आपल्या मृत्यच्या आदल्या दिवशी दुपारी अण्णांनी आमच्याशी बोलताना, कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकावरून नजर फिरवत काही मोजके बदल सुचवले आणि आम्हाला, 'आता परत दाखवू नका. छापायला द्या' अशी सूचना केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भावी लेखन संकल्पाबाबत आमच्याशी दोनेक तास चर्चाही केली होती. आपल्या बदललेल्या मालघरच्या पत्त्यासह आमचे नवीन व्हिजिटिंग कार्ड बनवायला द्या, असं ठामपणे सांगणाऱ्या अण्णांनी अगदी दुसऱ्या दिवशी आम्ही कै. नंदिनी काकींच्या स्मृतिअंकाचे काम पूर्ण करत असताना अखेरचा श्वास घेणं आमच्यासाठी सर्वाधिक धक्कादायक ठरलं.
इतिहासात अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोकण इतिहास संशोधकांना फारशी उपलब्ध होऊ न शकलेली विविध साधने नव्याने उपलब्ध करून देण्यात अण्णांचे योगदान ऋषितुल्य राहिले. आज संगणक, इंटरनेट, मोबाईल, फोटोग्राफी, दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, अनुवाद यामुळे इतिहास संशोधनाचे क्षितिज विस्तारले आहे. इतिहास हा मानवाच्या आदिपासून अंतापर्यंत सोबत करणारा विषय आहे. सर्वसामान्य मनुष्याच्या दृष्टीने इतिहासाचा मर्यादित अर्थ 'असे घडले' असा आहे. मात्र अण्णांसारख्या संशोधकाला 'असे घडले' यावर अवलंबून चालत नव्हते. एखादी घटना घडती की त्यांच्या मनात जणू का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे सहा 'क'कार प्रश्न उभे राहायचे. कोकण संदर्भात अण्णांनी या प्रश्नांचा जीवनभर शोध घेतला. त्याकाळी कोकण इतिहासातील घटनांचा अभ्यास करणे सोपे नव्हते. अत्यंत गुंतागुंतीचे, संदिग्ध आणि अस्पष्ट होते. पण अण्णा कधीही मागे हटले नाहीत. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते शरीराने वर्तमानात पण मनाने भूतकाळात वावरत पुराव्यांची संगती जोडत राहिलेले आम्ही पाहिलेत.
जगाच्या पाठीवर गणिताच्या उत्तरात बदल होणार नसतो, इतिहासाचे तसे नसते. मानवी कृती आणि मनोव्यापार यादृष्टीने आपणास वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेळ्या पद्धतीने इतिहास घडल्याचे दिसते. कित्येकदा चमत्कार वाटावी अशी कृती एखादी व्यक्ती करून जाते, अण्णांच्या बाबतीत असेच घडल्याचे दिसते. कोणतेही ऐतिहासिक संशोधन शंभर टक्के मान्य होणे दुर्मीळ असताना अण्णांच्या कामाता राजमान्यता मिळाली. उपलब्ध पुराव्याला सदैव चिकटून राहित्याने हे शक्य झाले. कोकण इतिहासाच्या प्रांतात एकांड्या शिलेदाराची भूमिका घेऊन अण्णा कधीही वावरले नाहीत. त्यांनी या क्षेत्रातीत असंख्य नामवंत इतिहास संशोधकांशी संपर्क साधला. वेळोवेळी त्यांचे विचार समजून घेतले. उपलब्ध माहिती जुन्या पुराव्यांच्या साहाय्याने नव्या दृष्टिकोनांचा स्वीकार करून मांडली. यासाठी संशोधन विषयाच्या मर्यादा आणि व्यक्तिगत मर्यादा यांचे भान ठेवून विश्वसनीय तथ्यांचे आकलन आणि संकलन केले. म्हणूनच अण्णा कोकण इतिहास संशोधनावर आपला ठसा उमटवू शकले.
आजकाल आपल्याकडे इतिहासाविषयीचे आकर्षण वाढते आहे. ऑल इंडिया हिस्ट्री काँग्रेस, महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास संशोधन मंडळ, कोकण इतिहास परिषद अशा संस्थांमधून वाचल्या जाणाऱ्या शोधनिबंधांची संख्या वाढते आहे. याबाबत अण्णा समाधान व्यक्त करायचे. 'जगभर दृष्टी फिरवीत असताना स्थानिक इतिहासाकडे दुर्लक्ष व्हायला नको आहे. प्रत्येक गावाचा तालुक्याचा, जिल्हय़ाचा, हेरिटेज स्थळांचा इतिहास लिहिला जायला हवा आहे. कागदपत्रांची जपणूक, उत्तम दर्जाची संग्रहालये आणि त्यांची जोपासना याकडे लक्ष वेधण्याची गरज आहे'. असे ते सातत्याने सूचीत करायचे. सद्याच्या काळात आपल्याकडे 'इतिहास' या विषयावर बोलणे आणि लिहिणे हे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण काम झालेले असताना अण्णांची सतत आठवण होणे क्रमप्राप्त आहे. इतिहासाचा ध्यास घेऊन जीवन व्यतीत केलेल्या अण्णांचे प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू या!
