गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

आव्हानमायेच्या निमित्ताने...

        नामवंत बहुआयामी लेखकआमचे मार्गदर्शक आदरणीय सुमेध वडावाला (मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड) सरांच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच कोकणातील खेड शहरातील तटकरी सभागृहात संपन्न झाला. साधारणतः तीनेक महिन्यांपूर्वी सुमेध सरांनी फोन करून, ‘दोन डिसेंबर तारीख रिकामी ठेवा. माझ्या खेडमधील एका कार्यक्रमासाठी तुम्हाला यायचे आहे’, अशी स्पष्ट सूचना केली होती. एकाच वेळी एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्यांचा मराठी साहित्य विश्वातील दुर्मीळ प्रकाशन सोहोळा, पुस्तकांवर कोणीही काहीही बोलायचे नाही हा सर्व वक्त्यांना घालून दिलेला शिरस्ता आणि व्यक्त होण्यासाठी दिलेला ‘आव्हानमाया’ हा अनोखा विषय यांमुळे हा कार्यक्रम सर्वार्थाने वेगळा ठरला. या कार्यक्रमासाठी आम्हाला (धीरज वाटेकर) आमचे सहकारी निसर्ग प्रकाशनाचे सल्लागार विलास महाडीक यांच्यासह उपस्थित राहाता आले. त्या ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाच्या निमित्ताने...

      ‘आव्हानमाया’ कार्यक्रमाने शीर्षकापासून संपेतोपर्यंत आपला वेगळेपणा कायम ठेवला. एकीकडे जागतिकीकरणामुळे मानवी जीवन जगण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात जागतिकीकरणाने प्रवेश केला आहे. त्यातून अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. ग्रामीण भागातील तरूणांपुढे शिक्षण घेतानाच कौटुंबिक कामाला हातभार लावत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आव्हान खडतर आहे. बहुसंख्य तरूण उच्चशिक्षण घेऊनही नोकरीच्या शोधात सर्वत्र वणवण फिरत आहेत. नोकरी नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबरोबर स्वतःचे कसे होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. नोकऱ्या मिळत नसल्याने गुन्हय़ांमध्ये तरूणांची संख्या वाढते आहे. उदरनिर्वाहासाठी नेमके करायचे तरी काय ? या मन:स्थितीतील अनेकजण सध्या तणावग्रस्त आयुष्य जगताना दिसत आहेत. अविचार आत्मघाताला प्रवृत्त करतो. आयुष्याचा अर्थ समजून घेऊन जगणे सुंदर करावेअसे संस्कार दुर्मीळ होत चालल्याने जगण्याची मौज आणि त्याच्या संकल्पनाही संकुचित होत चालल्याने तरुणाईचा अविचारीपणा फोफावल्याची खंत अनेकदा जाणत्या पिढीकडून व्यक्त होताना दिसते. आज क्षणाचा शाश्वतपणा पुरता हरवला आहे. मुंबईसारख्या महानगरातक्षणाक्षणाला समोर आव्हाने उभी असतातयाची प्रत्येकाला पुरेपूर जाणीव असते. या आव्हानांचा  मुकाबला करण्यासाठी संयम आणि विवेकाची गरज असतानाअविचार आणि अविवेकाचेच मार्ग प्रभावी ठरू लागल्याचे चिंताजनक वास्तवही अलीकडे बळावत चालले आहे. अर्थात जगण्याचे संदर्भच बदलत असताना ‘आव्हानामाया’ हा विषय पुढे आला, हे महत्त्वाचे ! जगण्याचे वर्तमानकालीन संदर्भ बदलत अविचारी साहसवृत्तीला आयुष्याचा, जगण्याचा अर्थ समजावण्याचे मार्गदर्शन आव्हानमायेत मिळाले.

      सुमेध वडावाला हे मूळचे कोकणातल्या खेड गावचे रहिवासी. व्यवसायानिमित्ताने पुढे ते मुंबईत स्थिरावले. त्यांनी खेड परिसरातील आपले निवडक कौटुंबिक सदस्यनातेवाईकहितचिंतकत्यांच्या लेखनावर प्रेम करणाऱ्या सुमारे सव्वाशे साहित्यप्रेमींना या अनोख्या सोहोळ्यासाठी निमंत्रित केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षचिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडेज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सरचिटणीस प्रकाश गुजराथीखेडच्या माजी नगराध्यक्षा वैशाली कवळेडॉ. उपेंद्र तलाठीविलास बुटाला आदि मान्यवर उपस्थित साहित्य रसिकांसमोर ‘आव्हानमाया’ विषयानुरूप व्यक्त होते झाले. यातून जे विचार सर्वांसमोर आले ते ऐकून उपस्थितांना थक्क व्हायला झालं. सर्वच मान्यवरांनी हातचं न राखता मनातलं हृदयस्थ खुलं केल्याने वक्त्यांच्या आयुष्यातील ही अनुभवांचीआव्हानांची मांडणी सा-यांनाच भावली. या पुस्तकांचे प्रकाशक सुकृत प्रकाशनचे अमर कदमविघ्नेश ग्रंथ भांडार कणकवलीचे विघ्नेश गोखले यांनी हा कार्यक्रम खेडला घडविला याबद्दल सूत्रसंचालनकर्ते उत्तमकुमार जैन यांनी त्यांच्याप्रति आणि उपस्थितीबाबत सर्व मान्यवरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. ‘वीर माणसाचा पोवाडा वीर माणसाने गावा, आणि तशानींच तो ऐकावा’. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असल्याचे जैन यांनी नमूद केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सात पुस्तकांचे प्रकाशन झाले.

      ९ आत्मकथा, ८ कथासंग्रह, ७ कादंबऱ्या, ३ ललितसंग्रह, १ प्रवासवर्णन आदि प्रकारातील राजहंस, मॅजेस्टिक, मेहता, ग्रंथाली अशा प्रतिष्ठित प्रकाशकांनी प्रकाशित केलेली २८ पुस्तके सुमेध सरांच्या नावावर आहेत. जवळपास सर्वच पुस्तकांच्या २ ते ८ आवृत्याही निघाल्यात. सन १९९२ पासून २०१६ पर्यंत महाराष्ट्र शासनासह १७ पुरस्कार त्यांच्या पुस्तकांना मिळालेत. कादंब-याकथासंग्रहललितलेखन आदि उदंड लेखन करत सुमेध वडावाला (रिसबूड) हे नाव पुढे आत्मकथा / चरित्र या साहित्य प्रकारात स्थिरावले आणि अधिक प्रसिद्ध झाले. अनेक सामान्य माणसांच्या असामान्य जीवनप्रवासास वडावालांची शैली लाभल्याने ती पुस्तके वाचकवर्गाने हमखास उचलून धरली, हा आजवरचा अनुभव आहे. ‘वडावाला’ या त्यांच्या नावामागेही एक गंमत आहे. खेडला नारिंगी नदीच्या किनाऱ्यावरील जुन्या घरात त्यांचे बालपण गेलेले आहे. सन १९६२ साली कोकणातल्या सुशिक्षित घरात जन्मलेल्या (११ एप्रिल) सुमेध सर कोकणातील सुरुवातीच्या वास्तव्यानंतर पुढे विलेपार्ल्यात मामांकडे आले. सन १९८३ मध्ये नोकरी निमित्ताने माझगाव डॉक मध्ये स्थिरावल्यानंतर सायंकाळच्या फावल्या वेळेत विलेपार्ले येथे त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वडापावच्या गाडीवर उभे राहण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कथालेखन सुरूच होते. मात्र अनेकदा लेखन मूळ नावाने छापले जात नव्हते, लिखाण परत येई. नावामुळे असे होतेय की काय असे त्यांना वाटू लागले. इकडे सायंकाळी वडापावच्या गाडीवर त्यांना सहजतेने कोणीही ग्राहक हाक मारताना 'वडावाला' म्हणून संबोधित असे. एकदा सहज म्हणून त्यांनी ‘वडावाला’ हा शब्द वापरून लेखन करायला सुरुवात केली आणि त्यांची कथा साप्ताहिक सकाळ ने स्वीकारली. तेव्हापासून ‘सुमेध वडावाला’ हे नाव प्रसिद्धीस आले. त्यांच्यालेखनाचे विषय आणि मांडणी एवढी वेगळी कीविज्ञानलेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या प्रकाशकांकडे शब्द टाकला. सांजवा’ कथासंग्रह निघाला. पुस्तके यायला सुरुवात झाली. सन २०१३ साली चिपळूणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सुमेध सर जन्मांध मनश्रीची मुलाखत घेत होते. मुख्य मंडप हाऊसफुल्ल झाला होता. गाण्यात प्रावीण्य मिळवलेली‘बालश्री’ने सन्मानित मनश्री तेव्हा कॉलेजमध्ये होती. दृष्टिहीनत्वामुळे बिकट झालेला प्रवास ती उलगडत होती. ‘बालश्री’ प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कौतुकानं विचारलं होतं, ‘‘कब आओगी मनश्री हमें वापस मिलने ?’’ त्यावेळी तिनं उत्स्फूर्तपणे सांगितलं होतंआज बालश्री स्वीकारने आयी हूँभविष्य में पद्मश्री’ लेने के लिये आ जाऊंगी’. त्या दुर्दम्य आत्मविश्वासदर्शी गप्पा अनेकांसोबत तेव्हा आम्हीही ऐकल्या होत्या. सुमेध वडावालांना त्यावेळी मिळालेलं ‘स्टँडिंग ओव्हेशन’ हा आम्हाला सर्वोत्तम पुरस्कार वाटला. या मनश्रीची आत्मकथाही त्यांनीच लिहिली. ही मनश्री’ लिहिताना पहाटे जाग आल्यावरच्या अंधारात आपण आंधळे असल्याचा भास सुमेध सरांना व्हायचा. अशा समरसतेमुळेच त्यांच्या आत्मकथा जीवंत झाल्या. पुढे वाचकांनाही तीच प्रचीती आली. राष्ट्रपतींसोबतच्या मनश्रीच्या संवादाची सरांनी या कार्यक्रमात आठवण करून दिली. 
   
     

                   प्रकाशक विघ्नेश गोखले आणि अमर कदम यांनी सुमेध वडावाला हे आमचे मार्गदर्शक असल्याचे सांगून ‘आम्हाला ग्राहक नको वाचक हवायं’, असे आवर्जून नमूद केले. प्रकाश गुजराथी यांनी बोलताना रिसबूड सरांचे चिरंजीव असा उल्लेख करून खेडची ‘माया’ व्यक्त केली. अनेकविध पुरस्कारांचे धनीखेडचा साहित्यिक असा सुमेध यांचा उल्लेख करून आपल्याला शिक्षणसंस्था चालवताना आलेल्या आव्हानांबाबत त्यांनी अनुभव सांगितले. कुटुंब चालवताना आवश्यक असलेले समाजभानआयुष्यात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू न देता तो सिद्ध करण्याची आपल्यावर येणारी जबाबदारीकोणत्याही कामाला नकार न देणे आदि बाबींचा उहापोह त्यांनी केला. रिसबूड यांचे ‘अष्टावधान’ हे पुस्तक ज्यांच्या अनुभवांवर आधारित आहे त्या डॉ. उपेंद्र तलाठी यांनी सहज आव्हाने पेलणारे आव्हानमाया जगतात असे सांगून आयुष्यातील वैद्यकीय आणि सामाजिक जीवनातील काही किस्से सांगितले. योगायोगाने नगराध्यक्ष झालेल्या वैशाली कवळे यांनी बोलताना आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगितल्या. एक हाती सत्तेचा सामाजिक उपयोग करण्याच्या प्रयत्नात असूनही त्यांचा प्रत्येक दिवस समस्या घेऊन उजडायचा आणि मावळायचा. नगराध्यक्ष झाल्या तरीही त्यांच्यातला शिक्षक जीवंत असल्याने त्याचा सभेत काय परिणाम व्हायचा हे सांगितल्यावर सारे हास्यात बुडाले. कोट्यावधी रूपये गटारात का घालवता हा प्रश्न पुढे करून भुयारी गटार योजना बाबतचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी आव्हानाशिवाय जगणं अशक्य असल्याचे सांगितले. कोमसापचे पहिले साहित्य संमेलनकवी माधवांची जन्मशताब्दीजितेंद्र अभिषेकी यांचे नाट्यसंमेलनाध्यक्ष होणेआशा भोसले यांचे संमेलनाला येणे आदिंसह सन २०१३ साली चिपळूणात झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील आव्हानांचा वृत्तांतही अत्यंत खुबीने मांडला. यावेळी चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, डॉ. यतीन जाधव, डॉ. रेखा देशपांडे उपस्थित होत्या.

      झापडबंद राहू नका’, असा संदेश देणारे, प्रेरणादायीवैविध्यपूर्ण आणि वाचताना भान हरपायला लावणारं लेखन करणारे लेखक म्हणून सुमेध सरांचे लेखन आम्हालाही आवडते. बदलत्या नीतिमत्तेचा वेध घेणारी, केवळ संवादांतून साकारलेली धर्मयुद्ध’ ही त्यांची कादंबरी लक्षणीय आहे. अनुभवंतीआई ती आईचकाही काही माणसं!चित्रंतृष्णादोन चाकं झपाटलेलीथोरवीप्रदीप लोखंडेब्रह्मकमळमनश्रीमी नंदाजल आक्रमिलेसंदर्भासहित स्पष्टीकरणसफाईसांजवाहेडहंटरअशी त्यांची जवळपास सर्वच पुस्तके गाजलेली आहेत. या कार्यक्रमात मराठी साहित्य विश्वात एकाच लेखकाच्या सात पुस्तकांच्या नव्या आवृत्त्यांचे एकाच वेळी प्रकाशन होण्याची दुर्मीळ घटना घडत असताना स्वतः लेखक वडावाला यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना ‘माझ्या पुस्तकांवर कोणीही बोलायचे नाही’, असे स्पष्ट केले होते. सर्वांना सुग्रास भोजन आणि सुमेध सरांच्या स्वाक्षरीसह मिळालेल्या पुस्तकभेटीने कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोपापूर्वी व्यासपीठावरून बोलताना वडावाला यांनी लेखनानेच आपले आयुष्य समृद्ध झाल्याचे सांगितले. पुस्तकांच्या माध्यमातून दुस-यांचे आयुष्य रेखाटताना ते काही काळ जगायला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. अखेरीस लेखक असण्याचे खूप फायदे असल्याचे सांगून लेखनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

धीरज वाटेकर

‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.     
मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...