मंगळवार, १६ जून, २०२०

अशी वेळ कोणावरही न येवो !

            
            कोकण किनारपट्टी, 3 जून २०२० ! वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत !! नाव, ‘निसर्ग’ चक्रीवादळ !!! ते आपल्या दिशेने येत असल्याच्या सूचनेचा ‘भोंगा’ सरकारने तत्पूर्वी वाजवून आपली जबाबदारी पार पाडली होती. सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी ते आल्यावर स्थानिक मित्र बोललेला, ‘वादळ जबरदस्त आहे. असा वारा पहिल्यांदा पाहिला !’ वादळ येऊन गेल्यानंतर भेटला तेव्हा म्हणाला, माझं एवढं हे सारं वैभव खलास झालं रे ! असं कधीही वाटलं नव्हतं की हे सारं शून्यावर येईल ! कोकण किनारपट्टीत आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागायतदारांसह अशा छोट्या-मोठ्या असंख्य उमद्या व्यावसायिकांना हताश आणि हवालदिल झालेला पाहणे निवळ क्लेशकारक आहे. कितीही संकटं आली तरी लोकं जगणं सोडत नाहीत. मात्र अशी हानी लोकांना कित्येक वर्षे मागे सारत असते. डोळ्यांदेखत व्यवसाय उध्वस्थ होऊन दमछाक झालेल्या पिढीची उमेद जीवंत ठेवण्याचं मोठं सध्या आव्हान आहे. त्यांच्या वेदना आम्ही कशा समजून घेणार आहोत ? ...अन्यथा हे शासनयंत्रणेचं सर्वात मोठं अपयश मानलं जाईल.

त्या ३ जूनला तारखेला सकाळपासून थंडगार वारे सुटलेले होते. लोकांची आवराआवर सुरु झाली. वारा वाढू लागला. पण त्याला जोर नव्हता.  हळूहळू लोकांनी आपली दार खिडक्या बंद करायला घेतल्या. काहीजण टी.व्ही.वरचे अपडेट्स पाहू लागले. रेंज असेपर्यंत वाऱ्याचे व्हिडीओही व्हायरल करून झाले. काहींनी फोन करुन इकडची-तिकडची परिस्थिती चाचपली. तोवर सकाळचे १० वाजून गेले. वादळाने १२० किमी वेग पकडायला सुरुवात केली. बघताबघता उत्तर रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड तालुके चक्रीवादळाने आपल्या कवेत घेतले. लोकांच्या घराच्या दरवाजा आणि खिडक्यांतून आत येऊ पाहाणारे पाणी छतावर जमा होऊ लागले. घरा-घरातल्या वस्तू भिजल्या. आगोटचं म्हणून जमवलेल्या अन्नधान्याला पाणी लागून ते डोळ्यादेखत खराब होऊ लागलं. सगळीकडे पाणीचपाणी होणार या विवंचनेनं लोकांना घेरलं. आवरायचं कसं ? नि सावरायचं कुणाला ? भिजत चाललेलं अन्नधान्य कोरोनाच्या कहरात जमविण्यासाठी केलेली धडपड आठवून काहींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कौला, पत्र्यांचा होणारा जीवघेणा आवाज, झाडांची पान हवेत उडावीत तसे घरांवरचे पत्रे लोखंडी चॅनेलसह उडू लागले. ५/१० नव्हे तर तब्बल पन्नासेक फुटांवर जाऊन पडले. काही तर झाडांवर जाऊन अडकले. जिथे उडून गेले तिथेही त्यांनी नुकसान केलं. कुणाच्या शेतातली १०० वर्षांपूर्वीची चिंच मुळासकट उन्मळून पडली. कुठे घरावर फणस पडला. दोन माणसांच्या कवेत न सामावणारा आंबा पिळवटून कोसळला. काही झाडं उभी पिंजकली. मुळांसकट एकावर एक उन्मळून पडणाऱ्या या मोठाल्या झाडांचे धडकी भरवणारे आवाज, वाऱ्याच्या वेगाने पिळवटणारे वीजेचे पोल, डोळ्यांदेखत तुटणाऱ्या त्यांच्या तारा, २/२ किलोमीटरपर्यंत स्पष्ट ऐकू येणारी सागराची गाज, स्वतःभोवती वेगाने चक्राकार फिरणाऱ्या वादळात सापडून धडधडू लागलेली धरतीमाता, सरकारी सूचनेप्रमाणे स्लॅबच्या खाली उभारलेल्या माणसांची हालणारी अस्वस्थ शरीरं असं काहीसं कुणीही कधीही न अनुभवलेलं दृश्य होतं ते ! शेवटी स्लॅबवरून, इकडून तिकडून, आडवंतिडवं पाणी घरात आलंच. बघता बघता सारं घर पाण्यानं भरलं. जीन्यांवरून धबधबे वाहू लागले. मातीच्या भिंती क्षणार्धात जमिनींना भेटत्या झाल्या. आता झोपायलाही जागा शिल्लक राहिली नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबप्रमुखांची आपल्या लहानश्या लेकरांच्या नजरेला नजर देताना काळीज पिळवटून टाकणारी झालेली हृदयातली कालवाकालव शब्दात पकडता न येणारी ! उत्तर रत्नागिरीत विध्वंस करून चक्रीवादळ श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर करत अलिबागला पोहोचलं. मुंबई वाचली. चक्रीवादळ पुढे नाशिकला धडकलं. वादळ अनुभवलेला मित्र म्हणतो, ‘आता काही नाही रे ! जे काही झालं ना ते त्या ३ तासातच ! ते पाहिलं असतं ना म्हणजे कळलं असतं नक्की निसर्ग ‘चक्रीवादळ’ म्हणजे नक्की काय आलं होतं ते !’ खरं आहे त्याचं म्हणणं !

