शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

आरमारी ‘शिव’सत्तेत समुद्रीकोकणचा भौगोलिक प्रभाव !

भौगोलिक महाराष्ट्रातला समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश म्हणजे कोकण. कोकण प्रदेश हा सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेला आहे. इथले दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. शिवपूर्वकाळात मुस्लिम सत्ताधीश त्यांना आपल्या सैन्यात आवर्जून भरती करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मावळ्यांना एकत्र करून मराठा साम्राज्य उभारले. सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. राजांचं पश्चिम किनारपट्टीवरील आरमारी सामर्थ्य अभ्यासताना, कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग पाऊलोपावली जाणवतो. प्रस्तुत लेखात आरमारी शिवसत्तेतील समुद्रीकोकणच्या भौगोलिक प्रभावाचा आढावा घेऊया !

सर्वात प्रभावी आणि जलद प्रवासाची सोय असलेल्या नौकानयनात आपले भारतीय प्राचीन काळापासून निष्णात असल्याचे उल्लेख इतिहासात भेटतात. अर्थात भारतीय राज्यकर्त्यांची नौकानयन परंपरा ही शांतता आणि व्यापाराची होती. प्राचीन लेण्यांमध्ये सागरीप्रवास आणि व्यापाराचे संदर्भ सापडतात. महाराष्ट्रातील सातवाहन राजे त्रिसमुद्रतोयपितवाहनया गौरवास्पद उपाधीने स्वत:ला भूषवित. हजारभर वर्षापूर्वी दक्षिणेतील चोल राजांनी पूर्वआशिया (कंबोडिया-अंकोरवाट) भागात भारतीय संस्कृतीचा प्रभाव निर्माण केलेला. तद्नंतर समुद्रबंदीसारख्या घातक रूढींमुळे भारतीयांनी समुद्राशी नाते तोडले आणि आपले वर्चस्व गमावले. महाराष्ट्राचा सागराशी असलेला संबंध हा यात्रा आणि अभ्यंगस्नानापुरता राहिला. त्यात समुद्री पर्यटनाचे अनुभव नसायचे. तेव्हा कोकण किनारपट्टी आरमारीदृष्ट्या विकसित नव्हती. इथे गुजराप्रमाणे खुल्या खोल समुद्रा थेट मार्गस्थ होता येत नसायचे. भौगोलिक मर्यादांमुळे येणाऱ्या अडचणी, साहित्याच्या अनुपलब्धतेमुळे इथले लोकजीव किनाऱ्यालगत ५/७ किलोमीटरच्या परिघाच्या मर्यादेत वावरायचे. दक्षिण कोकणात तर खाड्या आणि खडकाळ भागांमुळे किनाऱ्यालगतचा प्रवास सावधपणे करावा लागे, आजही काही ठिकाणी अशी स्थिती आहे. उत्तरेकडील दमणगंगेपासून दक्षिणेकडे गोवा सीमेवरील तेरेखोल खाडीपर्यंतची कोकण किनारपट्टी भौगोलिक वैशिष्ट्यांनी युक्त होती. इथली लोकसंस्कृती, माणसांचे स्वभाव, त्यांची वृत्ती, संघर्ष करण्याची मानसिकता हे सारे इथल्या इतिहास आणि भूगोलाचा परिणाम होते. पोर्तुगीज आक्रमक वास्को-द-गामा ख्रिस्ताब्द १४९८ मध्ये कालिकत बंदरात पोहोचल्यावर इथले किनारवर्ती वातावरण बदलले. वास्को-द-गामा आल्याची नोंद जगाने घेतली, परंतु आपण नाही. पोर्तुगीजांनी भूमध्य समुद्रात प्रचलित असलेले दादागिरीचे तत्त्व भारतात अंमलात आणत सागरी सत्तेची फेरमांडणी केली. पुढे डच, फ्रेंच, ब्रिटिशकाळात हा संघर्ष वाढत गेला. या सागरी सत्तांनी बळकट जलदुर्ग आणि शक्तिशाली आरमार उभारले. तेव्हा एकाही स्थानिक भारतीय सत्ताधिशाकडे आरमार नव्हते. भारताचे बादशहा म्हणवून घेणार्‍या मोगल सत्ताधिशांनाही समुद्रावर संचार करण्याकरता, पोर्तुगीजांना फी (कार्ताझ) देऊन विशिष्ठ मार्गावर फिरायचा परवाना घ्यावा लागे. हा कार्ताझ नसल्यास पोर्तुगीज गलबतांचे कप्तान जहाजांना अडवत. मालमत्ता जप्त करत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीचा वनराईने व्यापलेला इतरांना जिंकायला अवघड असलेला हा प्रदेश स्वराज्यासाठी निवडला. वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्ताप्रसारापुढे संपूर्ण देश हतबल असताना, ‘संकटं पराक्रम गाजविण्याची संधी देतात’ या तत्त्वाने स्वराज्य निर्मितीसाठी, सह्याद्रीच्या शिखरावरील किल्ले आणि पाताळाला, समुद्राला जाऊन भिडणाऱ्या कोकणदऱ्या, खाड्यांचा आधार घेतला. पराक्रमासाठी आसुसलेल्या इथल्या मावळ्यांची मोट बांधली. विशेष पूर्वपरंपरा नसताना, कष्टातून, तरबेज आणि अनुभवी विरोधांना धूळ चारून, सागराचे व्यापारी महत्त्व ओळखून पहिलं स्वदेशी सागरी आरमार उभारलं. मध्ययुगात आरमार आणि सागरी व्यापाराची खंडीत झालेली परंपरा सुरु केली. याची मांडणी सचिन पेंडसे यांच्या ‘मेरिटाइम हेरिटेज ऑफ कोकण’ या पुस्तकात भेटते.

१६४८ मध्ये कोकणातील तळे, घोसाळे किल्ले ताब्यात घेतले तेव्हा राजांचा सिद्दीशी संबंध आलेला. राजे स्वतः खलाशी किंवा दर्यावर्दी नव्हते. त्यांना आरमारी युद्धतंत्राची माहिती नव्हती. जवळ लढाऊ जहाजेही नव्हती. पाण्यातील किल्ले लढवण्याचा, जिंकण्याचा अनुभव नव्हता. मोगल आणि आदिलशाहीला भूमीवर शह देत कोकणात आरमार उभारणे सोपे नव्हते. पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज आणि डचांकडून आरमार उभारण्याचे कौशल्य शिकावयास मिळणे अशक्य होते. कोकणातला उंचचउंच सह्याद्री दक्खनच्या पठारापासून वेगळा होता. इथे घनदाट जंगल, अरबी समुद्र, खाड्या, समुद्रातील बेटे आदि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे किल्ल्यांमधील अंतर कमी राहाणार होते. याचे लष्करी डावपेचांमधील महत्त्व राजांनी अचूक हेरले होते. कोकणला पश्चिमेकडे समुद्राचे संरक्षण होते. पूर्वेकडूनही आक्रमणाचा धोका कमी होता. स्थानिक सरदारांच्या माध्यमातून वर्चस्व राखणाऱ्या आदिलशाह आणि मोगल बादशाह यांचे कोकणकडे विशेष लक्ष नव्हते. त्यांनी आरमारी सामर्थ्य उभे करण्याचा विचार केलेला नव्हता. पोर्तुगीज, इंग्रज आणि डच आक्रमकांपासून देशाला वाचविण्यासाठी, स्वराज्याला पूर्णत्त्व आणण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यशाली आरमाराची आवश्यकता महाराजांना जाणवलेली होती. भौगोलिकतेचा अचूक फायदा घेत राजांनी जमिनीवर गनिमीकावा तंत्र अवलंबिलेलं. तसं इथे, सागरी सत्तांवर अंकुश मिळवण्यासाठी आरमार आवश्यक होतं. किनारपट्टीवरील अवघड जागी किल्ले बांधणं गरजेचं होतं. याभागात फिरंग्यांचा संपर्क असल्याने शहरांचा विकास झालेला. वादळात सापडलेली जहाजे समुद्रकिनाऱ्यावर फुटत असत. त्यात असलेला माल स्थानिक सार्वभौम सत्तेच्या ताब्यात येत असे. आरमाराच्या दृष्टीने कोकणातील खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसरा होत्या. समुद्रकिनारी असणाऱ्या कठीण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी उत्तम होत्या. आरमारी संरक्षणाच्या दृष्टीने गिरिदुर्ग आणि जलदुर्गांची बांधणी आणि नवी संरक्षक स्थळे निर्माण करण्यासाठी किनारपट्टीवरील बेटे आणि समुद्रापर्यंत घुसलेले डोंगरसुळके मोक्याच्या जागा पुरवायला सज्ज होते. हे आरमारी महत्त्व लक्षात आल्याने राजे कोकणात शिरायची संधी शोधत होते.

जानेवारी १६५६नंतर औरंगजेब, बादशहा व्हायला दिल्लीला रवाना होत होता. विजापूरला अली आदिलशाह मरण पावला होता. याकाळात राजांनी जावळी जिंकली. दाभोळवर भगवा फडकवला. तेव्हा कोकण किनारपट्टी निरनिराळ्या राज्यात विभागलेली होती. प्रजा अत्याचारांनी त्रस्त होती. सह्याद्रीतील डोंगररांगांच्या माथ्यावर उभे राहिलेल्या राजांना सागराच्या भव्यतेचे दर्शन झालेले. त्यांनी वेश पालटून कोकणपट्टीची पाहाणी करून घेतली. १६५७ला ते उत्तर कोकणात उतरले. त्यांनी कल्याण, भिवंडी परिसर जिंकला. आता जिंकलेला समुद्रकिनारा आणि मुलुखाच्या संरक्षणासाठी आरमाराची आवश्यकता होती. आरमारी उभारणीसं आवश्यक नौका भर समुद्रात बांधता येत नाहीत. त्यासाठी लष्करीदृष्ट्या उपयुक्त अशी समुद्रातून आत घुसलेली खाडी आणि तळ कोकणच्या या भौगोलिक किनारपट्टीत मुबलक होतेच. १६५७ला कल्याणजवळील दुर्गाडी येथे उत्तम प्रतीचे सागवान वापरून पहिली २० जहाजे आणि लढाऊ गलबते बनविण्यास राजांनी सुरुवात केली. पुढच्या काळात राजांच्या आरमारात गाब्र (गुराब-तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज), तरांडी (माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करणारी नाव), तारव आणि गलबत (जलद चालणारे जहाज), शिबाड (मालवाहतूक करणारी व्यापारी जहाज), तिर्कटीतारू, मचवा, पडाव, होडी, डोण, पगार आदि प्रकार राहिले. राजांनी कल्याणची ही जबाबदारी सेनापती आबाजी सोनदेव यांच्यावर सोपविली. कामात आपल्या स्थानिक लोकांचा समावेश असणं लाभदायक ठरलं. जहाजांसाठी लागणारं लाकूड, कारागीर उपलब्ध होते, पण तंत्रज्ञान नव्हतं. हे काम दर्जेदार होण्यासाठी त्यांनी वसईत तारवे बांधणारे कुशल पोर्तुगीज खलाशी लैतांव व्हियेगस आणि त्याचा मुलगा फेर्नांव व्हियेगस यांची मदत घेतली. त्यांच्यासोबत ३४० माणसं कार्यरत होती. आपल्या स्थानिक कारागिरांना नौकाबांधणीचं प्रशिक्षण मिळावं हा यातला मुख्य हेतू होता. तसं राजांनी आबाजींना, ‘जी माणसे या कामावर नियुक्त कराल ती अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेची हवीत, जी ते ज्ञान आत्मसात करू शकतील’ असं सांगितलं होतं. पोर्तुगालचे मुख्यालय असलेल्या गोव्यात मराठा आरमार उभारणीची ही वार्ता पोहोचल्यावर गडबड होण्याचा धोका होता. अल्पावधीत तसं घडलं. २ महिन्यांनी व्हेगास नोकरी सोडून गेला. अर्थात तोवर मावळे बरेचसे शिकले होते. राजांनी आपल्या जहाजांचे डिझाईन युरोपियन प्रमाणे न करता कोकणच्या भौगोलिकतेला अनुसरून केले. तेव्हा युरोपियन जहाजे खोल पाण्यात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी बांधण्यात येत. त्यामुळे त्यांच्या पाण्याखालच्या तळाची खोली अधिक असायची. राजांची जहाजं ही किनारपट्टीच्या आसपास अधिक वावरणार होती. त्यांनी आपली सुरुवातीची जहाज छोटी आणि सरळ तळ असलेली, वेगाने किनारपट्टी जवळ पोहोचतील अशी बनविलेली. यामुळे राजांचे आरमार शत्रूंना आव्हान देऊ लागले. नौकाबांधणी, समुद्र, वारा, खगोलशास्त्र, नाविक रणनीती आदि ज्ञान शिकायला एकेक जन्म पुरायचा नाही हे वास्तव असताना राजांनी हे सारे जुळविले. रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या ‘आज्ञापत्र’ ग्रंथातील, ‘ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ या वाक्यात मराठी आरमाराच्या प्रेरणेचे गुपित सामावले आहे. राजांना आरमारी, जहाज बांधणीज्ञान संपादन करण्यासोबत नौकाबांधणी, आरमाराचे सुरक्षित तळ म्हणून उपयोगी पडणारे जलदुर्ग बांधणे, माणसे प्रशिक्षित करणे आदि गोष्टी कराव्या लागणार होत्या. त्यांनी पुढे आरमाराच्या वेगवेगळ्या तुकड्या बनविल्या. प्रत्येक तुकडीत वेगवेगळ्या प्रकारची २०० जहाजं असायची. इथल्या भौगोलिकतेचा वापर करीत थेट खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी द्यायचे तंत्र वापरले. मोठी जहाजे खाडीमधून खुल्या समुद्रात संचार करत असता शत्रु समोर आल्यास एकत्र येऊन झुंजायचे आणि वाऱ्याची दिशा विरुद्ध असल्यास व गलबत योग्य चालवता येत नसल्यास शत्रूशी झुंज न देता जवळच्या जलदुर्गाच्या आश्रयाला यावे, असे युद्धतंत्र होते.

