बुधवार, १० एप्रिल, २०१९

त्वदीयाय कार्याय ! ‘जाणकार’ प्रकाश देशपांडे यांच्या सुवर्णमहोत्सवी कारकीर्दीचा आलेख !


गेल्या मार्च महिन्याच्या २४ तारखेला चिपळूणात, श्री. प्रकाश देशपांडे कृतज्ञता समितीने ‘पुण्यभूषण’ डॉ. देगलूरकर सरांच्या आशीर्वादस्वरूप उपस्थितीत आपला संस्मरणीय उत्सव साजरा केला. निमित्त होते, श्री. प्रकाशकाका एकनाथ देशपांडे यांच्या विविधांगी कर्तृत्त्वसंपन्न सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे ! यावेळी ‘त्वदीयाय कार्याय’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशनही झाले. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. वि. रा. करंदीकर यांच्यासारख्या वैचारिक क्षेत्रातील मानदंड असलेल्या अधिकारी व्यक्तीने, ‘प्रकाशराव जाणकार आहेत’ असे म्हटले होते. चिपळूणला कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त होण्यात, दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्वर्गीय नानांसोबतच प्रकाशकाका देशपांडे यांच्या कार्यशैलीचे असलेले योगदान या गौरवग्रंथाच्या पानोपानी जाणवते. चिपळूणंच, कोकणची सांस्कृतिक राजधानी का ? असा प्रश्न आजही पडणाऱ्या चिकित्सकांनी, अभ्यासकांनी, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीची जडणघडण समजून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी ‘त्वदीयाय कार्याय’ हा एका अर्थाने कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचा मागोवा असलेला संदर्भीय गौरवग्रंथ मुद्दामहून वाचावयास हवा.

‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने...’ या वृत्तीने समाजासाठी कार्य करणाऱ्या ज्ञात-अज्ञातांना त्वदीयाय कार्यायगौरवग्रंथ समर्पित आहे. हा २८८ पानी गौरवग्रंथ ४३ मान्यवरांचे लेख, स्वत: प्रकाश देशपांडे यांचे निवडक लेख, कथा, कविता आदि पुनर्मुद्रित साहित्य, नामवंतांची दुर्मीळ पत्रं आणि फोटोंनी परिपूर्ण आहे. गौरवग्रंथ आणि सोहोळा निर्मितीतील कार्यकर्त्यांच्या श्रेयनामावली पानाच्या शीर्ष भागात दिलेली, गौरवग्रंथाच्या भागांना दिलेली बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, डॉ. अरुणा ढेरे यांची काव्यअवतरणे, लेख लिहिलेल्या लेखकांच्या परिचयातील कल्पकता अभ्यासताना साहित्यकुशल संपादन झाले असल्याची पक्की जाणीव होते. गौरवग्रंथाच्या मलपृष्ठावर कोकण इतिहास परिषदेच्या महाड येथे संपन्न झालेल्या ८ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या भाषणाचा संपादित अंश नोंद आहे. या अधिवेशनाला आम्हीही उपस्थित होतो. इतिहासाच्या अभ्यासकांना आवश्यक असणारे मुलभूत मार्गदर्शन प्रकाशकाकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले होते. गौरवग्रंथाच्या मुखपृष्ठावर असलेले समीर गोरे यांनी रेखाटलेले रेखाचित्र, आतील सजावट, लेखांची मांडणी, विविध रंगांची फारशी उधळण न करता साकारलेले मुखपृष्ठ हे सारे प्रकाशकाकांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे साधेशे तरीही लक्षवेधक आहे. कुसुमाग्रज, प्राचार्य राम शेवाळकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रख्यात इतिहास संशोधक रामचंद्र चिंतामण तथा रा. चिं. ढेरे, यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे, स्वा. सावरकरांचे निजी सचिव बाळाराव सावरकर, संत साहित्याचे आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. वि. रा. करंदीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर, मंगेश पाडगावकर, लेफ्टनंट कर्नल शाम चव्हाण, जेष्ठ कवी शंकर वैद्य, प्रख्यात संगीतकार यशवंत देव, श्रीकांत मोघे यांच्या सोबतचा पत्रव्यवहार, सरसंघचालक मोहनजी भागवत, लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन, संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज यांच्या सोबतची छायाचित्रे ग्रंथाचे संग्राह्यमूल्य वाढवित आहेत. दीडशे वर्षांहून अधिक, किमान पाच पिढ्यांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे गेली तीन तपे प्रकाशकाका नेतृत्व करीत आहेत. ‘चालते बोलते विद्यापीठ’ असलेल्या प्रकाश देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण ओळख व्हावी, या हेतूने गौरवग्रंथाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादकीयात म्हटले आहे. आणि  ते खरेच आहे. ग्रंथातील विविध नोंदीबाबत अनेकजण आजतागायत अनभिज्ञ होते, हे प्रतिक्रियांवरून लक्षात येते आहे.

