शनिवार, ५ मार्च, २०२२

पूज्य भाऊ सहस्रबुद्धे : दत्त संप्रदायी सत्पुरुष

               प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज (श्रीक्षेत्र माणगाव) यांचे शिष्य, पूज्य श्री. बाळकृष्ण काशीनाथ उर्फ भाऊ सहस्रबुद्धे म्हणजे आपल्या अफाट तप सामर्थ्यातून सिद्ध झालेले एक अलौकिक दैवी व्यक्तिमत्त्व आहे. पूज्य भाऊ हे असंख्य शिष्यगणांच्या जीवनातील दीपस्तंभ आहेत. भाऊंचा मार्गदर्शन शब्द म्हणजे शिष्यांच्या मनात चैतन्य निर्माण करणारा अमृतकुंभ आहे. कोकणातल्या कुंब्रल (दोडामार्ग) गावी काहीतरी वेगळे घडावे, वेगळे उगवावे आणि या मातीचा गंध अध्यात्मिक क्षेत्रात सर्वत्र पसरवा असा जणू परमेश्वरी संकेत असल्यासारखे पूज्य भाऊ आपल्या संपूर्ण जीवनात वावरले आहेत. भाऊंचे गुरु पूज्य टेंब्येस्वामी महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगावी झाला होता. टेंब्येस्वामी महाराजांनी २४ जुलै १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदेला श्रीनर्मदा मातेच्या कुशीत गरुडेश्वर (गुजरात) येथे समाधी घेतली होती. यानंतर जवळपास २६ वर्षांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १४ फेब्रुवारी १९४० रोजी जन्मलेल्या आणि मानवी मनात आयुष्यभर दत्त संप्रदायी सत्पुरुष म्हणून स्थान निर्माण करणाऱ्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या तपस्वी जीवनाचा हा मागोवा.

अनादि काळापासून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची हजारो वर्षांची सलग परंपरा लाभलेला महाराष्ट्रासारखा भूप्रदेश जगाच्या पाठीवर क्वचित कुठे सापडेल. साऱ्या संतांनी मानवी समुदायाला ईश्वरभक्ती शिकवत उदात्तपणे जीवन जगण्याचे तत्वज्ञानही शिकवले आहे. पूज्य भाऊंकडे पाहिल्यावरही हेच जाणवते. कष्टाळू, अभ्यासू, व्यासंगी भाऊंचं मार्गदर्शन हे नेहमीच त्यांचा आवाजातील प्रेमळपणा, कारुण्य, मार्दवता आणि विषयातील प्रभुत्व यांमुळे प्रभावी ठरलेले आहे. आयुष्यात माणसाला कितीही वैभव प्राप्त झालं तरीही पूर्ण समाधान लाभतंच असं नाही. म्हणून तर ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ असं समर्थ रामदासांनी तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीही ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ म्हटलंय ते काही उगीच नव्हे. मानवातील विवेक काहीवेळा अडचणीच्या काळात ढळत असतो. अशावेळी त्याला देहरूपी गुरूंची खऱ्या अर्थाने गरज असते. आपल्या संपर्कात आलेल्या अगणितांची ही गरज भाऊंनी पूर्णत्वास नेलेली आहे. आकर्षक गौरवर्ण, नाकाने सरळ, तेजस्वी डोळे, कपाळावरील अष्टगंधाचा टिळा, साधा आणि स्वच्छ पोशाख, सदा हसतमुख चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले विलक्षण तेज आदींच्या समुच्चायातून साकारलेल्या पूज्य भाऊंरुपी सत्पुरुषाचे दर्शन-मार्गदर्शन अध्यात्मिक आनंदाचे अधिष्ठान आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ‘सहस्रबुद्धे’ घराण्याचे मूळ गाव आहे. कोतवडे हे रत्नागिरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. मूळची गणपुलेअसलेली आणि कालांतराने चतुरस्र बुद्धी, व्यवहार कुशलता, बाणेदारपणा या अंगभूत गुणांमुळे ही मंडळी बुद्धी सहस्त्रेषुअर्थात सहस्रबुद्धे नावाने प्रसिद्ध झाली असावीत असे म्हटले जाते. कोतवडे गावात पेशव्यांच्या उत्कर्षाच्या काळात बांधलेले ‘सहस्रबुद्धे’ घराण्याशी संबंधित स्वयंभू जागृत श्रीदेव धामणेश्वराचे भव्य मंदिर आहे. हे बिनखांबी मंदिर पायापासून घुमटापर्यंत जांभ्या रंगाच्या विशाल चिऱ्याचे एकावर एक थर रचून बांधले आहे. अहमदनगर मधील प्रसिद्ध संत आणि शिर्डीच्या श्रीसाई संस्थानचे पहिले अध्यक्ष श्रीदासगणू महाराज (गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे ; ६ जानेवारी १८६८ ते २६ नोव्हेंबर १९६२) यांचेही मूळगाव कोतवडे होते. प्रस्तुत लेखात आपण ज्यांच्याविषयीची मांडणी करतो आहोत त्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या घराण्याचे कोतवडे येथून विस्थापित झालेले मूळ पुरुष गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील ‘वेळगे’ गावी स्थिरावले होते. ‘वेळगे’ येथे याच सहस्रबुद्धेंपैकी ‘अनंत’ नामक व्यक्तीला तीन अपत्ये झाली. काशीनाथ हे त्यापैकी एक अपत्य होत. पुढे काशीनाथ यांना भालचंद्र नावाचे अपत्य झाले. भालचंद्र हे १९०७ दरम्यान वेळगे गावातून महाराष्ट्र-गोवा हद्दीवरील कुंब्रल (दोडामार्ग) या जैवविविधतेने संपन्न अशा गावात स्थायिक झाले. कुंब्रल मुक्कामी भालचंद्र यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. यातील मुलगा काशीनाथ हे पूज्य भाऊ यांचे वडील होत. काशीनाथ यांना सामाजिक कार्याची आवड होती. काशीनाथ यांना एकूण आठ अपत्ये झाली. भाऊ हे दुसरे अपत्य होय. पूज्य भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग सहस्रबुद्धे हे शिक्षक-साहित्यिक होते. शिक्षकी पेशात इमानेईतबारे सेवा बजावून निवृत्तीनंतर त्यांनी काहीशा उशीरा कथालेखनाला प्रारंभ केला होता. त्यांच्या कथांमध्ये आपल्याला दक्षिण कोकणी लोकजीवनातील सरळपणा, मिश्किलपणा, गांभीर्य, विनोद आणि वातावरणातील गूढता भेटते. त्यांच्या ‘अबोध’ कथासंग्रहाला प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी प्रस्तावना लिहिली होती.

पूज्य भाऊंच्या आणि त्यांच्या भावंडांच्या प्राथमिक शिक्षणाकरिता वडील काशीनाथ यांनी आपल्या राहात्या घरी दोन शालेय शिक्षक (पंतोजी) नेमले होते. कुंब्रल भागात शाळा नसल्याने काशीनाथ यांनी कालांतराने रत्नागिरीपर्यंत पायपीट करून आपल्या घराच्या आवारात गावातील वीस विद्यार्थ्यांच्या कल्याणार्थ शाळेची परवानगीही मिळवली होती. पहिल्या दिवसापासून पूज्य भाऊंना लागलेली शिक्षणातील गोडी बालवयात एकदम दुसरीच्या वर्गात प्रवेश करू देण्यास उपयोगी पडली होती. भाऊंचे बालपण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेत होते. आजोबा भालचंद्र यांचेही मार्गदर्शन भाऊंना लाभत होते. वयाच्या आठव्या वर्षी भाऊंची मुंज (उपनयन संस्कार) करण्यात आली. मुंजीचा ठरलेला कार्यक्रम काशीनाथ यांना अचानकच्या अडचणीस्तव महिनाभर लांबवावा लागला होता. महिन्याभरानंतर मात्र काशीनाथ यांनी भाऊंच्या मुंजीचा केलेला कार्यक्रम त्या काळात कुंब्रल पंचक्रोशीत आगळावेगळा ठरला होता. या कार्यक्रमात पूज्य भाऊंना पहिल्यांदा गायत्री मंत्राचा उपदेश झाला होता. भाऊंच्या मुंजीनंतर आई जानकी यांनी भाऊंच्या मनात दीक्षेद्वारे श्रीरामसेवेची आवड निर्माण केली होती. त्या अर्थाने आई जानकी या पूज्य भाऊंच्या पहिल्या गुरु होत. आईंच्या मार्गदर्शनाने पूज्य भाऊंची श्रीरामसेवा सुरु झाली. श्रीरामसेवा परिणामस्वरूप भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात असलेली किंचितशी चंचलवृत्ती कायमची बदलली.

ग्रंथ वाचनाची आवड अधिक वाढल्यानंतर एके दिवशी भाऊंनी आपल्या घरातील श्रीगुरुचरित्र ग्रंथाची पोथी वाचनासाठी उघडली. या पोथीत भाऊंना त्या बालवयातील इवलाश्या तळहातावर मावेल इतका छोटासा एक फोटो मिळाला. हा फोटो पाहताच क्षणी भाऊंना फोटोतील व्यक्तीविषयी चमत्कारिक आकर्षण निर्माण झालं होतं. या आकर्षणाचा परिणाम इतका वाढला की, ‘हेच माझे गुरु आहेत’ असे शब्द भाऊंच्या तोंडून आपल्या बाहेर पडले होते. तेव्हा भाऊंचे आजोबा भालचंद्र हे शेजारीच बसले होते. भाऊंच्या तोंडचे हे वाक्य ऐकून आजोबा भालचंद्र यांनाही अचंबा वाटला. त्यांनी तातडीने भाऊंच्या जवळ येऊन पोथीत सापडलेला फोटो पाहिला तर तो फोटो श्रीक्षेत्र माणगावच्या प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा होता. आजोबांनी हा फोटो कोणाचा आहे हे ओळखल्यावर भाऊंना आणखी आनंद झाला. त्यांनी लगेच ‘मी त्यांना पाहाण्यास आतुर आहे. मला तेथे जावयाचे आहे.’ असे आजोबांना सांगितले होते. आजोबांनी टेंब्येस्वामी महाराजांनी समाधी घेतली असून ते हयात नसल्याचे सांगितले. बालवयातील भाऊंसाठी हा मोठा धक्का होता. त्याही वयात भाऊ क्षणभर स्तब्ध झाले होते. भाऊंच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि निराशेचे भाव पसरले होते. पण आंतरिक तळमळ भाऊंना शांत बसू देत नव्हती. भाऊ शेवटी आजोबांना पुन्हा म्हणाले, ‘ते नसले तरी मला त्यांची जन्मभूमी पाहायची आहे. दत्तदर्शन घ्यायचे आहे.’ भाऊंची ही अनामिक ओढ आजोबांना लक्षात न आली तर नवल ! आजोबांनी तातडीने आपल्या एका खात्रीच्या माणसासोबत भाऊंना श्रीक्षेत्र माणगाव येथे पाठवले. या पहिल्याच भेटीत भाऊंना प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा गुप्तरितीने उपदेश झाला. महाराजांच्या झालेल्या याच उपदेशावर नितांत श्रद्धा ठेवून पूज्य भाऊंनी आपले जीवनव्रत आरंभिले.

भाऊंना लौकिकार्थाने दोन गुरु मिळाले. गुरूंच्या उपदेशस्वरूप जीवनव्रत आरंभिल्याने भाऊंमध्ये ज्ञानवृद्धी होऊ लागली होती. भाऊंकडून वेगवेगळ्या देवतांच्या सेवा घडू लागल्या होत्या. वैदिक, पुराणोक्त मंत्रांचा अभ्यास, धार्मिक शिक्षण, दैनंदिन संध्या आणि पूजाअर्चा यांचे घरच्या घरी दोन वर्षे अध्यात्मिक बैठक असलेल्या गुरुजींकडून मार्गदर्शन मिळत होते. बालवयात स्वतःला संस्कारक्षम शिक्षण मिळाले नसल्याची सतत जाणवणारी उणीव वडील काशीनाथ यांनी आपल्या मुलांच्या जीवनात राहाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. १९५२-५३ सालचे दरम्यान सावंतवाडी परीक्षा केंद्रावर पूज्य भाऊ इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी भाऊंना सावंतवाडी किंवा बांदा येथे जावे लागणार होते. आपल्या भागात सातवीच्या पुढील शाळा असायला हवी हा विचार काशीनाथ यांच्या मनात कित्येक वर्षे सुरूच होता. त्यावर्षी काशीनाथ यांनी जवळच्या कोलझरला शाळा सुरु केली. भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग हे या शाळेवरचे पहिले शिक्षक होते. अवघ्या आठ मुलांना घेऊन ही शाळा सुरु झाली होती. आज या शाळेचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. ही शाळा आज भाऊंचे वडील काशीनाथ यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेची साक्ष देत आहे. याच शाळेत भाऊंचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. मात्र या पुस्तकी ज्ञानाने आपल्याला नोकरी व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर जावे लागेल, प्रसंगी सरकारी नोकरी पत्करावी लागेल वगैरे विचार पचनी न पडल्याने भाऊंनी दहावीची परीक्षा देणे टाळले. भाऊंनी संस्कृतचा विशेष अभ्यास सुरु केला. पोटापाण्यासाठी घरातील शेती व्यवसाय आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दैनंदिन तपश्चर्या व साधनेत विशेष काळ घालविण्यास सुरुवात केली. वयाच्या १८व्या वर्षापासून भाऊंकडून पीडितांच्या पीडापरिहार्थ सेवा घडू लागली. अध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने विविध अडचणीतील पीडितांना उपाय सुचविण्यास प्रारंभ झाला होता. भाऊंकडून पीडितांचा पीडापरिहार इतक्या सहजतेने घडू लागला की भाऊंकडे येणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. १९५९ साली वयाच्या विसाव्या वर्षी भाऊंना परांजपे नामक गुरुजी घरी येऊन वेदोक्त शिक्षणाचे मार्गदर्शन करीत राहिले होते. मंत्रसंहितांसह विविध संहितांचे अधिकचे ज्ञान भाऊंना याच काळात प्राप्त झाले होते.

