.साठी स्पेशल इंग्रजी विषय निवडला. तोवर शिक्षक वगैरे होण्याबाबत अजिबात न ठरलेले. बी.ए. इंग्रजी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी निपाणीच्याच देवचंद कॉलेजात एम.ए.साठी प्रवेश घेतला. पहिलं वर्षही पूर्ण झालं. तेव्हा आजोबांनी विशेष आग्रह करून बी.एड.चा फॉर्म भरायला लावला. शिक्षक व्हायचं पहिल्यांदा तेव्हा ठरलं. सन १९८५ ला शासकीय अध्यापक विद्यालय बेळगाव येथून सर शिक्षणशास्त्र विषयात बी.एड. झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेवर सरांचं प्रभुत्त्व ! त्यांनी एन.सी.सी.चे ‘सी’ प्रमाणपत्रही मिळविले ! त्याचा उपयोग अलोरेत झाला. सन १९९७-९८ दरम्यान शाळेत एम.सी.सी. सुरु झालं. यासाठी दोन शिक्षकांची निवड झाली. श्री. खोतसर आणि मानेसर ! दोघांच्या मार्गदर्शनखाली कवायत म्हणजे साक्षात लष्करी प्रशिक्षणाचा अनुभव ! सन २००८ साली सरांनी, मुंबई विद्यापीठाचा ‘डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ (डी.एस.एम.) हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सरांच्या जीवनातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे, त्यांच्या पत्नी सौ. कविता (एम.ए.बी.एड.-इंग्रजी) यांचे दिनांक १ जून २०११ साली दु:खद निधन झाले. त्या शिक्षिका म्हणून अलोरे जवळच्या मंदार एज्युकेशन सोसायटीत, चिपळूणच्या बांदल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि शेवटी डेरवणच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात आपल्या दोनही जुळ्या मुलाचं संपूर्ण पालन, पोषण आणि संगोपन सरांनी केलं. एकाचवेळी आई आणि वडिलांची भूमिका बजावली. अशा दु:खद प्रसंगी अलोरकरांनी धीर दिला. वेळोवेळी प्रसंगाला धावून आले. आपल्या साऱ्या समस्या, विवंचना बाजूला ठेवून सरांचा विद्यार्थ्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न राहिला. सध्या सरांची मुलगी कुमारी अक्षता ही बी.एल.डी.ए. ए.व्ही.एस. आयुर्वेद महाविद्यालय बिजापूर येथे तर मुलगा कुमार अक्षय हा श्रीनिवास विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अॅन् टेक्नॉलॉजी, मेंगलोर येथे शिक्षण घेत आहे.

अलोरेत, स्वतंत्र खोली मिळाल्यावर ७/८ मुलं तिथं अभ्यासाला, मुक्कामाला असायची. सरांनी अनेक वर्ष इंग्रजीचा क्लास घेतला. बॅचनं मुलं यायची. त्यांचा इंग्रजी शिकवण्यांचा ज्ञानयज्ञ सकाळी पावणेसहा वाजता सुरु व्हायचा. नाममात्र शुल्कात तो चालायचा. एकदा शिकवणं स्वीकारलं की मग त्याच्या बदल्यात मला काय मिळतंय याचा विचार न करता बेभान होऊन शिकवणं विद्यार्थ्यांनी अनुभवलंय ! अनेकांच्या मेंदूत ते कायमचं कोरलं गेलं आहे ! जाता जात नाही आहे ते ! कालांतराने शाळेने दहावीच्या सर्व विषयांच्या विशेष तयारीसाठी प्रश्नपत्रिका काढायला घेतल्या. संपूर्ण जिल्हाभर त्या वितरीत व्हायच्या. त्याचंही काम कै. देशमाने सरांच्या नेतृत्वाखाली सरांनी पाहिलं.

अलोरे शाळेला आगवेकर सरांचे नाव दिले जावे यासाठी मानेसरांनी केलेली धडपड हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. नामकरण सोहोळ्याच्या स्मरणिकेचेही सरांनी संपादन केले. सरांसह, पर्यवेक्षक मा. विभावर वाचासिद्ध आणि शशिकांत वहाळकर सर या तिघांनी केलेली धावपळही कृतज्ञतापूर्ण उल्लेख करण्यासारखी आहे ! या सोहोळ्याच्या अनेक आठवणी आमच्याजवळ आहेत, परंतु प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सरांना प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नावं पाठ आहेत, माजी विद्यार्थ्यांची आहेतच आहेत ! मागच्या फेब्रुवारी अखेरीस मानेसर नेपाळला जाऊन आले. आपला प्रवासातला आनंद फेसबुकवरून आपल्या विद्यार्थ्यांशी शेअर करत राहिले. सरांनी अलोरे जवळच्या खडपोलीत छानसं घरकुल उभारलंय ! अर्थात निवृत्तीनंतरही ते इथंच असणार हे नक्की आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर आगवेकर सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोरे शाळेतून सेवानिवृत्त होताना स्वतः आगवेकर सरांनी, आपल्या पश्चात शाळेच्या मुख्याध्यापक पदाकरिता खात्रीपूर्वक विश्वास दाखवलेले, ज्ञानमंदिर पावित्र्यासाठी, केवढा जीवाचा आटापिटा ! ही काव्यभावना जगणारे मानेसर हे आगवेकर सरांनंतरचे शाळा आणि सरया सूत्रात सामावणारे, दीर्घकालीन कारकीर्द लाभलेले अफलातून व्यक्तिमत्त्व ! शालेय जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. आमच्यासारख्या अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी मुलांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशीरपणा, वेळापत्रकानुसार वर्तणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणारे माने सर अनेकांच्या पक्के स्मरणात आहेत. शाळा भरतानाचा पहिला तास चुकविणाऱ्यांच्या, उशीरा येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मानेसर गेटवर हातात शिमटी (बारीक काठी) घेऊन उभे असायचे. मजबूत झाडाच्या फांद्या कायम नम्र असतात. निसर्गाच्या या नियमाचे सदैव भान असलेल्या सरांचा शिक्षित विद्यार्थी देश घडवू शकतोया तत्त्वावर गाढा विश्वास राहिला.

शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तीला शालेय जीवनात स्व-नियमन सवयीची आणि त्याकरिता शिस्तीची गरज असते. सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामचं असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते. आश्वासक जीवनासाठीचा ती महत्त्वाचा पाया असते. तशी शिस्त आपल्या विद्यार्थ्यांच्यात पेरण्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून माने सर यशस्वी झाले आहेत. स्वत: मानेसर हे स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत. ‘आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत’, ही जीवनातील केवढी तरी मोठ्ठी आनंदाची बाब आहे. सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापूर्वी, काळगतीचे अचूक भान असलेल्या विभावर वाचासिद्ध सरांचे अलोरे शाळेत येणं, शाळेचा मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूलनामकरण सोहोळा, मानेसरांचं मुख्याध्यापक होणं आणि पुढच्या काळात त्यांचं शाळेच्या सोबत असणं या साऱ्या सकारात्मक घटनांकरीता शाळेचे संस्थाचालक आदरणीय डॉ. विनय नातू साहेब आणि सर्व संचालक मंडळाप्रतिही कृतज्ञता व्यक्त करायला हवी !

निवृत्ती ! सेवेत कार्यरत असलेल्या मनुष्य जीवनात एक सर्वोत्तम संधी घेऊन येणारी घटना ! काही वेळेला सेवेत उद्देशपूर्ण कार्य न घडल्यामुळे निवृत्त व्यक्‍तीच्या मनात उदासी पसरलेली असते. तर काही माणसं निवृत्तीकडे जीवनातील नवीन टप्पा, कार्य साधण्याजोगे द्वार म्हणून पाहतात. स्वतःला व्यस्त ठेवत समाजासाठी अधिकाधिक फलदायी बनण्याचा मार्ग अनुसरतात. ‘शेवटी आपल्या हृदयात काय आहे ?’ हे फार महत्त्वाचं असतं. हृदय जर काठोकाठ भरून वाहात असेलं तर या जीवनात आपण सर्वकाही मिळवलेलं आहे. ह्या अनुभूतीसह जगणं सरांच्या उत्तर आयुष्यातील सुंगंधी ठेवा ठरावा. भूतकाळाशी न भांडता, त्याचं केवळ तटस्थ निरीक्षण करत शक्य तेवढं स्वच्छ आणि मोकळेपणाने जगण्याचं महत्तम कसब मानेसरांनी फारपूर्वी आत्मसात केलंय ! हे कसब त्यांची जगण्यातली श्रीमंती आणि सौंदर्य अधिकाधिक वाढवत जाणार आहे. आगवेकरसरांच्या कारकिर्दीच्या अखेरीस ऑक्टोबर १९९८ ते २००३ पर्यंत मानेसर उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. आपली शिक्षणव्यवस्था, त्यातले कायदे, ‘सेवाज्येष्ठता’ नावाचे उद्योग गुणवत्तेच्या आडवे आले. दोष तरी कोणाला द्यावा ?

सन २०११-१२ मध्ये ते संस्थेच्या खडपोली शाळेत, सन २०१७-१८ मध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्याध्यापक पदावर रुजू होऊन २०१९ च्या वर्षारंभी मानेसर पुन्हा आपल्या कर्मभूमीत अलोरेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. ‘सगळंच काही वाईट नसतं’ हे प्रतिपादन करणारा हा दीडवर्षांचा कालावधी लाभला ! रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या सन २००० च्या बॅचने वर्तमानपत्रात सरांवर ‘जाहिरात पुरस्कृत पुरवणी’ प्रकाशित केली. पुरवणीतील जाहिराती त्या बॅचच्या अख्ख्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने जमा केलेल्या ! जणू वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात असलेला सरांचा राज्याभिषेकच त्या दिवशी घडला ! इतका भावनाप्रधान की ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीत बसताना सरांना आनंदाश्रू अनावर झाले. सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अलोरे शाळेच्या ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीला, मोरेश्वर आत्माराम आगवेकर सरांनी आपल्या विलक्षण कर्तृत्वाने, नेतृत्वाने समाजात वेगळा मानदंड प्रस्थापित करून दिला. ‘मुख्याध्यापक हा कर्तव्यनिष्ठ, वेळेचे भान असणारा, त्यानुसार नियोजन करणारा, कर्तव्यकठोर तितकाच वेळप्रसंगी मेणाहून मऊही असावा. आपल्या विषयात पारंगत, अभ्यासू, व्यासंगी, पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यात दुवा म्हणून काम करणारा मुख्याध्यापक असावा.’ असं आगवेकर सर कायम म्हणत. स्वतः तेही कायम असेच वागले. संधी मिळालेल्या प्रत्येक काळात त्यांच्या तत्वानुसार मानेसरांनी प्रभावी काम करण्याचा प्रयत्न केला. आगवेकर सरांनी प्रस्थापित केलेला ‘तो’ मानदंड तितक्याच समर्थपणे सांभाळणारे ‘केवळ’ मानेसर म्हणून या अभिषेकाला, सन्मानाला पात्र ठरले !

कधीकधी आपण ज्या समाजात वावरतो तो समाज आपल्याला अधिक ओळखत असतो. ‘आपलं म्हणालं तर काम बोललं पाहिजे, तोंड नव्हे !’ प्रत्येकाच्या स्वतः विषयीच्या कल्पना आणि समाजभावना यातलं वाढतं अंतर ‘कीर्तनाचा वर्तनाशी नसलेल्या संबंधासारखं ठरावं !’ मानेसरांना सामान्य मानवी जीवनातील ह्या असामान्यत्वाच्या कसोट्या साधता आल्या ! म्हणून मानेसरांचं संघर्षाला पुरून उरत जगणं आम्हाला भाग्याचं’ वाटलं. आज काळ बदललाय ! आव्हानं बदललीत. शिक्षण पद्धती बदलल्येय ! तरीही शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं कायम आहे. कायम राहणार आहे. त्या नात्यातला उमाळा साधत शाळेच्या ‘मुख्याध्यापक’पदाच्या खूर्चीचा सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी तिच्यात स्थानापन्न होणाऱ्या पुढच्या प्रत्येकावर असणार आहे. तो सन्मान ‘कालातीत’ राखला जावा, खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकाने खूर्चीचा हा इतिहास जाणून ‘बेभान होऊन कार्यरत व्हावं !’ या देशाचं भवितव्य असलेली सुजाण निखळ पिढी घडवावी, यासाठीचं हे प्रामाणिक निवेदन !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com

(माजी विद्यार्थी, इयत्ता दहावी बॅच १९९५)


एका कार्यक्रमात देवी सरस्वतीच्या प्रतिमेस
          पुष्पहार अर्पण करताना, संस्थाचालक डॉ. विनय नातू
           आणि मुख्याध्यापक अरुण केशव मानेसर !

सन २०१९ ला शाळेच्या विद्यार्थ्यानींनी जवानांना
             पाठविण्यासाठी बनविलेल्या राख्या स्वीकारताना मानेसर !

विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करताना मानेसर !


शाळेच्या एका कार्यक्रमात बोलताना मानेसर !


दैनिक सागर ३१ मे २०२० 

दैनिक सकाळ ३० मे २०२० 

दैनिक पवना समाचार पुणे १ जून २०२० 

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

जिद्द केवढी फुलण्याची !

गेल्या महिन्याभरापूर्वीपासून तीन कळ्या अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या या अकरा इंच उंचीच्या दुहेरी तगरीची जिद्द मागच्या (२२ एप्रिल) वसुंधरादिनी फळाला आलेली. तिची शेवटची, तिसरी कळी नेमकी आज, महाराष्ट्र दिनी फुलली. संपूर्ण विश्वात ‘करोना’चे ढग वास्तव्याला असताना तगरीतली फुलण्याची ही जिद्द आम्हाला विशेष भावली. साधीशी फांदी ती ही ! गेल्यावर्षी पावसाळ्यात लावलेली. कधी मोठी होणार ? कधी फुलणारं ? कुणास ठाऊक ? लावलेली तशी जगलेली. जगलेली म्हणून परसदारी असलेली. पण तिचं हे आजचं फुलणं मनाला केवढं तरी समाधान देणारं ! अंधाऱ्या वातावरणात एवढ्याच्या जीवानं उजेड दाखवण्यासारखं !
तिच्याकडे पाहून सहज वाटून गेलं,

जीव येवढा, जिद्द केवढी फुलण्याची !!
कठीण प्रयासातुनी, जगी समाधान देण्याची !!

