मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

‘निसर्ग’ चक्रीवादळ : ना वेदनांना अंत...

‘वादळाच्या तांडवनृत्याने गोरगरीब लोकांचे जीवन उद्ध्वस्त केल्यास आज तब्बल पाच महिने होत आले तरी वादळग्रस्ताना द्यावयाच्या मदतीचे काम पुरे झालेले नाही. त्याला जेवढी गती यावयास पाहिजे तेवढी आलेली नाही. हे मदत वाटपांचे कार्य आणखी किती काळ चालेल हे तो परमेश्वर जाणे ! वादळानंतर शासनकर्त्याकडून मदतीची हाक दिली गेली खरी परंतु मदतीचा प्रत्यक्ष अनुभव मात्र विचित्र आहे. सरकार मदत करणार आहे या भरवशावर बिचारे वादळग्रस्त नागरिक अवलंबून आहेत.’ हे वर्णन ३ जून २०२० रोजी कोकण किनारपट्टी उद्ध्वस्त केलेल्या निसर्ग चक्रीवादळाचे नसून १३ नोव्हेंबर १९६६ ला रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळाचे आहे. वादळाच्या दोन घटनांत ५४ वर्षांचे अंतर असले तरी सरकारी मदतीच्या अनुभूतींमध्ये विलक्षण साम्य आहे. म्हणूनच ‘ना वेदनांना अंत, ना कुणा खंत’ असे म्हणण्याची वेळ हळूहळू समीप येते आहे.

कोकणी माणूस सतत रडत न बसल्याने, माध्यमांना फारसे सनसनाटी मिळत नसल्याने आणि कोरोना संकटासासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांमुळे निसर्ग चक्रीवादळाबाबतच्या बातम्यांचा टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) कमालीचा घसरला आहे. अर्थात वादळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या वेदना कायमच आहेत. ‘निसर्ग आहे तसा ठेवा’ हे साधं सोपं तत्त्व कधीही न पाळलेल्या आम्ही सोशल मिडीयावरू ‘निसर्गाने केला निसर्गाचा घात’ अशा परस्परविरोधी टॅगलाईन चालविल्या. महाराष्ट्रातील इतर आपत्तींशी तुलना करता, अपवाद वगळता बहुतेक माध्यमांनी लोकप्रतिनिधींचे दौरे वगळता ग्राउंड रिपोर्टिंग कमी केलं. ‘रिलीफ फंड’, रोजच्या नव्या  अपडेट्सअभावी समाजाला याचं फारसं गांभीर्य राहिलं नाही. कोकणी माणूस सतत चेहेऱ्यावर हसू ठेवून आपल्या बोलण्यानं इतरांना आपलंस करतो. आर्थिक विवंचनेची तो फारशी वाच्यता करत नाही. हा इथल्या मातीचा गुण की अवगुण माहित नाही. मात्र आज या साध्या भोळ्या माणसांच्या काळजातली भरलेली ‘शहाळी’ जमीनदोस्त झालीत. काळीजं काळजीनं व्यापलीत. त्यांना डोळ्यासमोर तो अंगावर काटा आणणारा अक्राळविक्राळ वारा दिसतो. जीव वाचला असला तरी ढिगाने पडलेले नारळ, सुपाऱ्या, आडव्या झालेल्या लागत्या पोफळी, कोलमडलेले माड, झावळ्यांचे खच, मुळासकट उन्मळून पडलेली हापूसची लागती कलमं, फुटलेल्या होड्या, फाटलेली जाळी, घरावरचे उडालेले पत्रे, कौलांचा खच आदिंचा मनात साठलेला पसारा मोकळा कसा करायचा ? हा तणाव आहे. कोकणी माणूस पुनर्उभारणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे आव्हान आहे. जग जैविक शेतीकडे वळत असताना, आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी गावं स्वयंनिर्भर व्हायला हवीत. शेती शेतकऱ्यांची राहिली पाहिजे. आलेलं संकट ही संधी मानून काम व्हायला हवंय वगैरे बोलायला छान वाटत असलं तरी वादळग्रस्थांच्या मनात काय चालू आहे ? त्यांच्यापर्यंत मदत पोहोचल्येय का ? संवेदनशीलता न हरवलेल्या समुदायाने याचा आढावा सातत्याने घ्यायला हवा आहे. फळबागांमधून प्रॉफीट व्हायला किमान १२ वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. तोवर काय करायचे ? खरंतर पारंपारिक बागात नवे बदल करून कोकणाला वेगळी व्यावसायिक ओळख प्राप्त करून देण्याची संधी आहे. पण त्याकडे व्यवस्थेचे नीटसे लक्ष नाही. लोकांना तत्काळ उत्पन्न मिळावं म्हणून ‘राजवाडी (संगमेश्वर)’च्या धर्तीवर आलं, हळद यांसह भाजीपाल्याचे काम व्हायला हवं असल्याचं म्हणणं जितकं सोपं आहे तितकं ते उभारणं नाही. वाढती बेरोजगारी, कोरोनाने घरात बसलेल्या तरुणांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघत ऑरगॅनिक फार्मिंगकडे वळायला हवे. सध्याची बेकारी सावरु शकण्याची क्षमता फक्त शेतीत आहे. कारण वर्षानुवर्षांचा सर्वाधिक बॅकलॉग तिथेच आहे. युवकांना शेतीत आकर्षित करण्याचं शासनाचेही ध्येय आहे. कोरोनाच्या संकटामुळे कोकणी तरुण यात सहभागी होईल. पण आर्थिक गणित जुळवायचं मार्गदर्शन मिळायला हवं. बागांच्या नुकसानीसाठी जाहीर झालेली हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई, झाडांच्या पुन:र्जीवन आणि पुन:र्लागवडीसाठीचे अनुदान, गाव पातळीवरील कॅम्प, फळभाग योजना, काजू व्यवस्थापन, आंबा पुनर्वसन आदींबाबत कालबद्ध कार्यक्रम करण्याचे शासन म्हणत असले तरी यातले फारसे काही आपद्ग्रस्तांच्या माहितीत नाही. अशात, ‘राष्ट्रीय महामार्गात गेलेल्या झाडांचे निकष वादळात उन्मळून पडलेल्या लागत्या झाडांना लावायला हवेत’ ही हिरवळ प्रतिष्ठानच्या किशोर धारिया यांची मागणी योग्य वाटते.