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड भागातील काही आपदग्रस्त गावांत असं काही घडलंय याची सुरवातीच्या २/४ दिवसात कुणालाच नीटशी कल्पना आलेली नसावी. जसजशी येत गेली तसतशी यंत्रणा हलू लागली. नेते, पदाधिकारी, मंत्री यांचे पाहाणी दौरे सुरु झाले. सांत्वन होऊ लागली. धीर दिला जाऊ लागला. मदत मिळू लागली. सुरुवातीचे १५ हजार नुकतेच रुपये आपदग्रस्तांच्या खात्यात जमा होऊ लागलेत. गावागावात पोहोचलेले पाहुणे मदतीच्या पिशव्या रिकाम्या करून परतू लागलेत. तरी एक नशीब हे चक्रीवादळ दिवसा आलं. कोकणात मदतीला, नातेवाईकांच्या भेटीला जाणारी लोकं तिथली स्थिती पाहून अश्रू ढाळू लागली. केळशीतल्या खालच्या डुंगात तर दोन स्त्रीया दोन भिंतींच्या मधात दिवसभर अडकून पडल्या होत्या. त्या घरावर वड कोसळलेला. रात्री सुदैवाने त्यांच्या दीर्घ श्वासोच्छवासाच्या आवाज आल्याने ओढून बाहेर काढण्यात यश आलं. काही भागात तर एवढ्याश्या वादळात परसदारातल्या विहिरी भरल्या. काही लोकांनी चक्रीवादळापूर्वी घरांवर नवे पत्रे टाकलेले होते. बऱ्याच शाळांची वित्तहानी झाली. तरीही गावागावातून लोकं त्याचं दिवशी दुपारी कामाला लागली. काही शाळाही स्वच्छ झाल्या. वाड्यावाड्यातून एकत्र होऊन एकेक घर तात्पुरतं शाकारू लागली. पंचनाम्यातून काय मिळणार आहे ? पंचनामा करा नाहीतर काहीही करा. झालेलं नुकसान काही परत मिळणार नाही. हे पक्क माहिती असल्यानं लोकं एकमेकांना आधार देती झाली.

८/१० दिवसानंतरचं चित्र मात्र आमच्यातल्या पर्यावरणप्रेमीला केवळ झाडं कापण्याच्या ‘ट्री कटर’ मशिनींच्या आवाजाने जणू साऱ्या निसर्गाला वेठीस धरलेलं जाणवलं. खरंतर ‘ट्री कटर’ मशीनवर बंदी आणण्याची मागणी व्हायला हवी, अशा मताचे आम्ही ! पण इथं दिवसभर त्याचेच आवाज ऐकावे लागले. अर्थात पर्यायही नव्हता. अजून काही काळ फक्त तेच आवाज ऐकू येत राहतील. जवळपासची सारी झाडं थबकलीत. ‘सुक्या सोबत ओलंही जळतं’, तश्याप्रकारे काही ठिकाणी घडतंय. का तर म्हणे ? चक्रीवादळाने झाडं पार मुळापासून हादरलीत. त्यांना रस्त्यावर, परसदारी ठेवण्यात काहीही अर्थ नाही. शिल्लक दिसेल ते झाड तोडण्याचा सपाटा सुरु आहे. हे बघून वाईट वाटलं. सुदैवाने अशातही दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ. संतोष वरवडेकर आणि त्यांचे सहकारी समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे आदिंनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिल्याची वार्ता समजली, निसर्गमन सुखावलं.

११ वर्षांपूर्वी आमच्या विवाहाला आलेल्या एका आजीला भेटलो. ती म्हणाली, ‘काय नाय ओ ! पोरं माझी वाचली एवढंच नशीब म्हणायचं ! पुढची १५/२० वर्ष आता फळफळावळ बघायला नको. लागवड केली तर ही लहान पिढी उद्या पुढे खाणार ! नंतर होईलही सगळं चांगलं ! पण आम्ही थोडंच राहणार आहोत. प्रत्येकाचं असंच झालंय. इतक्यात आजीसाठी आणलेली पिशवी आम्ही हळूच घरात सरकवली. घर कुठलं ? सारी दैनाच झालेली ती ! ज्या व्हरांड्यातून आम्ही नेहमी घरात पाऊलं टाकतो तिथंच चूल मांडलेली. संसार उघड्यावर आलेला. तिची मुलं पाठीमागच्या बाजूला एकावर एक कोसळलेले नारळ, फणस, आंबा बाजूला करण्यात गुंतलेले होते. कोसळलेल्या घराला त्यातल्याच एका सुपारीच्या सरळ खोडाचा तात्पुरता आधार दिला गेला. कौलाच्या खालच्या जागेत आधाराला नारळा-सुपारीच्या खोडाच्या म्हणून रिपांना टाकलं गेलं. कौलं चढवायला सुरुवात झाली. अगदीच नाही तिथं प्लस्टिकचं कापड, ताडपत्री असलं काहीतरी जे मिळलं ते शाकारण्याचं  काम सुरु राहिलं. घराघरात हीच स्थिती राहिली. आजीनं कुठून बघितलं कुणास ठाऊक. पण जाताना म्हणाली, ‘पिशवी रिकामी नेऊ नकोस. ४/२ शहाळी घेऊन जा. नातवंड खातील माझी ! आता परत कधी होतील माहिती नाय !’ बापरे ! माझे डोळे पाण्याने भरले. परिस्थिती काय ? आजी बोलत्येय काय ? मी विचार करत असल्याचं बहुदा तिच्या लक्षात आलं असावं. परत म्हणाली, ’अरे ने हे ! घेऊन जा. मी जगताय का मरताय ? कोणास ठाऊक ?’ तेवढ्यात कोकणच्या उत्तर किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाचं हे तांडव अनुभवलेली आजीची दीड वर्षांची नात जवळ येऊन बोलली, ‘आमचा नाय, आजीचा घर मोडला !’

पुण्या-मुंबईसह दुनियेभरातली संवेदनशील मनाची माणसं लोकांना सहकार्य करण्यामागं तर साऱ्या आपदग्रस्त गावागावातली व्यापारी मनाची माणसं पैशामागं इथेही धावू लागली. अपवाद असतीलही. पण मालाच्या तुटवड्याच्या जोरावर चालणारं, ‘कोरोना’ने दुनियेला दाखविलेलं हे जीवंत सत्य इथेही अनुभवायला मिळालं. मोलमजूरी करून जगणाऱ्या समूहाला १३ रुपये एम.आर.पी.ची वस्तू २० रुपयांना विकत घ्यावी लागली. कोन्यावरचे पत्रे ५० रुपये फुटांनी विकले गेले. एक बागायतदार म्हणाले, ‘लोकं तिप्पट खर्चात पडलेत ओ !’ एका ठिकाणी तर वाडीत घरे ५२ ! आणि कोणा पुढाऱ्याकडून मदत काय पोहोचली तर ५ पुड्या फरसाण, ५ बटर पुड्या आणि २ पाकीट मेणबत्या बस्स ! आता २४ नग मेणबत्या ५२ घरांत कशा वाटायच्या ? प्रश्न पडला. मेणबत्ती तोडायची की अर्धी जाळून मग दुसऱ्या घरात पुन्हा पेटवायची. सांगणारा खूप तावातावाने सांगत होता. त्याचा रागही स्वाभाविक होता. पण दोष त्या पुढाऱ्याचाही नसावा. दुर्दैवाने त्याने व्यक्तिगत किंवा आपल्या जवळच्यांना किंवा नक्की कुणाला मदत पोहोचणार आहे याचा नीटसा अंदाज न घेता पाठवली असावी. स्वीकारणाऱ्यांनी मात्र ती वाडीत आणली. त्यातून, ‘आपण काय लोकांची चेष्टा करायची काय ? ज्याच्याकडून घेतलं त्याला परत नेऊन द्या.’ इथवर विषय आलेला. अर्थात, ‘एखाद्या संस्थेने मदत आणून दिली तर त्यांचा अपमान करू नका. ज्यांना गरज आहे त्यांची घर दाखवा’ असंही तो आपदग्रस्त बोलला. तोही संवेदनशील वाटला. हा किस्सा नोंदवायचं कारण इतकंच की अशा प्रसंगी कार्यकर्त्यांनी बेभान होऊन काम जरूर करावं. पण चुकीच्या दिशेनं भान हरपून गेलं की अशा संदेश देणाऱ्या घटना घडण्याची संभावना वाढत जाते, हेही लक्षात घ्यायला हवं.

शहरातली माणसं ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. कोकणात, गावातली माणसं मरेपर्यंत राबतात. बरं ! घरचं ठीक असलं तरी या माणसांचं राबणं थांबत नाही. ‘जोवर झेपतंय तोवर करायचं’ या विचारानं ही माणसं कार्यरत राहतात. आत्ताच्या चक्रीवादळातही ही लोकं उठून कामाला लागलीत ती याचमुळे ! कोकणासाठी १०० टक्के अनुदानाच्या फळबाग लागवड योजनेची रास्त मागणी पुढे आलेली आहे. तेवढी रोपं उपलब्ध होण्याचं आव्हान आहे. हे बागायती नुकसान सावरायला किमान १० वर्ष जातील. तरीही शक्य होईल ती माणसं आपापल्या बागा साफ करून नव्याने खड्डे खणून ४/२ कलमंही लावतील. त्यांना जगवतील. हे वर्ष वाया घालवणार नाहीत. हमीभाव मिळत नाही. बँकेचे कर्ज फेडता येत नाही हे खरं असलं तरीही इथली माणसं घरात रडत बसणार नाहीत. गणपती बाप्पाची थोडी उंची नक्की कमी करतील, पण ही माणसं येऊ घातलेल्या बाप्पाला आनंदात घराघरात बसवतील. आपलं दु:खही त्याला कळू देणार नाहीत ती ! सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेलं हे कोकण, इथला ४/५ महिन्यांचा भरपूर पाऊस, तुकड्यात विभागलेली शेती, महद्प्रयासानं त्यात येणारं भाताचं पिकं घ्यायला, जमिनीत नांगर फिरवायला, लावणीला इथं सुरुवात झालीय. कोकणी माणूस कर्जापासून तसा दूर पळणारा आहे. कर्ज बुडवणं, मग माफ करायला लावणं, आत्महत्या करणं असल्या गोष्टी करायला त्याला वेळ मिळत नसावा. एका आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये राज्यात गेल्या ३ महिन्यात ११९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने इथल्या आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमधल्या फरकांचा अभ्यास करून अहवाल बनविण्यासाठी एक समिती घोषित करायला हरकत नाही. संकटांकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याची इथल्या माणसाची ‘त्या आजीची’ भूमिका तरी या निमित्ताने जगासमोर येईल.

यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय ? अशा चर्चा सुरु होतील. तज्ज्ञ आपली विचारी भूमिकाही मांडतील. सरकार त्या मुद्यांचं काय करेल ? पूर्वी कोकणातली घरं अत्यंत उतरत्या छपराची होती. आम्हीही गावच्या घरी आणि आजोळी लहानपणी कंबरेत वाकून घरात शिरायचो. जागतिकीकरणाने ग्रासलेल्या विकासाच्या प्रक्रियेत ती घरं गायब झाली. तेव्हाची कमी शिकलेली जुनी माणसं अधिक शहाणी होती. आज वीजपुरवठा भूमिगत पद्धतीने करण्याच्या सूचना येऊ लागल्यात. विकासाच्या आड येणारी झाडं एकाबाजूने कापल्याने झाडाचं वजन एका बाजूला जास्त होतं. दुर्दैवानं ते झाडं जोराच्या वाऱ्यात उन्मळून पडतं हे जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये यांचं निरीक्षणही महत्त्वाचं आहे. परसदारातल्या वृक्ष लागवडीबाबतही निश्चित भूमिका शासनाकडून नव्याने जाहीर व्हायला हवी. आपत्ती ही नुकसान करते. पण नुकसान नगण्य करायला आपण कधी शिकणार ? जपान भूकंपप्रवण आहे. पण वारंवार भूकंपाचे लहान-मोठे धक्के सहन करून ते ताकदीने उभे आहेत. आपणही राहू यात. या चक्रीवादळामध्ये वृक्षसंपदेची सर्वात जास्त हानी झालेली आहे. सुदैवाने 'निसर्ग'बाबत ३१ मेला याचा संभाव्य इशारा मिळाला होता. मुंबई परिसरातल्या समुद्रात सन १८८२ साली धडकलेले मोठे चक्रीवादळ ‘बॉम्बे_सायक्लॉनम्हणून ओळखले जाते. मुंबई लगत कोकण किनारपट्टीत चक्रीवादळ धडकण्याच्या घटनेची दुर्मीळ नोंद आहे. सन १९६८ साली हर्णैला चक्रीवादळ धडकले होते. सन २००९ ला फयान येऊन गेले. फयानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे नुकसान केले. ‘कोरोना’काळात पूर्व किनारपट्टीवर ‘अम्फान’ चक्रीवादळ आल्यावर कोकणातही असं काही येईल असं कुणाला वाटलं नव्हतं. तेवढ्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळ आलं. आता ते निसर्गनिर्मित की मानवनिर्मित अशा चर्चाही होत राहतील. कारण येणारी वर्षे चक्रीवादळांची असतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. हवामान बदल हे सत्य आहे. निसर्गाने दुसरी घंटा वाजविली आहे. याच्याशी सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, बागायतदारांना जुळवून घ्यावे लागेल हा तज्ज्ञांचा सूचक इशारा पुरेसा बोलका आहे. या साऱ्या किनारपट्टीत सध्या भयानक रोगराई पसरण्याचा धोका आहे. समुद्रकिनाऱ्यावर वादळांचा वेग थोपवून धरणाऱ्या वृक्षांची लागवड गरजेची आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळानं  विध्वंस घडवलाय. या विध्वंसाला कोरोनाची दुर्दैवी किनार आहे. कोकण किनारपट्टीचं झालेलं सारं नुकसान पंचनाम्यात सापडणार नाही आणि मावणार तर त्याहून नाही आहे. इथल्या पर्यटन व्यवसायाचं झालेलं नुकसान असह्य करणारं आहे. ते भरून काढणं निवळ कोकणावर प्रेम करणाऱ्या पर्यटन प्रेमींच्या हातात आहे. लॉकडाऊन नंतर पर्यटक आपली दमदार पाऊलं पुन्हा कोकणात टाकतील याची खात्री आहे.

नुसत्या राजकीय दौऱ्यांनी प्रश्न सुटणार नाहीत, प्रश्न फक्त कळतील. ते सोडवायला ठाण मांडून बसावं लागेल. सुदैवाने १/२ नव्हे तर तब्बल 3 पक्षांचं सरकार राज्यात सत्तेवर आहे. गावागावात त्यांचे कार्यकर्ते विखुरलेत. सामाजिक पक्षकार्य सुरु आहे. तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ‘कोरोना’ग्रस्तांच्या व्यथा आपण पहिल्यात. निसर्ग चक्रीवादळाचेही तसेच आहे. तिघांची ताकद एकत्रित येऊन गावागावात कार्यरत झाली तर जनसामान्यांना निश्चित मदत पोहोचेल. पण अपवाद वगळता दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही आहे. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यावर (सिंधुदुर्गसह) सन १९२९ पासून ऑक्ट्रॉय कर लावलेला होता. हा कर रद्द करावा आणि उत्त्पन्नासाठी पर्यायी योजना सुचविण्यात यावी अशी मागणी सन १९६३ पासून होऊ लागली होती. सन १९७२ च्या दरम्यान जिल्ह्याला ऑक्ट्रॉय करातून ३०/३२ लाखांचे उत्त्पन्न मिळत होते. जिल्हा परिषदांना शासन त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नाइतकी मॅचिंग ग्रँट देत असते. ऑक्ट्रॉय कर ही रत्नागिरी जि.प.ची बाब होती. तेवढीच मॅचिंग ग्रँट शासनानेही द्यायला हवी. पण शासनाकडून तेव्हा ५ लाख रुपये मिळत. एकूण मागील किमान १० वर्षाचा सरासरी २० लाखप्रमाणे विचार करून जिल्ह्याच्या मॅचिंग ग्रँटमधील सुमारे दीड कोटींची तफावत शासनाने आम्हाला द्यावी अशी मागणी तेव्हा आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांनी केली होती. कोकणात कृषी विद्यापीठ झाल्यापासून, इथल्या माणसाची इकॉनॉमिक कंडिशन सुधारायची तर असेल पाण्याची टंचाई दूर केली पाहिजे. विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शेती करायला पाणी लागणार आहे. त्यांच्या एक-दोन एकर जमिनीला आपण पाणी देणार नसू तर विद्यार्थ्यांचे शिक्षण वाया जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.