हा तो काळ होता जेव्हा दक्षिण कोकणात गोवा राज्यबंदीचे वातावरण पसरले होते. स्थानबद्धतेचे वाँरट आलेले भाऊंचे गोव्यातील नातेवाईक सखाराम पांडुरंग बर्वे हे कुंब्रल मुक्कामी आले होते. ते चारेक वर्षे कुंब्रलला राहिले. आपल्या या वास्तव्यात बर्वे यांनीच भाऊंना संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाऊंनी हार्मोनियम, तबला आणि गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण केले. संगीत क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळावे म्हणून १९६३ साली भाऊ सावंतवाडी येथील जोशी यांच्याकडे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्याच्या उद्देशाने अधिकच्या शिक्षणासाठी दाखल झाले. या परीक्षेला बसलेले भाऊंसोबतचे काही विद्यार्थी सहजगत्या ही परीक्षा पास होऊ लागल्याने आणि परीक्षेचा अभ्यास खूपच हलका वाटू लागल्याने भाऊंनी ती परीक्षा देणे ‘मध्यमात’ ऐन परीक्षा केंद्रावर जाऊन टाळले. परीक्षकांकडून याबाबतची विचारणा होताच, ‘परीक्षा अभ्यासक्रमापेक्षा बिंदूमात्र जास्त माझा अभ्यास झालेला आहे’ असं उत्तर भाऊंनी दिलं होतं. परीक्षकांनी मग लेखी पेपरनंतर होणारी १५ मिनिटांची तोंडी परीक्षा भाऊंसाठी खासबाब म्हणून तब्बल ७५ मिनिटे घेतली होती. यावेळी भाऊंनी दिलेली उत्तरे ऐकून अवाक् झालेल्या परीक्षकांची भाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप तर मारलीच परंतु पुढील काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची संधीही भाऊंना दिली होती.

भाऊंनी यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी काही शास्त्रीय पुस्तके अभ्यासून वैयक्तिक साधनेद्वारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. तत्पूर्वी म्हणजे १९६१ पासूनच भाऊंचे अध्यात्म आणि ज्योतिष यांची सुयोग्य सांगड घालून येणाऱ्यांना घडणारे मार्गदर्शन खूपच प्रभावी ठरू लागले होते. समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीची पत्रिका बघितल्यावर पत्रिकेत ज्या ग्रहांची तक्रार दिसते आहे त्या ग्रहांच्या देवतांची भाऊंकडून दिली जाणारी उपासना सेवा श्रेष्ठ ठरू लागली होती. लोकांना आपापल्या घरी बसून सहज करता येण्यासारखी उपाययोजना अनेकांना आपल्या समस्यांवर मात करण्याचे बळ देत होती. भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढत होती. भाऊंना वैयक्तिक अध्यात्मिक साधनेला वेळ अपुरा पडू लागला होता. म्हणून १९६९ मध्ये भाऊंनी आपला मुक्काम गोव्यातील ‘वेळगे’ या मूळगावी हलविला. १९७३ पर्यंत तिथेही भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढली. शेवटी भाऊ पुन्हा कुंब्रलला परतले. मात्र यावेळी घरी न थांबता भाऊ कोलझर येथील श्रीहनुमान मंदिरात वास्तव्याला आले. भाऊंनी आपली अध्यात्मिक सेवासाधना सुरु केली. कुटुंबापासून दूर राहून तपश्चर्या पूर्ण करण्यास आणि लोककल्याणार्थ भाऊंना पुरेसा वेळ मिळू लागला. जवळपास एक तपाहून अधिककाळ १९८६ पर्यंत भाऊंना श्रीहनुमंताच्या चरणी सेवेत राहून आपली विशेष तपश्चर्या रुजू करता आली. याकाळात भाऊंनी अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संत, सज्जनांची दर्शने आणि तीर्थक्षेत्री तीर्थाटने केली. तपश्चर्या फलित म्हणून शेकडो लोकांना अडचणीतून मोकळे होता यावे म्हणून भाऊंनी रामरक्षा, श्रीहनुमानस्तोत्र, श्रीव्यंकटेशस्तोत्र यांसह भगवान हनुमंताशी बोलणे करून आपल्याकडून प्रत्येक व्यक्तीला दिला जाणारा शब्द सत्कारणी लागेल याची काळजी घेतली. याच हनुमान मंदिरात भाऊंच्या अध्यात्मिक जीवनाला विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. पुढे पुढे भाऊंना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या इतकी वाढली की मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. दरम्यान ‘ज्याचे तोंडून श्रीराम हा शब्दही म्हटला जात नाही अशांना तू संकटमुक्त करून आम्हास अडचणी आणत आहेस. हे तू बंद कर. येणाऱ्यांना सेवा दे. ती हनुमंताकडून रुजू करून नंतरच शब्द दे.’ असा सूचनावजा आदेश भाऊंना सद्गुरुंकडून प्राप्त झाला. तेव्हापासून भाऊंनी लोकांना मार्गदर्शन करण्याची गणिते बदलली. तेव्हापासून आजतागायत पूज्य भाऊंनी भेटीस आणि मार्गदर्शनास येणाऱ्या प्रत्येकास प्रथम ग्रंथवाचन, जपरुपी सेवा देऊन नंतरच त्याच्या समस्येसंदर्भात अंतिम शब्द दिल्याचे अनेकांना ज्ञात आहे. पूज्य भाऊंनी सद्गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून श्रीरामदासस्वामी यांच्या त्रयोदशाक्षरी ‘श्रीराम जयराम जयजयराम’ या मंत्राप्रमाणे श्रीहनुमंतांच्या प्रेरणेने ‘जय जय जय श्री जय हनुमान’ हा मंत्र सिद्ध केला. विविध पीडा निवारण, लग्नकार्यादी अडचणी, नोकरी प्राप्तीतील समस्या, आदी कामांकरिता या मंत्राचा अनेकांना फलप्राप्त्यर्थ उपयोग झाला आहे.

आजन्म ब्रम्हचर्यपालन करत अध्यात्माकडे वळलेले पूज्य भाऊ हे आई जानकी यांच्या आज्ञेने १९८६ साली कुंब्रलला घरी परतले. आपलं घर, कुटुंब, शेती आणि संसार यात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. कुटुंबातील लग्नकार्ये, मुंज आदींत भाऊंनी लक्ष घातलं. कुटुंबातील वडिलोपार्जित भूखंडांची विभागणी, नव्याने घरबांधणी, घरी येणाऱ्यांना नियमित मार्गदर्शन सेवा सुरु केली. विशेष म्हणजे या काळात कालसर्पदोष शांतीसारख्या विविध धार्मिक मुद्द्यांवर छोटे छोटे उपाय सुचवून संत्रस्त लोकांना गुण प्राप्त करून दिला. काही हजार लोकांना रामरक्षा म्हणावयास सांगून त्याद्वारे लग्न आणि नोकरी यासारख्या प्रश्नांची उकल मिळणे, श्रीगणपती सहस्रआवर्तनातून नोकरीची उपलब्धी, श्रीशिवमंत्र आणि शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाच्या वाचनातून रोगमुक्ती तसेच पिढीजात दोष निवारणार्थ ६ किंवा १० अक्षरी प्रभावी मंत्राचा उपयोग करून लोकांना संकटमुक्त होण्यासाठी पूज्य भाऊ सहाय्यभूत ठरल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

२०११ सालच्या प्रारंभी पहिल्यांदा आम्ही एका अचानक योगावर पूज्य भाऊंच्या कुंब्रलमधील निवासस्थानी पोहोचलो होतो. या पहिल्या भेटीत आमचं भाऊंचे ज्येष्ठ बंधू पत्रकार आणि कथाकार स्वर्गीय पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्याशी अधिक बोलणं झालेलं. त्यानंतरच्या जवळपास भेटीत आमच्या पूज्य भाऊ आणि पांडुरंग सहस्रबुद्धे सरांसोबत, शेणाने सारवलेल्या सुगंधित अंगणात कोकणी पद्धतीने शाकारणी केलेल्या मांडवाच्या सावलीत तासनतास रंगलेल्या गप्पा आठवतात. विशेष म्हणजे पूज्य भाऊ आणि सहस्रबुद्धे सरांसोबत स्वतंत्र संवाद व्हायचा. कधी कधी कुंब्रलला नुकत्याच सारवलेल्या अंगणातही आमचं आगमन व्हायचं तेव्हा त्या ओलेथर सारवणावर काढलेली ती छोटीशी पांढरी रांगोळी भारतीय संस्कृतीचं अलभ्य दर्शन घडवायची. पूज्य भाऊंच्या उपस्थितीतील तिथल्या वातावरणात अनामिक आनंदाची दुर्मीळ अनुभूती मिळायची. आमच्या २०११ सालच्या दिवाळीपूर्व भेटीत, आम्ही नाथसांप्रदायी असल्याचे कळताच पूज्य भाऊंनी आम्हाला जवळच्या मोरगाव येथील श्रीदेव म्हातारबाबा देवस्थान चरणी नतमस्तक होण्याची आज्ञा केली होती. त्याच दिवशी सूर्यास्तसमयी श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेताना आम्हाला आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींची तुलना २००० साली गणेशगुळे येथे आलेल्या अनुभवाशी करण्याचा मोह आम्हाला अनावर झाला होता. श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी चिपळूणला मार्गस्थ झालो होतो. काळोख झालेला नव्हता पण अंधारून आलेलं होतं. त्याच रात्री आमच्या राहात्या घरी कुटुंबात आमच्याच खूर्चीत बसलेल्या अवस्थेतील श्री म्हाताराबाबांची दिव्यदर्शन‘स्वरूप’ उपस्थिती आम्हाला कळली तेव्हा ‘पूज्य भाऊ हेही आपले गुरुच !’ याची मनोमन खात्री पटली होती. म्हातारबाबा देवस्थान महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील बांद्यापासून १० ते १२ किमी. अंतरावर आहे. हे स्थान किमान दोनेकशे वर्षपूर्व असावे. बांदा या गावातून घारपी, फुकेरी, कोलझर, कुंब्रल, उगाडे, तळकट, शिरवल, झोळंबे गावी जाणाऱ्या अतिदुर्गम जंगलातील पायवाटेवर हे ठिकाण आहे. येथे पूर्वीच्या काळी पैदल किंवा बैलगाडीने प्रवास चालायचा. रात्री-अपरात्री या रस्त्यावर मदतीसाठी कोणी नसायचं. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करताना विशिष्ठ ठिकाणी थांबून खडे (दगड) टाकून देवाला मदतीसाठी हाक मारण्याची प्रथा रूढ झाली होती. कालांतराने कच्चा मार्ग झाल्यावर खडे टाकण्याची प्रथा मागे पडून चिलीम (विडी) ठेवण्याची प्रथा सुरू झाली. ही चिलीम एखादी वयस्कर व्यक्ती ओढत असावी असा रूढ समज होता. एके रात्री एक वाटसरू रात्री या वाटेने आपल्या घरी निघाले होते. निर्जन जंगलातून पुढे जायचा त्यांना धीर होईना. त्यांनी रूढ प्रथेप्रमाणे विशिष्ठ ठिकाणी उभे राहून, ‘मदत कर’ अशी विनंती केली. तेव्हा समोरून डोक्यावर फटकूर, हातात कंदील आणि दांडा धरलेली व्यक्ती वाटसरूला दिसली. त्यांनी वाटसरूला घरापर्यंत सोबत केली. घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी बोलल्यावर रात्रीच्या वेळी सर्वांच्या मदतीला येणारी अदृश्यरूपी शक्ती हीच म्हातारबाबा असल्याचा उलगडा झाला होता. कालांतराने याठिकाणी आजचे मंदिर उभे राहिले. हे क्षेत्र श्रीगोरक्षनाथ यांचे शिष्य ‘गहिनीनाथांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नजीकच्या इन्सुलीत (सावंतवाडी) प्रसिद्ध संत सोहिरोबानाथ अंबिये यांनाही एका वडाच्या झाडाखालच्या पाषाणी बसलेले असताना गहिनानाथांचा (गैबीनाथ) साक्षात्कार झाला होता. श्रीम्हातारबाबा क्षेत्री ‘उन्हाळी व पावसाळी’ पाण्याचे दोन झरे आहेत. आडाळी आणि मोरगावच्या हद्दीतील त्रिकोणात हे स्थान आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथे म्हातारबाबाची जत्रा भरते. श्रीम्हातारबाबा अडचणीत सापडलेल्या आणि त्यांना हाक मारणाऱ्या प्रत्येकाला संकटकाळात मदत करतात अशी या परिसरातील श्रद्धा आहे.विभिन्न वनदेवतांचे सूक्ष्म अध्ययन हवे’ असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटलेलं आहे, त्यामागे कदाचित हीच भावना असावी.