आम्ही आंबवली-केळशी भागातील मनोज केळकर, केदार पतंगे, विनायक जाधव, विजय मिसाळ, अनंत लोंडे आदि बागायतदार, व्यावसायिक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून वादळग्रस्तांच्या व्यथा समजून घेतल्या. ‘निसर्ग वादळानंतर कोकणातील शेतीचे भविष्य’ या विषयावर महाराष्ट्र शासन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय यांच्यावतीने २३ जुलै रोजी ऑनलाईन परिसंवाद संपन्न झाला. परिसंवादातील मुद्देनिहाय काम झालं तर कोकणातील चित्र आगामी काळात पालटू शकते. मात्र कोकणातील शेतीचे भवितव्य घडविण्यासाठी ती शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे भवितव्य घडायला हवे आहे. लोकांच्या १०० वर्षे जुन्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या उभ्या करण्यासाठी लाखो कलमी रोपे लागणार आहेत. त्यातही नारळ आणि सुपारीची कलमे बियाणे पेरून तयार करावी लागतात. त्यासाठी विद्यापीठ नारळ विकास बोर्ड आणि कासारगोड येथून बियाणांसाठी प्रयत्न करते आहे. सुपारीसाठी भारतात सर्वाधिक दर मिळणाऱ्या श्रीवर्धन रोठा जातीच्या लागवडीसाठी विद्यापीठ आग्रही आहे.

निसर्गाने उध्वस्थ केलेले कोकण वाचवू या, विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाने उभारी देऊ या !

लाखी बाग मसाला पिके मॉडेल आहे खास, जांभ्या जमिनीत आंबा काजूला पर्यटकांची आस !

भात नाचणी वरी पिकाची शेती फुलवू या, विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाने उभारी देऊ या !

शेतकऱ्यांचे खचलेले मनोधैर्य वाढविण्यासाठी हे विद्यापीठाची निर्मिती असलेले डॉ. संतोष वरवडेकर यांनी लिहिलेले, डॉ. प्रफुल्ल अहिरे यांनी गायलेले जनजागृतीपर गीतही उमदे आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवरविद्यापीठ चांगले कामही करते आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावं यासाठी ते आपलं योगदान देईल. मात्र ते तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आवश्यक असलेली कोकणी शेतकऱ्याची मनोवस्था टिकावी याकरिता निकष बदलून अधिकाधिक मदत देण्याचे धोरण स्वीकारणारे शासन दिलेल्या शब्दांना जागते आहे का ? हा प्रश्न आहे. वादळानंतच्या सुरुवातीच्या दीड महिन्यात विद्यापीठाने दापोली तालुक्यातील ३४० शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सोशल सर्व्हे केला. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार काम होण्याबाबतची आश्वस्तता, आजही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.

कोकणात जंगलातही शेती होत असते. निसर्ग चक्रीवादळाने कोकणातलं जंगल उद्ध्वस्त झालीत. पिळवटून गेलीत. प्राणी, पशुपक्षी यांची हानी झालीय. वादळग्रस्त भागातील बदलत्या पर्यावरणाचा नीटसा अभ्यास व्हायला हवा. अहवाल, संशोधन करून त्यानुसार कृती करण्याची आवश्यकता पक्षी-निसर्ग अभ्यासक, बागायतदार मनोज केळकर यांनी मांडली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मंडणगडात (शिपोळे बंदर) दीड महिन्यांनी लोकांना गिधाडांचे दर्शन झाले. स्थानिकांच्या मते साधारण तीस वर्षांनंतर मंडणगड तालुक्यात गिधाडे आढळून आली ही नोंद महत्त्वाची आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा आणि श्रीवर्धन भागात पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचीची गिधाडे आढळतात. त्यांचे वास्तव्य असलेली नारळ, आंबा, पुनई (जंगली बदाम), साकवीण, वनभेंड, अर्जुन आदि झाडे वादळात नष्ट झाल्याचे निरीक्षण 'सिस्केप' संस्थेने नोंदवले आहे. चक्रीवादळात लाखो वृक्ष उन्मळून पडले. त्यात विदेशी किती होते ? याचा अभ्यास व्हायला हवा. रायगड जिल्ह्यात काँक्रीटमध्ये बंदिस्त असलेले वृक्ष उन्मळून फेकले गेले. चक्रीवादळात, रस्त्याच्या कडेला उभी असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची असलेली पडलेली लाखो रुपये किमतीची झाडे चोरीला जाण्याच्या घटना दापोलीत उघडकीस आल्या. कोकणात दरवर्षी स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांना घरटी बांधायला सुरक्षित जागा राहिली नाही. वादळग्रस्त भाग मायनिंग झोन आहे. जंगल नष्ट झालंय. पैशाअभावी लोकं हैराण आहेत. लोकांच्या सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठवून या लोकांकडून मायनिंगसाठी जागांचे करार केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकंही याचा विचार करू शकतात. त्यांच्या जागेत काही राहिलेलं नाही. शासन देतंय तेवढेच पैसे मात्र तत्काळ मायनिंगमधून मिळणार असतील तर काय हरकार आहे ? असा हताश विचार स्थानिकांनी केला तर ? अशी भीती केळकर व्यक्त करतात. तळकोकणात, पावसाळा संपला की ठाणे, जव्हार, मोखाडा, वाडा भागातून आंब्याच्या बागांसाठी कातकरी लोकं आणले जातात. हे लोकं बेचकीने खाण्यासाठी दिसेल तो पक्षी मारतात. हा मुद्दा खूप गंभीर आहे. यातून दुर्मीळ स्थलांतरित पक्षी मारले जातात. या लोकांवर बंधन असायला हवे. कदाचित त्या लोकांना याची समज नसेल पण त्यांना इकडे आणणाऱ्यांना ती असायला हवी असल्याची भूमिका वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट यांची आहे. बागांमध्ये माकडांचा त्रास वाढला कारण त्यांना अजगरासारख्या नैसर्गिक शत्रूचे भय राहिलेले नाही. लोकं अजगरांना मारतात किंबहुना पकडून दूर जंगलात नेऊन सोडतात. अजगराचा वावर असलेल्या भागात वानर, केलटी फारशी वावरत नाहीत. पाठपुरावा न केल्यास बिबळ्या वाघाचा हल्ला होऊन पाळीव जनावर मृत पडल्यास मिळणारी नुकसान भरपाईही वेळेत मिळत नाही. अशा वातावरणात शिल्लक जंगल जपण्यासाठी, वाचवण्यासाठी प्रयत्न करणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही.

