शुक्रवार, २ मार्च, २०१८

‘डेस्टिनेशन चिपळूण’च्या दिशेने...!

मुंबईहून गोव्याला जाताना विश्रांतीचे पारंपारिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे चिपळूण. हाच विचार करून जगप्रसिद्ध हॉटेल ‘ताज’ने साधारणत सन १९८९ ते ९५ च्या दरम्यान कोकणाचा स्वामी असलेल्या भगवान परशुराम मंदिर परिसरात, महेंद्रगिरी डोंगरात, निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या वाशिष्ठी नदीपात्राचे दर्शन घडणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जागेवर थ्रीस्टार हॉटेल उभारले. याकाळात ‘महाराष्ट्र पर्यटन’कडे बघण्याचा पर्यटकांचा दृष्टीकोन वेगळा होता. नंतरच्या काळात कोकण महामार्गावर, इथेच पुढे ‘विसावा पॉइंट’ जन्माला आला, निसर्ग तर पहिल्यापासूनच खुणावतच होता. तेव्हापासून असलेली चिपळूणची ‘विश्रांतीस्थान’ ही ओळख बदलण्याचे प्रयत्न गेल्या २०-२५ वर्षांत अनेकांनी आपापल्यापरीने केले. मात्र त्याला दखलपात्र यश मिळत नव्हते. मागच्या महिन्याच्या २३ ते २५ फेब्रुवारीला चिपळूण पर्यटनाच्या इतिहासात प्रथमच संपन्न झालेल्या, देशभरातील पर्यटकांना पर्यटन सेवा पुरविणाऱ्या प्रसिद्ध पर्यटन कंपन्या, टूर ऑपेरेटर आदि ३५ प्रतिनिधींच्या ‘चिपळूण दर्शन’ दौऱ्यातून हे दखलपात्र यश काही प्रमाणात का होईना, मिळण्याची आशा निर्माण झाल्याचे जाणवून आले. निर्माण झालेल्या आशेवर नुसतेच विसंबून न राहाता चिपळूण पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक स्थानिक घटकाने ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ संस्थेच्या हातात हात घालून काम करायला सुरुवात केली तर भविष्यातील ‘डेस्टिनेशन चिपळूण’चे स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचे ते दमदार पाऊल ठरेल.          
     
निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, विकासाची झेप घेण्याची प्रचंड क्षमता असलेले चिपळूण पर्यटन आजही उपेक्षित आहे.  संपूर्ण कोकणाकडे खूप काही असल्यामुळे ही अडचण निर्माण होते, ज्यांच्याकडे दाखवण्यासारखं थोडंस आहे ते मात्र हमखास प्रगती साधतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी’चे गेल्या पाच वर्षातील ‘आपण चालायला लागलो की रस्ता बनायला सुरूवात होते’ अशा विचाराचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सन १९६४-६५ ला या महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले. तत्पुर्वीपासून परशुराम मंदिराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील बंडोपंत आणि लीलाकाकू सहस्रबुद्धे यांचे ‘विश्रांतीस्थान’ हीच चिपळूणातीलच नव्हे तर कोकणातील (कदाचित) एकमेव पर्यटक व्यवस्था होती. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांचा धामणदेवीमार्गे प्रवास चाले. भरणेनाका नाका सोडल्यानंतर चिपळूणपर्यंत एकही हॉटेल नव्हते, वीज, वाहतूक व्यवस्था नव्हती. तेव्हा हे ‘विश्रांतीस्थान’ २४ तास सुरु असायचे. येथूनच ‘कोकम सरबत’ महाराष्ट्रभर पोहोचले. पर्यटन कंपन्या चहा-फराळासाठी इथे थांबत असतं. पाठीमागील वाशिष्ठीची खाडी हे तेव्हाही आकर्षण होते, क्रोकोडाईल टुरिझमसह विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत पर्यटन आकाराला आलेलेच नव्हते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शैलेश वरवाटकर, रविकिरण जाधव, संदेश संसारे आदि काहींनी वाशिष्ठी खाडीत वैयक्तिक प्रयत्नांना सुरुवात केली होती. सन २००८ साली धीरज वाटेकर आणि समीर कोवळे यांनी, तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या सौ. नूतन आणि श्री. विलास महाडिक यांच्या सहकार्याने ‘चिपळूण तालुका पर्यटन’ हे इथल्या पर्यटनाची खडानखडा माहिती देणारे अभ्यासपूर्ण पुस्तक तयार केले. त्यानंतरच्या कालखंडात इथल्या पर्यटन चळवळींनी आकार घ्यायला सुरुवात केली. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ हे त्याचे आजचे सर्वात समृद्ध स्वरूप होय. याच संस्थेच्या सहकार्याने, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे, इंटरप्रायाझिंग ट्रॅव्हलर एजंट असोसिएशन, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया आदि संस्थांमार्फत कार्यरत प्रसन्ना टूर्स, ट्रॅव्हल मास्टर, गिरिकंद ट्रॅव्हल्स, ओम टूर्स, पॅराडाईज मार्केटिंग, मिहीर टुरिझम, सिमास ट्रॅव्हल्स आदि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांसोबत काम करणाऱ्या नामांकित ३५ टूर ऑपरेटर्सचा नुकताच तीन दिवशीय चिपळूण पर्यटन दौरा संपन्न झाला. चिपळूणची पर्यटन श्रीमंती दाखवून आगामी काळात अधिकाधिक पर्यटक चिपळूणात आणता यावेत, हा या मागचा मुख्य हेतू होता.

पहिल्याच दिवशी दिनांक २३ फेब्रुवारीला दुपारी चिपळूणात दाखल झालेल्या टूर ऑपरेटर्सचे परशुराम येथील ‘दि रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्ट येथे आगमन झाल्यानंतर पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दुपारच्या भोजनानंतर मान्यवर टूर ऑपरेटर्सना डेरवण शिवसृष्टी दाखविण्यात आली. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारलेली महाराष्ट्रातील ही सर्वात पहिली शिवसृष्टी रत्‍नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे पंधरा वर्षांच्या प्रयत्नातून शिल्पकार दादा पाटकर यांच्या सहकार्याने सन १९८५च्या दरम्यान उभारली गेली. सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही शिवसृष्टी उभारण्यात आली. डेरवण येथेच उभारण्यात आलेल्या ऑलंम्पिक दर्जाच्या क्रीडासंकुलाची पाहणी सर्वांनी केली. कोकणातल्या काटक आणि निसर्गतःच चपळाई अंगात असलेल्या तरुणाईला संधी देण्यासाठी हे ऑलंम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. संकुलामध्ये शूटिंग, जिम्नास्टिक, स्विमिंग, वॉटर पोलो, लॉन टेनिस, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल, कॅरम, हॉकी, कराटे, कुस्ती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, कराटे, गोळा फेक, थाळी फेक, तिरंदाजी आदि ३५ खेळ खेळण्याची सुविधा आहे. त्यामध्ये रायफल खेळांचा समावेश आहे. सुमारे १०० एकर परिसरात वसलेल्या आणि फळबाग लागवड, विविध पक्षी अभयारण्य, नेचर ट्रेल, १.५ कोटी लीटर पाणी क्षमतेचे शेततळे असलेल्या कँपसाठी उपयुक्त धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्स सर्वांनी भेट देऊन तिथल्या ‘जंगल सफारी’ आणि स्थानिक प्रसिद्ध शाकाहारी / मांसाहारी मोंगा पार्टी, विठ्ठलाई नाचनृत्य धामणवणे (मधली उंडरेवाडी), श्रीराम मित्र मंडळ यांच्या पारंपारिक जाखडी नृत्याचा आनंद घेतला. इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी उपस्थितांना ‘चिपळूण इतिहास आणि संस्कृती’ याबाबत माहिती दिली.  

दुसऱ्या दिवशी, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी चिपळूणचा पहारेकरी असलेल्या किल्ले गोविंदगडाची पाहाणी करण्यात आली. गोविंदगड नावाने ओळखला जाणारा, सात बुरुज, वैशिष्ट्यपूर्ण बांगडी तोफ असलेला गोवळकोट किल्ला 'डोंगरी' प्रकारातील आहे. किल्ल्यावर तळी, तोफा पुरावशेष पाहायला मिळतात. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. किल्यावर रेडजाई तर पायथ्याशी श्रीदेवी करंजेश्वरीचे प्राचीन मंदिर आहे. चिपळूणच्या याच देवीचा शिमगोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे. त्यानंतर चिपळूण बॅकवॉटर, आयलँड पार्क आणि क्रोकोडाईल सफारीचा खराखुरा आनंद सर्वांनी घेतला. ‘गोवळकोट ते दाभोळ’ असा ४४ कि.मी.चा प्रवास असलेल्या आपल्या दोन्ही तीरावर दापोली, गुहागर, खेड आणि चिपळूण तालुक्यांच्या सीमा अससेल्या देखणे निसर्गसौंदर्य, नितांत सुंदर वाशिष्टी खाडी, खाडीतील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीचे छोटे-मोठे डोंगर आणि खाडीकिनारी निवांत विसावलेल्या मगरींचे दर्शन सर्वांनी बोटीमधून घेतले. दुपारच्या भोजनासाठी सर्वांना शैलेश वरवाटकर यांच्या ‘तुंबाड किनारा रिसॉर्ट्स’ येथे नेण्यात आले. प्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. पेंडसे यांच्या ‘तुंबाडचे खोत’ (१९८७) या कादंबरीने अजरामर झालेले तुंबाड गाव जगबुडी नदीच्या काठावर वसलेलं आहे. खेडच्या पूर्व सह्याद्रीतून नागमोडी वळण घेत निघालेली जगबुडी नदी तुंबाडच्या पुढे वशिष्ठी नदी मिलनानंतर दाभोळ येथे समुद्राला मिळते. निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न असलेल्या या तुंबाडच्या धक्यावरून शरीराला सुखावणारा मंद, गार वारा, झाडांची गर्द सावली. फुलझाडांचा दरवळलेला सुवास अशा नैसर्गिक वातावरणातील प्रसन्नता साऱ्यांनीच अनुभवली. या दरम्यान टूर ऑपेरेटर्सनी पॅगोडा, रीम्झ, अभिरुची, ओमेगा इन, दि रिव्हर व्हयू रिसॉर्ट्स आदींची पाहाणी केली. कोकणाचा स्वामी भगवान परशुराम आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचे दर्शन घेत इथल्या अध्यात्मिक परंपरा समजून घेतल्या. भगवान परशुरामाचा अवतार चिरंजीव असून, त्याचे अस्तित्व या भूमीत आहे, असे मानले जाते. या मंदिराच्या मागे माता रेणुकादेवीचे मंदिर आहे. रावतळे परिसरात विध्यवासिनीचे पुरातन मंदिर आहे. शाक्तपंथियांना भावणारी देवीची यादवकालीन अष्टभुजा मुर्ति, कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिसऱ्या शेवटच्या दिवशी, २५ फेब्रुवारी हेदवीतील प्रसिद्ध दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर, निसर्गनवल समुद्रघळ (बामणघळ), वेळणेश्वर मंदिर आणि समुद्र किनारा पाहिला. 

तत्पूर्वी दिनांक २४ रोजी सायंकाळी, चिपळूण पर्यटन विकासासाठी खा. हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या भरीव सहकार्याने गेली पाच वर्षे झटणाऱ्या 'ग्लोबल चिपळूण टुरिझम' या टूर आयोजक संस्थेच्या वतीने 'द रिव्हर व्हयू' या चिपळूणातील तारांकित हॉटेलच्या विशेष सहकार्याने पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या टूर ऑपेरेटर्स, स्थानिक हॉटेलियर्स आणि पर्यटन या विषयात रुची असलेल्या सुमारे ६५ अभ्यासू व्यक्तींचे महत्वपूर्ण चर्चासत्र पार पडले. यात ‘प्रसन्ना पर्पल’चे संजय नाईक, मिहीर टुरिझमचे सुधीर करंदीकर, सिमास ट्रॅव्हल्सचे विश्वास केळकर, ‘ट्रॅव्हल मास्टर’चे कृष्णा गोपालन, ओम टूर्सचे राजेश अरगे, पॅराडाईज मार्केटिंगचे मिलिंद आयरे, ट्रीप स्टोअरचे प्रशांत ढेकणे यांनी तर 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'तर्फे अध्यक्ष श्रीराम रेडिज, संजीव अणेराव, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर, 'द रिव्हर व्हयू'चे विजय गावकर यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्रात सुरुवातीला आयोजकांकडून परशुरामचा महेंद्रगिरी डोंगर ते वाशिष्ठी खाडीतील बेटे ते गोवळकोट किल्ला असा रोप-वे, चिपळूण पर्यटन माहिती केंद्र, सवतसडा धबधबा बारमाही प्रवाही करणे, शहरातील तलाव उर्जितावस्था, शहरातील पर्यटनाशी निगडीत रिक्षावाला, चारचाकी वाहतुकवाले, छोटे खाद्यपदार्थ विक्रेते यांच्या एकत्रीकरण आणि संवादाची आवश्यकता, रिक्षांवर पर्यटन लेखन, रिक्षादर निश्चिती, गेल्या २५ वर्षांत एकही नवा उद्योग चिपळूणात आलेला नसल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता पर्यटनाकडे पाहण्याची गरज, हाऊसबोटची उपलब्धी, वाशिष्ठी खाडीच्या दोन्ही तीरावर होम स्टे, त्यातून स्थानिकांना रोजगार, तळ्यांचे शहर असलेल्या चिपळूणात नारायण आणि रामतीर्थसह इतर तलाव ऊर्जितावस्थेत आणणे, किल्ले गोविंदगडसह चिपळूण पर्यटनातील विविधता याबाबत माहिती देण्यात आली. चिपळूणात आजमितीस एकूण ३५ हॉटेल असून त्यातील तीन हॉटेल थ्री स्टार आहेत, त्यात ७० रूम्सची उपलब्धी आहे. उच्च मध्यमवर्गीय श्रेणीतील १५ हॉटेलात १५० खोल्यांची व्यवस्था असून परिसरात होम-स्टेची ८ ठिकाणे आहेत. चर्चेदरम्यान, चिपळूणकरांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज, येणा-या पर्यटकांचे स्वागत करण्याबाबत घायावयाची भूमिका, ‘क्रोकोडाईल सफारी’ला ब्रँड अॅम्बॅसिडर बनविण्याची गरज, छोट्या-छोट्या बोट राईड, महाराष्ट्रातील ५-६ हजार टूरएजंटपर्यंत चिपळूण फेस्टीवल पोहोचविण्याची गरज, मार्केटिंग, वैयक्तिक ग्राहकाला पॅकेजमध्ये वेगळी सूट न देण्याचा विचार, ‘सर्टिफाईड गाईड’ची टीम, खाडीतील बेटावर निवासासह विविध व्यवस्था, महाराष्ट्राबाहेरच्या पर्यटकाला त्याच्या कंफर्ट झोनप्रमाणे जेवण, मगरी दिसल्या नाहीत तर पर्यटक येतील का ?  यासाठीची पर्यायी व्यवस्था, एकावेळी ४० माणसं राहू शकतील अशा हॉटेलची वाढीव संख्या, वीज, पाणी व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर, मेन्टेनन्स, स्वच्छ बाथरूम, जवळपासच्या देवरायातील नेचर ट्रेक यांवर चर्चा झाली.

मूळात चिपळूणकरांना आपल्या पर्यटनाची ताकद समजायला हवी आहे, त्यासाठी चिपळूणकरांनी चिपळूण  पाहायला, फिरायला हवे आहे. आपल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित शक्तीस्थळांवर काम करावे लागणार आहे. पर्यटकांच्या प्रवास मार्गावर आणि मोक्याच्या ठिकाणी (विसावा पॉइंट) पर्यटन फलक, शासन आणि लोकप्रतिनिधी या पर्यटन विकासाच्या दोन महत्वाच्या चाकांचे सहकार्य, नवे पर्यटन प्रकल्प, संग्रहालय निर्मिती, किमान पर्यटन हंगामात शहर सुशोभिकरण, स्वच्छता, रेल्वेस्टेशन ते गांधारेश्वर मार्गे चिपळूण शहर या अंतर्गत रस्त्याची सुधारणा, पर्यटन डॉक्युमेंटेशन, आपल्याकडील विसावा पॉइंट सारख्या ठिकाणी संकासूर, जाकडी, कोळीनृत्य आदींसाठी लागणाऱ्या पेहेराव-पर्यटक फोटो दर्शन यावर विचार व्हायला हवाय. येथे येणाऱ्या पर्यटकाला शांतता, चांगले खानपान, स्वच्छता, करमणूक, राहाण्याची उत्तम व्यवस्था हवी असते. पर्यटन हा शंभर टक्के नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. केरळ, गोवा, हिमाचल, उत्तराखंड, अंदमान आदि देशी ठिकाणाशी तुलना करता कोकण कोठेही कमी नाही. आपल्या शेजारच्या कर्नाटकात आपण राज्यभर कुठेही फिरा, आपल्याला काही महत्वाच्या ठिकाणी, मुख्य मार्गावर आपण येथे आहात ; u are here असे सांगणारी आणि तिथून आजूबाजूला साधारणतः ५०-१०० किलोमीटरच्या परिघात किती भरगच्च पर्यटन समृद्धी आहे ? याची जाणीव करून देणारी अगदी मोठी होर्डींग्स दिसतील ! ती होर्डींग्स पाहाताना आपल्या मनात सहजच पर्यटक म्हणून अनेक विचार येऊन जातील, बरच काही पाहायचं राहून गेलं म्हणून आपले मन चुकचुकेल, आपण पुन्हा इथे आल्यावर काय-काय पाहायचं ? याचे नियोजनही करू. आज पर्यटकांना असे सारे सहज हवे आहे, अशी व्यवस्था आपण चिपळूणातही करू शकतो. आपल्याकडे पर्यटन विकास कामाची अंदाजपत्रके कोट्यानुकोटींची उड्डाणे घेत आहेत, जी यंत्रणा, व्यवस्था प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी ही विकासकामे पूर्ण करते, तिला ‘पर्यटन दृष्टी किती असते ? की आम्ही फक्त ठेकेदारी कामम्हणून याकडे पाहतो ? पुढेही पाहणार आहोत ? खाडीकिनाऱ्यावरील कामे,  किल्ल्यांची, प्रमुख पर्यटन रस्ते, हेरीटेजची डागडुजी करताना काम करणारा आणि करून घेणारा त्याकडे फक्त ठेकेदारी कामम्हणून पाहतो, मग अशा पर्यटन विकासाच्या कामांचा पुढे अल्पकाळात पुरता बोजवारा उडतो, पर्यटन म्हणून विचार करून यात काम करण्याची संधी आहे. प्रसिद्ध दोन पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्याचे सक्षमीककरण करताना कल्पकतेने, पर्यटकांच्या रस्त्यावरील गरजा पूर्ण करणारे नियोजन व्हायला हवे. कोकण पर्यटन समृद्धीचा राजमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वर मध्यवर्ती असलेल्या चिपळूणनजीक एखाद्या गावात शे-पाचशे वर्षांपूर्वीचे समृद्ध प्राचीन कोकणी खेडे अगदी जसेच्या-तसे, धूळ उडविणाऱ्या मातीच्या रस्त्या-बैलगाडीसह पर्यटकांना अनुभवायला दिले तर किती मज्जा येईल ! त्या गावात, खानपान, जगण्याच्या काही सवयी, मनोरंजनाची साधनेही तेव्हाचीच असतील ! काय हरकत आहे ? अशा नव्या गोष्टींचा आगामी काळात विचार करायला लागणार आहे. चिपळूणात कोकणी खाद्यसंस्कृती हमखास जपणारी काही हॉटेल तयार व्हायला हवीत, त्यांचे मार्केटिंग हवे. चिपळूणची वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला पुढे जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे विश्व गॅझेटिअरप्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. आम्हाला पर्यटन विकासासाठी हे संदर्भ वापरावे लागतील.

चिपळूणात अवघ्या ६० ते १०० किमीच्या पट्यात ‘खाडी, डोंगर, बॅकवॉटर, किल्ले, निसर्ग, जंगल, संस्कृती, लोककला, हेरीटेजअशी जगातील सारी अमर्याद पर्यटन समृद्धी एकवटली आहे. याची नीट प्रसिद्धी, जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा कृषी पर्यटन व हॉटेल उद्योगामधून निर्माण झाल्या तर पर्यटक चिपळूणात रमतील. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप  मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक स्वामी अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. तालुक्यातील मालदोली गावात साधारणत: नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कल्पनेतून उभारण्यात आलेल्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यासया हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराच्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी, सुरेख उभारणी असलेल्या वास्तूचा शास्त्रीय वेगळेपणा वर्तमान पिढीसमोर यायला हवा. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गालगत अतिशय जवळ नितांत सुंदर म्हणून सवतसडा धबधबा प्रसिद्ध आहे. वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार असलेले दादरचे श्रीरामवरदायिनी मंदिर, टेरवचे भवानी माता मंदिर, तीन हजार फुट उंच किल्ले भैरवगड, शारदादेवी मंदिर तुरंबव, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले शिरंबेचे श्रीमल्लिकार्जुन मंदिर, शहराच्या पश्चिमेकडील अरण्यमय महालक्ष्मीण डोंगर भागात असलेले मिरजोळीत श्रीदेवी महालक्ष्मी - साळूबाई हे देवस्थान, वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या किनार्यावर असलेल्या गोंधळे गावी सन १६९६ मध्ये आप्पाजी गोंधळेकर यांनी बांधून पूर्ण केलेले श्रीहरिहरेश्र्वर मंदिर, त्या मंदिराशेजारी विशाल आकारमानाची ४० पायऱ्यांची प्राचीन विहिर, डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्याने पुनित वास्तू राजगृह, चिपळूण शहर दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असल्याचा पुरावा सांगणारी कोल्हेखाजन बौद्ध गुंफा लेणी, शहरातील गजान्तलक्ष्मी शिल्प, विजयस्तंभ, भोगाळेतील घोडेबाव, ई. स. सहाव्या शतकापासूनचे चिपळूणातील पराक्रमी, कोकण प्रांताचे वतनदार घराणे असलेल्या राजेशिर्के यांची ३५० वर्षाचा इतिहास लाभलेली वाडासंस्कृती इथलं वैभव आहे. ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या श्रीराम रेडिज, इब्राहिम दलवाई, संजीव अणेराव, आलिम परकार, मिलिंद कापडी, निलेश बापट, धीरज वाटेकर, रमण डांगे, राजेश पाथरे, विश्वास पाटीलसमीर कोवळे, विलास महाडिक, मनोज गांधी, महेंद्र कासेकर, शाहनवाज शाह, समीर जानवलकर यांच्यासह प्रा. सौ. मीनल ओक, डॉ. मनोज रावराणे, संदेश संसारे, सत्येंद्र वैद्य, अभिजित चव्हाण, प्रकाश चव्हाण आदि अनेकजण ‘चिपळूण पर्यटन’ विकसित व्हावे म्हणून धडपडत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचे, तळमळीचे अनेकांनी कौतुकही केलं.

चिपळूणची जीवनदायिनी म्हणून इथल्या ‘वाशिष्ठी’ नदीकडे पाहाता येईल. कोयनेच्या अवजालामुळे चिपळूणकर निवांत आहेत, अन्यथा आम्हा सर्वांची हयात पाणी भरण्यातच वाया गेली असती. जेव्हा ओहोटी असते, कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी सोडलेले नसते, वीजनिर्मिती बंद असते, तेव्हा या वाशिष्ठी नदीला बहाद्दुरशेखनाकानजीक ब्रिटीशकालिन पुलाजवळून फेरफटका मारला की माझ्या वरच्या विधानाचे मर्म ध्यानी येईल. इथे आगामी काळात ‘रिव्हर बँक प्रकल्प’ राबविताना आम्हाला याचा विचार करावा लागणार आहे. गोव्यात  मांडवी आणि झुआरी नदीवर पर्यटन उद्योगाचा डोलारा उभा आहे, मग संपूर्ण महाराष्ट्रात बारमाही वाहणाऱ्या एकमेव,  चिपळूणला ‘आपण सारे’ पर्यटन समृद्ध का करू शकत नाही ? याचा विचार समस्त चिपळूणकरांनी आपणहून करायलाच हवा. चिपळूणला डेस्टिनेशन बनविण्याच्या प्रयत्नांना प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यासह, चिपळूणला उतरलेल्या कोणी पर्यटकाने सहजपणे विचारलेल्या ‘इथे पाहण्यासारखे काय आहे ?’ या प्रश्नावर ‘इथे ? कुठे काय ? काय नाय, बा !’ असे तद्दन खोटे आणि नकारात्मक उत्तर न देणाऱ्या स्थानिक चिपळूणकरांचेही तितकेच  ठोस सहकार्य मिळण्याची गरज आहे.          

धीरज वाटेकर

http://www.mulshidinank.com/2018/03/blog-post_4.html

कोकणाचा स्वामी भगवान परशुराम मंदिर 
धामणवणे येथील एस. आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्समधील जंगल सफारी

एस.आर. जंगल अँड अॅड्व्हेंचर रिसॉर्ट्सची माहिती घेताना टूर ऑपेरेटर्स
प्रसिद्ध विसावा पॉइंट


श्रीदेवी करंजेश्वरी 

किल्ले गोविंदगड भेट 

वाशिष्ठी खाडीतील बेटास भेट

खाडीतील जल पर्यटन

खाडीतील क्रोकोडाईल पर्यटन 

 सवतसडा धबधबा 

चर्चासत्रात 'चिपळूण पर्यटनातील विविधता' याबाबत बोलताना धीरज वाटेकर






गुरुवार, १ मार्च, २०१८

'आदर्श गटशिक्षणाधिकारी' : सूर्यकांत पाटील

सूर्यकांत बळवंत पाटील  
चिपळूण प्राथमिक शिक्षणाच्या इतिहासात प्रथमच, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने 'आदर्श गटशिक्षणाधिकारी' म्हणून गौरव झालेले, चिपळूणात सहा महिन्यापूर्वीच (२२ जुलै २०१७) रुजू झालेले सूर्यकांत बळवंत पाटील यांना जिल्हा परिषद सोलापूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) अशी पदोन्नती बढती मिळाली आहे. मूळचे वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूरचे रहिवाशी असलेल्या पाटील यांनी चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागातील शाळांना भेटी, वादाचे विषय सामोपचाराने मिटविण्यात पुढाकार आणि विविध शाळांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करीत इथल्या प्राथमिक शिक्षण विषयात आदर्शवत काम उभे करण्याचा प्रयत्न केला.

चिपळूणातील आपल्या २२ जुलै २०१७ पासूनच्या अवघ्या गत सहा महिन्याच्या कारकिर्दीत त्यांनी अभिलेख वर्गीकरण, सेवा पुस्तकांचे अद्ययावतीकरण, प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला. चिपळूणात या पदाचा पूर्वीचा कालावधी हा ‘प्रभारी’ असल्याने अनेक विषय प्रलंबित होते. याकरिता कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलून काम करून घेण्याचे मोठे आव्हान होते. ७० केंद्राशाळातून विभागलेल्या ११३९ शिक्षकांचे कँप लावून किमान ८०० हून अधिक सेवापुस्तके अद्ययावत करून घेतली, उर्वरितही करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. वर्ग चारच्या सर्व सहा कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विद्या प्राधिकरणाने घेतलेल्या चाचण्या, ‘आसर’ संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत पहिल्या तीन क्रमांकात असून त्यात चिपळूण तालुका अग्रेसर आहे. शाळासिद्धी आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मुलांच्या वाचन विषयक जाणीवा समृद्ध करून त्यांना प्रभुत्व पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. गणितात विशेषतः भागाकारात मुले मागे पडत होती, त्याबाबत तसेच वर्तमान काळात मुलांना शिकायचे असेल तर आधुनिक डिजिटल युगाचा अवलंब अत्यंत आवश्यक मानून काम केले. सर्वात महत्वाचे म्हणजे चिपळूणात शिक्षक, प्रशासन यांच्यात अधिकाधिक सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. येगाव शाळेत सुमारे ८-१० लाख रुपयांच्या शैक्षणिक उठावातून, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रकरिता आवश्यक सर्व उपक्रम राबविले जात असल्याबाबत त्यांनी विशेष कौतुक केले. पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील ‘कुटी’ या शाळेत निर्माण करण्यात आली असून त्यात पुस्तके ठेवून मुक्त वाचन प्रकल्प राबविला जात आहे. उपक्रमशील शिक्षण असलेल्या या शाळेतील मुले पाहुण्यांची मुलाखत घेतात, इतपत सक्षम आहेत. चांगल्या कामाची संधी असलेल्या चिपळूणात काम करताना ‘संवाद आणि समन्वय’ अतिशय महत्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या खातेप्रमुखाला पुरस्कार दिला जातो, तो यावर्षी चिपळूणने शैक्षणिक इतिहासात पहिल्यांदाच मिळवला. रत्नागिरीत संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘शिक्षणाची वारी’ कार्यक्रमासाठी कोल्हापूर विभागातून फक्त चिपळूणचा स्टॉल निवडण्यात आला होता, त्याचीही दखल शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतली होती.