श्रीम्हातारबाबांच्या या अनुभूतीनंतर आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या व्यावसायिक कामास्तव सिंधुदूर्गात गेलो तेव्हा तेव्हा पूज्य भाऊंच्या दर्शन-मार्गदर्शनार्थ कुंब्रलला जात राहिलो. साधारणतः दीडेक वर्षे या भेटी होत राहिल्या असतील. त्यानंतर एका विशेष प्रयोजनास्तव, १२ ऑक्टोबर २०१२ पासून भाऊंनीच आपला मुक्काम कुंब्रलमधून रत्नागिरीत हलवला होता. २०१५ साली रत्नागिरीतच पूज्य भाऊंचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन (पाद्यपूजन-दर्शन-मार्गदर्शन) सोहोळा सर्व शिष्यगणांनी संपन्न केला होता. किमान सहा वर्षे, २०१८ पर्यंत पूज्य भाऊंचे रत्नागिरीत वास्तव्य होते. याही काळात भाऊंनी अध्यात्म, दैवी संकेतांवर विश्वास असलेली अनेक माणसे नव्हे तर कुटुंबे रत्नागिरीत जोडली. आज शुभारंभ (६ मार्च २०२२) होत असलेल्या प्रस्तुतच्या साप्ताहिक ‘रत्नागिरी प्रतिनिधी’चे संपादक सुनील चव्हाण आणि कुटुंबीय यांपैकीच एक होत. पूज्य भाऊंच्या उण्यापुऱ्या ८३ वर्षांच्या जीवनाकडे तटस्थपणे पाहिल्यावर नियमबद्ध आचरण, कमालीची सत्यप्रियता, देशभक्ती आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे भाऊंची समाजमनावरील छाप अधिकाधिक घट्ट बनल्याचे जाणवते. मानवी मनाला एखाद्या क्षणाचा सत्संग जरी घडला तरी जीवन सफल झाल्याचे समाधान भेटत असते. अशाच एखाद्या क्षणापुरते का होईना ? पूज्य भाऊंचे सानिद्ध्य लाभलेल्यांचा अनुभवही असाच आहे. भाऊंचे अध्यात्मिक जीवन, त्यांनी विविध गरजूंसाठी केलेले कार्य, लोकांना आलेले त्यांचे अध्यात्मिक अनुभव यातून अगणितांची जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी बदलून गेलेली आहे. रत्नागिरीतून सिंधुदूर्गात परतल्यावर पूज्य भाऊंचे आम्हाला कधी देवगडात कधी कुडाळात दर्शन-मार्गदर्शन लाभलेले आहे. तसे ते अनेकांना लाभलेले असेल. पण भाऊंना त्यांच्या कुंब्रलमधील अध्यात्मिक पवित्र्याने भारलेल्या निसर्गरम्य वातावरणातील ‘कुटी’त बैठक मारून बसलेलं असताना ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवणं, त्यांचं मार्गदर्शन आपल्या पदरात पाडून घेणं ही मानवी जीवनातील सर्वोत्तम अध्यात्मिक अनुभूती ठरावी.


धीरज वाटेकर, चिपळूण.

मो. ९८६०३६०९४८.

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  





रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

कोकणातील पर्यटन उद्योगाचे भवितव्य


आजच्या घडीला पर्यटन हा संपूर्ण जगात सर्वाधिक वेगाने वाढणारा उद्योग आहे. जगातील कंबोडिया, मॉरिशस, बाली, थायलंड आदि अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. हे जरी खरे असले तरी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह जगातील समुद्रकिनारा लाभलेल्या जवळपास देशांच्या विकासाच्या मुळाशी कितीही ‘पर्यटन पर्यटन’ म्हटलं तर ‘पोर्ट डेव्हलपमेंट’ ही मूळ संकल्पना आहे, हे आपण समजून घ्यायला हवे आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर स्थिरावण्यासाठी बंदर उद्योगांचा विकास होणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत याकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात हीरक महोत्सवी महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहात ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्र कसा असावा ? हे अभ्यासताना कोकण विभागात पर्यटन उद्योग स्थिरावण्यासाठी पायाभूत सुविधांसह बंदर विकासांची आवश्यकता विशेषत्वाने नोंदवली जायला हवी आहे.

एकविसाव्या शतकात कोकणासह भारतातील पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढू लागला. देशाची अर्थव्यवस्था विकसित होत असताना एकूण लोकसंख्येच्या काही वर्गाच्या हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. चांगले रस्ते, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे सर्वत्र पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे जाळे विणले गेले. पूर्णत्वास गेला नसला तरी कोकणातही मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, चिपी विमानतळ अशा प्रकल्पांतून कोकणातही पायाभूत सुविधा मजबूत होत असल्याचे चित्र तयार झाले. पर्यटन हा पारंपरिक भारतीय जीवनपध्दतीतील परमश्रध्देचा विषय आहे. तीर्थाटनाच्या माध्यमातून सुरु झालेले पर्यटन आज झपाट्याने आधुनिक बदल स्वीकारीत पुढे सरकत आहे. कोकणही त्यात मागे नाही आहे. कोरोना काळातही इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर नववर्षाचे स्वागत (२०२१-२२) करण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळली होती. आधुनिक पर्यटनाच्या संकल्पनांमध्ये वैयक्तिक सुखसुविधा आणि स्वच्छता हे मुद्दे कळीचे आहे. कोकणात तुलनेने स्वच्छता आहे. फारपूर्वी पर्यटनस्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निवास, प्रवास, खानपान सोयीसुविधांचे व्यवस्थापन आणि नियोजन करणे असे पर्यटन व्यवसायाचे स्वरूप होते. कालांतराने त्यात प्रत्यक्ष नियोजन करण्याची भर पडली. आजचा पर्यटन व्यवसाय हा पर्यटन उद्योग म्हणून विकसित होत आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंटरनेट बँकिंग आदि सोशल मीडिया मोठया प्रमाणावर साहाय्यभूत ठरत आहे. नवनवीन पर्यटन संकल्पना विकसित करून त्याद्वारे पर्यटन उद्योग बहुआयामी बनविण्याच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. कोकणातही हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हीरक महोत्सवी महाराष्ट्रातील कोकण पर्यटन अभ्यासत ‘अमृतमहोत्सवी’ महाराष्ट्राचा विचार करताना ‘कोकण पर्यटन डिजिटल विश्व’ मोठी भूमिका बजावणार हे नक्की आहे. अर्थात यासाठी सोशल मीडियाकडे पाहण्याची दृष्टी सकस व्हायला हवी आहे.


जागा स्वतःची असेल तर कोकणात पर्यटन उद्योग सुरू करताना लागणारी गुंतवणूक अत्यल्प असते. तसेच या व्यवसायात काही प्रमाणात का होईना, पर्यटकांच्या खिशातून अगोदर पैसे मिळत असल्याने ते प्राप्त करून त्यांच्यावर खर्च करून वर त्यांचीच प्रशंसा प्राप्त करण्याची नामी संधी हा व्यवसाय प्राप्त करून देतो. यात अनेकदा कोकणी स्वभाव आडवा येतो, हे वास्तव आहे. तरीही वर्षानुवर्षे उत्तम सेवा देणारी ठिकाणेही कोकणात कमी नाहीत. अशा ठिकाणच्या कोकणी पर्यटन व्यावसायिकांत आपल्याला उत्तम संवादकौशल्य, संभाषणचातुर्य, मनुष्य हाताळणीचे कौशल्य, विनम्रता, समयसूचकता, साहस, जिज्ञासा, नियोजनक्षमता, कॉमनसेन्स, निर्णयक्षमता, विषयज्ञान आदि गुण हमखास जाणवतात. म्हणून कोकणवर प्रेम करणारे पर्यटक सातत्याने अशा ठिकाणी आपल्या सुट्या व्यतित करत असतात. हे गुण असलेल्या व्यक्तिंची कोकण पर्यटन व्यवसायात वृद्धी होणे हे व्यावसायिक भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कोकणात आज येणारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावरील मौजमजेसाठी, निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पाहाण्यासाठी येतात. हेरिटेज, मंदिर स्थापत्य, नैसर्गिक आश्चर्ये, धार्मिक दर्शन, नाविन्यपूर्ण संकल्पना, इंडॉलॉजी, आर्किऑलॉजी, शहरीकरणाला कंटाळलेल्या पर्यटकांना ग्रामीण कोकणी जीवनाच्या परंपरांची, वैशिष्टयांची ओळख आणि अनुभव करून देणारे कृषी पर्यटन, कोकणाला लाभलेल्या सह्याद्री आणि सागराच्या सानिद्ध्यातील साहसी पर्यटन, दुर्गभ्रमण, ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्क्युबा डायव्हिंग, स्कीईंग, रिव्हर राफ्टिंग, वॉटर स्पोर्ट्स, रॅपलिंग यांसाठीही येतात. तसेच कोकणी घरे, संस्कृती, जीवनपध्दती, खाद्यसंस्कृती, चालीरिती यांचा अनुभव घेण्यासाठी, नदीची परिक्रमा किंवा उगम ते संगम सफर अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. विविध संवाद, चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांसह विवाहासाठी ‘wedding destination’ म्हणून कोकणी सौंदर्याकडे आकृष्ट होण्याचे प्रमाण पर्यटकांत वाढते आहे. कोकणातील सण-उत्सवाला, आयुर्वेद, देवराई, वनराई, आकाशदर्शन, आदि पर्यावरणीय संकल्पना समजून घेण्यासाठी, ग्राम पर्यटन, संग्राहालये पाहण्यासाठी, बोर्डी (जि. रायगड) येथील चिक्कू महोत्सव, मुरुड-हर्णे-वेळास येथील डॉल्फिन-कासव महोत्सव, चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीतील क्रोकोडाईल सफारी, डॉल्फिन महोत्सव आदिंसाठी कोकणात पर्यटक येतात. कोकणातील पर्यटन व्यवसाय उद्योगाचे स्वरूप धारण करताना त्याला  अधिकाधिक नवनवीन संकल्पनांद्वारे व्यक्त होण्याची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी या विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक पर्यटकस्नेही असायला हवा आहे. कोकण पर्यटन उद्योगाला आपले विश्व व्यापक करण्यासाठी गाईड प्रशिक्षण कार्यक्रमावर भर द्यावा लागणार आहे. अलिकडच्या काळात तसे प्रयत्न होत आहेत. संजय नाईक यासाठी विशेष मेहनत घेत आहेत हे निश्चित स्वागतार्ह आहे. वास्तविक कोकणातील प्रत्येक महाविद्यालयात पर्यटन उद्योग विकसित करण्याविषयी मार्गदर्शन करणारी व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यांना मार्गदर्शन आणि या विषयात लक्ष घालणारे करणारे कॉलेजच्या स्टाफरूमच्या बाहेरील पर्यटन विषयात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असायला हवेत.

कोकण पर्यटन उद्योगाच्या दुसऱ्या अडचणीच्या बाजूकडे आगामी १५ वर्षांच्या काळात काळजीपूर्वक लक्ष दिले तर कोकण प्रदेश राज्याची अर्थव्यवस्था सांभाळू शकतो. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ३८ टक्के टक्के कारखाने कोकणात आहेत. जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये कोकण महाराष्ट्राला देत आहे. मात्र हे उद्योग कोकणातील नद्या आणि खाड्या सातत्याने सर्वाधिक प्रदूषित करण्याचे काम करत आहेत. यांच्यामुळे कोकणातील शेती आणि मच्छिमार उद्ध्वस्त झाला आहे. कोकणाला हवा असलेला सागरी महामार्ग आणि सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुंबई गोवा चौपदरीकरण मार्ग आजही अपूर्ण आहे. या रस्त्याची अवस्था इतकी भयंकर आहे की अनेक ठिकाणी शासन-प्रशासनाला कंटाळून नागरिकांनी स्वतः रस्त्यांचे खड्डे भरायला घेतलेत. कोकणी माणसांनी काही ठिकाणी या खड्ड्यात वृक्षारोपण कार्यक्रमही केले. पण शासन-प्रशासन म्हणून याची कोणालाही लाज वाटत नाही. कोरोना कालखंडात उद्योगाकडे वळण्याचे स्वप्न पाहणारा त्यासाठी झटणारा कोकणातील पर्यटन व्यावसायिक कर्जांच्या विळख्यात सापडला आहे. त्याला सरसकट कर्जमाफी नको आहे. पण कोरोना संक्रमणात सापडलेल्या कोकणातील व्यावसायिकांना उभारी येण्यासाठी किमान कर्जावरील व्याजमाफी देण्याची भूमिका शासनाने घ्यायला काहीही हरकत असण्याचे कारण नाही, पण तेही होत नाही आहे. कोकणातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी बँकांची कर्ज काढून उभे केलेत. पायाभूत सुविधांची शब्दशः बोंब असताना कोकणातील निसर्गाच्या प्रेमामुळे पर्यटक कोकणात येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना सेवा देण्यासाठी कोकणातील ‘सेवाकर्मी’ पर्यटन व्यावसायिकाला शासकीय आधाराची गरज आहे. जगप्रसिद्ध हापूस आंबा आणि विविध प्रकारची मासळी हे कोकणाचे वैभव आहे. मागील काही वर्षांत शासनाने कोकणात पर्यटन महोत्सवांचं आयोजन सुरू केलं आहे. त्याचं मार्केटिंग व्हायला हवं आहे. कोकण पर्यटन व्यवसाय उद्योगात परावर्तित करण्यासाठी राज्याच्या पर्यटन खात्याने आणि तेथे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कल्पक होण्याची आवश्यकता आहे. ‘कोकण पर्यटन उद्योग मिशन’ म्हणून कार्यरत व्हायला हवे आहे. विविध प्रकल्पांना होणारा कडवा विरोध आणि समर्थन या दोन्हींच्या मधला पर्यावरणस्नेही व्यवहार्य विचार रुजविण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी स्टरलाईट प्रकल्पाच्यावेळी जागतिक कीतीर्चे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर यांनी रत्नागिरीत येऊन स्टरलाईट प्रकल्प हानिकारक आहे असा अहवाल दिल्यावर हा प्रकल्प रद्द झाला होता. कोकणातील मायनिंग आणि इतर साऱ्या प्रदूषणकारी उद्योगांचा असाच निर्णय व्हायला हवा आहे. तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी इथली मागणी आहे. यात दक्षिण रायगडमधील २० महाविद्यालयेही समाविष्ट होऊ शकतात. काही संस्थाचालकांना आजही ‘मुंबई विद्यापीठ’ ची भुरळ आहे. यातून मार्ग निघायला हवा आहे. रोजगार देणारे कौशल्य शिक्षण कोकणात हवे आहे. समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, मेरिटाईम, रेल्वे तंत्रज्ञान आदि अभ्यासक्रम कोकणाला हवे आहेत. त्यातून इथले उद्योगजगत विकसित होईल. आगामी काळाचा वेध घेताना हे विचार महत्त्वाचे असणार आहेत.


कोकणात २००९ मध्ये आलेल्या फयाननंतर निसर्ग, तोक्ते अशी ४/५ वादळे आलीत. महापूर-वादळांनी कोकणाची सर्व बाजूंनी नव्याने उभारणी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. कोकणच्या उद्योजकीय विकासासाठी अशा संकटांची व्याप्ती आणि खोली शासकीय पातळीवर समजावून घेतली जायला हवी आहे. इथल्या सामान्य शेतकऱ्यांचे जीवन हे आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, करवंद, केळी, मिरी यांवर अवलंबून आहे. महापूर-वादळात यांचे अमाप नुकसान होते. अशावेळी मिळणारी शासनाची मदत साफसफाई करायलाही पुरत नाही. अशा वातावरणात अंदाजे वर्षातील ६० ते ९० दिवस चालणारा पर्यटन व्यवसाय भविष्यात ‘उद्योग’ म्हणून कसा झेपावेल ? यावर आजच विचार व्हायला हवा आहे. कोकणात कोणताही मोठा उद्योग येत नाही. मुंबईत बसून कोकणाच्या भवितव्याचे निर्णय घेणारे पुढारी कोकणाचा विकास करत आहेत. कोकणातील जमिनींचे कसाई भरमसाट दराने शेत जमिनी विकत घेऊन त्यांचे तुकडे पाडून करोडपती बनले आहेत. याची दुसरी बाजू ही की यातून जमिनीच्या वाढलेल्या भरमसाट दरांमुळे नव्याने जमीन घेऊन बाग लावणे हे आता कोकणी माणसासाठी दिवास्वप्न ठरते आहे. महाराष्ट्रात एप्रिल १९९४ मध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी तीन वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली होती. तेव्हा ‘उर्वरित’ समजून कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडले गेले. आर्थिक विकासात कोकणाची उपेक्षा आणि अन्यायाची वेग इथून आणखी वाढला. आतातर ही मंडळे कुठे गुंडाळून ठेवलीत देव जाणे ! म्हणून देशासह राज्याच्या आर्थिक विकासात सतत उपेक्षित असलेल्या कोकणाचा विकास होण्यासाठी 'कोकण प्रादेशिक विकास मंडळ' स्थापन करायला हवे आहे. संपूर्ण कोकणचे सर्वेक्षण करायला हवे आहे. यात कोकण पर्यावरण, महापूर, नद्यांची पात्रे, प्रदूषण, फलोत्पादन, मत्स्योत्पादन धोरण, लहान मच्छिमारांना मोठ्या सवलती, पर्यटन उद्योग कोकण विकासाचा केंद्रबिंदू करण्याचे नियोजन, पायाभूत सुविधा, किफायतशीर हॉटेल बांधण्यासाठी उद्योजकांना सहकार्य, छोट्या-छोट्या धरणांची आवश्यकता, प्रदूषण आदिंचा विचार व्हायला हवा आहे. कोकण विकासाच्या योजनांचा नेहमी मोठा गाजावाजा होतो. योजना जाहीर होतात. मात्र योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना फोलपणा समोर येतो. खर्च होऊनही परिणाम साधला गेलेला नसतो. पुन्हा विकासाचा मुद्दा चर्चेला येतो. पुन्हा नवी योजना येते. महाराष्ट्राचा अमृत महोत्सवी वेध घेताना असंच होत राहाणार नाही याची काळजी घ्यायला हवी आहे.

गेली पन्नासहून अधिक वर्षे कोळसेवाले आणि आता लाकूडतोडे जंगलमाफिया सह्याद्रीचे लचके तोडत आहेत. कोकणातील घाटातून असंख्य ट्रक भरून लाकडे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांचे बॉयलर पेटवण्यासाठी जातात. इथल्या एम.आय.डी.सी.मधील कारखाने नद्या-खाड्या प्रदूषित करतात. आज प्रचंड जंगलतोडीमुळे कोकणातले डोंगर उघडेबोडके झालेत. जमीन धरून ठेवायला झाडेच नसल्यामुळे डोंगरावरील माती, दगड, गोटे नदी-खाड्यांत आलेत. गाळ वाढलाय. पिढ्यांपिढ्या कोकणी माणूस पाऊस अनुभवतोय. कोकणातल्या काही भागात तर ६/८ महिने पाऊस पडायचा. पण डोंगर खाली येणे, दरडी कोसळणे आणि महापूर येणे हे नित्याचे प्रकार होत नव्हते. ते आज होतायेत, याला कारण अनियंत्रित विकास हेच आहे. निसर्गरम्य कोकणात विदेशी वृक्षांची लागवड नको यासाठी आमदार शेखर निकम आग्रही आहेत. पर्यावरणप्रेमींचीही ही मागणी आहे. तिचा गांभीर्याने विचार व्हायला हवा आहे. कोकणात पर्यटन उद्योग बहरण्यासाठी पायाभूत सुविधा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत. कोकणात ७०/८० पर्यटन ग्राम आहेत. राज्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांपर्यंतचा वेध घेताना किमान या गावात चोवीस तास वीजपुरवठा, पाणी, पक्का दुपदरी रस्ता, पार्किंग, स्वच्छतागृहे, सुशोभीकरण आदि मुलभूत मूलभूत सुविधा या गावांमध्ये असतील अशी व्यवस्था निर्माण व्हायला हवी. कोकण पर्यटन विकासाचे कामे मार्गस्थ करताना कोकण पर्यटनकर्मींना खूप अडचणी येतात. बांधकामांसह विविध शासकीय बाबी पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगीची सिंगल विंडो व्यवस्था असायला हवी आहे. कोकणातल्या खाड्यात पर्यटक बोटीतून फिरवायचे असतील तर मेरिटाईमसह शासनाच्या सर्व परवानग्या क्लिष्ट आहेत. शासनाकडे भरावे लागणारे शुल्क आणि वर्षाकाठी जमणारी गंगाजळी यांचे गणित जुळत नसल्याचा अनुभव गेली ७/८ वर्षे चिपळूणातील ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्था घेत आहे. त्यामुळे शासनाने पर्यटन उद्योग विकसित होण्यासाठी अशा प्रयत्नांना जाचक अटीत न अडकवता पाठबळ द्यायला हवं आहे. सागरकिनारा लाभलेल्या जगातील बहुसंख्य देशात रेल्वेही सागरकिनाऱ्यावरून जाते. कोकणात मात्र ती सह्याद्रीतून नेण्यात आली. हे कौशल्याचे काम होते. त्यासाठी सर्व संबंधित अभिनंदनास पात्र आहेत. मात्र आज कोकण रेल्वेचा दुसरा ट्रॅक टाकण्यात अडचणी येताहेत. म्हणून कोकण रेल्वेने आगामी ट्रॅकसाठी सागरकिनाऱ्याकडे आणि त्यातील रिंगरूटकडे पाहायला हवे. ही आणि ‘पोर्ट’ विकासाची माजी आमदार प्रमोद जठार यांची आग्रही मागणी रास्त आहे.

कोकणात एकविसाव्या शतकात, पूर, महापूर, वादळे, चक्रीवादळे आदिंनी कोकण भूमीला हैराण केले आहे. पर्यावरणीय ह्रासाचे हे परिणाम भविष्यात अधिकाधिक गडद होत जाणार आहेत, असं यातल्या तज्ज्ञांचं मत आहे. ते विचारात घेता शासकीय पातळीवर अशा आपत्तींपासून बचाव होण्यासाठी तसेच आपत्तीग्रस्तांना त्वरित न्याय मिळण्यासाठी ठोस व्यवस्था निर्माण व्हायला हवी आहे. तात्पुरत्या मलमपट्टीस्वरूप उपचारांनी कोकणात ‘पर्यटन उद्योग’ ही संकल्पना अशा आपत्तीत किती टिकाव धरेल हा प्रश्न भविष्याचा वेध घेताना पडतो आहे. कोकण पर्यटन उद्योग साकारण्यासाठी हवी असलेली हजारो कोटींची गुंतवणूक कोकणात आणण्यासाठी ‘पोर्ट’ हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकडे लक्ष दिल्यास कोकण पर्यटन उद्योग उद्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळेल. 

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ०९८६०३६०९४८

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !



          ‘एकच देऊ नारा संपवू वणवा सारा’ हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय निसर्ग सौंदर्य लाभलेलं अखंड कोकण वणवामुक्त व्हावं म्हणून गेल्या दोनेक वर्षांपासून ‘वणवा मुक्त कोंकण’ कार्यरत झाली आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव पाहाता वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वणवा न लावता, न लावू देता सामाजिक स्तरावर वणवा जाळण्याऐवजी वणवा लावणारी प्रवृत्ती जळून जाण्याची आवश्यकता आहे. कायद्याने गुन्हा असलेली वणवा लावण्याची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सध्याच्या जंगलातील वणव्यांच्या ऋतू हंगामात जनजागृतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आज चिपळूणात ‘वणवा’मुक्ती साठी कार्यरत संस्था, ग्रामपंचायती, व्यक्ती यांचा सन्मान सन्मान सोहोळा संपन्न होत आहे.

