गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

वृक्षमित्र आबासाहेब मोरे आयोजित ‘भूतान पर्यावरण अभ्यास दौरा’

     
        निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरे पर्यावरण सम्मेलन आणि भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा नुकताच दिनांक १० ते २० नोव्हेंबर दरम्यान संपन्न झाला. महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी केला. भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेऊन त्याच्यांशी भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची  सर्वाना मिलालेली संधी या पर्यावरण अभ्यास दौऱ्याचे मोठे फलित म्हणावे लागेल.

      कुझोझाम्पुला म्हणजे भूतानच्या झोन्खा भाषेत नमस्कारगुड मॉर्निंग वगैरे हे आम्हाला तिथे गेल्यावर समजले. भूतान भू-उत्थान असा अर्थ होतो. येथे १ गुल्ट्रम = १ रुपया असा चलनाचा समसमान दर आहे. भूतान धूम्रपान बंदी करणारे ते जगातील पहिले राष्ट्र आहे. ताकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. राष्ट्रीय आणि सर्वात लोकप्रिय खेळ तिरंदाजी आहे. ३८३९४ चौ.कि.मी. पसरलेला भूतानफक्त १० लाख लोकसंख्याउतरेकडे २४००० फुट हिमशिखरापासून दक्षिणेकडील समुद्र सपाटीपासून ४५० फुट उंचीवर सपाट जमिनीवरील दाट जंगलापर्यंत पसरला आहे. ह्या देशात ५४०० प्रकारच्या विविध वनस्पती७०० हून अधिक पक्षी६०० पेक्षा अधिक प्रकार असलेले ऑरचीड४६ पेक्षा अधिक प्रकारचे Rhododendrons (गुलाबाचा एक प्रकार) आणि ३०० हून अधिक प्रकारच्या हर्बल वनस्पती (ज्याचा आयुर्वेदिक औषधासाठी उपयोग होतो ) दिसून येतात. २३००० फुट उंचीहून अधिक असणारी २० हिमशिखरे असलेला हिमालय ह्या देशाच्या उत्तरेला आहे. भूतानला पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी अधिक येतात. आम्हीही काही पक्षी पहिले. भूतानमध्ये पुरुष गुडघाभर लांबीचा घो” नावाचा रोब सारखा पोशाख घालतात. स्त्रिया तळपायाच्या लांबीपर्यंतचा किरा” नावाचा पोशाख घालतात. विविध रंगाच्या मफलरी आणि स्कार्फ वापरतात. भूतानच्या एकूण १० लाखपैकी २ लाख राजधानी थीम्पू मध्ये रहातात. ही जगातली एकमेव राजधानी आहे जिथे ट्रॅफिक सिग्नल्स नाहीत. हा भारताच्या पूर्वेकडील भागपहाडी प्रदेश असल्यामुळे येथे लवकर अंधार होतो. "ओम मणि पद्मे हुम" या मंत्राच्या त्रिकोणी पताका आपल्याला देशभर सर्वत्र दिसतात.


      या देशातून फिरताना सर्वांनी येथील लोकांची आनंदी जीवनशैली अनुभवली. शेजारचा अस्वच्छ जयगाव आणि स्वच्छ फुटशोलिंग येथेच त्या देशाची ओळख सर्वांना पटली. येथे तंबाखू विक्रीला, उघडयावर शौचास बंदी आहे. तेथील महामार्गावर जागोजागी शौचालय आहेत. चोरीचे कमी प्रमाण, नाल्यात, गटारात कचरा न टाकण्याची मानसिकता, स्मशानभूमीला चारही बाजूने असलेल्या सीमाभिंती, अस्वच्छता करणाऱ्यावर होणारी पोलिस कारवाई असे अनेक मुद्दे वेगळे भासले. भूतान मधील रस्ते आपले भारतीय आभियंते तयार करतात. हे रस्ते खड्डे विरहित अवस्थेत किमान ७ - ८ वर्षे टिकतात. डोंगर उतरावर सेंद्रीयशेती केली जाते. येथे ध्वनी प्रदूषण नाही. हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. येथे रस्त्यावर सिग्नल नाही. वाहतुकीला शिस्त आहे. रस्ता ओलंडताना झेब्राक्रॉसिंग वरुनच जावे लागतें. मनुष्य रस्ता ओलांडित असताना सर्व वाहने थांबतात. येथे वाहनाला गतीचे बंधन आहे. हवा, पाणी, जमीन, प्रदूषित होऊ नये याचे नियम कडक आहेत. येथे इमारतीला लाकूड मोठ्या प्रमाणात वापरतात. कोठेही स्टिकरफ्लेक्स जाहिराती दिसत नाहीत. मंत्री, पुढारी यांच्या वाढदिवस, शुभेच्छा आदि फलक नाहीत. लोक राजाला खूप मानतात. त्याबाबतचे फलक मात्र दिसतात. सद्यास्थितीत हा देश पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. भूतान देश शिक्षण, संस्कृती, स्वच्छताशिस्त, तेथील नागरिकांचे त्यांचा देश, राजाविषयीचे प्रेम, पर्यावरणसेंद्रियशेती याबाबतीत वेगळा आहे. गच्च भरलेला निसर्ग, महिला-पुरुष वर्गाचे कष्ट, चेहऱ्यावरील आनंद कौतुकास्पद वाटला. भूतान पर्यावरण संवर्धन बाबतीत जगात अग्रेसर आहे. भूतान देशात पर्यवारणाचा अभ्यास करताना या देशातील शिक्षण कसे आहे ? याचीही माहिती सर्वांनी घेतली. त्यासाठी परिसरातील, गावातील विविध शिक्षक, नागरिक, पालक, विद्यार्थी यांच्याशी चर्चा करण्यात आली. सर्वांनी भूतान देशातील पुनाखा शहराजवळील पोचू-मोचू नदीच्या संगमजवळ एका सरकारी शाळेला भेट दिली. या शाळेचा परिसर खूपच स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य व आकर्षक दिसला. शाळेची इमारत भव्य, सुसज्ज होती. विशेष म्हणजे शाळेत जैवविविधतेने संपन्न गार्डन होती. भूतानमध्ये १०-१२ वीपर्यंत  मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. येथे बहुतेक सर्व शैक्षणिक साहित्य मोफत मिळते. शाळेचा अभ्यासक्रम भूतान देश व इतर जगाची माहीती यावर आधारित आहे. येथे इयत्ता पहिलीपूर्वी प्री-प्रायमरी शिक्षण आवश्यक आहे. वर्गातील विद्यार्थी संख्या ३२-४० आहे. येथील प्रत्येक विषयाचा पर्यावरणाशी संबंध जोडलेला आहे, पर्यावरण हा विषय स्वतंत्र सक्तीचा आहे. वर्षातून २ वेळा परीक्षा होते. वर्गात ग्रीनबोर्ड, विविध खेळ, संगणक वापर, ई-लर्निग, तंत्रस्नेही पद्धत वापरली जाते. शिक्षकदिन मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीनुसार होतात. विद्यार्थी सहलीला गेले तर छोटी डस्टबिन सोबत नेतात. शेतीत भात हे मुख्यपीक घेतले जाते. भाजीपाल्यामध्ये बटाटे, टोमॅटो, मिरची, कांदे, भोपाळाकोबी, फ्लॉवर अशी पीके घेतली जातात. येथे कोणीही रस्त्यावर कचरा टाकत नाहीत. रस्त्यावर सरकारने dont littering असे बोर्ड लावलेले आहेत. जंगल ७०% आहे. पारोपोचू, मोचू आदी सर्व नद्यांचे पाणी स्वच्छ आहे. नदीत कचरा दिसत नाही. नद्यांना  सरंक्षक भिंती बांधलेल्या आहेत. नदीमध्ये कपडे,  जनावरे, गाडया धुतल्या जात नाहीत. येथे कोठेही सांडपाणी डबकी दिसत नाहीत. त्यामुळे डासांचे प्रमाण नगण्य आहे. भूतानमध्ये कोठेही फोटो काढला असता अत्यंत सुंदर फोटो येतो. भूतानी निसर्गाला देव मानतात, त्याची पूजा करतात. दाट उंचाल्या वृक्षांच्या जंगलातून जाणारे वळणावळणाचे रस्ते, दुपारच्या वेळीही झोंबणारी थंड हवा, चहूबाजूंनी दिसणारी हिमालयाची उंच उंच शिखरे, खोल दऱ्या सर्वाना मोहवून टाकतात.