सन १९८५ साली शाहूकुमार हायस्कूल कासारवाडा-बिद्री येथे त्यांनी सेवेस प्रारंभ केला, तिथे सात वर्षे सेवा बजावली. यावेळी काम करताना त्यांचा कल स्पर्धा परीक्षेकडे झुकला, सन १९९२ साली परीक्षा पास होऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण शाखेत वर्ग २ अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. दिनांक २५ मे १९९३ ला ते गटशिक्षणाधिकारी म्हणून कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे कार्यरत झाले. तिथेही त्यांनी सात वर्षे काम केले. सुरुवातीचा कालखंड तसा कठीण होता, अनेक प्रशासकीय गोष्टी मुळापासून समजून घेऊन कराव्या लागल्या. तिथे विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा शैक्षणिक उठावातून अधिकाधिक उपलब्ध व्हाव्यात, शिक्षक संख्येची कमतरता दूर व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत त्यांनी प्रयत्न केले. त्याबरोबरच विज्ञान प्रयोगशाळा, प्रकाशयुक्त खोल्या, प्रत्येक शाळेत एक बगीचा असावा याकरिता पाच लाख वृक्षारोपण, दुर्गम भागात शिक्षक रमावा म्हणून प्रयत्न केले. कुडाळ येथून त्यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथे सन २००० ते २००३ दरम्यान एक वर्ष डायटमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर पुढे २००८ पर्यंत पन्हाळा येथेच ते कार्यरत राहिले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागात  उपशिक्षणाधिकारी म्हणून, एक वर्षे पुसेगाव महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम केल्यावर ते चिपळूणात कार्यरत झाले होते. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुर्यकांत पाटील यांनी स्वत: श्रम करून प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मूळगावी (वाघापूर, भुदरगड), त्यानंतरचे बी.एस.सी.एम.एड. पर्यंतचे शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर आणि प्रसिद्ध मौनी विद्यापीठ गारगोटी येथून पूर्ण केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात शिकत असताना जाधव नावाचे शिक्षक गणित शिकवायचे, त्यांच्या अध्यापन पद्धतीचा पाटील यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. आपण पुढील आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व्हायचे, हे त्यांनी त्यावेळेसच ठरवून टाकले होते. 
   
धीरज वाटेकर 


बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

‘अ.भा.वि.प.’ची रत्नागिरीतील पाच दशकांची वाटचाल !

‘थोडा वेळ समाजासाठी’ ही संकल्पना तरुणांच्या मनात रुजवित, आदर्श विद्यार्थी चळवळीचे तत्त्वज्ञान मांडून देशभरात गेल्या ६८ वर्षांत ते सिद्ध करणारी, जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अशी ओळख असलेल्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात गेली ५२ वर्षे काम सुरु आहे. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून वैशिष्ट्यपूर्ण आणि सदैव कार्यरत,
देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारी तरुणाई घडविणाऱ्या या संघटनेच्या कोकण प्रदेशाचे ५२ वे अधिवेशन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान रत्नागिरीत संपन्न होते आहे, त्या निमित्ताने ‘अ.भा.वि.प.’च्या रत्नागिरीतील पाच दशकांच्या  वाटचालीचा हा धावता आढावा !

लहान वयात मोठं कार्य उभे केलेल्या स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थानी मानून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू पाहाणारी, दिनांक ९ जुलै १९४९ मध्ये रा. स्व. संघाच्या मोजक्या प्राध्यापकांनी स्थापन केलेली ही संघटना आज संघपरिवारम्हणून ओळख असलेल्या संघटनांपकी एक बहुचर्चित देशव्यापी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना बनली आहे. ‘सेवा, संस्कार आणि संघर्ष’ या त्रिसूत्रीवर काम करत अ.भा.वि.प.ने आजपर्यंत लाखो तरुणांच्या मनात ‘एक आंदोलन देश के लिये’ म्हणत राष्ट्रभक्ती, देशभक्तीचा विचार आणि समाजाविषयी ममत्व जागविण्याचे काम केले. आपापल्या कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी ‘झिंदाबाद झिंदाबाद ! विद्यार्थी परिषद झिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत मोर्चा, आंदोलने, सदस्यता करणारी परिषदेची प्रवाही कार्यकर्त्यांची तरुणाई अनेकदा समाजाचे लक्षवेधून घेत असते. संघटनेच्या रत्नागिरीतील ५२ वर्षांच्या अशा या  कामाचा इतिहास हा माणूस जगण्याच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या, येथील अनेक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस दिलेल्या योगदानाचा इतिहास आहे. एखाद्या संघटनेचे काम सुरु करणे सोपे असते, परंतु ते इतकी वर्षे टिकवणे कठीण असते. ‘अ.भा.वि.प.चे काम नक्की चालते कसे ?’ याबाबत अनेकांना आजही कुतूहल आहे. या लेखातून त्यातील काही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील, जी नवनव्या कार्यकर्त्यांना सदैव अखंड कामाची प्रेरणा देत राहतील !      

साधारणतः सन १९६०च्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्या मार्गदर्शनखाली झपाटल्यासारखे कार्यरत झाले होते. यातूनच पुढे सन १९६४-६५ पासून रत्नागिरी शहरात गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘सदस्यता नोंदणी’ होऊन प्रा. मुळ्ये, प्रा. शेवडे, प्रा. लेले यांच्या प्रयत्नातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु झाले. पेढांबे-चिपळूणचे रहिवाशी महाराष्ट्र ‘कृषिभूषण’ स्वर्गीय रणजितराव खानविलकर हे त्याकाळचे परिषदेचेच कार्यकर्ते (ही आठवण त्यांनीच आम्हास सांगितली होती) होत. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमातून काम सुरु असताना स्वर्गीय यशवंतराव केळकर यांच्यासह सध्याचे आसाम आणि नागालँड या राज्यांचे राज्यपाल असलेल्या  पद्मनाभ आचार्य, सदाशिवराव देवधर, बाळासाहेब आपटे, सुरेशराव मोडक आदि रत्नागिरीतील काम वाढावे म्हणून अनेकदा मुंबईतून त्याकाळी प्रवास करीत असत. या प्रवासातून सन १९७० ला रत्नागिरी शहरात पहिली शाखा तयार होऊन ‘माधव ठाकूर’ ह्या कार्यकर्त्यावर ‘शहरमंत्री’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. प्राचार्य सुभाष देव हेही याच दरम्यान कामात आले. त्याचवेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जी.एस. निवडणुकीत परिषद कार्यकर्ते भिकू उर्फ दादा इदाते (थोर शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष) हे निवडून आले होते. परिषदेच्या बैठकींना किमान ४०-५० कार्यकर्त्यांचा ग्रुप असायचा. याच कालखंडात परिषदेचे चिपळूणातही काम सुरु झाले होते.         

सन १९७०-८०च्या दशकात अगदी सुरुवातीला जगदीश खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोकण विभाग अधिवेशन’ आणि ‘डिपेक्स’ संपन्न झाले. मुंबईच्या प्रांतवर्गाला रत्नागिरीतून २० कार्यकर्ते उपस्थित होते. या कालखंडात आचरेकर माडीवर गोखले नाका येथे परिषदेचे कार्यालय सुरु झाले होते. अॅड़. अजित गोगटे, अॅड़. बाबा परुळेकर, सुरेखा दाते, अरुण भाटकर, जयंत करमरकर हे कार्यकर्ते तेव्हा सक्षमतेने परिषदेचा विचार महाविद्यालयीन तरुणाईसमोर ठेवत होते. या दशकात आणि त्यानंतरही गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य डॉ. सुभाष देव हे सुरुवातीची १० वर्षे रत्नागिरी शहर शाखेचे अध्यक्ष आणि प्राचार्यपदाच्या कालखंडातही त्यांचा कामात सक्रीय सहभाग राहिला, महाविद्यालयीन अनेक कार्यक्रम-उपक्रम त्यांच्या सहज परवानगीने साकार झाले. सन १९७८ साली प्रांतस्तरीय पतितपावन मंदिर (रत्नागिरी) ते काळाराम मंदिर (नाशिक) अशी ‘समता ज्योत यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत गो. नी. दांडेकर, बाळ आपटे, शंकरराव खरात हे सहभागी झाले होते. वार्षिक सदस्यता उपक्रम याच दरम्यान सुरु झाला, किमान १०० कार्यकर्ते साप्ताहिक बैठकीला उपस्थित असत. हातात पावती पुस्तक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक रुपया घेऊन सदस्यता केली जाई. कार्यकर्त्यांवर कधी-कधी प्रश्नांचा भडीमार तर कधीकधी हातावर चटकन एक रुपया मिळे. अधिक सदस्यता, चांगली आणि वेळेत व्हावी, याकरिता स्वतंत्र बैठका होत. सदस्यता प्रमुख आणि समिती ठरे. या बैठकांमधून पुढील वर्षाचे नियोजन करणारे कार्यकर्ते घडत.  यातील जमलेला काही निधी हा छपाईशुल्क म्हणून काही प्रांतनिधी म्हणून पाठविला जाई. विद्यार्थ्यांचे त्यांच्या शिक्षण क्रमानुसार वर्गीकरण आणि भागश: याद्या तयार होत. भागश: याद्यांनुसार संपर्काची रचना, प्रत्यक्ष संपर्क आणि कार्यक्रमांना आमंत्रण यातून परिषदेच्या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होई. दिनांक ९ जुलैचा स्थापनादिन एक आनंदोत्सव असे, आजही हेच सुरु आहे.      

१९८०-९० च्या दशकात, सन १९८२-८३ मध्ये मुंबईतून पहिली विद्यार्थीनी पूर्णवेळ, शुभांगी गद्रे-पुरोहित  रत्नागिरीला आली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर संघटना सांगेल तेथे, सांगेल त्या स्वरूपाचे काम समर्पण भावनेने एका निश्चित कालावधीपर्यंत करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हटले जाते. अशा कार्यकर्त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील योगदानाला आणि परिषदेच्या संघटनात्मक कामाला प्रारंभ झाला. या दशकात रत्नागिरीला विद्याधर मुळे, रवि देशपांडे, मेधा महाबळ, संतोष बाम, शशांक गाजरे हे पूर्णवेळ कार्यकर्ते मिळाले तर प्रांतातून विद्यमान महसूलमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, संजय परमणे, प्रा. जयंत कुलकर्णी यांचा प्रवास सुरु झाला. प्रा. अच्युत लेले हे रत्नागिरी शाखेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यानंतर प्राचार्य सुभाष देव, प्रा. श्रीकृष्ण जोशी, प्रा. राजू सप्रे यांनी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. या दशकात परिषदेचे पहिले जिल्हाप्रमुख म्हणून दापोलीच्या उदय गोविलकर यांच्याकडे जबाबदारी होती. या कालखंडात ५०० सदस्यता व्हायची. सन १९८५ साली रत्नागिरीत प्रथमच तंत्रनिकेतन महाविद्यालयात परिषदेचे प्रांत अधिवेशन झाले होते. यावेळी रत्नागिरीतून प्रदीप कुलकर्णी, ज्योती फडके-काळे, विनीत देव, संगीता करंबेळकर, विदुला देशपांडे, नयनाताई लिमये-सहस्रबुद्धे, मालती पाथरे-साबळे, गणेश मुळ्ये, चिपळूणातून डॉ. विनय नातू, अनिल परांजपे, दापोलीतून अनिल जोशी, सौरभ बोडस, वैशाली गोगटे, उदय गोविलकर, देवरुखातून नयना नवरे, संदीप गानू या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली होती. याच दरम्यान प्रा. यशवंतराव केळकर यांच्या ६१ वर्षे वयपूर्तीचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी रत्नागिरीतून ६१ हजार रुपयांचा ‘यशवंत निधी’ संकलित करून तो प्रांताच्या कोशात जमा करण्यात आला. सन १९८९ साली मुंबई विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू शशिकांत कर्णिक यांच्या विरोधात रत्नागिरीत आंदोलन करण्यात आले. सन १९९० साली सुनीला मेस्त्री या काश्मिरी तरुणीचे रत्नागिरीत अल्पबचत सभागृहात भाषण झाले होते, विद्यार्थीनींच्या मोठ्या उपस्थितीने पुन्हा एकदा विद्यार्थीनी कामास या व्याख्यानाने गती मिळवून दिली. गीताताई गुंडे यांचा प्रवास त्याकाळात रत्नागिरीत सुरु झाला होता, त्याचाही विद्यार्थीनी काम वाढण्यास खूप उपयोग झाला होता.  

सन १९९१ ते ९५ दरम्यान संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीसह देवरुख, खेड, चिपळूण, दापोली, गुहागर, मंडणगड येथे संघटनात्मक काम वाढीस लागले. रत्नागिरीतून अकल्पिता सरदेसाई, रमेश काळे, दर्शना  कुलकर्णी-जानराव, रुपाली पंडितराव-जोशी, अपर्णा बापट-पंडितराव, संजना बर्वे-मराठे, मनीषा ठाकूर, मकरंद दामले, सातवळेकर भगिनी, चिपळूणातून संगीता गोखले, विनोद झगडे, विराज आवटी, प्रकाश कुंभार, योगिनी मालशे, प्रा. विकास मेहंदळे, संगीता आणि अपर्णा बापट, दर्शना देशपांडे, देवरुखातून विठ्ठल सावंत, कांचन फाटक, नयना बने, स्मिता गद्रे, हर्षदा सावंत, संभाजी आंब्रे, दापोलीतून श्रीरंग जांभळे, विद्याधर करंबेळकर, दुर्गा आंबर्डेकर, देवयानी सरखोत, संजय मिश्रा, लांज्यातून जयेश शेट्ये, संजय गांधी, अरुण उपशेट्ये, श्रीराम जंगम, किशोर मानकर, गुहागरातून मयुरेश पाटणकर, अभय भाटकर, स्मिता तांबे, अमोल दीक्षित, खेडमधून दिलीप आम्बुर्ले, भूषण काणे, अॅड़. मिलिंद जाडकर, मंडणगडातून बापू शेठ, सचिन शेठ हे कार्यकर्ते परिषदेच्या प्रवाहात प्रामुख्याने कार्यरत होते. याच दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात प्रमुख कार्यकर्त्यांचा जिल्हा प्रवास सुरु झाला. त्याकाळी विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे, राजेश पांडे, विनय नवरे, वर्षा पवार-तावडे, नरेंद्र पवार हे कार्यकर्ते प्रांतातून तर अकल्पिता सरदेसाई, श्रीरंग जांभळे, दर्शना कुलकर्णी, स्वाती सातवळेकर, भूषण काणे, अॅड़. संदेश चिकणे, विश्वास वाडेकर, शलाका पाटील, सोनाली गानू, माधव नामजोशी जिल्हा प्रवास करीत. रत्नागिरी शाखेची मनीषा ठाकूर मंत्री तर श्रीरंग जांभळे जिल्हाप्रमुख होता. प्रा. सुभाष देव, प्रा. प्रकाश घळसासी, प्रा. कांबळे हे शहराध्यक्ष, उमेश आपटे, संतोष बाम, अविनाश मणेरीकर हे पूर्णवेळ कार्यकर्ते तर जयंत कंधारकर, प्रमोद कुलकर्णी, सतीश कुलकर्णी हे विभाग संघटनमंत्री म्हणून जिल्ह्यात कार्यरत असत. या सर्वांच्या एकत्रित कामामुळे सन १९९१ च्या काश्मीर आणि आसाम बचाव आंदोलनात रत्नागिरीतून १०० जणांनी सहभाग घेतला होता. सन १९९२ ला रत्नागिरीत ‘कोकण उपकेंद्र मागणी परिषद’ झाली, यावेळी शहरात झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट बैठकीसमोर निदर्शने करण्यात आली होती. यात तीन जिल्ह्यातील ६५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता, नेतृत्व वर्षा पवार-तावडे हिने केले होते. याचवर्षी हृदयनाथ मंगेशकर यांचा ‘भावसरगम’, अरुण दाते यांचे गायन आदि उपक्रम आर्थिक कार्यक्रम म्हणून झाले. जिल्ह्याच्या कोषाची व्यवस्था लागावी म्हणून आर्थिक कार्यक्रमांची असलेली रचना रत्नागिरीत कार्यान्वित झाली. सन १९९३ च्या मोर्चा पूर्वी ५०० संख्येची मशालज्योत यात्रा काढण्यात आली. जून १९९३ मध्ये फी वाढीविरोधात महाराष्ट्रात एकाचवेळी ठिकठिकाणी, जिल्ह्यात जिल्ह्यात वाटुळ, लांजा, हातखंबा, संगमेश्वर, चिपळूण, भरणेनाका येथे मोठा रास्तारोको करण्यात आला. रास्तारोकोचे नेतृत्व अकल्पिता सरदेसाई, जयेश शेट्ये, विठ्ठल सावंत, प्रकाश कुंभार, भूषण काणे, शिल्पा सातवळेकर यांनी केले. महाराष्ट्र परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ७ सप्टेंबर १९९३च्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठीच्या विराट मोर्च्यात जिल्ह्यातून ७७८ कार्यकर्ते सहभागी झाले होते, लांज्यातून लक्षणीय १५० जणांचा सहभाग होता. जिल्ह्यातून मोर्चाचे नेतृत्व रमेश काळे याने केले. सन १९९४ साली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मंडणगड ते बांदा अशी ‘स्वामी विवेकानंद संदेश यात्रा’ काढण्यात आली होती. सन १९९४ साली वनवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन रत्नागिरी, भरणे नाका, चिपळूण, लांजा, संगमेश्वर येथे ठिय्या आंदोलन आणि रास्ता रोको, मोर्डे-संगमेश्वर येथील श्रमसंस्काराचा अनुभव देणारे श्रमानुभव शिबीर, बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानमाला हे कार्यक्रम संपन्न झाले. उमेश आपटे, श्रीरंग जांभळे, अकल्पिता सरदेसाई आणि मधुवंती साठे यांनी जिल्ह्यात संघटनात्मक काम उभे राहावे म्हणून विशेष योगदान दिले.

सन १९९५ ते २००० दरम्यान जिल्ह्यात परिषदेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, विविध वसतिगृहे येथे काम वाढत गेले. या दरम्यान परिषदेच्या कामातून प्रेरणा घेऊन दापोलीची कार्यकर्ती शलाका पाटील हिने सुरुवातीला वर्षभर विक्रमगड-डहाणू आणि त्यानंतर मध्यप्रदेशात ‘वनवासी कल्याण आश्रम’करिता पूर्णवेळ काम केले. याच कालखंडात जिल्ह्यात रत्नागिरी, लांजा, भांबेड, वेरवली, रिंगणे, नेर्ले, राजापूर, पाचल, देवरुख, संगमेश्वर, कसबा, चिपळूण, अलोरे, मार्गताम्हाने, गुहागर, दापोली, वाकवली, मंडणगड येथे महाविद्यालयीन शाखा उभ्या राहिल्या. शहरात सुषमा कोतवडेकर, सोनाली गानू या शहरमंत्री, प्रा. घळसासी, प्रा. महेश नाईक हे अध्यक्ष तर संभाजी आंब्रे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. लांज्यातून प्रा. मराठे, प्रा. आनंद मराठे, राजापुरातून प्रा. कांबळे, दापोलीतून प्रा. साठे, लवेलमधून प्रा. गद्रे, चिपळूणातून प्रा. अर्चना बक्षी कार्यरत होत्या. याच कालखंडात जिल्ह्यात व्यावसायिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढला. सन १९९६ ला श्रीधर फडके यांचा ‘ऋतू हिरवा’ आर्थिक कार्यक्रम आणि ११० विद्यार्थी संख्येचे धामणंद-खेड, मुरडे, कोळथरे, कोळीसरे, रानारी, तिवडी-चिपळूण येथील श्रमानुभव शिबिरांतून कार्यकर्ता ग्रामीण वातावरणाशी जोडला गेला. सन १९९७ च्या प्रतिभासंगम संमेलनाची सुरुवात पतितपावन मंदिरातून ग्रंथदिंडीने, राज्यातील ८०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली होती. हातात भगवा ध्वज, ग्यानबा तुकारामचा गजर, स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवरचे यथार्थ चित्रण करणारे चित्ररथ यामुळे दिंडी आकर्षण ठरली होती. शहरातील शिर्के प्रशालेच्या प्रांगणात संमेलनासाठी स्वा. सावरकर नगरी उभारण्यात आली होती. या संमेलनाला उद्घाटक मंगेश पाडगावकर, डॉ. आनंद यादव, रमेश पतंगे, किशोर पाठक, अरुण म्हात्रे, रमेश कोटस्थाने, अंजली हर्डीकर, नितीन केळकर, प्रवीण दवणे, नामदेव कांबळे यांच्यासह सुधीर मोघे यांचा कविता पानोपानी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, द. मा. मिरासदार यांच्या तोंडून आचार्य अत्रे ऐकण्याचा अविस्मरणीय अनुभव, शब्दांशी असलेलं देण-घेण मानणाऱ्या पानिपतकार विश्वास पाटील यांची रंगलेली मुलाखत, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे तत्कालीन संचालक आणि आजचे राज्यसभा खा. विनय सहस्रबुद्धे यांनी समरसतेचा विचार मांडणारे साहित्य निर्माण व्हायला हवे हा समारोपाला दिलेला विचार घेऊन संमेलनाला उपस्थित राज्यभरातील सुमारे ७०० साहित्यिक आपापल्या गावी परतले होते, ह्या संमेलनाने परिषदेच्या रत्नागिरीतील कामाला नवा आकार प्राप्त करून दिला होता. यशस्वीतेसाठी प्रांत संघटनमंत्री रत्नाकर पाटील, सहसंघटनमंत्री संजय पाचपोर, प्रांताध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रांतमंत्री नरेंद्र पवार (कल्याणचे आमदार), प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. नरेंद्र पाठक, अतुल कुलकर्णी यांचा प्रवास, निमंत्रक अरविंद नाईक, स्वागताध्यक्ष जयंत देसाई, जयंत पटवर्धन, जयंत पुरोहित, जिल्हाप्रमुख संभाजी आंब्रे, शहराध्यक्ष प्रा. घळसासी, शहरमंत्री सुषमा कोतवडेकर, प्रतिभासंगम प्रमुख जयवंत धुमाळ, निधीप्रमुख अमित करंदीकर, विश्वास वाडेकर, धीरज वाटेकर, अॅड़. संदेश चिकणे, अॅड़. समीर आठल्ये, मंदार दामले, यशवंत सोहोनी, अभिजित जेधे या प्रमुख कार्यकर्त्यांसह विभाग संघटनमंत्री शिवाजी दहीबावकर, जिल्हा संघटनमंत्री निरंजन काळे, पालक शुभांगी पुरोहित, प्रदीप कुलकर्णी आदींसह सुमारे २५० कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमातून संमेलन यशस्वी झाले. ‘नियोजन-व्यवस्था-भोजन’ या तीनही कसोट्यांवर हे संमेलन कमालीचे यशस्वी ठरले. संमेलनातून १५ लाख रुपयांचा निधी जमा झाला होता. या संमेलनात कार्यकर्ता म्हणून काम केलेला प्रत्येकजण आजही प्रतिभासंगमची आठवण निघाली की त्या संस्मरणीय आठवणीत रमतो, त्या आठवणी जगतो आहे. यानंतरच्या कालखंडात ज्योती रेगे, बलराज जोशी हे पूर्णवेळ कार्यकर्ते, उत्तम पाटील, चारुदत्त देशपांडे हे विद्यार्थी विस्तारक लाभले. सन १९९९ ला ‘मतदार राजा जागा हो’ द्वारे जिल्ह्यात १० गेटसभा, ३० कॉलेजच्या माध्यमातून ५० हजार पत्रकांचे वाटप करण्यात आले. याचे नेतृत्व संभाजी आंब्रे, मंदार गानू, रामचंद्र केळकर यांनी केले. याकालखंडात मकरंद दामले, मंदार दामले, विश्वास वाडेकर, सोनाली गानू, संभाजी आंब्रे, अॅड़. संदेश चिकणे, धीरज वाटेकर, अॅड़. समीर आठल्ये, निवेदिता करंबेळकर, नूतन करंबेळकर, नेत्रा करंबेळकर, सुषमा यादव, मंदार दामले, यशवंत सोहोनी, जयेश शेट्ये, अभिजित जेधे, स्वप्नील सावंत, कै. विवेक पवार, पल्लवी मुळ्ये, गणपतीपुळेच्या ‘प्राचीन कोकण’चे संचालक वैभव सरदेसाई, आश्विनी केतकर, सुचिता भागवत, शलाका मुकादम, अमिता मुळ्ये, वृंदा गद्रे, मिनाक्षी नामजोशी, विद्या परुळेकर, राजेश गोसावी, प्रसाद भुर्के, क्षमा सातवळेकर, कमाल गद्रे, रमेश हर्चे, मनोज बाईंग, विनोद पवार, मंजिरी पेठे, कै. शबरी पाटणे, निलेश ठाकूर, स्वरूपा हेगशेट्ये, अमोल तांबे, अमित तांबे, युवराज पेठे, निनाद जोशी, प्रमोद कांबळे, विक्रम फडके, अमोल कदम हे कार्यकर्ते कार्यरत होते.     

सन २००० ते २०१० या दरम्यान निनाद जोशी, स्वप्नील सावंत, कै. विवेक पवार, धीरज वाटेकर, अभिजित जेधे, अॅड़. समीर आठल्ये, पल्लवी मुळ्ये, वैभव सरदेसाई, आश्विनी केतकर, स्वरूपा हेगशेट्ये, प्रमोद कांबळे, अमित तांबे, अमोल तांबे, युवराज पेठे, अमोल कदम, विक्रम फडके, निवेदिता करंबेळकर, नूतन करंबेळकर, नेत्रा करंबेळकर, सुषमा यादव, स्वाती करमरकर, विठ्ठल रावनंग, समीर रावनंग, स्नेह बापट, अजय इदाते, मनीषा शेवडे, अॅड़. महेंद्र मांडवकर, प्रणिता नामजोशी, रत्नप्रभा रहाटे, प्राची साळवी, अमेय हर्डीकर, नीता जाधव, जयेश हर्डीकर, भाग्यश्री रायकर, गौरीप्रसाद जोशी हे तर सन २०१० नंतर संकेत देवस्थळी, अनिरुद्ध परांजपे, मानसी मुळ्ये, निकिता राणे, अपूर्वा सरपोतदार, सतीश सूर्यवंशी हे कार्यकर्ते प्रामुख्याने कामात होते. या कालखंडात सुचिता देशपांडे, विवेक शिरोडे, अमोल पाठक (लोकसभाध्यक्ष खा. सुमित्रा महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक), दत्ता मिसाळ, विलास बोरसे, योगेश कुलकर्णी, मयुरी वायगुडे हे पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत राहिले. सध्या संतोष तोनशाळ, प्रेरणा पवार हे पूर्णवेळ कार्यकर्ते कार्यरत आहेत. अध्यक्ष म्हणून या कालखंडात प्रा. महेश नाईक, प्रा. सुधीर येवले, प्रा. श्रीकांत दुधगीकर, प्रा. प्रभात कोकजे, जिल्हाप्रमुख म्हणून अमेय हर्डीकर, प्रमोद कांबळे, संकेत देवस्थळी, प्रा. श्रीकांत दुधगीकर, साईजित शिवलकर, विभाग संघटनमंत्री शिवाजी दहिबावकर, शरद चव्हाण, मिलिंद आरोलकर, यदुनाथ देशपांडे यांनी तर प्रांत आणि क्षेत्रीय संघटनमंत्री म्हणून देवदत्त जोशी गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.

सन २००५ साली मंदार सावंतदेसाई, सन २०१० साली अॅड़. संदेश चिकणे या परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक लढविली होती. ५ ऑगस्ट २००५ रोजी कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पुनर्मुल्यांकन आणि झेरॉक्स या करिता आंदोलन छेडले होते. जून २००८ मध्ये दापोलीत प्रांत समीक्षा बैठक आणि पूर्णवेळ कार्यकर्ता वर्ग संपन्न झाला.जुलै २००९ मध्ये राजिवडा-रत्नागिरी आय.टी.आय.चे प्राचार्य  यांना फी-वाढीविरोधात घेराव घालण्यात आला होता. जानेवारी २०१५ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे ‘प्रदेश कार्यकारिणी बैठक’ संपन्न झाली. तिला प्रांतातून १२५ प्रतिनिधी आणि त्या बैठकीच्या व्यवस्थेकरिता ५० कार्यकर्ते कार्यरत होते. यावेळी सुनीलजी आंबेकर, प्रा. मिलिंद मराठे, संजय पाचपोर उपस्थित होते. झारेवाडी-रत्नागिरी, शिपोशी-लांजा, बुरंबी-देवरुख, अलोरे याठिकाणी श्रामानुभव शिबिरे या कालखंडात संपन्न झाली. २०१५ मध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘युगंधरा विद्यार्थीनी संमेलन’ संपन्न झाले. जिल्ह्यातून याला २०० विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या संपूर्ण कालखंडात २५ डिसेंबर २०१५ ला परिषदेच्या महाराष्ट्र प्रांताचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन संपन्न झाले. यावेळी स्वतंत्र ‘कोकणप्रांत’ घोषणा होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी असे दोन जिल्हे त्यांचे केंद्र अनुक्रमे चिपळूण आणि रत्नागिरी घोषित करण्यात आले. या अधिवेशनाला ५० कार्यकर्ते आणि ७ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. जानेवारी २०१७ मध्ये दापोलीत ‘कोकण प्रांत कार्यकारिणी बैठक’ संपन्न झाली. यानंतर लोटे येथील परशुराम आर्युवेद महाविद्यालयात ‘पंचकर्म आर्युवेद काळाची गरज’ याविषयावर कार्यशाळा संपन्न झाली, त्यास १०० रुपये शुल्क भरून १३० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळा प्रमुख डॉ. प्रेमदास चव्हाण, तर डॉ.अमोल कदम, डॉ. नचिकेत वाचासुंदर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या सुरुवातीपासून प्राचार्य सुभाष देव, शुभांगीताई पुरोहित, प्रदीप कुलकर्णी, नरेंद्र घाडीगावकर यांनी ‘पालक’ या नात्याने सतत अनेक वर्षे न विसरता येणारे योगदान दिलेले आहे. त्यानंतरच्या अलिकडच्या कालखंडात डॉ. अजित जोग, संभाजी आंब्रे, निनाद जोशी, प्रा. अर्चना बक्षी, धनंजय साठे, सौरभ बोडस, विश्वास वाडेकर, स्वप्निल सावंत हेही या विषयाची जबाबदारी सांभाळून आहेत. सन डिसेंबर २०११ मध्ये लातूरला परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. सुमारे ६०० जुने कार्यकर्ते-प्रतिनिधी संमेलनास उपस्थित होते. आपल्या सोबत बेभानपणे काम केलेल्या सवंगड्यांना भेटणे हा संमेलनाचा आपसूकच बनलेला हेतू अनेकांचा साध्य झाला. मुंबईतील ५० व्या प्रदेश अधिवेशनातही ‘पूर्व कार्यकर्ता एकत्रीकरण’ झाले होते. दोन्ही वेळेला जिल्ह्यातून पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेच्या प्रेरणेतून आजवर जिल्ह्यातून अकल्पिता सरदेसाई, श्रीरंग जांभळे, कै. किशोर पुरोहित, शलाका पाटील-मोरे, स्वाती करमकर-रानडे, विक्रम फडके, स्वप्नील सावंत, प्रणिता नामजोशी, मनिषा शेवडे, रत्नप्रभा रहाटे, सतीश सूर्यवंशी, गौरीप्रसाद जोशी, संकेत देवस्थळी हे पूर्णवेळ कार्यकर्ते राज्यात कार्यरत झाले.  

सन १९८५ नंतर ३२ वर्षांनी २७ ते २९ डिसेंबरला रत्नागिरीत अधिवेशन होत आहे. रत्नागिरी अधिवेशनासाठी कोकण प्रांतातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या नावाने अनेकांचे महाविद्यालयीन जीवन व्यापून टाकले आहे. शिबिरे, सहली, अभ्यासवर्ग म्हणजे परिषदेचे काम हा प्राथमिक समज जसजसे आपण कामात अधिक समरस होत जातो तसतसा व्यापक होत जातो, संघटनेचे अनेकविध पैलू समजत जातात. परिषदेच्या कामाची पाच-सहा वर्षांची शिदोरी पुढे जीवनात सदैव उपयोगीच पडते, असा अनेकांचा अनुभव आहे. आपण ज्या काळात काम केले तो ‘अभाविप’चा ‘सुवर्णकाळ’ होता, असे स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे तो त्या कार्यकर्त्याच्या आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा ‘सुवर्णकाळ’ असतो. हा सुवर्णकाळ जगलेले अनेक ‘पूर्व कार्यकर्ते’ या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आपला थोडा वेळ समाजासाठी देऊ पाहाणाऱ्या वर्तमान महाविद्यालयीन तरुणाईनेही त्यांच्यासारखेच आपल्या कार्यक्षम जीवनातील काही काळाच्या समाजसेवेच्या समिधा अर्पिण्यासाठी कार्यरत होण्याची पहिली पायरी हे अधिवेशन ठरू शकते. त्यासाठी नवतरुण कार्यकर्ते बंधू-भगिनींना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा !   

धीरज वाटेकर (पूर्व कार्यकर्ता)

‘अभाविप’च्या ५२ व्या कोकण प्रदेश अधिवेशन निमित्ताने...

(टीप : या लेखातील मुद्द्यांसंदर्भात, आपला पूर्व कार्यकर्ता बंधू संभाजी आंब्रे याने अनेक पूर्व कार्यकर्ते, प्राध्यापक, पूर्णवेळ कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला होता. अजूनही हा लेख आपल्याला अपूर्ण वाटू शकतो. आगामी काळात हे लेखन सर्वार्थाने परिपूर्ण व्हावे यासाठी पूर्व कार्यकर्त्यांनी आपले काही अनुषंगिक अनुभव कृपया dheerajwatekar@gmail.com येथे पाठवावेत आणि ‘अ.भा.वि.प.’ची रत्नागिरीतील पाच दशकांची वाटचाल ! हा लेख अधिक परिपूर्ण होण्यासाठी आपले योगदान द्यावे. धन्यवाद.)

                                          


रविवार, २४ डिसेंबर, २०१७

अटलजी ! भारतीय राजकारणाचे भीष्म पितामह !







धीरज वाटेकर

अटल प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या सन २०१३ साली 
प्रकाशित झालेल्या स्मरणिकेतील विशेष लेख !



शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारे संघटन

‘अभाविप’च्या ५२ व्या कोकण प्रदेश अधिवेशन निमित्ताने... 

साधारणतः १६ ते २१ या वयोगटातील युवक हा शारीरिक आणि मानसिक बदलातून जात असतो. या वयात, विद्यार्थी मनात ‘असंतोष’ निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नकारात्मक प्रभावाने व्यापण्याची शक्यता असते. आज आपल्याकडे पारंपारिक कुटुंबपद्धतीही जवळपास नाहीशी झाली आहे. युवा वर्गात एक ‘प्रतिसंस्कृती’ निर्माण होऊ पाहाते आहे. साधारणतः या वयातला युवक हा शिक्षणाबरोबरच स्वतःचे अवलंबित्व संपवून, स्वायत्तता आणि जबाबदारी पेलण्यासाठी किमान वैचारिक स्तरावर धडपडत असतो. अशा अवस्थेतील युवकांनी सकारात्मक विचारांनी भारलेल्या युवा चळवळीला भावनिक प्रतिसाद देत तिच्यावर बौद्धिकश्रद्धा दाखवून आपली तारुण्यसुलभ उर्मी जगायला प्रारंभ केला की त्यातून पुढे राष्ट्राला, समाजाला काहीतरी ‘ठोस’ देण्याची क्षमता असलेलेच कार्यकर्ते घडतात. राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचे स्वप्न उराशी बाळगून गेली ७० वर्षे अशी वैशिष्ट्यपूर्ण आणि सदैव कार्यरत, देशासाठी जगण्याची प्रेरणा देणारी तरुणाई घडविणारी विद्यार्थी संघटना म्हणून जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेकडे पाहिले जाते. या संघटनेच्या कोकण प्रदेशाचे ५२ वे अधिवेशन दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१७ दरम्यान रत्नागिरीत संपन्न होते आहे, त्या निमित्ताने...!

‘दिशा भविष्याची, कौशल्यपूर्ण शिक्षणाची’ हे या अधिवेशनाचे मुख्य सूत्र आहे. आज संपूर्ण जग, सर्वाधिक तरुणाईच्या जोरावर संधीचा देश बनलेल्या भारताकडे मोठ्या आशेने बघते आहे ! देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण आणि वय ३५ वर्षांच्या आतली आहे. कोकणातील या तरुणाईला कौशल्यपूर्ण शिक्षणाची भविष्यातील दिशा या अधिवेशनात स्पष्ट केली जाणार आहे. भूतकाळात रमणारी, सदैव घडून गेलेल्या घटनांविषयी बोलणारी आणि आठवणी सांगत बसणारी व्यक्ती आपले तारुण्य गमावून प्रौढत्व आणि वृद्धत्वाकडे झुकलेली असते. ‘अभाविप’ तरुणाईला भविष्यातल्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी सतत विविध रचनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवृत्त करत असते आणि एकदा का या वयात तरुणाच्या रक्तात ही सदैव ‘कार्यरत’ राहाण्याची शैली शिरली की मग तो तरुण उर्वरित आयुष्यातही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेचा विचार करत, त्याचा ध्यास घेत, स्वप्नांना साकार करण्यासाठी अविश्रांत कठोर मेहनत करताना, यशस्वी होताना दिसतो. संपूर्ण देशभरात डोळसपणे पाहिल्यास राष्ट्रहिताचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य उभे करणारी, तो विचार घेऊन जगणारी अशी तरुणाई आपल्याला दिसेल. सामर्थ्यशाली युवक सामर्थ्यवान राष्ट्र निर्मिती करू शकतो. एकविसावे शतक आशियाचे शतक आहे, ते भारताचे कसे बनू शकते ? त्यासाठी युवाशक्तीला कौशल्य विकासाच्या प्रवाहात आणून विकासाची नवनवी शिखरे गाठण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. आज कला-कौशल्य माध्यमातून भारत उत्पादनाचे मोठे केंद्र शकतो आहे. याचा सारासार विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने ‘कौशल्य विकास’ या विषयाला अतिशय महत्त्व दिले आहे. बुद्धीचे काम हे श्रेष्ठ, महत्वाचे आणि हाताचे, कष्टाचे काम हे कमी दर्जाचे ही मानसिकता आम्हाला बदलावी लागणार आहे. ‘आपल्यापैकी खूप कमी जणांच्या आईला बुद्धीचे काम करण्याची संधी मिळाली असेल तरीही आपण आपल्या आईचा सन्मान करतो’ असा मुद्दा खुद्द पंतप्रधानांनीच मांडून हाताच्या आणि कष्टाच्या कामाचा, श्रमाचा आपण सन्मान करायला हवा, अशी समानतेची भूमिका मांडलेली आहे, जी अतिशय योग्यच आहे. आज स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठीची ताकद ही पारंपरिक पदवी शिक्षणापेक्षा कौशल्य शिक्षणात अधिक आहे. तिला अनुसरून समाजात बदल घडायला हवा आहे, त्यासाठी तो सर्वप्रथम तरुणाईत उतरायला हवाय. त्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडणे शक्य आहे. हा दूरगामी विचार या अधिवेशनात चर्चिला जाणार आहे.