दरवर्षी देशातील विविध जंगलांत वणवे लागत असतात. वणवा हा अतिशय चिंताजनक विषय आहे. यातले जेमतेम १५ टक्के वणवे नैसर्गिक तर बहुसंख्य मानवनिर्मित असतात. मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा तालुक्‍यातील डिंगणे गावी वाळलेल्या गवताच्या कुरणांमुळे ५०० एकरांवर नैसर्गिक वणवा भडकून काजू, आंबा आणि नारळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले होते. ९० शेळ्या, दोन घरे व ९५ बोकडांचा या वणव्यात होरपळून मृत्यू झाला होता. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटासह अनेक भागात लावले जाणारे वणवे वाहतूक थांबविण्यास कारणीभूत ठरत असतात. भारतीय वन सर्वेक्षणाच्या अहवालानुसार वणवा लागण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य पहिल्या दहात आहे. राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने मागे वणवा समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘राष्ट्रीय धोरण’ तयार करण्याची सूचना केली होती. ‘वणवा’ संदर्भातील अभ्यासपूर्ण भूमिका निश्चित करताना, वणवा लागल्यानंतर त्या आडभागात कसे पोहोचायचे ? आग विझवायला काय वापरायचे ? त्याकरिताचे आर्थिक नियोजन याचा उलगडा होत नाही. म्हणून ‘वणवा लागूच नये’ यावर काम करण्याची आवश्यकता जाणवते. जंगलमाफियांकडून मुद्दाम आगी लावल्या जातात. पुढे त्यात होरपळलेल्या झाडांचा लिलाव केला जातो. वनौषधी, वनसंपत्ती गोळा करण्यासाठी आणि जंगल पर्यटसाठी गेलेल्या माणसांकडून निष्काळजीपणे आणि काहीवेळा जाणुनबुजून केलेल्या कृत्यामुळे वणवे लागतात. वनातून जाताना पेटती सिगारेट फेकणे, टेंभे (मशाल, पलिते) घेऊन जाणे, कॅम्पवरील आग तशीच सोडून जाणे, शेतीबांधावरील लावलेली आग आदिंमुळे वणवे लागतात. कोकणात वणवे लागण्यापेक्षा वणवे लावण्याचे प्रणाम अधिक आहे, म्हणून जनजागृती आवश्यक आहे. वणव्यासंदर्भात भारतीय वनखात्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी अद्ययावत यंत्रणा असेल का ? प्रश्न आहे. वणवा विझवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. पण आग लागू नये म्हणून जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या या पलिकडे आम्ही जात नाही. ‘ग्रीन इंडिया’चे स्वप्न पाहाणाऱ्या देशाला ‘वणवा’ प्रवृत्ती परवडणारी नाही आहे. वणवा लागलेल्या एखाद्या जंगलाचे आत्मवृत्त ऐकायला बसलो तर एखादं संवेदनशील मन उद्ध्वस्थ होऊ शकतं. वणवा लागल्यावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. यावरील सर्वात सोपा उपाय हा आग लागूच न देणे हाच आहे. अर्थात सर्वच ठिकाणी अशी अपेक्षा करणे व्यवहार्य नाही आहे. जंगलांमध्ये जेव्हा जोरदार वारा वाहू लागतो त्यावेळी एकमेकांच्या आसपास असलेल्या झाडांच्या फ़ांद्या आपापसात एकमेकांवर घासून घर्षणाने आग निर्माण होत असते. ही आग हळू हळू तेथील पालापाचोळ्याला लागून संपूर्ण जंगलात पसरते. नैसर्गिक वणवा साधारणपणे असा लागत असतो. या आगीमुळे निसर्गाला प्रतिकूल ठरणाऱ्या अनेक गोष्टींना अटकाव करता येतो असा एक मतप्रवाह आहे. याचे लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोकणात लागणारे वणवे ‘नैसर्गिक’ या कक्षेत बसत नसल्याने त्यातून होणारी नैसर्गिक हानी पाहाता कोकणात वणवे रोखायला हवे आहेत.  आपल्याकडे जंगलांना मुद्दामहून आगी लावल्या जातात हे वास्तव आहे. आगीमुळे पर्यावरणाची हानी होते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वाढतो. त्याचा प्रतिकूल परिणाम विश्वाचे तापमान वाढीमध्ये दिसून येतो आहे.

                                       
पाचाड गाव सीमेवरील येथील वणवा विझवताना समितीचे सदस्य

थंडी संपून उन्हाळा सुरु झाला की वणव्यांचा प्रश्न गंभीर बनतो. कोकणात दिवसाला कुठेना कुठे एक वणवा अशी भयंकर स्थिती निर्माण होत असते. तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी पर्यावरणस्नेही उपायांचा विचार करता पेटलेला वणवा विझवणे कठीण आहे. कोकणात फळबागांना लागणाऱ्या वणव्यांमुळे ‘नको ती शेती’ म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याची उदाहरणे आहेत. वणवा ही कोकणच्या सौंदर्याला लागलेली कीड आहे. कोकणची सांस्कृतिक राजधानी आणि असंख्य कृतीशील चळवळींचे माहेरघर असलेल्या चिपळूणात माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करणारे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे, ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या माध्यमातून चिपळूणला ‘डेस्टीनेशन’ बनविण्यासाठी कार्यरत असलेले पर्यावरणस्नेही उद्योजक श्रीराम रेडिज, शहरातील सर्व चांगल्या उपक्रमातील अग्रणी उद्योजक प्रकाश(बापू) काणे यांच्यासह प्रवीण कांबळी, जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, अनिकेत बापट, धीरज वाटेकर, दिनेश दळवी, विलास महाडिक, डॉ. गौरव बारटक्के आदी कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी हे असंख्य पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याच्या बळावर ही चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘वणवा मुक्त कोकण’च्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील खेंड कांगणेवाडी परिसरातून जाणाऱ्या गुहागर बायपास घाट मार्गावरील महालक्ष्मी डोंगराला ६ डिसेंबर २०२० ला दुपारी लागलेला वणवा प्रयत्नांती विझवला होता. अलिकडे पाचाड (चिपळूण) वणवा मुक्त कोंकण समितीच्या सदस्यांनी ११ फेब्रुवारी २०२२ गावात येणारा वणवा सीमेवर विझवण्यात यश मिळवले होते. समिती सदस्य प्रवीण कांबळी आणि अनिकेत बापट यांनी नेरळ (कर्जत) येथील सगुणा बागेने विकसित केलेले वणवा लागू न देण्याच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले आहे. चिपळूण तालुक्यातील महत्त्वाच्या गावांचे सर्वेक्षण, सर्वेक्षणाच्या आधारे कामाचा प्राथमिक कृती आराखडा, ‘वणवा मुक्त गाव’ प्राथमिकता, तालुक्यातील ग्रामपंचायती, वनविभाग, पोलिस, विविध सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांचा सहभाग या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समितीचे काम सुरु आहे. गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे फलक गावागावात लावल्यानंतर जेव्हा गावात वणवे लागले तेव्हा ते विझवण्यासाठी कार्यकर्त्यांना फोन येत होते. आजही येत असतात. याचा अर्थ आजही समाजात ही प्रवृत्ती नष्ट व्हावी असं मानणारं समाजमन आहे. त्याला संघटीत करायला हवं आहे.   

महालक्ष्मी डोंगर गुहागर बाय पास रोड येथील वणवा विझवताना समितीचे सदस्य

कोकणात शेतजमिनीची भाजावळ करण्याची लोकांची जुनी सवय आहे. वास्तविक ही भाजणी अयोग्य आहे, ती करू नका असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून सातत्याने केले जाते. तरीही हे घडते. यातील काही विकृत मानसिकता पुढे वणव्याला कारणीभूत ठरते.  भाजवळ पद्धत जागतिक स्तरावरही योग्य नसल्याचे सर्वमान्य झाले आहे. तरीही आपलं समाजमन ही पारंपारिक पध्दत सोडण्यास तयार नाही. भाजावळीच्या काळात ही पद्धत अव्हेरून शेती करणाऱ्या किती शेतकऱ्यांच्या पाठीवर आम्ही कौतुकाची जाहीर थाप मारली आहे ? भाजवळ पद्धत नाकारून यशस्वी शेती करणाऱ्या किती शेतकऱ्यांना आम्ही सन्मानित केलं आहे ? त्यांचे अनुभव समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही कोणते प्रयत्न केले आहेत ? आपला समाज उत्सव आणि कार्यक्रमप्रिय आहे. समाजाची ही मानसिकता प्रबोधनाचे उत्तम व्यासपीठ आहे. हे ओळखून वणवा मुक्त कोंकणतर्फे आज (१४ जानेवारी) पुरस्कार प्रदान आणि जनजागृती सोहोळा संपन्न होत आहे. कोकणात पशुपालन वाढल्यास वणव्याचे प्रमाण कमी होऊ शकेल असाही एक मतप्रवाह आहे. सरकारनेही ‘वणवा मुक्त गाव योजना’ स्वरूप कार्यक्रम हाती घेण्याची नितांत गरज आहे. ‘आमचा गाव वणवामुक्त गाव’ कार्यक्रमांतर्गत गावागावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन या संदर्भातील मार्गदर्शन, गाव कृतीदलाची स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवा विरोधी सशस्त्र पथक आदी पर्याय वापरले जायला हवेत. आज चिपळूणचे आ. शेखर निकम, पंचायत समिती सभापती सौ. रीयाताई कांबळे, उपसभापती प्रतापराव शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, प्रभारी गटविकास अधिकारी भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम वणवा मुक्ततेसाठी साहाय्यभूत ठरावा.

 

धीरज वाटेकर

सदस्य, वणवा मुक्त कोंकण



सोमवार, १० जानेवारी, २०२२

मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनेची नोंद


कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई आणि श्रीविंध्यवासिनी मंदिरांचे सान्निद्ध्य लाभलेल्या डोंगरात २०२१ च्या वर्षारंभी सापडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांची आणि त्यांची आई मादी बिबट्याची भेट घडवून आणण्यासाठीच्या शासकीय वनविभाग रत्नागिरी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या प्रयत्नांना आठवड्याभराच्या संयमित प्रयत्नांनंतर यश प्राप्त झालं. मातृत्वापासून कायमचे पारखे होण्याच्या वाटेवर असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना (एक नर एक मादी) मादी बिबट्याने सोबत घेऊन सुरक्षित नैसर्गिक अधिवास गाठला. या संपूर्ण आँखो देख्या घटनाक्रमात वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासकांना मादी बिबट्याच्या अनोख्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीची दुर्मीळ नोंद करता आली. या संवेदनशील विषयाबाबत कमालीची गुप्तता पाळली गेल्याने बघ्यांची अपेक्षित गर्दी टळली होती. प्रयत्नरत हातांचा मूळ हेतू सफल होऊन शेवट गोड झाल्याने मादी बिबट्याच्या वत्सलभावनायुक्त वर्तणुकीचा उहापोह करणं महत्त्वाचं वाटलं.


मौजे धामणवणे येथील पर्यटन प्रसिद्ध श्रीविंध्यवासिनी मंदिराच्या पाठीमागे ११ जानेवारीला प्रा. चेतन खांडेकर यांच्या घराच्या आवाराला लागून असलेल्या ओढ्यात कोणीतरी मार्जार कुळातील प्राणी ओरडत असल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून खांडेकर यांनी त्यांचे मित्र अॅड. चिन्मय दिक्षित यांना कळवले. दिक्षित यांनी वन्यजीव अभ्यासक ओंकार बापट यांना ही माहिती दिली. ओंकार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहिले असता त्यांना दीड-दोन महिन्याचे बिबट्याचे एक पिल्लू निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क केला. वनरक्षक रा. र. शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर यांनी तातडीने येऊन पाहाणी केली. तेव्हा कोरड्या ओढ्यात दगडाच्या कपारीत बिबट्याचे मादी जातीचे पिल्लू सर्वांना दिसले. वन विभागातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. चिपळूणचे वनविभाग अधिकारी सचिन निलख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्वानुमते, ‘बिबट्याच्या पिल्लाला त्याची आई, मादी बिबट्या घेऊन जाते का ?’ यासाठी प्रयत्न करायचे निश्चित झाले. श्रीविंध्यवासिनी मंदिराच्या नजीक कोरड्या ओढ्याच्या वरच्या बाजूला जिथे पिल्लू सापडलं त्याच वातावरणात एका लाकडी फळ्यांच्या बॉक्समध्ये पिल्लाला ठेवण्यात आलं. घटनेची नोंद व्हावी म्हणून ट्रॅप कॅमेरा बसविण्यात आला. टीमचे सदस्य सुरक्षित अंतरावर बसून राहिले. रात्री पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येत राहिला. पण मादी बिबट्या आली नाही. उलट एका क्षणी आपल्या नखांचा उपयोग करून ते पिल्लूच बॉक्समधून बाहेर आलं. आजूबाजूला वावरू लागलं आणि कुणाला काही कळायच्या आत अचानक ट्रॅप कॅमेऱ्याच्या कक्षेच्या बाहेर गेलं. आता काळोख्या अंधारात पिल्लू दिसेनासं झालेलं. मध्यरात्र असल्याने पिल्लाला शोधणंही शक्य नव्हतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, १२ जानेवारीला बिबट्याच्या पिल्लाचा शोधघेणे सुरु झाले. पण ते पिल्लू सापडेना. शोधण्यात दोनेक तास गेले असतील. ट्रॅप कॅमेऱ्यापासून दोनशे मीटर अंतरावर एका बागेतून पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने शोध सुरु झाला. तेव्हा त्या बागेतल्या सागवानाच्या सुकलेल्या मोठाल्या पानांच्या आडोशाला पिल्लू लपून बसलेलं दिसलं. हे पिल्लू मादी जातीचं होतं. आईचे दूध न मिळाल्याने पिल्लू अशक्त झालेलं होतं. पिल्लाला कृत्रिमरित्या दूध (लॅक्टोजन) पाजण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची वजन आणि आरोग्य तपासणी केली. वनविभागाच्या एस.ओ.पी. (स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर) नियमानुसार ‘पिल्लाला त्याची आई घेऊन जाते का ?’ यासाठीचे प्रयत्न करायचे निश्चित झाल्याने पिल्लाच्या आईचा, मादीचा शोध सुरु झाला. त्या सायंकाळी लाकडाच्या खोक्यात पिल्लाला ठेवून बाजूस ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. सुरक्षित अंतरावरून नजर ठेवणे सुरूच राहिले.


