बुधवार, ३ जून, २०२०

सोनटक्का फुलू लागला !

    

        जून महिना उजाडला. अजूनही दारातल्या सोनटक्क्याची पानं टोकाला करपलेलीच होती. यावर्षी भर उन्हाळ्यात त्यांना अंघोळ घालत होतो. पण सोनटक्का काही फुलला नाही. काल पाऊस झाल्याने आज पाणी घातलं नव्हतं. सकाळी थोडं उशीरा परसदारी फिरताना यातल्या काहींवर कणिश पुष्पबंध प्रकारच्या गुच्छांवर कळ्या उमलत असल्याचे लक्षात आले. म्हटलं, व्वा ! झाला यांचा सीझन सुरु ! थोडं अधिक बारकाईनं पाहिलं तर यातल्या एका पानामागे सोनटक्क्याचं एक लेकरू जन्मलेलं होतं. सकाळची देवासाठीची फुलं वेचताना याची चुकामूक झालेली होती. आता दिसलं तेव्हा डोक्यात पर्यावरणदिनाचा विचार सुरु होता. कडक उन्हाळा पचवून आसमंतात मंद सुगंध पसरवायला ‘सोनटक्का’ सज्ज झालेला होता. पर्यावरणपूरक कामं फारशी होत नसल्याच्या परिस्थितीतही चिकाटी न सोडत कार्यरत राहाणाऱ्या पर्यावरणप्रेमी सुजनांच्या तनामनाला आनंद द्यायला जणू ‘हा’ अवतरला. सोनटक्का फुलू लागला !

‘कोरोना’ येण्यापूर्वी आम्ही निसर्गवेडे माचणूर (सोलापूर) आणि दोडामार्ग-सिंधुदुर्ग या दोन ठिकाणी मनसोक्त भटकलो होतो. २९ फेब्रुवारीच्या सायंकाळी आंबोली मुक्कामी असताना, सुप्रसिद्ध उभयसृपशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी (सर) आल्याचे वन्यजीव अभ्यासक रोहन कोरगावकर यांच्याकडून कळले. त्यांच्यासोबतच डॉ. गिरी सर मुक्कामी असलेल्या हेमंत ओगले यांच्या निवासस्थानी पोहोचलो. डॉ. गिरी सरांशी छान गप्पाही झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीही पुन्हा भेट घडली. यादरम्यान ओगले यांच्या पर्यटन केंद्रातील फुललेल्या ‘सोनटक्का’ फुलझाडाने आम्हाला स्वत:कडे खेचून घेतले. त्याला पाहाताच आम्हाला आमच्या परसदारातील सोनटक्क्यांची तीव्र आठवण झाली. विशेष म्हणजे ‘आंबोली’तला सोनटक्का फेब्रुवारीत फुललेला होता. जेव्हा आमच्याकडचा कायम करपत चाललेला असतो. मला आश्चर्य वाटलं. अर्थात आंबोली ही अशा जैवविविधतेच्या आश्चर्यांची खाण असल्यानं त्यात वेगळं असं  काही नसावं ! पण आम्हाला मात्र त्या निसर्गाची कमाल वाटली. सोनटक्का झुडपाची उंची साधारण अर्धा ते दीड मीटरपर्यंत असू शकते. मात्र यांची नक्की त्याहून अधिक होती. आंबोलीतील वातावरण सोनटक्क्याच्या नाजूक फुलांना, त्याच्या त्या नाजूक गंधाला वर्षभर सुगंधी राहायला जणू सहकार्य करत असावं ! अहाहा ! ‘किती किती म्हणून देतो, हा निसर्ग मानवाला ! पण आम्ही करंटे समजून घेतो, का हो या निसर्गाला !’ अशा तरल भावना चट्कन स्फुरल्या. आंबोलीच्या वातावरणातील चैतन्य सोनटक्क्याच्या नाजूक फुलांना वर्षभर फुलायला प्रोत्साहन देते आहे, म्हणजे नक्की काय ? हे त्या फुलांचा सुगंध आपल्या सर्वांगात भिनवलेल्या निसर्गप्रेमींना नक्की समजेल.

सोनटक्का ही भारतीय वंशाची झुडूपवर्गीय सदाहरित प्रकारची वनस्पती आहे. दलदल किंवा जास्त पाण्याच्या ठिकाणी सहज वाढते. अनेकांच्या परसदारी असते. हळद, आले, कर्दळ यांच्या कुळातील ही बहुवर्षायु वनस्पती आहे. याची फुले शुभ्र पांढरी, सुगंधी, लांब देठाची आणि खूप नाजूक पाकळ्यांनी युक्त असतात. पाकळ्या इतक्या नाजूक, शुभ्रता इतकी लक्षवेधी की हात लावायलाही भीती वाटावी. उमललेल्या फुलाचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. म्हणून त्याला इंग्रजीमध्ये Butterfly Ginger Lily म्हणतात. याच्या तीन पाकळ्या एकवटतात त्या ठिकाणी, फुलाच्या मध्यभागी थोडी पिवळसर झाक असते. परागकणांनी भरलेली ती पिवळीधमक पिशवी खास दिसते. ही फुलं सायंकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजतात. कदाचित म्हणूनच नाराज होऊन लगेच कोमेजून जाणाऱ्या स्त्रीला सोनटक्का फुलाची उपमा देत असावेत. सुगंधी द्रव्यं, पुष्पौषधीमध्ये या फुलांचा वापर केला जातो. फुले उमलली की हाताळून खराब होतात म्हणून याच्या कळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. याचे खोड जमिनीत अनेक वर्षे जगणारे, मांसल जाड आणि आडवे वाढणारे असते. जमिनीवर सरळ पानांसह उभे, बारीक पण मजबूत खोड येते. पाने साधी एकाआड एक, हिरवीगार बारीक आणि लांबट असतात. मोठी पाने दोन रांगात असतात. खोडावर पाने एकमेकांच्या समोरासमोर असतात. माशाच्या काट्यासारखी पानांची रचना असते. सध्याच्या लॉकडाऊन काळात विणीच्या हंगामात गुंतलेल्या लालबुड्या बुलबुलला आम्ही याचे पान आपल्या चोचीने मधातून खुडताना दोनदा पाहिले. जणू बुलबुल त्या पानातला रस शोषून घेत आहे असे वाटले. याच्या कंदापासून नवीन रोपांची निर्मिती होते. याच्यात दुर्मीळ पिवळा सोनटक्काही आढळतो. परसदारी लावण्यात येणाऱ्या झाडांमध्ये गुलाब, मोगरा, जास्वंदसोबत याचाही नंबर लागतो. पावसाळ्यात याला चांगला बहर येतो. पाकळ्यांच्या एका कणिश पुष्पबंध प्रकारच्या गुच्छातून किमान ६ ते १२ फुलं मिळतात. व्यवस्थित देखभाल आणि पाणी असेलं तर हिवाळ्यातही फुलं येतात. संख्या मात्र कमी होत जाते. याला इतर झाडांपेक्षा पाणी अधिक लागतं. तरीही, आपल्या परसदारी नसल्यास सुंगंधी जीवनाचा आंनद देणारं हे रोप मिळवून नक्की लावायला हवंय.