      भूतानची जागतिक ओळख असलेले टायगर नेस्ट मॉनेस्ट्री (तक्तसांग मठ - Taktsang Monastery) हे पारो घाटीतील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाण आहे. ही मॉनेस्ट्री समुद्र सपाटीपासून ३१२० मीटर उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेली आहे. सन १६९२ मध्ये उभारणी झालेल्या मॉनेस्ट्रीचा सन १९९८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे बौद्ध भिक्षूंचे वास्तव्याचे विशेष ठिकाण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात भूतानची अद्भुत कला पाहाता येते. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा मार्गे पायी चालत (ट्रेकींग) जावे लागते. पारो शहरापासून हे ट्रेकिंगचे ठिकाण १२ किमी आहे. रस्त्यात काही ठिकाणाहून टाइगर नेस्ट दिसते तेव्हा तिथपर्यंत पोहोचणे अशक्यप्राय वाटते. आम्ही ग्रुपमधील ५ जणांनी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत हा ट्रेक पूर्ण केला. या वेळेत परिसरात सरासरी ६°से. तापमान होते. सुरुवातीला छोटा पटरी बाजार आहे. सुरुवातीच्या प्रवासात झ-याच्या पाण्याच्या मदतीने गोल फिरणारे बौद्ध प्रार्थना चक्र पाहून विशेष वाटते. रस्त्यात काही ठिकाणी पिण्यासाठी झ-याचे पाणी आहे. या ट्रेकिंगचा पहिला टप्पा पूर्ण होतो तेथे खानपान व्यवस्था पुरविणारा एक कॅफेटेरिया आहे. पहिल्यासह पुढील दोनही ट्रेकिंगचे टप्पे आपले ट्रेकिंगचे कसाब पणाला लावायला लावतात. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून आकाशाच्या दिशेने जाणारी वाट आपल्याला चांगलीच दमवते. अर्धे अंतर पार केल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनलेले प्रार्थना चक्र लक्ष वेधून घेते. अति उंची (हाय अल्टिट्यूड)विरळ हवाथंडी आणि खडी चढण यांचा सामना करीत लवकर दमछाक होणाऱा हा प्रवास करावा लागतो. अगदी शेवटच्या टप्प्यात आपल्याला समोर मॉनेस्ट्री दिसत राहते मात्र ती पलिकडच्या डोंगरावरील कड्यात असल्याने फूटभर उंचीच्या ४०० उतरून पुन्हा ३०० पाय-या चढण्याची कसरत करूनच मॉनेस्ट्रीत पोहोचता येते. या मार्गावर पवित्र मानला गेलेला एक सुंदर धबधबाबौद्ध धर्मात पवित्र मानल्या जाणा-या मंत्र लिहिलेल्या रंगीबेरंगी कापडी पताका लक्ष वेधून घेतात. येथून समोर पारो घाटीचे सौंदर्य तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताकसांग मॉनेस्ट्रीडोळे मिटताक्षणी ध्यान लागावे इतकी शांतता अनुभवून मानवी मन वेडं होऊन जातं. एकूण ट्रेकिंगचे जाता-येता अंतर ११ किलोमीटर आहे. रंगीबेरंगी पक्षीवनराई यांनी युक्त असलेल्या या ठिकाणी कायम थंडी जाणवली. माॅनेस्ट्रीत फोटोग्राफीला परवानगी नाही. तेथे धबधबा वगळता सहसा कोणताही आवाज येत नाही. माॅनेस्ट्री चार मुख्य भागात विभागली आहे. या मॉनेस्ट्रीबद्दल काही आख्यायिका आहेत. बौद्ध वज्रयान पंथाचे गुरू पद्मसंभवा हे वाघिणीवर स्वार होऊन येथे गुहेत आले. त्यांनी येथे खडतर तपश्चर्या केली होती. गुरू पद्मसंभवा वाघिणीवरून ज्या गुहेतून या भागात आले त्या गुहेत उतरल्यावर एका अवचित क्षणी हृदयावर प्रचंड दबाव आलेला जाणवला. कारण सुमारे १० हजार फूट उंचीवर दोन मोठाल्या दगडांच्या कपारीत अरूंद मार्गाने खोल दरीत शिरून पारो घाटीचा नजारा आणि टायगर नेस्ट पाहिल्याचा तो क्षण आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही. हा सारा वारसा समजून घेतल्यावर आम्ही भगवान गौतम बुद्धांपुढे नतमस्तक झालो. या ट्रेकला आमच्यासोबत (धीरज वाटेकर) पर्यावरणवादी चळवळीतील आमचे सहकारी विलास महाडिकमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती पुणेचे सदस्य बाळासाहेब चोपडे (पलूस-सांगली)गुरूवर्य प्राथमिक शिक्षक मार्गदर्शक पुस्तिकेचे उपसंपादक- शिक्षक तुकाराम अडसूळ (पारनेर-अहमदनगर) आणि मुक्त पत्रकार संतोष दिवे (संगमनेर-अहमदनगर) सोबत होते.