तिकडे श्रीविंध्यवासिनी मंदिर परिसरात हे प्रयत्न सुरु असताना रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट यांना धामणवणे येथील श्रीविठ्ठलाई मंदिर परिसरातील मालकीच्या शेतात बिबट्याचे पिल्लू असल्याबाबत निसर्गप्रेमी रोहन शेंबेकर यांनी कळविले. त्या दिवशी शेंबेकर यांच्या बागेतकाम करणारे कामगार कांबळी यांच्या पत्नीला दुपारी १२ वाजल्यापासून कोणा प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. ती महिला दिवसभर कांबळींना म्हणत राहिली, ‘मांजर ओरडतंय म्हणून !’कांबळींनी शेवटी सायंकाळी शेंबेकर यांना बोलावून घेतले. तोवर कांबळींच्या मुलाने ओरडणाऱ्या पिल्लाचा अगदी जवळून मोबाईलवर फोटो काढलेला होता. सायंकाळी बागेत आलेल्या शेंबेकर यांनी मोबाईल मधला तो फोटो पाहिला. तेव्हा त्यांना संशय आला. एका क्षणी त्यांनी ही पिल्लाचा आवाज ऐकला. शेंबेकर आवाजाच्या दिशने मार्गस्थ झाले. पण बिबट्याचं पिल्लू जवळपासच्या झुडुपात लपल्याने त्यांना दिसलं नाही. शेंबेकर यांनी मोबाईल मधला फोटो निलेश यांना पाठविला. दोघांचं बोलणं झालं. फोटो पाहताच तातडीने निलेश यांनी धामणवणे गाठले. पण तोवर सायंकाळ झाली होती. निलेश यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून बिबट्याच्या पिल्लाचा विषय सांगितला. आणि ‘धामणवण्याच्या मंदिराजवळ या !’ असं सुचविलं. तेव्हा वन विभागाचे कर्मचारी, ‘आम्ही पिल्लाजवळच आहोत’ असं सांगू लागले. संवादात थोडावेळ कन्फ्युजन झालं. ‘कुठल्या पिल्लाजवळ ?’ असं निलेश यांनी विचारल्यावर ‘देवळाजवळ !’ असं उत्तर मिळालं. शेवटी या संवादात निलेश यांच्या ‘कुठल्या देवळाजवळ ?’ या प्रश्नाच्या उत्तरामधून श्रीविंध्यवासिनी आणि श्रीविठ्ठलाई या दोन स्वतंत्र देवळांच्या ठिकाणांचा उलगडा झाला.

आता तिसऱ्या दिवशी, १३ जानेवारीला सकाळ-सकाळी श्रीविंध्यवासिनी जवळच्या पहिल्या पिल्लाची सर्वांनी पाहाणी केली. तेव्हा पिल्लूबॉक्स मध्येच आढळून आलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी पिल्लाची तपासणी केली. पिल्लू सुस्थितीत होते. ट्रॅप कॅमेरा तपासण्यात आला. त्यात कोणत्याही विशेष हालचालीची नोंद नव्हती. प्रयत्न करणाऱ्या सर्वांच्या मनात निराशा निर्माण झाली. श्रीविंध्यवासिनी जवळच्या पिल्लाला बॉक्सच्या तुलनेत एका लहान बास्केटमध्ये घालून डोंगराच्या दमवणाऱ्या चढाने शोधाशोध करत सारेजण शेंबेकर यांनी दाखवलेल्या बागेच्या आवारातील जागेच्या दिशेने मार्गस्थ झाले. हा मार्ग निवडण्यामागे मादी बिबट्या याच मार्गाने खाली उतरल्याचा प्राथमिक अंदाज होता, जो खरा होता. याच मार्गावर मध्यभागी डोंगरातून ग्रॅव्हिटीने आणलेल्या पाण्याचा एक पाणवठा आहे. पाणवठा ते विठ्ठलाईच्या दरम्यान मादीला विणीसाठी उपयुक्त ठरू शकतील अशा २/३ आडोश्याच्या जागा टीमच्या निदर्शनास आल्या. तिथे थांबून दुसऱ्या पिल्लाचा शोध घेण्यात आला. मात्र दुसरे पिल्लू सापडले नाही. शोधाशोध करत सारेजण, कामगार कांबळी यांच्या मुलाने बिबट्याच्या पिल्लाचा फोटो काढलेल्या जागेवर पोहोचले. तेव्हा विणीची जागा हीच असावी असा तर्क बांधण्यात आला. दोन वर्षापूर्वी या भागात मादी बिबट्याचा वावर दिसून आलेला होता. याची माहिती वन्यजीव अभ्यासकांकडे होती. सध्याच्या दुसऱ्या पिल्लाचा फोटो काढलेल्या या जागेपासून जवळच पाण्याची उपलब्धी होती. मोठ मोठ्या दगडांच्या कपारीचा आडोसा होता. तणरूपी रानमोडीचं जंगल वाढलेलं होतं. त्यातून चालणं कठीण होतं. याच ठिकाणी काल बिबट्याचं दुसरं पिल्लू दिसलं होतं. त्यामुळे आता, ‘या ठिकाणी बास्केटमधून सोबत आणलेलं बिबट्याचं पाहिलं पिल्लू ओरडलं तर त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडेल आणि शोधणे सोपे होईल’, अशी स्वाभाविक अपेक्षा टीमच्या मनात होती. टीमने सकाळी ७ वाजता पहिल्या पिल्लाला घेऊन चालायला सुरुवात केली होती. त्याला आता पाचेक तास उलटले होते. दुपारी १२ वाजून गेल्यानंतरही दुसरे पिल्लू मिळालेले नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. पण इकडे घटनेत काहीच नवीन घडत नव्हतं. मादी बिबट्याच्या वर्तणुकीचा आणि तिच्या अस्तित्वाचा अंदाज बांधणे कठीण झाले होते.


दुपारची १२ वाजून ३७ मिनिटे झाली असतील. बास्केटमधील पहिलं पिल्लू अचानकपणे सलग ४/५ वेळा ओरडलं. अन् त्याक्षणी दुरून कुठूनतरी दुसऱ्या पिल्लाच्या आवाजाचा हलकासा कॉल सर्वांच्या कानावर आला. खरंतर तो क्षण, ‘आत्ता मादी बिबट्या इथे आली तर ?’ या विचारातून मनात कमालीची अनामिक भिती निर्माण करणाराही होता. पण का कोण जाणे ? टीमला अशी भिती वाटत नव्हती. त्याच निश्चित कारण ती निसर्गशक्तीच सांगू शकेल. भर जंगलात मादीच्या विणीच्या जागेजवळ बिबट्याच एक पिल्लू ओरडतंय, काही क्षणांनी दुसऱ्या पिल्लाचा हलकासा का होईना पण आवाज ऐकू आलाय आणि मादी बिबट्या मात्र अजूनही समोर आलेली नाही. जवळपास तिच्या असण्याचा कोणताही पुरावा दिसून येत नाही. अशी साधारण स्थिती होती. वेळ दिवसाची दुपारची असल्याने टीमचे काही सदस्य आवरायला तर काही जण पिल्लाला दूध आणायला निघून गेले. एक-दोघेजण जागेवर थांबून राहिले. वन्यजीव शास्त्रानुसार साधारणत सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत पिल्लं असताना किंवा नसताना बिबट्या सक्रीय (active) नसतो. त्यामुळे भिती तशी कमी झालेली होती. पण तरी सुद्धा बिबट्या मादी, ‘आत्ता आली तर ? किंवा इथेच असेल तर ?’ हे स्वाभाविक प्रश्न मनात येतच होते. तरीही अशा मानसिक अवस्थेत उपस्थित दोघा सदस्यांनी जमिनीवर सुरक्षितपणे काठी आपटत रानमोडीच्या जंगलाचा डोळ्यादेखतचा सारा परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. बघताबघता दुपारचा दीड वाजला, तरीही दुसरं पिल्लू सापडण्याची चिन्हे दिसेनात. शेवटी बास्केटमधील पहिल्या पिल्लाजवळ येऊन दोघे सदस्य बसलेआणि अचानक आतलं पहिलं पिल्लू पुन्हा ओरडू लागलं. त्याचा आवाज ऐकून दुसरंही ओरडलं, पण आताही एकदाच ! अर्थात टीम सदस्यांना दुसऱ्या पिल्लाचा आढळ कळायला तेव्हढं ओरडणं पुरेसं होतं. दुसरं पिल्लू जवळपासच कुठेतरी आहे, हे आता नक्की झालं होतं. कदाचित ते सहज नजरेला पडणार नाही अशा रितीने कॅमॅफ्लॉज झालेलं असावं. आता सगळी टीम आल्यावर पुन्हा एकदा रानमोडीच्या जंगलाचा परिसर पिंजायचा असं ठरलं.

एकतर आवाज येणारं पिल्लू मिळायला हवं होतं किंवा सध्या टीमच्या सोबत असलेल्या पिल्लाला मादी बिबट्याने येऊन घेऊन जाणं आवश्यक होतं. तासाभराने पुन्हा टीम एकत्र जमली. सर्वांनी जेवण केलं आणि ३ वाजताच्या सुमारास पुन्हा शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी ४ च्या सुमारास माडाच्या झाडाखाली दगडांच्या दरी सदृश्य कपारीत गर्द झावळ्यांमध्ये दुसरं पिल्लू अंग चोरून खूप आत दडून बसलेल्या अवस्थेत आढळलं. ते पिल्लू नर जातीचं होतं. ज्या ठिकाणी हे पिल्लू आढळलं त्या ठिकाणी दोघांच्या टीमने पूर्वी दोनदा फेरफटका मारलेला होता. पण तेव्हा पिल्लू दिसलेलं नव्हतं. डोळ्यातून प्राण गेल्यावर माणसाचे उघडे डोळे जसे जाणवतात तसं बिबट्याच्या या दुसऱ्या पिल्लाकडे बघून क्षणभर जाणवलं. त्याचं शरीर कॅमॅफ्लॉज झालं होतं. दुपारी १२ वाजेपर्यंत दोनदा कॉल दिल्यानंतर चारेक तासांनी ते दिसलेलं होतं. त्याच्या पोटाची हालचाल जाणवल्यावर टीमच्या जीवात जीव आला. पिल्लाला वाहेर काढलं तेव्हा तर ते गुरगुरत अंगावरच आलं. त्याची तपासणी केली. ते सशक्त होतं. सुरुवातीला एकमेकांवर गुरगुरून झाल्यावर काही वेळांनी दोन्ही पिल्लं एकमेकांत रमली. आता दोन्ही पिल्लांना बॉक्समध्ये एकत्रित पाहिलं तर दुसर मिळालेलं पिल्लू हे पहिल्यापेक्षा २/४ दिवसांनी मोठं वाटत होतं. पण तसं ते नसावं. खरंतर पहिलं भेटलेलं पिल्लू अधिक सशक्त असावं. म्हणूनच तर ते श्रीविठ्ठलाई ते श्रीविंध्यवासिनी असं डोंगर ओढ्याच्या मार्गाने उतरून मादीसोबत फिरत फिरत खाली आलेलं होतं. पहिलं पिल्लू भेटलं तेव्हा अशक्त होतं कारण ते डी-हायड्रेट झालं असावं. दोन दिवस त्याला काही खायला, आईचं दूध प्यायला मिळालेलं नव्हतं. टीमने दूध पाजलं पण ते दूधही पिल्लू सुरुवातीला पित नव्हतं. जेवढं पित होतं ते पोषणाच्या दृष्टीने कमी होतं. अशा विषयात मादी बिबट्यांना काऊन्ट नसतो. विंध्यवासिनी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने अडचण जाणवली असल्याने मादी बिबट्या आल्या पाऊली परत फिरली असावी आणि येताना तिच्यासोबत आलेलं पिल्लू ती निघून जाताना मात्र खालीच राहिलं. मादीने डोंगरावर श्रीविठ्ठलाई जवळच्या पिल्लाला मात्र दूध पाजलं असावं. नंतर ती इथून निघून गेली असावी. कदाचित म्हणून सापडलेलं दुसरं पिल्लू सशक्त असण्याबरोबर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला की बचावात्मक पवित्र्यात यायचं. नखं बाहेर काढून सर्वांच्या अंगावर यायचं, गुरगुरायचं. यातला योगायोग असा की पाहिलं श्रीविंध्यवासिनीजवळ मिळालेलं मादी जातीचं पिल्लूही सायंकाळी ४ वाजताच मिळालं होतं. दोन्ही पिल्लं ताब्यात मिळाल्यावर वन खात्याच्या एस.ओ.पी. नुसार अशा प्रसंगात सापडलेल्या वन्यजीवांना हाताळण्याबाबतच्या नियमावलीनुसार काम सुरु झालं. दोन्ही पिल्लांसाठी पुन्हा प्लायवूडचा बॉक्स बनविण्यात आला. श्रीविंध्यवासिनीजवळ सापडलेल्या पिल्लासाठी पहिल्यांदा बनविलेला जाड फळ्यांचा लाकडी बॉक्स मोठा होता. तो डोंगरावर आणणे कठीण होते. म्हणून नवीन बॉक्स बनविण्यात आला. ट्रॅप कॅमेरा झाडाला लावता येईल अशी बिब्बीच्या झाडाजवळची जागा निश्चित करण्यात आली.