धीरज वाटेकर
स्मृतिदिन वृत्त
अण्णा शिरगावकर स्मृतीदिनी मान्यवरांनी दिला
आठवणींना उजाळा
चिपळूण :: कोकण इतिहासाचे नामवंत संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती निराधार फौन्डेशनमध्ये ‘स्मृतिगंध’ कार्यक्रम तर अण्णांचे दाभोळोत्तर वास्तव्य राहिलेल्या शिरगाव येथील कन्या सौ. नूतन रविंद्र लब्धे यांच्या निवासस्थानी प्रथम स्मृतिदिन संपन्न झाला. यावेळी अण्णांच्या संकल्पनेनुसार त्यांच्या पत्नी कै. सौ. नंदिनी अनंत शिरगावकर यांच्यासह अण्णांवर तयार करण्यात आलेली ‘स्मरणयात्रा’ ही स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.
अण्णांच्या स्मृति
जागवताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे उपाध्यक्ष गंगाराम इदाते
म्हणाले, ‘गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यामंदिर
कोळथरे उभारणाऱ्या स्वर्गीय कृष्णामामा महाजन यांच्या स्मृति जीवंत ठेवण्यासाठी
कोळथरे येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपक्रमांप्रमाणे अण्णांचे काम
सतत सर्वांसमोर असावे यासाठी ‘सागरपुत्र’च्या माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे.
कोळी आणि गरजू-गरीब विद्यार्थांना शिक्षण घेता यावे यासाठी अण्णांनी केलेल्या
शैक्षणिक कामाचा आढावा दादा खातू यांनी मांडला. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत
अण्णांचा सहभाग राहिल्याची आठवणही यावेळी सांगण्यात आली. अण्णांनी गरजू मुलींसाठी
वसतिगृहे काढली होती. खेर्डी वाचनालय खेर्डीचे प्रतिनिधी आणि आंबडस शाळेचे माजी
मुख्याध्यापक निर्मळकर, स्वर्गीय अण्णांची पुस्तके वाचनालयाला भेट मिळाल्याबद्दल
कृतज्ञता व्यक्त केली. रविंद्र लब्धे यांनी अण्णांच्या जीवनपरिचयाचे वाचन केले. यावेळी
‘स्मरणयात्रा’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर, विलास महाडिक, समीर कोवळे, महम्मद
झारे, कैसर देसाई, आरती फाउंडेशनच्या अनिता नारकर, प्रियांका कारेकर, या कार्यक्रमाचे
आयोजन सौ. नूतन रविंद्र लब्धे यांनी तर संयोजन आणि सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते
प्रकाशबापू काणे यांनी केले. आभार केवल लब्धे यांनी मानले.
मालघर येथे ‘स्मृतिगंध’
कार्यक्रम संपन्न
स्वर्गीय अण्णांचे मृत्युपूर्व काही दिवसांचे वास्तव्य राहिलेल्या चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आरती सेवा फाऊंडेशनच्या दुसऱ्या शाखेत स्मृतिगंध कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेसमोर प्रसिद्ध व्यावसायिक आणि माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज यांनी दीपप्रज्ज्वलन केले. लेखक आणि अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या हस्ते स्वर्गीय अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाटेकर यांनी अण्णांच्या इतिहास संशोधन कार्याचा आढावा घेतला. ‘प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं ऑडीट करायला हवे आहे. मला, तुमच्याशी या विषयावर सविस्तर बोलायचंय. असं ऑडीट करायला मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही ते वेळीच करा. कारण या ऑडीट दरम्यान काही त्रुटी लक्षात आल्यास त्या पूर्ण करण्यास अवधी मिळायला हवा.’ असं आपल्याला एकदा अण्णांनी सांगितल्याची हृद्य आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे यांनी सांगितली. श्रीकांत बापट यांनी बोलताना, आयुष्याच्या अखेरच्या काही दिवसात मालघरला येऊन अण्णांनी जणू ‘वानप्रस्थाश्रम’ जगल्याची भावना व्यक्त केली. दादा कारेकर यांनी नाणीसंग्रह करण्याच्या दृष्टीने अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनाची आठवण सांगितली. यावेळी ‘दलितमित्र’ शिलभद्र जाधव, विलास महाडिक, अलताफभाई, सचीन शेट्ये, गणेश भालेकर, प्रशांत साठे, नामजोशी, सुरेश आवटे आदी अण्णांचा परिसस्पर्श लाभलेली व्यक्तीमत्त्वे उपस्थित होती. प्रियांका कारेकर यांनी सूत्रसंचालन तर आरती फाउंडेशनच्या संस्थापक अनिता नारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रसिद्ध कोकण इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांचेविषयी आम्ही लिहिलेले इतर ब्लॉगलेख वाचण्यासाठी कृपया खालील लिंक क्लिक करा.
अखेर ‘ते’ दिवस संपले! (मृत्युलेख)
https://dheerajwatekar.blogspot.com/2022/10/blog-post.html
अण्णा, नव्वदीपार... (साप्ताहिक
लोकप्रभा)
https://dheerajwatekar.blogspot.com/2021/08/blog-post_26.html
अण्णा, ‘शतायुषी’ व्हा!
https://dheerajwatekar.blogspot.com/2020/09/blog-post.html
अण्णा शिरगावकर यांच्या ‘शेवचिवडा’ आणि ‘व्रतस्थ’
विषयी...!
https://dheerajwatekar.blogspot.com/2020/04/blog-post_86.html
अण्णांचे छांदोग्योपनिषद
https://dheerajwatekar.blogspot.com/2017/04/blog-post.html
धन्यवाद
धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा