गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

आबालवृद्धांच्या उत्साही पदभ्रमणाने ‘तिवरे ते मालदेव जंगल ट्रेक’ सुरु

मालदेव हद्दीत आल्यानंतर सह्राद्रीच्या
विशालतेसोबत निसर्गप्रेमी पर्यटक.
चिपळूण : भारत सरकारने सन २००८ साली निर्माण केलेल्या ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या चिपळूण तालुक्यातील ‘बफर आणि कोअर झोन’च्या सीमांपर्यंत घेऊन जाणाऱ्या अडीच हजार फुट उंचीवरील तिवरे ते मालदेव जंगल ट्रेकची १६ कि.मी. भटकंती नुकतीच ३० निसर्गप्रेमी आबालवृद्धांच्या सान्निध्यात उत्साही पदभ्रमणाने सुरुवात झाली. चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणारी ‘मातृसंस्था’ ग्लोबल चिपळूण पर्यटन या संस्थेने संयोजकत्त्व स्वीकारलेल्या या जंगल ट्रेकचे अलिकडेच उद्घाटन झाल्याच्या पार्श्वभूमीवर, वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने हा पर्यटनाभिमुख साहसी उपक्रम पहिल्या बॅचसह सुरु करण्यात आला.
  
भारतीय संस्कृतीप्रमाणे ट्रेकच्या सुरुवातीला तिवरेची ग्रामदेवता असलेल्या श्रीदेवी व्याघ्रांबरीला श्रीफळ अर्पण करण्यात आला. या परिसरात उपस्थितांना उपक्रमामागील भूमिका सांगण्यात आली. कोकणात समुद्र पर्यटनासोबत आगामी काळात ‘सह्याद्री पर्यटन’ बहरायला हवे आहे. असंख्य निसर्ग अभ्यासक, डोंगरभटके यांच्या सततच्या वावराने मनुष्य संपर्कात असलेल्या सह्याद्रीत पर्यटकांची पाऊले वळावीत, त्यातून सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांना, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा या उपक्रमामागचा मूळ हेतू आहे. या पहिल्या एकदिवसीय ट्रेकमध्ये डॉ. अरूण पाटील, सावर्डे पोलिस कर्मचारी रमा करमरकर, सेवानिवृत्त शिक्षिका शालन रानडे, संदीप चिंगळे, 'नेस्ट' संस्थेचे कार्यकर्ते किशोर मानकर, विद्या कोकण कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका गार्गी सरखोत, प्राथमिक शिक्षिका आखाडे, श्रीपरशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्राचे विलास महाडिक, शालेय विद्यार्थी नेहा महाडिक, कौशिक करमरकर, सुरभी म्हापाते, प्रथमेश पाटील, ट्रेकचे संयोजन करणा-या 'ग्लोबल चिपळूण टुरिझम' संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडिज, मॅनेजर विश्वास पाटील, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, ट्रेकचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, तिवरे ग्रामपरिस्थितीय विकास समितीचे अध्यक्ष हणमंत शिंदे, सदस्य सुरेख शिंदे, तिवरे विविध सहकारी सोसायटीचे सचिव पांडुरंग शिंदे, 'पर्यटक गाईड' ट्रेनी म्हणून सहभागी झालेले उदय मुकुंद शिंदे, प्रतिक यशवंत शिंदे, प्रिती गंगाराम शिंदे, निखिल कृष्णाजी शिंदे, विक्रांत संतोष शिंदे, मंगेश पवार, सुरेश गणपती बालुगडे, सिद्धेश सुभाष दळवी, वाटाड्या शांताराम कोकरे, राजू शिंदे, वनपाल अमित वाझे, खंडेराव कटकडे, फॉरेस्ट गार्ड सुभाष आणि गेली अनेक दशके मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक राहिलेले शामराव कोकरे आदि सहभागी झाले होते.