मादी बिबट्या आली तर ती बॉक्समधल्या पिल्लांना घेऊन जाईल असा अंदाज होता. वन्यजीवांत बिबट्याची जात धूर्त आणि हुशार मानली जाते. एव्हाना खरंतर बिबट्याचा जंगलात सक्रीय होण्याचा वेळ सुरु झाला होता. म्हणून सायंकाळी अंधार पडेपर्यंत सारी टीम सुरक्षित अंतरावर थांबली होती परंतु मादी बिबट्या आली नाही. शेवटी पिल्लांना बॉक्समध्ये ठेवून त्यावर ट्रॅप कॅमेरा लावून सारे चिपळूणला निघून आले. रात्री जेवणानंतर पुन्हा टीमने अख्या धामणवणे गावाला एक फेरफटका मारला. गावातल्या कोणाची गाय, कुत्रं (कॅटलकेस) मारलं गेलं आहे का ? याचा शोध घेतला. मात्र संपूर्ण गावात असं काहीही घडलेलं नव्हतं. कोणाला मादी बिबट्या दिसलेलीही नव्हती. १५ दिवस आधी मात्र गावातल्या अनेकांनी बिबट्याला पाहिलेले होते. पाहणाऱ्यांना बिबट्या जातीने नर की मादी हे सांगता येत नव्हते. रात्रीचा फेरफटका मारून परतताना, पाणवठ्यावरून श्रीगणपती मंदिराच्या परिसराकडे येणाऱ्या मार्गावर, ‘कोणाचा आवाज येतोय का ?’ हे ऐकायला टीम थांबली.तेव्हा त्यांना मादी बिबट्याने एका मातीच्या ढीगाऱ्यावर उभ्या असलेल्या अवस्थेत दर्शन दिलं. पण तेव्हा ना मादी ना ही मंडळी पिल्लांजवळ होती.


चौथ्या दिवशी पहाटे, १४ तारखेला टीमने सात-सव्वासातच्या सुमारास जाऊन ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबता क्षणी सारेजण शहारले. कारण ६ वाजून ५७ मिनिटांनी मादी बिबट्या खोक्याच्या शेजारी बसलेली असल्याचा शेवटचा फोटो अचानक डोळ्यासमोर आला. अर्थात टीमच्या आगमनाची चाहूल लागताच २/४ मिनिटात मादी बिबट्या निघून गेली होती. हे लक्षात आल्याने आणि मादी बिबट्या जवळपास कुठेतरी असू शकते या जाणीवेने टीम आल्यापावली मागे फिरली. खोक्यापासून दूर सुरक्षित अंतरावर गेली. गडबडीत कॅमेऱ्याचं शटर बंद करायचं राहिलं. व्ह्यू फाईंडरचं बटन दाबून शेवटचा फोटो चेक केल्यावर कॅमेरा पूर्वस्थितीत आणायचाही राहून गेला होता. सकाळी ११ वाजता कॅमेरा पुन्हा सुरु करण्यात आला. पहिल्या ३ दिवसात पिल्लांकडे मादी बिबट्या न फिरकल्याने, एवढ्या मोठ्या कालखंडात, पिल्लांच्या हाताळणीत एकदाही टीमला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणारी, ‘मादी बिबट्या अशी का वागत्येय ?’ असा प्रश्न निर्माण झाला होता. पिल्लांच्या असण्याच्या काळातलं मादी बिबट्याचं हे वर्तन थोडं अचंबित करणारं होतं. तत्पूर्वीपर्यंत, ‘मादी बिबट्या मेलेली असावी !’ असाच कयास टीमने बांधला होता. वन्यजीव नियमावलीनुसार अशाप्रसंगी पिल्लांच्या आईच्या येण्याची किमान सहा दिवस वाट पाहायची असते. त्यानंतरच पिल्लांना देखभाल केंद्रात दाखल करायचे असते. या प्रक्रियेसाठी अजून दोन दिवसांचा अवकाश होता. बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना दूध पाजून (फिडिंग), तपासणी करून खोक्यात ठेवलं गेलं. चौथा दिवस सरताना रात्री उशीराच्या फेरफटक्यात गावातल्या एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर मादी बिबट्या दिसली. रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्यावर असलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी, हे पाणी वाहात जात असलेल्या शेतातही नंतर ती दिसली.


पाचव्या दिवशी, १५ तारखेला सकाळी येऊन ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं तेव्हा मादी बिबट्या बॉक्समधील पिल्लांना चाटत असलेलं दिसलं. मादीची पिल्लांप्रती असलेली वत्सलभावना ट्रॅप कॅमेऱ्याने बरोबर टिपलेली होती. खरंतर तेव्हा ती पिल्लांना बॉक्समधून बाहेर काढू शकत होती. पण तिने तसं करणं टाळलेलं होतं. इतकंच काय ? स्वतःच दूध पाजलं नव्हतं की पिल्लांना आपल्यासोबत नेलं नव्हतं. ‘कोणीतरी हा ट्रॅप तर लावलेला नसेल ना ? मी बॉक्सच्या आत गेले तर अडकेन ?’ अशा विचाराने मादी बिबट्या खोक्यात गेलेली नसावी. बॉक्सची सध्याची जागा असलेल्या आजूबाजूला अनेकांच्या आंबा-काजूच्या बागा आहेत. काही जागा नुसत्या कुंपण घातलेल्या आहेत. सकाळी अनेकजण इथल्या जवळच्या मार्गावरून मॉर्निंग वॉक करत असतात. त्यामुळे दुसरा तर्क असा होता की मादी बिबट्याच्या दृष्टीने सध्याची पिल्लांची जागा हीच सर्वाधिक सुरक्षित होती. पिल्लांना घेऊन जाण्यासाठी दुसरी सुरक्षित जागा तिला तोवर सापडली नसावी किंवा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नसावा. दिवसभरात चिपळूण शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या कचरा डेपो परिसरातल्या छोट्याश्या पाणवठ्यावर एका जेसीबी ऑपरेटरलाहीआज बिबट्या दिसला होता.

सहाव्या दिवशी, १६ तारखेला ट्रॅप कॅमेऱ्यात पाहिलं असता आदल्या रात्री १ ते ३ वाजेपर्यंत मादी बिबट्या पिल्लं असलेल्या बॉक्सजवळ बसून राहिली असल्याचे दिसले. तेव्हा ती अधून मधून इकडे तिकडे आजूबाजूला न्याहाळत राहिली होती. काहीवेळ बॉक्सच्या भोवती गोल-गोल फिरत होती. मध्येच खोक्यात डोकावून पिल्लांकडे पाहात होती. पण एवढं होऊनही पिल्लांना खोक्याबाहेर काढायचं तिने टाळलं होतं. पण यामुळे मादी बिबट्या रात्रीची पिल्लांजवळ येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. म्हणजे जागेसाठी कुठेतरी तिची पाहाणी सुरु असणार हे निश्चित झालं. फक्त तिची ही जागेची पाहाणी कोणाच्या निदर्शनास येत नव्हती. सलग दोन दिवस पिल्लं एकाच ठिकाणी असल्याने ती सुरक्षित असावीत, हेही तिनं मान्य केलं असावं. स्वतः जागा शोधण्याच्या निमित्ताने पिल्लांपासून लांब गेल्यावर तीही सुरक्षित आणि पिल्लंही सुरक्षित असं तिचं काहीसं वेगळं दुर्मीळ वर्तन सध्या जाणवत होतं. टीमने सध्याच्या बॉक्सला आतून आणि वरून गोणपाट लावलेले होते. त्याला वरती एका ठिकाणी थोडीउघडीक ठेवलेली होती. जेणेकरून गोणपाट फाडून मादी बिबट्या सहज पिल्लांना बाहेर काढू शकेल. पण मागच्या २/३ रात्रीतील अनुभवामुळे तेही तिला अवघड ठरत असावं असं वाटल्याने आज टीमने अशा मोहिमांत उपयुक्त ठरणारे भाजीपाल्यासाठी वापरले जाणारे दोन क्रेट आणले. क्रेट धुतले. मादीला जवळपास कुठेही मनुष्यसदृश्य वास येऊ नये यासाठी क्रेटना माती लावली. पिल्लांची हाताळणी करताना हँडग्लोव्ज वापरण्यात आले. एका क्रेटमध्ये तळाला पिल्लं ठेवण्यात आली. दुसरा रिकामा क्रेट पहिल्यावर उपडी ठेवण्यात आला. त्यावर मादी बिबट्या वरचा क्रेट सहज ढकलू शकेल एवढ्या वजनाचा दगड सुरक्षितेसाठी ठेवण्यात आला. सगळाच अभ्यास सुरु होता. चिपळूण वन्यजीव अभ्यासक टीम यासंदर्भात राज्यातल्या तज्ज्ञांशी बोलत होती. त्यातून या नवनव्या क्लुप्त्या लढवल्या जात होत्या. आज दिवसभरात सकाळी बैल घेऊन शेतात जाणाऱ्या मंडळींना एक-दोनदा तर एकदा १/२ मुलांनी बिबट्याला पाहिलं होतं.


एवढे प्रयत्न करूनही सातव्या दिवशी, १७ तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा आदल्या रात्रीही मादी बिबट्या स्वतः पिल्लांजवळ येऊनही त्यांना सोबत घेऊन गेली नव्हती. तेव्हाही ती क्रेटच्या आजूबाजूला फिरत राहिली. काहीवेळ क्रेटजवळ बसून राहिली. आता दिवसभर पिल्लांजवळ न थांबता सायंकाळी मावळतीच्या वेळेस पाहाणीसाठी यायचं टीमचं सर्वानुमते ठरलं. सायंकाळी टीम पोहोचण्यापूर्वी मादी बिबट्या क्रेटजवळ बसलेली असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात दिसले. मादी बिबट्याच्या निघून जाण्याच्या आणि टीमच्या पोहोचण्याच्या वेळेत पाचेक मिनिटांचं अंतर होतं. हे असं दुसऱ्यांदा घडत होतं. मादी बिबट्याच्या वावरावरून ती सुरक्षित जागा शोधत असल्याच्या निर्णयाप्रत सारे आले. मादी बिबट्या पिल्लांना नक्की नेईल असा विश्वास वाटू लागला. पिल्लांना पुन्हा दूध पाजण्यात आलं. त्यांची तपासणी करण्यात आली. टीमने पिल्लांची जागा आणि क्रेट बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोजच्या जागेपासून साधारणपणे १० फूट अंतरावर जाणवलेल्या विणीच्या जागेवर एकावर एक रचलेल्या वीटांचे पेटी सदृश्य आकाराचे कच्चे बांधकाम करण्यात आले. त्यात दोन्ही पिल्लांना ठेवण्यात आले. वीटांच्या बांधकामाचा वरचाभाग मोकळा आणि जवळपास नैसर्गिक वाटेल असा साकारलेला होता. नव्याने दोन ट्रॅप कॅमेरे सेट करण्यात आले. रात्री काहीवेळ सुरक्षित अंतरावरून पाहाणी करण्यात आली.