      भूतान निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत महाराष्ट्रातील सहभागी ७८ पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली सी. ए. राज देशमुख आणि सुशांत जवक यांच्या माध्यमातून भूतान मधील भारताचे राजदूत जयदीप सरकार यांची राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भेट घेण्याची संधी मिळाली. पर्यावरण अभ्यास दौ-यांतर्गत भूतानला आलेल्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय दूतावासातर्फे भेटीचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर दूतावासात एक विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब मोरेदूतावासातील वरिष्ठ अधिकारी इशा श्रीवास्तवसमीर अकोलकर उपस्थित होते. मोरे यांनी भारताचे राजदूत जयदीप सरकार यांचा विशेषांक देऊन विशेष सन्मान केला आणि आपल्या मनोगतात संवाद भेटीचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना जयदीप सरकार यांनी भूतानच्या आनंदी देश असण्यामागील रहस्य सर्वांना उलगडून सांगितले. भूतान आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. भूतानला एकावेळी जगभरातील अधिक पर्यटकही इथे नको आहेत. म्हणून त्यांनी कायद्यात अनेक तरतूदी केल्या आहेत. या देशाच्या मानवी जीवन पद्धतीबाबत स्वतःच्या संकल्पना आहेत. इथली माणसे कशी वागतात हे पाहून त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रभरातून उपस्थित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी यावेळी भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मानआरोग्यसेवा,शिक्षणनिसर्ग आणि पर्यटन विकासभूतानची संस्कृतीमानवी जीवनपद्धतीपर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कायदामहिलांविषयीच्या मुद्द्यानुरूप संवाद साधला. कोकणातील अभ्यासक धीरज वाटेकर यांनीही भूतानमधील लोकांचे सरासरी आयुर्मान आणि भूतानमधील वीज निर्मिती व गरज याबाबत भारताचे राजदूत जयदीप सरकार यांच्याशी संवाद साधला. यातील काही प्रश्नांची उत्तरे दूतावासातील उपस्थित वरिष्ठ अधिका-यांनी दिली. चहापानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

      संतांचे विचारतत्त्वज्ञान आपण प्रामाणिकपणे आचरणात आणले तर त्याचा किती सकारात्मक परिणाम जाणवतोयाचे सर्वोत्तम उदाहरण असलेल्या भूतानचाभगवान गौतम बुद्धांविषयीचा अधिक अभ्यास करण्याची संधी या पर्यावरण अभ्यास दौ-याने उपलब्ध करून दिली. भारत-भूतान बाॅर्डरवरील जाता-येतानाचे दोन मुक्कामपारो शहरातील दोन आणि राजधानी थिंफूतील तीन अशा सात मुक्कामी दिवसाततत्पूर्वी अभ्यासलेला भूतान समजून घेता आला.
आपल्याला असंख्य भारतीय महानुभावांनी मर्यादेचे पालन करण्याची शिकवण दिली आहे.

चिंटी चावल ले चलीबीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलैइक ले डाल॥

असे मार्मिक विवेचन संत कबीर यांनी केले आहे. विकल्प हे मानवी डोक्यात बिघाड निर्माण करतात. घेशील किती दोन करांनी अशी माणसाची अवस्था होते. या अगतिकतेला,आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्ती कारणीभूत आहे. निसर्गाने माणसाला दोन हात दिलेतते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीततर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावंयासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. गौतम बुद्धांच्या साहित्यात तृष्णा असा शब्दप्रयोग आला आहे. बुद्ध विचाराने जगणा-या भूतानी माणसाचं समाधान आणि आनंद या विचारधारेमुळे टिकून आहे. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेला भूतान नैसर्गिक सौंदर्यासाठीबौद्ध माॅनेस्ट्रीकिल्ले यांसाठी प्रसिद्ध आहे. ऑफबीट डेस्टिनेशन असल्याने हौशी आणि नवख्या पर्यटकांनी शक्यतो भूतानचा मार्ग धरूच नयेअसे आमचे प्रामाणिक मत बनले. समाधान फक्त पैसाच देऊ शकतोहा जागतिक सिध्दांत बाजूला ठेवित पैशांपेक्षाही माणसांना मोठे मानणाराआनंदी जीवन जगणारा हा ३८ हजार कि.मी. परिसराचा देश आम्हाला विशेष वाटला. नोव्हेंबर महिन्यात आमच्या भूतानमधील आठवड्याभराच्या वास्तव्यात सरासरी ३ ते ७°से. तापमान राहिले. जवळपास ३ हजार भूतानी कलाकृतींचा संग्रह असलेले भूतानचे राष्ट्रीय संग्रहालय पारो म्युझियमनिसर्गाच्या कुशीत वसलेला बौद्ध परंपरेचा वारसा असलेला पारो डिझाँगहिमालय पर्वतरांगांचा अद्भूत नजारा दाखवणारा चेलेला पासटायगर नेस्ट मॉनेस्ट्रीट्रॅफिक लाईटस नसलेली जगातील एकमेव राजधानी थिंफूप्राचीन राजधानी पुनाखा आदि प्राचीनता पाहिली. थिम्पू हेरिटेज म्युझियम ही भूतानमधील ३ मजली लाकडी संग्रहालय इमारततेथील पुरातन काळातील नूडल बनवण्याचे मशीनबिबट्याच्या कातड्याच्या पिशव्या आम्हाला विशेष वाटल्या. पर्यावरणासह शाळाशेतीस्वच्छ आणि तळ दाखवणा-या नद्यारंगीबेरंगी पक्षीवृक्षवेली आदि समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय शहरवासी डास येथे भेटला नाही. मुख्यपिक भातासह भाजीपाला शेती पाहिली. प्रामाणिकपणे काम करणारे कष्टाळू लोकइथल्या सरकारने DON'T LITTERING, we have solution stop pollution असे लावलेले बोर्ड पाहिले. नद्यांमध्ये कपडे धुणा-या स्त्रीयागाड्यागायी-म्हशी धुणारे आढळले नाहीत. सांडपाणी वाळूमार्गे नैसर्गिक प्रक्रिया करूनच नदीला सोडलेले दिसले. श्रमिकपणामर्यादित गरजांमुळे ढेरी सुटलेली पोटं दिसली नाहीत. राजधानी थिंफूमधील डाकगृहात जाऊन भारत आणि जपानमध्ये छापलेली काही भूतान सरकारची तिकिटे घेता आली. भूतानमध्ये नाण्यांचे महत्त्व संपलेय. एक रूपयाला काहीच मिळत नसल्याने रूपयाचे नाणे व नोट मिळत नाही. सुदैवाने सन १९७९ ची तीन नाणी आणि नोट मिळाली. पाकीट मारणेचोरीस्त्रीयांची छेडछाडअत्याचार हे प्रश्न येथे नाहीत. अनेक ठिकाणी घाटांच्या रस्त्यावरअगदी सुनसान जागी एकटय़ा बायका छोटे-मोठे सामान घेऊन विकायला बसलेल्या दिसल्या. मोफत शिक्षणऔषधोपचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील वाहतुकीचे कडक नियम अनुभवले. रस्त्यावर कचरा फेकलेला दिसला नाही. फक्त टायगर नेस्ट रस्त्यावर जिथे भरपूर पर्यटक भारतीय असतात. तिथे रस्त्यावर कचराकुंडय़ा ठेवलेल्या असूनही इतरत्र कचरा पाहिलानि आमच्या भारतीय जीवनशैलीच्या खुणा दिसल्याचा साक्षात्कार झाला. अखिल विश्वा ला आर्थिक महामंदीपासून वाचवायचे असेल तर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) पेक्षा सकल राष्ट्रीय समाधान (जीएनएच) अर्थनीती राबविण्याची गरज आहेअसे सांगण्याचा भूतान प्रयत्न करते आहे. नाममात्र प्रदूषणप्राणवायूचे अधिक प्रमाणमनाला उल्हसित करणारी हवा७० टक्के भाग जंगलांनी व्यापलेला असल्याने भूतानला कार्बन निगेटिव्ह देश म्हणतात. भूतानमध्ये २००८ पासून लोकशाही आहे. रस्त्यावर कुणाच्या वाढदिवसाचेकुठल्याशा नेता-कार्यकर्त्याचे तीनपाट पदावर नियुक्ती झाल्याचेविशेषणांचा पाऊस पाडणारे एकही होर्डिग बघायला मिळाले नाही. कायदा पाळलाच पाहिजेअशी मानसिकता जाणवली. येथे लोक राजाला मनापासून मानतात. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये,हॉटेलांमध्ये राजाचा छोटा-मोठा फोटोबॅनर हमखास दिसले. हा समृद्ध भूतान अनुभवताना आम्हाला पुण्याच्या सुप्रसिद्ध श्रीचंडिका ट्रॅव्हल्सच्या श्री. व सौ. राणी धनेश सरदेसाई यांची साथ राहिली.