कोकणात उपरोधिकपणे ज्याची ओळख, ‘भाई साहब नही लगेगा !’ अशी केली जाते त्या बी.एस.एन.एल. सेवेचा बोजवारा उडाला आहे. फोन बंद असताना लोकांना बीलांना सामोरे जावे लागते आहे. बीले कमी होण्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. आजही अनेक गावात मोबाईलची रेंज नाही. मोबाईल नॉटरिचेबल आहेत. मध्यंतरी बी.एस.एन.एल.ने औषधापुरती सेवा देण्याचा अपुरा प्रयत्न केला. आंजर्लेत झालेला हा प्रयत्न दिवसभर लाईट नसल्याने बॅकअप अभावी फेल झाला. याकाळात लोकांनी बी.एस.एन.एल.ची सीम नव्याने घेतली. रिचार्ज केली. त्या साऱ्यांचे पैसे वाया गेलेत. बी.एस.एन.एल.चा टॉवर वादळात पडला आहे. त्याच्या अंतर्गत आयडीया आणि व्होडाफोनची रेंज मिळायची. तीही बंद झाली. याचा थेट फटका बँका, पोस्ट आणि  ऑनलाईन शिक्षणाला बसलेला आहे. केळशी पंचक्रोशीतील १३ गावे आजही नॉटरिचेबल आहेत. नेत्यांनी ताबडतोप मोबाईल टॉवर उभारण्याच्या घोषणा केल्या आहेत. सध्या केळशी बाजारपेठेपुरती एक किलोमीटरभर परिसरात बी.एस.एन.एल.ने विशिष्ठ यंत्रणा बसवलेली आहे. तिच्याकडे गावातले ४५० ग्राहक आकर्षितही झाले. लोकांनी नवीन सीमकार्ड्स घेतली, रिचार्ज केली. आज तीही दूरसंचारयंत्रणा बराचकाळ बंद असते. तिचे ३जी नेटवर्क मिळविण्यासाठी लोकांकडे अॅनरॉईड फोन असायला हवा आहे. गावातल्या अनेक ज्येष्ठांना तो फोन वापरणेही अडचणीचे झाले आहे. आंजर्लेत आयडीयाची रेंज सुरु झाली आहे. ‘जिओ’ने येथे सर्व्हे केलेत. पण विषय पुढे सरकत नाही आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात नेटवर्क नसणे आणि ते पुढील वर्ष-दीडवर्ष उपलब्ध होण्याबाबत साशंकता असणे ही गोष्ट भयंकर आहे. महावितरणने रात्रंदिवस काम करून, सर्वदूरहून टीम्स आणून या भागात सरासरी दोन महिन्यांनी वीज पोहोचविण्याचे काम केले. नव्याने जोडणी झाल्याने आता लाईट जाणार नाही असं वाटलेलं. तरीही गणेशोत्सवात वीजेचा लपंडाव सुरू राहिला. ‘पाऊस आला, लाईट गेली’ हे या भागातलं आजही अस्तित्वात असलेलं सत्य ! म्हणूनच या सेवेची ओळख गावात ‘मंडे टू संडे इलेक्ट्रिसिटी बंद’ अशी आहे. ही ओळख बदलावी असं कुणालाच वाटत नाही. वादळग्रस्थांना आलेली वीजेची बीले अव्वाच्या सव्वा असल्याचा आरोप आहे. बीलांची दुरुस्ती व्हावी, भरणा करायला टप्प्यानुरूप मुदत मिळावी आदि मागण्या होऊ लागल्यात. वीज कनेक्शन खंडीत न करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधी देत आहेत. अर्थात मूळ प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. खेड तालुक्यातील दस्तुरीमधून मंडणगडला वीज पोहोचते. तिथून ती देव्हारे सबस्टेशनमार्गे केळशी पंचक्रोशीत पोहोचते. हा किमान सत्तर किलोमीटरचा प्रवास आहे. याऐवजी जवळच्या हर्णै बायपास सबस्टेशन वरून वीज मिळावी अशी मागणी आहे. दस्तुरीपासूनच्या लाईनमध्ये बिघाड झाला तर अडचणी सोडवायला वेळ अधिक लागतो. होणाऱ्या प्रत्येक फॉल्ट शेवटच्या भागाला अधिक सोसायला लागतो. या साऱ्या पट्ट्यात कुठेही फॉल्ट झाला तरीही केळशीत लाईट जात असतो. तरीही हर्णैमधून जोडून द्या ही मागणी पूर्ण होत नाही. आम्ही आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या प्रयत्नात असताना समस्यांना कंटाळून लोकं गावं सोडून शहराकडे वळताहेत. गावात सुशिक्षित लोकं राहात नाहीत. खेड्यांमध्ये दुरवस्था वाढते आहे. रस्त्यांची परिस्थिती दयनीय आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाजूंनी गटार नसल्याने पावसाचे पाणी त्यावर येऊन रस्ते खराब होतात. या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ३ वर्षे ठेकेदाराची असूनही रस्त्यांना वर्ष-सहा महिन्यात खड्डे पडतात. उन्हाळ्यात रस्ते करताना खडीच्या ढीगाने शेजारचे गटार बंद केले जाते. काम संपल्यानंतर खडी न उचलल्याने पावसाळ्यात पाणी रस्त्यावर येते. हे सारे निष्काळजीपणे घडत असल्याचे निरीक्षण केदार पतंगे यांचे आहे. निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी १३० कि.मी. होता. ओरिसामध्ये १९९८ मध्ये आलेले ताशी ३५० कि.मी. वेगाचे किंवा फिलिपाईन्समधे २०१७ मध्ये आलेले ताशी ४०० कि.मी. वेगाचे वादळ भविष्यात आले तर ? ‘निसर्ग’ हे शेवटचे वादळ नाही. संभाव्य धोका पाहता पश्चिम किनारपट्टीवर सजगता यायला हवी आहे. विकासाच्या मागे लागून केळशीसारख्या (दापोली) गावाचे संरक्षण कवच असलेल्या त्सुनामी निर्मित वाळू टेकडीची परवड ‘केळशीचे भवितव्य अवघड’ असल्याचे ओरडून सांगत असल्याची भीती आम्हांस वाटते आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना आपली बागेतली घरं मोकळ्या जागेत आणावी लागणार आहेत. झाडांचे नियोजन आणि लागवड यात बदल करावे लागतील. दीर्घ उत्पन्न देणाऱ्या पिकांसोबत तत्काळ मोबदला देणाऱ्या उत्पादनांकडे वळावे लागेल. कोकणातील बागायती, वास्तुशास्त्र आणि पर्यावरण यावर तज्ज्ञांनी आपली निरीक्षण मांडायला हवीत.