गेल्यावर्षी, २/३ महिन्यातून एकदा परसदारी बागकामाला येणाऱ्या दत्तारामने हिला आणलेली. कुठे लावायची माहिती नसल्यानं त्यानं तशीचं ठेवलेली. पावसाळ्याचे दिवस, फांदी पडून राहिलेली. मी बाहेर प्रवासात असलेला. घरी आल्यावर तिची नीटशी छाटणी करून तिला परसदारी लावली. चित्रातली सध्याचं आकर्षण ठरलेली छोटीशी फांदी, मुख्य फांदीला पर्याय म्हणून नेहमीच्या सवयीने लावलेली. सवयीने लावलेली म्हणून तिच्याकडून फारशी अपेक्षाही नसलेली. सुदैवानं दोन्ही जगल्या. पहिल्या दोन-अडीच फुटाच्या फांदीनं दिवाळीतचं फुलायला सुरुवात केलेली. ही मात्र तशीच असलेली. तिनं सध्याच्या ऐन वातावरणात अशी कमाल साधलेली.

तगर, तगरी, तगारी, चांदणी (East Indian Rosebay) नावानं ओळखली जाणारी सुमारे अडीच/तीन मीटर उंच वाढणारी, अनेक फांद्या असलेली, सदापर्णी, काटक, बहुवर्षायू, झुडपवर्गीय, सुगंधी फुलं देणारी ही वनस्पती. समोरासमोर असलेली हिरवी, चकचकीत जणू भाल्यासारखी निमूळत्या टोकाची तिची पानं. पांढरी शुभ्र, एकेरी आणि दुहेरी (मोठी बहीण) पाकळ्यांनी युक्त असलेली तिची फुलं खाली नळीसारखी वरती पसरट छत्रीसारखी ! दिवसभर नाही पण रात्री, पहाटेस मंद सुगंध वाटणारी. आयुर्वेदासही उपयोगी पडणारी. तगर एकदा रुजली की तिच्याकडे फारसं बघावं लागत नाही अशातली. पहाटेच्या अंधारात फुललेल्या तगरीकडं पाहिलं तर जणू आकाशातून चांदण्या जमिनीवर अवतरल्याचा भास व्हावा, अशी शुभ्रता. लहानपणी, आमच्या अलोरे (तालुका चिपळूण) कोयना प्रकल्प कॉलनीतील घराच्या परसदारी मोठी फुललेली एकेरी आणि दुहेरी तगर होती. तिचे खोड चांगले मजबूत झालेले. आसपासच्या कोंबड्या पकडापकडीतून वाचण्यासाठी उडून तिच्यावर जाऊन बसलेल्या असायच्या. पतंगाची मादी (हॉकमॉथ) हिच्या पानांवर अंडी घालते. अळ्या तगरीची पाने खाऊन आपली उपजीविका करतात. हे चित्र इथेही असलेलं. अशीही तगर सर्वत्र वर्षभर फुलणारी. गजऱ्यांची शोभा वाढविणारी. अधिक काळ ताजी राहणारी. चाफा, गुलाबाच्या दुनियेत सोशल मिडीयावर दुर्लक्षिलेली. ‘कोणी माझ्याकडे पाहात नाही. कौतुकानं माझा शुभ्रधवल रंग डोळ्यांत साठवत नाही. माझा साधा फोटोही काढत नाही.’ असं सुचवू पाहणारी. याबद्दल खंत व्यक्त करणारी !

आज महाराष्ट्र दिन ! कामगार दिन ! परमेश्वर कृपेने आमच्या चिरंजीवाचा, तीर्थरूप आईचा वाढदिन ! ‘करोना’च्या प्रादुर्भावाने सारं विश्व काकुळतीला आलंय ! काय संदेश देत असेलं आजचा महाराष्ट्र दिन ! काय सांगू पाहात असेल वर्तमान निसर्ग आम्हाला ? अशा प्रश्नांच्या काहुरात अडकलेल्या आम्हाला मागच्या जागतिक वसुंधरा दिनी फुललेल्या या एवढ्याश्या ‘तगरी’नं स्तब्ध केलं. तिची तिसरी कळी नेमकी आज, महाराष्ट्र दिनी फुलली. फुलण्याची ही तगरीची जिद्द आम्हाला अत्यंत प्रेरणादायी वाटली. ‘सध्याच्या वातावरणात ह्याच जिद्दीनं, प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला ‘फिजिकल डिस्टंन्सिग’सह सांभाळा. आपल्यातली फुलण्याची जिद्द जीवंत ठेवा. हेही दिवस जातील.’ असं तर तिला सांगायचं नसेल ना ? तसचं असेलं कदाचित ! निसर्गालाही भावना असतातच ना ? ...अन्यथा बरोबर दिवस गाठून स्वतः फुलून आपल्या कृतीतून साऱ्या मानवजातीला ‘फुलण्याची जिद्द’ कायम ठेवायला कसं बर सांगितलं असेलं तिने ? 

धीरज वाटेकर
चिपळूण.
मो. ९८६०३६०९४८.
dheerajwatekar.blogsopt.com


बुधवार, २२ एप्रिल, २०२०

मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे

चिपळूणच्या ब्राह्मण साहाय्यक संघ, वीरेश्वर मंदिर परिसरात, नानासाहेब जोशी नगरात अखिल भारतीय प्रकाशक संघ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ व २९ डिसेंबर २०१९ ला दुसरे लेखक प्रकाशक साहित्य संमेलन संपन्न झाले. हे लेखक प्रकाशक संमेलन नव्याने पुस्तक लेखनासाठी सिद्ध होऊ पाहाणाऱ्यांसाठी, पुस्तकांच्या लिखाणात वेगळेपणा आणू पाहाणाऱ्या लेखकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. या निमित्ताने 'दैनिक सागर'साठी लिहिलेल्या 'मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे’ या लेखाद्वारे प्रकाशन क्षेत्राचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...!

मराठी प्रकाशनाचे आद्य प्रवर्तक म्हणून कलकत्त्याच्या डॉ. विल्यम कॅरी यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी बंगालमधील श्रीरामपूर येथे सन १८०५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘मराठी भाषेचे व्याकरण’ या देवनागरी लिपीतील पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. एकोणिसाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी मुद्रणयंत्रे आणून धर्मप्रचाराच्या दृष्टीने काही ग्रंथ प्रकाशित केले. त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हते. कालांतराने सरकारी व खाजगी शाळांसाठी क्रमिक पुस्तकांची आवश्यकता भासू लागल्यावर मराठी साहित्यिकांच्या मदतीने सरकार स्वतः पुस्तके तयार करून वाटप करू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर २,१९३ पुस्तके प्रसिद्ध झाल्याची नोंद मिळते. विसाव्या शतकातही शालेय पुस्तकांचीच प्रकाशने अधिक होती. १९१९ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारताचे इतर देशांशी वैचारिक दळणवळण सुरू झाले. विल्यम कॅरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशकमराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकारतसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक, मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडितवनस्पतिशास्त्रज्ञ, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते. दिनांक १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर येथील डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली. एक छापखाना उभारला. ते बंगाली, संस्कृत आणि पौर्वात्य संस्कृती भाषांशिवाय ते इंग्रजीफ़्रेंचलॅटिनग्रीकहिब्रू भाषांत पारंगत होते. आपल्या छापखान्यातून सन १८३४ पर्यंत त्यांनी बंगाली व मराठीसह नागरीसंस्कृतहिंदीकोंकणीगुजरातीकानडीतेलुगूपंजाबीउडियाअरेबिकपर्शियनचिनी आदि चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या होत्या. सन १८०५ ते १८२५ दरम्यान मराठी भाषेत, देवनागरी लिपीत त्यांनी सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमानबायबलचा नवा करारजुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले. सन १८१० साली केरी यांनी अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ दिला आहे. सन १८१४ साली सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत लिहून मुद्रित केले.