माणदेशी मातीत दिनांक ५ एप्रिल १९४७ ला त्यांचा जन्म झाला. वलवण, विटा परिसरात जीवावर बेतणारे खेळ खेळत, कीर्तनं, व्याख्यानं ऐकतं त्यांचं बालपण गेलं. लहानपणापासून इतिहासाची आवड असलेले प्रकाशकाका शाळेतील इतिहास शिक्षक तावरे सरांचे आवडते विद्यार्थी. शिवाजी महाराजांची भक्ती, बालवयात नाटकात साकारलेला तानाजी मालुसरे साऱ्यातून हे व्यक्तिमत्त्व आकाराला आलं. जनसंघाच्या निवडणुकांची जबाबदारी, मुंबईतील काम, भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव, ‘साक्षात धन्वंतरी’ डॉ. तात्यासाहेब नातूंचे कार्यालयीन काम, अणीबाणी जेल, चिपळूणात श्रीरामनवमी उत्सव, श्रीलक्ष्मी नारायणाच्या मैदानात, अश्रूंची झाली फुले (पणशीकरांनी अजरामर केलेली विद्यानंदची भूमिका), रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या त्यांच्या भूमिका, चिपळूणच्या कॉलेजयीन नाट्य प्रशिक्षण शिबिरांचे मार्गदर्शक, दूरदर्शनवर गाजलेल्या रचनांचे कवी, गेली ९० वर्षे चिपळूणात सुरु असलेली श्रीकृष्ण व्याख्यानमालेत शांताबाई शेळके, वि. रा. करंदीकर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या दिग्गजांना आणून वान्द्मयीन वातावरण तयार करणारे, रत्नागिरीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोकणातीलच असावा विचारांनी झपाटलेले, अनेक साहित्य-नाट्य संमेलनाचे कर्तेधर्ते, कुमार गंधर्व संगीत महोत्सव, राज्य नाट्य स्पर्धांचे परीक्षक, शासनाच्या ग्रंथालय ग्रंथ निवड समितीचे सदस्य, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन / कार्याध्यक्ष, संस्थान श्री भार्गवराम परशुरामचे सदस्य राहिलेल्या प्रकाशकाकांनी दैनिक सागरच्या दिवाळी अंकांचे संपादनही केले होते.