राजे स्वतः शिस्तप्रिय असल्याने, आधुनिक प्रशासनाची वैशिष्ट्ये त्यांच्या व्यवस्थेत दिसतात. नीती-नियमांचे काटेकोर पालन केले जाई. वर्षाचे ८ महिने राजांचे आरमार खुल्या समुद्रात असायचे. पावसाळ्याचे ४ महिने ते योग्य ठिकाणी छावणी करून सुरक्षित ठेवले जायचे. हे काम समुद्राला उधाण येण्याच्या १०-१५ दिवस आधि व्हायचे. जहाजे खुल्या उथळ समुद्रात किंवा जलदुर्गाच्या खाली उघड्यावर नांगरून ठेवता येत नसत. छावणी दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या सानिध्यात होई. एकाच बंदराच्या आसपासच्या गावांना अधिक कष्ट पडून नये, हे त्यामागचे कारण होते. नाविकांना पावसाळ्याचे ४ महिने शेतीत काम करावे लागे. आरमारात पठाणासोबत कोकणातील कोळी, सोनकोळी, आगरी, भंडारी, दादली, कोकणी मुस्लिम आणि कर्नाटकातील अंबी समाजाचे नाविक असत. या लोकांना समुद्र संचाराचे ज्ञान होते. गावाने प्रत्येकी १०० माणसांमागे २ माणसे आरमाराला द्यावीत अशी मागणी असे. राजांच्या आरमारात ५ हजार लोक होते. सागरी युद्धाच्यावेळी जलदुर्गांमधून आरमाराला युद्ध साहित्य पुरवण्यात येई. युद्धकैदी ठेवण्यासाठी जलदुर्गांचा उपयोग होई. जलदुर्गांच्या किनाऱ्यावर नांगरून ठेवलेली जहाजे शत्रूंच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहात. नजीकचा परिसर, किनारपट्टी, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवणे सोपे होई. किल्ल्यांवरील सैन्य आणि तोफांमुळे समुद्रात आणि नदीत येऊ पाहणाऱ्या जहाजांना परतून लावता येत असे. राजांचे किल्ले उघड्या मैदानात किंवा सपाटीवर अभावाने आढळतात. भौगोलिकतेचा अचूक उपयोग करून नैसर्गिक बळकटी, अभेद्यता, जलसंचय आणि संरक्षण यांचा विचार येथे दिसतो. सिद्धीचे सामर्थ्य त्याच्या जहाजात होते. त्याचे आरमार दीडशे वर्ष जुने होते. तरीही राजांनी शून्यातून आपले आरमार उभारून त्याला सर्व शक्तीनिशी झुंज दिली. महाराज समुद्राकडे वळले नसते तर कदाचित सिद्दीशी संघर्ष करण्याचा प्रश्न आला नसता. परंतु स्वराज्याचे ध्येय त्यांनी तडीस नेले. आरमाराच्या जहाजांसाठी लागणारं लाकूड रयतेला त्रास न देता उपलब्ध झालं पाहिजे याबाबत राजे दक्ष होते. जहाज बांधणीस कमी पडलेली आंबा, फणसाची लाकडं त्यांनी कर्नाटकातूनही मिळवलेली. महत्त्वाच्या जहाजांसाठी बंदुकीच्या आणि तोफेच्या गोळ्यांपासून बचाव करणारे महत्त्वाचे लाकूड म्हणून ते सागवानाचा उपयोग करीत. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या वनसंवर्धनालाही खूप महत्त्व दिले. गडावर आंबा, वड, नारळ, साग, शिसव अशी झाडे लावली. चिपळूण जवळच्या दळवटणे येथे राजांची १० हजारावर फौज होती. १६७४ च्या मे महिन्यात, लष्कराच्या छावणीला त्यांनी दिलेले पत्र, ‘आदर्श राज्य कसं असावं ?’ याचं उत्तम उदाहरण आहे. राई म्हणजे वनराई तिला सोन्यासारखं मोल म्हणून कदाचित राजांनी चलनी नाण्यांना शिवराईसंबोधलं असावं. पुण्याजवळच्या शिवापूरगावात राजांनी दाट शिवराई सजवली होती. राजांच्या पश्चात सरखेल कान्होजी आंग्रे यांनीही बाणकोटला सागवानाची लागवड केली. पुढे इंग्रजांनी ते तोडले. आजही बाणकोटला काही साग दिसतात.

राजांनी सिद्दीची इतर ठाणी जिंकली तरी, चौल (उत्तर) आणि दाभोळ (दक्षिण) या दोन प्राचीन बंदरांच्या मधोमध वसलेला जंजिरा जिंकणे आरमारासाठी आवश्यक होते. त्यासाठी प्रबळ आरमार आणि आर्थिक सामर्थ्य आवश्यक होते. म्हणून १६६४ मध्ये सुरत लुटण्यात आली. १६१३ साली सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेल्या ‘हिंदुस्थानी मरीन’शी राजांच्या आरमाराशी इस्ट इंडिया कंपनीच्या मरीनला लढावे लागले. सुरतेतून मिळालेल्या धनाचा उपयोग करून राजांनी २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग उभारण्याचे काम सुरु केले. राजांच्या हस्ते पायाभरणी झालेला तिथला दगडही आज भौगोलिकदृष्ट्या ‘मोरयाचा दगड’ नावाने प्रसिद्ध आहे. ८ फेब्रुवारी १६६५ ला आपल्या आरमाराचा उपयोग करत राजांनी आदिलशाही राज्यातील धनाढ्य बंदर बसरूरवर स्वारी केली. हे जोखमीचे काम अभ्यासल्यावर राजांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहाते. २९ मार्च १९६७ ला सिंधुदुर्गचे काम पूर्ण झाले. शत्रूकडून व्यत्यय येऊ नये म्हणून राजांनी येथे २ सहस्र मावळ्यांचा खडा पहारा नेमला होता. जंजिरेवर सिद्दीचा अभेद्य असणारा जंजिरे मेहरुबा हा राजांच्या महत्त्वकांक्षेला आव्हान देत होता. त्याच्यावर मात करायची असेल, तर दुसरी राजपुरी वसवावी लागेल हा विचार करून त्यांनी मालवणनजीकच्या कुरटे बेटावर सागरीदुर्ग बांधायचा निर्णय घेतला. या कुरटे बेटाजवळील पाण्यात आडवे तिडवे छुपे खडक होते. बेटाभोवती तीन कोसपर्यंत मोठ्या नौका येणे मुश्कील होते. राजांनी तेथे गड बांधायचे निश्चित केले. गडावर चोहोबाजूंनी खारेपाणी असताना दहीबाव, साखरबाव आणि दूधबावची उपलब्धी, सुमारे ४० शौचकूपांचे बांधकाम तिथल्या भौगोलिकतेचा उपयोग स्पष्ट करते. यानंतर राजांनी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट, सुवर्णदुर्ग बांधला. विजयदुर्गाची नव्याने बांधणी करून संपूर्ण कोकण किनारपट्टी नियंत्रणाखाली आणली. हर्णै बंदरातील बेटावर १६६३ मध्ये बांधलेला सुवर्णदुर्ग हा राजकीय आणि प्रशासकीय केंद्र होता. याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला जाई. विजयदुर्ग (घेरिया) हा शिलाहार राजा भोज याने ११९५ ते १२०५ मध्ये बांधलेला किल्ला. आरमारी महत्त्व ओळखून राजांनी तो जिंकून घेतला. या भागातले भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे विजयदुर्गजवळची खडकात खोदलेली ३५५ फुट X २२७ फुट आकाराची गिर्ये गोदी होय. तज्ज्ञांच्या अनुमानानुसार ५०० टनी जहाज येथे सहज बांधता येत असावे. अर्थात राजांकडील सर्वाधिक जहाज २५० टनी होते आणि १५० टनी जहाजे अधिक बांधली जात. विजयदुर्गपासून १५० मैल अंतरावर पश्चिमोत्तर समुद्रतळातील ४०० मीटर लांबीची तटबंदीही भौगोलिकतेचे दर्शन घडवते. ज्या भागात ही तटबंदी आहे त्या बाजूने येणारी अनेक जहाजे शिवकाळात, धडकून फुटून गेल्याची नोंद आहे. हे कशाने घडते ? याचे कोडे पोर्तुगीज आणि इंग्रजांना पडायचे. विजयदुर्ग जिंकून घेतल्यावर तेथे राजांनी पश्चिमोत्तर समुद्राच्या तळात ही संरक्षक तटबंदी उभारल्याचे किंवा ती शिलाहारांच्या काळात बांधली गेली असावी असे म्हटले जात असले तरी संशोधकांच्या म्हणण्यानुसार ती भिंत नैसर्गिक आहे. पुण्याच्या डेक्कन पुरातत्त्व संस्थेचे निवृत्त संशोधक डॉ. अशोक मराठे हे  कोकण किनारपट्टीवर पाचशे वर्षांपूर्वी आलेल्या त्सुनामीचा अभ्यास करत असताना त्यांना केळशी-हरेहरेश्वर ते विजयदुर्ग दरम्यान किनारपट्टीलगत एक रेष आढळून आली होती. ही दगडी भिंत असल्याच्या प्राथमिक अंदाजानंतर डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी समुद्राच्या पाण्यात पाणबुडे उतरवले. तेव्हा ही भिंत ८ हजार वर्षे पुरातन असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते आले होते. इंडियन हिस्ट्री काँग्रेसमध्ये डेक्कन कॉलेजचे संशोधक सहायक सचिन जोशी यांनीही मिथ्स अँड रिअॅलिटी-दि सबमर्ज्ड स्टोन स्ट्रक्चर अॅपट फोर्ट विजयदुर्गया विषयावर शोधनिबंध सादर करताना, ‘विजयदुर्ग किल्ल्याजवळची समुद्राखालील भिंत ही मानवनिर्मित नसून नैसर्गिक रचना आहे’ असे म्हटले होते. नंतरच्या काळात आंग्रेंनीही याच भागात समुद्रातील टेकडी ‘आंग्रे बँक’ शोधली. अर्थात या साऱ्या भौगोलिकतेचा उपयोग सुरुवातीच्या काळात राजांनाही झाला.

इंग्रजांनी २६ नोव्हेंबर १६६४ ला इस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या एका पत्रात, ‘शिवाजी विजयी व अनिर्बंध असून त्यांचे सामर्थ्य रोज वाढत आहे. सभोवतीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते. त्यांनी आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठविली आहेत.’ असे लिहिले होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या नोंदीनुसार, १६६५ मध्ये मराठा आरमारात ८५ लढाऊ आणि ३ उच्च दर्जाची जहाज होती. पोर्तुगीज विजरई कोंदि द सांव्हिसेति याने राजांच्या आरमाराविषयी १६६७च्या अखेरीस पोर्तुगालच्या राजास, ‘शिवाजीचे नौदलही मला भीतीदायक वाटते. त्याच्याविरुद्ध आम्ही सुरवातीस कारवाई न केल्यामुळे त्याने किनाऱ्यावर किल्ले बांधले. आज त्याजवळ पुष्कळ तारवे आहेत. पण ही तारवे मोठी नाहीत’ असे कळविले होते. संपूर्ण राजवटीत तारवांमधून (संगमिरी) स्वारी करणारे राजे कदाचित एकमेव असावेत. राजांनी १६७० मध्ये नव्याने १६० जहाजांची बांधणी नांदगाव (कुलाबा) येथे केली. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमावरील संगमेश्वरजवळच्या ओझरखोल (निढळेवाडी) येथेही राजांनी नौकाबांधणी सुरु केली होती. छत्रपतींच्या आरमारातील प्रसिध्द 'संगमेश्वरी' नौका इथली. शिवकालीन नौकाबांधणीची ही तंत्रपरंपरा आजही सुरु आहे. चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीवरील गोविंदगड हा दाभोळ खाडीतील आरमाराला निरोप पोचविणे, तेथून येणारे निरोप स्वराज्याची राजधानी रायगडावर पोचविणे या कामातील दुवा म्हणून काम करायचा. रायगडावर विशिष्ठ ठिकाणी आग पेटविल्यावर गोविंदगडाच्या समोरील सह्याद्रीतून ती दिसायची. रायगडावर पेटविलेली आग पाहून गोविंदगडावर खुणेची आग पेटविली जाई. याद्वारे फार थोड्या वेळात राजधानी रायगड ते मराठा आरमार यांच्यात संदेशाची देवाणघेवाण होई, इथे आपल्याला भौगोलिक महत्त्व दिसून येते. राजांनी या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रावर जरब बसवित सागरी व्यापार सुरु केला. समुद्राला पश्चिमेकडील नद्या जिथे मिळत तिथे बंदरे होती. त्यातूनही वाहतूक चाले. खास मीठाच्या (सॉल्टफ्लीट) वाहतुकीसाठी राजांनी गलबतांचा तांडा तयार करून घेतला होता. १६६५ च्या सुरतकर इंग्रजांच्या पत्रानुसार, दरवर्षी दक्षिण कोकणातील ७/८ बंदरातून राजांची २/३ गलबते पर्शिया, बसरा, आणि मोक्का (अबेसॅनिया) बंदरात व्यापारासाठी जात. परकीय सत्तांशी व्यापार करताना राजांनी आयात कमी आणि निर्यात जास्त हे वाणिज्य अनुकूल धोरण अवलंबिले होते. कोकण आणि घाट जोडणारे घाटमार्ग हे व्यापाराचे राजमार्ग होते. त्या मार्गांवर उभारलेले किल्ले चेकपोस्टचे काम करायचे. १६६९ पर्यंत गोवा, वसई, मुंबई ही मोठी समुद्री शहरं वगळता सगळं ताब्यात घेतलं. आरमाराला एक सुसंघटीत आणि फायदेशीर संस्थान बनवलं. या आरमाराने पुढे जवळपास १५० वर्ष राज्य केलं.

राजांनी मुरुड-जंजिऱ्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) बांधला. या पद्मदुर्गच्या भिंतींचे दगड झिजलेत पण दरजा भरलेला चुन्याचा मसाला झिजला नाही. मुंबईजवळ खांदेरी बंदरावरच्या बेटावर १६७२ मध्ये किल्याचं बांधकाम सुरु केलं. तत्पूर्वी या बेटांवर युरोपियन लोकांना गोड्या पाण्याची सोय करणे जमले नव्हते. राजांनी आपल्या संस्कृतीतील ज्ञानाच्या आधारे येथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. कामास विरोध करण्यासाठी इंग्रजांनी किनारा आणि बेट यांमध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे ठरवले. त्यांना आपल्या मोठ्या जहाजांचे विशेष महत्त्व वाटत होते. त्यामुळे कोकणातला उथळ समुद्र आणि खाड्यांचा विचार करायला त्यांना वेळ मिळाला नसावा. त्यांच्या मोठ्या जहाजांना खाडीमध्ये ठिय्या देणे जमले नाही. वार्‍यामुळे त्यांच्या होड्या किनाऱ्याकडे फेकल्या जात. त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. उथळ पाण्यात मराठ्यांच्या छोट्या बोटींविरोधात इंग्रजांच्या बोटी जिंकू शकल्या नाहीत. राजांनी आपले आरमार आपल्या हद्दीत वावरणारे केलेले. मराठे लोकं रातोरात या चिंचोळ्या होड्या वल्हवत विविध बेटांवर सामान पोहवत. इंग्रज जहाजे पूर्णपणे वार्‍यावर अवलंबून असत. खांदेरीच्या घटनेद्वारे सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलयी वारे आदिंचे स्थानिक ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. खांदेरी उभारताना आजूबाजूला मोठाले दगड टाकण्यात आले. त्याच्यावर कालवे वाढून दगडाच्या कडा धारधार होतील. पायाला इजा होऊन त्यास सागराचे खारेपाणी लागताच आग होईल आणि पोहोचणं अवघड बनेल अशी योजना होती. जवळचा काशाखडक ते खांदेरी हा सागरीप्रवास खडकाळ आहे. तिथे पाण्याला उलट-सुलट प्रवाह असून अचानक बदलणारे वातावरण अशी त्या सागरीपट्ट्याची आजही भौगोलिक ओळख आहे. १६७८ ला कुलाबा किल्याचं काम सुरु झालं. मोठाले दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधण्यात आल्या. चुन्याने दरजा भरल्या नाहीत. समुद्राच्या लाटा भिंतीवर आदळल्या की त्यांचं पाणी दोन दगडांच्या फटीतून आत जावं आणि पाण्याच्या प्रवाहाचा रोध कमी व्हावा, हा विचार भौगोलिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कुशीतल्या समुद्री कोकणला राजांनी आरमारी उभारणीने बळकट बनवले. त्यांनी जमिनीवरील युद्धात जसा सह्याद्रीतले उत्तुंग डोंगर, अवघड घाटवाटा, घनदाट जंगले आदि भौगोलिकतेचा पुरेपूर वापर करून घेतला तसाच आरमारी युद्धात किनारपट्टीच्या भौगोलिक रचनेचा उपयोग केला. स्वराज्य निर्मितीसाठी निष्ठावान मावळ्यांप्रमाणे सह्याद्री, सागराच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचेही सहकार्य त्यांना मिळाले. राजांच्या आरमाराविषयी जेम्स डग्लस म्हणतो, ‘शिवाजी जन्माने खलाशी नव्हता, ही त्या ईश्वराची कृपा होय. जर असता तर जशी त्याने भूमी पादाक्रांत केली त्याप्रमाणे सागरावर आपला अंमल गाजवला असता. खलाशी नसताना त्याने सागरावर आपले वर्चस्व स्थापन केलेच.’ सह्याद्री आणि सागराच्या या इतिहासात मानवी सामर्थ्याला अपयशी करण्यास निसर्ग आणि भौगोलिकता कारणीभूत ठरल्याचे दिसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य आणि आरमार उभारण्यापासून कोणालाही रोखता आलं नाही.

राजांच्या जीवनातील व्यवधानता पाहाता, सागरी सत्तेसारख्या अनोख्या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या असामान्य कर्तृत्त्वात भौगोलिकतेचा मोठा प्रभाव आहे. राजांच्या आरमाराविषयी कमी लिहिलं गेलं आहे. आजही जगातील ९० टक्के व्यापारी माल आणि वस्तूंची वाहतूक सागरी मार्गाने जहाजाद्वारे होत आहे. आगामी काळात समुद्रमार्ग हा प्रवासासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह मोठ्या प्रमाणात खुला व्हायला हवा आहे. तसा तो व्हावा म्हणून अख्खं जग प्रयत्न करते आहे. आपले केंद्र सरकारही यावर काम करते आहे. महत्त्वाचा मार्ग म्हणून सागरीमार्गाला महत्त्व यायला विमान आणि रस्त्यांचे अपघात, प्रवासास लागणारा वेळ, आणि पैसा हेही कारण आहे. केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नातून ‘कोकण मेरिटाईम क्लस्टर’ अंतर्गत समूह सागरी सेवा प्रकल्प गोव्यात सुरु होण्याबाबतची वृत्त आपण वाचली आहेत. प्रत्येकाला समुद्राच्या तळाशी जाणे शक्य नसल्याने भविष्यात जगातल्या समुद्रीतळाची डिजिटल लायब्ररी तयार होण्याची चिन्हे आहेत. म्हणूनच भारताने सागरी सत्ता बनण्यासाठी विचार करायला हवा आहे. वर्षभरापूर्वी मुंबई विद्यापीठात सागरी मार्ग वाहतूक यावर एक सेमिनारही झाला होता. आपला अधिकतर इतिहास हा बखरी आणि प्रवासवर्णनातून लिहिला गेलेला आहे. त्याजोडीला इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा चिकित्सक अभ्यास वास्तूविशारदशास्त्राच्या दृष्टीने व्हायला हवाय. त्यातून इतिहासाची अधिकची भौगोलिक चिकित्सा पूर्ण होऊ शकेल.

संदर्भ :

१. मराठी विश्वकोश (http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9817&Itemid=2)

२. केतकर ज्ञानकोश

३. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी प्रशासनातील मुसलमानांचे योगदान (http://14.139.13.47:8080/jspui/bitstream/10603/241792/9/09_chapter%203.pdf)

४. मराठी सत्तेचा उदय, शिवाजी विद्यापीठ बी.ए. भाग १ (http://www.unishivaji.ac.in/uploads/distedu/2019_2020/SIM%202019/B.%20A.%20Part-I%20History%20(Rise%20of%20Maratha%20Power)%20sem%20I.pdf)

५. https://www.thinkmaharashtra.com/node/2045

६. शिवछत्रपतींचे आरमार - गजानन भास्कर मेहेंदळे

७. महाराष्ट्रेतिहास परिषद निबंध संग्रह-३, १९६८

८. कोकणचा राजकीय इतिहास – डॉ. खोबरेकर (१९९७)

९. इतिहास आणि भारतीय संस्कृती – जानेवारी - मार्च २०१२         

१०. इतिहास आणि भारतीय संस्कृती – एप्रिल – जून २०१६                                  

११. छत्रपती शिवाजी महाराज (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध) – वा. सी. बेंद्रे

१२. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आणि नामवंत इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे आणि मुंबईतील प्रसिद्ध वास्तूविशारद ‘ए फिफ्थ पर्स्पेक्टीव्ह’चे चंद्रशेखर बुरांडे यांच्याशी चर्चा. 


धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-बकांगणेवाडी रोडखेंडचिपळूण ४१५६०५जि. रत्नागिरी. 

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, 

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

‘पर्यटन’पूरक व्यवस्था सक्षम हव्यात !

              कोरोना लॉकडाऊन काळात सोशल मिडीयावर व्हायरल झालेला ‘डेस्टीनेशन चिपळूण’ हा आमचा लेख वाचून कोकण रेल्वेत ‘मोटरमन’ म्हणून काम करणाऱ्या गृहस्थांचा फोन आलेला. रेल्वे इंजिन घेऊन चिपळूणहून माणगावला निघण्याच्या तयारीत असलेले ते गृहस्थ पोटतिडकीने बोलत होते. देशभरातील पर्यटक, रेल्वेच्या माध्यमातून कोकणात आणण्याच्या नियोजनावर लिहा, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. कोकणातील मूळ पर्यटनस्थळे चांगली होत असताना, आजूबाजूचा परिसर, रस्ते ओंगळवाणे असता कामा नयेत. त्याने मूळ पर्यटनस्थळाच्या आकर्षणास बाधा येत असल्याची भूमिका नुकतीच आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आणि लेखक प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनीही आमच्याजवळ व्यक्त केली. पर्यटनपूरक व्यवस्था सक्षम असायला हव्यात ! या दृष्टीने कोकण पर्यटन विषयात काय करायला हवं ? याविषयी सुचलेलं काही...!

कोकण रेल्वेच्या प्रवासी नेटवर्कचा उपयोग करून भारतभरातील पर्यटकांना ‘चलो कोकण’ या ब्रँडिग अंतर्गत कोकणात आणायला हवं. अशा प्रयत्नात एका ट्रेनमधून काही हजारात पर्यटक कोकणात उतरू शकतात. देशात कर्नाटकसह काही राज्यात अशी व्यवस्था करणारी यंत्रणा आहे. कोकण पर्यटनाची जाहिरात कोकणापलिकडे संपूर्ण देशभर व्हायला हवी, असा मुद्धाही त्या मोटरमननी सांगितला. पत्रकारितेतील अनुभवानुसार हे पूर्वीच लक्षात आलेल्या आम्ही गेल्या काही वर्षांपासून आमचं कोकण पर्यटन विषयक लेखन महाराष्ट्रभरातील नियतकालिकात द्यायला सुरुवात केलेली. यासाठी सोशल मिडीयाचाही पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडल्या पर्यटनस्थळांचा मजकूर देशभरातल्या माध्यमांत पोहोचविण्यासाठी विशिष्ठ यंत्रणा सोबत असायला हवी, असं जाणवू लागलं. दोन वर्षांपूर्वी डेस्टीनेशन चिपळूणच्या प्रयत्नांचा भाग एक म्हणून ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने देशभरातील पर्यटन संस्थांना आपल्या खर्चाने चिपळूण दाखविले. संस्थेने पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील टूर ऑपरेटर यांच्या भेटी आणि पत्रकार परिषदाही घेतल्या. ‘डेस्टीनेशन चिपळूण’ तिथल्या स्थानिक माध्यमांत झळकावं म्हणून प्रयत्न केले. त्याचा उपयोगही झाला. पण यात सातत्य हवं, हेही लक्षात आलं. सातत्यासाठी नियमित निधीची आवश्यकता असते. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तो निधी कायम स्वतःच्या खिशातून खर्च करणे शक्य होतेच असे नाही. इथे प्रशासकीय यंत्रणांच्या सहकार्याची गरज असते. नुसत्या उथळ आणि सवंग घोषणा करून काय उपयोग ? वेळ देऊन काम करणाऱ्या हातांना बळ दिलं जायला हवं. खरंतर हे सारं करण्यासाठी आपल्याकडं एक ‘खातं’ आहे, पण त्यांना हे काम आपलंच आहे याची जाणीव नसावी. पर्यटन पूरक व्यवस्था या विषयात कोकणात गावोगावी स्वयंसेवी माणसं, संस्था काम करताहेत. वर्षानुवर्षे आपलं योगदान देताहेत. त्यांच्या नावांच्या याद्या त्या–त्या ठिकाणी उपलब्ध असतील. पण या सर्वांचे एकत्रीकरण सरकार दफ्तरी आहे का ? त्यांची कोणाला आवश्यकता वाटते आहे का ? या साऱ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्यासोबत कधी संवाद झाला आहे का ? तो होणं ही पर्यटन पूरकततेची आवश्यकता आहे.

भारतीय पर्यटनात महाराष्ट्र मागे पडतो आहे. कारणांचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा समोर येतो तो दळणवळणाचा ! कोकणासह महाराष्ट्रातील मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत रस्त्यांच्या अवस्थेविषयी काय बोलावं ? प्रवासात मुक्कामी पोहोचेपर्यंत हाडं खिळखिळी होतात. अंदाजापेक्षा अधिक वेळ खर्च होतो. अपघातांना निमंत्रण मिळतं. शेजारच्या गोव्याचे रस्ते बघा. अगदी छोट्या गावात जाणारे रस्तेही गुळगुळीत आहेत. रस्त्यांवर सर्वत्र मार्गदर्शक फलक आहेत. आमच्याकडे चिपळूणचा परशुराम घाट बंद पडला तर प्रवासाला तातडीचा, जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. सागरी महामार्गाकडे आजही आम्ही नीट पाहात नाही. मुख्य रस्ते जिथे गावागावांच्या सीमांना जाऊन भेटतात तिथे नाके, चौक, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा निर्माण होत असतात. आम्ही याचा पर्यटनासाठी कितीसा विचार करतो ? रस्त्यांचा विचार करता कोकणात गेली काही वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हल्ली राजापूरच्या पुढे हातिवले परिसरात आणि चिपळूण-खेड पट्टयात टोलनाकेही उभे राहिलेत. आता तिथे चहानाश्ता, टायर दुरुस्ती इत्यादी सेवा पुरविणारे छोटे मोठे उद्योग उभे राहू शकतील. ते कसेतरी कुठेतरी टपऱ्या बांधून सुरु झाले की बकालपणा येईल. तिथे थांबणाऱ्या पर्यटकांना पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या सुविधा त्याच ठिकाणी पुरविल्या पाहिजेत. यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न झाले पाहिजेत. या नव्या हायवेच्या शेजारी असलेल्या जागांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी पर्यटनाला साजेसे छानसे गाळे बांधून रोजगार निर्मिती साधायला हवी. कारण होणारा महामार्गीय विस्तार हा सुशोभित असायला हवा. आरेवारेसारख्या देखण्या समुद्रकिनारी, रस्त्याशेजारी कुठेतरी कोणीतरी दुकानांसाठी रोवलेले बांबू, हवेत उडणारे प्लास्टिक किंवा ताडपत्री दिसते. नुसता समुद्रकिनारा किंवा कोकणचा निसर्ग छान असून उपयोगाचं होणार नाही. पर्यटनस्थळाच्या आजूबाजूचं वातावरण ओंगळवाणं असेल तर कसं चालेल ? अर्थात सगळाच दोष व्यवसाय करणाऱ्यांचा नाही. त्यांना याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कोण करणार ? वार्षिक कर गोळा करणं वगळता, स्थानिक स्वराज्य संस्थांची या विषयातली भूमिका काय ? महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष उद्योगपती रावसाहेब गोगटे यांनी १९७८ साली कोकणची, कॅलिफोर्नियाशी तुलना केलेली. त्यामागे एका बाजूला समुद्रकिनारा दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले निसर्गरम्य डोंगर आणि मध्यभागातून नागमोडी वळणांचे छानसे रस्ते हे साम्य कारणीभूत होते. गुगलवरची चित्रे पाहिल्यास आपल्या हे सहज लक्षात येईल. आम्ही या घोषणेकडे कसे पाहिले ? किल्ले जंजिरा येथे पर्यटकांनी भरलेल्या शिडाच्या होडीतून, जीव मुठीत धरून भर समुद्रात हेलकावे खात प्रवास करणं एक दिव्य असल्याच्या नोंदी काही पर्यटक करतात. अर्थात शिडाच्या होडीतील प्रवासाचे थ्रीलींग आपल्याला प्राचीन प्रवासाचा अनुभव देते हे सत्य मान्य केलं तरी ते पर्यटकांवर बिंबवायला आपण कमी का पडतोय ? यात इतक्या वर्षात काहीही सुधारणा का होत नाही ? पुरातत्त्वीय वास्तूंना अपार श्रद्धेने भेट दिल्यावर तिथली दुरवस्था पाहून, ‘इथे का आलो ?’ असा प्रश्न पर्यटकांना पडत असेल तर आम्ही इतकी वर्षे काय करतो आहोत ? अशा ठिकाणांची जीर्ण-शीर्ण अवस्था, भग्नावशेष, ऐतिहासिक आणि भौगालिक माहिती सांगणाऱ्या फलकांचा अभाव, माहितीपर साहित्याची अनुपलब्धी बघून पर्यटकांनी कशाचा आनंद घ्यायचा ? चुकून एखाद्या ठिकाणी अशी माहिती देणारा फलक आढळला तर तो स्वयंसेवी संस्थेने लावल्याचे निदर्शनास येते. मग पुन्हा तोच प्रश्न उभा राहातो, आमचं ‘खातं’ काय करतं ? अर्थात शासकीय अनुभव माणसांगणिक बदलतात, असं म्हटलं जातं. पण पर्यटन सारख्या विषयाची आवश्यकता लक्षात घेता त्यात सर्वत्र एकवाक्यता आणि एकसूत्रता यायला हवी. गेली दहा वर्षे पश्चिम भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांमध्ये राज्यातील महाबळेश्वर, पाचगणी, मुंबई, शिर्डी आणि गणपतीपुळे, तारकर्ली, अलिबागसह कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होतो आहे. पर्यटकांना फिरायला आवडणारे समुद्रकिनारे, धार्मिक, गिरीस्थाने, वन्यजीवन, ऐतिहासिक ठिकाणांची समृद्धी कोकणात आहे. पर्यटकांना दोन-तीन दिवसांच्या प्रवासाचे अंतर ३/४शे किलोमीटर असावे, असेही वाटते. म्हणून जवळच्या पर्यटकांना हा कोकण पर्यटनाचा आनंद सातत्याने घेण्यासाठी दळणवळणासह पर्यटन पूरक व्यवस्था उत्तम असायला हव्यात.