‘लिखिलेल्या ४९ पृष्ठांपेक्षा अधिक मजकूराला मुद्रित करून प्रकाशन योग्य करणे ग्रंथ !’ अशी युनेस्कोने ग्रंथाची व्याख्या केलेली आहे. जगाचा विचार करता या व्यवसायास नवव्या शतकाच्या मध्यास चीनमध्ये सुरुवात झाली. तोपर्यंत ग्रंथाच्या नकला तयार होत असतं. मुद्रणामुळे ग्रंथाच्या प्रती निर्दोष व त्वरेने तयार करता येऊ लागल्या. यूरोपात पंधराव्या शतकात खिळामुद्रण सुरू झाले. सोळाव्या शतकात हा धंदा फ्रान्समध्ये स्थिर झाला आणि तेथून इंग्लंडमध्ये गेला. जगात, बांधलेल्या पृष्ठांच्या ग्रंथाचे अस्तित्त्व चौथ्या शतकापासून, रोमन युगापासूनच आढळते. सन १५०१ मध्ये आल्दो मानूत्स्यो या नागरिकाने ग्रंथाचा अवाढव्य आकार बदलून त्याला आजचा आकार आणला. प्राचीन ग्रंथ हस्तलिखित स्वरूपाचे, मोठ्या आकाराचे असत. थोलकाधीअर नावाच्या लेखकाचे थोलकाप्पियम हे पुस्तक २ हजार ५०० वर्षांपूर्वीचे जुने आहे. पूर्वी ग्रंथप्रकाशक असा स्वतंत्र व्यवसाय नव्हता. हस्तलिखितांच्या प्रती तयार करणारा ‘प्रकाशक’ असायचा. त्याच्या दुकानात कागदाच्या अथवा कातड्याच्या मोठमोठ्या गुंडाळ्यांवर ग्रंथ लिहिले जात असे. कालांतराने चर्चविद्यापीठेगिल्ड्‌समुद्रक व प्रकाशक अशी प्रकाशन व्यवसायाची स्थित्यंतरे क्रमाक्रमाने होत गेली. अनेक शतकांच्या मार्गक्रमणेतून पुस्तकांची मागणी वाढू लागली. लेखकांना लोकप्रियता मिळू लागली. अठराव्या शतकाच्या अखेरीस पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालये यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये दरवर्षी सु. ९३ ग्रंथ प्रसिद्ध होत. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मितीच्या खर्चासाठी राजेराजवाडेसरदार, धनिक यांची मदत घ्यावी लागे.

खरतरं ग्रंथप्रकाशन हे अतिशय कठीणकौशल्याचे व जिकीरीचे काम ! ग्रंथाचा विषयव्याप्ती, पृष्ठसंख्यात्याला मिळणारे ग्राहक, त्याचे रास्त मूल्य यांचा विचार प्रकाशकाला करावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ग्रंथप्रकाशन हा भारतात व्यवसाय होऊ शकला नाही. सन १८६७ मध्ये कार्यवाहीत आलेल्या ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट’ मुळे ग्रंथनिर्मिती व्यवहारास आकार प्राप्त होत गेला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालय विकास योजनेमुळे ग्रंथालयांची संख्या वाढली. ब्रिटिश सत्ता भारतात पक्की झाल्यानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी दुय्यम दर्जाच्या नोकरवर्गाची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी शाळा उघडल्या. या शाळांतून देशी भाषा हेच माध्यम होते. सन १८३३ मध्ये ‘मेकॉले मिनिट’ प्रसिद्ध झाले. शाळेतील देशी भाषांचे स्थान इंग्रजीला मिळाले. या शाळांमुळे ग्रंथप्रकाशनास चालना मिळाली. महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक ‘पंचोपाख्यान’ होय. ते सन १८२२ मध्ये बाँबे करिअर छापखान्यात छापून प्रसिद्ध करण्यात आले होते. सन १८४७ साली लेखाधिकार कायदा (इंडियन कॉपीराइट ॲक्ट) संमत झाला, ग्रंथकारास संरक्षण मिळाले. सन १८६७ च्या ग्रंथनोंदणी कायद्यामुळे सरकारकडे पुस्तके येऊ लागली. १८६७ च्या पूर्वीच्या प्रकाशित ग्रंथास दोलामुद्रिते’ आद्यमुद्रिते’ म्हणत. दोलामुद्रितांच्या काळात मराठी भाषेत १२८ प्रकाशकांनी ४३५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्याहीपूर्वी प्रकाशने शिलामुद्रित असत. सन १८६७ नंतर खिळामुद्रण सुरू झाले. टॉमस ग्रॅहॅम यांनी या मुद्रणकलेची सुरुवात केली. मराठीतील पहिले पंचांग सन १८५८ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर छापले. कॅरीएल्‌फिन्स्टनकँडीजार्व्हिसमोल्सवर्थ या ब्रिटिशांनी मराठी भाषेवर प्रेम केल्याचे दिसते. याकाळात परशुरामपंत गोडबोले यांचे नवनीत (१८५४)बाबा पदमनजी यांची यमुनापर्यटन (१८५७) कादंबरीकृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे साक्रेतिसाचे चरित्र (१८५२)अमरापूरकर यांचे प्रबोधचंद्रोदय (१८५१) नाटक ही मराठीतील काही नामांकित प्रकाशने होती. सन १७९५ मध्ये नाना फडणीस यांनी तयार केलेल्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या लाकडी ठशांपासून तो खिळामुद्रणापर्यंत ५० वर्षांत मराठी प्रकाशकांनी बरीच मजल मारली. सन १८५९ च्या सुमारास गोविंद रघुनाथ केतकर यांच्या ज्ञानसागर शिळा छापखान्यात एका ग्रंथाच्या १५० प्रती निघत होत्या. भाषा समृद्ध करण्यासाठी कोशवाङ्‌मयही समृद्ध करण्याचा प्रयत्न मराठी पंडितांच्या मदतीने ब्रिटिशांकडून सुरु झाला. यातून डॉ. विल्यम कॅरी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८०५)बाळशास्त्रींचा मराठी-इंग्रजी कोश (१८२०)मोल्सवर्थ-कँडी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८३१)रत्नकोश (१८६१)हंसकोश (१८६३) निर्माण झाले. मुद्रकप्रकाशक व विक्रेते या घटकांनी एकत्र यावे. कोणाकडून या मंडळींवर अन्याय झाल्यास त्याचा प्रतिकार करता यावाया हेतूने त्या काळात प्रिंटर्सपब्लिशर्सबुकसेलर्स असोसिएशन या नावाची संस्था आद्य मराठी मुद्रक-प्रकाशक जावजी दादाजी यांनी सन १८९३ ला स्थापन केली. न्या. रानडे यांनी १८७४ मध्ये मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. केशव भिकाजी ढवळेजगत्‌हितेच्छू प्रकाशनाचे गोंधळेकरकर्नाटक प्रकाशनाचे मंगेश नारायण कुलकर्णीदामोदर सावळाराम यंदेमनोरंजक ग्रंथ प्रकाशन मंडळीतुकाराम पुंडलिक शेटे आदिंनी प्रकाशन व्यवसायासाठी प्रयत्न केले. मनोरंजन मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र, गणेश महादेव वीरकर मंडळी मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत होती. मात्र मराठी जनतेने ग्रंथखरेदीच्या बाबतीत उदासीनवृत्ती दाखविल्यामुळे त्यांना फारसे यश मिळाले नाही.