      ज्येष्ठ समाजसेवकपद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालीदरवर्षी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंड़ळ महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या समारोपप्रसंगी पर्यावरण संवर्धन हा जागतिक आणि प्रत्यक्ष काम करण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन अण्णा हजारे यांनी केले. आपल्या भाषणात बोलताना हजारे यांनीटाकाऊ पासून टिकाऊ निर्माण करण्याचा संकल्प करण्याचेविषयाची आसक्ती कमी करण्याचे आवाहन सर्वांना केले. जगभरात प्रदूषणामुळे आजारतापमानसमुद्रपातळी वाढतेयहिमनद्या वितळताहेत. त्यामुळे याविषयात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी मोठी असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरेवखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबेसी.ए. राज देशमुखसुभाष डांगे होते.

      हा विदेश अभ्यास दौरा करताना सर्वांना जागतिक ऑफबीट डेस्टीनेशन असलेल्या भूतान समजून घेता आले. भूतानची ओळखआंतरराष्ट्रीय महत्त्व असलेला टायगर नेस्ट चा ट्रेक यशस्वी करता आला. सर्वात महत्वाचे म्हणजे आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली भूतान मधील भारताचे राजदूत मा. जयदीप सरकार यांच्याशी राजधानी थिंफू येथील भारतीय दूतावासात भूतान पर्यावरण व संस्कृती संदर्भातील विविध मुद्दयानुरूप संवाद साधण्याची संधी मिळाली. एकूणात भूतान देशाची ओळख करून देण्यात हा दौरा यशस्वी ठरला. पुढील आयुष्यात भूतानमध्ये अधिकचे काय पाहायला हवे याची पक्की जाणीव करून घेत अत्यंत जड अंतःकरणानेजंगल नदी की माँ होती है हे तत्त्व शब्दशः जगत या विस्मयकारक भूमीतून सर्वजण महाराष्ट्रात परतले.

ओम नमो बुद्धाय !

धीरज वाटेकर
मो. +919860360948


टायगर नेस्ट 

पारो विमानतळ 

पुनाखा : पोचू मोचू नद्यांचा संगम 

पुनाखा पॅलेस 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...