तिवरे धरणाच्या उजवीकडील, भेंडवाडीतील उंच टापूवर गाड्या उभ्या करून ठेवून धरणाच्या डाव्या तीरावरून ट्रेकची सुरुवात झाली. तिवरे ते मालदेव हा बैलमारव आणि व्याघ्रांबरी घाटातील प्रवास अनेकांना प्राचीन  इतिहासाची आठवण करून देत होता. याच घाटमार्गे तिवरे गावात प्रवेश केलेल्या देवीने ज्या ठिकाणी काहीकाळ विसावा घेतला होता तिथेच घाटाच्या मध्यभागी श्रीदेवी व्याघ्रांबरीचे स्थान आहे. सर्व निसर्गप्रेमी पर्यटकांनी या ठिकाणी काही काळ विश्रांती घेतली. तीन तासांच्या पदभ्रमणानंतर ‘बफर आणि कोअर झोन’च्या सीमांवर असलेल्या अडीच हजार फुट उंचीवरील मालदेव गाव सीमेत प्रवेश केल्यानंतर सुखावणाऱ्या थंड वाऱ्याने सर्वांचे स्वागत केले. मालदेव हद्दीत डाव्या बाजूस असलेल्या उंच टापुवरून, सह्याद्रीच्या विशालतेचे दृश्य सर्वांनी आपापल्या नजरेत सामावून घेतले. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी दोन खोल्या बांधण्याचे काम या ठिकाणी सुरु असल्याचे दिसले. याच ठिकाणी सर्वांनी ‘वनभोजन’ केले. जवळच असलेल्या एका जीवंत झऱ्याच्या पाण्याने सर्वाची तहान भागविली. या ठिकाणी ट्रेकचे मार्गदर्शक निलेश बापट यांनी, ट्रेक  कशासाठी ? याबाबत बोलताना ‘मनुष्याला अरण्यवाचन आल्यासच ‘जंगले’ टिकतील’ ही आपली भूमिका सर्वांना समजावून सांगितली. इथल्या निसर्गात आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती त्यांनी यावेळी दिली. मालदेव ट्रेक करणाऱ्या असंख्य डोंगरभटक्यांचे स्थानिक मार्गदर्शक राहिलेल्या शामराव कोकरे यांना विविध प्रश्न विचारून पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. जंगली श्वापदांची शास्त्रीय माहिती बाजूला ठेवून शामरावांसोबतच्या गप्पांमधून खरं जंगल जाणण्याचा अनेकांचा शिरस्ता यावेळीही पाळण्यात आला. सह्याद्रीच्या सानिद्ध्यातील तिवरे हे ऐतिहासिक गाव आहे. ग्रामदैवत श्रीदेवी व्याघ्रांबरी देवस्थानचा ञैवार्षिक जञोत्सव (समा) आपली सुमारे पाचशे वर्षांची परंपरा जोपासून आहे. गावात सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गंगेचीवाडी भागात, खडकाळ नदीप्रवाहाच्या तीरावर  ‘गंगाकुंड’ आहे. या कुंडात दर तीन वर्षांनी कार्तिक महिन्यात गंगा उगम पावते. या पर्वणी काळात गंगास्नानास भाविक, जिज्ञासू, पर्यटक यांची येथे रीघ लागलेली असते.  

वन्यजीव परीक्षण आणि पर्यटनासह ट्रेकींग करणाऱ्यांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने उघडल्यानंतर हा ट्रेक यशस्वी करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र राखीव व स्थानिक ग्रामविकास परिस्थितीय विकास समितीच्या माध्यमातून महाबळेश्वर ते आंबा घाट दरम्यान पर्यटन व  टेकींगसाठी ८ हॉट स्पॉटनिवडण्यात आले आहेत. त्यापैकी तिवरे ते मालदेव हा एक आहे. भविष्यात या ट्रेकचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांनी विश्वास पाटील मो. ९८२३१३८५२४ येथे संपर्क साधावा.


दैनिक तरुण भारत रत्नागिरी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...