कोरोना लॉकडाऊन : ५ मधील मागच्या एक जूनची सकाळ ! उन्हात रखरखलेल्या सृष्टीला चैतन्य प्रदान करायला येणाऱ्या वर्षाऋतू आगमनाची निसर्गाला चाहूल लागलेली होती. लॉकडाऊनमुळे ती नक्की जुळून येणार असल्याचं गेले ४/२ दिवस ढगाळून आलेलं आकाश सांगू पाहात होतं. आज आमच्याही लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे जरा अधिकच्या   उत्साहात सकाळी देवपूजेसाठी परसदारातली फुलं वेचू लागलो. आदल्या दिवशीही पाऊस शिंतडलेला होता. त्यामुळे झाडांना पाणी घालण्याची आवश्यकता नव्हती. फुलं वेचल्यावर सौ.ने नेहमीप्रमाणे (कोरोनाने सध्याच्या जगण्याला ‘नेहमीप्रमाणे’ म्हणायला भाग पाडलंय ! एरव्ही अनेकदा आम्ही ना पूजेला ना फुलं वेचायला घरी सापडतो !) पूजा आटपली. आम्ही आमच्या कामाला लागलो. सकाळी ११ वाजता दारातल्या कल्पवृक्षावर दयाळचा कलकलाट ऐकू आला. म्हणून उठलो. खरंतर त्याचे सध्या कलकलाट करण्याचेच दिवस आहेत. पण तरीही उठून बाहेर बघीतलं तर मार्जार कुलोत्पन्न मांसाहारी ‘मांजर’ जवळपास वावरत होतं. त्याला हटकलं. इतक्यात जवळच्या सोनटक्क्यावर पुन्हा नजर स्थिरावली. बारकाईनं पाहिल्यावर यातल्या काहींवर कणिश पुष्पबंध प्रकारचे कळ्यांचे गुच्छ उमलत असल्याचे लक्षात आलं. एका गुच्छात तर छानसं एकच फुलंही जन्मलेलं दिसलं. सकाळी वेचताना हे लक्षात न आलेलं. म्हणून तसंच राहिलं होतं. तेव्हा चिरंजीव सोबत होता. त्याला म्हटलं, ‘याचा वास घे !’ चिरंजीवाला वास आवडला. मग त्याला थोडं अधिकचं म्हणून दसरा, दिवाळीतला झेंडू, हिवाळ्यातली रातराणी, उन्हाळ्यातला अनंत, रात्री फुलणारा मोगरा, उन्हाळ्यात जरा जास्त आणि इतरही वेळेसही बहरणारा चाफा, आणि पावसाळ्यात गंध वेडावून टाकणारा हा सोनटक्का ! आदि गंमत सांगितली.

सोनटक्का ! किती नाजूक फुलं हो ते ! काय ते त्याचं पांढरं-पिवळं सौंदर्य ! काय तो त्याचा बेधुंद करणारा मंद गंध सुगंध ! ‘कोरोना’ने साऱ्या मानवी बुद्धीमत्तेला निसर्गापुढे नतमस्तक व्हायला लावलंय ! निसर्ग मोकळेपणाने मुक्त विहरतोय ! त्याचे अनेक किस्सेही माध्यमांतून प्रसूत झालेत ! अशा छोट्या-छोट्या उदाहरणातून निसर्ग आम्हां मानवजातीला समजून घेण्याची सूचना करतोय ! खरंतर सगळ्या पर्यावरणीय समस्यांना चघळून त्यांचा चोथा झालाय ! पर्यावरण रक्षणाचं मूळ राजकीय सक्षमतेत दडलंय ! स्वातंत्र्यापूर्वीपासून तिथेच गडबड होत आली आहे. अजूनही गडबड होते आहे. पण आम्ही आतातरी सुधारायला हवंय ! मंद सुगंधाचं सृष्टीचैतन्य हेच खऱ्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग आहे. हे रोजची सकाळची हृदयाची धडधड वाढवणारी ‘कोरोना’ची आकडेवाढ आम्हाला शिकवतेय ! यंदाच्या पर्यावरण दिनी आम्ही यातून बोध घेतला, आजूबाजूचा निसर्ग-पर्यावरण सांभाळायला सुरुवात केली आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीचं सच्चं पाठबळ मिळालं तर पर्यावरणीय सुगंध आपलंही जीवन फुलवेल !

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेण्ड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com

जून २०२० सिझनमध्ये पहिल्यांदा फुललेले सोनटक्का

या सिझनमध्ये पहिल्यांदा फुललेले परंतु सहज नजरेला
न पडता या पानात कुठेतरी लपलेले सोनटक्का

आंबोली (सिंधुदुर्ग) येथील हेमंत ओगले
यांच्या बागेत नियमित अपेक्षेपेक्षा
अधिक उंच वाढलेल्या, फुललेल्या
सोनटक्का कंद फुलझाडाचा
२९ फेब्रुवारी २०२० रोजी टीपलेला फोटो

              






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...