मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

अगम्य-अतर्क्य कोकण


कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव आहे. कोकणी निसर्गाबाबत आलेल्या सकारात्मक-नकारात्मक अनुभवांची शिदोरी गाठीशी बाळगलेली कोणीहि व्यक्ती व्यक्त होते तेव्हा ते ऐकत राहावं! समाजरचनेतील प्रबोधनाचे मुद्दे टप्प्याटप्यावर बदलतात. मागील दोनेक हजार वर्षांचा इतिहास अभ्यासला तर हे जाणवतं. पण प्रबोधनाची मुलभूत गरज कधीही संपत नाही. कालौघात जे चांगले असते तेच टिकते. समाजाची सामुहिक मानसिकता हा ‘मला पटत नाही’ म्हणून सोडून देण्याचा नव्हे तर अभ्यासाचा विषय आहे. भारतीय समाजमनाला गैर गोष्टी फार काळ आवडत नाहीत. सामाजिक मानसिकतेच्या या पार्श्वभूमीवर ‘भूत’ हा विषय इतकी शतके कसा काय टिकला? याच्या मुळाशी आपण जसजसे जायचा प्रयत्न करू तसतशी आपल्याला निसर्गातील या अद्भुत, अगम्य-अतर्क्य, अमानवीय सकारात्मक आणि नकारात्मक उर्जाकेंद्रांची अनुभूती येत जाईल.

‘कांतारा’ मधून प्रेरणा घेऊन कोकणसह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या ब्रह्मराक्षसाचे कथानक घेऊन  ‘मुंज्या’ चित्रपट तयार झाला. कोकण किनाऱ्याच्या आतील भागातील लोकप्रिय लोककथा आणि कोकणातील शूटिंग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. खरंतर सत्तरच्या दशकापर्यंत सिनेमागृहातील रुपेरी पडद्यावर भूताची चाहूल लागली की पडद्यावरून नजर हटवून इतरत्र पाहाणारा, घाम फुटणारा किंवा खाली मान घालून बसणारा आपला प्रेक्षक होता. काहीअंशी असेलही. पण आजच्या डिजिटल काळातील पिढी ‘भूत’ विषय एन्जॉय करते आहे. भूतपट हे भयपटांपेक्षा अधिक मनोरंजन करत आहेत. कृष्णधवल ते रंगीत तंत्रज्ञानाचाही हा परिणाम असावा. मुंज्याने पहिल्या आठवड्यात ३३ कोटींचा व्यवसाय केला. कोणत्याही मोठ्या अभिनेत्याशिवाय कमी बजेट असलेले या धाटणीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळवतायत. अशा चित्रपटांच्या मुळाशी असलेल्या ‘भूत’ विषयाला ‘खोटं’ ठरविण्यापूर्वी ही उर्जा ‘नक्की कोणती असावी? आणि असं का घडत असावं?’ याचा शोध घ्यायला हवा. भूतकथा जगभर भेटतात. समाजमनावर त्यांचा पगडा इतकी वर्षे कसा टिकून राहतो? हे आपण ते समजून घ्यायला हवं आहे. दुसरीकडे सह्राद्रीचा कडा, अरबीसमुद्र, दक्षिण-उत्तरेस असलेल्या डोंगरदऱ्यांच्या वाटा आणि नद्या-खाड्यांच्या दलदलीने व्यापलेल्या याच कोकणात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारले. कोकणातील दळणवळणाचे जवळपास मार्ग हे खाड्यांच्या भरती ओहोटीच्या गणितांवर अवलंबून असणारे. सह्याद्री सानिद्ध्यामुळे इथली भूमी बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलांनी युक्त असल्याने इथले लोकं शरीराने काटक होतं. महाराजांनी सह्याद्रीसह कोकण किनारपट्टीच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेचा उपयोग करून घेतला. राजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी पश्चिम किनारपट्टीवर उभारलेलं आरमारी सामर्थ्य अभ्यासताना भूताखेतांच्या लोककथा अंगा-खांद्यावर खेळवणाऱ्या याच कोकणच्या भौगोलिकतेचा केलेला नियोजनबद्ध उपयोग जाणवतो. हेही लक्षात घेतले पाहिजे.

भुताखेतांचा त्रास होऊ नये म्हणून कोकणात इष्ट व आराध्य देवतांची नियमित व्रते आणि कुलाचार पाळून आपली योग्यता वाढवावी असे सांगितले जाते. ‘भूत’ या विषयावर व्यक्त होत असताना कोकणच्या निसर्गातील गुढता आणि पिढ्यांपिढ्या चालत आलेली इथली मानवी समाजव्यवस्था समजून घ्यायला हवी असे वाटते. कोकणात गावोगावी ग्रामदेवतेची उपासना चालते. ग्रामदेवता ही गावाचे रक्षण करणारी, संकटकाळी शक्ती देणारी देवता आहे. गाव उत्सवाच्या दिवशी तिला बलिदान देण्याची प्रथा आहे. ग्रामदेवतांना ठरलेली परंपरागत देणी न दिल्यास त्या रागावतात असेही मानले जाई. कॉलरा, देवी, प्लेग हे रोग परंपरागत देणी न दिल्याचा परिणाम म्हणून आणले जातात असेही मानले जाई. अगदी असाध्य अशा रोगावर कोणताच इलाज न चालल्यास तो दुष्ट शक्तीचा परिमाण आहे किंवा भुतांनी केलेला आहे असे मानले जात असे. याचा उपाय करण्यासाठी भगत, तांत्रिक-मांत्रिक असत. या अनुषंगाने थोडं कोकणच्या  इतिहासात डोकावलं असता ‘भूत’ विषयाचा दरारा अस्तित्वात असल्याचे संदर्भ भेटतात. विजापूरच्या युसुफ आदिलशहाने कोकणात १५०२मध्ये सावित्री नदी ते देवगड पर्यंतच्या रत्नागिरीतील भागात खोतीची पद्धत सुरु केली होती. जमिनीच्या महसुलात सुलभता आणण्यासाठी ही व्यवस्था होती. प्रत्यक्षात मात्र या व्यवस्थेने अनेक नवे प्रश्न कोकणात निर्माण झालेले दिसतात. महादेवशास्त्री नावाचे प्रसिद्ध मांत्रिक जादूटोण्याच्या विद्येत प्रवीण असल्याचे समजल्यावर नाना फडणीस यांनी, तंत्रविद्येने ब्रिटीशांचा नाश करण्याकरिता किती काळ लागेल याची विचारणा करण्यासाठी आपला दूत पाठविला होता. कोकणात सामान्य लोकांचे दारिद्र्य, जमिनीच्या लहानशा तुकड्यावरून व इतर कारणांवरून होणारी भाऊबंदकी-भांडणे नित्याचीच बाब होती. ज्याच्याशी वाकडे असेल त्याच्यावर भूते घालणे हा सर्वसामान्य रिवाज होता. भूते घालण्याचे प्रकार वाढल्याने पेशवाईत, भूतांच्या चौकशीचे, बंदोबस्त करण्याचे आदेश दिल्याचे किस्से आहेत. कोकणात बलुतेदारी होती. १७६५च्या एका यादीत बलुतेदारांची संख्या अकरा, १७९९च्या यादीत बारा, १८१८च्या यादीत तेरा भेटते. सर्वांना जातीविषयक रीतीभातींचे रूढीने, नियमाने पालन कोकणात बंधनकारक होते. जगभरातील मानवी समाजात ‘गुलामगिरी’ हे लक्षण आढळते. कोकणही याला अपवाद नाही. ब्रिटीशकालीन कागदपत्रात याच्या नोंदी भेटतात. पेशवाईत भूतांच्या दहशतीने अनेक कुटुंबे नव्हे तर तळकोकणातील गावेच्या गावे स्थलांतरित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १७७४-७५ साली कोकणातील अंजनवेल, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड आणि सौंदळ तालुक्यात पेशवे सरकारने याकामी दोन अधिकारी नेमले होते. त्यांच्या मदतीला दोन कारकून आणि सहा शिपाई होते. या अधिकाऱ्यांना वर्षाला ३५० रुपये पगार आणि २६१ रुपये भत्ता ठरला होता. अधिकाऱ्यांनी गुन्हेगाराची शक्ती पाहून रुपये २५ ते ५० दंड करावयाचा अधिकार असे. भुते घालणाऱ्यांची आणि ती निवारण करणाऱ्यांची यादी वैद्यांच्या यादीप्रमाणे गावोगावच्या पोलीस पाटलांना माहिती असणे आवश्यक असायचे. ही यादी दर महिन्याला अद्ययावत व्हायची. असा दंडक असायचा. हे सारे १९व्या शतकापर्यंत सुरू असावे. पुढे ब्रिटिश राजवटीत बंद करण्यात आले.

भारताचा पश्चिमेकडील भाग हा सह्याद्री आणि समुद्र-खाड्यांच्या चिंचोळ्या पट्टीत विराजमान आहे. या प्रदेशाने स्वतःची अशी काही भूवैशिष्ट्ये सांभाळली आहेत. कोकणातील उंचचउंच सह्याद्रीच्या कडेकपारीत घोंगावणारा वारा, समुद्रावर उठणाऱ्या लाटा, सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचणार नाही अशी निबिड अरण्ये, दूरवर असणारी मनुष्यवस्ती, जुनाट व अजस्त्र वृक्षांचे अस्तित्व, पडकी घरे-वाडे-विहिरी, रात्रीच्या अंधाराला छेद देणारी अपुरी वीजव्यवस्था यामुळे भूतांचे (नकारात्मक उर्जा) प्राबल्य वाढले असावे. भूत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कोकणात पिशाच्च या नावानेही ते रूढ झाल्याचे दिसते. कोकणात चांगल्या-वाईट भूतकथा नाहीत असे गाव सापडणार नाही. इथल्या देवभोळ्या लोकांचा देवाइतकाच भूतांवरही विश्वास असावा. कोकणात भूतबाधा उतरवणाऱ्यांची, उपाय सांगणाऱ्यांची संख्याही विलक्षण असावी. मध्यरात्र उलटून गेलेल्या कोकणात रात्री काळाकुट्ट अंधारातील कोणत्याही घाटातील नागमोड्या वळणांच्या मोकळ्या रस्त्यावरून संततधार पावसात, वाऱ्याच्या झूळूकेत रातकिड्यांची किरकिर ऐकत प्रवास करताना गाडी अचानक बंद पडली तर? अर्थात दैव बलवत्तर असल्यास काहीतरी विचित्र अनुभूती येऊन गाडी आपोआप पुन्हा चालू होते आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो. अगदी आमच्याही लहानपणी सुट्टीत आजोळी किंवा गावी गेलो आम्ही भावंडं रात्री अंगणात बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असू. हा उद्योग कोकणात सर्वत्र चालायचा. भूताखेतांचे किस्से रंगायचे. लोकांच्या मांडणीत असे दाखले असायचे की त्यांना खोटं ठरवणं अडचणीचं ठरावं. गीतकार दिलीप शिंदे यांचं आनंद शिंदे यांनी गायिलेलं, ‘सांगवी गावात, बामन ढवात, बयाला धरलंय भूतानी! बयाला धरलंय भूतानी, तिला नदीत पाडलंय उतानी’ हे गीतही आपल्याला कोकणातील भूत’लोक’कथा सांगतं. कोकणनजीक गोव्यात डिचोली तालुक्यातील साळ गावात होळी पौर्णिमेच्या तीन दिवसात 'गड्यांची जत्रा' म्हणून स्थानिक दैवत श्रीमहादेव यांची जत्रा भरते. या गड्यांच्या जत्रेला गेलेल्या माणसाला रात्री १२ नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत घरी परतता येत नाही असा नियम आहे. डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील श्रीलईराई देवीची जत्रा ही एप्रिल-मे महिन्यात होते. गोव्यातील या दोन गूढ आणि रहस्यमय जत्रा आहेत. कोकणात भगवान श्रीशंकर आणि देवी श्रीभवानीची (पार्वतीची) मंदिरे अधिक आहेत. भगवान श्रीशंकर यांच्या अधीन वेताळ, चाळा, राक्षस, भूतपिशाच्च असतात अशी श्रद्धा कोकणात आहे. या अज्ञात शक्तीला वर्षातून एकदा परंपरेनुसार मान दिला जातो. डॉ. भालचंद्र आकलेकर यांनी ‘कोकणचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात भुतांचे १६ प्रकार सांगितले आहेत. त्यात वेताळ हा पहिला असून त्याला भूतांचा राजा म्हटले जाते. मात्र भुतांच्या याच राजाची कोकणात पूजा केली जाते. आरवली, पेंडूर, वराड, कुणकेरी, ओटवणे, परुळे, पोईप, नाणोस या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात त्याची मंदिरे व मूर्ती आढळतात. कोकणातील गावात याला रक्षणकर्ता म्हणून मान्यता मिळालेली आहे. कोकणातील भुते अभ्यासताना हे समजून घ्यायला हवे आहे. भूत रात्रीचं का दिसतं? लोकमान्यता अशी की दिवसभर देवांचा वास पृथ्वीवर असतो. देवांच्या शक्ती सूर्याच्या उजेडासोबत सर्वत्र पोहोचतात. त्यामुळे अमंगळ शक्तींना बाहेर पडता येत नाही. दैवी शक्तींचा संकोच होऊन भूतं रात्री बाहेर पडतात. दुसरं कारणं असं असावं की, दिवसभरात सजीवांच्या हालचालींमुळे वातावरणात उष्णता वाढते. ही ऊर्जा दिवसा शक्तीमान असते. तिच्या प्रभावात निगेटिव्ह एनर्जी दबून जाते. रात्री जमिनीचा खालचा स्तर थंड होऊ लागतो. वीजेचा वापर कमी होतो. मोबाईलचे संदेश कमी होतात. उर्जेचा वापर मंदावतो. अशा शांततेत नकारात्मक उर्जा आपले अस्तित्व प्रकट करते. या उर्जेशी आपण परिचित नसल्याने भास होत राहातात. पण मग एखाद्या विशिष्ठ जागी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या वर्षी, एकमेकांना न ओळखणार्‍या लोकांना एकाच प्रकारचा भास का होतो? असेही प्रश्न पडतात.

कोकण हे गूढ गोष्टींचे भांडार आहे. येथील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा पगडा आहे हे नक्की. भूतांच्या अस्तित्वाची खात्री पिढय़ान्-पिढय़ा इथल्या मनुष्याने बाळगली आहे. भूतांचा उद्भव, संचार, इच्छेनुरूप रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे, प्रसंगी भले करण्याचे सामर्थ्य, त्यांचा स्वभाव, त्यांची निवासस्थाने, शक्तीच्या मर्यादा, त्यांना प्रसन्न करून घेण्याचे वा हुकमतीत ठेवण्याचे उपाय, त्यांना प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रण शक्ती आणि या अनुषंगाने येणारे समज, रूढी आणि परंपरा यांचे फार मोठे विश्व आहे. कदाचित कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या तुलनेत आजही विशेष झालेला नाही. त्यामुळे कोकणात आजही नकारात्मक शक्तींचे अस्तित्व असावे. कोकणात आजही घनदाट झाडी, अरण्य आहे. डोंगरकडे, घाट, एकाकी सडे, दूर असलेली घरे-वाड्या-वस्त्या गूढरम्य असतात. रात्रीच्या निरव शांततेत पान हलतात, वारा सुसाट येतो, नारळ-सुपारी डोलतात, ओहोळ, छोटे झरे खळखळ करत वाहत असतात. वाळलेल्या पानांच्या पातेऱ्यावर पाऊले टाकली की आवाज येतो. भोवताली अफाट गर्द झाडी, आसमंतात पक्षांचा किलबिलाट, घरी परतणाऱ्या गुरांच्या गळ्यातील घंटा ऐकू येणाऱ्या एखाद्या तळ्याची ठिकाणी जिथे माणूस प्राणीहि दिसत नाही अशा ठिकाणी ते सवाष्ण बाईने सांजवेळी जायचे नसते. हे कोकणवासीयांच्या मनात पक्के आहे. भूत-पिशाच्च एक ऐतिहासिक वास्तव आहे. त्यावर संशोधन व्हायला पाहिजे. भूते ही त्रास देणारी व त्रास न देणारी या प्रकारात मोडतात. कोकणातील लोकसंस्कृतीवर भूत विषयाचा रंजक पगडा आहे. भुतांच्या अस्तित्वाविषयीची खात्री पिढय़ान् पिढय़ा कोकणी माणसाने बाळगली आहे. कोकणातील लोकांचा देवावर जेवढा विश्वास आहे तेवढाच भूतबाधेवरही आहे. याचमुळे गावागावात डॉक्टरप्रमाणे या विषयातले तज्ज्ञही असतात. अपवाद वगळता कोकणातील भुते त्रास देणारी नसावीत. कारण भूतांचे अस्तित्व नाकारण्यासाठी स्मशानभूमीत रात्र काढणारे अवलिया कोकणात भेटतील. कोकणाची भूमी अलौकिक उर्जेने संपन्न आहे. इथे अनेक सकारात्मक नकारात्मक घटनांचे किस्से ऐकायला येतात. भूत हा त्यापैकी एक प्रकार असावा. कोकणात आपण जेव्हा नैसर्गिक उर्जेने भरलेल्या ठिकाणी असतो तेव्हा आपल्याला अलौकिक अनुभव येतो. उर्जा जुळून येत नसेल तर कसलाही अनुभव येत नाहीत. आपण त्यावर विश्वासही ठेवू शकत नाही. कोकणात अलौकिक वातावरणामुळे लोकांना चांगले वाईट अनुभव येतात. या शक्ती ठराविक ठिकाणी वास्तव्य करून असतात. मनुष्यप्राण्याचा वावर नाही, स्वच्छता नाही. चिखल, पाणी, गच्चझाडी, डेरेदार वृक्ष, भव्य सरोवर, बंद पडलेली सदनिका, जुने मंदिर, पडलेला वाडा, पडलेली बुजलेली विहिर, जुनाट आड अशा ठिकाणी नकारात्मक शक्तींचे वास्तव्य असते. नकारात्मक शक्तींची स्वतःची एक वारंवारिता (फ्रिक्वेंसी) असावी. काही कारणाने आपण त्यात आलो तरच त्यांच्या अस्तित्वाचा अंदाज येतो.

आजही कोकणातील अनेक देवळात पाषाण न्याय निवाडा पद्धतीद्वारे जनतेला सुखी ठेवण्याचे काम सुरू आहे. कोकणातील गावरहाटीची संकल्पना समजून घेतली की नकारात्मक उर्जा समजणे सोपे होईल. मागील किमान २० वर्षे आम्ही कोकणात व्यावसायिक कारणे बारमाही दिवसा-रात्री ऊन-वारा-पावसात पनवेल ते पणजी अशी भ्रमंती करतो आहोत. निसर्गातील अद्भुत, अगम्य-अतर्क्य, अमानवीय अनुभूती आम्हीही घेतल्या आहेत. अर्थात सह्याद्रीत आणि कोकणात आम्हाला आलेल्या साऱ्या अनुभूती या सकारात्मक राहिल्यात. नकारात्मक अनुभूती नाही असं नाही पण त्या आमच्यासोबत असलेल्यांना अधिक जाणवलेल्या आहेत. समर्थ रामदास जवळपास चार दशकांच्या साधनेनंतर आपल्या घरी वृध्द आईला भेटायला आले. तेव्हा आईचे डोळे गेले होते. हे लक्षात येताच समर्थांनी तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. आईला दृष्टी आली. उघड्या डोळ्याने आईने समर्थांना विचारले, ‘इतके वर्ष बाहेर राहून कोणते भूत वगैरे वश केलेस का? ही भूतचेष्टा कुठून शिकून आलास?’ यावर समर्थांनी आईला अत्यंत गोड शब्दात मोजक्या पदात प्रभू श्रीरामांचे चरित्र ऐकवत सुंदर उत्तर दिले. त्या पदाच्या शेवटी समर्थ म्हणतात, ‘सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥‘ बाकी ज्याची त्याची मर्जी!

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

(पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांची पर्यटन आणि चरित्रलेखन विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली पंचवीस वर्षेहून अधिक काळ ते ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)

आंबोली जंगलातील दिवाळी



        जंगलांची आणि त्यातही सह्याद्रीतील भटकंती म्हणजे आपल्या नियमित धकाधकीच्या जीवनशैलीला काहीवेळ पूर्णविराम देऊन निसर्गाच्या कुशीत अलगद विसावण्याची आणि निसर्गदेवतेची विविध ऋतूतील मुक्त उधळण अनुभवण्याची  संधी. चिपळूण सारख्या शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या भूमीतील वास्तव्यातही आम्हाला नियमित निसर्ग भेटतो. पण जंगल अनुभवण्यासाठी थोडी वाट वाकडी करावीच लागते. जंगल भटकंतीतील काही अनुभव संस्मरणीय असतात. ‘आठवणीतील दिवाळी’चा विचार करताना आम्हाला २०१३मधील नरक चतुर्दशीच्या पहाटेचा अनुभव आठवला. त्या दिवशी आम्ही कोकणातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीतील चौकुळ गावी होतो. खरंतर ‘आठवणीतील दिवाळी’ म्हटल्यावर आम्हालाही पहिल्यांदा बालपणातील ‘कोयना प्रकल्प (अलोरे) कॉलनीतील दिवाळी’ आठवलेली. पण थोडा अधिक बारकाईने विचार केल्यावर ‘आंबोली जंगलातील दिवाळी’ लिहावीशी वाटली.

आंबोली हे कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. आंबोली घाटाचा परिसर घनदाट अरण्याने वेढलेला आहे. सह्याद्रीचे कडे ढगांना जणू आग्रहाने थांबवत असावेत असा विक्रमी पाऊस इथे कोसळतो. निसर्गप्रेमींसह साहसी व अभ्यासू पर्यटकांना आंबोली कधीही निराश करत नाही. २०१३च्या दिवाळीच्या दिवशी आम्हालाही तिने निराश केले नाही. ‘आंबोली जंगलातील दिवाळी’ आम्ही, कोकणात ‘शिरवली’ येथे खाजगी पक्षी अभयारण्य साकारणारे ‘वन्यजीव अभ्यासक’ निशिकांत उर्फ नंदू तांबे आणि पुण्यातील ‘वन्यजीव अभ्यासक’ अभय काळे यांच्यासोबत अनुभवली केली होती. ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१३ या दिवसातील जंगल भ्रमंतीत आम्ही, ज्याच्या मार्गावरून प्रवास करणे इतर प्राणी टाळतात अशा दुर्मिळ असलेल्या 'कोळशिंदा' (रानकुत्रा) टोळीने चौकुळ गावातील (आंबोली) जंगल भागात केलेल्या सांबर मादीच्या पिल्लाच्या 'किलिंग अॅक्टीव्हीटी'चा (शिकार) थरार अनुभवला होता. या पाच दिवसांच्या कालावधीत आम्हाला ग्रीन वाईन स्नेक (हरणटोळ) या मध्यम विषारी जातीच्या आणि झाडावर आढळ असलेल्या सापासह आंबोली जंगलात भरपूर आढळ असलेला मलबार पिट वायपर, दख्खनची छोटी पट्टेरी पाल (डेक्कन बॅण्डेड गेको), शेकरू, विविध रंगाची फुलपाखरे, पतंग, कोळी, पांढऱ्या मानेचा करकोचा (वूली नेक्ड स्टॉर्क), बाळढोक, ग्रीन बी इटर, स्टॉर्क बिल्ड किंगफिशर, ब्राह्मणी काईट, इंडियन रॉबिन, ओरिएंटल मॅगपाय रॉबिन, टिकेल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, ब्लॅक नेप मोनार्च, एशियन फेरी ब्ल्यू बर्ड, सनबर्ड, विविधरंगी चतुर, ग्रे हेरॉन, बदक, गायवगळे, क्रीमसन बॅक सनबर्ड, मलवार ट्रॉगन, ब्ल्यू मॉर्मन फुलपाखरू आदीचे दर्शन झाले होते. याशिवाय नांगरतास धबधब्यावरील पठार परिसरात जिथे हत्ती आढळून आलेले तिथे धामण जातीचा साप पाहिलेला. फुलपाखरांच्या फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम वाटलेले. भारतीय सापसुळी (skink), काळा विंचू, विविध प्रकारची झाडावरील शेवाळे, गवा आणि बिबट्या यांचे आंबोली जंगलातील वास्तव्याचे पुरावे, जमिनीवरील, झाडावरील आणि गुहेतील बेडूक, गार्डन लिझार्ड, केसाळ कोळी (टॅरांट्यूला) यांचे जवळून दर्शन झालेले. याच भ्रमंतीत आम्हाला आंबोली परिसरातील जंगलात, महाराष्ट्रात फारसा आढळ नसलेला चेस्टनट हेडेड बी-इटर हा पक्षीही दिसला होता.

तर, २ नोव्हेंबरच्या सकाळी चौकुळ गावातून वाहणाऱ्या नदीच्या तीरावरील टेंटमध्ये आम्ही विश्रांती घेत होतो. पहाटे साडेपाचच्या सुमारास जंगलाच्या दिशेने आम्हाला तिघांना भारतातील सर्वात मोठे हरिण असलेल्या सांबराची किंकाळी (कॉल) ऐकू आली. पहाटेच्या शांततेत आजूबाजूला कोणतेच आवाज नसल्याने ही किंकाळी नदीच्या दरीत चांगलीच घुमली. टेंटमधून बाहेर येईपर्यंत ‘कुई कुई’ आवाजाने आमचे लक्ष आणखी विचलित केलं. कोळशिंद्याने काहीतरी सावज पकडल्याची जाणीव झाली. जंगलातील वास्तव्यात नेहमीच तयारीत असावे लागते. दोघा अभ्यासकांच्या मागून आम्हीही आवाजाच्या दिशेने धावलो. ज्या वाटेने आम्ही धावू लागलेलो ती वाट उभी चढणीची किंचित दमछाक करणारी आणि दोन्ही बाजूने दाट झाडी झुडुपानी वेढलेली होती. सह्याद्रीत पावसानंतर रानमोडी, गवत आणि इतर झुडुपे इतकी दाट वाढतात की अगदी पुढ्यात कोणी येऊन उभा राहिला तरी चटकन दिसणार नाही. आज नेमकं असंच झालं. ज्या दिशेने कानात आवाज येत होते त्या दिशेने पाऊलं टाकताना एका अनपेक्षित क्षणी आमच्या समोरून स्वतःचा जीव मुठीत धरून वेगाने पळताना सांबराची मादी आम्ही पाहिली. जंगलात काहीतरी घडल्याची जाणीव झाली. खरंतर तिच्याच मागे काही कोळशिंदे लागले होते. पण कोळशिंद्यांच्या हाताला सांबराचे पिल्लू सापडले होते. आम्ही उभे होतो तेथून थोड्या अंतरावर आम्हाला गव्यांची झुंज सुरु असलेली दिसत होती. आदल्या रात्री पूर्णतः निपचित पडलेलं हे जंगल एव्हाना पूर्णतः अॅक्टीव्ह जाणवत होतं.