सन १८९४-९५ च्या डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रॅन्स्लेशन सोसायटीच्या अहवालात, मराठी भाषेत ग्रंथ कमी होतात. याचे कारण मराठे लोकांत ग्रंथकर्तृत्व-शक्ती कमी आहे हे नाहीतर ग्रंथवाचनाची अभिरुची कमी आहे हे होय. म्हणून उपयुक्त व मनोरंजक ग्रंथ तयार करून ते अल्प किंमतीने लोकांस विकत देता येतीलअशी तजवीज केली पाहिजे अशी नोंद आढळते. रियासतकार सरदेसाईनाथमाधवपारगावकरसावरकरखांडेकर वगैरेंचे वाङ्‌मय सन १९२० ते १९४० दरम्यान गणेश महादेव आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केले. सन १९१४ मध्ये के. भि. ढवळे प्रकाशन संस्था स्थापन झाली. ग्रंथनिर्मितीलेखकांची निवडसचोटीचे व्यवहार आणि मराठी वाङ्‌मयाबद्दलचे प्रेम ही या संस्थेची वैशिष्ट्ये होती. मराठी ग्रंथांना रूपसंपन्न करण्याचे याच संस्थेला जाते. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमिक व उच्च अभ्यासक्रमांत मराठीला स्थान मिळू लागले. मराठी ग्रंथप्रकाशनांची संख्या वाढली. भाषेच्या दृष्टीने विचार करता प्रकाशनाबाबत सन १९६४ साली इंग्रजी व हिंदी या भाषांच्या खालोखाल मराठीचा क्रम राहिला आहे. सन १९७० मध्ये मराठीत १,५१४ पुस्तके प्रसिद्ध झाली. देशमुख आणि कं.पुणे काँटिनेंटल प्रकाशनपुणे व्हीनस प्रकाशनपुणे मौज प्रकाशनमुंबई मॅजेस्टिक प्रकाशनमुंबई पॉप्युलर प्रकाशनमुंबई ठाकुर आणि कं.अमरावती सुविचार प्रकाशननागपूर व उद्यम प्रकाशननागपूर ही त्यावेळची काही प्रमुख नावे होतं. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने, काही खाजगी संस्थांनी श्रेष्ठ ग्रंथांस पारितोषिके देऊन या व्यवसायाला उत्तेजन देण्याचा अभिनंदनीय कार्यक्रमही चालू केला. ग्रंथालयासाठी स्वतंत्र खाते स्थापन झाले. साक्षरता प्रसारासाठी खेडेगावापर्यंतही ग्रंथांचे लोण पोहोचविण्यात आले. विश्वविद्यालयेमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळभारत सरकार वगैरे संस्थाही उपयुक्त ग्रंथांस अनुदान देऊ लागल्या. दुर्दैवाने इतक्या प्रयत्नातून सावरूनही आजचा मराठी वाचक तितका जागरूक झालेला नाही. ग्रंथालयासारख्या उपक्रमाबाबत मराठी माणूस मागे आहे. वाचकांना ग्रंथ विकत घेणे परवडावे म्हणून लोकप्रिय ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्याप्रकाशनपूर्व सवलत-योजनाखंडशः पैसे देऊन ग्रंथ-खरेदी करण्याची योजना यांबाबत अलिकडे मराठी प्रकाशकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जगात युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाग्रंथप्रदर्शनेपरिसंवादचर्चासत्रे वगैरेच्या साहाय्याने या धंद्याची बैठक भक्कम पायावर उभी करीत आहेत. पश्चिम जर्मनीत फ्रँकफुर्ट येथे दरवर्षी भरत असलेले आंतरराष्ट्रीय ग्रंथ-प्रदर्शन, दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरणारे वर्ल्ड बुक फेअर आज प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही ग्रंथ प्रदर्शने होतात. त्यांचे प्रमाण घटलेले आहे. ग्रंथ हे शिक्षणाचे प्रमुख माध्यम हे तत्त्व गृहीत धरून सरकारने साहित्य अकादमीनॅशनल बुक ट्रस्टमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ माध्यमातून प्रयत्न सुरु केले. सन १९७३ दरम्यान ग्रंथमुद्रणास योग्य अशा कागदाचे दुर्भिक्ष्यछपाईच्या दरातील वाढ यांमुळे पुस्तकांच्या किंमती वाढल्या आणि वाढत्या महागाईमुळे विक्री कमी झाली. भारतातील आजच्या बहुतेक प्रकाशन संस्था व्यक्तिगत मालकीच्या आहेत. भारतातील इंग्रजीसंस्कृत भाषांतील ग्रंथांना परदेशांतील वाचनालयांतून मागणी आहे.

पुण्याचा विचार करता शनिवार पेठनारायण पेठ हा भाग मुख्यत: मुद्रणछपाई क्षेत्राने व्यापलेला आहे. याच भागातील सदाशिव पेठेमध्ये शनिपारजवळ फिरताना 'दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन'ची इमारत दिसते. पुण्यात सन १९१० च्या दशकात प्रिंटिंग क्षेत्र वेगाने विकसित होत असताना कागदटंचाईप्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा निर्माण झाल्याने या क्षेत्रातील काही ध्येयवादी व्यक्तींनी एकत्र येऊन १९ मे १९१९ या दिवशी पुणे मुद्रक संघाचे हे रोपटे लावले होते. आता या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्रात सन १९७०-८० च्या दशकापर्यंत पुण्या-मुंबईसह औरंगाबादकोल्हापूरनागपूर, नाशिक शहरात मोजके प्रकाशक कार्यरत होते. महाराष्ट्रभर विद्वान लेखकांची मांदियाळी होती. वाचकप्रेम अनुकरणीय होतं. प्रकाशनविश्व जोरात कार्यरत होतं. नंतरच्या कालखंडात हळूहळू नवनवीन प्रकाशन संस्था उदयाला येत गेल्या. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शासनाने सकारात्मक योजना राबवल्या. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अनेकांनी प्रकाशन संस्था उभारल्या. एकविसाव्या शतकात पुस्तके प्रकाशित करण्याबाबतचा प्रकाशकांचा दृष्टीकोन बदलला. माहितीपर, अनुवादित, वाचकाला वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण वाढले. दुर्दैवाने सर्वच प्रकाशकांना भरपूर पैसा मिळतो हा चुकीचा समज या काळात अधिक दृढ झाला. प्रकाशन व्यवसायातील नैतिकतेसंदर्भातील अनेक बाबी ठळकपणे चर्चिल्या जाऊ लागल्या. शाळांमधील ग्रंथालयांच्या खरेदीवर शासकीय अनुदानाचा परिणाम होत गेला. कमी-जास्त किंमती, खरेदीतील अधिक सवलती यामुळे काही प्रकाशन संस्था डबघाईला आल्या. विविध कारणांमुळे ग्रंथालयामध्ये दर्जेदार पुस्तके मिळणे दुर्मीळ झाले. ग्रंथालयांच्या खरेदीत गुणात्मकता असायला हवी. ते सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. असे मुलभूत सिद्धांत अडगळीत गेले. परिणामस्वरूप ग्रंथालयापासून वाचक दुरावला. या साऱ्यावर सारासार विचारमंथन होण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन असावे. आजही महाराष्ट्रात ‘एक लेखक एक प्रकाशक’ या संकल्पनेवर कार्यरत असलेले लेखक आहेत. अगदीच नाही म्हणायला गेली काही दशके ‘एक लेखक एक प्रकाशक’ या विचारानुसार कार्यरत लेखक-प्रकाशक आपल्याला भेटतात. त्यांना सर्वांसमोर आणल्यास लेखक-प्रकाशक संवाद समन्वयाचे गुपित उलगडता येऊ शकेल.

अडचणींचा डोंगर उभा असला तरीही, सातत्याने उत्तमोत्तम पुस्तके काढणारे प्रकाशक आपल्या व्यक्तिगत वाचकांच्या आणि ग्रंथ प्रदर्शनांच्या बळावर भाषिक सामर्थ्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करताहेत. पूर्वी प्रकाशक पायाला भिंगरी लावून सर्वदूर प्रवास करत. चांगल्या मराठी प्रकाशकांची चांगली पुस्तके आजही ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. चालणारी पुस्तके वर्षभर चालतात. परंतु धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी प्रकाशकांना इतर दहा पुस्तकांची निर्मिती करावी लागते. अशा पुस्तकांनाही ग्रंथ प्रदर्शनातून उठाव मिळतो. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाचा चांगला फायदा होतो. दुर्दैवाने आज राज्यात ग्रंथ प्रदर्शनासाठी लागणाऱ्या हॉलची वाढलेली भाडीवाहतूक व प्रवास खर्चकामगारांचे पगार, मुक्कामाचा खर्चमंडप किंवा अन्य सुविधांचा खर्च आणि तुलनेने विक्रीच्या व्यस्त प्रमाणामुळे ग्रंथ विक्रेत्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित बिघडलेले दिसते. अनेक प्रकाशकांनी बाहेरगावची ग्रंथ प्रदर्शने बंद केली आहेत. खरतरं ही प्रदर्शने गावोगावची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम करतात. त्यामुळे शासनाने अशा उपक्रमांना सढळ हाताने मदत करायला हवी आहे. म्हणूनच या संमेलनाच्या निमित्ताने भरलेला ‘ग्रंथमहोत्सव’ अधिक महत्त्वाचा आहे. आज जगभर असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत वस्तूंप्रमाणे मराठी पुस्तकांची निर्यात होण्याच्या मुद्द्यावर विचार होणे गरजेचे आहे. शासकीय ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांचा सहभाग आणि वाचकांची सोय पाहिली जायला हवी. ‘आयएसबीएन’ क्रमांकाची उपलब्धी सहज व्हायला हवी. लेखक-प्रकाशकांना सरकारी विश्रामगृहांत मुक्कामासाठी सवलत मिळायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकीय मराठी टंकलेखन युनिकोड वापरासाठी शासनाने पुढाकार घ्यायलाच हवा आहे. अलिकडे जवळपास प्रकाशक लेखकांकडून टाईप केलेला मजकूर मिळावा असा आग्रह करीत असतात. आजच्या युगात ‘युनिकोड वापर कार्यशाळा’ ही एक मोठी आवश्यकता म्हणून पुढे येते आहे.

ग्रंथाचे संपादन आणि मुद्रितशोधन हा या क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. परदेशातील प्रकाशकांकडे असणाऱ्या संपादकांप्रमाणे मराठीत आता ही पद्धत रूढ होते आहे. पत्रकार, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आपल्या वृत्तपत्रेनियतकालिकातील सदरांची पुस्तके काढण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या सामाजिकराजकीय जाणीवांमुळे वैचारिक साहित्याचे दालन फुलू लागले आहे. मराठी पुस्तकांना मागणी आहे. वाचकांना वैविध्यपूर्ण पुस्तके हवी आहेत. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुस्तके नव्यातरुण वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही वाढली आहे. कॉपीराइट हा अनेक ठिकाणाचा कळीचा मुद्दा आहे. हक्क अबाधित असा उल्लेख नसला तरीही कॉपीराइट असतोच. लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंतच हा कायदा लागू होतो. नव्याने लेखनादि क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी नीट समजून घेण्याचे हे संमेलन योग्य व्यासपीठ आहे. मराठी साहित्याचे चांगले मार्केटिंग व्हायला हवे आहे. फेसबुकव्हॉट्सअप आदि तंत्रज्ञानामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘वाचक नाहीत’ ही तक्रार चुकीची आहे. ई-बुकऑडिओ बुक हा मूळ छापील पुस्तकांना पर्याय नसून त्या नवतंत्रज्ञानाने युक्त संधी असल्याचे समजून घ्यायला हवे आहे. बनावट पुस्तकांचा (पायरेटेड) मुद्दा सर्वत्र अत्यंत गंभीर आहे. पायरेटेड पुस्तके कशी रोखावीत ? यावर आजही ठोस उत्तर मिळालेले नाही. लेखक आणि प्रकाशक नात्याचे अनेक पैलू राहिलेले आहेत. या दोनही ठिकाणी विश्वासआपुलकी आणि सौहार्द समानतेच्या मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न करणारे हे संमेलन आहे.

पुस्तक विकलं जाण्यासाठी आम्ही नवोदितांनी, लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तकाचा निम्मा शिल्लक प्रवास समजून घेण्याची गरज आहे. तो समजला तर चांगल्या पुस्तकांची निर्मिती शक्य आहे. पूर्वी लेखकसंपादक आणि प्रकाशक यांच्यात लेखनाविषयी चर्चा होतं. योग्य आणि अचूक लेखन वाचकापर्यंत पोहोचवायची कळकळ त्यामागे असायची. आताची पिढी या साऱ्याकडे व्यवसाय म्हणून अधिक बघते. कधीकधी लेखनाची गुणवत्ता चांगली असतेपण विक्रीमूल्य कमी असतं. तेव्हा प्रकाशकीय अंदाजाचा कस लागतो. आजही मराठी वाचक पुस्तकाच्या किंमतीचा खूप विचार करतो. तुलनेने अधिक किंमतीची इंग्रजी विकत घेतली जातात. सध्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडलेत. संगणकायुगाने अलिकडे प्रिंट ऑन डिमांड पद्धत जन्माला घातली. साहित्यिक आणि वाचक जवळ आले आहेत. वितरण यंत्रणा बदलत आहेत. सोशल मीडिया, तंत्रज्ञानामुळे लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. इंटरनेटईमेलफेसबुकव्हॉटस्अपगुगलप्लस, ई-बुकडिजिटल प्रिंटिंग आदि तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र पूर्णतः ढवळले गेले आहे. आज वाचकांची प्रगल्भता कमालीची वाढते आहे. पुढचा काळ कागदी प्रकाशकांचा नाही. असे काही ठिकाणी म्हंटले जाते, त्यात सर्वथा सत्यता नसावी. आज महाराष्ट्रात राजहंस, मॅजेस्टिक, मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मौज, ग्रंथायन, वरदा बुक्स, प्रगती अभियान, उत्कर्ष, रोहन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, काँटिनेंटल प्रकाशन, मनोविकास, अनुबंध, देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि., परचुरे प्रकाशन, लोकवाङमय गृह – मुंबई, साकेत, स्नेहवर्धन, मधुश्री, विश्वकर्मा, मायबोली, रसिक आदिंसह सुमारे पाचशे हून अधिक प्रकाशन संस्था कार्यरत असाव्यात. तरुण वर्ग वाचत नाहीही टीका अन्यायकारक आहेतरुण वर्ग वाचत असतोत्यांच्या वाचनाचे विषयमाध्यमं बदलत आहेतत्यांच्या पसंतीस उतरतील असे विषयपुस्तकंच येत नसतील तर ते काय वाचणार असा एक प्रश्न पुढे येत असतोदुर्दैवाने जुनी जड वैचारिक पुस्तकं आजची पिढी वाचत नाही. आजचा वाचक चार पुस्तकं चाळूनबघूनत्यावर नजर टाकून मग पुस्तक विकत घ्यायचं की नाही ते ठरवतोप्रकाशकांनी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं हे सत्य आहे. प्रकाशकांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागतो आहे. भविष्यात प्रकाशन संस्थांना पुस्तकांच्या मुद्रित कॉपींबरोबर -बुक्सही तयार करावी लागणार आहेतमराठीत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण आणि मागणीही वाढते आहे.

आज लेखक स्वयं-प्रकाशनाबद्दल पाऊले उचलताना दिसतात. काही भक्कम यशही मिळवतात. अशांसाठी किमान लेखनाचे संपादन, पुस्तकाचा आकार, पुस्तकाचे मुखपृष्ठ, छपाई, पुस्तक बांधणी, वितरण, कमिशन, आय.एस.बी.एन. आदि बाबींचा किमान विचार करायला हवा, याची जाणीव करून देणारे हे संमेलन आहे. आजही पुस्तक हातात पडलं की काही वाचक एका बैठकीत ते वाचतात. पुस्तकातल्या विषयाचा विचार करतात. काही वेळा त्यातल्या व्यक्तिरेखेत गुंततात. एखाद्या वाक्यात हरवतात. हे सगळं लेखकाला अनुभवायला मिळतं. वर्तमान युगात, याही पुढे जाऊन लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तक निर्मितीचा प्रवास समजून घेतला तर नवलेखकांकडून अधिकाधिक दर्जेदार ग्रंथ निर्मिती शक्य होईल. मराठी ग्रंथनिर्मिती क्षेत्रात चैतन्य प्रस्थापित होईल.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८

संदर्भ :
१ मराठी विश्वकोश
२ प्रकाशनविश्व (२०१८-१९)
३ पॉप्युलर रीतिपुस्तक 
४ मराठी विकिपीडिया

अण्णा शिरगावकर यांच्या ‘शेवचिवडा’ आणि ‘व्रतस्थ’ विषयी...!


तब्बल नऊ ताम्रपटांचे संशोधन करून कोकणच्या इतिहासाला प्राचीनतेचे संदर्भ बहाल करणारे दाभोळचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांनी वयाच्या ८ व्या वर्षी आपल्या अनुभवसमृद्ध लेखणीतून ‘वाशिष्ठीच्या तीरावरून या संग्राह्यमूल्य असलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या लेखनानंतर ते अवघ्या आठ महिन्यात ‘शेवचिवडा आणि व्रतस्थ’ या दोन पुस्तकांसह वाचकांच्या भेटीस आले आहेत. यातील शेवचिवडा हे शिरगावकर यांनी आपल्या विनोदी आणि मिश्किल शैलीत लिहिलेले पुस्तक असून दुसरे 'व्रतस्थ' पुस्तक त्यांच्याच कार्याचा आढावा घेणारे, विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे.

आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजलेल्या अण्णा शिरगावकर यांनी आपल्या आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगण्याचं ठरवित, ‘आपल्या आयुष्याला वैशिष्ट्यपूर्ण आकार कसा  दिला ? याची मांडणी करणाऱ्या, गो. नी. दांडेकर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, निशिकांत जोशी, भालचंद्र दिवाडकर, कुमार कदम, गोपाल अवटी, माधव गवाणकर, अंजली बर्वे, उषा धुरंदर, प्रा. रेणू दांडेकर, प्रा. सुहास बारटक्के, सुधांशु नाईक, यशवंत पाध्ये, डॉ. वि. म. शिंदे आदि मान्यवरांनी लिहिलेल्या ४२ लेखांचे संकलन यात आहे. विशेष म्हणजे दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय निशिकांत जोशी यांनी अण्णांवर दोनदा लिहीलेले ‘प्रवाह’ या त्यांच्या गाजलेल्या सदरातील लेखही यात समाविष्ट आहेत. आयुष्याच्या पन्नाशीत जिल्हा परिषदेच्या सभापती पदावरून पाय उतार झाल्यानंतर अण्णांनी अवघ्या वर्षभरातच पक्षीय राजकारणातून निवृत्ती स्वीकारत स्वतःला पूर्णवेळ समाजसेवी उपक्रमांमध्ये झोकून दिले होते. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनीसागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली, या साऱ्यांचा उल्लेख वजा इतिहास विविध मान्यवरांनी मांडला आहे. वाचन आणि लेखनाचे प्रचंड वेड असलेल्या अण्णांचा लोकसंग्रह फार मोठा राहिला आहे. जबरदस्त निष्ठा आणि हातात घेतलेले काम होणारच असा समोरच्यांच्या मनात भरावसा निर्माण करणारी त्यांची कार्यतत्परता यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम आदिसंह सर्वधर्मीय त्यांचेवर शतप्रतिशत विश्वासून असतात. निव्वळ लोकसंग्रहाच्या बळावर सुमारे दहा-वीस मानाची पदे अण्णांकडे चालून आली होती असा इतिहास आहे.