कोकण आणि घाटावरील बागायती वेगवेगळी आहे. घाटावरील ऊस, हळद, तंबाखू ही बागायती पिके वर्षाला होणारी आहेत. कोकणात आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या झाडांना फळधारणा व्हायला किमान पाच वर्षे लागतात. अलीकडचे केळी, अननसासारखे फळ एक-दीड वर्षानंतर येते. राज्यात जी पिकं वर्षाला उत्पन्न देतात. ते ते अडचणीस्तव वर्षा-वर्षाला सरकारकडे याचना करीत असतात. सरकारही त्यांचं ऐकतं. कोकणात मात्र तसं घडत नाही. म्हणून कोकणाने आपत्कालीन मदत मागितली तर ती तेवढ्याच सक्षमतेने सरकारने द्यायला हवी आहे. दुर्दैवानं कोकणचं ऐकणारं दीर्घकालीन सरकार राज्याला लाभलेलं नाही. अपवाद वगळता आमचे लोकप्रतिनिधीही आपापली व्होटबँक सांभाळण्यात गुंतलेले असतात. त्यासाठी ते रोजच्या पेपरात कधी पाठी तर कधी पुढे हसतमुख चेहरा घेऊन हजर होतात. जनताही अशालाच भुलते. ‘यथा प्रजा, तथा राजा !’ इथली स्वर्गीय भूमी नासवणारे रासायनिक प्रकल्प, एन्रॉनसारखे बुडणारे प्रकल्प येथे आले. त्यामुळे कोकणी माणसाची मानसिकता कमालीची ‘विरोधी’ बनलेली आहे. अनेकविध कारणांनी ‘स्वतंत्र कोकण’ची मागणी इथे अधूनमधून पुढे आणली जाते. हे कोकण सावरावं म्हणून प्रशासन वेगाने काम करतंय ! काही ठिकाणी आपदग्रस्त कर्मचाऱ्यांनाच त्यांच्या गावातून दुसरीकडे हलवलं गेलंय, हे वाईट आहे. एन.डी.आर.एफ., एस.डी.आर.एफ. तुकड्या, कण्हेरी मठ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आदि सामाजिक संस्था, संघटना, बँका, विद्यार्थी संघटना, छोटे-मोठे गट, सामाजिक कार्यकर्ते, पंचनामा करणारे महसूल कर्मचारी, शिक्षक जीवतोड मेहनत करताहेत. त्या सर्वांप्रति नक्की कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे. निसर्गदेवता साऱ्या आपदग्रस्तांना यातून लढण्याचं बळ देवो !

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या निमित्ताने कोकणावरील कायमच्या दुर्लक्षाचा दुर्दैवी घटनाक्रम पुसून टाकून काही ठोस आणि भरीव करण्यासाठीची संधी सरकारला चालून आली आहे. ३/३ एकत्र आलेले पक्ष सरकार चालवत असल्याने निर्णय घेऊन अंमलबजावणी करणे अवघड नाही. गावागावात या पक्षांचं दखलपात्र अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांकडून ‘पल पल की खबर’ घेत जनतेला ठोस सहकार्य करण्याची भूमिका पार पाडली जायला हवी. पंचनाम्यापूर्वीच इथं अनेकांनी आपापली उध्वस्थ घरं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरती शाकारायला घेतली. ही बाब नोंदी करणाऱ्या ‘महसूल’च्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली असेल. इथला माणूस स्वाभिमानी आहे. तो ‘आत्महत्या’ करणार नाही. सरकारकडे तो दरवर्षी मदतीसाठी याचना करायला गेल्याचाही इतिहास नाही. ‘अशी वेळ कोणावरही न येवो !’ असं म्हणण्याची आलेली ही वेळ म्हणूनच नीट समजून घेतली जायला हवी आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल : dheerajwatekar@gmail.com          

दैनिक सागर २० जून २०२० 

साप्ताहिक कोकण मिडिया १९ जून २०२० 
                                    
दैनिक जनमाध्यम अमरावती २० जून २०२०  

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग १ - १८ जून २०२०  

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग २ - १९ जून २०२०



दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग ३ - २० जून २०२०

दैनिक पुढारी रत्नागिरी आवृत्ती 'वादळखुणा' मालिका भाग ४ - २१ जून २०२०

दैनिक 'पुढारी'ने या प्रदीर्घ लेखाची 'वादळखुणा' या नावाने ४ भागात उत्तम मांडणी केली.
 पहिल्या भागात, आम्ही न काढलेल्या (संग्रहित) फोटोवर दिलेले आमचे नाव वगळता 
इतर कुठेही सदर मजकूर आमचा असल्याचा उल्लेख, बहुदा नजरचुकीने केला नाही.




 
निसर्ग चक्रीवादळ:कोकण किनारपट्टी





 घरांच्या तात्पुरत्या शाकाराणीस प्रारंभ

 घरांच्या तात्पुरत्या शाकाराणीस प्रारंभ.

लोकांच्या पत्र्यांच्या शेड्स
अशा झाडांवर पोहोचल्या.
झाडांची चैत्र पालवी कुठच्याकुठे हरवली.

शांत मी, अशांत मी !

चक्रीवादळाच्या वेगाने
पीळ बसलेला वीजेचा पोल




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...