ज्या झुडुपातून सांबराच्या पिल्लाचे आवाज येत होते तिथपासून आम्ही तिघेही ५० फुट अंतरावरील फायकस वड वर्गीय झाडाच्या आडोश्याला उभे होतो. त्या पिल्लाला जीवंत मारत असल्याचे जवळच्या झुडुपातून येणारे आवाज जंगलातील सकाळच्या शांततेत केवळ भयानक वाटत होते. झुडुपातून येणारे ते आवाज ऐकताना अतिउत्कंठेने आमचं हृदय धडधडायला लागलं होतं. काळ जणू थांबलेला आहे असाच भास होत होता. गलितगात्र होत आलेल्या त्या पिल्लाला पाणी तरी द्यावे किंवा मोठंमोठे आवाज करून कोळशिंद्यांना हाकलावे असे विचार मनात माझ्या मनात येत होते. पण सोबतचे दोन्ही वन्यजीव अभ्यासक आम्हाला ‘जीवो जीवस्य जीवनम्’ची आठवण करून देणारे होते. जिवंतपणी शरीराचे लचके तोडले जात असल्यामुळे वेदनेने सांबर पिल्लू अगदी विचित्र आवाजात ओरडत होते. कोळशिंद्यांना त्याच्याशी काही देणं-घेणं नव्हतं. ते आपल्या जबड्याच्या जोराच्या हिसक्याने सांबरीच्या पिल्लाचं पोट फाडत असणार हे नक्की होतं. ‘कोळशिंदा भक्ष्याला न ठार मारताच खायला सुरुवात करतात’ हे मी आज पहिल्यांदा कानाने पाहात होतो. पाहाताना फार भयंकर वाटत होतं. एव्हाना आमचे सर्वांचे झुडुपातून येणारे आवाज ऐकून आणि बाहेर येणारे कोळशिंदे पाहून एकूण कितीजण असावेत? याचा अंदाज बांधणे सुरु झाले. कदाचित कोळशिंद्यांना आमचे अस्तित्व जाणवलेही असेल. मग सुरू झाला जंगलातील आमचा वाट बघण्याचा काळ. कारण त्या एकाच ठिकाणी पुढे आम्ही दोनेक तास थांबलो. खाणं खाऊन पोट भरलेले कळपातील काही कोळशिंदे तोंडावरून जीभ फिरवत झुडूपाबाहेर येऊन आम्हाला दर्शन देत होते. कोळसुंद्यांच्या टोळीचा प्रमुख अल्फा मेल आणि फिमेल दर्शनांति बऱ्यापैकी प्रौढ जाणवत होते. जीवनात अशा वेळा नक्की अनुभवाव्यात. कारण या वेळा ह्या मानसिक आंदोलनाच्या असतात. त्याच आपल्याला जीवनात ‘समर्थ’ बनवतात. या दोनेक तासात आम्ही कोळशिंद्याच्या विविध हालचाली टिपलेल्या. त्याच्या १२ ते १५ जणांच्या टोळीतील किमान नऊ जणांनी आम्हाला जणू आळी-पाळीने झुडूपाबाहेर येऊन आम्हाला दर्शन दिले. या दोनेक तासात कोळशिंद्यांविषयी वाचलेल्या, ऐकलेल्या कथा डोळ्यासमोर आल्या. यांच्या शिकार करण्याच्या पद्धती, प्रसंगी वाघाला सुद्धा न घाबरण्याची निडरवृत्ती आणि त्यांचे कळपातील सामर्थ्य सारे काही आम्ही डोळ्यासमोर पाहात होतो. आज डोळ्यादेखत सांबर पळाले पण तिचे पिल्लू मात्र सुदैवी ठरले नाही.

झुडूपातील अॅक्टिविटी पूर्णपणे थांबल्याचा निश्चित अंदाज घेऊन हतबल चेहऱ्याने आम्ही दुपारी त्याच झुडू‌पात आणि शेजारच्या कारवीच्या जंगलात शिरलो. सांबराच्या पिल्लाला खाल्लेल्या खुणा दिसत होत्या. पिल्लाची आतडी बाहेर ओढून काढलेली असावीत. पोटाकडून फाडून आतलं मांस खाल्लेलं असावं. मांसल भागाचे अगदी छोटे तुकडे तिथे पडलेले होते. आम्ही कोळशिंद्यांनी किल केलेल्या सावजाचे (सांबराचे पिल्लू) मांस व हाडांचे फोटो टिपले. दिवाळीच्या दिवशी असे फोटो टिपणे थोडे विचित्र वाटत होते, पण ‘जंगलातील दिवाळी अशीच असायची’ असे स्वतःला समजावले. ज्या पध्दतीने झुडुपात मांस व हाडे आढळली त्या मार्गावरून शेवटपर्यंत जाणे मात्र आम्ही तिघांनी टाळले. बहुतेक वेळा जंगल हे दिसण्यापेक्षा ऐकूच जास्त येतं असतं. भेकरांचं भुंकणं, बिबट्याची साद, वानरांचं खेकसणं, प्राण्यांची चाहूल लागताच केकाट्यांची ओरड, चान्यांची टिवटिव, शेकरूची साद असे प्रसंग अनुभवयाला मिळतात. असे अनुभव रोमांचित करणारे, आपली जंगल भ्रमंतीची आस वाढवणारे सुखांत आणि मन प्रफुल्लित करणारे असतात. परंतु काही प्रसंग अगदी थरारक, भितीदायक आणि खऱ्या अर्थाने जंगलाचे दुसरे रूप आपल्यासमोर आणणारे असतात. ‘आंबोली जंगलातील दिवाळी’ असाच अनुभव होता.

पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना आपल्या लेखनात अधिकाधिक बारकावे उतरावेत म्हणून सह्याद्रीत, किल्ल्यांवर फिरत असताना जंगलाकडे आम्ही केव्हा ओढले गेलो कळलंच नाही. धुळीत उमटलेली प्राण्यांची पावले, बिबट्याच्या विष्ठा, रानडुक्करांनी खाण्यासाठी उपटलेली मुळे, रानडुक्करांच्या जंगलातील लोळणी, सांबरांनी शिंगाने खरवडलेल्या साली अशा कितीतरी गोष्टी जंगलाने आम्हाला दाखवल्या. त्यातल्या काही संस्मरणीय ठरल्यात. आपल्या सह्याद्रीतील जंगलं ही इथल्या पावसासारखी लहरी जाणवतात. सह्याद्रीच्या शिखरावरील घनदाट सदाहरित पासून पायथ्याच्या पानझडी पर्यंतची या जंगलात सामावलेली दिसते. अर्थात पूर्वी कधीतरी ही सारीच भूमी घनदाट असावी. या सह्याद्रीतील जंगलात कोणत्याही मोसमात मिळणाऱ्या अनुभवांची मेजवानी काही वेगळीच असते. पायी चालत वन्यजीवांचा माग शोधणं हा फार उपयुक्त आणि आनंददायी प्रकार आहे. यामुळे आपल्याला अगदी जवळून ठसे, गंध, इतर खाणाखुणांचा माग घेता येतो. मात्र यासाठी खूप सावध राहावं लागतं. पावलं जपून टाकावी लागतात. अन्यथा आवाजाने जनावरं सावध होऊन पळ काढण्याची शक्यता असते. आतातर सह्याद्रीत जंगलाचा राजा असलेल्या वाघांपासून छोट्या किटकांपर्यंत सगळ्याच जीवांची रेलचेल नांदते आहे. त्यामुळे सह्याद्रीत गेल्यावर काय बघावं? असा प्रश्‍न अजिबात पडू नये. सस्तन प्राणी, पाखरं, सरपटणारे आणि उभयचर जीव, फुलपाखरं- पतंग या सारखे अनेक किटक आणि या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे वृक्ष-वनस्पतींचे अरण्य यांचे निरीक्षण हा नितांत सुंदर अनुभव असतो. आता सह्याद्रीत वाघापाठोपाठ शिकार करणाऱ्यांत सर्वात पुढे बिबट्या आणि कोळशिंदे आहेत. अर्थात बिबट्या एकट्याने भक्ष्य धरतो आणि कोळशिंदा (रानकुत्रा) टोळीने. शिकार करणाऱ्या कोळशिंद्यांचे निरीक्षण करायला मिळणे हे जंगल भटक्यांसाठी भारी अनुभूती देणारे असते. वाघ आणि कोळशिंदे हे तसे हाडवैरीच असावेत. समान भक्ष्यामुळे वाघांनाही कोळशिंदा आपल्या हद्दीत नको असतात. आतातर सह्याद्रीत दोघेही स्थिरावलेत. त्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना यातून मिळणाऱ्या अनुभूती अधिक वेगळेपणाच्या असू असतील.