आपल्याकडे आपला संकल्प पूर्ण करण्यासाठीचा आवश्यक समर्पण भाव असेल, त्यासाठी जीवन अर्पण करण्याची, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वय महत्वाचे ठरत नाही. लहान वयात मोठं कार्य उभे केलेल्या स्वामी विवेकानंदांना प्रेरणास्थानी मानून त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण करू पाहाणारी, दिनांक ९ जुलै १९४९ मध्ये रा. स्व. संघाच्या मोजक्या प्राध्यापकांनी स्थापन केलेली ही संघटना आज संघपरिवारम्हणून ओळख असलेल्या संघटनांपकी एक बहुचर्चित देशव्यापी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना बनली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने संगोपन झालेले, आहार, राहाणीमान, भाषा, पेहेराव वेगवेगळे असलेल्या संपूर्ण देशातील तरुणाईला, स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून सर्वांना प्रेरणादायी असलेल्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या मंत्रघोषाने एका धाग्यात गुंफण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. या मंत्राने पूर्वी तरुणाईला भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्याची ताकद दिली, आणि आज स्वतंत्र भारताला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी, विकासाची नवनवी शिखर गाठण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, भारतातील गावे, गरीब शेतकरी, मजूर अशा सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची प्रेरणा हाच मंत्र देतो आहे. सन १९६०च्या दशकात महाराष्ट्रात स्वर्गीय यशवंतराव केळकर, सुरेशराव मोडक असे प्राध्यापक-शिक्षक कार्यकत्रे, बाळ आपटे, पद्मनाभ आचार्य, अनिरुद्ध देशपांडे, अरविंद वैशंपायन, प्रभाकर देसाई   असे धडाडीचे विद्यार्थी कार्यकर्ते, मदनदास यांच्यासारखे पूर्णवेळ कार्यकत्रे झपाटल्यासारखे कार्यरत झाले होते. अखिल भारतीय विद्यापीठात प्रवास, गाठीभेटी, बैठका, प्रवास, विद्यार्थी सत्कार, संगीत, शास्त्रीय संगीत, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धा, विविध स्थानिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांची आंदोलने, महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलने, विविध गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी, अधिवेशन, अभ्यासवर्ग, कार्यकारिणी, प्रवास, डिपेक्स, प्रतिभासंगम आदि कार्यक्रम-उपक्रमांमुळे या सकारात्मक चळवळीवर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांच्या देशभर पिढय़ाच्यापिढय़ा निर्माण झाल्या. स्वर्गीय यशवंतराव केळकर हे विद्यार्थी परिषदेच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक होत. आमच्या पिढीने त्यांना पाहिलेलं नाही, परंतु त्यांची सार्वजनिक आयुष्यातील आपल्या उक्ती आणि कृतीत पराकोटीची एकरूपता, स्वप्नांना दृष्टी देणारे, समाजाच्या गतीचं चालण्यीचं भान बाळगणारे, अगदी निरेपक्ष, निरहंकारी साधा प्राध्यापक अशी मनावर बिंबलेली प्रतिमा आजही आम्हाला आम्हीच सन १९९८ मध्ये लिहिलेल्या ‘आज यशवंतराव हवे होते’ या एका लेखाच्या मथळ्याची आठवण करून देते. एकाच वैचारिक सूत्राने बांधलेल्या आजी-माजी कार्यकर्त्यांची देशव्यापी साखळी हे अभाविपच्या आजवरच्या यशाचे गमक मानले जाते.

सन १९६४-६५ पासून रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात सदस्यता नोंदणी होऊन प्रा. मुळ्ये, प्रा. शेवडे यांच्या प्रयत्नातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरु झाले. प्रा. यशवंतराव केळकर यांच्यासहित सध्याचे आसाम आणि नागालँड या राज्यांचे राज्यपाल असलेले  पद्मनाभ आचार्य, सदाशिवराव देवधर, बाळासाहेब आपटे हे रत्नागिरीतील काम वाढावे म्हणून अनेकदा मुंबईतून त्याकाळी प्रवास करीत असत. केंद्रीय भटक्या-विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, ‘कृषिभूषण’ स्वर्गीय रणजितराव खानविलकर हे रत्नागिरी शाखेचे अगदी सुरुवातीचे कार्यकर्ते होत. सन १९७० ला रत्नागिरी शहर शाखा सुरु होऊन शहरमंत्री ही जबाबदारी माधव ठाकूर ह्या कार्यकर्त्याने सांभाळली होती. गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबीर यांसारख्या उपक्रमातून काम वाढत गेले. सन १९८० ला रत्नागिरीत ‘कोकण विभाग अधिवेशन’ संपन्न झाले होते. परिषदेचे पहिले कार्यालय गोखले नाका येथे आचरेकरांच्या माडीवर होते. त्यानंतर पासून, ते सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आजगावकरवाडी येथे आहे. सन १९८२ साली प्रांतस्तरीय पतितपावन मंदिर (रत्नागिरी) ते काळाराम मंदिर (नाशिक) अशी ‘समता ज्योत यात्रा’ काढण्यात आली. या दरम्यान रत्नागिरीला पहिली पूर्णवेळ ‘शुभांगी पुरोहित’ यांच्या रूपाने मिळाली, त्या परिषदेच्या पहिल्या महिला पूर्णवेळ होत. तेव्हापासून रत्नागिरीत परिषदेचे संघटनात्मक काम वाढते राहिले असून आजतागायत त्यातील विद्यार्थीनी सहभाग लक्षणीय आहे. आपल्या महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी परिषदेचे काम केल्यानंतर संघटना सांगेल तेथे, सांगेल त्या स्वरूपाचे काम समर्पण भावनेने एका निश्चित कालावधीपर्यंत करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘पूर्णवेळ कार्यकर्ते’ म्हटले जाते. अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान रत्नागिरीतील काम वाढण्यासाठी मिळालेले आहे. सन १९८५ साली प्रा. यशवंतराव केळकर यांच्या ६१ वर्षे वयपूर्तीचा कार्यक्रम रत्नागिरीत झाला होता, त्यावेळी येथून ६१ हजार रुपयांचे निधी संकलन करण्यात आले होते. प्रांत अधिवेशन, सन १९९१ च्या काश्मीर आणि आसाम बचाव आंदोलनात सहभाग, सन १९९३ चा विराट मोर्चा, ‘स्वामी विवेकानंद संदेश यात्रा’, श्रमानुभव शिबीरे, विविध आर्थिक कार्यक्रम आणि सन १९९७ च्या ‘प्रतिभासंगम’ संमेलनाने परिषदेच्या रत्नागिरीतील कामाला नवा आकार प्राप्त करून दिला होता. राज्यातून ८०० विद्यार्थी साहित्यिकांची उपस्थिती लाभलेल्या या संमेलनात कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या २५० जणांपैकी प्रत्येकजण आजही प्रतिभासंगमची आठवण निघाली की त्या संस्मरणीय आठवणीत रमतो, त्या आठवणी जगतो.   
   
परिषदेचे काम केलेले जुने कार्यकर्ते ‘पूर्व कार्यकर्ता’ म्हणूनही अत्यंत जबाबदारीने आपले योगदान देत संघटनेचे काम सतत प्रवाही कसे राहील यासाठी प्रयत्नरत असतात. या प्रामुख्याने पूर्णवेळ कार्यकर्त्यांची व्यवस्था, आर्थिक तरतूदी, निरनिराळ्या व्यवस्था आदींचा समावेश होतो. ‘परिषदेचे काम हे पवित्र काम आहे’ हा विचार एकदा का मनावर पक्का बिंबला की तो कार्यकर्ता सदैव आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आपले शक्य ते योगदान देत राहतो. देशासाठी काही क्षण जगण्याची प्रेरणा देणारा, त्याच्या अंतरंगात भिनलेला विचार कार्यकर्त्याला सदैव कार्यरत ठेवत असतो. अशा असंख्य पूर्व कार्यकर्त्यांचे पाठबळ जबाबदारीने आजही संघटनेच्या मागे उभे आहे, विशेष म्हणजे या साऱ्या भाव-भावना जपाण्यामागे एक संस्काराचा घट्ट धागा विणला गेला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी अधिवेशनासाठी कोकण प्रांतातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सन १९८५ नंतर ३२ वर्षांनी रत्नागिरीत अधिवेशन होत आहे. कौशल्य विकासासोबत नवीन विद्यापीठ कायदा, राष्ट्रीय शिक्षण धोरण, मुंबई विद्यापीठ उपकेंद्र समस्या, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आदी समस्यांवर चर्चा, अनुभवकथन, सांकृतिक कार्यक्रम, शोभायात्रा आणि नूतन कोकण प्रदेश कार्यकारिणी निवड आदि कार्यक्रम या अनुषंगाने  होणार आहेत. वर्तमान कार्यकर्त्यांसोबत ज्यांनी आपल्या तरुणपणात सामाजिक चळवळीच्या आयुष्याचा श्रीगणेशा अभाविपपासून केला असे कोकणातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहाणार आहेत.

तरुणांच्या सक्रीय सहभागानेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७० वर्षानंतरही  आपल्याला अजूनही जातिव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता, गरिबी, अज्ञान, भ्रष्टाचार आणि कुशासन यांसारख्या विषयात अजूनही मोठे काम करावे लागणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवणे हे या सर्वांतील अगदी पहिले काम होते, त्यानंतरच्या काळात विविध प्रश्नांना भिडणारी तरुण पिढी उभी करण्याचे ‘अभाविप’चे काम, व्रत म्हणून सुरूच आहे, आपला थोडा वेळ समाजासाठी देऊ पाहाणाऱ्या वर्तमान महाविद्यालयीन तरुणाईने आपल्या कार्यक्षम जीवनातील काही काळाच्या समिधा अर्पिण्यासाठी कार्यरत व्हायला हवे. त्याची पहिली पायरी हे अधिवेशन ठरू शकते. देशहितासाठी जगण्याची प्रेरणा घेऊ पाहाणाऱ्या या पिढीच्या नवतरुण कार्यकर्ते बंधू-भगिनींना त्यांच्या पुढील कामांसाठी शुभेच्छा !   

धीरज वाटेकर (पूर्व कार्यकर्ता)







नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...