नेमिले तू करि
कर्म कर्तव्यचि म्हणोनिया : गीताई
कालच्या १७
ऑक्टोबरला आम्ही वयाची ३८ वर्षे पूर्ण करून ३९ व्या वर्षात पदार्पण केले. अत्यंत
शिस्तबद्ध जीवन जगण्याची कला मनुष्याला सततचे समाधान प्राप्त करून देत असते, याचा
अनुभव वयाच्या १७ व्या वर्षांपासून गेली २१-२२ वर्षे आम्ही घेत आलो आहोत. मानवी
जीवनात अनंत अडचणी सदैव येतच असतात, पण त्यावर सतत मात करून एकेक पाऊल पुढे
जाण्यातली गंमत काही औरच असते. संपूर्ण कुटुंबियांसह असंख्य वंदनीय ‘गुरुजी’, सच्चे
मार्गदर्शक, शिक्षक, जीवलग मित्र-मैत्रिणी आणि आबालवृद्धांच्या सानिद्ध्यात
आम्हीही हा अनुभव घेतला आहे.
वास्तविक चाळीशी म्हटले की अनेकदा
आपल्या भुवया उंचावतात, कधीकधी अस्वस्थही वाटू लागते. मलाही ‘सुटलेल्या पोटाची
कहाणी’ लिहावी लागते की काय अशी शंका होती ! असो... आपण किती वर्षे जगलो यापेक्षा कसे
जगलो यालाच जीवनात अधिक महत्त्व असल्याचे संदेश आपण फेसबुक / वॉट्सपवर सतत वाचत
असतो. तशा जगण्यातली मजा काही वेगळीच असते. गुणवत्तापूर्ण जगण्यासाठीही चाळीशीनंतरचा
काळ अधिक महत्त्वाचा असतो. वय वाढण्याची प्रक्रिया ही आपल्या जन्मापासूनच सुरूच असते.
शरीरात काही अपरिहार्य, अटळ बदल वयोमानानुसार होत
असतातचं ! ते मान्य करून जगण्याची सवय आपल्याला आनंद प्रदान करते. बालपणापासून आम्ही
वाट बघण्याचा अतिरेक आणि अतिघाई या मधला फरक समजून घेत जगण्याचा प्रयत्न करत आलो
आहोत. तरीही अनेकदा घाई होतेच ! कालच्या वाढदिनी आम्हांला फोन, फेसबुक, वॉट्सपवरून
शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आम्ही याद्वारे आभार व्यक्त करीत आहोत.
वीस वर्षांची
काय नवलाई ती, साखर तेव्हा कायतरीच स्वस्त होती !
बापानं आमच्या
वाटी वाटी वाटली ती, पहिल्या पुत्र लाभाकारणे !
घराणे तसे देवादिकातले,
भटजी आले, पाटावर बसले !
पंचांग उघडले,
आणि घातले, अवघे बोटचि की हो तोंडात !
सतरा ऑक्टोबरला
जन्म ज्याचा ज्याचा...
वयाच्या
विसाव्या वर्षी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ही ७२ ओळींची कविता आम्ही सादर केली होती.
दुर्दैवाने ती आमच्या कडून गहाळ झाली. पण या सुरुवातीच्या ओळी मात्र आजही आठवत
राहतात. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्यांना नक्की आठवतील. वीस वर्षांनंतर चाळीशीच्या
उंबरठ्यावर आज त्या पुन्हा शेअर कराव्याश्या वाटल्या.
आमच्या ‘नियोजित’ जीवनाला ‘अर्थ’ प्राप्त करून देणाऱ्या
सर्वांना पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद !!!
धीरज वाटेकर
विजयादशमी, दिनांक १८ ऑक्टोबर २०१८
सन २००० @ अलोरे ता. चिपळूण |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा