बुधवार, २७ मार्च, २०२४
आस ग्रामदेवतेच्या भेटीची
मंगळवार, १९ मार्च, २०२४
पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणारे आत्मचरित्र
१ सप्टेंबर २०२३ला पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत गाडगीळ सरांच्या ‘सह्याचला : एक प्रेम कहाणी’ या वैज्ञानिक आत्मचरित्राचे ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अनड नेचर’ या इंग्रजीसह कोंकणी, कानडी, मल्याळम, तामिळ, तेलगू. हिंदी आणि बंगाली आदी भारतातील नऊ भाषांत प्रकाशन झाले. सरांनी महिनाभर अगोदर या कार्यक्रमाची कल्पना दिलेली असल्याने प्रकाशन समारंभाला उपस्थित राहाता आलं. यावेळी आधुनिक भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी गाडगीळ सरांची आत्मचरित्र अनुषंगाने घेतलेली मुलाखत आम्हा श्रोत्यांसाठी पर्वणी ठरली होती.
गाडगीळ सर हे सहा राज्ये, ४४ जिल्हे आणि १४२ तालुक्यांमध्ये पसरलेल्या, भारतातील सर्वात श्रीमंत वाळवंट, १३ राष्ट्रीय उद्याने आणि अनेक अभयारण्ये असलेल्या पश्चिम घाट संवर्धन समितीसह जैविक विविधता कायदा आणि पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्याच्या नवीन युगात हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या घातक स्थितीला आपण तोंड देत आहोत. त्या पार्श्वभूमीवर माणूस म्हणून आपण कुठे होतो? इथे कसे आणि का आलो? हे समजून घेण्यासाठी हे चरित्र अनिवार्य आहे. गाडगीळ सरांनी आपले हे आत्मचरित्र गोव्यातील शाकाची जुवे गावाच्या बिस्मार्क डियास यांना समर्पित केले आहे. भारतातील सामान्य लोकांचा शहाणपणा आणि सामर्थ्य यावर विश्वास ठेवणाऱ्या बिस्मार्क डियास यांच्या संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडण्याच्या अस्वस्थ कहाणीने आत्मचरित्र उलगडू लागते. सरांना गेली पन्नास वर्षे ओळखणाऱ्या, भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना आपल्याला २५ प्रकरणात विभागलेल्या पुस्तकाची उंची सांगते. पुस्तकात आपल्याला पिढ्यानपिढ्यांचे आघात, संकटे, जमिनीच्या सर्वात जवळ राहणाऱ्यांचे सामूहिक नुकसान, त्यांच्या परंपरांनी नैसर्गिक संसाधनांच्या वापराबद्दल आदर कसा निर्माण केला? गाडगीळ सरांच्या मनात निसर्गाबद्दलची उत्कट आस्था आणि देशातील आदिवासी आणि ग्रामीण लोकांबद्दलचा आदर बालपणापासून कसा निर्माण झाला? याची माहिती मिळते.
या आत्मचरित्रातून माणसांसह जगभरातून समोर येणारे मासे, पक्षी, भटके हत्ती, प्राणी, कीटक, किनारपट्टीवरील मच्छिमार लोक यांची सरांनी केलेली निरीक्षणे, निसर्गवेडाचे धडे, पायपीट, स्थानिकांसोबत मिळून-मिसळून राहाण्याची त्यांची पद्धत थक्क करते. पुस्तकात प्रादेशिक पर्यावरणीय इतिहासाची नोंद आणि सरांच्या कामाच्या सूक्ष्म नोंदी आहेत. पुण्याबाहेरील उपवने, पानशेत धरण पाणलोट क्षेत्र, देशात डोंगर उतारावर स्थलांतरित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची समाजशास्त्रीय निरीक्षणे आणि वरच्या स्तरात वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांबाबतचे सरांचे निरीक्षण विचार करायला लावणारे आहे. हे पुस्तक निसर्गाशी आणि देशासह जगातील विविध भूप्रदेशातील समुदायांशी असलेले सरांचे गहन संबंध स्पष्ट करते.
सरांच्या कार्यवृत्तीचे मूळ घरातील बालपणीच्या संस्कारात असल्याचे पुस्तक वाचताना लक्षात येते. सरांचे वडिल देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्यासह डॉ. सलीम अली, सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे सान्निध्य तसेच महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, जे.बी.एस. हाल्डेन यांचा प्रभाव, हार्वर्डसारख्या विद्यापीठात ई. ओ. विल्सन या प्रसिद्ध वैज्ञानिकांचे मार्गदर्शन, अमेरिकेत संधी असूनही भारतात परत येऊन संशोधन करण्याचा त्यांचा निश्चय, महाराष्ट्रातील देवरायांवरचे काम, IISC नियुक्ती, कर्नाटकातील काम, सायलेंट व्हॅली जनआंदोलन, biodiversity register, मेंढा-लेखा, पश्चिम घाट समिती, बंदीपूरमधील पांढऱ्या ठिपक्यांसह जमिनीवर राहणाऱ्या कोळ्याच्या नवीन प्रजातीला भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाचे बीके टिकाडर यांनी दिलेले ‘ओरनिथोक्टोनस गाडगीली’ नाव अशा अनेक गोष्टी पुस्तकात भेटतात. मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्रात सागरी जीवशास्त्र विषय हा परिसरशास्त्राच्या जवळचा म्हणून इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करत असताना ‘मांदेली’ माशाच्या संशोधनाच्या निमित्ताने अनेकदा सरांचा मुंबईच्या मच्छीमारांशी संवाद झालेला आहे. त्याकाळी हे मच्छीमार ट्रॉलरच्या उपयोगाबद्दल साशंक होते. म्हणायचे, ‘सुरुवातीला खूप मासे सापडतील, पण या ट्रॉलरने समुद्राचा तळ खरडून काढला जातो आणि याच्यातून माशांच्या विणीवर वाईट परिणाम होऊन दूरच्या पल्ल्याने मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.’ आज मच्छिमारांचे भाकीत खरे ठरल्याची नोंद सरांनी केली आहे. मच्छीमार जी मांडणी करत होते त्याला ‘सावधानतेचे तत्त्व’ (Precautionary principle) म्हणतात असे पुस्तकात नमूद आहे.