आठव्या दिवशी, १८ तारखेला सकाळी येऊन पाहिलं तेव्हा दोन्ही पिल्ले विटांच्या कच्च्या बांधकामात आढळून आली नाहीत. ट्रॅपकॅमेरा बंद पडलेला होता. मादी बिबट्या आपल्या दोन्ही पिल्लांना घेऊन सुरक्षित अधिवासात रवाना झाली होती. दोन्ही पिल्लं चालणारी असल्याने तोंडातून नेण्याची आवश्यकता नव्हती. विषयाची खात्री करण्यासाठी पुढील २/३ दिवस टीमने निरीक्षण केले. मादी बिबट्या, तिची पिल्लं दिसली नाहीत. मादीने आपल्या पिल्लांना सुरक्षित सोबत नेल्यावर शिक्कामोर्तब झाले. चिपळूणला वन विभागात दोन ट्रॅप कॅमेरे उपलब्ध होते. रत्नागिरीतूनही आणखी कॅमेरे मागविण्यात आले होते. शेवटीशेवटी भौगोलिक स्थितीनुसार प्रत्यक्ष जागेवर तीन कॅमेरे लावण्यात आले. प्रत्यक्षात दोन कॅमेरे अचानक बंद पडले. एक जो कॅमेरा चालू होता त्यात कोणताही क्लिक मिळाला नाही, अर्थात तोही कॅमेरा खराब झाला होता. शेवटच्या क्षणी ट्रॅप कॅमेरा बंद पडल्याने शेवटच्या क्षणाचे डिटेल्स टीमला मिळवता आले नाहीत. नवीन जागी पिल्लांसह आल्यावर वन्यजीव शक्यतो जागेवरून हलत नसतात. मागच्या पाचेक दिवसात मादी बिबट्या काहीतरी व्यवस्थित खाऊन आलेली असावी. अशात पुढचे सलग २/३ दिवस एका ठिकाणी थांबण्याची क्षमता या वन्यजीवात असते. दोन पिल्लांना दूधाशिवाय अन्य काही खायला देऊन चालणारं नव्हतं. त्यामुळेच मादी बिबट्या दिसली नसावी.


एसआर. रेडिज जंगल रिसॉर्टमधील हेलिकॉप्टरच्या रनवेवर ५ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जोरजोरात डरकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने मादी बिबट्या तिथून चालत गेली असावी अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली होती. ‘मादी बिबट्या पिल्लांना घेऊन फिरते आहे का ?’ हे पाहाणे वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचे होते. अर्थात दिसणारी मादी बिबट्या ही तीच !’ असं लगेच म्हणणंही धाडसाचं ठरणारं होते. पण तरीही मादी बिबट्याच्या सोबतीला तिची दोन्ही पिल्लं असतील तर कदाचित ओळखणं सोपं जाईल असं टीमला वाटतं होतं. मादीने आपल्या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्यानंतर जवळपास दोनेक आठवडे ही मंडळी, मादी-पिल्लांना जगण्यात पुन्हा काही अडचण तर आलेली नाही ना ? या कारणाने त्यांच्या शोधात राहिली. पण मादी दिसली नाही. काही ठिकाणी पाऊलखुणा मात्र सापडल्या. पण त्या तिच्याच कशावरून ? हाही प्रश्न होता. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सकाळच्या वेळेत श्रीविठ्ठलाई मंदिरापलिकडे असलेल्या कचरा डेपोदरम्यानच्या जागेत पहिल्यांदा मादी बिबट्या आणि पाठोपाठ एक पिल्लू पाहाण्यात आलं. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शेंबेकर यांच्या बागेच्या खालच्या बाजूला असलेल्या जंगलसदृश्य गवताळ जमिनीवर कोणीतरी लोळलेलं निदर्शनास आलं. तेव्हा त्या परिसराची पाहणी केली असता अर्ध्या तासाने बिबट्या मादी आपल्या दोन पिल्लांसह कचरा डेपोच्या दिशेने चालत जाताना दिसली. या दोन्ही नोंदी प्रत्यक्षदर्शी निलेश बापट यांनी केल्या. शेंबेकर यांचे बागेतील कामगार कांबळी यांनीही मे महिन्याच्या अखेरपर्यंत तीन वेळा मादी बिबट्याला पिल्लांसह पाहिल्याचे सांगितले. मादी बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर धामणवणे गावातून माहिती घेतली असता गावातील ३/४ कुत्रे गायब असल्याचे समोर आले. या भागातील लोकांची पावसाळापूर्व शेती वगैरेची कामे नियमित सुरु होती. मात्र बिबट्याने कुणाची गाय वगैरे मारल्याची नोंद झालेली नव्हती. मादी बिबट्या ही कदाचित या भागातल्या चिपळूण कचरा डेपोवर पोसलेली कुत्री आणि क्वचित प्रसंगी मिळणारं भेकर मारत असावी, असे अनुमान काढण्यात आले.

मादी बिबट्या आणि तिच्या पिल्लांची ही भेट घडवण्यासाठी कोल्हापूरचे मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमंट बेन, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, उपविभागीय वनाधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील, कोळकेवाडीचे वनरक्षक राजाराम शिंदे, चिपळूणचे वनपाल किशोर पत्की, रामपूरचे वनरक्षक दत्ताराम सुर्वे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद खेडकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, ओंकार बापट, अॅड. चिन्मय दीक्षित, रोहन शेंबेकर आदिंनी परिश्रम घेतले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून आत आलेल्या चिपळूण नजीकच्या डोंगररांगेत असा प्रयत्न पहिल्यांदाच होत असल्याने विशेष काळजी घेण्यात आली होती. जुन्नरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर, प्रसिद्ध वन्यजीव संशोधक आणि बिबट्याच्या अभ्यासक डॉ. विद्या अत्रेय यांचेही यासाठी मार्गदर्शन घेण्यात आले.


बिबट्या अंगावर आला तर माणसाच्या मांडीला चावा घेऊ शकतो. कारण आपली मांडी ही चालताना त्याच्या तोंडाजवळ येत असते. तो मांडी बाद करू शकतो, पंजा मारू शकतो. म्हणून अशा वेळी हाता-पायावर क्रिकेटसारखे पॅड, मानेला कॉलर, डोक्यावर हेल्मेट असलेला विशिष्ठ पेहेराव करून वावरावे लागते. टीममधल्या एक-दोघांनी तो ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसवर असताना बिबट्याने हल्ला केला तर माणूस दगावण्याचा धोका कमी होतो. यातल्या पॉवरपॅक हेल्मेटमुळे बाहेरचा आवाज येत नसतो. ड्रेसमुळे हातापायाच्या हालचालीवर परिणाम होत असतो. त्यामुळे टीममधले सगळेजण तो ड्रेस घालत नसतात. वन्यजीवाने हल्ला केला तर त्याला हाकलणे हे पहिले काम असते. म्हणून इतरांच्या हातात, जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून वापरली जाणारी फेसशिल्ड आणि काठ्या असतात, त्या यावेळी वापरण्यात आल्या. टीममधला एकजण दूर उंचीवर उभा राहून ‘वॉचटॉवर’ सारखा कक्षेतल्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून होता. धामणवणेतील मादी बिबट्याचा हा विषय खूप गुप्त ठेवण्यात आला होता. गावातल्या विचारणाऱ्या माणसांना नीटसं सांगितलं गेलं नव्हतं. अन्यथा विषय जिकडेतिकडे पसरून लोकांची गर्दी वाढली असती. प्रत्यक्ष काम करताना त्रास झाला असता. ४/५ वर्षांपूर्वी चिपळूण गुहागर मार्गावरील उक्ताडला भेकर आणि नंतर एकदा बिबट्याचं पिल्लू मिळालेलं होतं. तेव्हा शेकडोंचा जनसमुदाय जमा झालेला होता. आपल्याकडे एखादा साप किंवा अजगर मिळाला तरी अशीच अवस्था असते. पिल्लं सोबत असताना कोणतीही वन्यजीव मादी आक्रमक असते. ती इतरांना त्रास देऊ शकते. या निकषाचा विचार करता प्रस्तुत घटनेतील मादीच्या घरा-दारात आठवडाभर टीमची सारी मंडळी वावरत राहिली. तरीही मादी बिबट्याने यांच्यातल्या कोणालाही त्रास दिला नाही. स्वतःलाही त्रास करून घेतला नाही. पिल्लांना दूध पाजलं नाही. ज्या पट्टयात हे घडलं त्या धामणवणे भागात क्वचित प्रसंग वगळता अनेकांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिलेला नव्हता. २ वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसात धामणवण्यात मादी बिबट्या फासकीत अडकलेली होती. त्यानंतर गेल्या २ वर्षात बिबट्या कोणालाही दिसलेला नव्हता किंवा बिबट्याची माणसासमोर यायची वेळ जुळलेली नव्हती. बिबट्या काय किंवा जंगलातले अन्य वन्यजीव काय ? ते माणसांच्या हालचाली दुरून पाहात असतात. माणसाची चाहूल लागताच सावध होतात. सुरक्षित ठिकाणी कॅमॅफ्लॉज होतात. जो वन्यजीव माणसासमोर येत नाही किंवा अनेक दिवसात आलेला नाही तो प्रस्तुतच्या घटनेप्रमाणे स्वतःच्या बचावाच्या दृष्टीने मनुष्यासमोर येणं टाळतो, असं मत निलेश बापट यांनी नोंदवलं.


संपूर्ण कोकणाला जैव विविधतेतील विविध परिसंस्थांची निसर्गदत्त देणगी लाभली आहे. पट्टेरी वाघासह बिबट्या, रानडुक्कर, माकड, उदमांजर, खवले मांजर, रानगवा, सांबर आदी सस्तन प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, कीटक, फुलपाखरे, मगरीसारखे उभयचर प्राणी, सरीसृप वर्गातील प्राण्यांचा येथे आढळ आहे. इथल्या अति वनाच्छादित क्षेत्रात आव्हानात्मक सेवा बजावणे हे नेहमीच शासन प्रतिनिधी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारे ठरते. कोकणातले वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे सामुदायिक समन्वयाच्या माध्यमातून स्थानिक वन्यजीव अभ्यासकांच्या साहाय्याने अनेकदा आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडतात. यातला बिबट्या हा प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतो आणि मानव-वन्यजीवांच्या संघर्षाला तोंड फुटते. हे आपण नेहमी वाचतो, दूरचित्रवाहिन्यांवर पाहातो. खरंतर हा संघर्ष घडावा असं कोणाच्याही मनात नसताना ते घडतं. पण याच निसर्गात ‘वन्यजीव संवर्धन मोहीम’ही यशस्वी होत असतात. समाज म्हणून आपण सर्वांनी त्याकडेही डोळसपणे पाहायला शिकायला हवंय. विशेषत शासकीय वन्यजीव संवर्धन मार्गदर्शक तत्त्व प्रणालीस अधीन राहून, कमालीची गुप्तता पाळून एखादी मोहिम यशस्वी केली जाते तेव्हा ती मानव आणि वन्यजीव यांमधले सकारात्मक नात्याचे नवे दोर विणण्याचा प्रयत्न करत असते. धामणवणे येथील घटनेतील मादी बिबट्याच्या वर्तणुकीतील अनोख्या वत्सलभावनेच्या नोंदीने हेच काम केले आहे. ते समाजाने आणि सजग निसर्गप्रेमींनीआवर्जून समजून घ्यायला हवे आहे.

अशा कामांचं यश हे टीमच्या संयमावर अवलंबून असतं. एखादी टीम दुसऱ्याच दिवशी कंटाळली आणि त्यांनी ‘फिमेल मेलेय !’ असं रिपोर्टिंग वन खात्याच्या वरिष्ठांना केलं तर हा सगळा विषय संपू शकला असता. पिल्लांची रवानगी कधीच बाहेर न पडण्याकरिता जुन्नर किंवा बोरिवली अनाथालयात झाली असती. पण या टीमच्या सक्रीयतेमुळे असं चुकीचं काही घडलं नाही. दुसरं असं की श्रीविठ्ठलाई मंदिराकडचं पिल्लू प्रकाशात आलं नसतं तर कदाचित सारी टीम श्रीविंध्यवासिनी मंदिराजवळ नियमानुसार आठवडाभर बसून राहिली असती. सरतेशेवटी कदाचित काहीही हाती लागलं नसतं. सुरवातीला ४/५ दिवस होऊनही मादी बिबट्या पिल्लांना नेत नव्हती. अशा स्थितीत शासनाचे आठवडाभराचे असलेले एस.ओ.पी.चे नियम खूप चांगले आहेत. आपण निसर्गात कार्यरत सर्वांनी ते न थकता संयमपूर्वक पाळायला हवेत, हे या घटनेतून सिद्ध झालं.


प्रस्तुतची मादी बिबट्या सुरक्षित जागेसाठी धडपडत होती. ती पिल्लांजवळ यायची, त्यांना बघायची. काही काळ थांबायची आणि परत फिरायची. पिल्लांजवळ एखादा कुत्रा किंवा गाय गेली असती तर तिने नक्की हल्ला केला असता. पण माणूस म्हटल्यावर तिलाही काहीशी भिती वाटली असावी. अर्थात हाही तर्क आहे. कारण मादी बिबट्याचं असं वर्तन आजवर कोठेही आढळून आलेलं नाही. पिल्लं असताना मनुष्यासह कोणीही मादीच्या कक्षेत जाण्याचा प्रयत्न केला तर मादी आक्रमक होते असाच वन्यजीव शास्त्राचा अनुभव सांगतो. त्यामुळे मादी बिबट्याने असं दुर्मीळ वर्तन का केलं असावं ? याबाबतचे अनेक तर्क आपण समजून घेतलेत. तरीही या मागचं निश्चित कारण ती मादी बिबट्याच आपल्याला सांगू शकेल.

 

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड,चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.

मो. ९८६०३६०९४८. ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,

ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २४ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.) 


पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2021’, पृष्ठ क्र. 187


आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...