कोकणसह कृषीप्रधान भारतातील बहुसंख्य पर्यटनस्थळं ग्रामीण भागात आहेत. त्यांच्यात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. अशा अनवट पर्यटनस्थळांकडे जायला रस्ता, अपवाद वगळता राहण्या-खाण्या-पिण्याची व्यवस्था, माहिती सांगणारा गाईड ह्या सोयी कशा उपलब्ध होतील ? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्द्दीत आलेल्या, पर्यटनासाठी पैसे खर्च करू पाहाणाऱ्या पर्यटकाला आपल्या गावासंदर्भातील सुखद आठवणींचा ठेवा सूपूर्द करण्याची जबाबदारी कोणाची ? कोणत्याही विकासात सर्वात मोठा अडथळा हा स्थानिकांच्या सहभागाचा असतो. कोकणात तर ८० टक्के जमिनी ह्या २० टक्क्यांच्या मालकीच्या आणि उरलेल्या २० टक्के जमिनींचे मालक ८० टक्के लोक आहेत. भूमीहिनांची इथे कमतरता नाही. अशा वातावरणात स्थानिकांचा सहभाग मिळविण्यासाठी कोणते पर्याय स्वीकारायला हवेत ? यावर नीटसा विचार झाल्याचे दिसत नाही. म्हणूनच, चाकरीच करायचीय ना ? मग गावची का ? मुंबई-पुण्याची केली तर काय बिघडलं ? असा विचार करून कोकणी माणसाने कोकण सोडलं आणि रिकामं झालेलं अख्खं कोकण इतरांच्या घशात गेलं तर दोष कोणाला द्यायचा ? घटनेने देशातल्या प्रत्येकाला कोठेही राहण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो नाकारायचे काही कारण नाही. पण देशात जिथे पर्यटन विकसित झाले आहे तिथे स्थानिकांचे योगदान आणि सहभाग लक्षणीय राहिल्याचे दिसते. आपल्याकडे काय चित्र आहे ? रत्नागिरी तालुक्यातील निवळीपासून जयगड-गणपतीपुळे पर्यंतच्या मार्गावर कोकणाबाहेरील लोकांनी गॅरेज आणि ढाबे काढलेले आपल्याला दिसतील. मग, कोकणात रोजगाराच्या संधी नाहीत ? असे कसे म्हणता येईल. पण या संधी स्थानिकांना मिळाव्यात म्हणून आम्ही कोणते प्रयत्न करतो ? कोकण पर्यटनावर लंबेचौडे भाषण करणारे आम्ही ग्राऊंड गाईडन्स करण्यात कमी का पडतो ? बचतगटांनी पर्यटन सेवा उद्योगाकडे वळावे यासाठी आम्ही कृतीशील कार्यक्रम का आखत नाही ? आमच्या शहरात येणाऱ्या पर्यटकांना आम्ही ‘पिक अॅन्ड ड्रॉप’ सीट्स तत्त्वावर आमचे शहर फिरवू असे जाहिरात फलक का लागत नाहीत ? आलेल्या पर्यटकांकडून वारेमाप पैसे उकळण्याची आमची प्रवृत्ती कधी थांबणार ? अशा स्थितीत पर्यटक पोलिसी मदत कशी मिळवू शकतो का ? यासाठीची अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हायला हवी. पर्यटन विभागाने जर पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटन वैभव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे,  स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, विकास कामांवर लक्ष ठेवण्यात आपले योगदान दिले तर कोकण पर्यटनाचा विकास होऊ शकतो. पण कोकण पर्यटनात काम करणाऱ्या बहुसंख्य कार्यकर्त्यांशी या खात्यांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा संवादच नसतो, हे दुर्दैवी आहे.

डिस्कव्हरीसारख्या वाहिन्यांवर दिसणारे खोल समुद्रातील रंगीबेरंगी मासे कोकणात किनारपट्टीवर आढळून येतात. सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी या विषयात मोठे काम उभे केले आहे. कोकण पर्यटनासाठी ही पर्वणी आहे. रत्नागिरीच्या भाई रिसबूड, प्रा. ठाकूरदेसाई आणि मराठे यांनी प्रकाशात आणलेली किमान १० हजार वर्षे जुनी कातळखोद शिल्पंही परदेशी पर्यटक आणि चलनासह मोठे योगदान देण्याची क्षमता राखून आहेत. त्याठिकाणी पायाभूत सुविधा आणि तिथवर जगभरातील पर्यटक पोहोचावेत म्हणूनचे प्रयत्न कोणी करायचे ? अशा ठिकाणी कोकणात स्थानिकांचे हात झटत आहेत. त्याला भरीव प्रशासकीय सहकार्य कधी मिळणार ? जिथे मिळते तिथे किती वर्षे सातत्याने झगडावे लागते ? चिपळूणात ग्लोबल चिपळूण टुरिझम ही संस्था ‘डेस्टीनेशन चिपळूण’ होण्यासाठी धडपडते आहे. कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणला पर्यटन नकाशावर आणण्याची जबाबदारी कोणाची ? इथल्या गेल्या २५/३० वर्षांतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणांचे चिपळूण पर्यटन विकासात योगदान काय ? ग्लोबल चिपळूण टुरिझम दरवर्षी भरवित असलेल्या क्रोकोडाईल फेस्टिव्हल आणि बोट सफारीतून शहराच्या पर्यटनाचे ब्रँडींग होत असेल तर यासाठी विशेष निधीची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थांनी का करू नये ? असे महोत्सव कोकणात अनेक ठिकाणी वर्षाखेर आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडात होत असतात. त्यातल्या काहींना स्थानिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पाठबळ मिळते. मग ते चित्र सर्वत्र का दिसत नाही ? या साऱ्या महोत्सवांचे एकत्रित मार्केटिंग करण्याची यंत्रणा आम्ही का उभारू शकत नाही ? परशुरामभूमी अशी चिपळूणची ओळख आहे. इथल्या महेंद्रगिरी डोंगरात, परशुराम घाटात भगवान परशुरामांचा एखादा भव्य पुतळा उभा राहायला हवा. पर्यटनात अशी आकर्षणे फार महत्त्वाची ठरतात, हे जगातील पर्यटनाचे ट्रेंड अभ्यासता लक्षात येईल. याच घाटातून रोपवे व्हावा म्हणून मध्यंतरी प्रयत्न झालेले. सर्व्हे झाला. काही कोटींचा खर्च असल्याचे लक्षात येताच, हा खर्च कोणी करायचा ? म्हणून हा विषय मागे पडला. मध्यंतरी कोरोना लॉकडाऊन काळात एक मित्र आम्हांला बोलून गेला, ‘कसल्या कोकण आणि पर्यटन विकासाच्या गप्पा मारता तुम्ही ? साधे रस्ते तुम्हाला नीट करता येत नाहीत ? चिपळूणचा पूल वर्षानुवर्षे रखडलाय ?’ काय उत्तर द्यावे ? तरीही एका बाजूने रोजच्या माध्यमांत नेटाने आमच्या विकासाच्या गप्पा सुरु असतात, आश्चर्य वाटतं.

अर्थात, कोकणात सगळं काही असंच नाहीय्यै ! जसं राजस्थान पर्यटन तिथल्या स्थानिकांनी पुढे नेलं. तसं कोकणही जातंय ! कोकणात फिरताना पूर्वी न दिसणारी हॉटेल, होमस्टेचे बोर्ड, पर्यटकांच्या गाड्या, टुमदार बंगले, विक्रीसाठी आखणी केलेले प्लॉट, समुद्रकिनाऱ्यांवरची गर्दी, तिथले भेळवाले, लोखंडी बाकडी असे चित्र आज दिसते. उन्हाळी, दिवाळी, ख्रिसमस अशा कोणत्याही सुट्टीत जाता येईल, सामान्य खिशाला परवडेल असा पर्याय म्हणून लोक कोकण पर्यटन निवडतात. परिणामी आज कोकणातल्या कोपऱ्यातल्या किनाऱ्यावरही पर्यटकांचे पाय वळताना दिसतात. मंडणगडला पूर्वी कोकणातलं अंदमान म्हटलं जायचं. तिथल्या वेळासची आजची ओळख कासव महोत्सवासाठी झाली आहे. ही निसर्गाला पूरक कल्पना असल्याने पर्यटक गर्दी करतात. हल्ली हे महोत्सव अनेक ठिकाणी होतात, पण त्यांचं सुसूत्रीकरण, एकत्रित मार्केटिंग होत नाही. पूर्वी फारसे पर्यटक न फिरकणाऱ्या आंजर्ले, हेदवी, मुरूड, हर्णे, दाभोळ, जयगड, नांदिवडे, कोळथरे, भंडारपुळे, देवगड, वेंगुर्ला, कुणकेश्वर, साखरीनाटे, पूर्णगड, वेत्ये, गावखडी अशा अनेक गावात आता पर्यटकांची गर्दी असते. एका आकडेवारीनुसार गेल्यावर्षी कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय श्रीक्षेत्र गणपतीपुळेला १७ लाख ६८ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. तेथे १९८१च्या सुमारास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुरू झालं. १९९१ मध्ये गणपतीपुळे विकास आराखडा तयार झाला होता. २०००च्या सुमारास कोकणात रेल्वे आली. पुढे फेरीबोट सुरु झाली. मुंबई-गोवा महामार्ग रडत खडत का होईना होतो आहे. सागरी महामार्ग अडचणीत आला असावा. लोकांनी कृषी पर्यटन आणि रिसॉर्ट सुरु केलीत. रोजगार वाढू लागलाय. इथली बहुसंख्य घरे आणि जमिनी या कुळ कायद्यामध्ये किंवा सामायिक स्वरुपाच्या आहेत. त्यामुळे घरगुती निवास न्याहारी व्यवसाय परवाना किंवा कर्ज घेताना लोकांना अडचणी येतात. यासाठी सहहिस्सेदारांचे संमतीपत्र दाखल करून परवानगी देण्यासाठी शासनस्तरावर आदेश निघायला हवेत. कर्जमाफीपेक्षा घरोघरी असे व्यवसाय उभारणाऱ्यांना मूळ कर्जावरील व्याजात आणि वीज-पाणी बीलात सवलत मिळाली तरी ते दिलासादायक ठरू शकते.

तीर्थाटन म्हणून सुरु असलेल्या भारतीय पर्यटनात पूर्वी वैयक्तिक सुखसुविधांची फारशी चर्चा होत नसायची. आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनेत याला विशेष महत्त्व आलं. रुटीन जीवनापासून दूर जात लोक मौजमजेसाठी बाहेर पडू लागले. घराबाहेर कुठेतरी दूरवर जाऊन हौस-मौज करणे, शॉपिंग करणे, सुखसुविधांचा अनुभव घेणं सुरु झालं. मग जगप्रसिध्द वर्ल्ड हेरिटेज, मंदिरे, स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, जागतिक आश्चर्ये, मोठी शहरे, भव्यदिव्य शॉपिंग आलं. धार्मिक पर्यटन होतंच ! त्याला चारधाम यात्रा, ज्योतिर्लिंग यात्रा, शक्तिपीठे यात्रा, कुंभमेळे, कन्यागत महापर्व, पुष्कर, तिरुपती बालाजी, शिर्डी, कैलास मानसरोवर, स्वर्गारोहिणी, पंचकैलास, पंचकेदार, अयप्पा असं स्वरूप आलं. अलिकडे तर नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यटन सुरु झालंय. ज्यात इंडॉलॉजी आणि आर्किऑलॉजीवर आधारित पर्यटन, कृषी आणि ग्रामीण पर्यटन, साहसी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, नदी आणि धार्मिक स्थळांच्या परिक्रमा, संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांद्वारे पर्यटन, सण-उत्सवावर आधारित पर्यटन, महोत्सव पर्यटन सुरु झालं. साहित्य, कला, नृत्य, संगीत पर्यटन, शिबीरे, संस्कार वर्ग पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, पर्यावरण पर्यटन, गोग्राम, शैक्षणिक आणि संग्रहालये आदि प्रकार विकसित झालेत. या प्रत्येक पर्यटन रचनेत सामावण्याचं सामर्थ्य कोकणात आहे. त्याला पायाभूत सुविधांची गरज आहे. विकास साधायचा तर शासन आणि स्थानिक यांचा एकत्रित सहभाग असायला हवा. आजही कोकणातील पर्यटन व्यवसाय समृद्ध करणाऱ्या ठिकाणांचा सरासरी सहभाग ६ ते ८ महिन्यांचा असतो. इतर ठिकाणी हे प्रमाण त्याहूनही कमी आहे. काही ठिकाणी तर सुट्ट्यांपुरते पर्यटक फिरकतात. म्हणून कोकणात किनारपट्टीलगत आणि सह्याद्रीच्या परिसरात असलेल्या रम्य गावांवर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे आहे.

अपवाद वगळता आजही कोकणात व्यावसायिक दृष्टिकोन, पायाभूत सुविधा, पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणेचे असक्षमीकरण, थेट पर्यटनस्थळापर्यंत जाण्यासाठीच्या सुविधा, तिथल्या राहण्या-खाण्या-पिण्याच्या सुविधा, गाईड, सुरक्षित पर्यटनपूरक वातावरणाचा अभाव स्पष्ट जाणवतो. जिथले चित्र चांगले दिसते तिथे शासनाच्या तिजोरीतील गेल्या चार दशकांत किती कोटी रुपये निधी खर्ची पडला हे तपासलं तर इतर ठिकाणी या सुविधांचा अभाव का ? हे लक्षात येते. बदलत्या जगात पर्यटनासारख्या सक्षम रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील  पायाभूत सुविधांच्या विकासाकडचे अक्षम्य दुर्लक्ष आम्हाला परवडणारे नाही. हे ध्यानात घेऊन आम्ही पर्यटनपूरक व्यवस्था सक्षम बनवायला हव्यात.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

प्रसिद्धी : कोंकणी माणूस दिवाळी अंक २०२०, संपादक  प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर सर

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

‘तांबट’ पक्ष्याचा फराळ !

     
      दीपावलीच्या चौथ्या दिवशीची, रविवार (१५ नोव्हेंबर २०२०) सकाळची घटना. पूर्वेकडल्या दारात बांधलेल्या किल्ल्यावर
सूर्याची कोवळी किरणपडण्याच्या तयारीत होती. किल्ल्यावर उशीरा पेरलेले धान्यही किंचितसे उगवून आलेले. किल्यावर पाणी शिंपडण्याच्या हेतूने मावळ्यांना, ‘थोडी विश्रांती घ्या म्हणत जमिनीवर उतरवलं. पत्नीला भोवताली साधीशी रांगोळी काढायला सांगितली. बहिणीने पुण्याहून मावळे पाठविल्याने गेल्यावर्षीच्या सैन्यदलात चांगलीच भर पडलेली. लेकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या मावळ्यांना किल्यावर पुन्हा स्थानापन्न करत असताना पश्चिमेकडच्या उंबरावरची फळं जमिनीवर पडत असल्याचा आवाज आला. झाडावरून पडणाऱ्या उंबराच्या फळांच्या आवाजाचा वेग नेहमीपेक्षा जास्त असल्यानं उत्सुकता ताणली गेली. थोडं बारकाईनं पाहिलं तेव्हा डोके, छाती आणि कंठ तपकिरी रंगाचा असलेल्या तांबट पक्ष्याची (Brown Headed Barbet) जोडी पिकलेल्या उंबराच्या फळांच्या फराळाचा आस्वाद घेताना दिसली. तांबटपक्ष्याचा हा दिवाळी फराळ कार्यक्रम तीसेक मिनिटे चालला. एरव्ही कॅमेऱ्याची चाहूल लागताच उडून जाणाऱ्या ‘तांबट’ची आजची कृती मात्र पर्यावरणीय कारणे आमची दीपावली सुखद करून गेली.

दीपावलीचा पहिला दिवस अशी मान्यता असलेल्या वसुबारसेच्या सकाळी परिसरातील बालमावळ्यांनी साकारलेल्या किल्यावर शेवटचा हात फिरवून तातडीच्या प्रवासाला निघालेलो, तो परतायला धनत्रयोदशीची रात्र झाली. घरून निघताना किल्यावर धान्य पेरणी केलेली. तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान आटपल्यावर लगबगीनं किल्यावर महाराजांना आणि मावळ्यांना स्थानापन्न केलं. छानसे फोटोही घेतले. कोरोनाच्या संकटात दीपावलीचा आनंद विशेष नसला तरी काळासोबत चालायला हवं. यंदा अभ्यंगस्नानानंतर ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाणं, घरचा फराळ अर्पण करणंही शक्य झालं नाही. अशात दिवस सरला. दीपावलीच्या आजच्या चौथ्या दिवशी सकाळी किल्यावर पेरलेलं धान्य उगवू लागल्याचे लक्षात आले. तिकडे लक्ष देत असताना परसदारातल्या उंबरावरच्या पिकल्या फळांच्या जमिनीवर पडताना होणाऱ्या आवाजाने लक्ष वेधून घेतले. जवळपास अर्धा डझनहून अधिक खारुताईंची टीम परसदारी आंबा, नारळ आणि उंबरावर फळं खायला कायम कार्यरत असते. निसर्ग नियमानुसार सकाळी त्यांचा खाण्याचा वेगही अधिक असतो. फळं खाताना बरीचशी जमिनीवरही पडतात. तेव्हा आवाज येतो. आता हे सवयीचं झालेलं. पण आजच्या आवाजाचा वेग कानाला अधिक जाणवला. म्हणून पाहिलं तेव्हा तांबटपक्ष्याचा जोडीनं दीपावली फराळ आनंद कार्यक्रम सुरु असल्याचं दिसलं. या जोडीला पाहाताच दुसरं काही सुचेचना. किल्यावरील मावळे चटकन स्थानापन्न करून आम्ही तांबटांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचा आनंद घेण्यास सज्ज झालो. त्या आनंदात काही फोटोही घेतले. मात्र दोघे तांबट स्वतंत्रपणे फलाहार करण्यात मग्न होते. दारातल्या उंबराला फळं धरू लागल्यावर तांबटाचं एकट्याने येणं आम्हाला नवीन नाही. तसे विविध पक्षी येत असतात. पण आजचं दीपावलीच्या, फटाक्यांच्या आवाजी वातावरणात सकाळी सकाळी यांचं जोडीनं येणं नाही म्हटलं तरी सुखद पर्यावरणीय अनुभूती प्रदान करणारं होतं.

गेली काही दशके वर्षे फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा, त्यांच्या अतितीव्र प्रकाशाचा पशुपक्ष्यांवर परिणाम होत असल्याचे आपण वाचतो आहोत. पक्ष्यांच्या स्थलांतरणाचाही हा काळ असल्याने अनेक स्वयंसेवी संस्था, पक्षीप्रेमी, अभ्यासक, संशोधक याबाबत समाजात सतत जागरुकता निर्माण करण्याचे काम करत असतात. दीपावलीतील रॉकेट्ससारख्या फटाक्यांमुळे पक्ष्यांची झाडावरील घरटी जळण्याचा धोका असतो. फटाक्याच्या आवाजाचा सर्वाधिक परिणाम चिमण्यांवर होत असल्याचंही वाचल्याचं आठवतं. तशी मलाही यंदा दीपावलीत परसदारी चिमणी दिसली नाही. गेल्यावर्षी देशातल्या काही शहरात फटाके फोडण्याचे, पर्यायाने पशुपक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदवले गेले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोडसारख्या पक्षी अभयारण्यात शेकडो कुटुंबे पशू आणि पक्ष्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत असल्याच्याचेही मागे वाचले होते. आमचे मात्र आजही दाट लोकवस्तीच्या शहरात फटाके वाजविणे सुरू आहे. लहानग्यांना समजावताना अडचणीचं होतं, पण मोठ्यांनी तरी हा मोह टाळायला हवा. फटाके उडविण्याची पद्धत हजारो वर्ष जुनी असली तरी वर्तमानात ती किती उपयोगात आणावयाची ? याचे तारतम्य प्रदूषित जगात आपण बाळगायला हवे. आमच्या बालपणी भुईचक्र, लवंगी फटाके, फुलबाजे, पाऊस, एखाद-दुसरा दादा बॉम्ब, एवढेच फटाके असायचे. आता त्यात खूप वाढ झाली आहे. नवनवीन प्रकार आलेत. पूर्वीची लवंगी फटाक्यांची छोटी माळ आता मोठया आकारात कित्येक मीटर लांब झाली आहे. दीपावलीसारख्या उत्सवी काळात या विषयावर सातत्याने चर्चा झडतात. रोजगाराचा सारासार विचार करून सरसकट फटाके बंदीला विरोधही केला जातो. फटाके बंदीमुळे चोरट्या विक्रीला बळ मिळू शकते असाही एक मतप्रवाह आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणावी असा काहींचा विचार असतो. काहीजण प्रदूषणविरहित फटाक्यांना प्राधान्य देण्याचा विचार मांडतात. तरीही काही गोष्टी आम्ही आपणहून समजून कमी करायला हव्यात.

तर आजच्या फटाक्यांच्या आवाजात, जमिनीवर कमी उतरणाऱ्या वृक्षवासी तांबटला सकाळच्या सूर्यप्रकाशात उंबराच्या झाडावर बसून फराळ करताना पाहाण्यात खूप मजा आली. त्या दोघांमधला एकजण तर आपल्या चोचीत उंबराच्या फळांचा नुसता बकाणा घेत होता. त्यांच्या आजच्या वावरात भिती दिसत नव्हती. त्यांना न्याहाळताना मला ज्येष्ठ साहित्यिक स्नेही प्रल्हाददादा जाधव यांनी लिहिलेल्या ‘तांबट’ पुस्तकाची आठवण झाली. दीपावलीच्या दिवसात निमशहरी भागात सकाळ संध्याकाळी फटाके वाजविण्याच्या मुहूर्तावर परसदारी शुकशुकाट असतो. यंदा कोरोनाकारणे, फटाक्यांचे आवाज काहीसे कमी झाल्याने पक्ष्यांची हालचाल जाणवत होती. प्रस्तुतचे तांबट पक्षी उभयता म्हणूनच चटकन उडून न जाता फराळ करीत बसले असावेत ! नंतर दुपारी, भोजनसमयी एक कोकीही उंबरावर येऊन विसावलेला. पण तो मला पाहून चटकन उडाला, बहुदा त्याला आज फराळात रस नसावा. सोमवारी, दीपावलीच्या पाचव्या दिवशीही सकाळी तांबट आलेला, पण एकट्याने ! आणि मला बघताच तोही उडून गेला. जाण्यापूर्वी मात्र त्यानं २/३ वेळा ‘कुटरुक् कुटरुक् कुटरुक्’ एकसुरी आवाज ऐकवून मला मोहवून टाकलं, प्रस्तुतचा मजकूर लिहायला प्रोत्साहन दिलं.

