१६ जुलै २०२४ |
Tickell's Blue Flycatcherचं नाव ब्रिटीश पक्षीशास्त्रज्ञ सॅम्युअल टिकेल यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ दिलेलं आहे. पक्ष्याचं निसर्गातील वर्तन त्याच्या शरीरावरील मोहक निळा, फिकट निळा-राखाडी, केशरी आणि पांढऱ्या रंगांच्या पार्श्वभूमीवर मनाला अत्यंत उत्साहवर्धक अनुभूती देतं. नीलिमा पक्ष्याचे निरीक्षण करताना त्याच्या पंखांची रंगछटा प्रचंड आनंद देते. सतत जागोजागी फिरत राहण्याच्या सवईमुळे यांना नर्तक पक्षी म्हणूनही ओळखले जाते. नीलिमा पक्षी साधारणपणे चिमणीपेक्षा थोडा लहान आकाराचा (११ ते १२ सें.मी.) आहे. यातील नर पाठीकडून निळा, पोटाकडे पांढरा, गळा व छातीचा भाग तांबूस, खांद्यावरचा काही भाग आणि भुवया आकाशी रंगाच्या असतात तर मादी नरापेक्षा फिकट रंगाची असते. हा पक्षी भारतासह श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया या आशियाई देशात आढळतो. Tickell's Blue Flycatcher खरंतर जंगलातील पक्षी आहे. तो झाडी, बांबूची झाडे, पानगळीची जंगले, सदाहरित जंगले, लहान झुडपी जंगले, बांबूचे बेट आणि हिरवळीने समृद्ध बागांच्या वातावरणात वास्तव्याला असतो. बहुतेक वेळा पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतो. या पक्ष्याच्या आहारामध्ये प्रामुख्याने उड्डाण करताना चतुराईने पकडलेल्या कीटकांचा, काही अपृष्ठवंशी आणि अळ्यांचा समावेश असतो. कधीकधी जमिनीवरून रांगणारे कीटकही गोळा करतो. त्याचे हे वर्तन सध्याच्या बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेणे ठरावे.
१८ जून २०२४ |
मार्च ते ऑगस्ट हा काळ या नीलिमा पक्ष्यांचा वीणीचा काळ आहे. आमच्याकडे १८ जूनच्या दरम्यान पक्ष्याने घरटे करायला सुरुवात केलेली. पाने, मूळ, शेवाळे, बारीक गवत, वनस्पतींचे तंतू आदी साहित्य वापरून बनविलेले घरटे सहसा बांबूच्या बुंध्यात, झाडाच्या पोकळीत-खोडात किंवा खडकांमध्ये असते. मात्र कुठेही जागा न मिळाल्याने पक्ष्याने साधारणपणे नियमित साहित्याचा उपयोग करून आमच्या घराच्या ईशान्येला असलेल्या खिडकीच्या (पांढऱ्या काचांची स्लायडिंग विंडो) डाव्या कोपऱ्यात घरटे केले होते. घरट्या समोरून फारशी मानवी ये-जा नसल्याचे अचूक हेरून त्याने हे घरटे बनवले होते. हे लक्षात येताच आम्हीही कुटुंबीयांना पुढील किमान महिनाभर हॉलची खिडकी अजिबात न उघडण्याच्या, खिडकीला धक्का न लावण्याच्या आणि अंगणाची विशेष स्वच्छता न करण्याबाबत सांगितलं होतं. इकडे १९ जूनला पक्ष्याचे घरटे पूर्ण झालेले, मादीही घरट्यात बसलेली पण अंडी अजून घातलेली नव्हती. नर आणि मादी घरट्यापासून अगदी जवळ वावरत होती. याचा अर्थ त्यांनी हे घरटे पूर्णपणे स्वीकारलेले होते. नीलिमा पक्ष्याने परसदारी पहिल्यांदाच घरटे केल्याने आम्हीही आनंदून गेलो होतो. नीलिमा मादीने घरट्यात २३ जून रोजी पहिलं अंड घातलं. प्रजनन हंगामात नीलिमा मादी एकावेळी ३ ते ५ अंडी देते याची वाचनात आल्याने आमची पाहाणी सुरु होती. २३ जून रोजी पहिले अंडे घातल्यानंतर २४ जूनला दुसरे तर २६ जूनला घरट्यात एकूण ४ अंडी घातलेली दिसली. फिकट तपकिरी रंगाची आणि तुटक लालसर रेषा असलेली अंडी होती.
७ जुलैला आम्ही पाहिलं तेव्हा घरट्यात पिल्लांनी जन्म घेतला असल्याचे लक्षात आले. आता नर-मादी मिळून पिलांची देखभाल करण्यात गुंतलेले होते. सुरुवातीचे दोनेक दिवस बराच काळ पक्षी घरट्यावर बसून असलेले दिसले. १५ जुलैला पाहिलं तेव्हा लक्षात आलं, घरट्यातील पिल्लं बऱ्यापैकी मोठी झालेली होती. आता ती घरट्याच्या कडेवर येऊन उभी राहात होती. ती कोणत्याही क्षणी जणू झेप घेण्याच्या तयारीत जाणवली. म्हणून वेळ मिळताच १६ जुलैला सायंकाळी काही छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला.
१७ जुलैला आषाढी एकादशीच्या सायंकाळी घरट्याजवळ आवाज झाला म्हणून पाहिलं तेव्हा घरट्यातील एक पिल्लू खिडकीच्या लोखंडी आडव्या गजावर बसलेलं! ‘दिसलं’ म्हणायचाही अवकाश, पिल्लू पुढच्या काही क्षणात अंगणात किंचित दूरवर असलेल्या आंब्याच्या डहाळीकडे डोळ्यादेखत झेपावलं. नीलिमा पक्ष्याच्या लेकरांच्या खान-पान व्यवस्थेत खारीचा वाटा उचलता यावा म्हणून आम्ही परसदारी अंगण स्वच्छता अभियान दोन आठवडे पुढे ढकललेलं! आषाढीच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१८ जुलै) सकाळी चिरंजीव शाळा-शिकवणीसाठी घराबाहेर पडला तेव्हा एक पिल्लू जणू त्यालाच भेटायला गेटवर येऊन बसलेलं. त्यानं मला सांगेपर्यंत ते पुन्हा उडालं. पिल्लाचे आई-बाबा (नरमादी) आसपासच होते. चार लेकरांचा हिशोब जुळवा म्हणून आम्ही तिकडे घरट्याकडे पाहिलं तर त्यात अजूनही एक पिल्लू शांतपणे झोपलेलं दिसलं. मनात किंचितशी काळजीही दाटून आली. पण काही वेळाने त्यानेही घरट्यातून आकाशी झेप घेतली आणि बघता-बघता अवघ्या तीनेक आठवड्यांचा हा रम्य प्रवास संपला.
नीलिमा पक्ष्याची सारी लेकरं श्रीविठ्ठल कृपेने निसर्गदेवतेच्या छायेत बागडू लागल्याची खात्री झाल्यावर आम्हीही स्वतःला अंगण स्वच्छता अभियानात गुंतवून घेतलं. राज्यात पंढरीची वारी (२९ जून ते १७ जुलै २०२४) सुरु असताना आमच्या परसदारी जैवविविधतेतील हे चैतन्य फुललं होतं. नीलिमा पक्षी आपली चार लेकरं वाढवत होती. ऐन आषाढी वारीच्या दिवसातलं हे परसदारचं बाळंतपण विशेष काहीही कारण नसताना आम्हाला, ‘पक्षी अंगणी उतरती | ते का गुंतोनी राहती ||’ एकनाथ महाराजांच्या या अभंगाची आठवण करून देऊन गेलं.
धीरज वाटेकर चिपळूण
1 टिप्पणी:
अप्रतिम, सुंदर लेखन व निरीक्षण, निसर्गाला व प्राण्यांना हनी न पोचविता आपल्या कुटुंबीयांनी घेतलेली काळजी अप्रतिम आहे. सलाम तुमच्या लिखाणाला व कोंकण भूमी प्रति असलेल्या प्रेमाला. आणि आपल्या प्रसन्न प्रवासाला.
टिप्पणी पोस्ट करा