आंबोलीतील निसर्गाने, कोळशिंदा  (ढोल / Wield Dog) प्राण्याच्या टोळीसमवेत ‘किल्लिंग अॅक्टिविटी’चा थरार ऐन दिवाळीच्या पहाटे आम्हाला दाखविला होता. २ नोव्हेंबरच्या सकाळी कोळशिंद्याच्या टोळीने सांबराच्या पिल्लावर केलेला हल्ला, पिल्लाला वाचवण्यासाठी धावलेली सांबराची मादी, नंतर स्व:तचा जीव वाचवण्यासाठी तिने ठोकलेली धूम, खुल्या जंगलात कोळशिंद्याची टोळी सावज जीवंत फाडत असताना जेमेतेम पन्नासेक फुट अंतरावरून आमच्या कानावर आदळलेले आलेले आवाज आठवले की निसर्गासमोर आपण हतबल आहोत हे जाणवतं. निसर्गाच्या कुशीत नित्य नूतन घडामोडी या घडतच असतात. त्यातल्या काही अनुभवांच्या रूपाने आपल्या पदरात पडतात. अशीच एक घडामोड ऐन दिवाळीच्या दिवशी पदरात टाकण्याची निसर्गाची किमया आम्हाला अचंबित करून गेली. आंबोली जंगलात पाच दिवस-रात्र जैवविवधतेच्या निरीक्षणाचा आलेला अनुभव अफलातून होता. आंबोलीतील निसर्ग हा स्वत:ची दु:ख, मानवी जगण्याच्या विवंचना विसरायला लावणारा. दिवाळीच्या दिवसातील डोंगराच्या कुशीत शुभ्र धुक्यात भिजलेली चिंब ती आंबोली आम्हाला पाच दिवस पावित्र्याची साद घालत दिवाळीची अनोखी भेट देऊन गेली.

 

धीरज वाटेकर

पत्ता : ‘विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : https://dheerajwatekar.blogspot.com

 (लेखक धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २८ वर्षे ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.) 

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

‘सह्याद्री’सखा

 


‘कोकणच्या सांस्कृतिक राजधानी चिपळूणात, जंगलात काम करणारे अभ्यासक, जिज्ञासू, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नाही.’ ही खंत आयुष्यभर बोलून दाखविणारे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कै. निलेश विलास बापट यांना आपल्यातून जावून (१४ सप्टेंबर २०२४) एक वर्ष झालं. रत्नागिरी वन विभागाने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत चिपळूणात केलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आज (३ ऑक्टोबर) सायंकाळी होत आहे. या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलची मूळ संकल्पना आणि मांडणी निलेश बापट यांची होती. बापट यांचे नाव या गॅलरीला देण्यात यावे अशी चिपळूणातील पर्यावरणप्रेमींची आग्रही मागणी आहे. बापट यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.

 