‘मी पूर्ण रस्त्यावर आलेलो आहे. आम्हाला सरकारने मदत करावी’, असं सांगून इथला माणूस आता थकलाय ! समाजभान असलेल्या मोजक्या लोकप्रतिनिधींनी, तुटपुंजी का होईना शासनाची आलेली मदत वादळग्रस्थांना आपणहून घरपोच केली. अशांचे काम वाखाणण्याजोगे आहे. बाकी आपली पोटं भरणाऱ्यांची कथा काय वर्णावी ? वादळग्रस्त भागाचा फेरफटका मारला की अशा कथा कानी पडतात, पडत राहतील. प्रत्यक्षात बॅंक दारी आल्याची व्यवस्था फार कमी ठिकाणी दिसली. लोकांना कोरोना महामारीत अर्धाअर्धा दिवस बॅंकेच्या दारात रांगेत उभं राहिल्यावर जेव्हा त्यांचा नंबर यायचा तेव्हा पासबुक तपासून ! तुमचे पैसे आलेले नाहीत हे अनेकदा ऐकावं लागलं. आशेने आलेली माणसं पदरी निराशा घेऊन परतली. त्यांच्या व्यथा कुणाला दिसल्या नाहीत. एका गावात तर वडिलांच्या सांगण्याने गावात राहिलेल्या मुलाला त्यानेच उभी केलेली बाग उद्ध्वस्थ झाल्याचे पाहावे लागले. त्याला आता परत १५/२० वर्षे मेहनत करायला हवेय. सध्याच्या वयात तो हे करायला तयार होईल ? केलेल्या मेहनतीचं फळ खायची आलेली वेळ नेमकी अडचणीची ठरली. अशांनी काय करायचं ? सुरुवातीला वडिलांचं ऐकण्याऐवजी त्यानंही नोकरी केली असती तर मोठ्या भावासारखा तोही चांगलं राखून असता. कदाचित पेन्शन घेत असता. बागायती वाड्या हीच गावाकडच्या लोकांची पेन्शन, तीच गेली. या बागांच्या उभारणीसाठी आयुष्य पणाला लावणारी अनेक उदाहरणं भेटतील. झाडं आणायला, लावायला लोकांकडे आता पैसाही शिल्लक राहिलेला नाही. खर्च करायला पैसा नाही म्हणून लोकांनी गणपतीचे दिवस कमी केले. वाड्या साफ करायला पैसे खूप लागणार आहेत. वाड्या साफ करून लाकडे ठेवणार कुठे ? हा प्रश्न आहे. या लाकडाचा उपयोग काय ? चुलीला किती ठेवणार ? अन्यथा मच्छर त्रास देणार ? म्हणून अनेकांनी इतरांना लाकडं दिली. तोडणाऱ्याला पैसे देण्यापेक्षा मागणाऱ्याला फुकट दिलेली पत्करली. सामन्यांच्या घरात गेलं की कर्तीबाई सांगत्ये, ‘झाडांची नुकसानी झालीय. नव्याने काय लावणार ? लावायची अजिबात परिस्थिती नाय. पूर्वी झाडांना मुलासारखं लावलं. वाढवलं. त्यातलं एकही झाड राहिलं नाही. इनकम थांबलाय. हाताशी पैसा नाही. तुम्ही ५/५ किलो मदत दिलेव, ती काय राहिल्येय ? लोकांनी खाऊन टाकली. आता पोटाचा बघायचा की वाडीचा ?’ अनुत्तरीत व्हायला होतं लोकांच्या व्यथा ऐकून ! या वादळाने इथल्या माणसाची पर्यटन, मासेमारी, बागायतदारी, जंगले ही उत्पन्नाची साधने उद्ध्वस्थ झालीत. चक्रीवादळाचा फटका बसून शेतकऱ्यांची मागच्या २ पिढ्यांच्या मेहनत वाया गेली असल्याने लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. वादळग्रस्तांना आलेला धनादेश न मिळालेला कोणी चुकून महसूल विभागात गेला तर, ‘तुमचा सर्व्हे झालाय का ? याची पाहणी करा. इथपासून ऐकावं लागल्याची खंत केदार पतंगे यांनी बोलून दाखविली. कोरोनामुळे अनेक चाकरमानी मे महिन्यात गावी आले. ते १४ दिवस क्वारंटाईन राहिले. आपल्या घरात शिरले तोच वादळ अंगावर आलं. काहीजण तर आपल्या घराची डागडुजी करून, वास्तुशांती, घरभरणी करून मेच्या अखेरीस घरात गेले तेही याचा शिकार झाले. यांना सरकारने मदतनिधी देताना संमतीपत्रासारख्या अटी ठेवल्यात. सातबाऱ्यावर एकच नाव असणाऱ्यांचे घर नुकसानीचे पैसे जमा झालेत. पण कोकणात बहुसंख्य सातबारे सामाईक आहेत. मदतवाटप शेतकऱ्याच्या हमीपत्रावर व्हायला हवं. शासनाने जाहीर केलेली अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठीची १५ हजार आणि १० हजार रुपयांची मदत आजही अनेकांना मिळालेली नाही. ज्यांना मिळाली त्यांना दोन्ही टप्पे मिळालेत, नाही त्यांना काहीही मिळालेले नाही. काही लोकांच्या नावात चुका राहिल्यात. विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना, ‘निधी नाही म्हणून पैसे मिळालेले नाहीत’ असे सांगितले जाते. शासनस्तरावर पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असलं तरीही पूर्णतः आणि अंशतः नोंदीत चुका झाल्याने पंचनामे परत करण्याची लोकांची मागणी आहे. मुळातच हे सर्वेक्षण आणि पंचनाम्याचं काम ढिसाळपणे, दिशाहीन पद्धतीने झालं. झालेल्या सर्वेक्षणाची एक प्रत वादळग्रस्तांना देणं गरजेचं होतं. पण तसं न घडल्याने सर्वेक्षणात पारदर्शकता राहिली नाही. वादळग्रस्तांच्या मनात संशय निर्माण झाला. हर्णेमधील (दापोली) मच्छीमार वस्तीत चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तिथले तहसीलदार सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायचा प्रकार घडल्याचा आरोप हर्णैवासियांनी केला. काही गावातील पंचनामे पंचायतीत बसून पूर्ण करण्यात आल्याचा आरोप झाला. नुकसान न झालेल्यांना अधिक मदत मिळाली. प्रत्यक्ष नुकसान झालेले अनेकजण आजही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. पंचनाम्याच्या फॉर्ममध्येही नुकसानीच्या सविस्तर नोंदी नव्हत्या. यातलं काही काम शिक्षकांनी केलं. त्यांना महसूल विभागाच्या नुकसानाच्या नोंदी कशा असतात ? त्यांची आकडेमोड कशी करायची ? याची कल्पना नसावी. सुरुवातीला सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर केली. नंतर नष्ट झालेल्या नारळाच्या प्रतिझाडाला २५० रुपये आणि सुपारीला ५० रुपये देण्याचा निर्णय झाला. हे कोणत्या निकषाने ठरवले ? असा प्रश्न वादळग्रस्तांना पडला आहे.

