सोमवार, ३१ डिसेंबर, २०१८

माने सर ! विद्यार्थी प्रिय शिक्षक ते मुख्याध्यापक !


रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर आगवेकर सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोरे हायस्कूल अलोरे शाळेतून सेवानिवृत्त होताना स्वतः आगवेकर सरांनी, आपल्या पश्चात शाळेच्या मुख्याध्यापक पदाकरिता खात्रीपूर्वक विश्वास दाखवलेले, ‘ज्ञानमंदिर पावित्र्यासाठी, केवढा जीवाचा आटापिटा !’ ही काव्यभावना जगणारे अरूण केशव माने सर हे आजपासून शाळेच्या (मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूल अलोरे) मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारत आहेत. माने सर हे आगवेकर सरांनंतरचे शाळा आणि सर या सूत्रात सामावणारे, दीर्घकालीन कारकीर्द लाभलेले अफलातून व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सेवाकारकिर्दीतील हा अखेरचा टप्पा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. तो अधिकाधिक संस्मरणीय करण्याची जबाबदारी त्यांच्या हाताखाली घडलेल्या, जगभर सर्वदूर पसरलेल्या विद्यार्थ्याची आहे. त्याची सुरुवात आजपासूनच, चिपळूण येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक सागर या वृत्तपत्रात विशेष अर्धपान पुरवणी प्रकाशित करून सन २००० च्या इयत्ता दहावीच्या बॅचने केल्याने तेही सर्वजण अभिनंदनास पात्र ठरताहेत ! 

शालेय जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. आमच्यासारख्या अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी मुलांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशिरपणा, वेळापत्रकानुसार वर्तवणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणारे माने सर आमच्यासह अनेकांच्या पक्के स्मरणात आहेत. मजबूत झाडाच्या फांद्या कायम नम्र असतात. निसर्गाच्या या नियमाचे सदैव भान असलेल्या सरांचा ‘शिक्षित विद्यार्थी देश घडवू शकतो’ या तत्त्वावर गाढा विश्वास आहे. दिनांक १० मे १९६२ ला जन्मलेले, बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळचे रहिवासी असलेल्या सरांनी आपले शिक्षण अत्यंत खडतर वातावरणात पूर्ण केले आहे. दिनांक १ जून १९८६ पासून काही महिन्यांचा अपवाद वगळता माने सर अलोरे शाळेत कार्यरत आहेत. हाताखालून गेलेल्या विद्यार्थ्यांना सरांनी इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे. शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक  समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तीला शालेय जीवनात स्व-नियमन सवयीची आणि त्याकरिता शिस्तीची गरज असते. सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामच असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते. आश्वासक जीवनासाठीचा ती महत्त्वाचा पाया असते. तशी शिस्त आपल्या विद्यार्थ्यांच्यात पेरण्यात आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून माने सर यशस्वी झाले आहेत. स्वत: मानेसर हे स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत ही जीवनातील केवढी तरी मोठ्ठी आनंदाची बाब आहे.

अलोरे हायस्कूल अलोरे शाळेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर स्वतंत्र स्थान आहे. शाळा सन २०२२ साली आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वातावरणात अलिकडच्या कालखंडात घडलेल्या, काळाच्या गतीचे अचूक भान असलेल्या विभावर वाचासिद्ध सरांचे अलोरे शाळेतील आगमन, शाळेचा झालेला ‘मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूल’ हा नामकरण सोहोळा आणि आता अरुण केशव माने सरांची मुख्याध्यापक पदी झालेली नियुक्ती या सकारात्मक घटनांकरीता शाळेचे संस्थाचालक आदरणीय डॉ. विनय नातू साहेब आणि त्यांचे सर्व संचालक मंडळाचेही अभिनंदन करावयास हवे ! जाताजाता पुन्हा एकदा अत्यंत सुसंस्कृत, मनमिळाऊ, साधी राहणी अन् उच्च विचारसरणी लाभलेल्या, अनुकरणीय व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या माने सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

धीरज वाटेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...