१९९०मध्ये, गाडगीळ सरांना मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पीपल ऑफ इंडिया (POI) प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली होती. पीओआय डेटाबेसमधून गाडगीळ सर आणि त्यांचे सहकारी, ‘आधुनिकता, वेगवान विकास आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर संसाधनांची अधिक चांगली वाटणी करण्यासाठी गरिबी निर्मूलन आणि लोकसंख्या नियंत्रण धोरण परस्परपूरक राबवून भारतीय कुटुंबाचा आकार लहान व्हायला हवा’ या निष्कर्षापर्यंत पोहोचले. हे आत्मचरित्र निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगासाठी ही जीवनकथा प्रेरणादायी आहे. राजकीय अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यासह वस्तुनिष्ठ तथ्ये सांगून आपल्याला ज्या विषयांची माहिती आहे त्यावर आजवर निर्भयपणे लिहिणारे गाडगीळ सर चरित्रात पानोपानी भेटतात. हे पुस्तक म्हणजे एका तल्लख विद्वान, शिक्षक, वैज्ञानिक, कार्यकर्ता, प्रभावशाली धोरणकर्ता आणि बरेच काही यांचे संस्मरण आहे. या आत्मचरित्राची भाषा सरांच्या बोलण्यातल्या शब्दांसारखी सहजसोपी आहे. सरांनी संपूर्ण पुस्तकात निसर्ग-पर्यावरणाच्या रक्षणासोबत शाश्वत विकास कसा होईल? यासह भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि शासन याविषयी आपले स्पष्टवक्तेपण कायम ठेवले आहे. मोजकी छायाचित्रे असलेले हे पुस्तक प्रकाशकांनी सुरेख सजवले आहे. मराठी पुस्तकाचे संपादन हे गाडगीळ सरांसोबत पश्चिम घाट अभ्यासवर्गात काम केलेल्या डॉ. मंदार दातार यांनी केले आहे. भारतासह जगात आमच्यासारखे अगणित पर्यावरणप्रेमी आहेत, ज्यांच्यावर गाडगीळ सरांच्या कामाचा खोलवर प्रभाव आहे. सरांचे हे आत्मचरित्र निसर्ग, जंगल आणि पर्यावरणाकडे कललेल्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
गाडगीळ सरांचे कोणतेही म्हणणे हे शास्त्रीय पुराव्याशिवाय नसते आणि समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी कटूसत्य सांगायला सर कचरत नाहीत याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. आत्मचरित्रातील शेवटचे प्रकरण ‘पुढची दिशा’ सांगणारे आहे. त्यात सर म्हणतात, ‘आपल्या प्रचंड लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी आसमंतातील नैसर्गिक संसाधनांवरचे अधिकार स्थानिक लोकांच्या हाती दिले पाहिजेत.’ सध्याच्या हवामान बदलाच्या युगात सरांच्या या सल्ल्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे आहे. भारतातील पर्यावरणीय इतिहास आणि संवर्धन यांची वास्तविकता शिकवण्यासाठी हे पुस्तक अमूल्य आहे. भारतातील जैवविविधता, संवर्धन आणि पर्यावरणीय भविष्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे प्रकाशमय पुस्तक आहे. भारतात शेतीवरती रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांची जी पकड आहे ती नवी पिढी ढिली करेल या आशावादासह सरांनी आपल्या आत्मचरित्राचा शेवट दलाई लामा यांच्या ‘वैश्विक जबाबदारी’ विषयक मानवतेच्या कल्याणासाठी आपल्याला झटावे लागेल अशा आशयाच्या वचनाने केला आहे. हे आत्मचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध जैविक वारशाच्या एका माणसाच्या खोल वेडाची दुर्मिळ प्रेमकथा आहे. यातील बारकावे अस्वस्थ करणारे आहेत. हे पुस्तक निसर्ग व पर्यावरणप्रेमी, विकासाच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक यांसह सर्वांनी वाचायला हवे आहे. आज विकासाच्या नावाखाली देशभरात झपाट्याने हिरवाई मोडीत निघत असताना गाडगीळ सरांचे जीवन एक धडा म्हणून समोर आले आहे. दुर्दैवाने आम्ही भारतीय हा धडा शिकायला तयार नाही पण न शिकण्याची मोठी किंमत मोजायला तयार आहोत अशी आजची स्थिती आहे.
‘परिसरशास्त्राचे शिक्षण घेतल्याचा एक तोटा म्हणजे तुम्हाला एका रक्तबंबाळ जगात एकाकीपणे जगायला लागते. सामान्य माणसाला जगावर होत असलेले हे घाव बिलकुल दिसत नाहीत. परिसर शास्त्रज्ञाला एक तर निर्ढावायला लागते, नाही तर मृत्यूची चिन्हे दिसत असली, तरी ती पाहायची नाहीत, असा डॉक्टर बनायला लागते.' अमेरिकेतील निसर्गप्रेमी आल्डो लिओपोल्ड यांनी १९४९ साली त्यांच्या A Sand County Almanac या पुस्तकात लिहिलेल्या मजकुराचा संदर्भ देऊन गाडगीळ सर, ‘मीसुद्धा हे घाव बघतो आणि त्याचे मला दुःख होते’ असं लिहितात ते वाचताना अस्वस्थ व्हायला होतं. त्याही स्थितीत कविवर्य विंदा करंदीकर यांच्या शब्दात, 'विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया, देई न प्रेम शांती, त्याला इलाज नाही' हे सांगूनही मी दुर्दम्य आशावादी आहे आणि आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी ज्ञानक्रांती घडवून आणली आहे, त्यातून खूप काही चांगली निष्पत्ती होईल, ह्याची मला खात्री आहे. असं गाडगीळ सर नमूद करतात. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा सरांना विश्वास आहे. तो सार्थ ठरावा, ही वनदेवतेच्या चरणी प्रार्थना.
धीरज
वाटेकर चिपळूण
मो.
९८६०३६०९४८
आत्मचरित्र : सह्याचला
आणि मी - एक प्रेमकहाणी
लेखक : माधव
गाडगीळ
पृष्ठे : ४६४ +
१६ रंगीत पृष्ठे
किंमत : ८०० ₹
राजहंस प्रकाशन पुणे
महाराष्ट्र टाईम्स २४ मार्च २०२४ |
शुक्रवार, १ मार्च, २०२४
‘खाजगी पसंत’ शाळेचा सुवर्णमहोत्सव!
दैनिक सागर २ मार्च २०२४ |
असुर्डे!
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अकरा वाड्यांनी युक्त सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे
गाव. पन्नास वर्षांपूर्वी गावात सात इयत्तांची एक आणि चार इयत्तांच्या दोन शाळा
अस्तित्वात होत्या. मात्र गावातील कासारवाडी, खापरेवाडी, चोगलेवाडी आणि गुरववाडी
येथील विद्यार्थ्यांना बसस्टॉप जवळील शाळेत पोहोचण्यासाठी रस्त्यातील नदी पार
करावी लागत असे. इतर मोसमात ठीक असायचे पण पावसाळ्यात हा प्रवास अत्यंत खडतर व्हायचा.
स्थानिक लोक, नदी पार करायची पारंपारिक व्यवस्था म्हणून नदीच्या पात्रावर लाकडाचा
साकव उभारीत. मात्र त्यालाही मर्यादा येत. अनेकदा हा साकव पुराच्या पाण्यात वाहून
जाई. मग पालकांना आपल्या लेकरांना स्वतःच्या खांद्यावर बसवून शाळेत पोहोचवावे लागत
असे. अनेकदा तर चौथीपर्यंतच्या छोट्या विद्यार्थ्यांना पर्यायाअभावी शाळा बुडवावी
लागत असे. शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरील पक्क्या पुलाच्या अनुपलब्धीमुळे होणाऱ्या
शैक्षणिक नुकसानीला पालक पर्याय शोधण्याच्या मनस्थितीत होते. अशातच गावातील वसंत
शंकर जाधव यांचे १९७१साली रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पत्नी
श्रीमती सुमन वसंत जाधव आणि उभयतांच्या छोट्या कन्येच्या भविष्याचा गंभीर प्रश्न
निर्माण झाला होता. जाधव यांच्या कुटुंबीयांनी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत
देसाई आणि विठठल साळवी यांच्यामार्फत हा विषय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वर्गीय
गोविंदराव निकम (माजी खासदार) यांच्यासमोर मांडला आणि काहीतरी मार्ग सुचविण्याची
विनंती केली. निकम साहेबांनी ग्रामस्थांची समस्या समजून घेऊन कासारवाडीतील प्रमुख
ग्रामस्थांना खाजगी पसंत शाळा सुरु करण्याची सूचना केली. त्यांची सूचना आणि
वाडीतील पावसाळी शैक्षणिक स्थितीचा विचार करून गावातील कासारवाडी, खापरेवाडी,
चोगलेवाडी आणि गुरववाडीतील ग्रामस्थ एकवटले. गावात शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे
संस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापन होताच शाळेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला.
तेव्हा आपल्या राहात्या घराच्या पडवीत जागा उपलब्ध करून देत स्वर्गीय गणपत
बाळकृष्ण नरोटे यांनी जागेचा प्रश्न सोडवला. १ जून १९७४ रोजी कासारवाडीत पहिली ते
चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खाजगी पसंत’ शाळा सुरु झाली.
ज्या
घटनेच्या गांभीर्यातून शाळेची उभारणी झाली होती त्या स्वर्गीय वसंत शंकर जाधव
यांच्या पत्नी श्रीमती सुमन वसंत जाधव यांना शाळेत ‘शिक्षिका’ म्हणून नेमण्यात
आले. असुर्डे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गावातील एका कुटुंबावर ओढवलेल्या संकटावर
मात केली होती. पुढे गणपत नरोटे यांच्या घरात वर्षभर शाळा चालली. वर्षभरात शाळा
नियमित झाल्यावर इमारतीचा प्रश्न पुढे आला. तेव्हा स्वर्गीय शांताराम कृष्णा नरोटे
आणि स्वर्गीय राजाराम कृष्णा नरोटे यांनी शाळेच्या इमारतीसाठी जागा दिली. या
जागेवर ग्रामस्थांनी अर्ध्या मातीच्या भितींवर गवताचे पेंढारु छप्पर घालून
शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. शाळेची गरज लक्षात घेऊन पुढच्या वर्षी
श्रीमती घाणेकर यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनेक वर्षे शाळा याच
पेंढारु अवस्थेत होती. कालांतराने ग्रामस्थांनी शाळेला कौलारू स्वरूप दिले.
२०११साली स्वतंत्र दोन रूमची चिरेबंदी कौलारू इमारत बांधण्यात आली. या खोल्यांच्या
मध्यभागी स्लॅब टाकून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील असा मोठा
पॅसेज तयार झाला. आज याठिकाणी शाळेचे सर्व कार्यक्रम संपन्न होत असतात.
गावातील लोकांनी शासकीय मदतीशिवाय हे सारे उभे केले आहे. सुरुवातीपासून शाळेचा दर्जा उत्तम आहे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडी या संस्थेचे पहिले अध्यक कै. गणपत बजाबा नरोटे (१ जून १९७४ ते डिसेंबर १९८०) होते. त्यानंतर कै. विठोबा केशव नरोटे (१९८१ ते १९८३), कै. नारायण गोपाळ खापरे (२ मे १९८३ ते २००९), कै. राजाराम गजानन नरोटे (२००९ ते २०२१), राकेश राजाराम नरोटे (ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२) यांनी काम पाहिले. एप्रिल २०२२ पासून वसंत शांताराम साळवी हे अध्यक्ष आहेत. आजपर्यंतच्या सर्वच संस्थाचालकांनी आपलं तन-मन-धन अर्पून शून्यातून ही शाळा नावारुपाला आणलेली आहे. यासाठी मागील पन्नास वर्षांत सर्व ग्रामस्थांचेही सातत्याने सहकार्य राहिलेले आहे. २०१४ मध्ये ही शाळा डिजीटल होऊन इयत्ता पहिली ते चौथीचे इंग्रजी वर्ग सुरु करणेत आले आहेत. २०१५मध्ये शाळेने ISO नामांकन प्राप्त केले. शाळेने ‘A’ ग्रेडही प्राप्त केली आहे.
आमदार
निकम यांच्याहस्ते उद्घाटन होणार
शनिवारी
(दिनांक २ मार्च) सकाळी ९ वाजता गोपूजन व ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाल्यावर आमदार
शेखर निकम यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी
माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती संतोष चव्हाण, पं. स. चिपळूणच्या गटविकास अधिकारी उमा घारगे
(पाटील), गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, साहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर
कांबळे, प्रभाग सावर्डेच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, मांडकी
केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवितके, असुर्डेचे सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप
जाधव, सदस्य सारिका नरोटे, माजी सदस्य (शाळा समिती) गणपत खापरे, लायन्स क्लब
सावर्डेचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते
अवधूत साळवी, गजानन साळवी, असुर्डेचे तंटामुक्ती अध्यक्ष अनंत निर्मळ, उत्तम जाधव,
माजी मुख्याध्यापिका सुमन जाधव, माजी साहाय्यक शिक्षिका अपर्णा भाताडे आदी मान्यवर
उपस्थित राहाणार आहेत. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ०३.३० - महिला व बालविकास
अधिकारी माधवी जाधव यांचे महिला कायदे विषयक मार्गदर्शन, सायंकाळी ५ - हळदीकुंकू
समारंभ, रात्रौ ७.३० - आजी-माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल.
यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची विशेष उपस्थिती असेल. तर रविवारी
(दिनांक ३ मार्च) सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण पूजा संपन्न होईल. सकाळी १०.३० –
सामाजिक कार्यकर्ते अवधूत साळवी यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी सन्मान सोहोळा
संपन्न होईल. सकाळी ११.३० – फनीगेम्स,
दुपारी १.३० – महाप्रसाद, दुपारी ३ – लायन्स क्लब सावर्डे यांच्या
सौजन्याने डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीर व
रक्तदान शिबीर होईल.
या
शाळेचा सुवर्णमहोत्सवी समारंभ संपर्कात आलेल्या सर्वासाठी पर्वणी असणार आहे.
कोकणच्या मातीत उपक्रमात्मक वैशिष्टपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांचे विद्यमान
विद्यार्थ्यांना सान्निध्य देताना शाळेचे गेल्या पन्नास वर्षातील माजी विद्यार्थी,
पालक, शिक्षक आवर्जून उपस्थित राहातील, असे नियोजन शाळेने केले आहे.
या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभास अवश्य उपस्थित राहावे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे
कासारवाडीचे अध्यक्ष वसंत शांताराम साळवी, सचिव महेंद्र नरोटे आणि त्यांचे सर्व
सहकारी शाळेचा सुवर्ण महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
विद्यार्थी संख्येअभावी राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा बंद होत
चालल्या असताना, अभिनव विचारातून उभ्या राहिलेल्या आणि वयाची पन्नाशी पूर्ण
केलेल्या या खाजगी पसंत शाळेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
धीरज वाटेकर
चिपळूण
मो. ९८६०३६०४९८
मौजे शिपोशी :: विशेष नोंदी
कोकणातील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण
साहित्य संमेलन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर सरांच्या अध्यक्षतेखाली आजपासून (१-३ मार्च
२०२४) शिपोशीतील न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये विद्यामंदिरात होत आहे.
संमेलनाच्या निमित्ताने ‘शिपोशी’ संदर्भातील काही दुर्लक्षित नोंदींचा घेतलेला हा
आढावा...
धीरज वाटेकर चिपळूण (मो. ९८६३६०९४८)
निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी श्रीपोशीचा अपभ्रंश होऊन आजचे शिपोशी नाव रूढ झाले असावे असा कयास आहे. इ.स. १६८२ मध्ये गावात वस्ती असल्याचे उल्लेख सापडतात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कोकणातील वसाहती ग्रंथात केलेल्या नोंदीनुसार हे गाव कोणी मराठा सरदाराने वसविलेले असावे. छत्रपती श्रीशिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानी देवीचे मंदिर बांधले त्यावेळी देवीचे पुजारी इनामदार आठल्ये होते. मौजे बावधन (वाई) हा गाव त्यांच्याकडे इनाम होता. देवीचे विद्यमान पुजारी हडप मूळचे आठल्ये होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भयंकर आणि दुर्दैवी मृत्युनंतर (१६८९) कोकणात ज्या चकमकी, जाळपोळी झाल्या त्यात शिपोशी गाव सापडून श्रीदेव गांगेश्वर मंदिराचे नुकसान झाले होते. शिपोशी हे पेशवाईपूर्व काळापासून विद्वत्ता, शिक्षण आणि सामाजिक सुधारणा ह्यात पुढारलेले गाव होते.
११व्या
शतकाच्या सुमारास पाटण (सातारा) तालुक्यातील पाटणच्या दक्षिणेस असलेल्या
‘ओटोली’तून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले होते. ‘ओटोली-ये’ आडनावाचा
१६७६ च्या श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे. शिपोशी हे गाव
हा इ.स. १७२५ च्या आसपास देवळे येथील आठल्ये यांना इनाम म्हणून मिळाले. गावचे
ग्रामदैवत श्रीगांगेश्वर आहे. सन १७५०च्या दरम्यान आठल्ये यांनी श्रीदेव
हरिहरेश्वराची स्थापना करून प्रसिद्ध मंदिर बांधले. शिपोशी गावात मुंबई इलाख्यातील
सहावी मराठी शाळा १८५५ साली सुरु झाली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात
मुंबईत उद्योगधंदे वाढत होते. मुंबई बोटीने कोकणाला जोडलेले होते. १८३० नंतर
टप्प्याटप्प्याने झालेला मुंबई गोवा रस्ता तयार झाला. तर रत्नागिरी-कोल्हापूर
मार्ग १८८० ते १८९० या कालावधीत टप्प्याटप्प्याने टायर झाला. १९व्या शतकात
कोकणातून लोकं कामधंदा व शिक्षणासाठी मुंबईला जाऊ लागले. १९०५ साली गावी पोस्टऑफिस
सुरु झाले. गावात १९१३ साली शिपोशी ग्रुप सहकारी पतपेढी स्थापन झाली होती. १८ जून १९५९ रोजी कै. डॉ. वि. ग. तथा बापूसाहेब
आठल्ये यांच्या पुढाकाराने माध्यमिक विद्यालय सुरु झाले. शिपोशीचे शशिशेखर काशीनाथ
आठल्ये गुरुजी हे आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे विविध समाजाच्या पाठबळावर विधानसभेवर
सतत निवडून येत राहिले. आपल्या साधेपणासाठी विशेष लोकप्रिय असलेल्या गुरुजींनी ‘सामाजिक
कार्य कसे करावे?’ याचा आदर्श आपल्या जीवनात निर्माण केला. गावात १९५६ पासून
ग्रामपंचायत अस्तित्वात असून पहिले सरपंच कै. रघुनाथराव बाईंग होते. गावातील मोहोळ
पऱ्यावरील धरणामुळे लोकं उन्हाळ्यात भाजीपाला व इतर पिके घेत असतात. विशेष
नोंदींची सुरुवात याच मोहळच्या पऱ्यापासून करूयात.
शिपोशी ओढ्याची दिशा बदलण्याची कल्पकता
जमीन
सुधारण्यासाठी, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली
आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून साहाय्य मिळत असे. रत्नागिरी
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तर्फे देवळे मौजे शिपोशी या गावी मोहळचा पऱ्या
(ओढा) व दाभोळच्या सीमेवरील ओढा असे दोन ओढे होते. विशाळगडचे पोतदार मल्हार रंगनाथ
यांनी हे दोन ओडे मोडून नवे भातशेत करण्यासारखे आहे असे देवळे येथील ठाणेदारांना
कळविले होते. मल्हार रंगनाथ मशागत करणारे असले तरी हे काम फार कष्टाचे होते. त्या
जागी बराच खर्चही करावा लागणार होता. भातशेत तयार होऊन लागवडीस देण्यास बरीच वर्षे
लागण्याची शक्यता होती. मल्हार रंगनाथ आणि देवळे येथील सरकारी कामगार यांनी ती
जागा पाहून, तेथील मल्हार, गुरव यांना
बोलावून सर्वासमक्ष नदीस मिळालेला मोहोळाचा ओढा मोडून उत्तरेच्या बाजूने डोंगरात
चर काढून नदीस मिळविण्यासाठी तो १४०० हात लांबीचा खणावा अशी योजना होती. त्यासाठी
त्यांना देवळे तर्फ्याचे ठाणेदार यांनी मल्हार रंगनाथ याला १६८२ साली कौलनामा सादर
केला होता. ओढ्याची दिशा बदलण्याची आणि त्याखालील जमीन भातशेतीखाली आणण्याची योजना,
त्याकाळचा विचार करता, अत्यंत कौतुकास्पद
ठरावी अशी होती. या कल्पनेला संभाजीराजांच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मल्हार
रंगनाथ आणि काशी रंगनाथ यांनी डोंगरातून जो चर खणला त्याची लांबी १८०० हात,
रुंदी १८ ते २० हात आणि खोली ५ ते ७ हात होती. त्यांना या कामासाठी
८ हजार रुपये खर्च आला होता. श्रम, साहस व कष्ट मशागत करून
केलेले हे बांधकाम फुटले. पुन्हा खर्च आणि श्रम करण्यासाठी हुशारी यावी म्हणून
शिपोशीपैकी नदीच्या पूर्वेकडील सर्व भाग कोंड म्हणून स्वतंत्र करून द्यावा यासाठी
काशी रंगनाथ याने १६९२ साली विशाळगडचे अमात्य रामचंद्र निळकंठ यांना विनंती केली
होती. त्याप्रमाणे त्यांना सनद देण्यात आल्ली होती. खोदून तयार केलेला चर कित्येक
ठिकाणी १० ते २० हात रुंद असून ७-८ हात उंचीचा आणि दोनअडीचशे हात लांबीचा होता. या
ठिकाणाला 'चराची पट्टी' म्हणत. दाभोळ
नावाच्या सीमेच्या ओहोळासही बांध घालून बाजूने चर खणून तोही नदीपर्यंत नेलेला
होता. त्या ठिकाणी शेत तयार केलेले होते. मोहोळाच्या ओढ्यातील बांध फुटल्यामुळे ते
काम अपुरे राहिले होते. चर खणण्याचे आणि बांध घालण्याचे काम १६८२ साली सुरू होऊन
पुढे ८-९ वर्षे चालू होते.
जवळच्या
गावात चकमक
२
मार्च १७०२ रोजी रात्री शिपोशी जवळच्या (कोतरी-कातर) गावावर मोगल बादशाही
अधिकाऱ्यांनी हल्ला चढवला होता. मराठे आणि मोगल बादशाही अधिकाऱ्यांच्यात यांच्यात
चकमक झाली होती. मोगल बादशाही अधिकाऱ्यांनी गाव ताब्यात घेतले होते. मराठ्यांनी
खेळणा (विशाळगड) किल्ल्याचा आसरा घेतला होता.
रियासतकारांच्या
प्राथमिक शिक्षणाचे गाव
हिंदू
महासभेला शिपोशीत पाठींबा
विद्यार्थ्यांमध्ये
भेदभाव न करण्याचा सरकारी आदेश असताना कोकणात त्याचे पालन होत नव्हते. तेव्हा
रत्नागिरीत स्थानबद्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकारांनी हिंदू महासभेच्या
माध्यमातून १९२५ मध्ये हा प्रश्न हातात घेतला. जनजागृतीसाठी त्यांनी कोकणात
सर्वत्र दौरे केले, व्याख्याने दिली. याचे पडसाद कोकणातील साठ-सत्तर गावात उमटले
होते ज्यात शिपोशी एक होते.
१९२९ची शिपोशी सहकार परिषद
तत्कालीन
सावंतवाडी प्रांतातील कुडाळ येथील बाकरे कुटुंबातील वैद्यकीय व्यावसायिक (आयुर्वेद
आणि होमिओपॅथी) वासुदेव महाशेवर बाकरे यांनी १९०८मध्ये बेळगाव येथे वैद्यकीय
व्यवसाय सुरु केला होता. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १३ वर्षे
संचालक, सहकार परिषदेचे सदस्य, १९३२-३३मध्ये मुंबई प्रांतीय सहकारी संस्थेचे सचिव
होते. विशेष म्हणजे १९२९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिपोशी येथे झालेल्या सहकार
परिषदेचे ते अध्यक्ष होते.
आठल्ये
दप्तर
शिपोशी
गावातील श्रीकृष्ण विठ्ठल आठल्ये हे मराठा इतिहासाचे एक सुप्रसिद्ध समीक्षात्मक
अभ्यासक होते. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मूळ दस्तऐवज संकलित,
कॉपी आणि प्रेससाठी तयार केले होते. त्यांच्या आठल्ये दफ्तरातील हा
संग्रह १९४५मध्ये रघुवीर लायब्ररीसाठी विकत घेण्यात आला.
हिंदुस्थानातील पहिल्या बॉम्बचे जनक शिपोशीचे!
कवी-साहित्यिक कृष्णाजी नारायण आठल्ये
प्रमाण
अतीकोपता कार्य
जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते
कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त
सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे
सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा
रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते
मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग
देवावरी का रुसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां
कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी
आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां
न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता
दुरावेल सत्य, अती `होस हो'
बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा
ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही
असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास
कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून
तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग
कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न
कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द
स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न
कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ
खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया
नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही
वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
रत्नागिरी
जिल्ह्यातील पहिले मराठी वर्तमानपत्र ‘जगन्मित्र’ सुरु करणारे संपादक जनार्दन हरि
आठल्ये यांचेही मूळगाव शिपोशी होते. जनार्दन हरि आठल्ये यांचा जन्म १८२६ ला
झाल्याची नोंद मिळते. जनार्दन हरी आठल्ये (1826-1900) हे रावसाहेब विश्वनाथ
नारायण मंडलिक हे प्रसिद्ध वकील आणि प्राच्यविद्या अभ्यासक यांचे लहानपणापासूनचे
स्नेही आणि रत्नागिरीतील शाळासोबती होते. तसेच ते संस्कृतचे अभ्यासक बापूसाहेब
आठल्ये यांच्याशी संबंधित होते. प्राथमिक आणि इंग्रजी असे सुरुवातीचे शिक्षण
खाजगीत,
घरी मिळवणारे ते एक स्वयंनिर्मित व्यक्ती होते. त्या काळात छापून
आलेली इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली होती. यातून
त्यांना भारताबाहेरील देशांच्या घडामोडींमध्ये रस निर्माण झाला. रत्नागिरीच्या
सरकारी हायस्कुलात शिकून ते मॅट्रिक झाले त्यानंतर त्याच हायस्कुलात शिक्षक म्हणून
नोकरीला लागले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे जाणकार
असलेल्या जनुभांऊचा धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचा विशेष अभ्यास होता.
हस्तलिखितापेक्षा
मुद्रित ग्रंथाना महत्व येणार आहे हे जाणून या ज्ञात्याने १८४८ ला रत्नागिरीत
‘जगमित्र’ छापखाना सुरू केला. जून १८५४ ते १८९० पर्यंत सुमारे ३७ वर्षे त्यांनी
“जगन्मित्र” साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या शिळाप्रेसवर चालविले. पुणे-मुंबर्इ सोडून
अन्यत्र कुठे वृत्तपत्राला प्रारंभ झाला नव्हता तेव्हा या दोन शहरानंतर संपूर्ण
महाराष्ट्रात पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा मान ‘जगन्मित्र’ लाच आहे. जनार्दन हरी
यांचा स्वतःचा उत्तम असा ग्रंथसंग्रह होता. स्वतःचा मुद्रण व्यवसाय असल्यामुळेच
त्यांनी साप्ताहिकाचा बुडिताचा धंदा सुरू केला. साप्ताहिक विकत घेऊन वाचायची
मानसिकता समाजात आलेली नव्हती. ’जगन्मित्र ‘साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ५ रुपये
होती आणि वर्गणीदारांची संख्या होती अवघी १७. विशेष म्हणजे या १७ वर्गणीदारात
मराठीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखक आणि कोशकार मेजर थॉमस कॅडी,
कराची येधील फ्रियर हे पुढे मुंबर्इ प्रांताचे गर्व्हनर झाले होते.
मिस्टर एलिस अशा अभ्यासू व्यक्ती होत्या. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी
ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना हिंदू धर्मावर टीका करायला प्रारंभ केला असताना
त्या टीकेला अभ्यासपूर्ण भाषेत लेख लिहून उत्तरे देण्याचे काम जनुभाऊ आठल्ये यांनी
‘जगन्मित्र’ मधून केले. २० ऑगस्ट १८६६ च्या अंकात, हिंदुस्तानात
पडलेल्या दुष्काळाच्या एका बातमीत, ‘चितापूर येथे भिकाऱ्यास
तांदुळ वाटिले तेव्हा त्या गरिबांचे गर्दीत ३२ माणसे ठार मेली व १५ स दुखापत झाली
आहे.’ अशी नोंद आहे. ’जगन्मित्र‘चा त्या वेळी ’रत्नागिरीचे गॅझेट‘ असा उल्लेख
व्हायचा. बिनचूक माहिती प्रसिद्ध होत असे. जगन्मित्र छापखान्यात आठल्ये यांनी
‘धर्मसिंधू’, भावार्थ दीपिका’, ‘बृहत्संहिता’
ग्रंथ प्रकाशित केले. १८७५साली आठल्ये आणि विनायक शास्त्री आगाशे यांनी
शब्दसिद्धीनिबंध नावाचा कोश प्रसिद्ध केला होता. संस्कृत श्लोक आणि त्याचा मराठी
अनुवाद असलेला एक मूलभूत दुर्मिळ ग्रंथ वराहमिहिरकृत श्री बृहतसंहिता चे भाषांतर करून जनार्दन हरि आठल्ये यांनी ११
ऑक्टोबर १८७४ रोजी प्रसिद्ध केला होता.
'वराहमिहिर' हा चौथ्या-पाचव्या शतकातील
खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी होता. त्या काळात, भारतीय
खगोलशास्त्र व गणित, युरोपपेक्षा खूपच प्रगत होते. वराहमिहिर,
हा विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता, अशी आख्यायिका आहे. या पुस्तकात १०७ अध्याय असून त्यातील भविष्य हे,
व्यक्तिगत भविष्य नसून सार्वजनिक भविष्य आहे. भूकंपासारखी नैसर्गिक
संकटांची कारणे आणि भविष्ये यात आहेत. अशा प्रकारचा हा ग्रंथ दीड हजार वर्षापूर्वी
लिहिला गेला होता, ही आश्वर्याचीच गोष्ट आहे. १८७४ मध्ये
आठल्ये यांनी रत्नागिरी सारख्या ठिकाणी, या ग्रंथाचे
मुळाबरहुकूम भाषांतर सिद्ध केले होते. विद्योद्भव लाभ (१८४९) हा शिक्षणाच्या
फायद्यांवरील निबंध, शब्दसिद्धी निबंध (१८७१) हा एक दार्शनिक
निबंध, संस्कृतमधून मराठी शब्दांच्या व्युत्पत्तीबद्दल
मुर्खासतक (१८७७) हा मूर्खाविषयीच्या २५ सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकांचा श्लोक
स्वरूपात केलेला अनुवाद, काली उद्भव (1878) हे येणार्या
अंधकारमय युगाबद्दल संस्कृत कृतीचे मराठी रूपांतर, सद्यस्थिती
निबंध, विद्यामाला, ज्योतिष, बालवैद्य, पाकशास्त्र ही त्यांची कमी ज्ञात पुस्तके
आहेत. या नोंदी History of modern Marathi literature 1800-1938
मराठी वान्द्मय कोश या govind chimanaji bhate निवृत्त
प्राचार्य वेलिंग्टन कोलेज सांगली यांनी १७ फेब्रुवारी १९३९ रोजी लिहून प्रसिद्ध
केलेल्या ग्रंथात आहेत. त्यांनी शिपोशी येथे मराठी शाळा सुरू केली. लोकांच्या उदार
सहकार्याने शाळेसाठी इमारत बांधली होती. भारतीय ग्रंथमुद्रण – बापूराव नाईक (कॅ.
गो. गं. लिमये ट्रस्ट प्रकाशन) १० मे १९८० नुसार जगन्मित्र छापखान्यात १८५४ पासून
१८६९ पर्यंत २५ पुस्तके छापण्यात आली होती. गुण्ये घराण्याचा इतिहास खंड दुसरा
नुसार, शके १७९०, सन १८६८ मध्ये जनार्दन हरि आठल्ये (इनामदार शिपोशी) यांनी
परिश्रमपूर्वक कऱ्हाड्यांची शुद्ध गोत्रावळी तयार केली होती.
१८००
ते १८६९ दरम्यान महाराष्ट्रात बेळगाव-धारवाड-कराची सह १०१ छापखाने होते. त्यात
रत्नागिरीतील हा एकमेव होता. १८७० ते १८८५ - १८ पुस्तके छापण्यात आली. त्यांचे
पहिले पुस्तक प्रातस्मरणादि पद्य (प्रती २५) सखाराम मोरेश्वर जोशी यांनी छापून
घेतले होते. विद्यामाला हे अन्वर्थक नाव
घेऊन त्यांनी १८७८ मध्ये महाराष्ट्रीय ज्ञानकोश मासिक स्वरुपात छापायला सुरुवात
केली होती. पण २०० पानांच्यावर त्याची प्रगती झाली नाही. जनुभाऊ वृद्धापकाळापर्यंत
जगले आणि 1900 मध्ये मुंबईत त्यांचे निधन झाले.
संदर्भ
::
१. WHO’S
WHO INDIA (EDITED AND COMPILED THOS. PETERS) १९३६
२. HAND LIST OF IMPORTANT HISTORICAL MANUSCRIPTS IN THE RAGHUBIR LIBRARY १९४९
- RAGHUBIR LIBRARY SITAMAU (MALWA)
३. डिसेंबर
१९५१ - मासिक नवभारत - प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर यांचा लेख
४. शिवपुत्र
संभाजी - डॉ. सौ. कमल गोखले (ज्ञान-विज्ञान विकास मंडळ १९७१)
५. कै.
वै. वि. आठल्ये यांचे १९८१ सालचे माघी उत्सवातील भाषण
६. जानेवारी
१९८३ :: मोगल दरबाराची पत्रे (खंड दुसरा) संपादक - सेतुमाधव पगडी
७. www.harihareshwardevasthanshiposhi.in
(धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत.)
नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!
जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...
-
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष , वृक्षमित्र आबासाहेब मोरे हे सतत पर्यावरणाचा विचार करणारे एक अ...
-
कोकण पर्यटन विकास हा सातत्याने काम करण्याचा विषय आहे. अशी कामे करणाऱ्या अनेक कोकणी माणसांनी आपापल्या...
-
भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीच्या जडणघडणीत नाथपंथाचे खूप महत्वाचे स्थान आहे . संपूर्ण देशभरात हा समाज विखुरलेला आह...
-
पाचेक वर्षांपूर्वी एका प्रेरणादायी शब्दकथेचं लेखन करताना परीटघडी, परिटाचा दिवा, परिटांचा अंगारा या शब्दांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. तसे ...
-
ग्रामीण कोकणात आजही पावसाळ्यात असे नद्या-ओहोळ-नाले ओलांडावे लागतात कोकणच्या दऱ्याखोऱ्यातील माचाळसारख्या (रत्नागिरी) अनेक गावात आजही ‘पावसा...