कोकणातल्या चिपळूण सारख्या छोट्याश्या शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेला डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारा एक सर्वसाधारण मेकॅनिक जेव्हा आपल्या असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर जणू एखादं वर्तमानपत्र वाचावं तसा अवघा निसर्ग वाचू लागतो. बघताबघता भारतभरातील जंगलांचा, संपूर्ण सह्याद्रीचा अभ्यासक बनतो तेव्हा त्याच्यातल्या वेगळेपणाची दखल घ्यावी लागते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासामागे खूप मोठा संघर्ष असतो. मानद वन्यजीव रक्षक-अभ्यासक, ज्ञानी मित्र, ‘सह्याद्रीसखा’ निलेश विलास बापट यांचे गतवर्षी वयाच्या ४७व्या वर्षी (१४ सप्टेंबर) ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. निलेश म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेला, कोणतंही काम करायला कसलाही कमीपणा न बाळगणारा निसर्गसखा. कोकणी मातीत घडलेलं आणि माणसाळलेलं हे व्यक्तिमत्त्व. निसर्गवेडापायी त्यानं देशभरच्या जंगलातील किती माणसं जोडली असतील त्याची गणती नाही. ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या उभारणीतील योगदान हा त्याच्या जीवनाचा सर्वोच्च कार्यटप्पा ठरला. निलेश मागील तीन दशकांहून अधिक काळ जैवविविधता, वन्यजीवन, निसर्ग आणि पर्यावरण आदी संवर्धन क्षेत्रात कार्यरत राहिला. त्याने भारतातील ताडोबा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, STR, नागझिरा, दांडेली, कान्हा आदी जंगलांमध्ये निसर्ग प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केल्या होत्या. किमान हजारभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नेचर एज्युकेशन, नेचर वॉक संस्थेमार्फत वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल आदींच्या माध्यमातून ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निसर्ग विषयक ध्वनीचित्रफीती, चित्रप्रदर्शनांच्या माध्यमातून तरुणाईच्या निसर्गविषयक जाणीवा समृद्ध करण्यात त्याने योगदान दिले होते. पुण्याच्या नेचरवॉक संस्थेमार्फत राज्यातील विविध गावात ‘पक्षी महोत्सव’ सादरीकरण केले होते. चिपळूणातील आरोही, ग्लोबल चिपळूण टुरिझम, ‘वणवा मुक्त कोकण’सह वृक्ष लागवड मोहिमेतही त्याचा सहभाग राहिला. त्याने विविध ठिकाणी तीन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड यशस्वी केली होती. वनविभागासोबत अनेक ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्स’ यशस्वी करणे, वाट चुकलेले असंख्य अजगर, बिबटे, मगरी यांना त्यांच्या अधिवासात नेऊन सोडणे, महापुराच्या संकटात अनेकांना मदत, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीचे कार्यक्रम, वन विभागाच्या वन्यजीव सप्ताहांतर्गत ऑनलाईन वेबिनार, क्षेत्रभ्रमंती, निसर्ग अभ्यास सहली, ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड, मानव-वन्यजीव संघर्ष, अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अशा कितीतरी विषयांवर निलेशने दिशादर्शक काम केले. कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा, त्याने आणि त्याच्यासारख्या निसर्गरक्षकांनी मागील तीन दशकाहून अधिक काळ सह्याद्रीत निसर्ग संवर्धन विषयात केलेल्या कामाचा गौरव ठरला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भागातील घनदाट जंगलात पाणवठे निर्मिती, पुरातन विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, गाईड ट्रेनिंग प्रोग्रॅम त्याने परिणामकारकरीत्या यशस्वी केले. रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वनवासी संमेलन आयोजित करण्यात त्याचा विशेष सहभाग राहिला होता. चिपळूणच्या जवळ असलेल्या धामणवणे डोंगरावर वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांनी समृध्द वनीकरण प्रकल्प उभारण्यात त्याचे सक्रीय योगदान होते. अलिकडे त्याने रत्नागिरी जिल्हातील पक्ष्यांची सूची बनवण्याचे काम मनावर घेतले होते. ८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील ‘निसर्गसेवक’ संस्थेने वर्धापन दिनी पर्यावरण संरक्षण व त्याविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तीला गेली १६ वर्षे दिला जाणारा ‘निसर्गसेवक’ पुरस्कार निलेशला प्रदान केला होता.

 


आपल्याकडे पर्यावरण कार्यक्रमांना ४०/५०वर्षे वयाच्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होत नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा आहे. अशी व्यथा निलेश बोलून दाखवायचा. मनुष्याला अरण्यवाचन आल्यास जंगले टिकतील. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ घ्यायला हवी आहे. अशी मांडणी प्रत्येक ठिकाणी निलेश करायचा. ‘सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत.’ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे चिपळूणला २०१९ साली आम्ही आयोजित केलेल्या पर्यावरण संमेलनात ‘सह्याद्रीतील वैविध्यता’ या सत्रात हे त्याने आवर्जून सांगितलं होतं. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर यायला हवे. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्यात. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात ‘नपिता’ म्हणतात. आपण पक्ष्यांच्या नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा आहे. पक्षी जीवनाबाबतचे हे त्याचे अनुभवाचे बोलं विचारप्रवण करायचे. इतके की कधीकधी गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या अस्सल निसर्गसख्याने लिहिलेली जंगलची वर्णने वाचताना मिळणारा आनंद निलेशसोबत खुल्या जंगलात वावरताना मिळून जायचा. इतकी निलेशची जंगलविषयक मांडणी अस्सल असायची. निलेशचा स्वभाव झुंजार, कृतीशील होता. आपल्याला जे पटत नाही त्याच्याशी त्याने कधीही तडजोड केली नाही. चुकून पाय खड्डयात पडला तरी नियतीच्या नाकावर टिच्चून, कष्ट करून पुन्हा उभं राहायची त्याची धमक प्रेरणादायी होती. जंगलात-निसर्गात चुकीला माफी नाही. तिथे खूप काळजीपूर्वक प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जैववैविध्याचं निरीक्षण करावं लागतं. हे अत्यंत नाजूक काम असतं. आपण निसर्गाजवळ जाऊन थोड्याफार प्रमाणात का होईना, त्यांच्या दिनचर्येचा भंग करत असतो. त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करत असतो. आपलं जंगलावर प्रेम असलं तरीही ते व्यक्त करताना निष्काळजीपणा उपयोगाचा नाही. याची जाणीव निलेश नेहमी करून द्यायचा.

 


पावसाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही भैरवगडला गेलेलो. पावसाळ्यातील भैरवगडाचे दृश्य पाहून आम्ही लिहिलं... ‘भर पावसात भैरवगड’! पहिला पॅरेग्राफ लिहून नेहमीप्रमाणे निलेशला वाचायला पाठवला. वाचल्यावर लगेच त्याचा फोन आला. म्हणाला, ‘हे वाचून लोकं पावसाळ्यातच भैरवगडला जातील. अपघातांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे तू या नावाने लेख प्रसिद्ध करू नको.’ अर्थात लेखाला द्यायला दुसरं नाव आम्हाला सुचलं नाही, म्हणून तो लेख आम्ही प्रसिद्ध केला नाही. निसर्गाबाबतचा जो विचार निलेशने अंगिकारला त्याचा विशेष गवगवा न करता तो त्या विचाराशी प्रामाणिक राहिला. त्याने आपला वेगळा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जपला होता. निलेश आम्हाला भेटल्यापासून लेखनकारणे त्याची दखल घेण्याचा प्रयत्न आम्ही जाणीवपूर्वक केला. अर्थात तो अपुरा पडला, ही खंत सदैव राहिल.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

 

 

 

 

 

 

 

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...