शासन म्हणतंय, लागवड करा. आम्ही झाडामागे मदत करतो. पण लोकांच्या बागा साफ झालेल्या नाहीत. वाडीत फिरायला अंतर्गत रस्ते नाहीत. बागायती उभ्या करण्यासाठीची शासनाची मदत योजना किमान पुढची २/३ वर्षे असायला हवी अशी आग्रही मागणी बागायतदार केळकर यांनी केली आहे. मोठ्या बागायतदारांसह २/३ नारळ, आंब्यांचं उत्पन्न असणारे खूपजण आहेत. हजार झाडे गेलेल्यांना सरकारी नियमाने लाखभर रुपये मिळतील. तसे २ झाडे गेलेल्यांना हजार – दोन हजार रुपये मिळतील. त्यांनी काय करायचे ? कोकणात लोकांकडे १०० दिवसांच्या रोजगार हमी योजनेकरिता जॉबकार्ड नाहीत. त्यांना ती मिळायला हवीत. रिकाम्या हातांना यातले काम मिळायला हवे म्हणून ग्रामपंचायतीने लक्ष घालायला हवे. २० टक्के लोकं बागा साफ करून नवीन लागवडीचा प्रयत्न करताहेत. आजही सगळीकडे चेनसॉंचे आवाज येताहेत. हॉटेलच्या भटारखान्याला लाकूड लागतं. पण कोरोनाकारणे तिथेही उठाव नाही. दिवाळी आणि वर्षाखेरीस पर्यटन सुरु झालं तर काही प्रमाणात लाकूड विकलं जाईल. अन्यथा लाकूडफाटा वाया जाणार आहे. लाकूड नेणारे भाव तोडूनमोडून नेताहेत. दोन हजार रुपये देऊन जाणारी टेम्पोभर लाकडे आज पाचशे रुपयांना द्यावी लागत आहेत. सगळीकडेच लाकडांचा खच असल्याने जोतो आपली जागा रिकामी होण्यासाठी कमी भावाची तडजोड स्वीकारतो आहे. तिथेही रस्त्यावरच्या जागांवरचे लाकूड उचलले जाईल. अंतर्गत जागा असलेल्यांचा लाकूडफाटा उचलला जाणं जवळपास अवघड असून जागेवर कुसून जाण्याचा धोका आहे. वादळामुळे वाड्यांची साफसफाई, झाडं तोडणं, एका बाजूला करणं, साफ झालेल्या जागेत पुन्हा लागवड करणं ही काम नेहमी करणाऱ्या स्थानिक मजुरांनी आपली मजुरी ३०० रुपये प्रति दिवसावरून ५०० रुपयांवर नेली. कामगारांच्या उपलब्धतेअभावी आजही अनेक वाड्या सफाईच्या प्रतिक्षेत आहेत. काहींनी स्वतः साफ केल्यात. ज्यांना मजूर शक्य आहेत त्यांनी तशा मोकळ्या करून घेतल्यात. यांत्रिक कटर ऑपरेटरने माणुसकी सोडून पैशाची मागणी केली. आपलं गाव अडचणीत असताना व्यापाऱ्यांनी महिन्याभरात वर्षभराची कमाई केली. आपली झोळी भरून घेण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी राहिला. १२० रुपये फुटांनी मिळणारा पत्रा लोकांनी १६० रुपयांनी विकला गेला. सिमेंट पत्रा तर बुकिंग शिवाय मिळत नव्हता. तोही ४०० रुपयेवाला ६ फुटी पत्रा ५५० रुपयांच्या पुढे गेला. कौलांना सोन्याचे दर आले. १०/१५ रुपयांना मिळणारे कौलं ५० रुपयांच्या पुढे पोहोचलं. कोन्याची कौले मिळतच नव्हती. कोन्याचं जुनं कौलं नव्वद रुपयांना मिळू लागलं. शेवटी लोकांनी प्लास्टिक टाकणं पसंत केलं. तिथेही २००० रुपयांना मिळणारी प्लास्टिक ताडपत्री ४००० रुपयांना विकली गेली. जीवनावश्यक वस्तू, मेणबत्त्या, काडेपेट्या चढ्या भावात संपल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना,आम्ही तुम्हाला मदत करू हा विश्वास नीट द्यायला हवा आहे. विद्यापीठाच्या सर्वेक्षणानुसार शेतकऱ्यांना कलमे, रोपे, खत, औजारे आणि प्रशिक्षण यांची गरज आहे. वादळात जवळपास ८०% फळबाग क्षेत्र बाधित झाले असून नुकसानीच्या सरासरी १/३ खर्च पुनर्वसनाला येणार असल्याचा अंदाज आहे. फळबागांच्या पुनर्वसनासाठी मंजूर झालेल्या रोजगार हमी योजनेंतर्गत १०० टक्के अनुदान मिळायला हवे. तिचा कालावधी वाढायला हवा. वादळग्रस्थांना पुढील ६ ते ८ वर्षे उत्पन्न मिळणार नसल्याचे विद्यापीठाचे मत असले तरी लोकांना हा कालावधी १२/१५ वर्षांचा वाटतो आहे. चक्रीवादळाच्या संपूर्ण समस्येवर मात करण्यासाठी शासनाने टास्कफोर्स नेमण्याची कृषी उद्योजक विनय महाजन यांनी केलेली मागणी रास्त आहे.

‘नोव्हेंबरच्या १३ तारखेला वादळाच्या तांडवनृत्याने जिल्ह्यातील संगमेश्वर ते देवगड दरम्यानच्या तालुक्यातील गोरगरीब रत्नागिरीकरांचे जीवन उध्वस्त केल्यास आज तब्बल पाच महिने होत आले तरी वादालाग्रस्ताना द्यावयाच्या मदतीचे काम पुरे झालेले नाही. त्याला जेवढी गती यावयास पाहिजे तेवढी आलेली नाही. हे मदत वाटपांचे कार्य आणखी किती काळ चालेल हे तो परमेश्वर जाणे ! वादळानंतर शासनकर्त्याकडून येनकेनप्रकारे मदतीची हाक दिली गेली खरी परंतु मदतीचा प्रत्यक्ष अनुभव मात्र अगदी विचित्र येत आहे व तो वादळग्रस्तांना भेडसावीत आहे. सरकार मदत करणार आहे या भरवशावर बिचारे वादळग्रस्त नागरिक अवलंबून आहेत.’ या लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे वर्णन निसर्ग चक्रीवादळाचे नसून १३ नोव्हेंबर १९६६ ला ऐन दिवाळीत जिल्ह्यात थडकलेल्या वादळाबाबत २१ मार्च १९६७ रोजी प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक सत्यशोधकच्या ‘वादळग्रस्तांची व्यथा’ या संपादकीयमधील आहे. त्याहीवेळेला मदतीचे वाटप कूर्मगतीने सुरु होते. पाच महिने उलटल्यावरही पडझड झालेल्या ३३ हजार ४८८ घरांपैकी १४४९ घरांना तुटपुंजी आर्थिक मदत पोहोचली होती. ‘मदत वाटपासाठी सरकारकडे रक्कम शिल्लक नाही. सरकारकडून मदत आली तरच वाटण्यात येईल अन्यथा मिळू शकणार नाही.’ असे शासनाकडून सांगितले गेले होते. वादळग्रस्तांच्या समस्यांकडे अक्षम्य दिरंगाई होत असून सरकारने त्वरित लक्ष पुरविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती. तेव्हा मुख्यत्त्वे रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवगडसह काही वेंगुर्ले आणि सावंतवाडी भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. वित्तसोबत आणि मनुष्यहानीही मोठ्या प्रमाणावर झाली होती. लोकांच्या घरांचे, गुरांचे गोठे, शेतीची जनावरे, फळबागांचे नुकसान झाले. वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अनेकविध शेतीच्या योजना, शेतकऱ्यांना घरे आणि गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत, तगाई (कर्ज) आदि वेळेवर मिळेल अशी आश्वासने भेटी देणाऱ्या मंत्र्यांनी दिली होती, असं उपलब्ध नोंदी सांगतात.

कधी नव्हे इतक्या पोटतिडकीने कोकणवासियांनी शासनाकडे मदत मागितली. नुकसान झालं म्हणत वर्षातून दोनवेळा सरकारकडे हात पसरणारा कोकणी माणूस नाही. तो फारसा कर्जबाजारी राहात नाही. आत्महत्या करीत नाही. तो अविचारी नाही. कोकम, काजू, आंब्याला योग्य भाव मिळाला नाही म्हणून तो काजू, आंबा रस्त्यावर फेकत नाही. उर्वरित महाराष्ट्राशी तुलना करताना हे जाणवतं. सध्या कोरोनाचे संकट सुरु आहे. सरकाररी तिजोरीत टंचाई आहे. याची जाणीव इथल्या माणसाला आहे. मात्र शक्यतो कधीही हात न पसरणाऱ्या कोकणी माणसावर आलेलं संकट भयंकर आहे. शीर्षनेतृत्त्वाने मनावर घेतलं तर लोकांची कामे मार्गी लावता येतात हे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यात सावित्रीवरील पूल उभारून तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कणकवलीतल्या विद्यार्थीनीला बीएसएनएलची रेंज उपलब्ध करून देऊन दाखवून दिलं. मग आम्हाला काय अवघड आहे ? शासन खंबीरपणे जनतेसोबत असल्याचे नुसते बोलून उपयोग नाही. आपण जे बोलतो त्याच्या सकारात्मक प्रतिक्रिया प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनमानसाच्या हृदयस्त पोहोचायला हव्यात. अन्यथा... ‘ना वेदनांना अंत, ना कुणा खंत’ असेच म्हणणे पुन्हा कोकणच्या नशीबी येणार आहे.

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. 

मो. ९८६०३६०९४८.  ई-मेल - dheerajwatekar@gmail.comब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २० वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)






वादळग्रस्तांनी बागा साफ करायला घेतल्यावर
सर्वत्र लाकडांचा असा खच पडलेला दिसून येतो आहे.









   









                                       

निसर्गाचे वर‘दान’ सांभाळू या !

अधिकमास निमित्ताने...

अधिक (
पुरुषोत्तममास सुरु झालाय. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचे फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. अर्थात हे दान म्हणजे डोनेशन नव्हे ! या संकल्पनेत कोणी दिले ? काय दिले ? कोणाला दिले ? या बाबी गुप्त राहातात. गरीब, गरजूंना मदत मिळावी हा या संस्कृतीचा उद्देश ! याचा आधार घेऊन मानवाने कालौघात ग्रंथदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, विद्यादान, गोदान, कन्यादान, अर्थदान आदि संकल्पनांना महत्त्व प्राप्त करून दिलं. सध्या कोरोनामुक्त झालेल्यांकडून होणाऱ्या प्लाझ्मादानालाही विशेष महत्त्व आहे. तरीही सर्वोत्तम दान म्हणून सध्या निसर्गाकडे पाहायला हवंय. निसर्गकृपेनं, निरपेक्ष भावनेनं मिळालेल्या निसर्गदानाने मनुष्यजीवन भरून पावलं आहे. निसर्ग समतोल राखणं आपली जबाबदारी होती. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वरदानरुपी सानिद्ध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निद्ध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करत पुढील पिढीला जसाच्यातसा सपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पाऊले उचलायला हवीत.

निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. निसर्गाच्या ह्याच पंचतत्त्वातून मनुष्याला जन्मदानमिळत. मेल्यावरही मानवी देह पंचतत्त्वात विलीन होतो. निसर्ग एकाचवेळी आपला गुरु, मित्र आणि डॉक्टर असतो. निसर्गाशी असलेले मानवी नाते अतूट असूनही त्याच्या जतन, पोषणासह वृद्धी करण्याचे कर्तव्यदानमनुष्य विसरला. खोल दऱ्या, निर्मळ झरे, कमळांनी भरलेले तलाव, अथांग सरोवरे, रम्य सागरकिनारे, घनदाट जंगले, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग पर्वत, वाऱ्याच्या झोक्याने डोलणारी हिरवीगार सृष्टी, नारळी सुपारीच्या बागा, डोंगराआडून उगविणारा सूर्यदेव, निळ्याशार आकाशात सप्तरंगांची उधळण करणारी त्याची किरणं, ऋतुचक्र, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल आदि त्याच्याच दानाच्या छटा आपल्याला जगण्याची नित्य प्रेरणा देत असतात. ह्या निसर्गरुपी कृष्णानं आपल्यासारख्यांना न मागता भरभरून दिलं. त्या बदल्यात मनुष्याने निसर्गाला काय दिलं ? त्याने उपद्रवी प्रदूषण वाढवून निसर्ग सौंदर्याचा ह्रास केला. इमारर्तींचे टॉवर उभारून चांदोबाला लपवलं. जंगलतोड करून पर्जन्यमान अनियमित केलं. अतिवृष्टी उशाशी आणून ठेवल्या. स्वार्थलोलुपतेची पट्टी डोळ्यावर बांधल्याने निसर्ग जगला तर आपण जगूहे तत्त्व तो विसरला. जगण्यातली गंमत हरवून बसला. ‘सुखासीन जीवनयुक्त प्रगती हा त्याचा पारंपारिक स्वभाव हव्यासात बदलला. मात्र डोळ्यानेही न दिसणार्‍याकोरोनाने त्याचा प्रगतीचा अहंकार धुळीस मिळवला. कोरोना वयाने वर्षभराचाही नाही. जगाकडे  त्याच्याविरुद्ध लढण्याची निश्चित व्यवस्था नाही. अंदाजांच्या आधारे उपचार सुरु आहेत. ‘रोग प्रतिकारशक्तीशब्दाला मागणी वाढली आहे. निसर्गाचा ह्रास धोकादायक स्थितीत आलेला असला तरी त्याची प्रतिकारशक्ती मानवापेक्षा कित्येकपट असल्याचे लॉकडाऊनमध्ये दिसून आले. मानव बंदिस्त होताच निसर्गाने वातावरणाला स्वच्छ बनविले. याकाळातली भारतातील वातावरणाची २०१६ आणि २०२० मधील दोन छायाचित्रे नासाने प्रसिद्ध केली. वैज्ञानिकांनी छायाचित्रांद्वारे भारतात धूळ-मातीसह इतर प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याचे निदर्शनास आणले. पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील एका गावातून लोकांना हिमालयाचे पूर्वी न होणारे दर्शन याकाळात झाले. अधिक मासापासून अंगच्या वाईट सवयी त्याग करून विशेष संकल्प सोडण्याची परंपरा असल्याने, ‘निसर्ग आहे तसाच ठेवाया उक्तीनुसार आपण विचार करायला हवा.