मूर्तीशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘अष्टपैलू व्यक्तिमत्त्व’ या पहिल्या लेखातील ‘लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे अर्ध्वयू’ उल्लेखाने ग्रंथाची सुरुवात होते. मसापचे कार्याध्यक्ष आणि ख्यातनाम व्याख्याते प्रा. मिलींद जोशी यांनी आपल्या लेखात, ‘२०१३ सालच्या अखिल भारतीय संमेलनाच्या पूर्वतयारीच्या बैठकांत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन चिपळूणात दाखविले गेले. महामंडळ सदस्यांसाठी हा नवा प्रकार होता’ असे म्हटले आहे. संमेलनाच्या इतिहासातच अशा प्रकारे प्रेझेंटेशन चिपळूणातच पहिल्यांदा दाखविले गेले होते. एखाद्यावर विश्वास बसला की प्रकाशकाका नवख्या व्यक्तीला मान्यवरांच्या यादीत कसे आणतात, याची सुंदर आठवण संस्कृतच्या गाढ्या अभ्यासक डॉ. आसावरी बापट यांनी नोंदविली आहे. त्रिपुरा विद्युत महामंडळाचे अध्यक्ष आणि सन १९९१ साली चिपळूणला विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता राहिलेल्या मुरहरी केळे यांनी सांगितलेल्या साऱ्या आठवणी संस्मरणीय आहेत. प्र. के. घाणेकर यांनी आपल्या लेखात त्यांचा केलेला ‘प्रचंड ग्रंथभूकीचा उल्लेख’, केंद्र सरकारच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांनी, ‘आपण पाहिलेल्या १८ समरसता साहित्य संमेलानांपैकी भव्यदिव्य म्हणून चिपळूणचा केलेला उल्लेख’, डॉ. अरुणा ढेरे यांनी नोंदविलेलं, ‘वान्द्मयीन क्षेत्रातील सगळी मोठी माणसं चिपळूणच्या व्याख्यानमालेसाठी आपलं म्हणून येत राहिली’ हे विधानही खूप महत्वाचं आहे. प्रकाशकाका १०/१२ वर्षांचे, पाचवीत शिकत असताना ग. दि. मा. विट्यात आले होते. पाठपुस्तकात ‘माऊलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार ! भुकेलेल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार’ ही त्यांची कविता होती. केवळ त्यांना पाहण्यासाठी १०/१२ वर्षांच्या वयात ते त्यांच्या येण्याच्या वाटेत तिष्ठत उभे राहिले होते. रस्त्यावरून चालताना ‘ग.दि.मा.’नी सहज आपली शाल अंगावर लपेटली नि तिची झिळमिळी किनार प्रकाशकाकांच्या खांद्यावरून फिरली. या प्रसंगासह त्यांच्या जीवनातील अनेक बारकावे टिपलेला नामवंत लेखक सुमेध वडावाला रिसबूड यांचा ‘सुफळ संपूर्ण’ लेख अत्यंत वाचनीय आहे. दैनिक सागरचे संस्थापक संपादक स्वर्गीय निशिकांत जोशी यांच्या लेखातलं, ‘आमच्या शोरूममध्ये जे आहे ते यांच्या गोडाऊन मधूनच उधारीवर आणलेलं असतं’ हे वाक्य दोघांचे निकटचे घनिष्ठ संबंध दर्शविते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या माजी कार्याध्यक्षा, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी आपल्या लेखात सन २०१३ साली चिपळूणला संमेलन व्हावे म्हणून त्यांनी सन २०११ सालापासून सुरु केलेल्या पाठपुराव्याची, दूरदृष्टीची नोंद केली आहे. मूर्तीशास्त्रातील जगद्मान्य व्यक्तिमत्त्व डॉ. देगलूकरकर सरांनी, ‘आले प्रकाशरावच्या मना, तेथे कोणाचेही चालेना’ अशा शब्दात त्यांच्या संघटन कौशल्याचा गौरव केला आहे. चिकाटी, मोठाले कार्यक्रम आयोजित करण्याचा अग्रक्रम, संस्कृतीची जोपासना करण्याची धडपड या गुणांचेही देगलूकरकर सरांनी कौतुक केले आहे. त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या की तरुण मंडळी सहज श्रोते होऊन जातात. म्हणूनच ‘मॅन फॉर ऑल सिझन्स’ असं ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र दिवाडकरांनी लिहून ठेवलं आहे. ज्येष्ठ कीर्तनकार धनंजय चितळे यांनी देशपांडे यांना दुर्लभ संयोजकही उपाधी कशी सार्थ शोभते याचे विवेचन केले आहे. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी भारतीय मजदूर संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांना, ‘एखाद्या स्वयंसेवकाने कोणत्याही संस्थेचे काम स्वीकारले की ती संस्था आपली मानली पाहिजे, तिचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार केला पाहिजे’ असा उपदेश केला होता. त्याचे प्रकाशकाकांनी पालन केल्याचे चितळे यांनी म्हटले आहे.     

‘दोन तपांच्या काळात महाराष्ट्रभर पोहोचलेलं वाचनालय अनेकांच्या भुवया उंचावणार ठरलं आहे’ ही नामवंत कवी, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष अरुण इंगवले यांची नोंद, डॉ. मिलिंद गोखले, विवेक भावे, प्रा. अंजली बर्वे, डॉ. सुरेश जोशी, मनीषा दामले, डॉ. विनिता विनय नातू, पुष्पा वाणी यांच्यासह सर्वच लेख वाचनीय आहेत. कौटुंबिक पातळीवर विचार करता काकांच्या पत्नी डॉ. रेखा देशपांडे मॅडम यांच्यासह कन्या आसावरीताई आणि नातवंडांसह इतर नातेवाईकांचेही लेख अप्रतिम आहेत. आदित्य जोशी याने शब्दबद्ध केलेला ‘हणमंतराव’ आपल्याही वाट्याला यायला हवा होता, असे सहजच वाटून जाते. सर्व कौटुंबिक लेखातून समाजाला माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. अर्थात ‘काम चांगलं आहे म्हणून पुस्तकही छान झाले आहे’ ही डॉ. प्रशांत पटवर्धन यांची सोशल मिडीयावरील प्रतिक्रियाही तितकीच बोलकी आहे. अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने एखाद्या संस्थेला आकार देत आपलं नियोजित कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेल्या माणसांचे कार्य संपूर्ण समाजाला समाधान देऊन जाण्यासोबतच प्रवाही जीवनाची अनुभूतीही प्रदान करत असते. चिपळूण शहरात आम्ही वास्तव्याला असल्यापासून स्वकतृत्वाने उपरोक्त 'स्वयंसिद्ध' चौकटीत बसण्याचे सामर्थ्य प्राप्त केलेली एक व्यक्ती म्हणून आम्हीही प्रकाशकाका देशपांडे यांना पाहात आलो आहोत.

स्नेहल प्रकाशनच्या रवींद्र घाटपांडे यांच्या लेखातील, नामवंत इतिहास संशोधक स्वर्गीय निनादराव बेडेकर आणि प्रकाशकाका यांच्यातील कवी भूषणाच्या छंदाबाबतची जुगलबंदी आठवण आणि शेवटी ‘या माणसाने माझा अहंकार उतरविला. ये तो सवासेर निकला.’ हे मनमोकळेपणाने केलेले विधान खूप काही सांगून जाते. आपल्यातल्या कार्यकर्त्याच्या भूमिकेला अधिक न्याय देणाऱ्या प्रकाशकाकांनी यापूर्वी स्वतः लिहिलेले गौरवग्रंथातील पुनर्मुद्रित लेख, कथा, कविता आदि साहित्य... त्यांच्यातल्या दर्दी लेखकातील स्पष्टवक्तेपणाच्या खुणा पटवून देतात. तरीही... स्वत:ला ‘भणंग’ संबोधून त्यांनी लिहिलेला ‘आंधळ्याच्या गायी देव राखतो’ हा लेख भविष्य घडवू पाहणाऱ्या तरुणाईने वाचावयास हवा. याच लेखाच्या शेवटी ‘सुखी माणसाचा सदरा कोणाला हवा असल्यास माझा खुशाल घेऊन जा’ असे त्यांनीच म्हटले आहे. संपूर्ण ग्रंथ वाचताना त्यांच्या या वाक्याची वारंवार प्रचिती येते. स्वत: दिव्याची वात होऊन आसमंत उजळविणाऱ्या प्रकाशपर्वाचा हा अक्षरयज्ञ म्हणूनच वाचावयास हवा !

पुस्तकाचे नाव : त्वदीयाय कार्याय (प्रकाश देशपांडे गौरव ग्रंथ)
पृष्ठ संख्या : २८८, स्वागतमूल्य : २०० रुपये
प्रकाशक : प्रकाश देशपांडे कृतज्ञता समिती, चिपळूण  
ग्रंथाकरिता संपर्क :
मो. ९७६५८६८७२२ (प्रकाश घायाळकर, अध्यक्ष, प्रकाश देशपांडे कृतज्ञता समिती)
मो. ९८६०४३५५६० (प्रा. अंजली बर्वे, चिपळूण)
मो. ७०५७५५७५०८ (आसावरी देशपांडे-जोशी, पुणे)


धीरज वाटेकर, चिपळूण  
मो. ९८६०३६०९४८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...