वास्तविकत: कुठेही सापडणार नाही इतका हास्याचा साठा आपणा सर्वांच्या जीवनात असतो, परंतु त्याकडे  पाहाण्याची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी असावी लागते. त्या असलेल्या दृष्टीला शब्दात पकडण्याचे सामर्थ्य जर आपण जमवू शकलो तर आपले लेखन आणि भाषणही रक्त न सांडता परिणामकारक शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी ठरते. कोकणचे नामवंत इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या, गुढार्थाने भारलेल्या परिणामकारक विनोदी ‘शेवचिवडा’ या लेखसंग्रहाबाबत आपण असे निश्चित म्हणू शकतो. मानवी जीवन सदा सुखी आणि आनंदी असावे असे सर्वांनाच वाटते, परंतु वास्तव जीवन काही प्रमाणात का होईना सुसह्य करण्याचे काम ‘विनोद’च करू शकतो. हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो. आपले आरोग्य उत्तम राहाते. हे मर्म पटलेल्या ८८ वर्ष वयाच्या शिरगावकर यांनी, वर्तमान ताणतणावग्रस्त जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर  आपल्या जीवनाचे ‘हसा आणि हसवा’ हेच तत्व असल्याचे पुस्तकाच्या अगदी प्रारंभी सांगून टाकले आहे. त्यांचे मनोगतही इतके प्रभावी आहे की हे लेखन हास्यप्रधान आहे की हास्यास्पद आहे हे वाचकांनीच ठरवावे, असे सांगताना, सध्याच्या काळातील हास्यक्लबपासून आचार्य अत्रे यांच्या काळातील भाषणे आणि आजच्या काळातील ‘विदुषकी’ भाषणे अशी मांडणी करायला ते विसरत नाहीत. 

शिरगावकर यांचे हे प्रकाशित तेरावे पुस्तक आहे. लेखन विषयाचे व्यापक वाचन, पक्की तत्वज्ञानाची बैठक, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण आणि अचूक टायमींग साधणाऱ्या सहजस्फूर्त मर्मविनोदाची जाण असणाऱ्या शैलीचे पुरावे पुस्तकात जागोजागी आढळतात. शिरगावकर हे पुराणवस्तू संग्राहक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सतत काहीनाकाही ‘दर्शनीय’ असतेच ! यातून मग पुढे येतो एक प्रश्न, ‘एवढ्या पुराणवस्तू मिळाल्या कशा ?’ या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या ‘दोन लाखाचा ताम्रपट मला मोफत मिळाला’ या लेखाने हा शेवचिवडा सुरु होतो. ग्रामीण भागात सहज संवादातून घडणारे विनोद, मैलोनमैल करावी लागणारी पायपीट, तिच्यातील गमतीजमती आणि मुख्यत: त्या काळातील कोकणच्या ग्रामीण भागातील वातावरणात वाचकाला रममाण होता येते. आयुष्यातील काही काळ रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घालविलेले शिरगावकर आपल्या एका लेखात आजकाल सारखे पक्ष बदलणाऱ्या प्रवृत्तींवर बोट ठेवताना ‘लाकडे मसणात गेली आता पक्ष कसले बदलता ?’ अशी बोची टीका करतात. ‘राजकारण्यांची कॉमेडी एक्सप्रेस’ या आपल्या आणखी एका लेखात कालपरवापर्यंत एकमेकांना ‘लाखोली’ वाहणारे अचानक गळाभेटीत कसे रममाण होतात ? या वर बोट ठेवताना कोणत्याही कार्यक्रमाला राजकारण्यांसोबत येणारा आणि ‘टाळकुटी’चे काम करणाऱ्या पन्नास जणांच्या जमावावरही ते तिरकस शेरा मारतात. ‘माझ्या मरणाची कथा...!’ हा त्यांचा या लेखसंग्रहातील आणखी एक खुमासदार विनोदी लेख आहे. आपल्याच मरणाकडे तटस्थ पद्धतीने पाहात आपण मेल्यानंतर घडणाऱ्या घटना ते मांडतात. बायकोने फोडलेला हंबरडा, संसारातील वेचलेल्या लहानसहान घटनांचे, मेल्यानंतरच्या विविध सभांतील भाषणाबाबत लिहिताना समाजाच्या ‘ओठात एक आणि पोटात एक’ या वृत्तींवर सहज बोट ठेवण्याची किमया, लोकांच्या विनोदी अंगाने केलेले अचूक विश्लेषण यामुळे भरपूर हसविणाऱ्या या लेखात स्वतःचे मरणही जगण्याचा जबरदस्त प्रयत्न दिसतो. ‘इतिश्री गदर्भ पुराण आणि गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले’ हे विनोदी कल्पनाविलास लेख मुळातून वाचण्यासारखे आहेत. चिपळूणच्या गोवळकोट धक्यांवरील तोफांचे विषयी लिहितानाही त्या तोफांसोबत फोटो काढून उगाचच पेपरात मिरवणाऱ्यांना ते खडे बोल सुनावतात. हे करताना अगदी सहजतेने संपूर्ण कोकणात कुठे किती तोफा आजही पडलेल्या आहेत याबाबतही भाष्य करतात. ‘जि.प. प्रशासनाची दहा वर्षे विकास कि भकास ?’ या अन्य एका लेखात तर ते तिथल्या संपूर्ण कामाचा उताराच काढतात. माजी आमदार स्वर्गीय डॉ. श्रीधर नातू यांच्यावरील ‘तात्यांचे स्वर्गारोहण’ हा सुद्धा त्यांचा असाच एक अप्रतिम विनोदी लेख आहे. ‘एखादा मृत्यू लेखही किती विनोदी असू शकतो ? त्याचा हा लेख उत्तम नमुना आहे. ‘गोपाळगडचा वारस अमेरिकेहून येत आहे’ हा लेख लेखकाच्या समाजातील सजग वावराचे जीवंत दर्शन घडवतो.   
   
नामवंत लेखक प्रा. सुहास बारटक्के यांची अभ्यासपूर्ण, बोलकी आणि समर्पक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. ‘चव पाहू या !’ म्हणत वाचायला घेतलेला आणि सहज फस्त झालेला, ‘विनोदाची शेव मारलेला टेस्टी चिवडा’ अशा शब्दात बारटक्के यांनी लेखकाच्या लेखन कौशल्याचे कौतुक केले आहे. शेवचिवड्याची ही प्रस्तावना-लेखकाच्या मनोगताची डिश, त्यातील संकीर्ण लेखांचे भाजलेले पोहे, व्यक्तीविशेषाचे खोबरे-लसूण-तेल, निवडक कवितांएवढे मीठ, महत्वाच्या भाषणांचा मसाला, ‘चंपूबाई’ कथेची फोडणी आणि विनोदी लेखांची शेव मारलेला हा चिवडा वाचकाला पुरेपूर आनंद देऊन जातो.        

व्रतस्थ (अण्णा शिरगावकर लेखसंग्रह)
संपादन : धीरज वाटेकर  
प्रकाशक : निसर्ग प्रकाशन (पेढे-चिपळूण)
पृष्ठ : १६४  किंमत : १७५.००
संपर्क :  ९४२२३७६४३५, ९९७५१६६८६५

शेवचिवडा (लेखसंग्रह)
लेखक : अण्णा शिरगावकर
प्रकाशक : निसर्ग प्रकाशन (पेढे-चिपळूण)
पृष्ठ : २००  किंमत : २००.००
संपर्क :  ९४२२३७६४३५, ९९७५१६६८६५



धीरज वाटेकर


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...