खरंतर उंबराच्या झाडाची दारात होणारी पानगळ, फळांची पडणारी रास यांना कितीही नाही म्हटलं तरी मी कंटाळलोय. शहरी वातावरणात, मर्यादित जागेत यांचं करायचं काय ? असं गेल्या दहा-बारा वर्षात अनेकदा वाटून गेलंय. एक-दोनदा उंबराच्या काही फांद्या तोडूनही झाल्यात. आत्ताही तोडायच्यात. पण सकाळ-दुपार-संध्याकाळी झाडावर बसलेलं पक्षीवैभव न्याहाळताना फांद्या छाटण्याचा विचार आपोआप गळून पडतो आहे. गेली २/३ वर्षे हे असंच चाललंय. यंदा तर पानगळीचा आणि फळांचा त्रासही वाढला. आगामी दिवसात काही फांद्या छाटण्याचे जवळपास निश्चित केले असताना तांबटाच्या जोड्याने ऐन दीपावलीत फलाहाराच्या (फराळ) निमित्ताने दिलेले हे दर्शन मला पुन्हा माझ्या विचारापासून परावृत्त करू पाहाते आहे.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

सोयरिक ‘वाचन’ संस्कृतीशी !

     

गोत्रांच्या रूपाने पूर्वजांची आठवण जपणारा भारतीय माणूस सकळ स्नेह्यांची सोयरिकही सांभाळतो. 'वसुधैव कुटुंबकम्' तत्त्व जगणाऱ्या भारतीय मनाच्या कप्प्यात सकळ सोयरिकतेचे ‘सगे’ पदर एकमेकांत खोलवर गुंफलेले पाहायला मिळतात. या गुंफलेल्या सोयरिकीच्या साक्षीने मनुष्याचं जगणं प्रगल्भ होत जातं. कुणाच्यातरी जाण्याने काहीतरी गमावल्याची जाणीव जेवढ्या तीव्रतेने होते, तेवढीच एखादी स्मृती उजेडात आल्यावर काहीतरी गवसल्याचीही होते. या सग्यांमध्ये नुसती माणसं नसतात. त्यात आपलं घर, परिसर, जैवविविधता, पशूपक्षी, बाग-बगीचा, फुलं-फळावळे, वाहने, गावच्या आठवणी, वाचलेली, संग्राह्य असलेली पुस्तके, संस्कृती, शाळा, बालपण आदि बरंच काही सामावलेलं असतं. सग्यांची ही सोयरिक जीवनात नवचैतन्य आणते. उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या जाण्याने, समाजाच्या उंचीकडची वैचारिक बाजू ढासळत असताना सकळ सोयरिकतेत मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या वाचन संस्कृतीचे ठाम असणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच सज्जन सोयरिक जपणाऱ्या या ‘वाचन’ संस्कृतीचे सगे पैलू उलगडू यात !

कोरोना लॉकडाऊन काळात, पुस्तकांची सोयरिक माणसांना प्रकर्षाने जाणवली. कधीही पुस्तकं न वाचणाऱ्यांनीही पन्नासेक पुस्तकं वाचल्याचं सोशल मिडीयावर जाहीर केलं. कोणी १९३० ते २०२० पर्यंतच्या कादंबऱ्या वाचल्या. कोणी सांप्रदायिक पुस्तक वाचली तर कोणी आणखी काहीतरी ! काहींना पैसा कमावण्याच्या नादात आपण जीवनातील आनंद हरवून बसल्याची जाणीव पुस्तक वाचनाने झाली. कोणाला संत तुकाराम महाराजांचं, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ या भावनेमागचं मर्म समजलं. सामान्य माणूस एका आयुष्यात एकच जीवन जगतो पण वाचन करणारा एका आयुष्यात अनेक जीवन जगत असल्याची जाणीवही काहींना झाली. हा सारा सोयरिकतेचा प्रभाव होय. पालकांनी मुलांसाठी अवांतर पुस्तके खरेदी करण्याचा सपाटा लावला. सोशल मिडीयाने वाचकांना अधिकाधिक सगेसोयरे मिळवून दिले. तेथे पुस्तकांवर चर्चा होऊ लागल्या. ज्यातून अनेकांना पुस्तकं अधिक समजायला मदत झाली. वाचनातून मनन, चिंतनाची प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी सुरु झालेला वाचन प्रेरणा दिन समजून घेताना सरकारी अनास्थेमुळे वाचन संस्कृती चळवळ थांबल्याचे अनेकांना जाणवले. वाचनसंस्कृती खेड्यापर्यंत रुजविण्याचे प्रयत्न करताना राज्यातील अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्यिक मूल्य असलेल्या पुस्तकांच्या विक्रीची दुकाने नाहीत, हे सत्य कोरोनाने सर्वांसमोर आणले. लोकांनी वाचलेल्या पुस्तकांच्या ढीगांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेले आपण पाहिले. त्या फोटोजना प्रतिसादही मिळाला. अशा वाचकांना कोणी, ‘आमच्या वाचनालयाला भेट द्या असं सुचवलं’, कोणी, ‘वेळेचा सदुपयोग केल्याचं कौतुक केलं’. कोणी त्यातली आवडलेल्या ४/५ पुस्तकांची नावंही विचारली. काहींनी अतिशय जगावेगळा छंद म्हणून कौतुक केलं. लॉकडाऊनमध्ये बहुसंख्य लोकांचा वेळ जात नसताना, वाचनाशी सोयरिक जोडलेल्यांना वेळ पुरत नव्हता. कोणीतरी हे पुरूषांना शक्य आहे म्हणालं. त्यावर आणखी कोणीतरी आवड असली तर सवड मिळते असंही सांगून मोकळं झालं. कोणीतरी वाचन प्रेरणा दिनाचं निमित्त साधून आपल्या आवडत्या पुस्तकांसाठी साठवलेल्या पैशातून कपाट खरेदी करून आला. what’s on your mind ? असं विचारणाऱ्या सोशल मिडीयावर मनातलं सगळं पोस्ट करता येत असल्याने हेही पोस्टीत आलेलं. मूळ पोस्टपेक्षा त्याला मिळालेला प्रतिसाद सोयरिकतेतील गहिरेपणा सांगणारा होता. पुस्तके आणि कपाट विकत घेण्यासाठी बचतीचा मार्ग अनेकांना भावला. कोणीतरी अशी ५० कपाट व्हावीत म्हणून शुभेच्छा दिल्या. माणूस वयाने बुजुर्ग होत जातो, पण ग्रंथ जागच्या जागी असतात. आपल्याला मनाने ताजातवाना ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून विशेष आवडलेली पुस्तकं विकत घेऊन संग्रहित करावी, हवी तेव्हा वाचता येतात. खरंतर एकच पुस्तक आपण वर्षांच्या अंतराने वाचले तरी आपली गृहीतके, आकलन आणि अनुभवानुसार त्यातले पैलू भावत जातात. विचारसरणी बदलणाऱ्या, समृद्ध जीवनानुभव देणाऱ्या वाचनाच्या सोयरिकतेचं मी अनुभवलेलं गम्यही अफलातून आहे.

लहानपणी माझ्यानं शालेय पुस्तकं वाचून होत नव्हती. अवांतर वाचन लांब राहिलं. पण घरात ग्रंथसोबत होती. एखाद्या भाषाशास्त्राच्या अभ्यासकाच्या घरी शोभावं असं ग्रंथस्नेही वातावरण नांदत होतं. आजही नांदतंय ! तेव्हा मला वह्यांची उरलेली कोरी पाने फाडून दाभणाने शिवून वापरायला मजा वाटायची. त्या ‘कच्च्या’ वहीत मनातलं ‘पक्क’ व्यक्त होता यायचं. माझं अक्षर तुलनेनं मोठ्ठं ! पण कच्ची वही संपू नये म्हणून, बारीक अक्षर काढून लिहायची सवय लागलेली. ज्याची बघून लागलेली तो मात्र वही लवकर संपते म्हणून बारीक अक्षर काढायचा. हे मला कळेस्तोवर शाळा सुटली होती. अर्थात माझ्याही घरी काही वह्यांचं दुकान वगैरे नव्हतं. पण आपल्यासारखं मुलांच्या शिक्षणाचं आबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी, शक्य तेवढी काळजी घेतलेली. वडिलांनी घरात आणलेल्या नव्या पुस्तकांना उघडून त्याचा वास नाकातोंडात भरून घ्यायला मला आवडायचं. पुस्तक विकत घेऊन वाचण्यातला वडिलांचा आनंद समजत नव्हता तेव्हा. आपणही अशीच पुस्तकं विकत घेऊन वाचायची असंही मनात आलं नव्हतं. घरातल्या धार्मिक वातावरणात, श्रावणातील ग्रंथवाचन परंपरेची लागलेली ओढ वगळता बारावी होईपर्यंत, सांगण्यासारखं विशेष नसलेला मी यथा-तथा विद्यार्थी होतो. दहावीपर्यंतचं शिक्षण, वडील शिक्षक असलेल्या शाळेत कमालीच्या धाकात पार पडलेले. पुढे बारावीला तो धाक संपला आणि आम्हांला शिंग फुटली. त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर झाला. लहानपणापासून स्थापत्य शाखेची आवड म्हणून रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनात प्रवेश घेतला आणि त्याचवर्षी, १९९७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या झालेल्या दुसऱ्या प्रतिभासंगम युवा साहित्य संमेलनात मी ओढला गेलो. मला आपल्याकडे ओढण्याचे काम भिंतीवरल्या एका पोस्टरने केलेलं. तेव्हा मला चरित्र-आत्मचरित्र वाचनाची गोडी लागलेली. लोकांचे भन्नाट अनुभव वाचताना आपण जणू तेच आयुष्य जगतोय असा भास व्हायचा. अ.भा.वि.प. कार्यकर्ता म्हणून जरी मी त्या संमेलनात सहभागी झालो असलो तरी संमेलन कार्यक्रमात कानावर पडलेल्या साहित्य चर्चांनी माझ्यात चरित्रवाचनाने जागृत केलेल्या भासाला वर्तमानात आणायला सुरुवात केली. लिहिणं सुरु झालं. शब्दांशी सोयरिक जडली. स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होऊ लागलेल्या स्फुटलेखांची गरज म्हणून फिरणं आणि संदर्भ शोधणं सुरु झालं. शिक्षण संपल्यावर लिहिलेलं छापून येणं अवघड बनताच पत्रकारितेकडे मोर्चा वळवला. वाचन आणि लेखन होत राहिलं. यातलं ठरवून असं काहीही घडलं नाही. जेजे जसंजसं समोर येत गेलं तेते मी स्वीकारत गेलो. नंतर केव्हातरी, ‘वाचण हे पेरणं असतं आणि लिहिणं हे उगवणं म्हणून पेरत चलूयात ! कधीतरी ते उगवेलच !’ हे ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांचं वाक्य ऐकलं आणि ‘मी इथवर कसा आलो ?’ याचं कोडं उलगडलं. अर्थात या साऱ्याच्या मुळाशी घरचं, वडिलांचं प्राथमिक मार्गदर्शन होतंच ! ‘आपल्याला लिहिण्यासाठी आवश्यक संदर्भ आपल्या संग्रही असायला हवेत’, ही वडिलांची सूचना मनावर घेतल्याने स्वतःचा ग्रंथसंग्रह जमा होऊ लागला. कालांतराने याच सूचना चिपळूणला कोकणची सांस्कृतिक राजधानी बनविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वर्गीय नानासाहेब जोशी आणि प्रकाशकाका देशपांडे या ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून ग्रहण करायला मिळाल्या. संदर्भ तपासून लेखन करण्याच्या पद्धतीमुळे कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे आमच्याकडे लक्ष गेले. त्यांच्याच सूचनेनुसार वाचन संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या वस्तूसंग्रहालय संकल्पाने मेंदूत शिरकाव केला. त्याला आता काही वर्षे झालीत. संग्रहालयांसह पुस्तकांच्या आणि रद्दीच्या दुकानात सर्वाधिक रमणाऱ्या मला, चाळीशी पार केल्यावर माझ्या ‘परमचिंतन’ अभ्यासिकेत तिथल्या संदर्भीय सोयऱ्यांसोबत वावरताना जो आनंद मिळतो तो शब्दात पकडणे कठीण आहे.

मला वाटतं, माणूस बिन चेहऱ्याचा जन्माला येतो. त्याचा दिसणारा चेहरा हा अवयव असतो. अशा माणसाला आत्मविश्वासाने व्यक्त होणाऱ्या चेहऱ्याची गरज असते. पुस्तकं माणसाची ती गरज पूर्ण करतात, व्यक्त व्हायला शिकवतात. लेखकही व्यक्त होण्यासाठीच लिहितात. जो व्यक्तच होत नाही, तो माणूस कसला ? ‘पुरुष ते महापुरुष’ घडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला पुस्तकं भेटतात. म्हणून ‘वाचन हेचि सकळ सोयरे आमुचे’ असं म्हणावसं वाटतं. जिकडेतिकडे पुतळे उभारण्यात आपली सोयरिक कामी येत असल्याचे आपण पाहातो. पण पुतळ्यांच्या विचारांचा विचार काही मनात रुजत नाही. कारण वाचन संस्कृती नाही. म्हणून आजचे पुतळे पत्ता सांगण्यापुरते राहिलेत. देशाच्या गल्लोगल्लीत विचारवंतांचे पुतळे असताना तिथे वैचारिक दारिद्र्य का पाहायला मिळतं ? वाचन संस्कृतीशी असलेला सोयरिकतेचा अभाव हेच त्यामागचं कारण आहे. पुस्तकं आजच्या भपकेबाज दृश्य माध्यमांइतकी परिणामकारक नसली तरी विश्वासार्ह नक्की असतात. अर्थात सोयरिक कोणाबरोबर करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाचनाशी सोयरिक करण्याचे फक्त फायदेच आहेत, तोटे नाहीत. माणूस जीवनात व्यवहार्य वावरतो. फायदे-तोटे पाहून निर्णय घेतो. मग वाचनाशी सोयरिक करायला काय हरकत आहे ? आयुष्याचं जगणं समृद्ध होण्यासाठी माणसं, वाचनाचं वातावरण, जीवनपद्धती अवतीभवती असावं लागतं. यातून माणूस, ‘कसं जगावं ?’ हे नकळत शिकत जातो. शब्दांशी केलेली सोयरिक आजूबाजूच्या परिस्थितीचं वाचन करायला शिकविते. आपली सततची भूक ही चांगलं काम करण्याची असावी घाईघाईने व्यक्त होण्याची नसावी हे जाणवत राहातं. ‘मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते न सांगितल्यामुळे मला झोप लागत नाही आहे’, असं आपल्याबाबत जेव्हा होतं तेव्हा दर्जेदार कलाकृती जन्माला येते. याचं भान पुस्तकं आपल्याला देतात. या वाचनानंदाच्या वाटेवर पहिल्यांदा वाचकाला पुस्तकाचा शोध लागतो. नंतर माणूस त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. आपल्या बोलण्यात त्यातले संदर्भ द्यायला लागतो.  नंतर नंतर तर जीवनात माणसांना पर्याय म्हणून पुस्तकं उभं राहातं आणि सोयरिक जन्माला येते. ही सोयरिक नसानसांत भिनत जाते. त्यातून वाचकाला पुस्तकाचा पुनर्शोध लागतो. शेवटी वाचक आपल्याजवळ उत्तमोत्तम पुस्तकांची समृद्ध संपत्ती तयार करतो. आयुष्याच्या शेवटी, हा वाचक आपल्याकडील ज्ञानाचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपुर्द करता होतो. या साऱ्या प्रक्रियेतून जाणारा वाचक हा उत्तम सोयरिकतेचा प्रवास अनुभवत असतो, या बाबतीत मीही नशीबवान आहे.

सध्याच्या सोशल मिडीयाच्या काळात दूरचित्रवाणीसह करमणूकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरीही त्यातून वरवरची करमणूक होत असल्याचा फील अनेकांना आला असेल, मला येतो. पण वाचन करताना आपण एका वेगळ्या वातावरणात, विश्वात रममाण होत असतो. पुस्तकातील मजकूर मनातून मेंदूकडे सरकताना समाधान देऊन जातो. ‘वीकएन्ड’ला निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करणाऱ्यांना आनंद तर मिळतो पण त्याच निसर्गरम्य ठिकाणाच्या बारकाव्यांचे अफलातून वर्णन असलेलं एखादं पुस्तकं हाती पडलं तर प्रत्यक्ष स्थळी न जाताही तिथल्या निसर्गाचा गारवा अनुभवता येतो. केवळ मनोरंजन म्हणून पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांना नंतर त्यातले तत्वज्ञान खुणावते. लिहिणाऱ्यांची विद्वत्ता पाहून ही माणसं तपस्वी असल्याबाबत श्रद्धाही निर्माण होते. आपल्या मनाचा उत्तम व्यायाम सुरु होतो. हे सारं लक्षात आलेल्या माणसांकडून आज बड्या शहरात ‘ग्रंथ तुमच्या दारी / पुस्तकपेटी’ उपक्रमांना प्रतिसाद मिळताना दिसतो. वृद्धापकाळाकडे झुकलेली माणसं पुस्तकांच्या सोबतीनं छान आयुष्य जगताना दिसतात. त्यांनी उमेदीच्या काळातही सकस वाचनाची आवड जोपासलेली असते. म्हणून उतारवयात देवदर्शन करू म्हणत आयुष्य घालविल्यावर शेवटी देवदर्शन करताना दुखणारे गुडघे अशांकडे नसतात, असतो तो केवळ जीवनानंद ! आणि खऱ्या सोयऱ्याचे हेच प्रामाणिक लक्षण आहे ना ! 

गुगलने माहितीच्या क्षेत्रात जी क्रांती केली आहे त्याने माणसांना अपंग बनवले आहे. त्यामुळे तात्पुरते, कामचलाऊ जगणे वाढीस लागून संदर्भ, अवांतर वाचन, सखोल ज्ञान मिळवण्याची जिद्द संपुष्टात येऊ लागली आहे. सुपरफास्ट स्पीडच्या जगात सारे धावताहेत. धावण्याच्या या शर्यतीत आयुष्याची, जगण्याची उमेद संपतेय. माणसाला यशाचा आनंद उपभोगायलाही वेळ नाही. पुढे जेव्हा तो मिळेल तेव्हा शरीर साथ देत नसेल. अशात ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद आणि मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाची आवड वरदान असून त्यासाठी वाचनालयाचे सभासदत्त्व घेणे ही पहिली पायरी ठरावी. मानवी इतिहासात अक्षरवाङ्मय निर्मिती सुरु झाल्यापासून आजवर लाखो लोकांनी शेकडो वर्षे त्याचे अनुकरण केले आहे. तरीही माणसाची आजची स्थिती आपल्याला काय दर्शविते ? याचा विचार केल्यास बालपणी आनंद देणारे वाचन तरुणपणी  चारित्र्याचे  रक्षण तर वृद्धपणी दुःख दूर करते. चांगल्या ग्रंथांची सोयरिक नेहमीच हितकारक ठरते.

वाचन संस्कृतीशी आपली सोयरिक इतकी महत्त्वाची असताना त्याकडे दुर्लक्ष का होतंय ? ज्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा राजव्यवहार कोष तयार केला, त्या महाराष्ट्रात भाषिक समृद्धीसाठी काम करणाऱ्या संस्था भाषातज्ज्ञांना भरकटलेल्या का वाटतात ? सरकार त्यांचे का ऐकत नाही ? समर्थ आणि सक्षम तरुण माणसांना कामाची संधी का मिळत नाही ? भाषेच्या शिक्षणाचा अभाव का होतो आहे ? मराठी विद्यापीठाची मागणी पूर्ण का होत नाही ? इंग्रजी ही भाषा नसून ती एक संस्कृती आहे, हे आजही आमच्यातल्या बहुसंख्य माणसांना का कळलेले नाही ? वाचनाशी सोयरिक वाढविण्याच्या टप्प्यावर असे अनेक प्रश्न उभे राहतात. आपली विचार करण्याची भाषा ही मातृभाषा आहे. पण आपण तिला विकासाची आणि रोजगाराची भाषा बनवू शकलेलो नाही. आजही वर्तमानपत्र न वाचणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे माणसांना दर्जेदार जीवन जगणं जमेनासं झालंय. पूर्वी गावोगावचा माणूस छापलेलं तर वाचायचाच पण तो निसर्ग, जंगलं, पशुपक्षी, प्राणी, नदी हेही वाचायचा. तो माणूस ग्रंथांशी निगडीत होता. आता तोही वेग मंदावलाय. सोशल मिडीयावर तयार सामग्री खूप आहे अन् उपयोग करणारे अत्यल्प ! आज आधुनिकता माणसांना सभ्यता वाटते आहे.  मूळ संस्कृतीपासून तुटल्याने माणसाने रेडीमेड संस्कृती अंगिकारायला सुरुवात केली आहे. ग्रंथांपर्यंत वाचक पोहोचायला हवा म्हणून आम्ही काय करतो ? हा प्रश्न आहे. ग्रंथालयातला माणूस ग्रंथशत्रू होण्याऐवजी ग्रंथस्नेही जाणवायला हवा. तर माणसांची ग्रंथांशी सोयरिक वाढेल.

माणसाला प्रस्थापित व्यवस्थेत आपली जागा बनविताना जेव्हा ही व्यवस्था आपल्याला नकळत संपवत असल्याची भिती वाटते तेव्हा वाचनानंदासारखा सोयराच मदतीला धावतो. मळलेल्या त्याच त्या वाटांवरून चालण्याऐवजी स्वतःची वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्यांचा सुरुवातीला सार्‍या जगावर अफाट विश्वास असतो. हळूहळू जसजसे अनुभव येत जातात तसतसा या विश्वासाला सुरुंग लागतो. इथेही वाचनाने आलेली प्रगल्भताच माणसाला सांभाळते. कार्य कोणत्याही क्षेत्रातील असुदेत, ते वाढायला लागले की त्याला समाजमान्यता मिळू लागते. तसे अनेकजण सहकार्यासाठी पुढे सरसावतात. ते शक्य झालं नाही तर दूर होतात, प्रसंगी स्पर्धक बनतात. वापर करू पाहातात. विश्वासघात करतात. तेव्हा खचायला, एकटं पडायला होतं. जगण्यातली गंमत संपू लागते. तेव्हा नव्याने हरिओम करण्यासाठीची मानसिक तयारी करण्याचं काम ग्रंथ करतात. सगेसोयरे तरी अशाप्रसंगी वेगळं काय करतात ? मग या ‘वाचन’ नावाच्या संस्कारक्षम सोयऱ्याचं हे आपल्यावरील ऋण आपण कसं फेडणार ? कृतज्ञता व्यक्त करणं सोपं असतं. पण तेवढ्यानं समाधान होत नाही. म्हणून, जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून सोडावे । सकळ जन ।।‘ ही समर्थ रामदासांची शिकवण जगत संपर्कात येणाऱ्या नव्या पिढीशी, ‘वाचनसंस्कृतीशी सोयरिक घडवून आणण्याचा संकल्प या दीपावलीपासून करू यात !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(प्रसिद्धी : दैनिक सागर दिवाळी पाडवा विशेष 'सोयरे सकळ' टॅॅब्युलर पुरवणी २०२०)

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...