मेडिकल सायन्स प्रगत असताना कोरोना विषाणू झपाट्याने लोकांचा जीव घेऊन गेला. हा निसर्गाचा Balancing Act (समतोल) ठरावा. ज्या महाराष्ट्राला आपण देशातलं विकसित राज्य म्हणतो तिथं सर्वाधिक धरणं असूनही सिंचनाखालची जमीन कमी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूजलातली घट, पाण्याच्या समस्या, वाळवंटीकरणासह कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यूची आकडेवारीही इथेच सर्वाधिक दिसतेय. तरीही आमचा विकास सुरु आहे. घराघरातील मनुष्याला, आयुष्य स्वत:साठी नसून इतरांच्या सेवेसाठी असल्याचा धडा कोरोनाने शिकवला. मानव `जीवो जीवस्य जीवनम म्हणत दोन वेळचं अन्न आपल्यापर्यंत कसं येईल ? ह्याच्या काळजीत दिसला. निसर्ग आपल्याला जगवतो आहे हे यंत्रयुगात झाकोळलेले सत्यकोरोनाने उघड केले. कोटय़वधी वर्षांपासून मानवी जीवनाच्या आधार असलेल्या नद्यांची जंगल (अॅमेझॉन) आम्ही पैशांसाठी जाळली. मिठी, गंगा, यमुनांपासून सगळ्या नद्यांत रसायने आणि घाण ओतली. आम्ही माणसं पृथ्वीवर राहायला नालायक आहोत. कोरोना हा आम्हां उन्मादलेल्यांना निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा असेल का ? शाळेत शिकत असताना दरवर्षी इंद्रधनुष्याची कमान दिसायची. नकळततानापिहिनिपाजा उजळणी व्हायची. आज तेही प्रमाण कमी झालं. निसर्गाने सौंदर्याचा साक्षात्कार घडवित निर्माण केलेल्या रंगछटा पाहाताना मानवी डोळे थकून जायचे, पण छटा संपायच्या नाहीत. मानवी शरीरालगत ऊर्जेचं वलय (ऑरा) असतं. प्राचीन योगशास्त्राच्या अभ्यासातून आपण याचं महत्व समजू शकतो. आपल्या विचारांचा वलयावर परिणाम होतो. हे वलय स्वच्छ आणि सक्षम असेल तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पडतो. हे तेजोवलय आपली पर्सनल सिग्नेचरअसून त्याच्या उन्नतीतही निसर्गाची भूमिका महत्त्वाची असते. निसर्गाने जे जे जन्माला घातलं त्या प्रत्येकाला नियम घातले. आम्ही हव्यासापोटी नियमांचं उल्लंघन केलं नि कोरोना भेटीला आला. कुठंतरी वाचलेलं, पूर्वी म्हणे समुद्रकिनारी वाळूऐवजी मीठ पसरलेलं होतं. समुद्राचं पाणी अमृतासारखं गोड होतं. सजीवांची तहान भागवण्यासाठी या पाण्याचा उपयोग व्हायचा. मानवी उत्कांतीत अन्नाला चव यावी म्हणून मिठाचा सुरु झालेला मोजका वापर  नंतर हव्यासात बदलला. या क्रियेला निसर्गाने प्रतिक्रिया दिली. मीठ समुद्रात वाहून गेले, फक्त वाळू उरली. समुद्राचे पाणी खारे झाले. आज खारं पाणी प्रक्रिया करून मानव पिण्यायोग्य बनवतोय. कदाचित वृक्षतोडीचंही असंच होईल म्हणून निसर्गदानसंकल्पनेचं महत्त्व समजवून सांगायला कोरोनाआलाय.

निसर्गाल गृहीत धरून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याची कल्पना आपण कशी करू शकतो ? निसर्गाने दिलेलं दान जपत जगण्या-वागण्यातून ते संवर्धित करण्याकामी आपण स्वतःला समर्पित करायला हवंय. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या शाखा कितीही छाटण्याचा प्रयत्न केला तरीही त्या नव्याने उगवतात, आपलं दान मानवाच्या पदरात टाकतात. निसर्गाच्या सानिद्धयात मानवाला मिळणारं समाधान हेही निसर्गाच्या निर्हेतुक ओंजळीतून निसटलेलं दानच ! विनोबांची भूदानचळवळ सर्वश्रुत आहे. अधिक मासातील दानामागे वैज्ञानिक सूत्र, सामाजिक आशय आणि नैतिकता गुंफलेली आहे. दानामुळे संबंधित वस्तूवरील आपला हक्क समाप्त होऊन दुसऱ्याचा स्थापित होतो. घेणाऱ्यावर कोणत्याही प्रकाराचे उपकार न राहाता केलेलं दान सात्त्विक समजतात. याकारणे श्रद्धा, तुष्टि, भक्ती, ज्ञान, अलोभ, क्षमा आणि सत्य या सात गुणांची रुजवात आपल्या व्यक्तिमत्त्वात होत राहाते. भारतीय जीवनपध्दतीत यांचे महत्त्व विशेष असल्याने आपण निसर्गाला आहे तसा ठेवण्याची अभयशपथ घ्यायलाच हवी !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

ऑनलाईन पोर्टलवर लेख प्रसिद्ध झालेल्या लिंक्स :

https://www.khabarbat.in/2020/10/environment.html

https://kokanmedia.in/2020/10/04/nisarga-2/

केळशी (दापोली) येथील निश्चित कालमापन असलेली
जगातील पहिली त्सुनामी निर्मित वाळूची टेकडी (१५२४)


धामणदेवी (खेड) येथील खाडीकिनारा  सूर्यास्त

     
पालशेत (गुहागर) येथील अश्मयुगकालीन गुहा

                                                      चिपळूण तालुक्यातील कळमुंडी देवराई

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

अण्णा, ‘शतायुषी’ व्हा !

कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर ९१व्या वर्षात (५ सप्टेंबर २०२०) पदार्पण करीत आहेत. कोरोना संक्रमण काळात बोलताना अनेकदा अण्णा व्यथित झालेले जाणवले. सतत माणसांत वावरलेल्या अण्णांना ‘लॉकडाऊन’ मधला एकटेपणा असह्य करून गेला. दोन दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले, ‘काल ... हे गेले. ...तेही गेले. आमच्या वयाची बरीच माणसं जात आहेत. वाईट वाटतं. आता शुभेच्छानी काय करायचं आहे ?’ आपल्या या बोलण्याला मध्येच ब्रेक देऊन अचानक त्यांनी ‘कोरोनामुळे वेळ वाया जातो आहे’, या पूर्वीच्या अनेक संवादातील विधानाला पूरक असलेलं, ‘कामे पडली अनंत | वेळ मात्र मर्यादित || म्हणुनी व्यर्थ गप्पात | कालक्षेप न की जे ||’ हे वचन ऐकवलं. तेव्हा त्यांच्या याही वयातील वैचारिक सक्रीयतेचा हेवा वाटला. त्याच जाणीवेतून लिहिलेलं अण्णांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारं हे ‘शब्दपूजन’ !

दोन वर्षांपूर्वी, अण्णांनी प्रकृती अस्वास्थ्याने जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या 60 वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम दिला. त्यांनी आपला मुक्काम नोव्हेंबर २०१८ पासून चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे हलविला. १९६० मध्ये ते दाभोळला वास्तव्यास आलेले. दाभोळमधील सहा दशकात त्यांनी कोकणच्या इतिहासाला अनेक नवे संदर्भ उपलब्ध करून दिले. एखाद्या छोट्याशा ओव्हळामधील माशाला नदीचा पत्ता गवसावा तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे त्याकाळी झाले. कारण दाभोळ ही प्राचीन नगरी ‘दालभ्यपूरीहोती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा, धक्क्यावरील आदिलशहाच्या बीबीची अर्थात मॉंसाहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कौलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लॉंचेस होड्या आणि डुगडुग्या या सार्‍यांचे नजरेत सामावणारे चित्र पाहाण्याचा योग दाभोळच्या डोंगरावर जुळायचा. याच वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहकवृत्तीला खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोनही तीरावरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली ७५ हून अधिक वर्षे डायरी लेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्ताच्या साधनांसाठी ५० हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे त्यांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण ! छंदी व्हा !हा विषय घेऊन लायन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयातून अण्णा महाराष्ट्रभर फिरले. ज्यातून असंख्य संग्राहक, अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली.

एकविसाव्या शतकात, कोकणला आठ हजार वर्षापूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध होत असताना काही दशकांपूर्वी, ‘कोकणला प्राचीन इतिहास नाहीहे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे ९ ताम्रपटांचा शोध घेणाऱ्या अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम केले. सतत धडपडणार्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासूवृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले. आजही कै. सौ. नंदिनी काकींच्या पश्चात वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजालाअधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असलेले अनेकांनी पाहिलेत. खरंतर सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे इतिहासकार फक्त अस्सल पुराव्यांच्या आधाराने बोलतात. मूळ नकाशे, आकडेवारी यांची सोबत आपल्या बोलण्यात घेतात. विषयाच्या अभ्यासातील अपुर्या जागा वास्तववादी तर्क लावून भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कधी-कधी बखरीचाही आधार घेतात. भूतकाळाचे आकर्षक किंवा भावनोत्कट चित्र रंगवत नाहीत. अशा संवादातून माणसाची भूतकाळाबाबतची जाण वाढते. भूतकाळ साक्षात जीवंत करून त्याची वर्तमानाशी सांगड घालीत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न असे इतिहासकार करतात. आदरणीय अण्णा आम्हाला अशा पठडीतील वरच्या श्रेणीचे वाटतात. अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले. राजकारणासारख्या विषयात माणूस एकदा अडकला की प्रसिद्धीचे वलय, कार्यकर्त्यांचा गोतावळा या सार्यातून दूर जाणे अवघड असते. अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन १९८३ मध्ये त्यांनी सागरपुत्र विद्या विकास संस्थास्थापन केली. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठ्या मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदि वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता.  त्याकाळी दाभोळसारख्या फारशा सोयीसुविधा नसलेल्या गावातून एखाद्या छंदामागे बेभान धावत आपले कार्य सिद्धीस नेणे ही मोठी गोष्ट आहे. इतिहास हा कधीच कल्पित नसतो. तो कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर आधारित असतो, हे अण्णांनी खूप अगोदरच निश्चित केल्याचे त्यांचा संग्रह अभ्यासल्यावर लक्षात येते. म्हणूनच अनेक अभ्यासकांना हृदयाला जागे करणारा स्वच्छ प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाला आहे.

अण्णांच्या संशोधन कार्याने प्रेरित होऊन इतिहासाचे अनेक अभ्यासक दुरदूरहून आज शिरगावलाही येतात. अण्णा कोणालाही इतिहासात रमून जायला सांगत नाहीत. ‘इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे’, हे त्यांचे सांगणे असते. गेल्यावर्षी त्यांनी, ‘एखाद्या गावाकडे पाहाण्याची संशोधकदृष्टी किती चिकित्सक असू शकते याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणारा दाभोळमधील ६० वर्षांच्या वास्तव्याचा आलेख प्रकाशित केला. एखाद्या गावाची तटस्थपणे चिकित्सा करताना किती संदर्भ विचारात घेता येतात याचीही जाणीव व्हावी. आयुष्याच्या अगदी सुरूवातीला आपल्याला नक्की काय हवंय ? याचं मर्म उमजल्याने आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणार्‍या निरूपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगलेल्या अण्णांनी १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे. पायाच इतिहासाचा असल्याने त्यांच्या लेखनात व्यापक संदर्भ, तत्वज्ञान, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण भेटते. ९१ व्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने अण्णांमधील अद्वितीय छंदवेड्या संशोधकाला मनःपूर्वक दंडवत !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

अण्णा शिरगावकर यांच्या छंदांविषयी आणि शेवचिवडा/व्रतस्थ या दोन पुस्तकांची ओळख करून देणारा लिहिलेला लेख वाचण्यासाठी खालील लिंक पाहा !

https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html

(अण्णा शिरगावकर यांचा पत्ता  आणि  संपर्क क्रमांक: c/o सौ. रिना रविंद्र लब्धे, नूतन बंगला, शिगवण महाराज मठाजवळ, मु.पो. शिरगाव, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी . ९५५२३३४४६५, ९९७५१६६८६५)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...